• Sitemap
  • Advance Search
Farmer's Welfare

समृद्धीचा सुगंध : “शेतीपासून जागतिक कीर्तीपर्यंत, भारतीय कॉफीची यशोगाथा”

Posted On: 29 NOV 2025 10:14AM

नवी दिल्‍ली, 29 नोव्हेंबर 2025

 

ठळक मुद्दे
  • जागतिक कॉफी उत्पादनात भारत 7व्या स्थानावर आहे, एकूण योगदान 3.5%, वार्षिक उत्पादन 3.6 लाख टन, यापैकी 70% कॉफीची 128 देशांमध्ये निर्यात होते.
  • भारताच्या एकूण कॉफी उत्पादनात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा 96% वाटा असून, कर्नाटक अंदाजे 2,80,275 मेट्रिक टन (2025-26) उत्पादनसह पहिल्या स्थानावर आहे.
  • आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची कॉफी निर्यात 1.8 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचली, गेल्या वर्षाच्या तुलनेत 40% जास्त, कॉफी उत्पादक देशांमध्ये भारत 5वा सर्वात मोठा कॉफी निर्यातदार देश.
  • भारत-युके सीईटीए आणि भारत-ईएफटीए टीईपीए यासारख्या व्यापार करारांमुळे युके, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आईसलँड या देशांमध्ये कॉफी निर्यातीला सीमा-शुल्क माफ.
  • इन्स्टंट कॉफी वरील जीएसटी दर 18% वरुन 5% वर आल्यामुळे किमतीत 11-12% घट होण्याची शक्यता असून, यामुळे कॉफीची देशांतर्गत मागणी आणि बाजारातील पोहोच वाढेल.

 

परिचय

इ. स. 1600 च्या सुमाराला सुफी संत बाबा बुदान यांनी येमेनमधील मोका बंदरातून आणलेल्या सात कॉफीच्या बिया कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथील बाबा बुदान गिरी टेकड्यांमध्ये लावल्या, तेव्हा भारताचा ‘कॉफी’ प्रवास सुरू झाला, अशी आख्यायिका आहे. सुरुवातीला बागेतील रोप म्हणून लागवड होणाऱ्या कॉफीची हळूहळू मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली, आणि 18 व्या शतकात कॉफीच्या व्यावसायिक लागवडीची सुरुवात झाली. तेव्हापासून, भारतीय कॉफी, जागतिक कॉफीच्या नकाशावर एक वेगळी जागतिक ओळख असलेला, भरभराटीचा उद्योग म्हणून विकसित झाला आहे. भारतीय कॉफीची लागवड सदाहरित आणि शेंगायुक्त झाडांच्या आगळ्या द्वि-स्तरीय छटा प्रणाली अंतर्गत केली जाते, यात मातीचे आरोग्य आणि जैवविविधता वाढवणाऱ्या सुमारे 50 जाती आहेत. पश्चिम आणि पूर्व घाट आणि ईशान्य प्रदेशात 4.91 लाख हेक्टरवर कॉफीची लागवड केली जात असून, हे पीक पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे समजले जाते. कॉफी क्षेत्र शेती, प्रक्रिया आणि व्यापारात गुंतलेल्या वीस लाखांहून अधिक लोकांची उपजीविका चालवते. सुमारे 99 टक्के जमिनीची मालकी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे या उद्योगात वर्चस्व आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 70 टक्के वाटा त्यांचा असून, भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

