• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

भारतातील बोगदे: जमिनीखालील अभियांत्रिकीचे चमत्कार

Posted On: 14 JAN 2026 1:23PM

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2026

 

ठळक मुद्दे

  • अटल बोगद्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे भारत आपल्या बोगद्यांच्या पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करत आहे.
  • 12.77 किलोमीटर लांबीच्या T50 बोगद्यासारख्या विक्रमी रेल्वे दुव्यांमुळे भारताची मालवाहतूक आणि संपर्क व्यवस्था नव्याने आकार घेत आहे.
  • झोजिलासारखे आगामी महा-बोगदे लडाखला सर्व-ऋतूत संपर्क व्यवस्था प्रदान करतील, ज्यामुळे गतिशीलता आणि संरक्षण क्षमता वाढेल तसेच प्रादेशिक विकासाला चालना मिळेल.

 

संपर्क व्यवस्थेची निर्मिती: भारतातील बोगद्यांची कहाणी

भारतातील बोगदे हे केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिक नाहीत तर ते भौगोलिक आव्हानांवर मात करण्याच्या राष्ट्राच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहेत. एकेकाळी संपर्क व्यवस्थेला मर्यादा घालणाऱ्या पर्वत आणि डोंगराळ भूभाग भेदून काढलेल्या बोगद्यांमुळे वर्षभर वाहतूक शक्य झाली आहे. बोगद्यांमुळे दुर्गम भागांपर्यंत पोहोच सुधारली असून समुदायांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत. हिमालयातील धोरणात्मक बोगद्यांपासून ते शहरी मेट्रो नेटवर्कपर्यंत, हे प्रकल्प भारतातील लोक, वस्तू आणि संसाधने यांची वाहतूक करत त्यात बदल घडवत आहेत. आधुनिक अभियांत्रिकी आणि नाविन्यपूर्ण नियोजनाचा वापर करून बांधलेले बोगदे आर्थिक वाढ, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ते अधिक संपर्कित आणि सक्षम देशाची निर्मिती करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार, सीमावर्ती भागातील धोरणात्मक पायाभूत सुविधा, मेट्रो रेल्वेचा विस्तार, बुलेट-ट्रेन कॉरिडॉर आणि दुर्गम भागांमधील सर्व-ऋतूतील संपर्क सुविधा उपक्रमांमुळे भारतातील बोगदा निर्मिती क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. पायाभूत सुविधांचा विस्तार होत असताना, बोगदा निर्मिती हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या बांधकाम क्षेत्रांपैकी एक बनले आहे.

 

बोगद्यांच्या पायाभूत सुविधांचे महत्त्व पूर्वीपेक्षा जास्त का आहे

बोगदे भारताच्या विकासाच्या नकाशाला नव्याने आकार देत आहेत, पारंपरिक वाहतूक मार्गांना अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत पर्याय देत आहेत. त्यांचा प्रभाव केवळ अभियांत्रिकीपुरता मर्यादित नाही. ते प्रादेशिक विकासाला चालना देतात, धोरणात्मक सज्जता वाढवतात आणि लाखो लोकांचे दैनंदिन जीवन सुधारतात.

 

भारताचे विकसित होत असलेले बोगदा तंत्रज्ञान

गेल्या दशकात, भारताच्या बोगदा निर्मिती क्षमतेत मोठे परिवर्तन झाले आहे. पारंपरिक ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतींपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत प्रगती झाली आहे. यामुळे अधिक वेगवान, सुरक्षित आणि अधिक गुंतागुंतीचे भूमिगत बांधकाम शक्य झाले आहे. आधुनिक प्रकल्प आता प्रगत भूवैज्ञानिक मॅपिंग आणि रिअल-टाइम देखरेख प्रणालीवर अवलंबून आहेत, ज्यामुळे अभियंत्यांना प्रतिकूल परिस्थितीतही लांब आणि खोल बोगदे बांधणे शक्य झाले आहे.

