Rural Prosperity
आदर्श युवा ग्रामसभा
“लोकशाहीची शाळा”
Posted On:
30 OCT 2025 3:41PM
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
|
ठळक मुद्दे
- आदर्श युवा ग्रामसभा (MYGS) विद्यार्थ्यांना तळागाळातील लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देते, तसेच याअंतर्गत नेतृत्व निर्माण आणि नागरी सहभाग वाढवण्यासाठी खऱ्या ग्रामसभेतील प्रक्रिया पार पाडल्या जातात.
- या उपक्रमामुळे पंचायती राज व्यवस्थेबद्दल युवकांची समज अधिक दृढ होते, आणि स्थानिक प्रशासनामध्ये पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि उत्तरदायित्वालाही प्रोत्साहन मिळते.
- हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरूनच आखला गेला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि नागरी जाणीव निर्माण करून त्यांना सक्रिय नागरिक म्हणून घडवले जाते.
- या उपक्रमाची रचना प्रशिक्षित शिक्षक आणि प्रमाणित प्रारुपांच्या आधारे केली गेली असून, त्यामुळे उच्च गुणवत्तेची अंमलबजावणी आणि मूल्यमापन करतायेण्यायोग्य शैक्षणिक फलनिष्पत्तीची सुनिश्चित झाली आहे.
- या कार्यक्रमामुळे प्रशासनातील युवा वर्गाचा सहभाग वाढू लागला आहे, आणि त्याच वेळी संवाद, चिकित्सक वृत्तीने विचार करणे, सांघिक कार्य आणि लोकशाही प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे एकमत साध्य करणे तसेच निर्णयक्षमतेसारखी जीवन कौशल्ये विकसित होऊ लागली आहेत.
|
प्रस्तावना
भारताची गावे लोकशाहीचा खरा पाया असून, ती आपला वारसा, अर्थव्यवस्था आणि सामूहिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. देशभरातील 6.64 लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये देशातील सुमारे 65-70% लोकसंख्या राहते. महत्वाचे म्हणजे ग्रामीण भारताची ही चैतन्यशक्ती ग्रामसभांच्या बळकटीवर अवलंबून असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 अंतर्गत एक घटनात्मक संस्था म्हणून ग्रामसभा ही प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप आहे. यामुळे गावातील प्रत्येक प्रौढ रहिवाशाला प्रशासनात सहभागी होता येते, विकास कामांच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करता येते आणि पंचायती राज संस्थांच्या उत्तरदायित्वाची सुनिश्चिती करणेही शक्य होते. ग्रामसभा हे खऱ्या अर्थाने लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी असलेल्या प्रशासनाचे प्रतिबिंब असून, यामुळे तळागाळातील पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि लोकसहभागातून होणाऱ्या नियोजनाला चालना मिळते.
युवा वर्गाची ग्रामीण प्रशासनात अत्यंत महत्त्वाची भूमिका असूनही, ग्रामसभांमध्ये युवकांचा सहभाग अजूनही कमी आहे. मर्यादित जागरूकता, अपुरा अनुभव आणि अर्थपूर्ण संधींचा अभाव ही यामागची काही कारणे आहेत. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, आणि त्यामुळेच समुदाय विकास तसेच स्थानिक प्रशासनामध्ये आपल्या युवकांचा अर्थपूर्ण आणि उत्पादक सहभाग असणे हीच भारताच्या विकसित भारताच्या संकल्पामागच्या दृष्टीकोनाची मुख्य गुरुकिल्ली आहे. युवा वर्गाचा सहभाग तळागाळातील लोकशाहीचा पाया मजबूत करू शकणार आहे, तसेच त्यामुळे सर्वसमावेशक आणि प्रतिनिधित्वाधारीत निर्णय घेण्याच्या अधिक चांगल्या संधी निर्माण होऊ शकणार आहेत.
|
या अनुषंगानेच विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीव निर्माण करण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी पंचायती राज मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांनी संयुक्तपणे आदर्श युवा ग्रामसभा (MYGS) या उपक्रमाची संकल्पना मांडली. युवा नागरिकांमध्ये लोकशाही मूल्ये आणि सार्वजनिक जबाबदारी रुजवण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण नागरी शैक्षणिक उपक्रम ठरला आहे.
