Infrastructure
अमृत भारत एक्सप्रेस: परवडणाऱ्या दरातील लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात घडवत आहे परिवर्तन
Posted On:
17 JAN 2026 5:16PM
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
|
ठळक मुद्दे
|
- डिसेंबर 2023 पासून 30 अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत, ज्यात 9 नवीन सेवांची भर घालून देशभरातील व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
- बिगर-एसी स्लीपर प्रवासाचे भाडे प्रति 1,000 किलोमीटरसाठी सुमारे ₹500 असून, त्यात कोणतीही बदलती दररचना नसल्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी ते परवडणारे आहे.
- नवीन मार्ग ईशान्य, पूर्व, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडतात, ज्यामुळे सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि तीर्थक्षेत्रे एकमेकांशी जोडली जातात.
- सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे अनेक प्रदेशांमध्ये रोजगाराची गतिशीलता, पर्यटन, व्यापार आणि शिक्षण तसेच आरोग्यसेवेची उपलब्धता यांना चालना मिळते.
|
|
दैनंदिन प्रवास सामर्थ्यवान बनविणे
|
भारतीय रेल्वे ही भारताच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेचा दीर्घकाळापासून कणा राहिली आहे. तिने अनेक पिढ्यांतील प्रवाशांना विशाल अंतरांचा आणि विविध भूप्रदेशांमधून प्रवास घडवला आहे. परवडणाऱ्या दरातील सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी म्हणून भारतीय रेल्वेने लोकांना, बाजारपेठांना आणि संधींना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे विशेषतः अशा लोकांसाठी खरे आहे, ज्यांच्यासाठी रेल्वे प्रवास हा निवडीचा विषय नसून दैनंदिन गरज आहे.
भारताच्या पहिल्या रेल्वे प्रवासाला जवळपास दोन शतके उलटल्यानंतरही, भारतीय रेल्वे लाखो लोकांसाठी वाहतुकीच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणत आहे. एकेकाळी प्रामुख्याने प्रीमियम सेवांशी संबंधित असलेले आराम, सोयीसुविधा आणि विश्वासार्हता यांचा विस्तार करून, भारतीय रेल्वेने सातत्याने एक अधिक सर्वसमावेशक वाहतूक व्यवस्था निर्माण केली आहे. सुरक्षा आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनावर आजही लक्ष केंद्रित आहे.
या दृष्टिकोनाशी सुसंगत राहत अमृत भारत एक्सप्रेस म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. अमृत काळातील एक प्रमुख उपक्रम म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली. डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाल्यापासून 30 अमृत भारत एक्सप्रेस गाड्या आधीच कार्यान्वित झाल्या आहेत आणि आणखी 9 सेवा सुरू केल्या जाणार आहेत. हे मार्ग पूर्व आणि उप-हिमालयाकडील प्रदेशांना दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतातील प्रमुख ठिकाणांशी जोडून संचारसंपर्क मजबूत करतील. हे सर्वांसाठी परवडणाऱ्या दरातील, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासासाठी राष्ट्राची वचनबद्धता अधिक दृढ करते.
|
अमृत भारत एक्सप्रेस: संकल्पना आणि उद्देश
|

अमृत भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेने सुरू केलेली एक आधुनिक, वातानुकूलित नसलेली लांब पल्ल्याची स्लीपर क्लास रेल्वे सेवा आहे, जी विश्वसनीय, परवडणारा आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करते. ही गाडी विशेषतः सणासुदीच्या काळात आणि स्थलांतराच्या गर्दीच्या वेळी मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी तयार केली आहे. प्रति 1,000 किलोमीटरसाठी अंदाजे ₹500 भाडे आणि लहान व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी त्या प्रमाणात कमी दरांसह, ही सेवा कोणत्याही बदलत्या दररचनेशिवाय एक साधी आणि पारदर्शक भाडे रचना वापरते. अंतर आणि संधींच्या कमतरतेमुळे वेगळ्या पडलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी अमृत भारत एक्सप्रेस रोजगार, शिक्षण आणि कौटुंबिक गरजांसाठीच्या प्रवासाला मदत करते. ही संपूर्ण देशभरात परवडणाऱ्या दरातील लांब पल्ल्याचा संचारसंपर्क विस्तारण्याच्या भारताच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
अमृत भारत गाड्या पूर्णपणे नॉन-एसी असून, त्यामध्ये 11 जनरल क्लासचे डबे, 8 स्लीपर क्लासचे डबे, 1 भोजनयान आणि दिव्यांग-अनुकूल डब्यासह 2 सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड व्हॅन यांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरेखन आणि निर्मिती केलेल्या या गाड्यांचा उद्देश नॉन-एसी श्रेणीतील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि उच्च-गुणवत्तेचा प्रवासाचा अनुभव देणे हा आहे.

|
व्यापक पोहोच: नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या
|
नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांच्या आरंभामुळे रेल्वे जाळ्याचा लक्षणीय विस्तार झाला आहे. या नवीन सेवांचा उद्देश देशाच्या प्रमुख भागांमध्ये लांब पल्ल्याचा संचारसंपर्क मजबूत करणे आणि वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करणे हा आहे.