आधुनिक भारतीय बोगदे हे उच्च-तंत्रज्ञानावर आधारित, सुरक्षेवर भर देणारे कॉरिडॉर म्हणून डिझाइन केलेले आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी वायुवीजन प्रणाली, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशमन यंत्रणा, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि केंद्रीकृत बोगदा नियंत्रण कक्षांचा समावेश आहे. या आधुनिकीकरणामुळे कार्यात्मक विश्वसनीयता आणि आपत्ती सज्जता या दोन्हींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

भारताच्या बोगदा क्रांतीला चालना देणारे प्रमुख तंत्रज्ञान

बोगदा खोदणारी यंत्रे (टीबीएम)

मेट्रो नेटवर्क आणि लांब रेल्वे/रस्ते बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी बुद्ध खोदणारी यंत्रे दाट लोकवस्तीच्या आणि भूवैज्ञानिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या प्रदेशांमध्ये उच्च अचूकता, कमी कंपन आणि वर्धित सुरक्षा प्रदान करतात.

नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एनएटीएम)

हिमालयात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही पद्धत, अभियंत्यांना खडकांच्या बदलत्या आणि नाजूक संरचनेनुसार उत्खननाचे समर्थन रियल टाईम मध्ये करण्याची मुभा देते. 

एकात्मिक बोगदा नियंत्रण प्रणाली (आयटीसीएस)

आधुनिक रस्ते बोगद्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेली ही प्रणाली वायुवीजन नियंत्रण, आग शोधणे, दूरसंचार व्यवस्था, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांना एका केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते, ज्यामुळे 24*7 सुरक्षा सुनिश्चित होते.

 

भारताचे महत्त्वाचे बोगदे: आधुनिक पायाभूत सुविधांची ओळख

भारताच्या विस्तारत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे अनेक उल्लेखनीय बोगदे निर्माण झाले आहेत, जे देशभरात लोक आणि वस्तूंच्या वाहतुकीच्या पद्धतीची पुनर्व्याख्या करतात. प्रत्येक बोगदा मोठ्या प्रमाणावरील नवोन्मेष आणि समस्या-निवारणाचे प्रतिक म्हणून उभा आहे.

अटल बोगदा

पीर पंजाल पर्वतरांगेतील बर्फाच्छादित शिखरांच्या खाली असलेला अटल बोगदा 9.02 किमी लांब आहे, जो रोहतांग खिंडीला वळसा घालून एक उंच पर्वतीय मार्ग प्रदान करतो. हा बोगदा पूर्ण झाल्याने संपर्क व्यवस्थेत परिवर्तन घडले असून मनाली आणि लाहौल-स्पितीच्या दुर्गम खोऱ्यात वर्षभर अखंड प्रवास शक्य झाला आहे. आव्हानात्मक पर्वतीय परिस्थितीत सामान्य नागरिक आणि संरक्षण दलाच्या वाहतुकीसाठी सुरक्षित, विश्वसनीय मार्क उपलब्ध करून देणे हे या बोगद्याचे रणनीतीक महत्त्व आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यूकेने 2022 मध्ये याला 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे. या बोगद्यामुळे मनाली-सरचू अंतर 46 किमीने कमी झाले आहे आणि प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी घटला आहे. हिमालयाच्या कठोर परिस्थितीत बांधलेल्या या बोगद्याच्या ठिकाणी हिवाळ्यात तापमान -25°C पर्यंत खाली जाते तर कधीकधी बोगद्याच्या आतील तापमान 45°C पर्यंत पोहोचते, त्यामुळे बांधकामासाठी विलक्षण कणखरतेची आवश्यकता होती. अभियंत्यांना नाजूक भूगर्भ रचना, सेरी नाल्याच्या गळतीमुळे बोगद्यात पूर येणे, मोठ्या प्रमाणातील मातीचा दाब आणि तीव्र हिमवर्षाव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. या समस्यांवर सीमा रस्ते संघटनेच्या समर्पित कर्मयोग्यांनी यशस्वीपणे मात केली.  

   

