• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

सुरक्षित मार्गांवर: कवच आणि एआय भारतातील रेल्वे सुरक्षा कशी करत आहेत मजबूत

Posted On: 06 FEB 2026 1:55PM

 

ठळक मुद्दे 

• कवच ही स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) सिस्टीम आहे जी रेल्वेगाड्यांना सुरक्षा तसेच टक्कर प्रतिबंधक क्षमता प्रदान करते.

• कवच आता 2,200 पेक्षा जास्त मार्ग किलोमीटरवर लागू करण्यात आली आहे.

• कवच 4.0 आता पाच भारतीय रेल्वे झोनमध्ये 1,300 पेक्षा जास्त मार्ग किलोमीटर व्यापते.

• वंदे भारत 4.0 मध्ये प्रगत सुरक्षा आणि तंत्रज्ञान चौकटीचा भाग म्हणून कवच 5.0 ला समाविष्ट करण्याची कल्पना आहे.

प्रस्तावना

प्रत्येक रेल्वे प्रवासात एक खोल मानवी वचन असते: कुटुंबे पुन्हा एकत्र येतील, कामगार घरी परततील आणि विद्यार्थी सुरक्षितपणे पोहोचतील. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे सध्याच्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठ्या परिवर्तनातून जात आहे. वाढत्या रेल्वे वाहतुकीसह आणि नेटवर्कची गतिक्षमता वाढवण्याच्या योजनांसह, सुरक्षिततेशी तडजोड न करता रोलिंग स्टॉक, ट्रॅक, ट्रॅक्शन पॉवर आणि सिग्नलिंग सिस्टमसह विद्यमान मालमत्तांची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

या सुरक्षा क्रांतीचे नेतृत्व कवच करत आहे, ही भारताची स्वदेशी विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) म्हणजेच स्वयंचलित रेल्वेगाडी सुरक्षा प्रणाली आहे. प्रगत एआय-सक्षम देखरेख आणि भविष्यसूचक साधनांसह, कवच रेल्वेला एक सुरक्षा परिसंस्था तयार करण्यास मदत करत आहे जी प्रत्येक वर्षी मजबूत, जलद आणि अधिक विश्वासार्ह बनत आहे.‌ 

परिणाम स्पष्ट आहेत: याचा परिणाम म्हणून रेल्वे अपघातांमध्ये झपाट्याने घट झाली आहे, 2014-15 मधील 135 वरून 2024-25 मध्ये 31 आणि 2025-26 मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) 11. या सुधारणा अपघात प्रतिबंध, आधुनिक तंत्रज्ञान गुंतवणूक आणि प्रत्येक प्रवास जितका सुरक्षित आहे तितकाच आवश्यक आहे याची खात्री करण्यासाठी वचनबद्धतेवर सतत लक्ष केंद्रित करण्याचे प्रतिबिंबित करतात.

या सुरक्षिततेच्या परिवर्तनाला शाश्वत आर्थिक गुंतवणुकीमुळे बळकटी मिळाली आहे. भारतीय रेल्वेने 2013-14 मध्ये सुरक्षेवरील खर्च 39,200 कोटींवरून 2022-23 मध्ये 87,336 कोटी, 2023-24 मध्ये 1,01,662 कोटी, 2024-25 मध्ये 1,14,022 कोटी आणि 2025-26 मध्ये 1,17,693 कोटी इतका सातत्याने वाढवला आहे, ज्यामुळे रेल्वे नेटवर्कमधील सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन वचनबद्धता अधोरेखित होते.

कवच म्हणजे काय?

कवच ही एक स्वयंचलित परिस्थितीजन्य जागरूकता प्रणाली आहे जी रेल्वेगाडी संरक्षण आणि अपघात प्रतिबंधक क्षमता प्रदान करते. ती मानवी चुकांमुळे, ऑपरेशनल मर्यादांमुळे आणि उपकरणांच्या बिघाडांमुळे होणाऱ्या धोकादायक घटनांपासून संरक्षण करते, रेल्वेगाडी परिचालनामध्ये सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा स्तर जोडते. ही प्रणाली लोको पायलटना हालचालींचा अधिकार, लक्ष्य वेग, लक्ष्य अंतर आणि सिग्नल पैलू यासारख्या सिग्नलिंग माहितीच्या रिअल-टाइम इन-कॅब प्रदर्शनाद्वारे मदत करते, जे 120 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने सुरक्षित परिचालनासाठी आवश्यक आहेत.

भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएक्स ओ) द्वारे विकसित केलेले कवच हे धोक्याच्या वेळी सिग्नल पासिंग (एसपीएडी), जास्त वेग आणि टक्कर होण्यापासून गाड्यांचे संरक्षण करते. हा अतिरिक्त सुरक्षा स्तर प्रदान करून, ते भारतातील हाय-स्पीड आणि हाय-डेन्सिटी रेल्वे नेटवर्कमधील परिचालनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 

आपल्याला कवचची गरज का आहे?

पूर्वी, भारतीय रेल्वेवरील रेल्वेगाड्यांचे परिचालन प्रामुख्याने ट्रॅकसाईड सिग्नलिंग आणि मॅन्युअल कंट्रोलवर अवलंबून होते. आधुनिक इंटरलॉकिंग प्रणालीमुळे सुरक्षितता सुधारली असली तरी, रेल्वे चालवणे लोको पायलटच्या लाईन-साईड सिग्नल पाहण्याच्या आणि वेग नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिले. या मानव-आधारित प्रणालीला अंतर्निहित मर्यादा होत्या, कारण सिग्नल चुकवल्याने किंवा चुकीचा अर्थ लावल्याने गंभीर अपघात झाले.

पारंपरिक सिग्नलिंग प्रणालीमध्ये इन -कॅब परवानगी असलेला वेग, जाण्याचे अंतर, गाडीचे अचूक स्थान आणि ट्रॅक ग्रेडियंट याबद्दलच्या माहितीचा अभाव होता. रेल्वेमार्गाची वक्रता आणि प्रतिकूल हवामानामुळे सिग्नल दृश्यमानतेवर अनेकदा परिणाम होत असे, तर उच्च सुरक्षा मार्जिनमुळे गाड्यांमधील अंतर जास्त असणे आवश्यक होते, ज्यामुळे जाळ्याची क्षमता कमी होते. आगाऊ माहितीशिवाय ब्लॉक विभागांमध्ये काम केल्याने परिचालनाची जोखीम आणखी वाढत असे.

या आव्हानांसह, सिग्नल पासिंग ॲट डेंजर (एसपीएडी), उच्च वेगाने कमी होणारी प्रतिक्रिया वेळ, मर्यादित परिस्थितीजन्य जागरूकता आणि वारंवार धुके आणि कमी दृश्यमानता परिस्थिती, विशेषतः उत्तर भारतात, यामुळे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणालीची गरज वाढली.

गाडीचे स्थान, वेग आणि हालचालींचे अधिकार यांचे सतत निरीक्षण करण्यासाठी, असुरक्षित परिचालन टाळण्यासाठी, स्वयंचलितपणे हस्तक्षेप करण्यासाठी एटीपी प्रणाली विकसित करण्यात आल्या. वाढती वाहतूक घनता आणि उच्च कामकाज वेगामुळे रेल्वे जाळ्यामध्ये सुरक्षितता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी त्यांची तैनाती आवश्यक बनली.

या संदर्भात, कवच हे रेल्वे सिग्नलिंगमधील सर्वोच्च जागतिक सुरक्षा मानकांपैकी एक, सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल 4 (SIL-4) प्रमाणित, सतत रिअल-टाइम परिस्थितीजन्य जागरूकता आणि सुरक्षा पॅरामीटर्सची स्वयंचलित अंमलबजावणी प्रदान करून ही तफावत भरून काढते. ट्रॅकसाइड सिस्टम आणि स्वयंचलित हस्तक्षेपासह ऑनबोर्ड इंटेलिजेंस एकत्रित करून, कवच भारतीय रेल्वेवरील रेल्वेगाडी परिचालनाची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि मजबूती लक्षणीयरीत्या वाढवते.

कवचचे फायदे

• लोको पायलटसाठी वापरकर्ता-अनुकूल कॅब सिग्नलिंग.

• मल्टी-व्हेंडर इंटरऑपरेबिलिटी - एकाच पुरवठादारावर अवलंबून राहणे टाळते.