भारताच्या ईशान्येकडील अष्टलक्ष्मी: कामाख्या-रोहतक अमृत भारत एक्सप्रेसद्वारे संचालित
आसाममधील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र असलेल्या कामाख्याला हरियाणातील रोहतकशी जोडणारी ही अमृत भारत एक्सप्रेस, ईशान्य भारत आणि उत्तर भारत यांच्यातील लांब पल्ल्याची जोडणी मजबूत करते.
- ही गाडी आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये साप्ताहिक सेवा म्हणून चालते आणि किफायतशीर व आरामदायी प्रवासाची सुविधा देते.
- रेल्वेगाडीची वेळ:
- शुक्रवारी रात्री 10:00 वाजता कामाख्याहून सुटते आणि रविवारी दुपारी 2:45 वाजता रोहतक येथे पोहोचते.
- परतीच्या प्रवासात रविवारी रात्री 10:10 वाजता रोहतकहून सुटते आणि मंगळवारी दुपारी 12:15 वाजता कामाख्या येथे पोहोचते.
- ही रेल्वे सहा राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमधून जाते आणि कामाख्या मंदिर व वाराणसीच्या गंगा घाटांसारख्या ठिकाणांजवळून प्रवास करते, ज्यामुळे संचारसंपर्क, पर्यटन आणि प्रादेशिक संबंधांना चालना मिळते.

दिब्रुगड-लखनौ अमृत भारत एक्सप्रेस: 'पूर्वोदय से भारत उदय' दृष्टिकोनाला बळकटी
दिब्रुगड-लखनौ अमृत भारत एक्सप्रेस ईशान्य भारत आणि उत्तर भारत यांच्यात एक महत्त्वपूर्ण रेल्वे दुवा प्रस्थापित करते.
- हा मार्ग आसाममधील दिब्रुगड येथून सुरू होतो आणि नागालँडमधील दिमापूरमधून जातो, तसेच तो सीमावर्ती आणि सरहद्दीच्या प्रदेशांना उत्तर प्रदेशशी जोडतो.
- हा मार्ग काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (युनेस्को जागतिक वारसा स्थळ), कामाख्या मंदिर, विक्रमशिला महाविहार, अयोध्या आणि लखनौ यांसारख्या प्रमुख स्थळांच्या जवळून जातो.
- तीर्थक्षेत्रे आणि प्रमुख शहरांना जोडल्याने पर्यटन, स्थानिक व्यापार, लहान व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

न्यू जलपाईगुडी–नागरकोईल अमृत भारत एक्सप्रेस : डूअर्स ते निलगिरी
पूर्व हिमालयाच्या पायथ्याला देशाच्या दक्षिण टोकाशी जोडणारी ही रेल्वे सेवा राष्ट्रीय एकात्मता आणि दीर्घ पल्ल्याची वाहतूक अधिक मजबूत करते.
- भूतान आणि बांगलादेशजवळील महत्त्वाचे सीमावर्ती केंद्र असलेले न्यू जलपाईगुडी हे स्टेशन कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईलशी जोडले गेले आहे.
- ही गाडी आठवड्यातून एकदा धावते आणि सीमेलगतचे प्रदेश, बंदरे, औद्योगिक पट्टे तसेच अंतर्गत भागांना जोडणाऱ्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावरून जाते.
- दार्जिलिंग–डूअर्स, विशाखापट्टणमचे समुद्रकिनारे, मदुराईतील मीनाक्षी मंदिर आणि कोयंबतूर यांसारख्या ठिकाणांच्या जवळून ही सेवा जाते. त्यामुळे पर्यटनाला तसेच प्रादेशिक विकासाला चालना मिळते.
न्यू जलपाईगुडी–तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस : दार्जिलिंगच्या पायथ्यापासून शिक्षण केंद्रांपर्यंत
ही सेवा ईशान्य भारताच्या प्रवेशद्वारापासून तामिळनाडूमधील शिक्षण आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध केंद्रांपर्यंत दीर्घ पल्ल्याचा रेल्वे दुवा निर्माण करते.
- रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे सीमावर्ती स्टेशन असलेले न्यू जलपाईगुडी तिरुचिरापल्लीशी जोडले आहे.
- ही गाडी आग्रा, प्रयागराज, भुवनेश्वर, कावेरी डेल्टा, तंजावूर आणि चेन्नई या प्रमुख ठिकाणांमधून जाते.
- यामुळे बाजारपेठा, पर्यटनस्थळे, शैक्षणिक संस्था आणि रोजगार केंद्रांपर्यंत पोहोच सुलभ होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.

