• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Technology

'ध्रुव 64': भारताचा पहिला 1.0 गिगाहर्ट्झ, 64-बिट ड्युअल-कोअर मायक्रोप्रोसेसर

Posted On: 15 DEC 2025 3:08PM

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2025

 

मुख्य मुद्दे

  • 'ध्रुव 64' (DHRUV64) या भारताच्या पहिल्या स्वदेश विकसित 1.0 गिगाहर्ट्झ, 64-बिट ड्युअल-कोअर मायक्रोप्रोसेसर, स्वदेशी प्रोसेसरच्या विकासाला बळकटी देतो.
  • डिजिटल इंडिया RISC-V सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमामुळे ध्रुव64 सह स्वदेशी चिप्सची रचना, चाचणी आणि प्रोटोटाइप तयार करण्यासाठी भारताला आवश्यक असलेला पाठिंबा मिळतो.
  • ध्रुव64 च्या यशानंतर, पुढील पिढीतील धनुष आणि धनुष+ प्रोसेसर सध्या विकासाधीन आहेत.

 

प्रस्तावना

ध्रुव64 च्या लाँचमुळे भारताने आपल्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमडीपी) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) द्वारे विकसित हा एक पूर्णपणे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आहे. ध्रुव64 देशाला एक विश्वासार्ह, स्वदेशी प्रोसेसर तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. हे प्रोसेसर धोरणात्मक आणि व्यावसायिक वापरासाठी सक्षम आहे. हे प्रगत चिप डिझाइनमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

 

तुम्हाला माहित आहे का?

मोबाईल, संगणक, ऑटोमोबाईल्स, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण प्रणाली आणि उपग्रह यांसारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मेंदू म्हणजे मायक्रोप्रोसेसर. भारतासाठी, परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी अशा मुख्य तंत्रज्ञानाची निर्मिती करणे आणि त्यावर मालकी हक्क असणे महत्त्वाचे आहे.

 

ध्रुव64 आधुनिक संरचनात्मक वैशिष्ट्यांसह विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे ते उच्च कार्यक्षमता, वर्धित मल्टीटास्किंग क्षमता आणि सुधारित विश्वसनीयता प्रदान करते. त्याची प्रगत रचना विविध प्रकारच्या बाह्य हार्डवेअर प्रणालींसह सहज एकत्रीकरण सक्षम करते. प्रोसेसरच्या आधुनिक फॅब्रिकेशनमध्ये उच्च-कार्यक्षमता असलेल्या चिप्ससाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे ध्रुव64 हे 5जी पायाभूत सुविधा, वाहन प्रणाली, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक स्यंचलन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या क्षेत्रांसाठी योग्य ठरतो.

 

भारतासाठी ध्रुव64 चे धोरणात्मक महत्त्व

ध्रुव64 हे सुरक्षित आणि आत्मनिर्भर सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रगत प्रोसेसर विकासातील देशाच्या स्वदेशी क्षमतेला बळकटी देते. हे महत्त्वपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधांना समर्थन देते आणि त्यामुळे आयात केलेल्या मायक्रोप्रोसेसरवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी होते.

जागतिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या एकूण मायक्रोप्रोसेसरपैकी सुमारे 20% भारत वापरतो. ध्रुव64 च्या विकासामुळे भारतातील मोठ्या तंत्रज्ञ प्रतिभावान मनुष्यबळाला भारतामधील सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या प्रगतीसाठी एक पूर्णपणे आधुनिक प्रोसेसर प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहे.

ध्रुव64 आधी, भारताने अलिकडच्या वर्षांत आपली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकास परिसंस्था विस्तारण्यास सुरुवात केली होती. याची काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

  • शक्ती (2018, आयआयटी मद्रास): धोरणात्मक, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रासाठी डिझाइन केलेले;
  • अजित (2018, आयआयटी बॉम्बे): औद्योगिक आणि रोबोटिक्स अनुप्रयोगांसाठी एक मायक्रोप्रोसेसर;
  • विक्रम (2025, इस्रो-एससीएल): नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि मोहीम व्यवस्थापनासारख्या अंतराळ अनुप्रयोगांसाठी विकसित; अत्यंत कठीण अंतराळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केलेले प्रोसेसर;
  • तेजस64 (2025, सी-डॅक): औद्योगिक स्वयंचालनासाठी डिझाइन केलेले.