• विशिष्ट भारतीय रेल्वे आवश्यकता आणि परिस्थितींसाठी योग्य.

• धुक्याच्या हवामानात सुरक्षितता वाढवते.

• उच्च वेग असताना प्रभावी.

• रेल्वेगाडीच्या हालचालींचे केंद्रीकृत रिअल-टाइम निरीक्षण सक्षम करते.

कवच-कार्य तत्व

कवच हे सुरक्षित अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी (यूएच एफ) रेडिओ अँटेना आणि ट्रॅक-माउंटेड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आर एफ आय डी) टॅग्ज वापरून ट्रॅकसाइड सिस्टम आणि लोकोमोटिव्ह दरम्यान सतत रिअल-टाइम संप्रेषणाद्वारे कार्य करते. हे टॅग्ज ट्रेनचे अचूक स्थान उपलब्ध करून देतात, तर वेसाइड (स्थिर) युनिट्स स्टेशन इंटरलॉकिंग सिस्टममधून सिग्नल पैलू, पॉइंट पोझिशन्स, ट्रॅक ऑक्युपन्सी आणि मार्ग स्थितीसह थेट डेटा गोळा करतात.

या माहितीचा वापर करून गाडीची स्थिती, वेग आणि ट्रॅक प्रोफाइल (जसे की ग्रेडियंट्स आणि वेग मर्यादा) यासोबत वेसाईड सिस्टममुळे हालचाल अधिकाराची गणना केली जाते, गाडीला प्रवास करण्यास परवानगी असलेले सुरक्षित अंतर मोजले जाते आणि ते ऑनबोर्ड कवच युनिटला प्रसारित केले जाते. ऑनबोर्ड सिस्टम ट्रेनच्या वेगाचे सतत निरीक्षण करते, लोको पायलटसाठी महत्त्वाची माहिती प्रदर्शित करते आणि वेगवेगळ्या परिचालन परिस्थितींसाठी ब्रेकिंग कर्व्ह तयार करते.

समजा  गाडी धोक्याच्या सिग्नलजवळ पोहोचली, आणि या गाडीचा परवानगीपेक्षा   जास्त वेग वाढवला गेला असेल किंवा, ज्‍या लोहमार्गावर जायचे नाही, अशा  परस्पराच्या विरोधी मार्गावर गाडी  गेली, तर ‘कवच’ यंत्रणेमुळे  आपोआप ब्रेक लावला जातो.  यामुळे  धोक्याच्या वेळी सिग्नल पासिंग (एसपीएडी) आणि समोरासमोर होणारी संभाव्य धडक टाळता येते.  ब्लॉक सेक्शनमध्ये, जर दोन ट्रेन एकमेकांकडे जात असल्याचे आढळले, तर कवच कार्यप्रणालीमुळे दोन्ही गाड्यांना   स्वयंचलित स्टॉप-ऑन-साईट (एसओएस) चा आदेश  जारी केला जातो.

सर्वप्रकारच्या  गंभीर ‘ऑपरेशनल इव्हेंट्स सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम’ मध्ये पाठवल्या जातात, त्यामुळे नेटवर्क-व्यापी दृश्यमानता सुनिश्चित होते.  तर सुरक्षित संप्रेषण  आणि  कार्यपध्‍दतीचे प्रमाणीकरण यंत्रणेमुळे कार्यप्रणालीनुसार त्यामध्‍ये निरंतरता असते. कुठल्‍याची टप्प्‍यावर खंड पडत नाही.

कवच-सुरक्षा वैशिष्ट्ये

या ‘ऑपरेटिंग फ्रेमवर्क’ म्हणजेच कार्यान्‍वयन चौकटीद्वारे  कवच ‘बिल्ट-इन’ सुरक्षा कार्यपध्‍दती प्रदान केली जाते. त्‍यामुळे  अपघात रोखता येतात. गाडी चालकांच्या  जागरूकतेमध्‍ये  सुधारणा घडून येते  आणि स्वयंचलित हस्तक्षेप आणि ‘रिअल-टाइम’ म्हणजेच वास्तविक वेळेला होणा-या  देखरेखीद्वारे कार्यान्वयन  शिस्त पाळली जाते.  कवच कार्यप्रणालीतील  प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये  पुढील गोष्‍टींचा  समावेश  आहे -

• धोक्याच्या वेळी सिग्नल पासिंग (एसपीएडी ) शोधणे आणि प्रतिबंध करणे - सिग्नलच्या आधी गाडी  स्वयंचलितपणे थांबते.