कॉफीचे मळे हे मसाल्यांच्या बागा म्हणूनही काम करतात, या ठिकाणी कॉफीबरोबर मिरी, वेलची, व्हॅनिला, यासारखे विविध मसाल्याचे पदार्थ, संत्री आणि केळी याची लागवड केली जाते. जगातील आणि पूर्व घाटातील जैवविविधतेच्या 25 हॉटस्पॉटपैकी एक असलेला पश्चिम घाट, कॉफी लागवडीसाठी आदर्श परिस्थिती उपलब्ध करतो, थंड डोंगराळ प्रदेशात अरेबिका आणि उबदार, दमट प्रदेशात रोबस्टा या कॉफीच्या प्रजाती चांगल्या वाढतात. भारतातील रोबस्टा जगात अव्वल स्थानी आहे, तर अरेबिका ही उत्कृष्ट गुणवत्ता आणि विशिष्ट चवीसाठी ओळखली जाते. भारतीय कॉफी मंडळाच्या मते, भारत आता जगातील आघाडीच्या कॉफी उत्पादकांपैकी एक आहे, जो कॉफीचा सातव्या क्रमांकाचा उत्पादक आहे आणि जागतिक कॉफी उत्पादनात सुमारे 3.5 टक्के योगदान देतो. भारतात दरवर्षी अंदाजे 3.6 लाख टन कॉफीचे उत्पादन होते, त्यापैकी जवळजवळ 70 टक्के कॉफी 128 देशांमध्ये निर्यात केली जाते, ही आकडेवारी भारतीय कॉफीची वाढती जागतिक मागणी अधोरेखित करते.

 

भारतीय कॉफी क्षेत्राचा आढावा

भारतातील कॉफी उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या प्रमुख कॉफी उत्पादक राज्यांमध्ये केंद्रित आहे, ही राज्ये एकत्रितपणे देशाच्या एकूण कॉफी उत्पादनापैकी सुमारे 96 टक्के उत्पादन करतात. यामध्ये, कर्नाटक 2,80,275 मेट्रिक टन उत्पादनासह आघाडीवर आहे (2025–26 साठी पोस्ट ब्लॉसम अंदाज), त्यानंतर केरळ आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.

A graph of coffee productionAI-generated content may be incorrect.

भारतातील कॉफी उत्पादक भूप्रदेश 13 वेगवेगळ्या कृषी-हवामान झोनमध्ये विभागला गेला असून, प्रत्येक झोनला जागतिक बाजारपेठेत त्याच्या कॉफीसाठी एक वेगळी ओळख आणि मान्यता आहे. या झोनचे तीन विस्तृत गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे: अ) कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश असलेले पारंपारिक प्रदेश, ब) अपारंपरिक प्रदेश - आंध्र प्रदेश आणि ओडिशा आणि क) आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरासह ईशान्येकडील प्रदेश. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या आदिवासी पट्ट्यात कॉफी महत्त्वाची सामाजिक-आर्थिक भूमिका बजावते आणि ग्रामीण विकास आणि पर्यावरणीय समतोल वाढवण्याबरोबर, शाश्वत उपजीविका प्रदान करते. मान्यताप्राप्त कॉफी उत्पादक प्रदेशांमध्ये अनामलाई (तामिळनाडू), अराकू व्हॅली (आंध्र प्रदेश), बाबाबुदंगीरिस (कर्नाटक), चिक्कमगालुरू (कर्नाटक), कुर्ग (कर्नाटक), निलगिरी (तामिळनाडू), शेवरॉय (तामिळनाडू), त्रावणकोर (केरळ) आणि वायनाड (केरळ) यांचा समावेश आहे.

 

भारतीय कॉफीची प्रादेशिक मान्यता

भारताने पाच प्रादेशिक आणि दोन स्पेशालिटी कॉफीसाठी जीआय मानांकन मिळवले आहेत, ही मान्यता आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांचे प्रीमियम मूल्य वाढवते. देशातील विविध उंचीवरील भूप्रदेश, पर्जन्यमान आणि मातीची परिस्थिती, भारतीय कॉफीची समृद्ध विविधता आणि अपवादात्मक गुणवत्ता यात योगदान देते. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) पाच भारतीय प्रादेशिक कॉफीच्या जातींना जीआय मानांकन प्रदान केले आहेत: कूर्ग अरेबिका कॉफी, वायनाड रोबस्टा कॉफी, चिकमंगळूर अरेबिका कॉफी, अराकू व्हॅली अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरिस अरेबिका कॉफी. याव्यतिरिक्त, भारतातील मान्सूनेड मलबार रोबस्टा, या वैशिष्ट्यपूर्ण कॉफीला देखील जीआय मानांकन मिळाले आहे.

जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय)?