शक्ती, अजित, विक्रम, तेजस आणि आता ध्रुव64 सारखे स्वदेशी प्रोसेसर विकसित करणे हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. हे प्रोसेसर भारतीय प्रोसेसर परिसंस्थेच्या निर्मितीला चालना देतात.

 

भारताच्या संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषावर ध्रुव64 चा परिणाम

  • ध्रुव64 हे स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांसाठी डिझाईन करण्यात आलेले एक स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान परदेशी प्रोसेसरवर अवलंबून न राहता स्वदेशी संगणकीय उत्पादने तयार करण्यास, त्यांची चाचणी करण्यास आणि त्यांचा विस्तार करण्यास मदत करते.
  • ध्रुव64 कमी खर्चात नवीन प्रणाली संरचनेसाठी प्रोटोटाइप विकसित करण्यात मदत करते.
  • जगातील सुमारे 20% चिप डिझाइन अभियंते भारतामध्ये आहेत. ध्रुव64 कुशल सेमीकंडक्टर चिप व्यावसायिकांची एक मजबूत साखळी तयार करण्यात आणखी मदत करते.
  • ध्रुव64 च्या यशामुळे धनुष आणि धनुष+ या पुढील पिढीतील प्रोसेसर साठीचा आराखडा वेगाने पुढे सरकला असून हे प्रोसेसर सध्या विकास प्रक्रियेत आहेत.

 

ध्रुव64 ची सुरुवात आणि भारताच्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) कार्यक्रमाची प्रगती

भारत सरकारने आत्मनिर्भर भारताची संकल्पना पुढे नेण्यासाठी डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) कार्यक्रम सुरू केला. या उपक्रमाचे उद्दिष्ट भारताला इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग (इएसडीएम) साठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे आहे. हा उपक्रम RISC-V-आधारित मायक्रोप्रोसेसरचा संपूर्ण पोर्टफोलिओ विकसित करतो. हे प्रोसेसर उद्योग, धोरणात्मक क्षेत्रे आणि ग्राहक तंत्रज्ञानामधील अनुप्रयोगांना शक्ती देतील.

 

RISC-V ओपन आर्किटेक्चर आणि त्याचे भारतासाठी महत्त्व

RISC-V हे एक ओपन आर्किटेक्चर असून ते चिप डिझाइनसाठी सूचनांचा संच प्रदान करते. यासाठी कोणताही परवाना खर्च लागत नाही, ज्यामुळे उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांमध्ये सामायिक नवोन्मेषाला त्याचा व्यापक स्वीकार करणे शक्य होते.

  • हे DIR-V कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी स्वदेशी मायक्रोप्रोसेसरचा संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करते.
  • हे विकासकांसाठी समान साधने आणि मानके प्रदान करून सामायिक नवोन्मेषाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे संशोधन संस्था आणि कंपन्यांमधील सहकार्य अधिक बळकट होते.

 

भारताच्या स्वदेशी चिप रोडमॅपला गती देणारा ध्रुव64

ध्रुव64 च्या लाँचमुळे भारताची आत्मनिर्भर मायक्रोप्रोसेसर परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. ओपन-सोर्स आर्किटेक्चरचा वापर केल्यामुळे, ध्रुव64 मध्ये परवाना खर्च वाचतो. यामुळे विविध प्लॅटफॉर्मवर दीर्घकालीन वापर शक्य होतो.

ध्रुव64 ही डीआयआर-व्ही कार्यक्रमांतर्गत तयार केलेली तिसरी चिप आहे, ज्याचा मुख्य उद्देश भारतात भविष्यासाठी मायक्रोप्रोसेसर तयार करणे हा आहे.