- हालचाली अधिकार, लक्ष्य अंतर, वेग आणि सिग्नल या  पैलूंचे  प्रदर्शन  करून ‘कॅब सिग्नलिंग’ केले जाते.

- लोकोमोटिव्हला सतत वास्तविक वेळेची स्थिती दिली जाते.

-‘ टर्नआउट्स’ वर लागू केलेले  वेग निर्बंध पाळले जातात.

- कायमस्वरूपी वेग निर्बंधांचे पालन केले जाते.

- तात्पुरत्या वेगाच्या निर्बंधांचे पालन (चाचणी अंतर्गत) केले जाते.

- लेव्हल क्रॉसिंग गेट्सजवळ जाताना स्वयंचलित हॉर्न सक्रिय होतो.

-रोल बॅक / रोल फॉरवर्ड संरक्षण – यामुळे रेलगाडी  अनपेक्षित मागे किंवा पुढे हालचाल प्रतिबंधित करते, विशेषतः ग्रेडियंटवर किंवा थांब्यादरम्यान हे कार्य होते.

• गाड्यांच्या सर्व प्रकारच्या होणा-या  धडकेला  प्रतिबंध: समोरासमोर, मागील बाजूस आणि बाजूला.

-    गंभीर परिस्थितीत आपत्कालीन थांबण्‍याचा   (एसओएस) संदेश.

-    कार्यान्वयनाच्या  सुरक्षिततेसाठी गाडीच्या लांबीची गणना.

-  शंटिंग मर्यादेचे प्रमाणीकरण – वैधता निश्चित करणे.

-  नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम (एनएमएस) द्वारे रेल गाडीच्या हालचालींचे केंद्रीकृत थेट निरीक्षण.

‘कवच’ची उत्क्रांती

‘कवच’चा विकास आणि ही कार्यप्रणाली  टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात आणण्‍याचे काम  पद्धतशीर नियोजनाने  करण्यात आले.  प्रवासी गाड्यांवरील प्रारंभिक ‘फील्ड’ चाचण्या फेब्रुवारी 2016 मध्ये सुरू झाल्या. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्त्याने (आयएसए) केलेल्या कार्यान्वयनाचा  अनुभव आणि स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनाच्या आधारे, 2018-19  दरम्यान कवच  आवृत्ती 3.2 च्या पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांना मान्यता देण्यात आली.

दक्षिण मध्य रेल्वेवरील  1,465  पेक्षा जास्त मार्ग किलोमीटर आणि त्यातून मिळालेल्या अनुभवासह,  या  प्रणालीत  सलग सुधारणा आणि अद्ययावत करून  विकसित होत राहिली आहे. या विकासाचा शेवट सुधारित  आवृत्तीमध्‍ये  झाला.  त्यामुळे भारतीय रेल्वेच्या जाळ्यामध्‍ये  व्यापक अनुप्रयोगासाठी  ‘कवच’ ची कार्यक्षमता आणि योग्यता वाढली.

यानंतर, जुलै 2020 मध्ये ‘कवच’  ला राष्ट्रीय स्वयंचलित ट्रेन संरक्षण (एटीपी) प्रणाली म्हणून स्वीकारण्यात आले. अंमलबजावणीमध्ये पायाभूत सुविधा, ऑनबोर्ड आणि संप्रेषण-संबंधित क्रियाकलापांचा समावेश आहे. यामध्ये ट्रॅकसाइड, स्टेशन-आधारित आणि लोकोमोटिव्ह-बोर्न उपकरणे, तसेच विश्वसनीय प्रणाली ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी आवश्यक दूरसंचार आणि ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

कार्यान्वयनाचा अनुभव आणि स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनांवर आधारित सतत केल्या जाणा-या  सुधारणांमुळे जुलै 2024  मध्ये कवच आवृत्ती 4.0  ला मान्यता मिळाली. रेल्वे सुरक्षेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि भारताच्या वैविध्यपूर्ण आणि उच्च-घनता असलेल्या रेल्वे नेटवर्कच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. आवृत्ती 4.0  एक महत्त्वपूर्ण तांत्रिक झेप दर्शवते.