जिओग्राफीकल इंडिकेशन हा एक प्रकारचा आयपीआर आहे. तो उत्पादनाला विशिष्ट प्रदेशातील असल्याची ओळख मिळवून देतो. ही ओळख त्या प्रदेशाची नैसर्गिक वैशिष्ट्ये अथवा पारंपरिक पद्धतींशी जोडलेली असते. ‘जीआय टॅग’ ला कायदेशीर संरक्षण असून, त्याची नक्कल अथवा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित उत्पादनाच्या मूळ ठिकाणच्या केवळ अधिकृत उत्पादकांना त्याचा वापर करण्याची परवानगी आहे.

 

स्पेशालिटी कॉफी म्हणजे सर्वोत्तम दर्जाचे कॉफीचे दाणे, जे त्यांच्या अपवादात्मक चव, सुगंध आणि दिसण्यामुळे ओळखले जातात. ही कॉफी काळजीपूर्वक लागवड, निवडक तोडणी आणि काटेकोर प्रक्रिया करून तयार केली जाते, परिणामी, तिचा वैशिष्ट्यपूर्ण स्वाद, जगभरातील कॉफीच्या सुजाण ग्राहकांच्या पसंतीला उतरतो. आपला आगळा स्वाद आणि गंध, यामुळे स्पेशालिटी कॉफीला जागतिक बाजारात मोठी किंमत मिळते, भारताच्या कॉफी क्षेत्राचा हा गतिशील विभाग आहे. भारतीय बागायतदारांनी जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त केलेल्या स्पेशालिटी कॉफीच्या पुढील प्रकरांची लागवड करण्याची कला आत्मसात केली आहे:

  • मॉन्सूनड् मलबार ए.ए.- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सून प्रक्रियेद्वारे लागवड होणारी मऊ, गोड चव आणि कमी आम्लतेसाठी ओळखली जाणारी कॉफी.
  • म्हैसूर नगेट्स एक्स्ट्रा बोल्ड- मोठे दाणे, समृद्ध सुगंध आणि परिपूर्ण चवीची भारतातील सर्वोत्तम अरेबिका कॉफींपैकी एक.
  • रोबस्टा कापी रॉयल- एक उत्कृष्ट रोबस्टा प्रकार, जो त्याच्या ठळक चवीसाठी, उत्कृष्ट क्रीमसाठी आणि एस्प्रेसो मिश्रणांसाठी आदर्श म्हणून ओळखला जातो.

या मान्यतेमुळे भारतीय कॉफी उत्पादकांना प्रदेशानुसार कॉफीची वैशिष्ट्ये जपायला, भारतीय कॉफीची जागतिक रूपरेषा उंचवायला आणि त्यांच्या प्रीमियम वाणांना चांगली किंमत मिळवण्यासाठी सक्षम बनवले आहे. एकत्रितपणे, या सुप्रतिष्ठित कॉफी भारताच्या परंपरा, नवोन्मेष आणि उत्कृष्टतेच्या सुसंवादाचे प्रतिबिंब दर्शवतात, आणि देशाला जागतिक कॉफी उद्योगात महत्वाचे स्थान मिळवून देतात.

कॉफी बोर्डची स्थापना

1940 च्या दशकात, भारतातील कॉफी उद्योगाला दुसऱ्या महायुद्धामुळे, घसरत्या किंमती आणि कीटक आणि रोगांच्या व्यापक प्रादुर्भावामुळे गंभीर संकटाचा सामना करावा लागला. या क्षेत्राचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी, भारत सरकारने "1942 चा कॉफी कायदा VII" लागू केला, या अंतर्गत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कॉफी बोर्ड ऑफ इंडिया ची स्थापना झाली. मंडळात 33 सदस्यांचा समावेश आहे, यात अध्यक्ष, सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कॉफी उत्पादक, व्यापारी, क्युरिंग युनिट्स, कामगार, ग्राहक, प्रमुख कॉफी उत्पादक प्रदेशातील राज्य सरकारे आणि संसद सदस्य, यांचा समावेश आहे. संशोधन आणि विकासाद्वारे संपूर्ण कॉफी मूल्य साखळीला समर्थन देणे आणि विकसित करणे हे कॉफी बोर्डाचे प्राथमिक कर्तव्य आहे. तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन. हे इंटिग्रेटेड कॉफी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (आयसीडीपी) अंतर्गत उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी, उच्च मूल्य प्राप्तीसाठी निर्यात वाढवण्यासाठी आणि ड्रायिंग यार्ड आणि पल्पर युनिट्ससारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करते.

