• Sitemap
  • Advance Search
Energy & Environment

गर्जणारे पुनर्जीवन : चित्त्याचे पुनरागमन

Posted On: 12 DEC 2025 2:34PM

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2025

 

महत्त्वाचे मुद्दे

  • जगातील पहिले आंतरखंडीय मोठ्या मांसाहारी प्राण्यांचे स्थलांतर यशस्वीरित्या पूर्ण झाले, 2022-2023 दरम्यान नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील 20 चित्ते भारतात आले.
  • 17 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या पहिले आठ चित्ते मुक्त केले.
  • डिसेंबर 2025 पर्यंत, भारतात एकूण 30 चित्ते आहेत - 12 प्रौढ, 9 किशोर आणि 9 शावक - ज्यामध्ये 11 संस्थापक प्राणी आणि १९ भारतात जन्मलेल्या 19 पिल्लांचा समावेश आहे.
  • भारतीय भूमीवर जन्मलेली पहिली चित्त्याची शावक ‘मुखी’ आता स्वतः पाच निरोगी शावकांची आई बनली आहे.
  • कुनो परिसरातील स्थानिक समुदायांसाठी 450 हून अधिक ‘चित्ते मित्र’, 380 थेट नोकऱ्या आणि 5% इको-टुरिझम महसूल वाटा निर्माण झाला आहे.
  • 2032 पर्यंत भारत 17,000 चौ किमी मध्ये 60-70 चित्त्यांची स्वयंपूर्ण जनसंख्या निर्माण करण्याच्या मार्गावर आहे, गांधीसागर वन्यजीव अभयारण्य पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे.

 

प्रस्तावना

2022 मधील सप्टेंबरच्या पहाटेच्या सुवर्ण किरणात न्हालेल्या वातावरणात, नामिबियातील गवताळ प्रदेशातून आलेले आठ भव्य चित्ते भारतीय भूमीवर उतरले, त्यांच्या पावलांनी उपखंडातून दशकांपूर्वी हरवलेल्या एका प्रजातीच्या पुनरागमनाचा पहिला अध्याय लिहिला. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घडलेला हा ऐतिहासिक क्षण प्रकल्प चित्ताच्या उदयाची घोषणा करणारा ठरला, जो एका मोठ्या मांसाहारी प्राण्याचे जगातील पहिले आंतरखंडीय स्थलांतर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय भूमीवर जन्मलेली चित्त्याचे मादी पिल्लू, ‘मुखी’ आता स्वतः पाच निरोगी पिल्लांची आई बनली आहे, जी केवळ जैविक पुनरुज्जीवनाची नाही तर निसर्गाच्या नाजूक संतुलनावर मानवाच्या उत्तरदायी प्रयत्नाचा एक गहन पुरावा आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नेतृत्वाखाली सुरू झालेला, प्रकल्प चित्ता जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी भारताच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. 2013 च्या कृती आराखड्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे, 1952 मध्ये भारतात नामशेष घोषित झालेल्या आशियाई चित्त्याला (अ‍ॅसिनोनिक्स जुबॅटस) एक प्रमुख प्रजाती म्हणून पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे विशाल भूप्रदेशांमध्ये पर्यावरणीय आरोग्य वृद्धिंगत होईल.

डिसेंबर 2025 पर्यंत, कुनोमध्ये 30 चित्यांची स्थिर संख्या आहे. तसेच बोत्सवानाहून भारतात आणखी आठ चित्ते आल्याने, हा प्रकल्प आशेचा किरण बनला असून वैज्ञानिक अचूकता आणि मुत्सद्दीगिरीच्या बळावर आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवत आहे.

संवर्धन प्रयोग म्हणून सुरू झालेला प्रकल्प पर्यावरणीय आशावाद आणि राष्ट्रीय वचनबद्धतेचे विधान बनला आहे: जी तुटलेला पर्यावरणीय दुवा पुनर्संचयित करण्याची, आपल्या नैसर्गिक वारशाचा सन्मान करण्याची आणि मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या पुनर्वसनात जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची संधी आहे.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी: नामशेष होण्यापासून ते पुनर्जागरणापर्यंत