|
हा उपक्रम विधानसभांच्या धर्तीवर आधारलेला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना, विशेषतः जवाहर नवोदय विद्यालय (JNV) आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या (EMRS) विद्यार्थ्यांना तळागाळातील लोकशाहीच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. पात्र निभावणे (Role-play), वादविवाद आणि निर्णय घेण्याच्या सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. यामुळे विद्यार्थी विचारमंथन, सहमतीपर्यंत पोहोचणे आणि लोकसहभागातून चालणाऱ्या प्रशासनाच्या प्रक्रियेचा अनुभव घेऊ शकतात. या अनुभवात्मक शिक्षणामुळे त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दलचे आकलन तर वाढतेच, त्यासोबतच त्यांच्यात जबाबदारीची भावना, सहकार्य आणि लोकशाही संस्थांबद्दल आदर देखील निर्माण होतो.
|
जवाहर नवोदय विद्यालय (JNV) आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) म्हणजे काय?
जवाहर नवोदय विद्यालय (JNV): ही निवासी विद्यालये असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986) अंतर्गत या शाळांची स्थापन करण्यात आली. ग्रामीण भागातील प्रतिभेला वाव देणे हा या शाळांचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचा विचार न करता सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि शारीरिक विकासासह गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण देण्यासाठी ही विद्यालये स्थापन केली गेली आहेत.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS): दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात, तसेच त्यांना देशातील इतर मुलांच्या बरोबरीला आणता यावे या उद्देशाने, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरता या शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.
|
73 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची पाया रचला गेला आणि ग्राम, गट आणि जिल्हा स्तरावर प्रशासनाला अधिकार दिले गेले. आदर्श युवा ग्रामसभेसारख्या उपक्रमांद्वारे युवा वर्गाला ही चौकट समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देत, त्याद्वारे लोकशाहीतील सहभाग, घटनात्मक आदर्श आणि सामूहिक प्रगतीला मानणारी एक जागरूक आणि सक्षम पिढी घडवण्याचा दृष्टीकोन मंत्रालयने अवलंबला आहे.

आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या दृष्टीकोनाला अनुसरून आखलेला उपक्रम आहे. या नव्या शैक्षणिक धोरणात शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्राद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्ये आणि घटनात्मक मूल्यांबद्दल दृढ आदर तसेच राष्ट्रीयत्वाची प्रबळ भावना निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. वेगाने बदलत असलेल्या आजच्या जगात विद्यार्थ्यांची त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या समजून घेण्याच्या अनुषंगाने जडणघडण करता यावी यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणत भर दिला गेला आहे. या धोरणाअंतर्गत युवा वर्गात भारतीय असल्याचा अभिमान जागृत करण्याचे ध्येय समोर ठेवले असून, ते त्यांच्या विचारातून, कार्यातून आणि बुद्धीमत्तेतून प्रतिबिबिंत व्हायला हवे असा यामागचा दृष्टीकोन आहे. यासोबतच युवा वर्गाला मानवाधिकार, शाश्वत विकास आणि जागतिक कल्याणासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि त्यासाठी आवश्यक दृष्टीकोनावर या धोरणाअंतर्गत भर दिला गेला आहे. सरतेशेवटी या सगळ्यातून एक जबाबदार आणि संवेदनशील जागतिक नागरिकाची जडणघडण होईल अशी अपेक्षा आहे.

उद्दिष्टे
आदर्श युवा ग्रामसभेअंतर्गत लोकसहभागातून आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंचायती राज संस्थांच्या संरचनेची आणि कामकाजाची ओळख करून दिली जाते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक संभाषण, चिकित्सक विचार आणि सहमतीपर्यंत पोहोचण्यासारखी नागरी आणि नेतृत्व विषयक कौशल्ये रुजवली जातात. यासोबतच सर्वसमावेशकता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता या मूल्यांनाही प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाअंतर्गत युवा विद्यार्थ्यांना वास्तविक सामुदायिक समस्यांवर चर्चा करायला लावून, लोकशाही आणि विकास प्रक्रियेत सक्रिय योगदान देणारे, जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे खाली नमूद केली आहेत:
- विद्यार्थ्यांना पंचायती राज व्यवस्थेबद्दल शिक्षित करणे – 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे स्थापित त्रिस्तरीय पंचायती राज चौकटीची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे.
- सहभागाला चालना देणे – विद्यार्थ्यांना ग्रामसभा आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चालना देणे.
- नेतृत्व विषयक कौशल्ये विकसित करणे – पंचायती राज संस्थांना बळकटी देण्यासाठी युवा वर्गात जबाबदारी आणि नेतृत्वाची भावना निर्माण करणे.