  • पहिली चिप, तेजस32, मलेशियातील सिल्ट्रा प्रकल्पात तयार करण्यात आली.
  • दुसरी चिप, तेजस64, मोहली येथील देशांतर्गत सेमीकंडक्टर लॅब (एससीएल) येथे तयार करण्यात आली.
  • याव्यतिरिक्त, धनुष64 आणि धनुष64+ सिस्टम ऑन अ चिप प्रकारांचे डिझाइन, अंमलबजावणी आणि निर्मिती सध्या विकासाधीन आहे.

ध्रुव64 च्या अनावरणामुळे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन होते. डीआयआर-व्ही उपक्रमाची सातत्यपूर्ण प्रगती एका मजबूत मायक्रोप्रोसेसर परिसंस्थेच्या निर्मितीसाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित करते.

[1]

प्रोसेसर विकासाला चालना देणारी संस्थात्मक परिसंस्था

मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना भारताच्या प्रमुख राष्ट्रीय संस्थांच्या नेतृत्वाखालील समन्वित संस्थात्मक चौकटीद्वारे पाठिंबा मिळतो. या संस्था धोरणात्मक दिशा आणि कार्यक्रम सहाय्य प्रदान करतात, ज्यामुळे स्वदेशी प्रोसेसरचे डिझाइन आणि विकास शक्य होतो.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय: हे मंत्रालय भारताच्या प्रोसेसर आणि सेमीकंडक्टर उपक्रमांना पुढे नेण्यात मध्यवर्ती भूमिका बजावते. हे मंत्रालय मायक्रोप्रोसेसर विकास कार्यक्रम, डीआयआर-व्ही, सी2एस आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन यांसारख्या योजनांतर्गत धोरणात्मक पाठिंबा, निधी आणि दीर्घकालीन नियोजन या माध्यमातून राष्ट्रीय कार्यक्रमांना मार्गदर्शन करते. या उपायांमुळे देशाची डिझाइन परिसंस्था मजबूत झाली आहे आणि स्वदेशी प्रोसेसर विकासामध्ये सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे.

सी-डॅक: सी-डॅक भारताच्या स्वदेशी प्रोसेसरच्या डिझाइनचे नेतृत्व करते. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत प्रोसेसर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज, सिस्टम-ऑन-चिप्स, विकास बोर्ड आणि संबंधित साधने तयार करते. या साधनांमुळे संपूर्ण देशांतर्गत प्रोसेसर परिसंस्थेच्या वाढीस मदत होते. ही संस्था आता RISC-V मार्गदर्शक आराखड्यामधील पुढील प्रोसेसर - धनुष आणि धनुष+ यांच्यावर काम करत आहे. हे आगामी प्रोसेसर भारताची स्वदेशी RISC-V परिसंस्था मजबूत करतील अशी अपेक्षा आहे. यामुळे धोरणात्मक तसेच व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या स्वदेशी पर्यायांची श्रेणी विस्तारते.

 

स्वदेशी चिप डिझाइनला पाठबळ देणारे प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम

भारत सरकारने असे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केले आहेत, जे डिझाइन क्षमता मजबूत करतात, संशोधन पायाभूत सुविधांचा विस्तार करतात तसेच शिक्षण संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योगांमध्ये नवोन्मेषाला प्रोत्साहन देतात.

इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम): इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत डिसेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेले इंडिया सेमीकंडक्टर मिशन, हे संरचित सहाय्य प्रदान करते आणि देशात मोठ्या सेमीकंडक्टर गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी जागतिक कंपन्यांसोबत सहकार्य करते. 2025 पर्यंत, या मिशन अंतर्गत सहा राज्यांमध्ये दहा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये एकूण 1.60 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची वचनबद्धता आहे.[2] इंडिया सेमीकंडक्टर मिशन द्वारे, भारत स्वतःला जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेमध्ये एक स्पर्धात्मक भागिदार म्हणून स्थापित करत आहे.

डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) कार्यक्रम: एप्रिल 2022 मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) कार्यक्रमाने भारताच्या स्वदेशी चिप डिझाइन प्रयत्नांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे भारतात प्रगत RISC-V प्रोसेसरच्या विकासाला चालना मिळाली. संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योगांना एका सामायिक डिझाइन परिसंस्थेत आणून सहयोग आणि नवोन्मेषाला चालना देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

चिप्स टू स्टार्टअप कार्यक्रम: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया द्वारे 2022 मध्ये सुरू केलेला चिप्स टू स्टार्टअप कार्यक्रम, 113 संस्थांमध्ये राबविण्यात आलेला एक क्षमता-निर्माण उपक्रम आहे, ज्यात 100 शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संस्था याशिवाय 13 स्टार्टअप्स आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पाच वर्षांच्या कालावधीसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद आहे. चिप्स टू स्टार्टअप कार्यक्रमाचे उद्दिष्ट 85,000 उद्योग-सज्ज मनुष्यबळ निर्माण करणे आणि देशात एक चैतन्यपूर्ण फॅबलेस चिप डिझाइन परिसंस्था तयार करणे आहे. [3]

डिझाइन आधारित प्रोत्साहन (डीएलआय) योजना: 2021 मध्ये सुरू झालेल्या डिझाइन आधारित प्रोत्साहन योजनेचा उद्देश, 5 वर्षांच्या कालावधीत इंटिग्रेटेड सर्किट्स, चिपसेट्स, सिस्टीम ऑन चिप्स, सिस्टीम्स तसेच आयपी कोअर्स आणि सेमीकंडक्टर-संबंधित डिझाइनच्या विकासासोबतच अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आर्थिक प्रोत्साहन तसेच डिझाइन पायाभूत सुविधा सहाय्य प्रदान करणे आहे.[4]

इंडियन नॅनोइलेक्ट्रॉनिक्स युझर्स प्रोग्राम- आयडिया टू इनोव्हेशन: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे सुरू केलेला हा कार्यक्रम संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना अग्रगण्य संस्थांमधील राष्ट्रीय नॅनोफॅब्रिकेशन सुविधा उपलब्ध करून देतो. हा कार्यक्रम चिप आणि डिव्हाइस फॅब्रिकेशनमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रदान करतो. त्यामुळे नवोन्मेषकांना सेमीकंडक्टर घटक कसे तयार केले जातात हे समजण्यास मदत होते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 49 परिचय कार्यशाळा, 42 प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा, 36 औद्योगिक प्रशिक्षणे आणि 10 हॅकॅथॉन आयोजित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत 8,000 हून अधिक कुशल मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यात आले आहे तसेच सुमारे 348 अल्प-मुदतीचे आणि 220 मध्यम-मुदतीचे संशोधन याशिवाय विकास प्रकल्प यांना समर्थन दिले जात आहे.[5]

 

निष्कर्ष

स्वदेशी प्रोसेसर विकासातील भारताची प्रगती सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. DIR-V, चिप्स टू स्टार्टअप, इंडिया सेमीकंडक्टर मिशन, डिझाइन आधारित प्रोत्साहन आणि INUP-i2i सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांद्वारे समर्थित ध्रुव64 प्रोसेसर, प्रगत प्रोसेसरची रचना, विकास आणि प्रोटोटाइप तयार करण्याच्या देशाच्या वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन करतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, C-DAC, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे, भारत प्रगत तंत्रज्ञानामध्ये दीर्घकालीन नेतृत्वासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, संशोधन सामर्थ्य आणि पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तेजस32 पासून ध्रुव64 पर्यंतची प्रगती तसेच धनुष आणि धनुष+ यांचा सुरू असलेला विकास, स्वदेशी प्रोसेसर नवोन्मेष आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताचा आत्मविश्वासपूर्ण मार्ग दर्शवतो.

 

संदर्भ

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत सेमीकण्डक्टर्स अभियान

पत्र सूचना कार्यालय बॅकग्राऊंडर्स

VEGA प्रोसेसर्स

विशेष सेवा आणि फीचर्स

डिझाईन आधारित प्रोत्साहन

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

​​​​​​​राज्यसभा

 

'ध्रुव 64': भारताचा पहिला 1.0 गिगाहर्ट्झ, 64-बिट ड्युअल-कोअर मायक्रोप्रोसेसर 

 

* * *

नितीन फुल्‍लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 156768) आगंतुक पटल : 62
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , हिन्दी , Bengali , Kannada , Malayalam
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate