• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Economy

GeM एक उत्तम उपाय : सरकारी मालमत्तांचा फॉरवर्ड लिलाव

विल्हेवाटीतून मूल्यनिर्मिती

Posted On: 21 DEC 2025 10:10AM

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025

 

ठळक मुद्दे

  • जेम (GeM) फॉरवर्ड लिलाव मॉड्यूल मालमत्ता विल्हेवाटीच्या पद्धतीत बदल घडवून आणत आहे, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक आणि नियम-आधारित झाली असून एक शांत डिजिटल क्रांती घडवून आणली आहे.
  • ई-कचरा, यंत्रसामग्री, वाहने आणि मालमत्तांसारख्या विविध मालमत्तांसाठी जलद आणि कार्यक्षम पद्धतीने बोली लावण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
  • डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 2,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.
  • हे 'किमान सरकार, कमाल सुशासन' या सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते.

 

प्रस्तावना

अलिकडच्या वर्षांत भारताच्या सार्वजनिक खरेदी प्रणालीमध्ये एक उल्लेखनीय डिजिटल परिवर्तन झाले आहे. याच गतीचा लाभ घेत, एक नवी डिजिटल क्रांती शांतपणे घडत आहे, जी वस्तू आणि सेवांच्या खरेदीत नव्हे तर, सरकारी मालमत्तांच्या विल्हेवाटीमध्ये आहे. हे परिवर्तन गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) च्या फॉरवर्ड लिलाव मॉड्यूलद्वारे घडवून आणले जात आहे.

जेम हे पारदर्शक आणि कार्यक्षम खरेदीसाठीची डिजिटल व्यासपीठ म्हणून ओळखली जाते; मात्र त्याचे फॉरवर्ड ऑक्शन मॉड्यूल मंत्रालये आणि विभागांना त्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी पूर्णतः ऑनलाइन बोली यंत्रणा उपलब्ध करून देते. सुरक्षित आणि पूर्णतः डिजिटल इंटरफेसद्वारे, प्रत्येक मालमत्ता विक्री कागदविरहित, रोखरहित आणि संपर्करहित पद्धतीने केली जाते, ज्यामुळे विलंब आणि अकार्यक्षमता दूर होते. याचे दोन ठळक परिणाम दिसून येतात— भंगार विल्हेवाटीतून अधिक महसूल मिळवणे आणि सर्व भागधारकांसाठी न्याय्य परिणाम.

 

जेम पोर्टल: भारताचे एकीकृत सार्वजनिक खरेदी व्यासपीठ

जेम हे एक सुरक्षित, संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आहे जे सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संलग्न संस्थांद्वारे वस्तू आणि सेवांची खरेदी तसेच विल्हेवाट सुलभ करते. हे पोर्टल सार्वजनिक खरेदीमध्ये सर्वसमावेशक वाढीला चालना देते, तसेच स्टार्टअप्स, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक आणि बचत गटांना सरकारी बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळवून देते.

  • स्टार्टअप रनवे 2.0: एका समर्पित बाजारपेठ श्रेणी अंतर्गत, स्टार्टअप्स त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा सरकारी खरेदीदारांसमोर प्रदर्शित करू शकतात आणि सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
  • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अनुसूचित जाती/जमाती उद्योजक: विशेषतः अनुसूचित जाती/जमाती समुदायांवर लक्ष केंद्रित करून सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी, जेम विविध भागधारकांसोबत सहयोग करते, ज्याचा उद्देश सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राकडून 25 टक्के अनिवार्य खरेदीचे उद्दिष्ट साध्य करणे हा आहे.
  • वुमनिया: या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजक आणि महिला बचत गटांनी (WSHGs) बनवलेली उत्पादने प्रदर्शित करणे तसेच या उत्पादनांना विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि संस्थांशी जोडून महिला उद्योजकतेला चालना देणे हा आहे.
  • सरस कलेक्शन: सामाजिक समावेशन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, भारतातील बचत गटांनी बनवलेल्या हस्तकला, हातमाग वस्त्रे, कार्यालयीन सजावट साहित्य, गृहसजावट, उपकरणे, कार्यक्रमांसाठी स्मृतीचिन्हे, वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी उत्पादने यांचा एक उत्कृष्ट हस्तनिर्मित संग्रह जेम व्यासपीठावर प्रदर्शित केला जातो.