- स्थानिक समस्यांची समज वाढवणे – विद्यार्थ्यांना तळागाळातील प्रशासनातील वास्तविक आव्हानांवर चर्चा आणि विश्लेषण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
दृष्टीकोन
लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होणाऱ्या तसेच शाश्वत आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय विकासात योगदान देणाऱ्या सक्षम, जबाबदार आणि संवेदनशील युवा नागरिकांची जडणघडण करणे हा आदर्श युवा ग्रामसभेचा दृष्टीकोन आहे.
आदर्श युवा ग्रामसभेची ठळक दृष्टीकोन खाली नमूद केला आहे:
- घटनात्मक मूल्ये आणि लोकशाही तत्त्वांशी घट्टपणे नाळ जुळलेल्या सक्रिय, संवेदनशील आणि जागरूक नागरिकांची जडणघडण करणे.
- सर्वसमावेशकता, सहमतीपर्यंत पोहोचणे, न्याय आणि समानता ही मूल्ये रुजवणे. विद्यार्थ्यांचे सामाजिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती म्हणून सक्षमीकरण करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहभाग, संवाद आणि चिकित्सक विचार यांसारखी महत्त्वाची जीवन कौशल्ये निर्माण करणे.
- स्थानिक प्रशासनाची संरचना आणि स्थानिकतेला अनुरुप शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांबद्दल जागरूकता वाढवणे.
- राष्ट्रीय एकात्मता आणि विकासासाठी वचनबद्ध असणारे सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे.
आदर्श युवा ग्रामसभेची वैशिष्ट्ये

आदर्श ग्रामसभा/ग्रामपंचायत बैठकांच्या आयोजनाची प्रक्रिया
या उपक्रमात विद्यार्थी वास्तव जगातील स्थानिक प्रशासनाप्रमाणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी संबंधित विविध भूमिका प्रत्यक्षात साकारतात.
काही विद्यार्थ्यांना सरपंच, वॉर्ड सदस्य किंवा अध्यक्ष यांसारख्या पदांवर नियुक्त केले जाऊ शकते, तर काही विद्यार्थी स्थायी समिती, पंचायत कर्मचारी (सचिव, पंचायत विकास अधिकारी किंवा सहाय्यक असे), आघाडीचे कर्मचारी (आशा, अंगणवाडी सेविका किंवा रोजगार सहाय्यक असे) किंवा ग्रामीण विकास, आरोग्य तसेच महिला आणि बाल विकास यांसारख्या विभागांच्या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्वाच्या भूमिका साकारू शकतात. विद्यार्थ्यांचे गट ग्रामपंचायतीच्या विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करून त्यांच्या समुदायाशी संबंधित समस्याही मांडतात.
या बैठकांच्या प्रक्रियेत पूर्व तयारीचा समावेश असतो. यामध्ये विषयपत्रिकांचे वाटप, बैठकीच्या नियोजित तारखेच्या किमान 10 दिवस आधी बैठकीची नोटीस जारी करणे आणि बैठकीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे अशा प्रक्रियांचा समावेश असतो. बैठकांदरम्यान, सरपंच प्रस्तावना मांडतात, त्यानंतर मागील निर्णयांचे सादरीकरण, प्रगतीपथावर असलेली कामे, नवीन विषय आणि कृती आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. यासोबतच ते अर्थसंकल्प निश्चित करणे, उपलब्ध निधीचा आढावा घेणे, प्रस्तावित कामांचा अंदाज घेणे आणि निधीची कमतरता ओळखणे यांसारख्या आर्थिक नियोजनावरही चर्चा करतात. अतिरिक्त आर्थिक स्त्रोतांच्या उभारणीच्या संभाव्य पर्यायांचीही चाचपणी केली जाते. स्थानिक महसूल वाढवण्यासाठी विद्यार्थी अभिनव कल्पना मांडून, संबंधित त्रुटी दूर करण्यावर सक्रियपणे चर्चा करतात.
निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रस्तावांवरील मतदानाचा समावेश असतो, त्यानंतर सरपंच ठरावांचा सारांश मांडतात. या सत्राचा समारोप इतिवृत्त नोंदणीकाराद्वारे अधिकृत ठराव लिहून आणि सरपंचांनी बैठक संपल्याची घोषणा करून केला जाता.
अंमलबजावणीचा दृष्टिकोन
मार्च-एप्रिल 2025 मध्ये निवडक जवाहर नवोदय विद्यालय (JNV) आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आदर्श ग्रामसभा/ग्रामपंचायत आयोजित करण्यात आली होती. यासाठी या बैठका घेण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि आदर्श ग्रामसभा/पंचायतीची रचना समजावून सांगणारा एक नमुनाही देण्यात आला होता. ही रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी यासाठी एका छोटा मार्गदर्शक व्हिडिओदेखील उपलब्ध करून देण्यात आला होता.