हे पद्धतशीर अद्ययावत  कवच 4.0  ला अधिक मजबूत, प्रतिसाद देणारे आणि भारतातील विविध आणि उच्च-घनता असलेल्या रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात तैनातीसाठी योग्य बनवले आहे.  स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (आयएसए) द्वारे या प्रणालीला जागतिक सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी देखील प्रमाणित केले  आहे.

उपनगरीय विभागांसाठी डिझाइन केलेली प्रगत सुरक्षा आणि ‘सिग्नलिंग’ प्रणाली, कवच 5.0  सुरू करण्‍याचा कार्यक्रम  एप्रिल २०२५ मध्ये जाहीर करण्यात आला.  यामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम हालचाल राखताना रेल्वे ऑपरेशन्सची वारंवारता वाढेल अशी अपेक्षा आहे. वंदे भारत 4.0 मध्ये कवच 5.0  समाविष्ट करण्याची कल्पना आहे.   ही यंत्रणा प्रगत सुरक्षा आणि तंत्रज्ञान चौकटीचा भाग म्हणून स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) सिस्टमची पुढील उत्क्रांती आहे,

‘कवच’ची रणनीती आणि प्रगती

जवळजवळ 96% रेल्वे वाहतूक उच्च-घनता नेटवर्क (एचडीएन) आणि जास्त प्रमाणात वापरात असलेले नेटवर्क (एचयूएन) मार्गांवरून केली जाते. ही वाहतूक  सुरक्षित व्हावी, हे  सुनिश्चित करण्यासाठी, कवच अंमलबजावणी रेल्वे मंडळाने निश्चित  केलेल्या प्राधान्यक्रमांनुसार  केंद्रीकृत पद्धतीने केली जात आहे:

• पहिले  प्राधान्य : नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा विभागांसह उच्च-घनता मार्ग, स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस) आणि केंद्रीकृत वाहतूक नियंत्रण (सीटीसी) सह 160 किमी प्रतितास वेगाने मोकळे केले जातात. ज्या ट्रॅकवर  गाड्या एकमेकांच्या जवळून धावतात आणि मानवी चुकांचा धोका जास्त असतो, तिथे क‍वच कार्यप्रणाली लवकर बसविण्‍यास प्राधान्‍य आहे.  

• दुसरे प्राधान्य : एबीएस  आणि सीटीसी सह जास्त प्रमाणावर वापरण्‍यात येणारे मार्ग -नेटवर्क.

• तिसरे प्राधान्य :एबीएस सह इतर प्रवासी उच्च-घनता असलेले मार्ग.

• चौथे प्राधान्य: उर्वरित सर्व रेल मार्ग.

व्यापक चाचण्यांनंतर, कवच कार्यप्रणाली आवृत्ती 4.0  सुरुवातीला 738  मार्ग किलोमीटरवर कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये दिल्ली-मुंबई मार्गावरील पलवल-मथुरा-नागदा विभाग (633 मार्ग किलोमीटर) आणि दिल्ली-हावडा मार्गावरील हावडा-वर्धमान विभाग (105मार्ग किलोमीटर) यांचा समावेश होता. त्यानंतर दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा दोन्ही मार्गिकेवरील  उर्वरित विभागांमध्ये कवच अंमलबजावणी हाती घेण्यात आली आहे.

चालू कामाच्या  विस्ताराचा एक भाग म्हणून, कवच आवृत्ती 4.0  गुजरातच्या बाजवा (बडोदे) आणि अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या विभागात कार्यान्वित करण्यात आली.  हे अंतर 96 मार्ग किलोमीटर  होते, त्यामुळे नवीन  प्रदेशांमध्ये कवच कार्यप्रणालीचा प्रवेश झाला.