नोव्हेंबर 2025 पर्यंत, जेम ने सुमारे 3.27 कोटी ऑर्डर्सवर प्रक्रिया केली आहे, ज्याचे एकूण सकल व्यापारी मूल्य (GMV) 16.41 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये 7.94 लाख कोटी रुपये सेवा क्षेत्रातून तर 8.47 लाख कोटी रुपये उत्पादन क्षेत्रातून प्राप्त झाले आहेत. या व्यासपीठावर 10,894 पेक्षा जास्त उत्पादन श्रेणी आणि 348 सेवा श्रेणी उपलब्ध असून 1.67 लाखांहून अधिक खरेदीदार संस्था नोंदणीकृत आहेत. 24 लाखांहून अधिक विक्रेते आणि सेवा प्रदात्यांनी जेम व्यासपीठावर आपली प्रोफाइल पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी (MSEs) एकूण ऑर्डर मूल्यामध्ये 44.8% योगदान देऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 11 लाखांहून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योग नोंदणीकृत असून, या उद्योगांना एकत्रितपणे 7.35 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

स्मार्ट विल्हेवाट आणि सुशासनासाठी जेमचे फॉरवर्ड लिलाव

सार्वजनिक संसाधनांना योग्य मार्गाने वापरण्याचे एक साधन म्हणून लिलावाची आवश्यकता आणि क्षमता ओळखून, जेम चे फॉरवर्ड लिलाव भारतात सरकारच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीत बदल घडवत आहेत. ही डिजिटल क्रांती बोली आणि लिलाव व्यवस्थापनासाठी एक लवचिक वातावरण प्रदान करते, वापरण्यास-सुलभ नेव्हिगेशन उपलब्ध करून देते. प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

फॉरवर्ड लिलाव मॉड्यूल: विविध मालमत्तांसाठी एक डिजिटल मार्केटप्लेस

फॉरवर्ड लिलाव ही एक डिजिटल बोली प्रक्रिया आहे जिथे सरकारी विभाग विक्रेते असतात आणि नोंदणीकृत बोलीदार सूचीबद्ध मालमत्ता खरेदी करण्यासाठी स्पर्धा करतात. विभाग मालमत्तांसाठी राखीव किंमती निश्चित करण्याची मुभा असते, आणि सर्वाधिक बोली लावणारा बोलीदार विजेता ठरतो.

विविध प्रकारच्या सरकारी मालमत्ता जेमच्या डिजिटल बाजारात आणल्या जातात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • अप्रचलित प्रिंटर, लॅपटॉप आणि आयटी उपकरणांसारखा ई-कचरा
  • औद्योगिक आणि गैर-औद्योगिक दोन्ही प्रकारची यंत्रसामग्री
  • वापरलेले वंगण तेल तसेच धातू आणि अधातू वस्तूंसह भंगार आणि टाकून देण्यायोग्य वस्तू
  • निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक उद्देशांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनी आणि इमारती
  • आयुष्य संपलेली वाहने (ELVs)
  • वसतिगृहे, पार्किंग सुविधा आणि टोल बूथ यांसारख्या मालमत्तांचे उप-भाडेपट्ट्याने आणि भाड्याने देणे

या सर्व प्रकारच्या मालमत्ता एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणून, जेम’ने प्रभावीपणे एक 'वन-स्टॉप' डिजिटल बाजारपेठ तयार केली आहे.

या देशव्यापी उपक्रमामुळे केवळ अभूतपूर्व पारदर्शकताच येत नाही, तर पूर्वी विखुरलेल्या, वेळखाऊ आणि कागदपत्रांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या प्रक्रियांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत, या मॉड्यूलने 2200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या लिलाव सुलभ झाले आहे, 13,000 हून अधिक लिलाव आयोजित केले आहेत, 23,000 हून अधिक नोंदणीकृत बोलीदारांचे स्वागत केले आहे आणि 17,000 हून अधिक लिलावकर्त्यांना सहभाग घेण्यासाठी सक्षम केले आहे.