अलीपुरद्वार–बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस : सीमावर्ती भाग ते तंत्रज्ञान राजधानी
रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती जिल्ह्याला भारताच्या तंत्रज्ञान राजधानीशी थेट रेल्वेने जोडणारी ही सेवा पूर्व–दक्षिण भारतातील संपर्क अधिक मजबूत करते.
- भूतानजवळील अलीपुरद्वार ते एसएमव्हीटी बेंगळुरूदरम्यान ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.
- गाडीची वेळ :
- सोमवारी रात्री 10:25 वाजता अलीपुरद्वारहून प्रस्थान
- शनिवारी सकाळी 8:50 वाजता बेंगळुरूहून परतीचा प्रवास
- ही सेवा पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यांना जोडते, ज्यामुळे पर्यटन आणि आर्थिक एकात्मतेला चालना मिळते.

अलीपुरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस : ईशान्य भारताचा मुंबईशी थेट दुवा
उत्तर बंगालच्या सीमावर्ती पट्ट्याला मुंबई उपनगराशी जोडणारा हा महत्त्वाचा पूर्व–पश्चिम रेल्वे मार्ग आहे.
- अलीपुरद्वार ते पनवेलदरम्यान ही गाडी आठवड्यातून एकदा धावते आणि पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून प्रवास करते.
- गाडीची वेळ :
- गुरुवारी पहाटे अलीपुरद्वारहून प्रस्थान, शनिवारी संध्याकाळी पनवेल येथे आगमन
- परतीचा प्रवास सोमवारी पनवेलहून सुरू होऊन बुधवारी अलीपुरद्वार येथे समाप्त
- दार्जिलिंग, त्रिवेणी संगम, चित्रकूट धाम आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग यांसारख्या प्रमुख स्थळांच्या जवळून ही सेवा जाते, त्यामुळे पर्यटन आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळते.

सांत्रागाछी–तांबरम अमृत भारत एक्सप्रेस : पूर्व–दक्षिण रेल्वे संपर्क सुदृढ करणारी सेवा
ही सेवा पूर्व आणि दक्षिण भारतामधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करते.
- कोलकात्याजवळील सांत्रागाछी आणि चेन्नईचे उपनगर असलेले तांबरम यांना ही गाडी जोडते.
- पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील जिल्ह्यांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होते.
- जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि शोर टेम्पल (युनेस्को जागतिक वारसा स्थळे) यांच्या जवळून ही सेवा जात असल्याने पर्यटन आणि प्रादेशिक व्यापाराला चालना मिळते.
पूर्व भारत ते राष्ट्रीय राजधानी : हावडा–आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेस
पूर्व भारत आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र यांच्यात जलद व विश्वासार्ह रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणारी ही सेवा आहे.
- हावडा ते दिल्लीतील आनंद विहार टर्मिनलदरम्यान ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.
- गाडीची वेळ :
- गुरुवारी रात्री 11:10 वाजता हावडाहून प्रस्थान, शनिवारी पहाटे 2:50 वाजता आनंद विहार येथे आगमन
- परतीचा प्रवास शनिवारी सकाळी 5:15 वाजता आनंद विहारहून सुरू होऊन रविवारी सकाळी 10:50 वाजता हावडा येथे समाप्त
- ही सेवा पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख जिल्ह्यांना जोडते, ज्यामुळे रोजगार आणि प्रशासकीय केंद्रांपर्यंत पोहोच सुलभ होते.

कोलकाता (सियालदह)–बनारस अमृत भारत एक्सप्रेस : श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम
पूर्व भारत आणि देशातील प्रमुख आध्यात्मिक केंद्र असलेल्या बनारस यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करणारी ही सेवा आहे.
- सियालदह (कोलकाता) ते बनारसदरम्यान ही गाडी दररोज धावते.
- गाडीची वेळ :
- संध्याकाळी 7:30 वाजता सियालदहहून प्रस्थान, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:20 वाजता बनारस येथे आगमन
- परतीचा प्रवास रात्री 10:10 वाजता बनारसहून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 9:55 वाजता सियालदह येथे आगमन
- बैद्यनाथ धाम ज्योतिर्लिंग, तख्त श्री पटना साहिब, काशी विश्वनाथ मंदिर आणि सारनाथ यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या जवळून ही सेवा जाते. त्यामुळे धार्मिक पर्यटन आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळते.


अमृत भारत एक्सप्रेस ही भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे नेटवर्कला बळकटी देणारी महत्त्वाची योजना आहे. परवडणारी भाडेव्यवस्था, व्यापक भौगोलिक कव्हरेज आणि प्रवासी-केंद्रित सुविधा यांचा समन्वय साधत ही सेवा आर्थिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करते. भविष्यात नेटवर्कचा विस्तार होत असताना, अमृत भारत एक्सप्रेस देशभरात लोक, प्रदेश आणि संधी यांना जोडणारी एक प्रभावी साखळी ठरणार आहे.
रेल्वे मंत्रालय
https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2214291®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2150183®=3&lang=1
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
(Explainer ID: 156972)
नेहा कुलकर्णी / नंदिनी मथुरे / गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर
(Explainer ID: 157182)
आगंतुक पटल : 46
Provide suggestions / comments