जानेवारी 2026  मध्ये, भारतीय रेल्वेने एकाच महिन्यात,  एकाच दिवसात 472.3 मार्ग किलोमीटरवर कवच आवृत्ती 4.0  सुरक्षा प्रणाली स्थापित करून एक मोठा टप्पा गाठला आहे. हाँ  आतापर्यंतचा सर्वात जास्त मोठा टप्‍पा आहे. नव्याने समाविष्ट केलेल्या मार्गांमध्ये पश्चिम रेल्वेवरील बडोदे-विरार (344 किमी), उत्तर रेल्वेवरील तुगलकाबाद जंक्शन केबिन-पलवल (35 किमी) आणि पूर्व मध्य रेल्वेवरील मानपूर-सरमतनर (93.3  किमी) यांचा समावेश आहे. या विस्तारासह, कवच आवृत्ती 4.0 ने  आता पाच भारतीय रेल्वे झोनमधील 1,306.3  मार्ग किलोमीटर व्यापला आहे.  यामुळे दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गांसारख्या प्रमुख मार्गिकांवरील सुरक्षितता बळकट झाली . अतिरिक्त मंजूर कामांमुळे 2,667   मार्ग किलोमीटरपर्यंत कवचची व्याप्ती  वाढणार आहे.  या कामांची  अंमलबजावणी सुरू आहे.

स्वयंचलित ब्रेकिंग चाचण्यांद्वारे या प्रणालीची यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. वडोदरा-नागदा तसेच विरार-मुंबई सेंट्रल या मार्गांवर विस्ताराचे काम सुरू असून ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत 160 किमी प्रतितास वेगवाढीचे नियोजन करण्यात आले आहे.

एकूणच, ‘कवच’ प्रणालीची अंमलबजावणी 2,200 हून अधिक मार्ग किलोमीटरवर करण्यात आली असून, भारताच्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीचा राष्ट्रीय रेल्वे जाळ्यावर सातत्याने आणि वेगाने विस्तार होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाधारित सिग्नलिंग आणि दूरसंचार उपाययोजना:

कार्यकारी सुरक्षितता वाढविणे, संवादव्यवस्थेची विश्वसनीयता सुधारणे आणि प्रवासी माहिती प्रणाली अधिक सक्षम करणे या उद्देशाने भारतीय रेल्वे रेल्वे जाळ्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करत आहे. ‘कवच’सह या उपक्रमांमुळे पारंपरिक सुरक्षा प्रणालींना पूरक आधार मिळत असून, रिअल-टाइम निरीक्षण, पूर्वानुमानित देखभाल, स्वयंचलित सूचना, मानवी हस्तक्षेपावरील अवलंबित्वात घट, प्रणाली प्रतिसादक्षमता वाढ आणि अपघात प्रतिबंध यांना बळकटी मिळत आहे.

• एआय-सक्षम अतिक्रमण शोध प्रणाली (आयडीएस)

डिस्ट्रीब्युटेड अ‍ॅकॉस्टिक सेन्सिंग (डीएएस) तंत्रज्ञानावर आधारित एआय-सक्षम अतिक्रमण शोध प्रणाली विकसित करण्यात आली आहे. संवेदनशील रेल्वे मार्गांवर हत्ती व इतर वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते. वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत ही प्रणाली रिअल-टाइम सूचना देऊन लोको पायलट, स्टेशन मास्टर आणि नियंत्रण कक्षांना इशारा पाठवते, ज्यामुळे टक्कर होण्याचा धोका कमी होतो.

ईशान्य सीमांत रेल्वेवर 141 मार्ग किलोमीटरवर कार्यान्वित

अतिरिक्त 981 मार्ग किलोमीटरसाठी निविदा प्रदान

वन्यप्राण्यांच्या, विशेषतः हत्तींच्या हालचाली रोखण्यासाठी लेव्हल क्रॉसिंगवर ‘हनी बी बझर’ उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांमधून निर्माण होणारा ध्वनी हत्तींना दूर करण्यास साहाय्यकारी ठरतो. तसेच रात्री किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत सरळ मार्गांवर वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखण्यासाठी थर्मल व्हिजन कॅमेऱ्यांचा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे.

• व्हिडिओ सर्व्हेलन्स प्रणाली (व्हीएसएस):

1,731 रेल्वे स्थानकांवर व्हिडिओ सर्व्हेलन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालींमध्ये एआय-आधारित व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्स (व्हीए) आणि फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर (एफआरएस) समाविष्ट असून, अतिक्रमण, संशयास्पद वावर यांसारख्या घटनांची स्वयंचलित ओळख शक्य होते.