सुमारे 20% शाळांमध्ये आदर्श ग्रामपंचायत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या आणि 80% शाळांमध्ये आदर्श ग्रामसभा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, त्यांच्या मूल्यमापनासाठी सहभागी झालेल्या शाळांकडून सविस्तर अभिप्राय संकलित करण्यात आला. त्यानंतर या अभिप्रायावरून मानक कार्यप्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आणि उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यालाही गती दिली गेली होती.
या उपक्रमाची खाली नमूद केल्याप्रमाणे कालबद्ध रितीने आणि नियोजत स्वरुपात वाटचाल सुरू आहे :
- जुलै 2025 मध्ये विविध शाळांची निवड करण्यात आली. त्यानंतर जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान 200 मुख्य प्रशिक्षक आणि शिक्षकांना आगामी उपक्रमांसाठी सज्ज राहता यावे यादृष्टीने, त्यांच्याकरता ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- त्यानंतर, उत्तर प्रदेशातील बागपत आणि राजस्थानातील अलवर अशा काही निवडक शाळांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये सराव स्वरुपातील ग्रामसभांची सत्रे आयोजित करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक प्रशासनाच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
- त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये पाच विभागांमध्ये प्रादेशिक स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, ज्यातून दहा अंतिम संघ (पाच JNV मधून आणि पाच EMRS मधून) निवडले जाणार आहेत.
- डिसेंबर 2025 मध्ये एका राष्ट्रीय स्पर्धेने या उपक्रमाचा समारोप होणाक आहे, याअंतर्गत अंतिम दहा संघांमधील पहिल्या तीन संघांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव केला जाणार आहे.
आदर्श युवा ग्रामसभा प्रारुप (Model Youth Gram Sabha Module)
आदर्श युवा ग्रामसभा प्रारुप म्हणजे शाळांमध्ये लोकशाही प्रत्यक्षात अमलात आणण्याच्या संकल्पनेला कृतीत आणण्यासाठी तयार केलेले एक सर्वसमावेशक आराखडा आहे. याअंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुनियोजित मार्गदर्शन, प्रक्रिया पार पाडण्यासाठीची साधने आणि मूल्यमापन विषयक यंत्रणा उपलब्ध करून देत युवा वर्गाच्या नेतृत्वाखालील ग्रामसभांची प्रभावी आणि उच्च गुणवत्तेच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करण्याचा प्रयत्न आहे.
|
खरे तर आदर्श युवा ग्रामसभेच्या प्रारुपाच्या गाभ्यामागे हे MLJP आराखडा अर्था Meaning (अर्थ), Learning (शिक्षण), Joy (आनंद) आणि Pride (अभिमान) या तत्वांचे मार्गदर्शन आहे. या तत्वांच्या माध्यमातून सर्व उपक्रमांना अर्थपूर्ण सहभाग, अनुभवात्मक शिक्षण आणि नागरी सक्षमीकरणाशी जोडून घेतले जाते.
|
हे प्रारुप परस्परांशी संलग्न असलेल्या तीन भागांमध्ये विभागलेले आहे:

1. राष्ट्रीय स्तरावरील मुख्य प्रशिक्षिक:
राष्ट्रीय स्तरावरील मुख्य प्रशिक्षिकांद्वारे आदर्श युवा ग्रामसभेच्या व्यापक स्वरुपाविषयी तपशीलवार मार्गदर्शन केले जाते, त्यासोबतच प्रशिक्षकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांची स्पष्ट जाणिवही करून दिली जाते. यात MLJP तत्त्वांचा तसेच, प्रभावी सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील आवश्यक साधनांचा अंतर्भाव केलेला आहे.
2. शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुलभता प्रारुप:
हे प्रारुप म्हणजे शिक्षकांनी सुलभतेने समजून घ्यावे यासाठीचे चित्रात्मक आणि वापरकर्ता-स्नेही साधन आहे. या प्रारुपाच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांना लोकशाहीची मूलभूत तत्त्वे, नेतृत्व आणि जीवन कौशल्ये शिकवण्यात मोठी मदत होते. यासोबतच कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी करायच्या पूर्वतयारीविषयीच्या नियोजनांची मांडणी देखील याअंतर्गत दिली गेली आहे.