झेड-मोर्ह/सोनमर्ग बोगदा

समुद्रसपाटीपासून 8,650 फुटांपेक्षा जास्त उंचीवर पर्वतांमध्ये कोरलेला 12 किलोमीटर लांबीचा सोनमर्ग बोगदा, ही एक अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्वितीय कामगिरी असून तो जम्मू आणि काश्मीरमधील प्रवासात क्रांती घडवून आणणार आहे. हा बोगदा सुमारे 2,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. यामध्ये 6.4 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा, एक बाहेर पडण्याचा बोगदा आणि आधुनिक जोड रस्त्यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे श्रीनगर आणि सोनमर्गच्या सुवर्ण कुरणांदरम्यान, तसेच पुढे लडाखपर्यंत सर्व-ऋतूत संपर्क बहाल करणारी जीवनवाहिनी निर्माण झाली आहे. आता हिमस्खलन, भूस्खलन किंवा मुसळधार बर्फवृष्टीमुळे हा प्रदेश यापुढे विलग राहणार नाही. हा बोगदा मार्ग खुला ठेवत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये पोहोचणे सुलभ होते आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित होतो. आव्हानात्मक हिमालयीन भूगर्भ रचनेसाठी 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' (एनएटीएम) वापरून बांधलेला हा बोगदा एक महत्त्वाचा तांत्रिक टप्पा आहे. यामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, इलेक्ट्रिकल फायर सिग्नलिंग सिस्टीम, रेडिओ री-ब्रॉडकास्ट सिस्टीम (एफएम), डायनॅमिक रोड इन्फॉर्मेशन पॅनल (डीआरआयपी) इत्यादी प्रगत प्रणालींसह एकात्मिक बोगदा व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) यासारख्या प्रगत सुविधा आहेत. या बोगद्याची प्रति तास सुमारे 1,000 वाहने हाताळण्याची क्षमता आहे. आगामी झोजिला बोगद्याशी (2028) जोडल्यानंतर, प्रवासाचे अंतर 49 किलोमीटरवरून 43 किलोमीटरपर्यंत कमी होईल, आणि वेग 30 किमी प्रति तासावरून 70 किमी प्रति तासापर्यंत वाढेल. परिणामी, संरक्षण दलाची दळणवळण व्यवस्था, हिवाळी पर्यटन, साहसी खेळ आणि या पर्वतांना आपले घर मानणाऱ्या लोकांच्या उपजीविकेला चालना मिळेल.

 

सेला बोगदा

अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 'विकसित भारत विकसित ईशान्य' कार्यक्रमादरम्यान राष्ट्राला समर्पित केलेला सेला बोगदा, बीआरओने तेजपूर-तवांग मार्गावर 13,000 फूट उंचीवर बांधला आहे. हा बोगदा सुमारे 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा बोगदा सर्व ऋतूत संपर्क व्यवस्था प्रदान करतो.ज्ञ हा बोगदा सशस्त्र दलांसाठी रणनीतीतदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचा असून तो सीमावर्ती भागातील सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना देतो. 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' वापरून बांधलेला हा बोगदा, चिकाटी आणि प्रादेशिक वचनबद्धता दुर्गम पर्वतीय समुदायांचे भविष्य कसे बदलू शकते याची एक प्रभावी उदाहरण आहे. 

 

बनिहाल-काझीगुंड रस्ता बोगदा

3,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधलेला बनिहाल-काझीगुंड रस्ता बोगदा हा 8.45 किलोमीटर लांबीचा ट्वीन ट्युब बोगदा असून तो जम्मू आणि काश्मीरमधील संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे बनिहाल आणि काझीगुंड दरम्यानचे अंतर 16 किलोमीटरने कमी झाले आहे आणि प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासाने घटला आहे. वाहतुकीच्या प्रत्येक दिशेसाठी एक अशा दोन स्वतंत्र ट्युब बांधलेला हा बोगदा, देखभाल आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्याची सोय व्हावी यासाठी दर 500 मीटरवर क्रॉस पॅसेजद्वारे जोडलेला आहे. यामुळे सर्व-ऋतूत रस्ता संपर्क प्रस्थापित झाला असून दळणवळण सुलभ झाले आहे आणि दोन्ही प्रदेश जवळ आले आहेत.

 

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा

जम्मू आणि काश्मीरमधील चेनानी-नाशरी बोगदा म्हणून पूर्वी ओळखला जाणारा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा हा 9 किलोमीटर लांबीचा, ट्वीन ट्युब, सर्व ऋतूत संपर्क उपलब्ध करून देणारा रस्ता बोगदा आहे, जो उधमपूर आणि रामबनला जोडतो. हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात सुमारे 1,200 मीटर उंचीवर बांधलेल्या या बोगद्यामुळे 41 किलोमीटरचा रस्ता टाळून जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास दोन तासांनी कमी झाला आहे. या बोगद्यामध्ये प्रगत वायुवीजन, सुरक्षा आणि बुद्धिमान वाहतूक प्रणाली आहे, जी कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह पूर्णपणे एकात्मिक नियंत्रण यंत्रणेद्वारे चालविली जाते, तसेच यात वर्धित सुरक्षा उपाययोजनांचाही समावेश आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'स्किल इंडिया' उपक्रमांनुसार विकसित केलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांचे कौशल्य वाढले आहे. स्थानिकांना या बोगद्याच्या बांधकामावर ठेवण्यात आले. या प्रकल्पामुळे 2,000 हून अधिक स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला, ज्यापैकी जवळपास 94 टक्के कामगार जम्मू आणि काश्मीरमधील होते.