कॉफी बोर्डची भूमिका

केंद्रीय कॉफी संशोधन संस्थेत (सीसीआरआय) मुख्यालय असलेला कॉफी बोर्डाचा संशोधन विभाग, आपल्या पाच प्रादेशिक संशोधन केंद्रांसह, उच्च-उत्पादन देणाऱ्या, रोग-प्रतिरोधक जाती विकसित करण्यासाठी आणि उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे मानकीकरण करण्यासाठी समर्पित आहे. प्रोत्साहन विभाग देशांतर्गत कॉफीच्या वापराला चालना देण्याबरोबर, जागतिक बाजारपेठेत भारताचा विस्तार करण्यावर भर देतो.

निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत, "इंडिया ब्रँड" म्हणून किरकोळ पॅकमध्ये निर्यात केलेल्या मूल्यवर्धित कॉफीसाठी, आणि अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्क यासारख्या दूरवरच्या देशांमध्ये उच्च मूल्याच्या ग्रीन कॉफीच्या निर्यातीसाठी ट्रान्झिट / मालवाहतूक सहाय्य प्रदान केले जाते. त्याच बरोबर युरोपियन युनियन, रशिया आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) बरोबर मजबूत व्यापार संबंध कायम ठेवले जातात. कॉफी बोर्ड, प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यांमध्ये भारतीय कॉफीचे सक्रियपणे प्रतिनिधित्व करते आणि प्रीमियम कॉफीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याला जागतिक खरेदीदारांशी जोडण्यासाठी ‘फ्लेवर ऑफ इंडिया - द फाइन कप’ ही स्पर्धा आयोजित करते. देशात कॉफीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि कॉफी संस्कृतीला चालना देण्यासाठी, कॉफी बोर्ड, प्रमुख शहरांमध्ये 12 इंडिया कॉफी हाऊसचे नेटवर्क चालवते आणि राष्ट्रीय प्रदर्शने आणि व्यापार मेळाव्यांमध्ये भाग घेते, भारतीय कॉफीची जाहिरात करते आणि कॉफीचे आरोग्य विषयक फायदे ग्राहकांपर्यन्त पोहोचवते.

कॉफीची निर्यात

जागतिक कॉफी व्यापारात भारत एक महत्वाचा देश म्हणून उदयाला आला आहे. कॉफी उत्पादक देशांमध्ये कॉफीचा निर्यातदार म्हणून भारताचा पाचवा क्रमांक लागतो आणि जगभरातील कॉफी उत्पादक देशांच्या एकूण कॉफी निर्यातीत भारताचे सुमारे 5 टक्के योगदान आहे. गेल्या चार वर्षांत, भारताची कॉफीची निर्यात सातत्याने वाढली असून, 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कॉफीची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के इतकी प्रभावी वाढ नोंदवत 1.8 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचली, गेल्या वर्षी ती 1.29 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. जागतिक भू-राजकीय आव्हाने असूनही, एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान निर्यात 1.07 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, 2024 मधील याच कालावधीच्या तुलनेत ती 15.5% वाढ दर्शवते. भारत हे इन्स्टंट कॉफी उत्पादन आणि निर्यातीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे, एकूण कॉफीच्या निर्यातीत मूल्यवर्धित उत्पादनांचा वाटा सुमारे 38 टक्के आहे.

A graph with blue bars and a arrow pointing upAI-generated content may be incorrect.

जगात सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापार आणि उपभोग असलेल्या उत्पादनांपैकी एक असलेल्या कॉफीला प्रचंड आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. भारतीय कॉफीची सर्वाधिक निर्यात होणारी टॉप 5 ठिकाणे म्हणजे, इटली (18.09%), जर्मनी (11.01%), बेल्जियम (7.47%), रशियन फेडरेशन (5.28%) आणि संयुक्त अरब अमिराती (5.09%). भारताच्या कॉफी निर्यातीत अलिकडच्या काळात झालेल्या वाढीमुळे भारतीय कॉफीची जागतिक प्रतिष्ठा वाढली आहे आणि विशेषतः प्रमुख कॉफी उत्पादक राज्यांमधील उत्पादकांच्या उत्पन्नात सुधारणा झाली आहे.