3. मूल्यमापनाचा आराखडा:
ल्यमापनचा आराखडा म्हणजे या कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी उपलब्ध करून दिले गेलेले एक सुलभ साधन आहे. याअंतर्गत कार्यक्रमापूर्वी, कार्यक्रमा दरम्यान आणि कार्यक्रमाच्या नंतर मूल्यमापन करता येईल अशा प्रकारच्या निर्देशकांचा अंतर्भाव केलेला आहे. त्यासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांची निश्चिती करण्यासाठी यात काही विशिष्ट निर्देशकांचाही समावेश केला गेला आहे.
एकंदरीत पाहीले तर, या प्रारुपांच्या माध्यमातून शाळा-आधारित नागरी शिक्षणासाठीची एक संपूर्ण परिसंस्थाच उभी राहते, आणि त्यामुळे वर्गांचे रूपांतर लोकशाही व्यवस्थेच्या एका छोट्या अंमलबजणी केंद्रात करणे शक्य होते. महत्वाचे म्हणजे या प्रारुपांमुळे स्वतःहून प्रशासनाचा अनुभव घेण्यासाठी, नेतृत्व आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी तसेच पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि उत्तरदायित्व या भारतीय लोकशाहीच्या गाभ्याशी संबंधित मूल्यांबद्दल आयुष्यभराचा आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची जडणघडण होते.
सहभागी विद्यार्थी आणि शाळांसाठी निधी आणि दखलपूर्ण गौरव
प्रत्येक सहभागी शाळेला प्रत्येक सराव सरावपूर्ण ग्रामसभा आयोजित करण्यासाठी एकवेळची आर्थिक मदत म्हणून 20,000 रुपये दिले जातील. सभेची व्यवस्था, लॉजिस्टिकसाठीचे पाठबळ आणि अल्पोपहारासाठी या निधीचा वापर केला जाऊ शकतो.
- सहभागी विद्यार्थ्यांना पंचायती राज मंत्रालयाकडून प्रशस्ती प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही स्वरुपातील प्रशासनात रस घेण्याकरता प्रोत्साहन मिळेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा राष्ट्रीय स्तरावर गौरवही केला जाणार आहे.
- प्रादेशिक स्तरावरील विजेत्या संघाच्या कामगिरीचा दखलपूर्ण गौरव म्हणून, त्यांना रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. हा निधी शाळेच्या विकासासाठी वापरता येणार आहे.
- राष्ट्रीय स्तरावरील 3 विजेत्या संघांना मोठे रोख पुरस्कार दिले जातील. हा निधी देखील शाळेच्या विकासासाठी वापरता येणार आहे.
- राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडलेल्या संघांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च मंत्रालयाच्या वतीने केला जाणार आहे.
अपेक्षित परिणाम
स्थानिक प्रशासनात लोकशाही मूल्ये आणि युवकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाअंतर्गत खाली नमूद परिणाम अपेक्षित आहेत:
- सहभागाला प्रोत्साहन - विद्यार्थ्यांना स्थानिक प्रशासनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि तळागाळातील लोकशाही प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- युवा नेतृत्वाची जडणघडण - युवा वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी आणि आपापल्या समुदायासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी प्रेरित करणे.
- युवा वर्गाच्या अभिव्यक्तीचे सक्षमीकरण करणे - विद्यार्थ्यांना स्थानिक समस्यांबद्दलची आपली मते मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यामाध्यमातून अर्थपूर्ण चर्चा आणि उपाययोजनांना प्रोत्साहन देणे.
- युवा वर्गाला प्रोत्साहन - युवा प्रतिनिधींना त्यांच्या ग्रामपंचायतींमधील निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
सारांश
आदर्श ग्रामसभांमुळे युवा वर्गाच्या मनात लोकसहभागातून चालत असलेल्या प्रशासनाबद्दलचा दृष्टीकोन आणि त्याप्रती जबाबदार असण्याचा दृष्टीकोन निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या उपक्रमामुळे जागरूकता, नेतृत्व आणि सहभागात वृद्धी घडून येणार असून, त्याद्वारे युवा वर्ग आणि स्थानिक प्रशासनातील दरी कमी करण्याचे ध्येय या उपक्रमाअंतर्गत गाठता येणार आहे. या उपक्रमामुळे आपली भावी पिढी भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या वाटचालीत योगदान देण्यासाठी पूर्णपणे सज्ज होईल याची सुनिश्चिती होऊ शकणार आहे.
संदर्भ
पंचायती राज मंत्रालय
शिक्षण मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालय
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
(Explainer ID: 156735)
आगंतुक पटल : 15
Provide suggestions / comments