 

यूएसबीआरएल प्रकल्पांतर्गत T50 बोगदा

जम्मू आणि काश्मीरमधील खारी आणि सुंबरला जोडणारा 12.77 किलोमीटर लांबीचा अभियांत्रिकी चमत्कार असलेला T50 बोगदा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पांतर्गत बांधलेल्या भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगद्यांपैकी एक आहे. हा बोगदा काश्मीर खोरे आणि उर्वरित देशादरम्यान एक महत्त्वपूर्ण रेल्वे जीवनवाहिनी तयार करतो. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून बांधलेला हा बोगदा क्वार्ट्झाइट आणि नीसपासून फायलाइटपर्यंतच्या आव्हानात्मक भूगर्भ रचनेतून जातो. हा बोगदा तयार करताना अभियंत्यांनी अधिक पाणी गळती, भूस्खलन, शीअर झोन आणि तुटक ज्वालामुखीय खडक अशा समस्यांवर मात केली आहे. या बोगद्यामध्ये एक मुख्य बोगदा असून त्याला समांतर एक आपत्कालीन बोगदा जोडलेला आहे, जो सुरक्षिततेसाठी दर 375 मीटरवर मुख्य बोगद्याला जोडलेला आहे. दर 50 मीटरवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आणि केंद्रीय नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवल्या जाणाऱ्या T50 बोगद्याची रचना सुरक्षित आणि अखंडित रेल्वे वाहतुक सक्षम करण्यासाठी करण्यात आली आहे.

 

कोलकात्याचा पाण्याखालील मेट्रो बोगदा

2024 मध्ये, भारताने कोलकाता येथे आपला पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा सुरू करून एक ऐतिहासिक यश मिळवले. हा बोगदा हुगळी नदीखालून एस्प्लेनेड आणि हावडा मैदान यांना जोडतो. अभियांत्रिकीची ही किमया केवळ देशाची वाढती तांत्रिक आणि पायाभूत क्षमताच दर्शवत नाही, तर भारताच्या सर्वात व्यस्त महानगरीय प्रदेशांपैकी एकासाठी शहरी वाहतुकीची व्याख्या देखील बदलून टाकते.

 

भारतामधील पुढील टप्प्यातील बोगदा प्रकल्प

देशात नव्या पिढीचे बोगदे आकार घेत आहेत. हे आगामी प्रकल्प देश कसा प्रवास करतो आणि जोडला जातो, याची पुनर्व्याख्या करण्याचे वचन देतात. खालील प्रकल्प प्रगतीच्या भव्यतेचे स्पष्ट दर्शन घडवतात.  

झोजिला बोगदा

झोजिला बोगदा भारताच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरत आहे. हा बोगदा हिमालयातील काही सर्वात दुर्गम खडकाळ भागातून मार्ग काढत, लडाख आणि देशाच्या उर्वरित भागादरम्यान एक विश्वासार्ह, सर्व-ऋतूत उपलब्ध असणारी जोडणी स्थापित करत आहे. आतापर्यंत जवळपास 12 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पात प्रगत सुरक्षा उपाययोजना तसेच पर्वतांच्या आत खोलवर स्थिर वायुप्रवाह राखण्यासाठी डिझाइन केलेली सेमी ट्रान्सव्हर्स वायुवीजन प्रणाली समाविष्ट आहे. या प्रकल्पात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरून तयार केलेली स्मार्ट टनेल (एससीएडीए) प्रणाली समाविष्ट आहे. यामध्ये सीसीटीव्ही देखरेख, रेडिओ नियंत्रण, अखंडित वीजपुरवठा आणि वायुवीजन प्रणाली यांसारख्या सुविधा आहेत. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सरकारच्या 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची बचत झाली आहे. पूर्ण झाल्यावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताचा सर्वात लांब रस्ता बोगदा आणि आशियातील सर्वात लांब दुहेरी मार्गी बोगदा बनेल, ज्यामुळे त्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होईल. 11,578 फूट उंचीवर असलेला आणि 30 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून हा बोगदा या प्रदेशात नागरी आणि लष्करी दोन्ही प्रकारची गतिशीलता वाढवण्याचे वचन देतो.