भारतातील चित्त्याची कहाणी प्राचीन कथेच्या रचनेत विणलेली आहे, ज्यामध्ये हा प्राणी राजे महाराजे यांचा आवडता शिकारी साथीदार होता. अरबी द्वीपकल्पापासून ते भारतीय उपखंडापर्यंत भ्रमण करणारा आशियाई चित्ता स्वातंत्र्यानंतर भारतातून नामशेष झाला, ज्यामुळे गवताळ प्रदेश-सवाना परिसंस्थेत एक पोकळी निर्माण झाली. ऐतिहासिकदृष्ट्या, आशियाई चित्ता संपूर्ण भारतात, उत्तरेकडील पंजाबपासून तामिळनाडूमधील तिरुनेलवेलीपर्यंत आणि पश्चिमेकडील गुजरात आणि राजस्थानपासून पूर्वेकडील बंगालपर्यंत आढळत असे. झुडुपांची जंगले, कोरडे गवताळ प्रदेश, सवाना आणि इतर शुष्क ते निम-शुष्क भूप्रदेश हे त्यांचे खुले अधिवास होते.

भारतात वन्य चित्त्यांचे अंतिम दर्शन 1947 मध्ये घडले, जेव्हा सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील शाल (शोरिया रोबस्टा) जंगलात तीन प्राण्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यानंतर केवळ पाच वर्षांनंतर, 1952 मध्ये, ही प्रजाती अधिकृतपणे भारतातून नामशेष घोषित करण्यात आली, ज्यामुळे उपखंडातील तिचे मूळ अस्तित्व संपले.

अतोनात शिकार, बेकायदेशीर शिकार आणि शिकार करण्यासाठी चित्त्यांचा वापर यामुळे भारतातील मूळ आशियाई चित्ते नामशेष झाले. शेतीमुळे मोठ्या प्रमाणात अधिवास नष्ट होणे, शिकार कमी होणे, हवामानातील ताणतणाव आणि प्रजातींचा कमी पुनरुत्पादन दर तसेच मर्यादित अनुवांशिक विविधता यामुळे त्यांच्या विलुप्ततेला आणखी गती मिळाली.

तज्ञ समितीने मान्यता दिलेल्या, 24 गावांचे (1,545 कुटुंबे) स्थलांतर केल्यानंतर, कुनो राष्ट्रीय उद्यानाची इष्टतम पुनर्प्रजनन स्थळ म्हणून निवड करण्यात आली, ज्यामुळे चित्त्यांसाठी जवळजवळ 6,258 हेक्टर अतिक्रमण मुक्त गवताळ क्षेत्र उपलब्ध झाले.

2022 पर्यंत, जैविक विविधतेवरील अधिवेशनात (सीबीडी) संरेखित प्रजाती पुनर्प्राप्तीसाठी धोरणांच्या आधारे भारताने ही योजना कृतीत आणली. या प्रकल्पाची भावना संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय क्रमांक 15 (जमिनीवरील जीवन) याच्याशी जुळते, ज्यामुळे सीमापार संवर्धनाद्वारे जैवविविधतेचे नुकसान थांबवून ते पुर्वीच्या स्थितीत आणण्यात भारत अग्रणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण उपाययोजना ही प्रकल्प चीत्तामागील प्रेरक शक्ती आहे, ज्यामुळे दशकांपूर्वीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. 2022 च्या कृती आराखड्याचे सूत्र तयार करण्याच्या मार्गदर्शनापासून, जगातील पहिल्या आंतरखंडीय चित्त्यांच्या स्थलांतरणाला गती देण्यापर्यंत आणि नामिबियातून आणलेल्या पहील्या आठ चित्त्यांना 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वतः कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यापर्यंत, पंतप्रधानांनी प्रत्येक टप्प्यावर आवर्जून सहभाग घेतला. पंतप्रधानांनी नामिबिया (जुलै 2022) आणि दक्षिण आफ्रिका (जानेवारी 2023) सोबत उच्चस्तरीय सामंजस्य करार केले, नागरिकांना मन की बातद्वारे चित्त्यांना नावे देण्यासाठी आमंत्रित करून राष्ट्राला सहभागी करून घेतले आणि 2023 मध्ये पहिल्या भारतीय शावकांचा जन्म तर नोव्हेंबर 2025 मध्ये ऐतिहासिक दुसऱ्या पिढीतील पिल्ले यासारख्या महत्त्वाच्या घटनांवर सातत्याने प्रकाश टाकला. डिसेंबर 2025 पर्यंत, भारतात एकूण 30 चित्ते आहेत - त्यापैकी 12 प्रौढ, 9 तरुण आणि 9 शावक असून - त्यात 11 संस्थापक चित्ते आणि 19 भारतात जन्मलेले चित्ते आहेत.