 

कॉफी क्षेत्राला चालना देणारे धोरण आणि व्यापार सुधारणा

कॉफी उत्पादनांवरील जीएसटी दर कपात

कॉफीचे अर्क, एसेन्स आणि इन्स्टंट कॉफीवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे हे या क्षेत्रासाठी एक मोठे आर्थिक पाऊल आहे. या बदलामुळे किरकोळ किंमती 11-12 टक्क्यांनी कमी होतील, देशांतर्गत वापराला प्रोत्साहन मिळेल आणि छोट्या व्यापऱ्यांचा नफा वाढेल अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत बाजारपेठेचा पाया मजबूत होईल आणि भारताचा दरडोई कॉफीचा वापर वाढेल.

भारत-युनायटेड किंगडम व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए)

नुकताच संपन्न झालेला भारत-यूके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) हा द्विपक्षीय व्यापार संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या करारामुळे भारतीय मूल्यवर्धित कॉफीला, विशेषतः इन्स्टंट कॉफीला, सीमा शुल्कात सूट मिळते. भारताच्या कॉफीच्या निर्यातीपैकी 1.7 टक्के वाटा असलेल्या युनायटेड किंगडममध्ये आता रोस्ट अँड ग्राउंड आणि इन्स्टंट कॉफीसाठी सीमा-शुल्क मुक्त प्रवेश दिला जाईल. हा करार भारतीय निर्यातदारांना जर्मनी, स्पेन आणि नेदरलँड्स इथल्या पुरवठादारांशी अधिक प्रभावीपणे स्पर्धा करायला सक्षम बनवेल. हा करार यूकेमध्ये मूल्यवर्धित कॉफी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी एक मजबूत पाया स्थापित करतो.

भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए)

भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर (टीईपीए), 10 मार्च 2024 रोजी स्वाक्षरी झाली आणि तो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाला, हा गुंतवणुकीला रोजगार निर्मितीशी जोडणारा भारताचा पहिला मुक्त व्यापार करार (एफटीए) आहे. टीईपीए अंतर्गत, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड भारतातून होणाऱ्या सर्व कॉफी आयातीवर शून्य टक्के शुल्क आकारतील. टीईपीए, ईएफटीए बाजारपेठेत भारतीय कॉफीला सर्वात अनुकूल बाजारपेठ उपलब्ध करून देते. टीईपीए, कॉफी निर्यातदारांना स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँडमधील प्रीमियम बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवायला सहाय्य करेल, ज्यामुळे भारतातील उच्च-गुणवत्तेच्या, सावलीत पिकवलेल्या, हाताने निवडलेल्या आणि उन्हात वाळवलेल्या कॉफीला ईएफटीए बाजारपेठेत स्थान मिळवून देता येईल. या करारामुळे भाजलेल्या आणि इन्स्टंट कॉफीसारख्या मूल्यवर्धित कॉफीच्या निर्यातीच्या संधी वाढतात.

 

फाइन कप अवॉर्ड: भारतातील सर्वोत्तम कॉफीचे प्रदर्शन

कॉफी बोर्ड ऑफ इंडियाने 2002 मध्ये सुरू केलेला ‘द फ्लेवर ऑफ इंडिया - द फाइन कप अवॉर्ड’, भारतीय कॉफीमधील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करतो आणि देशातील सर्वोत्तम ब्रूजना जागतिक नकाशावर स्थान देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कॉफी बोर्डाने 2022-23 मध्ये ‘नो युवर कापी (केवायके)’ कार्यक्रम सुरू केला, सहा श्रेणींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कॉफीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्याला पुरस्कार देण्यासाठीचे हे एक विशेष कप गुणवत्ता मूल्यांकन व्यासपीठ आहे.

एका उल्लेखनीय कामगिरीमध्ये, कोरापुट कॉफीने केवायके 2024 दरम्यान वॉशड् प्रोसेस आणि नैसर्गिक प्रक्रिया, या श्रेणींसाठी प्रत्येकी एक असे एकूण दोन फाइन कप पुरस्कार जिंकले. या मान्यतेमुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा वाढली आहे आणि भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण कॉफी नकाशावर कोरापूट कॉफीला ठळक स्थान मिळाले आहे, जे ओडिशातील आदिवासी आणि उंच डोंगराळ प्रदेशातील कॉफीच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब आहे.