 

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे बोगदा

भारताच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरने आपल्या 4.8 किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्याच्या यशस्वी ब्रेकथ्रूसह एक भविष्यवेधी झेप घेतली आहे. हा बोगदा देशाच्या पहिल्या बुलेट-ट्रेन मार्गाचे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. घणसोली आणि शिळफाटा या दोन्ही टोकांपासून एकाच वेळी उत्खनन करण्यात आलेल्या या बोगद्याने विलक्षण आव्हाने उभी केली होती. दोन्ही पथकांनी पाण्याखालील कठीण भूभागातून मार्ग काढत अचूकपणे एकमेकांना गाठले. या उपलब्धीला भारताच्या अभियांत्रिकी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून गौरवण्यात आले आहे. हा प्रकल्प सर्वसमावेशक सुरक्षा उपायांसह प्रगत न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरतो. दोन हाय-स्पीड गाड्या सामावून घेण्यास सक्षम असलेल्या सिंगल-ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन केलेला हा बोगदा अत्याधुनिक रेल्वे बांधकामात आघाडीवर आहे. हा बोगदा भारताच्या पुढील पिढीच्या वाहतूक पायाभूत सुविधांना चालना देणारा नवोन्मेष प्रतिबिंबित करतो.  

 

ऋषिकेश-कर्णप्रयाग नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पातील बोगदे

उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्ग हा भारतीय हिमालयातील एक महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प आहे. सुमारे 125 किमी लांबीचा हा मार्ग भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील हिमालयीन प्रदेशातून जातो. यामुळे हा प्रकल्प प्रामुख्याने बोगद्यांवर आधारित आहे. यामध्ये सुमारे 105 किमी एकूण लांबीचे 16 मुख्य मार्गावरील बोगदे आणि सुमारे 98 किमी एकूण लांबीचे 12 समांतर आपत्कालीन बोगदे यांचा समावेश आहे. एकूण 213 किमीच्या कामापैकी 199 किमीचे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील एक प्रमुख तांत्रिक यश म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हिमालयीन भूभागात टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चा वापर करणे. 14.8 किमी लांबीच्या T-8 बोगद्यासाठी याचा वापर करण्यात आला असून हा बोगदा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. सुरक्षितता आणि दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करताना पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी प्रगत बोगदा तंत्रज्ञान आणि सतत देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यामुळे ऋषिकेश-कर्णप्रयाग बोगदे हे भारतातील उंच पर्वतीय रेल्वे बोगदा बांधकामाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहेत.

 

बोगद्याच्या टोकाशी दिसणारे प्रकाशकिरण 

भारताची बोगदा पायाभूत सुविधा अधिक स्मार्ट आणि सक्षम विकासाकडे स्पष्टपणे वाटचाल करत आहे. हे प्रकल्प संपर्क सुविधेसमोर दीर्घकाळापासून असलेल्या आव्हानांवर मात करतात, त्याचबरोबर आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय प्राधान्यांनाही पाठिंबा देतात. तंत्रज्ञान आणि अंमलबजावणीमधील प्रगतीमुळे जटिल भूभागात सुरक्षितपणे बांधकाम करण्याची भारताची क्षमता वाढली आहे. नवीन बोगदे कार्यान्वित होत असताना, ते गतिशीलता, विश्वसनीयता आणि प्रादेशिक एकात्मता यामध्ये सुधारणा करत राहतील. एकत्रितपणे पाहता, हे बोगदे अशा भविष्याचा संकेत देतात जिथे भूगोल हा प्रगतीसाठी अडथळा ठरणार नाही.

 

संदर्भ

रेल्वे मंत्रालय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 

संरक्षण मंत्रालय 

पोलाद मंत्रालय 

पंतप्रधान कार्यालय 

पत्र सूचना कार्यालय

इतर लिंक्स 

 

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Explainer ID: 157329) आगंतुक पटल : 30
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam
National Portal Of India
STQC Certificate