या प्रकल्पाला मिशन लाईफ आणि भारताच्या जी-20 “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या तत्वांशी जोडून, पंतप्रधान मोदी यांनी प्रकल्प चित्ता ला विज्ञान- आधारित, समुदाय-समावेशक पुनर्वसनाचे जागतिक प्रतीक बनवले आहे, त्यांच्या प्रगतीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण केले आहे आणि भारतात सात दशकांहून अधिक काळ निशब्द असलेल्या चित्त्याची गर्जना पुन्हा एकदा त्याच्या प्राचीन गवताळ प्रदेशात दुमदुमू लागेल याची खात्री केली आहे.

 

दिनांक

घटना / मैलाचा दगड

17 सप्टेंबर 2022

  • नामिबियाहून भारतात पाठवण्यात आलेल्या 8 आफ्रिकन चित्त्यांची (5 माद्या, 3 नर) पहिली तुकडी, मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान (केएनपी) येथे विलगीकरण कुंपणात सोडण्यात आली.

फेब्रुवारी 2023

  • दुसरी तुकडी: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सामंजस्य करारांतर्गत दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आली.

2023 (पहिले 6 महिने)

  • भारतीय भूमीवर पहिला जन्म: आयात केलेल्या चित्त्यांपासून जन्मलेले शावक, 70 वर्षांहून अधिक काळानंतर भारतात पहिल्या चित्त्याचा जन्म.

2024 पासून पुढे

  • हवामानानुसार अनुकूलन करणाऱ्या बोमांना टप्प्याटप्प्याने खुल्या जंगलात सोडण्यास सुरुवात; आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट-रिलीज प्रोटोकॉलचे पालन केले गेले.

2024–25

  • कार्यक्रमाचा विस्तार नवीन चित्ते (उदा. बोत्सवानातून) आणण्याची आणि कुनोव्यतिरिक्त इतर अधिवासांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये, बोत्सवानाने भारताला आठ चित्ते भेट म्हणून दिले.

 

उद्दिष्टे आणि धोरणात्मक चौकट

प्रकल्प चित्ताचा बहुआयामी उद्देश कुनो-गांधीसागर परिसरातील 17,000 चौ. किमी क्षेत्रात 60-70 चित्त्यांची व्यवहार्य मेटापॉप्युलेशन स्थापित करणे आणि मोकळी जंगले आणि गवताळ परिसंस्था पुनर्संचयित करणे, तसेच वाढीव कार्बन साठ्याद्वारे हवामान प्रभाव कमी करणे हे आहेत. प्रकल्प चित्ता अंतर्गत, चित्त्याला फ्लॅगशिप/अम्ब्रेला प्रजाती म्हणून घोषित केले गेले आहे. चित्त्याच्या पुनर्प्रवेशातून दुर्लक्षित गवताळ प्रदेश आणि अर्ध-शुष्क परिसंस्था पुनर्संचयित करणे हा या अधिकृत आराखड्याचा उद्देश आहे त्याच्या, ज्यामुळे शिकार प्रजाती आणि इतर गवताळ प्रदेश-आधारित जैवविविधतेला फायदा होईल.

टप्प्याटप्प्यांची अंमलबजावणी खालील गोष्टींद्वारे पर्यावरणीय विवेक सुनिश्चित करते:

  • कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या 748 चौरस किमी कोअर क्षेत्रात चित्ते सोडणे आणि हळूहळू हा विस्तार 3200 चौरस किमी पर्यंत वाढवणे. पहिल्या पाच वर्षांत दक्षिण आफ्रिका, नामिबिया किंवा इतर आफ्रिकन देशांमधून सुमारे 12-14 प्रजननक्षमतेच्या वयाचे, अनुवांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण, रोगमुक्त, भक्षकांबाबत सावध, कुशल शिकारी आणि सामाजिकदृष्ट्या सुसंगत जंगली चित्ते संस्थापक म्हणून आणले जातील, आवश्यकतेनुसार अतिरिक्त आयात केली जाईल.
  • कुनोपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या गांधीसागर वन्यजीव अभयारण्याशी (368 चौरस किमी अभयारण्य, 2,500 चौरस किमी संभाव्य अधिवास) मेटापॉप्युलेशन जोडणी. पुनर्संचयित उपाय, भक्ष्य उपलब्धता आणि वैज्ञानिक व्यवस्थापन सुनिश्चित केल्यानंतर कुनो-गांधीसागर परिसरात 60-70 चित्त्यांचे मेटापॉप्युलेशन स्थापित करणे हे दीर्घकालीन ध्येय आहे.
  • स्वयंपूर्ण वाढ: जर नैसर्गिक मृत्युदर, जन्म आणि कालांतराने पूरकतेचा विचार केला तर सुमारे 5% निव्वळ वार्षिक वाढीचा दर राखला गेला तर सोडलेल्या चित्त्यांची संख्या सुमारे 15 वर्षांत तिच्या वहन क्षमतेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

अर्थसंकल्पीय मदत संकल्पावर भर देते: पहिल्या टप्प्यासाठी 39 कोटी रुपये ( 50 लाख अमेरिकन डॉलर्स), केंद्र पुरस्कृत योजना-प्रकल्प वाघ मध्ये समाकलित, यासोबतच भक्ष्य स्थानांतरण आणि पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त तरतुदी. निगराणीसाठी IUCN मार्गदर्शक तत्त्वे (2013) लागू करुन GPS कॉलर, कॅमेरा ट्रॅप्स आणि डिस्टन्स सॅंपलिंग ( 734-816 किमी ट्रान्सेक्टस्) वापरुन भक्ष्य आणि अधिवासाचे निरीक्षण केले जाते.

 

मैलाचे दगड आणि उपलब्धी: आकडेवारी आधारित यशोगाथा

प्रकल्प चित्ताच्या कामगिरीची खातेवही मोजण्यायोग्य यशांनी भरलेली आहे, ज्यामध्ये नवोन्मेष आणि जिद्दीचे मिश्रण आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत, एकूण 20 चित्ते (नामिबियातील 8 = 5 माद्या, 3 नर; दक्षिण आफ्रिकेतील 12 = 5 माद्या, 7 नर) भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर्स विमानाद्वारे स्थलांतरित करण्यात आले. 7900 किमी पेक्षा अधिक अंतर पार करूनही कोणतीही आजारपणाची घटना न घडणे हे एक उल्लेखनीय यश आहे.

लवकर प्रजनन हे एखाद्या प्रजातीने तिच्या नवीन वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतल्याचे सर्वात मजबूत जैविक संकेतांपैकी एक आहे. कुनोमध्ये चित्त्यांचे स्थलांतर झाल्यानंतर इतक्या लवकर यशस्वी प्रजनन हे दर्शविते की हा परिसर त्यांच्या आवश्यक पर्यावरणीय गरजा, पुरेसे भक्ष्य, योग्य अधिवास आणि कमी ताणतणाव अशा मूलभूत पर्यावरणीय गरजा पूर्ण करत आहे. हे प्रारंभीचे प्रजनन यश अधिवासाच्या अनुकुलतेचे आणि पर्यावरणीय स्थिरतेचे एक प्रभावी निदर्शक आहे. यामुळे पुनर्प्रजनन धोरण अपेक्षितरित्या कार्य करत आहे, यांची पुष्टी होते. तसेच कुनो चित्त्यांना केवळ तात्पुरता आधार देत नाही तर दीर्घकालीन, निरोगी, व्यवहार्य संख्या टिकवून ठेवण्याची क्षमता राखून आहे, हे सुचित होते.

नोंदणी झालेल्या पिल्लांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • ज्वाला (नामिबियन मादी): दोन टप्प्यांत 8 पिल्ले (मार्च 2023 - भारतात पहिले जन्मलेले पिल्लू आणि जानेवारी 2024)
  • आशा (नामिबियन मादी): 3 पिल्ले (जानेवारी 2024)
  • गामिनी (दक्षिण आफ्रिकन): 6 पिल्ले (मार्च 2024)
  • निरवा (नामिबियन मादी): तिच्या पहिल्या प्रसवात 2 पिल्ले, भारतातील सहावे प्रसव (नोव्हेंबर 2024); तिच्या दुसऱ्या प्रसवात 5 शावक, भारतील 8 वे प्रसव (एप्रिल 2025)
  • वीरा (नामिबियन मादी): तिच्या पहिल्या प्रसवात 2 शावक, भारतातील 7 वे प्रसव (फेब्रुवारी 2025)
  • मुखी (भारतीय वंशाची): 5 शावक (नोव्हेंबर 2025), दुसऱ्या पिढीच्या अनुवांशिक क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा.