कोरापुट कॉफी द्वारे परिवर्तन

ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील नंदपूर ब्लॉकमधील पडवा गावातील परजा समाजाचे बलराम हंतल यांनी पूर्वी विजयवाडा आणि बंगळूरमध्ये मजूर म्हणून काम केले होते, त्यानंतर ते आपल्या गावी परतले. 2005-06 मध्ये, त्यांनी दोन एकर जमिनीवर कॉफीची लागवड केली आणि 2010-11 पर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. कॉफी बोर्डाच्या मदतीने, त्यांनी कॉफीच्या बियांवर प्रक्रिया करण्यासाठी एक बेबी पल्पर मशीन मिळवले. ओडिशा ट्रायबल डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह कॉर्पोरेशन लिमिटेड (टीडीसीसीओएल) च्या पाठबळाने त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि स्थिर भाव मिळाला. आज, हंतल कॉफी आणि काळी मिरीच्या लागवडीतून वर्षाला सुमारे 3 लाख रुपये कमवतात. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी पक्के घर बांधले आहे. त्यांच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यांचा मुलगा जवाहर नवोदय विद्यालय, कोरापुट येथे शिकत आहे. त्यांची यशोगाथा शाश्वत कॉफी शेतीच्या परिवर्तनकारी क्षमतेचा दाखला असून, तिने त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याला उपजीविकेची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि आशा दिली आहे.

 

कॉफी खरेदी आणि विपणन यात टीडीसीसीओएलचा सहभाग

ओडिशा सरकारच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विकास विभागांतर्गत 1967 मध्ये स्थापन झालेली, आदिवासी विकास सहकारी महामंडळ ओडिशा लिमिटेड (टीडीसीसीओएल) ही आदिवासी कल्याणासाठी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणून काम करते. ओडिशामध्ये शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देताना गौण वन उत्पादन (एमएफपी) आणि अतिरिक्त कृषी उत्पादनांना (एसएपी) रास्त भाव मिळवून आदिवासी समुदायांचे आर्थिक हित जपण्यात ही संस्था महत्वाची भूमिका बजावते.

2019-20 पासून, टीडीसीसीओएलने कोरापुट जिल्ह्यात कॉफी खरेदीत आघाडीची भूमिका घेतली असून, उच्च-गुणवत्तेच्या अरेबिका कॉफीसाठी ही आदर्श परिस्थिती समजली जाते. या संस्थेने केंद्रीकृत मंडई, ते घरोघरी खरेदी करण्यापर्यंतचे स्थित्यंतर पहिले असून, योग्य किंमत सुनिश्चित केली आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन दिले.

ठळक मुद्दे:

  • एंड-टू-एंड मॅनेजमेंट: खरेदीपासून ते ड्रायिंग, ग्रेडिंग आणि मार्केटिंगपर्यंत संपूर्ण मूल्य साखळीचे व्यवस्थापन.
  • योग्य किंमत: वार्षिक खरेदी दर आयसीटीए बाजारभावांशी जुळवून घेतले जातात, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात.
  • सामाजिक-आर्थिक परिणाम: या उपक्रमामुळे संकटग्रस्त स्थलांतर कमी झाले आहे आणि ग्रामीण उपजीविकेत सुधारणा झाली आहे.
  • मूल्यवर्धन: 11 सप्टेंबर 2019 रोजी “कोरापुट कॉफी” ब्रँडचे लाँचिंग, शाश्वत स्रोत असलेली, समृद्ध चव असलेली कॉफी देणारा ब्रँड अशी त्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख आहे.

टीडीसीसीओएलने ओडिशामध्ये आठ "कोरापुट कॉफी" कॅफे स्थापन केले आहेत - भुवनेश्वरमध्ये चार, पुरीमध्ये एक, कोरापुटमध्ये दोन आणि ओडिशा भवन, नवी दिल्ली येथे एक. ब्रँडची विशिष्ट ओळख आणि शाश्वत उत्पत्तीचा प्रचार केला जात आहे.

