Infrastructure
गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल्स (जीसीटी): भारताच्या मालवाहतूक व्यवस्थेच्या परिवर्तनाला मिळाली गती
Posted On:
13 JAN 2026 1:11PM
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
महत्वाचे मुद्दे
भारतीय रेल्वेने वार्षिक 192 दशलक्ष टन एकत्रित क्षमतेच्या 306 गतीशक्ती कार्गो टर्मिनसना (जीसीटी) मंजुरी दिली आहे; त्यापैकी 118 या आधीच कार्यान्वित झाल्या आहेत.
2014 पासून, 2,672 दशलक्ष टन मालवाहतूक रस्त्यावरून रेल्वेकडे वळवण्यात आली, ज्यामुळे 143.3 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते.
जीसीटी धोरणांतर्गत सुमारे 8,600 कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक करण्यात आली आहे.2022–23 ते 2024–25 या काळात जीसीटींमधून मिळणाऱ्या मालवाहतूक महसुलात चौपट वाढ झाली असून, तो 12,608 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रस्तावना
भारताच्या मालवाहतूक क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे, आणि आता मालवाहतूकीचा (लॉजिस्टिक्स) खर्च जीडीपीच्या 7.97% पर्यंत कमी झाला असून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सातत्यपूर्ण सुधारणा आणि एकात्मिक नियोजनाच्या यशाचे हे प्रतीक असून त्यामुळे भारत जागतिक मानकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे.
समन्वयित पायाभूत सुविधांचा विकास आणि डिजिटल एकात्मीकरण लॉजिस्टिक्स क्षेत्राला कसे नव्याने आकार देत आहेत, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि भविष्यासाठी सज्ज होत आहे,हे यातून दिसून येते.
या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी पीएम गती शक्ती राष्ट्रीय आराखडा (मास्टर प्लॅन) आहे, ज्याने रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळांना सर्व एकीकृत आराखड्यात एकत्र आणले आहे.
या योजनेचा उद्देश सुरळीतपणे चालणारी बहुविध दळणवळण यंत्रणा सक्षम करून,औद्योगिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, 'व्यवसाय सुलभता' आणि 'मेक इन इंडिया' सारख्या उपक्रमांना पाठिंबा देणे आणि संतुलित प्रादेशिक वाढ सुनिश्चित करणे हा आहे. गती शक्ती कार्गो टर्मिनल्स (GCTs) ही या दृष्टिकोनाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहेत, जे आधुनिक लॉजिस्टिक्स उपायांना चालना देत आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका विकसित होण्यास मदत होईल.
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स
रेल्वे कार्गो टर्मिनल ही एक अशी सुविधा आहे जिथे मालगाड्या आणि वाहतुकीच्या इतर साधनांदरम्यान वस्तूंची चढ-उतार आणि हस्तांतरण केले जाते. हे लॉजिस्टिक्स साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते, ज्यामुळे कंटेनर आणि मोठ्या प्रमाणात मालाची कार्यक्षम वाहतूक सुलभ होते. पूर्वी, गती शक्ती कार्गो टर्मिनल्स नव्हती, त्या काळात अशा मल्टीमॉडल हबशिवाय, भारतातील मालवाहतूक रस्ते, रेल्वे आणि बंदरांवर विखुरलेली होती. यामुळे पोहोचण्यासाठी विलंब लागे, अधिक खर्च आणि वाहतूक कोंडी होत असे. वाहतुकीच्या या साधनांना जोडण्यासाठी, माल हाताळणीला गती देण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी एकात्मिक केंद्रांची आवश्यकता असते.
गती शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल्स (GCTs) ही रेल्वे मंत्रालयाच्या GCT धोरण, 2021 अंतर्गत विकसित आणि स्थापित केली जाणारी आधुनिक कार्गो टर्मिनल्स आहेत, जी रेल्वेला वाहतुकीच्या इतर साधनांशी जोडतात.
विलंब कमी करण्यासाठी आणि रेल्वे पायाभूत सुविधांचा सर्वोत्तम वापर सुनिश्चित करण्यासाठी ‘इंजिन-ऑन-लोड’ (EOL) कार्यप्रणालीसह जीसी टर्मिनल्स (GCT) विकसित केली जात आहेत. ते यंत्रांद्वारे माल चढवणे (लोडिंग) प्रणाली आणि सायलोसारख्या अत्याधुनिक माल हाताळणी सुविधांनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे हाताळणीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.
वेगवान, अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह मालवाहतूक सेवा प्रदान करून एकूण मालवाहतुकीमध्ये भारतीय रेल्वेचा हिस्सा वाढवणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक अधिक ऊर्जा-कार्यक्षम, किफायतशीर आहे आणि त्यातून कार्बन उत्सर्जन खूपच कमी होते, ज्यामुळे भारताला लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यास आणि आपली शाश्वततेची उद्दिष्ट्ये साध्य करण्यास मदत होते, म्हणून याची आवश्यकता आहे.