 

यशोगाथा: जेव्हा लिलावातून खरा परिणाम दिसून येतो

हे डिजिटल मॉड्यूल 'किमान सरकार, कमाल सुशासन' या अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे, जे सार्वजनिक मालमत्तेच्या विल्हेवाटीमध्ये वेग, निष्पक्षता आणि मूल्य निर्मिती समाविष्ट करते. आता विभागांना राखीव किंमती निश्चित करणे, सहभागाचे निकष परिभाषित करणे आणि बोलीवर लक्ष ठेवणे शक्य झाल्यामुळे मालमत्ता विल्हेवाटीची प्रक्रिया एक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि मूल्यवर्धक यंत्रणेत रूपांतरित झाली आहे. उत्कृष्ट परतावा आणि कार्यक्षमतेमुळे, डिजिटल लिलावांचे वास्तविक जगातील परिणाम त्यांच्या यशाची स्पष्ट साक्ष देतात.

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी अपेक्षांपेक्षा जास्त यश

पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या संयोजनामुळे शाश्वत मूल्य निर्मिती कशी शक्य होते, हे यातून अधोरेखित होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच लखनौच्या अलिगंज येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी (EWS) असलेल्या 100 सदनिका लिलावात काढल्या. क्लस्टर-आधारित जेम फॉरवर्ड लिलावाद्वारे, या सदनिकांना 34.53 कोटी रुपये इतकी किंमत मिळाली जी अपेक्षेपेक्षा अधिक होती.

बहुतेक वेळा दुर्लक्षित राहणारी भंगार विल्हेवाट कार्यक्षमता सुधारण्यात आणि करदात्यांच्या संसाधनांचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

 

कचऱ्यातून महसूल निर्मिती

नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणी उद्यानातील बराच काळ निरुपयोगी असलेल्या आणि कालबाह्य झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यात अडचणी येत होत्या. जेम च्या फॉरवर्ड लिलावाचा वापर करून, प्राणीसंग्रहालयाने हे साहित्य बोलीसाठी ठेवले आणि राखीव किमतीपेक्षा खूप जास्त स्पर्धात्मक बोली (H1 किंमत) प्राप्त केल्या.

 

अमर्याद शक्यतांचा शोध

  • भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) अरावली जिप्सम अँड मिनरल्स इंडिया लिमिटेडने तपासलेले जिप्सम विकून 3.35 कोटी रुपये उत्पन्न मिळवले.
  • जेम पोर्टलद्वारे जम्मूमध्ये सुमारे 261 नादुरुस्त वाहनांची विल्हेवाट लावण्यात आली.
  • त्याचप्रमाणे, सीमा रस्ते संघटनेने (BRO) पुनर्प्राप्त साहित्याचा यशस्वीपणे लिलाव केला.
  • गुलमर्गमध्ये एका वसतिगृहाचा पाच वर्षांसाठी यशस्वीपणे भाडेपट्टा देण्यात आला.
  • स्पर्टार येथील एका तलावासाठी नौकाविहार उपक्रमाचे हक्क देखील लिलावाद्वारे देण्यात आले.

मालमत्ता एका पारदर्शक डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देऊन आणि व्यापक बाजारपेठ सहभाग आमंत्रित करून, ही प्रक्रिया योग्य किंमत निश्चिती, जलद परिणाम आणि इष्टतम मूल्य प्राप्ती सुनिश्चित करते. त्यामुळे मालमत्ता विल्हेवाट ही केवळ प्रक्रिया न राहता मूल्य निर्मितीचे धोरणात्मक साधन बनते.

 

लिलाव करणे झाले सोपे: कोण सहभागी होऊ शकते आणि कसे?

जेम पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व पात्र व्यक्ती आणि कंपन्या फॉरवर्ड लिलावांमध्ये सहभागी होऊ शकतात. इच्छुक बोलीदारांना जिथे लागू असेल तिथे, अनामत रक्कम (EMD) जमा करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी आणि सर्व नियमांचे पालन केल्यावर, बोलीदार सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेच्या मर्यादेत चालणाऱ्या प्रक्रियेद्वारे पूर्णपणे ऑनलाइन आयोजित केलेल्या थेट लिलावांमध्ये सहजपणे सहभागी होऊ शकतात.

पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सर्व लिलावांची सार्वजनिकपणे सूचीबद्ध केले जातात. केवळ काही मर्यादित प्रकरणात मालमत्तेच्या संवेदनशीलतेमुळे पूर्व मान्यताप्राप्त बोलीदारांसाठी मर्यादेत लिलाव आयोजित केले जातात.

 

सुशासनात परिवर्तन: पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वतता

जेम वरील फॉरवर्ड लिलावांचा उदय सार्वजनिक खरेदी प्रणालीमध्ये एक मोठे स्थित्यंतर दर्शवतो. कार्यात्मक कार्यक्षमता आणि प्रशासकीय सुधारणा दोन्ही प्रदान करून, जेम मॉडेल आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सुशासनाची संस्थात्मक स्वरूपात रुजवते.