कॉफी बोर्ड ऑफ इंडिया, इंटिग्रेटेड कॉफी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (आय.सी.डी.पी.)द्वारे टी.डी.सी.सी.सी.ओ.एल.ला देखील पाठबळ देते, जे ड्रायिंग यार्ड आणि कॉफी पल्पर सारख्या पायाभूत सुविधांसाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.

 

भविष्यातील दृष्टीकोन: कॉफी उत्पादनात नवी उंची गाठणे

भारताचा कॉफी उद्योग सशक्त वाढीसाठी 2028 पर्यंत सज्ज असून, एकूण बाजारपेठेचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर 8.9 टक्के राहील असा अंदाज आहे. आउट-ऑफ-होम कॉफी सेगमेंटमध्ये आणखी वेगाने वाढ होत असून, ते 15 ते 20 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढेल, आणि 2028 पर्यंत ते 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स ते 3.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या दरम्यान पोहोचेल असा अंदाज आहे. याशिवाय, कॉफी बोर्ड ऑफ इंडियाने 2047 पर्यंत राष्ट्रीय कॉफी उत्पादन 9 लाख टनांपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, यामुळे जागतिक स्तरावर आघाडीचा कॉफी उत्पादक देश म्हणून भारताचा उदय होत आहे.

 

निष्कर्ष

भारताची कॉफी यशोगाथा लवचिकता, नवोन्मेष आणि परिवर्तनाची आहे. बाबा बुदन गिरी टेकड्यांमधील छोट्याशा सुरुवातीपासून ते जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवण्यापर्यंत, भारतीय कॉफी गुणवत्ता, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक म्हणून विकसित झाली आहे. देशाची आगळी पर्यावरणीय विविधता, आणि लाखो लघु शेतकऱ्यांची वचनबद्धता, याने कॉफी चे असे परिदृश्य निर्माण केले आहे, जे परंपरेला आधुनिक उद्योगाशी जोडते. कॉफी बोर्ड ऑफ इंडियाने संशोधन, विकास, निर्यात प्रोत्साहन आणि देशांतर्गत बाजारपेठ विस्तारासाठी सतत पाठिंबा देऊन, या परिवर्तनाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मान्सूनेड मलबार, म्हैसूर नगेट्स आणि कोरापूट कॉफी यासारख्या विशेष कॉफीच्या उदयामुळे प्रीमियम, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वाणांचा उत्पादक म्हणून भारताची प्रतिष्ठा बळकट झाली आहे. ओडिशातील टीडीसीसीओएल सारख्या आदिवासी सहकारी संस्थांच्या यशाने कॉफी हे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविका निर्मितीचे साधन कसे बनू शकते, हे सिद्ध केले आहे. याशिवाय, जीएसटी कपात आणि भारत-यूके सीईटीए आणि भारत-ईएफटीए टीईपीए यासह मुक्त व्यापार करारांसारख्या धोरणात्मक उपायांमुळे, मूल्यवर्धित कॉफी निर्यातीसाठी संधींचा विस्तार झाला आहे, यामुळे जागतिक कॉफी उद्योगात भारताचा वाढता प्रभाव दिसून येतो.

2047 साला पर्यंत देशाचे कॉफी उत्पादन 9 लाख टनांपर्यंत वाढवण्याच्या स्पष्ट दृष्टीकोनासह उद्योग पुढे जात असताना, भारताचे कॉफी क्षेत्र एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहे. गुणवत्ता, शाश्वतता आणि न्याय्य विकासावर लक्ष केंद्रित करून, भारत आपल्या मातीत खोलवर रुजलेली आणि जगभरात साजरी होणारी यशोगाथा लिहीत आहे.

 

संदर्भ

पीएम इंडिया

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (निर्यात)

कॉफी बोर्ड ऑफ इंडिया

इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशन

पीआयबी प्रेस रिलीज

 

समृद्धीचा सुगंध

 

* * *

नितीन फुल्‍लुके/राजश्री आगाशे/दर्शना राणे

(Explainer ID: 156789) आगंतुक पटल : 103
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , हिन्दी , Assamese , Gujarati , Kannada