ईओएल प्रणालीअंतर्गत, माल चढवण्याच्या किंवा उतरवण्याच्या वेळी लोकोमोटिव्ह टर्मिनलवरच थांबते आणि परवानगी दिलेल्या वेळेत रेल्वेच्या खर्चाने विनामूल्य प्रतीक्षेत थांबते,जेणेकरून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गाडी त्वरित निघू शकेल.कार्गो टर्मिनल्स, भारताची लॉजिस्टिक्स परिसंस्था मजबूत करण्यासाठी असलेली धोरणात्मक केंद्र आहेत. त्यांची रचना अखंड कनेक्टिव्हिटी, खाजगी सहभाग आणि सुलभ प्रक्रिया यांवर लक्ष केंद्रित करते, तसेच राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि संतुलित प्रादेशिक विकासाशी ती सुसंगत असते.

गती शक्ती कार्गो टर्मिनल्सची रचना बहुविध दळणवळण व्यवस्थेला (मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी)ला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे रेल्वेमार्ग रस्ते, बंदरे आणि विमानतळांशी सुलभपणे जोडले जातात.
विकासातील खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवून, ही टर्मिनल्स आपल्या क्षमता विस्तारतात आणि नावीन्यपूर्णतेला चालना देतात.
जीसीटी प्रकल्पांसाठी मंजुरी प्रक्रिया सुलभ केली जात आहे, आणि वेळेवर मंजुरी मिळाल्याने प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल.हा उपक्रम राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत असून, 'व्यवसाय सुलभता', 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' यांना पाठिंबा देतो.
विविध राज्यांमध्ये टर्मिनलची ठिकाणे निश्चित केली जात आहेत, ज्यामुळे संतुलित प्रादेशिक विकास आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित होईल.
गती शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल (GCT) धोरण, 2021
15 डिसेंबर 2021 रोजी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या या धोरणाचा उद्देश आधुनिक मालवाहतूक टर्मिनलच्या विकासाला गती देणे, विद्यमान सुविधा अद्ययावत करणे आणि भारताची मालवाहतूक परिसंस्था मजबूत करणे हा आहे. हे धोरणप्रक्रिया सुलभ करते, खाजगी सहभागाला प्रोत्साहन देते आणि भारताला जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पायाभूत सुविधांची वाढ उद्योगाच्या मागणीनुसार संरेखित करते.
खर्चातील सूट : विभागीय शुल्क, जमिनीच्या परवाना शुल्कामध्ये आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या खर्चात सूट.
सहाय्यक सुविधा: सेवा देणाऱ्या स्थानकांवर,रेल्वे सामान्य वापरकर्त्यांसाठी वाहतूक सुविधांचे बांधकाम आणि देखभाल करते.
मालवाहतूक सवलत: 1 दशलक्ष टन किंवा त्याहून अधिक बाह्य वाहतूक करणाऱ्या टर्मिनल्सना मध्यवर्ती विभागातील ब्लॉक हट/ब्लॉक स्टेशनच्या खर्चावर 10% मालवाहतूक सवलत मिळेल.
मालमत्ता देखभाल: रेल्वेकडून मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओएचई (ओव्हरहेड उपकरणे) यांची देखभालीचा खर्च केला जातो (यार्ड आणि लोडिंग/अनलोडिंग लाईन्स वगळून).
जोडणीचे अधिकार: रेल्वेच्या वतीने देखरेख केलेल्या मार्गावरून अतिरिक्त टर्मिनल्स पर्यंत जोडणीचा विस्तार करू शकते.
भूमीचा व्यावसायिक वापर: रेल्वेच्या अतिरिक्त जमिनींचा विकास रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) यातील तरतुदींनुसार केला जाऊ शकतो.
सामरिक महत्त्व: यामुळे एक अखंड बहुविध वाहतूक लॉजिस्टिक्स परिसंस्था निर्माण होते, अडथळे कमी होतात, कामाची गती सुधारते आणि दीर्घकालीन जागतिक स्पर्धात्मकतेला पाठिंबा मिळतो.
आतापर्यंत साध्य केलेली प्रगती:
गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या प्रारंभापासूनच ही योजना संकल्पनात्मक स्तरावरून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचली असून, विविध टर्मिनल्सना मिळालेल्या मंजुरी, नव्या सुविधा कार्यान्वित होणे आणि मालवाहतुकीच्या क्षमतेत झालेली ठोस वाढ यांमुळे लक्षणीय प्रगती नोंदविण्यात आली आहे.
मंजुरी आणि कार्यान्वयन:
भारतीय रेल्वेने 306 गती शक्ती कार्गो टर्मिनल्ससाठी प्रस्ताव मंजूर केले आहेत, ज्यापैकी 118 टर्मिनल्स आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत, जे अंमलबजावणीत सातत्यपूर्ण प्रगती दर्शवत आहेत.
कार्यान्वित टर्मिनल्स आणि क्षमता
या 118 कार्यान्वित टर्मिनल्सची अंदाजे एकूण मालवाहतूक क्षमता 192 दशलक्ष टन प्रति वर्ष आहे, ज्यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास मदत होत असून रेल्वे मालवाहतुकीत लक्षणीय वाढ साध्य होत आहे.
खाजगी गुंतवणूक:
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स धोरणाच्या अंमलबजावणीपासून, सुमारे 8,600 कोटी खाजगी गुंतवणूक मिळाली आहे, ज्यामुळे उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग आणि सार्वजनिक–खाजगी भागीदारी मॉडेल यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
मार्गदर्शन व अंमलबजावणी
रेल्वे बोर्डाने 2022 मध्ये गती शक्ती कार्गो टर्मिनल्ससाठी मास्टर सर्क्युलर जारी केले, ज्यात करार, कार्यप्रणाली मानके आणि टर्मिनल्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सुधारणा यांचा समावेश आहे.
किफायतशीर व हरित वाहतूक:
रेल्वे ही स्वच्छ, कमी खर्चिक आणि कार्यक्षम वाहतूक माध्यम आहे. तिचा खर्च रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अर्ध्याहून कमी असून, कार्बन उत्सर्जन सुमारे 90% कमी आहे. मालवाहतूक रस्त्यावरून रेल्वेकडे वळवल्याने ट्रॅफिकची गर्दी कमी होते तसेच भारताच्या कमी कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टांनाही चालना मिळते. 2014 पासून, या बदलामुळे 2,672 दशलक्ष टन अतिरिक्त माल रेल्वेकडे वळली असून 143.3 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे.
अंमलबजावणी वेळापत्रक
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स धोरणानुसार, मंजुरी मिळालेल्या एजन्सींनी 24 महिन्यांत टर्मिनल बांधकाम पूर्ण करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे नवीन टर्मिनल्सच्या वेळेत कार्यान्वयन आणि तत्परता सुनिश्चित होते.
मालवाहतूक महसूल:
गती शक्ती कार्गो टर्मिनल्सनी दमदार कामगिरी केली असून, 2022-23 ते 24-45 या कालावधीत मालवाहतूक महसुलात चौपटपेक्षा जास्त वाढ झाली आहे, जे भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात त्यांची वाढती भूमिका अधोरेखित करते.
मंजुरी, कार्यान्वयन आणि मालवाहतूक महसुलातील सातत्यपूर्ण वाढ हे दर्शवते की गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरण मूर्त परिणाम देत आहे. या धोरणामुळे रेल्वे लॉजिस्टिक्स बळकट झाले आहे, खाजगी गुंतवणूक आकर्षित झाली आहे आणि भारतीय रेल्वेला कार्यक्षम मालवाहतुकीचे एक प्रमुख साधन म्हणून स्थान मिळाले आहे.

लॉजिस्टिक क्षेत्रातील वाढीसाठी प्रमुख गती शक्ती कार्गो टर्मिनल्स:
लॉजिस्टिक क्षेत्रातील बदल एका स्वतंत्र टर्मिनलवर अवलंबून नसून, नव्याने कार्यान्वित झालेल्या गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या संपूर्ण नेटवर्कद्वारे साधला जात आहे. या प्रभावाचे स्पष्ट उदाहरण काही ठळक टर्मिनल्सच्या कामगिरीतून पाहता येते:
हरियाणातील मानेसर गती शक्ती कार्गो टर्मिनल :
देशातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल गती शक्ती मल्टि-मॉडल कार्गो टर्मिनल हरियाणातील मॅरुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मानेसर प्लांटमध्ये स्थित आहे. 46 एकर क्षेत्रात व्यापलेला हा टर्मिनल पूर्णपणे विद्युत चालित कॉरिडॉरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये चार पूर्ण-लांबी रेक हॅंडलिंग लाईन्स आणि एक इंजिन एस्केप लाईन आहे, आणि एकूण ट्रॅक लांबी 8.2 किलोमीटर आहे. हा टर्मिनल पातली रेल्वे स्टेशनशी 10 किलोमीटर लांबीच्या समर्पित रेल लिंकद्वारे जोडलेला आहे, जो हरियाणा ऑर्बिटल रेल कॉरिडॉरचा भाग आहे. या लिंकसाठी 800 कोटी रुपये खर्च झाला असून, ज्यापैकी 684 कोटी हरियाणा रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट कर्पोरेशनने दिले आहेत तर उर्वरित मॅरुती सुझुकीने दिले आहेत. लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी तयार केलेला हा टर्मिनल भारतातील सर्वाधिक लोडिंग क्षमता असलेला टर्मिनल असून, तो वर्षाला 4.5 लाख ऑटोमोबाईल्स हाताळण्यास सक्षम आहे.