• एआय-आधारित पूर्वानुमानित देखभाल व तपासणी:

निवडक स्थानकांवर सिग्नलिंग प्रणालींसाठी एआय-आधारित पूर्वानुमानित देखभाल पायलट स्वरूपात

ऑनलाइन मॉनिटरिंग ऑफ रोलिंग स्टॉक प्रणाली (ओएमआरएस) आणि व्हील इम्पॅक्ट लोड डिटेक्टर (वाइल्ड) प्रणालींचा अवलंब

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत ‘वे-साइड मशीन व्हिजन-आधारित तपासणी प्रणाली (एमव्हीआयएस)’साठी सामंजस्य करार

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन सोबत ‘ऑटोमॅटिक व्हील प्रोफाइल मापन प्रणाली (एडब्ल्यूपीएमएस)’साठी सामंजस्य करार

• डिजिटल रेडिओ संवाद:

लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील विश्वासार्ह संवादासाठी डिजिटल 5 वॉल्ट चे अती उच्च फ्रिक्वेन्सी असलेले (व्हीएचएफ) वॉकी-टॉकी संच मानकीकृत करण्यात आले आहेत.

• बोगदा संवाद प्रणाली:

उधमपूर–श्रीनगर–बारामुला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पासह लांब बोगद्यात अखंड संवादासाठी विशेष प्रणाली कार्यान्वित.

• ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) जाळे:

ऑक्टोबर 2025 पर्यंत 619 मार्ग किलोमीटर नवीन ओएफसी टाकण्यात आले असून, एकूण विस्तार सुमारे 67,233 मार्ग किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे.

• प्रवासी माहिती व मार्गदर्शन प्रणाली:

1,064 स्थानकांवर कोच मार्गदर्शन प्रणाली (सीजीएस)

1,449 स्थानकांवर ट्रेन इंडिकेशन बोर्ड (टीआयबी)

• विद्युत/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग:

डिसेंबर 2025 पर्यंत 6,660 स्थानकांवर केंद्रीयीकृत पॉइंट व सिग्नल प्रणाली बसवण्यात आली.

• व्हिजिलन्स कंट्रोल उपकरणे (व्हीसीडी):

सर्व लोकोमोटिव्हमध्ये बसविण्यात आलेली.

• धुके सुरक्षा उपाय:

सिग्नल मस्तांवर रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह सिग्मा बोर्ड

जीपीएस-आधारित फॉग सेफ्टी डिव्हाइस (एफएसडी)

• ट्रॅक व रेल आरोग्य निरीक्षण:

अल्ट्रासॉनिक फ्लॉ डिटेक्शन (यूएसएफडी)

ऑस्सिलेशन मॉनिटरिंग प्रणाली (ओएमएस) आणि ट्रॅक रेकॉर्डिंग कार (टीआरसी)

• डिजिटल ट्रॅक मालमत्ता व्यवस्थापन:

वेब-आधारित ट्रॅक डेटाबेस व निर्णय सहाय्य प्रणालीद्वारे देखभाल नियोजन सुलभ.

निष्कर्ष

‘कवच 4.0’, आगामी ‘कवच 5.0’ आणि एआय-आधारित निरीक्षण प्रणालींच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे भारतीय रेल्वे आधुनिक, एकात्मिक आणि पूर्वानुमानित सुरक्षा संरचना उभारत आहे. 2016 मधील प्रारंभिक चाचण्यांपासून आजच्या व्यापक राष्ट्रीय अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास सुरक्षा, स्वदेशी नवोन्मेष आणि सातत्यपूर्ण सुधारणेप्रती दृढ बांधिलकी दर्शवितो.

अंमलबजावणीची गती कायम ठेवत भारतीय रेल्वे जगातील सर्वात सुरक्षित, तंत्रज्ञानसंपन्न आणि भविष्याभिमुख रेल्वे जाळ्यांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

 

References:

Ministry of Railways

Click here to see in PDF

PIB Research

***

नेहा कुलकर्णी / नंदिनी मथुरे / सुवर्णा बेडेकर / गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 157600) आगंतुक पटल : 70
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Kannada , Malayalam
National Portal Of India
STQC Certificate