मादी आशा सुमारे 121 चौरस किमी मध्ये संचार करते, तर तिची तीन तरुण नर पिले 1,508 चौरस किमी एवढ्या मोठ्या क्षेत्राचा वापर करतात. नर जोडी अग्नि आणि वायू यांचे अधिवास क्षेत्र 1,819 चौरस किमी आहे. मादी गामिनी आणि तिच्या चार तरुण शावकांचा वावर 6,160 चौरस किमी क्षेत्रात आहे. आणि मादी ज्वाला तिच्या चार तरुण शावकांसह 3,139 चौरस किमी क्षेत्रात भ्रमण करते.

तुम्हाला माहिती आहे का?

मध्य प्रदेशातील कुनो अभियारण्य हे भारतातील चित्ता पुनर्स्थापनेसाठी निवडलेले अभियारण्य आहे. योग्य अधिवास, भरपूर भक्ष्यसंपदा आणि पूर्वी करण्यात आलेल्या गावांच्या पुनर्वसनामुळे मानवी हस्तक्षेप अत्यल्प असल्याने कुनोची निवड करण्यात आली. भारतीय वन्यजीव संस्था (WII) तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या कृती आराखड्यानुसार कुनो राष्ट्रीय उद्यान चित्त्यांसाठी पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे ७० वर्षांनंतर भारतात चित्त्यांचे पुनरागमन घडवून आणणारे कुनो राष्ट्रीय उद्यान हे या भव्य वन्यप्राण्यांचे नवे घर ठरले आहे.

 

समुदाय आणि उपजीविका सक्षमीकरण: संवर्धनातील भागीदार

प्रकल्प चित्ताच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशक संवर्धन आहे. 80 गावांमध्ये 450 हून अधिक "चित्ता मित्र" जागरूक राजदूत म्हणून काम करत असून 150 जनजागृती संमेलने आणि 16 अनुभूती शिबिरे आयोजित करून 2,200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच साधली आहे.

रोजगार निर्मितीला चालना: 80 स्थानिकांना चित्ता ट्रॅकर म्हणून, 200 लोकांना गस्त घालण्यासाठी "सुरक्षा श्रमिक" म्हणून आणि स्थानिक तरुणांना सफारी मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केले गेले आहे.

पर्यावरण-विकास: रस्ते, चेक डॅम, स्वच्छता इत्यादी कामे चित्ता झोनमधील 100 हून अधिक गावांमध्ये राबवली जात असून मानव वन्यजीव सहअस्तित्वाला प्रोत्साहन मिळत आहे. UNEP-CBD फ्रेमवर्कमध्ये प्रतिध्वनीत केलेले हे मॉडेल समुदायाच्या नेतृत्वाखालील जैवविविधतेच्या फायद्यांचे उत्तम उदाहरण ठरते.

 

आंतरराष्ट्रीय सहकार्य: सामायिक जबाबदारीची एकतालता

प्रकल्प चित्ता हा जागतिक वन्यजीव कूटनीतितील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो भारत आणि आफ्रिकी देशांमधील दृढ, औपचारिक सहकार्यावर आधारित आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (जानेवारी 2023 मध्ये स्वाक्षरी) यांच्यातील आंतर-सरकारी सामंजस्य करारांतर्गत, दोन्ही राष्ट्रांनी चित्ता स्थानांतरण, संरक्षण, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीसाठी दीर्घकालीन भागीदारीकरिता वचनबद्धता दर्शविली आहे. सातत्य आणि प्रासंगिकता सुनिश्चित करण्यासाठी दर पाच वर्षांनी या व्यवस्थेचे पुनरावलोकन केले जाते. याआधी 2022 मध्ये नामिबियाहून भारताने केलेल्या ऐतिहासिक जंगल-ते-जंगल अशा चित्त्यांच्या स्थलांतरानंतर, प्रोजेक्ट चीत्ता हा जगातील पहिला मोठा मांसाहारी प्रजातीचा स्थलांतर प्रकल्प बनला जो संपूर्ण खंडांमध्ये नावाजला गेला. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञ संघांनी संयुक्तपणे चित्ते पकडणे, त्यांचे विलगीकरण, विमान प्रवास आणि नव्या अधिवासात सोडणे ही प्रक्रिया राबवली. त्याचवेळी भारतीय वन्यजीव व्यवस्थापकांना मांसाहारी प्राण्यांची हाताळणी, देखरेख, रेडिओ-कॉलरिंग आणि अधिवासात सोडल्यानंतरचे व्यवस्थापन याचे व्यापक प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. अनुवांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण दक्षिण आफ्रिकन चित्ते मिळवणे हे चित्त्यांच्या भारतातील संस्थापक संख्येला आणखी बळकटी देते आणि जागतिक संवर्धन जबाबदारीशी सुसंगत ठरते. याशिवाय, भारताने प्रोजेक्ट चीत्ताला पुनर्वनीकरण आणि प्रजाती पुनरुज्जीवनाचे आदर्श मॉडेल म्हणून जागतिक जैवविविधता मंचांवरील राष्ट्रीय सादरीकरणांमध्ये दस्तऐवजीकरण केले आहे, ज्यामुळे या उपक्रमाचा बहुपक्षीय स्वभाव अधिक ठळक झाला आहे. औपचारिक करार, संयुक्त क्षेत्रीय कार्यवाही आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण देवाणघेवाण यांवर आधारित ही सहकार्य चौकट प्रकल्प चीत्ताला केवळ भारताचा संवर्धन प्रयत्न न ठेवता, विज्ञानाधिष्ठित, आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे संकटग्रस्त प्रजाती कशा पुनर्जीवित करता येतात याचे जागतिक पुनर्स्थापन अभियान म्हणून उभे करते.

 

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स

 

भारताने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) स्थापन करून आपले जागतिक संवर्धन नेतृत्व अधिक बळकट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो चित्त्यासह जगातील सात मोठ्या मांजरी प्रजातींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी समर्पित आहे. भारतात मुख्यालय असलेले हे प्रकल्प 2027-28 पर्यंत पाच वर्षांसाठी 150 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय मदतीसह सुरू करण्यात आले आहेत. प्रोजेक्ट टायगर च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी 9 एप्रिल 2023 रोजी याचे औपचारिक उद्घाटन केले. विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, सामायिक संशोधन, क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही आघाडी भारताला मोठ्या मांजरीच्या संवर्धनासाठी आणि सहयोगी पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देते. या व्यापक आंतरराष्ट्रीय चौकटीत प्रकल्प चित्ताचा समावेश करून, भारत सहयोगी पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित करतो आणि प्रजाती पुनरुज्जीवनासाठी एक एकीकृत जागतिक रणनीती सादर करतो. विज्ञानाधिष्ठीत आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे धोक्यात असलेल्या भक्षक प्रजाती कशा पुनर्संचयित केल्या जाऊ शकतात, यांचे एकसंध जागतिक प्रारुप सादर करतात.

 

निष्कर्ष: जागतिक स्तरावर गौरवासाठी खुले आमंत्रण

प्रकल्प चित्ता हा केवळ पुनर्प्रवेश प्रकल्प नाही; ही भारताच्या पर्यावरणीय सुसंवादाला दिलेली मानवंदना आहे, जिथे विज्ञान, कुटनीति आणि समुदाय एकत्रितपणे एका भग्न वन्यजीवनाला बरे करतात. भारतात चित्ते वाढत असताना, हा प्रकल्प जगाला या पुनर्जागरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो, सीबीडी राष्ट्रांसाठी हे एक आदर्श प्रारुप आहे, जिथे नामशेष झालेल्या चित्त्यांचे प्रतिध्वनी पुन्हा गर्जत आहेत. ही कहाणी प्रेरणादायी ठरो: भारताच्या गवताळ प्रदेशात, आशा सदैव वेगाने धावत राहो.

 

संदर्भ

पत्र सूचना कार्यालय (PIB)

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन उपक्रम (National Tiger Conservation Authority)

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

Supreme Court of India

Convention on Biological Diversity

Cheetah.org

PM India

 

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Explainer ID: 156779) आगंतुक पटल : 82
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Marathi , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada
Prime Minister mygov.in Content Link
National Portal Of India
STQC Certificate