उत्तरपूर्वेतील गती शक्ती कार्गो टर्मिनल्स:
आसाममधील मोईनरबंद आणि सिनमारा गती शक्ती कार्गो उत्तरपूर्वेतील लॉजिस्टिक क्षमता बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या टर्मिनल्सद्वारे कोळसा, कंटेनर, अन्नधान्य, खत, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल्स आणि विविध सामान्य कार्गोचे प्रभावी हाताळणी केली जाते, ज्यामुळे या प्रदेशातील मालवाहतूक अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनली आहे.
उत्तर-पूर्व सीमांत रेल्वे अंतर्गत विकसित करण्यात आलेला मोनारबंद गती शक्ती मालवाहतूक टर्मिनल हा प्रामुख्याने पेट्रोलियम आणि तेलवाहतुकीशी, विशेषतः इंडियन ऑईलच्या उत्पादनांच्या वाहतुकीशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे, एनएफआर अंतर्गतच विकसित करण्यात आलेला सिनामारा टर्मिनल अन्नधान्य आणि खतांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून तो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया साइडिंगशी संलग्न आहे. ही दोन्ही बहू रचना असणारे लॉजिस्टिक केंद्रे प्रादेशिक व्यापाराला चालना देतात, उद्योग व कृषी उत्पादकांना व्यापक बाजारपेठांशी जोडतात आणि रेल्वे, रस्ते व जलमार्ग यांचे एकात्मिक जाळे उभे करून प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत कार्यक्षमतेत वाढ व खर्चात लक्षणीय घट घडवून आणतात. या आधारावर, आसाममध्ये सहा नवीन मालवाहतूक टर्मिनल्सचे बांधकाम सुरू असून, त्यापैकी बैहाटा टर्मिनल पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. तसेच हबापूर, जोगीघोपा, केंदुकोना, बासुगाव आणि चायागांव येथील प्रस्तावित टर्मिनल्समुळे राज्यातील लॉजिस्टिक क्षमता अधिक वाढणार असून उत्तर-पूर्व भारतात मल्टि मोड्युल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे.
गुजरातमधील न्यू संजली गती शक्ती मालवाहतूक टर्मिनल हे पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका लगत गती शक्ती धोरणाअंतर्गत खासगी जमिनीवर उभारलेले पहिले केंद्र आहे. हे आधुनिक टर्मिनल भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्रातील रूपांतराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरते. धोरणात्मक मालवाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यात आलेले हे टर्मिनल उच्चगती व उच्चक्षमता मालवाहतुकीस चालना देईल, मल्टि मॉडेल एकात्मतेला प्रोत्साहन देईल, तसेच हरित, अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर लॉजिस्टिक व्यवस्थेला बळकटी देईल.
पुढील दिशा:
गती शक्ती मालवाहतूक टर्मिनल धोरणाच्या पुढील टप्प्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, उद्योगांच्या गरजांशी सुसंगत पायाभूत सुविधा आणि जागतिक स्पर्धेत टिकू शकेल अशी लॉजिस्टिक व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग आणि उद्योगाभिमुख स्थळनियोजन यांमुळे भारतातील मालवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, किफायतशीर आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
गती शक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल एकात्मता अधिक बळकट करणे, ज्यामुळे रिअल-टाइम ट्रॅकिंग तसेच भविष्यवेधी विश्लेषण सक्षम होईल. दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारताला जागतिक लॉजिस्टिक हब म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट असून ज्यामुळे जीडीपी मधील लॉजिस्टिक खर्चाचा वाटा एकअंकी ठेवण्याच्या साध्य केलेली यशस्वी वाटचाल राखणे, तसेच पर्यावरणपूरक वाहतूक उपायांद्वारे शाश्वततेला चालना देणे हा उद्देश आहे.
निष्कर्ष :
गती शक्ती मालवाहतूक टर्मिनल्स हे भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने उचललेले एक निर्णायक पाऊल आहे. पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल एकात्मता आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांचा समन्वय साधून, ही टर्मिनल्स दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेल्या कार्यक्षमतेतील अडथळ्यांवर प्रभावी उपाय देत असून राष्ट्रीय आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहेत.
अंमलबजावणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स भारताच्या लॉजिस्टिक व्यवस्थेचे रूपांतर करण्यास सज्ज होत असून, ती व्यवस्था अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि भविष्याभिमुख बनविण्यात मोलाची भूमिका बजावतील.
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अंबादास यादव /संपदा पाटगावकर/ राज दळेकर/ /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 156958)
आगंतुक पटल : 8
Provide suggestions / comments