 

पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन

सरकार शाश्वत विकास ध्येय 12.7 नुसार राष्ट्रीय धोरणे आणि प्राधान्यांशी सुसंगत शाश्वत सार्वजनिक खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिकृत माध्यमांद्वारे ई-कचरा, भंगार आणि इतर सामग्रीचा योग्य लिलाव आणि विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम करून, जेम पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित पद्धतींना पाठिंबा देत आहे.

 

अपारदर्शकता दूर करणे

या सुविधेमुळे सर्व मालमत्ता विक्री एका पारदर्शक, नियम-आधारित डिजिटल व्यासपीठावर येते, जिथे प्रत्येक बोली दिसून येते ज्यामुळे खुल्या आणि निःपक्षपाती वाटाघाटी सुनिश्चित होतात.

 

कार्यवाहीतील विलंब कमी करणे

संपूर्ण विल्हेवाट प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे, जेम’ने कागदपत्रांची गरज कमी केली आहे, मंजुरी सुलभ केली आहे आणि निर्णय घेण्याचा वेग वाढवला आहे. ज्यामुळे विभागांना कमी कालावधीत मालमत्ता विक्री पूर्ण करण्यास मदत होते.

 

निष्पक्ष स्पर्धा सुनिश्चित करणे

हे मॉड्यूल सर्व पात्र आणि नोंदणीकृत बोलीदारांना सहभागाची समान संधी देते. पारदर्शक डिजिटल इंटरफेस द्वारे सर्वाधिक बोली लावणारा बोलीदार विजेता ठरतो यामुळे निष्पक्ष आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.

 

सार्वजनिक मालमत्तांमधून अधिक परतावा मिळवणे

स्पर्धात्मक बोली आणि व्यापक सहभागामुळे, अंतिम बोली अनेकदा राखीव किमतीपेक्षा जास्त असते, ज्यामुळे सरकारी विभागांना कालबाह्य मालमत्तेतून मिळणारे मूल्य कमाल पातळीवर येण्यास मदत होते.

 

जलद विल्हेवाट सुनिश्चित करणे

या मॉड्यूलने विल्हेवाटीची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान केली आहे, ज्यामुळे विभागांना भंगार, जुनी यंत्रसामग्री किंवा वाहने यांसारख्या वापरात नसलेल्या वस्तूंची त्वरीत विल्हेवाट लावता येते, जागा मोकळी होते आणि देखभालीचा खर्च कमी होतो.

 

निष्कर्ष

जेमच्या फॉरवर्ड लिलाव मॉड्यूलने जुन्या पारंपरिक सार्वजनिक खरेदी प्रक्रियांना जलद गतीने पारदर्शक बाजार यंत्रणेत रूपांतरित केली आहे. या बदलत्या वातावरणात, मालमत्तेच्या विल्हेवाटीचे डिजिटायझेशन करून फॉरवर्ड लिलाव वेगळे ठरतात. स्थानिक भंगार विक्रेत्यापासून ते मोठ्या रिअल-इस्टेट खरेदीदारापर्यंत, जुनी यंत्रसामग्री विकणाऱ्या विभागापासून ते मालमत्तेचा लिलाव करणाऱ्या बँकेपर्यंत, जेम‘च्या या डिजिटल वैशिष्ट्याने सरकारी लिलावांना कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह बनवले आहे. जसजसे अधिकाधिक विभाग फॉरवर्ड लिलाव पद्धतीचा अवलंब करत आहेत,तसे सरकारी विभाग आणि व्यवसाय एकाच पारदर्शक डिजिटल इंटरफेसवर एकत्र येत आहेत – जिथे प्रत्येक बोली स्पष्ट दिसते, प्रत्येक नियम पूर्वनिर्धारित असतो आणि प्रत्येक निकाल न्याय्य असतो. यामुळे डिजिटल लोकशाही, वाढीव पारदर्शकता आणि उत्तम मूल्य निर्मितीला चालना मिळते.

 

संदर्भ

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM)

 

GeM एक उत्तम उपाय: सरकारी मालमत्तांचा फॉरवर्ड लिलाव

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Backgrounder ID: 156645) आगंतुक पटल : 8
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Malayalam , Bengali , Kannada
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate