• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

कचऱ्यापासून आरोग्याकडे : भारताचा स्वच्छता प्रवास

Posted On: 19 NOV 2025 2:08PM

 

मुख्य मुद्दे

  • हागणदारी मुक्त (ओडीएफ प्लस) गावांची संख्या 5,67,708 पर्यंत पोहोचली असून 467% वाढीची नोंद
  • नोव्हेंबर 2025 पर्यंत 4692 शहरांना हागणदारी मुक्त दर्जा प्राप्त
  • 2019 मध्ये ग्रामीण भारत हागणदारीमुक्त (ओडीएफ) घोषित

आढावा

सुरक्षित शौचालयांची उपलब्धता आणि योग्य स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्य, मानवी प्रतिष्ठा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक आहे. सुधारित स्वच्छतेमुळे जलजन्य आजार कमी होतात, उत्पादकता वाढते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. यामुळे महिला आणि मुलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि चांगल्या शैक्षणिक संधी मिळून त्यांचे सक्षमीकरण होते. हवामान बदल, वेगाने होणारे शहरीकरण आणि सततची असमानता अशा आजच्या युगात, सुरक्षित स्वच्छता ही मानवी प्रतिष्ठा, सामुदायिक कल्याण आणि शाश्वत प्रगतीचा मूलभूत आधार आहे.

जागतिक शौचालय दिन

दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो. जागतिक स्वच्छता संकट आणि सर्वांसाठी सुरक्षित शौचालयांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 2013 मध्ये या दिवसाला संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिली. हा दिवस आरोग्य, सन्मान, समानता आणि शाश्वततेसाठी शौचालयांचे महत्त्व अधोरेखित करतो तसेच शाश्वत विकास ध्येय 6: स्वच्छ पाणी आणि स्वच्छता याला थेट पाठबळ देतो, ज्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत सर्वांसाठी शौचालयांची उपलब्धता करणे आहे.

भारताच्या स्वच्छ भारत अभियानाला युनिसेफसारख्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांकडून जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमांपैकी एक म्हणून गौरवले गेले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ठोस कृती जागतिक उद्दिष्टांना कशाप्रकारे हातभार लावू शकते याचेही हे प्रभावी उदाहरण आहे. जागतिक शौचालय दिन साजरा होत असताना, भारत स्वच्छतेला देशव्यापी यशोगाथा बनवून पुढे वाटचाल करत आहे.

स्वच्छ भारत मिशन (एसबीएम): स्वच्छता सुधारणा क्षेत्रातील जागतिक आदर्श

भारत सरकारने देशभरात स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) हा त्यातील एक प्रमुख कार्यक्रम असून उघड्यावर शौच करणे बंद करणे तसेच ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये सर्वांसाठी शौचालयांची उपलब्धता करणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रारंभापासून भारताच्या स्वच्छता मोहिमेत मोठे परिवर्तन झाले असून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शौचालये आणि स्वच्छतेच्या सुविधांची उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात (2014): 2 ऑक्टोबर 2014 रोजी घोषित केलेल्या या अभियानाचा उद्देश उघड्यावर शौच करण्याची प्रथा संपुष्टात आणणे तसेच घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणे हा होता. या अभियानाचे दोन घटक आहेत: स्वच्छ भारत अभियान - ग्रामीण आणि स्वच्छ भारत अभियान - शहरी (शहरे आणि नगरे). या उपक्रमांतर्गत, ऑक्टोबर 2019 मध्ये देशातील सर्व गावे, जिल्हे आणि राज्ये हागणदारीमुक्त (ओडीएफ) घोषित करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे उल्लेखनीय परिणाम : -

आरोग्यविषयक लाभ: जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सुधारित स्वच्छतेमुळे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये अतिसाराने होणाऱ्या मृत्यूंमध्ये 3 लाखांची घट झाली.

आर्थिक बचत: हागणदारीमुक्त गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी दरवर्षी आरोग्य-संबंधित खर्चात जवळपास 50,000 रुपयांची बचत केली.

पर्यावरण संरक्षण: हागणदारीमुक्त प्रदेशांमध्ये भूजल प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट नोंदवली गेली.

महिलांची सुरक्षा आणि सन्मान: शौचालयांची उपलब्धता वाढल्यामुळे, 93% महिलांनी आपल्या घरात अधिक सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले.

या यशाच्या आधारावर, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा II सुरू करण्यात आला असून त्याचा भर 'संपूर्ण स्वच्छते'चे ध्येय साध्य करण्यासाठी हागणदारीमुक्त स्थिती टिकवून ठेवण्यावर तसेच एकात्मिक घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यावर आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) चा दुसरा टप्पा 2020 मध्ये सुरू करण्यात आला. या टप्प्याचा उद्देश प्रत्येक घरासाठी शौचालयांची सार्वत्रिक उपलब्धता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करून गावांना ओडीएफ प्लसआदर्शात रूपांतरित करणे हा आहे. याचे मुख्य उद्दिष्ट गावांचा हागणदारीमुक्त दर्जा टिकवून ठेवणे तसेच घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील स्वच्छतेची पातळी सुधारणे, सर्व गावांना ओडीएफ प्लसआदर्श बनवणे, ज्यामध्ये ओडीएफची शाश्वतता, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन तसेच दृश्यात्मक स्वच्छता यांचा समावेश आहे.

ओडीएफ प्लसगाव

ओडीएफ प्लसगाव म्हणजे असे गाव जे आपला हागणदारीमुक्त (ओडीएफ) दर्जा टिकवून ठेवते, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करते आणि जिथे दृश्यात्मक स्वच्छता असते. ओडीएफ प्लस गावांचे 3 प्रगतीशील टप्पे आहेत:

ओडीएफ प्लस आकांक्षी: असे गाव जे आपली हागणदारीमुक्त स्थिती टिकवून आहेत आणि ज्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन किंवा सांडपाणी व्यवस्थापनाची सोय आहे.

ओडीएफ प्लस प्रगत: असे गाव जे आपली हागणदारीमुक्त स्थिती टिकवून आहेत आणि ज्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्हीची सोय आहे.

ओडीएफ प्लस आदर्श: असे गाव जे आपली हागणदारीमुक्त स्थिती टिकवून आहेत आणि ज्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्हीची सोय आहे; दृश्यात्मक स्वच्छता राखली जाते तसेच ओडीएफ प्लस माहिती, शिक्षण आणि संवाद संदेशांचे प्रदर्शन केले जाते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेमधील भारताची प्रगती ही सुविधेच्या उपलब्धतेकडून शाश्वततेकडे झालेल्या स्पष्ट बदलाचे प्रतिबिंब आहे. ग्रामीण भागात, गावे हागणदारीमुक्त घोषित होण्यापासून ते ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस मॉडेल दर्जा प्राप्त करण्यापर्यंत सातत्याने प्रगती करत गेली आहेत. यातून सुविधांच्या देखभालीमध्ये मजबूत सामुदायिक सहभाग दिसून येतो. दरम्यान, शहरी केंद्रांनी घरगुती आणि सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामाची उद्दिष्ट्ये ओलांडली आहेत, ज्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार स्वच्छतेची पायाभूत सुविधा कायम राखली जात आहे.

ओडीएफ प्लस प्लस’: म्हणजे असेच क्षेत्र जिथे उघड्यावर शौच केली जात नाही तसेच सर्व शौचालये कार्यान्वित आणि सुस्थितीत आहेत, तसेच मल आणि सांडपाण्याचे सुरक्षितपणे व्यवस्थापन केले जाते किंवा त्यावर प्रक्रिया केली जाते, ते उघड्या गटारात किंवा जलस्रोतांमध्ये सोडले जात नाही.

ग्रामीण स्वच्छता (स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण)

भारतातील 95% पेक्षा जास्त गावे ओडीएफ प्लस घोषित झाली आहेत.

ओडीएफ प्लस गावांमध्ये 467% वाढ झाली आहे डिसेंबर 2022 मधील 1 लाख गावांवरून ही संख्या 5.67 लाख गावांपर्यंत पोहोचली आहे.

ओडीएफ प्लस आदर्श गावांची संख्या 4,85,818 झाली आहे.

शहरी स्वच्छता (स्वच्छ भारत अभियान-शहरी)

4692 शहरे हागणदारी मुक्त आहेत, 4314 शहरांनी ओडीएफ+ दर्जा प्राप्त केला आहे आणि 1973 शहरे ओडीएफ++ दर्जापर्यंत पोहोचली आहेत. 

वैयक्तिक घरगुती शौचालय:

उभारणीची पूर्तता: 108.62%

बांधलेली शौचालये : 63,74,355

मिशनचे लक्ष्य: 58,99,637

सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय:

उभारणीची पूर्तता: 125.46%

बांधलेली शौचालये: 6,38,826

मिशनचे लक्ष्य: 5,07,587

(दिनांक 19.11.2025 रोजीची स्थिती)

पाणी आणि स्वच्छतेचा समन्वय: अमृत आणि जल जीवन मिशन

अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन अभियान (अमृत) सारख्या पूरक योजना शहरी सांडपाणी आणि निचरा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करतात, तर जल जीवन मिशन घरांना विश्वसनीय पाणीपुरवठा सुनिश्चित करते. या दोन्ही उपक्रमामुळे स्वच्छतेचे परिणाम अधिक मजबूत होतात. एकत्रितपणे, ही धोरणे शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सन्मानावर भर देतात, परिणामी स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्य आणि विकासाचा एक आधारस्तंभ बनते.

अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन अभियान (अमृत) 2015 मध्ये सुरू करण्यात आले, ज्यामध्ये पाणीपुरवठा, सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापन या क्षेत्रात शहरी भागातील मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अमृत 2.0 हे 2021 मध्ये सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरांमध्ये सुरू करण्यात आले. 500 अमृत शहरांमध्ये सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापनाचे सार्वत्रिक कव्हरेज प्रदान करणे हे अमृत 2.0 च्या प्रमुख लक्ष्यांपैकी एक आहे.

890 सांडपाणी आणि सेप्टेज प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे, ज्यांची किंमत 34,447 कोटी रुपये आहे.

4,622 एमएलडी (दशलक्ष लिटर/प्रतिदिन) नवीन किंवा वाढीव सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्यात आली आहे, ज्यात पुनर्वापर/पुनर्चक्रासाठी 1,437 एमएलडीचा समावेश आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 68,461.78 कोटी रुपये किंमतीचे 586 प्रकल्प हाती घेतले आहेत.

मंजूर झालेल्या प्रकल्पांमुळे एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) क्षमतेमध्ये 6,964 एमएलडीची भर पडली आहे, ज्यात पुनर्वापर/पुनर्चक्रासाठी 1938.96 एमएलडी राखीव ठेवण्यात आले आहे. (21.08.2025 रोजीच्या स्थितीनुसार)

ऑगस्ट 2019 मध्ये सुरू झालेल्या जल जीवन मिशनचा उद्देश सर्व ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासोबतच, स्वच्छतेवर आणि हागणदारीमुक्त (ओडीएफ) गावांच्या देखभालीवर लक्ष केंद्रित करणे हा देखील आहे.

निष्कर्ष:

भारताचा स्वच्छता प्रवास हा उघड्यावर शौच करण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यापासून ते स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या शाश्वत प्रणाली निर्माण करण्यापर्यंतच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. स्वच्छ भारत मिशन, अमृत आणि जल जीवन मिशनसारख्या उपक्रमांद्वारे, देशाने केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या पलीकडे जाऊन सन्मान, सर्वसमावेशकता आणि दीर्घकालीन स्वच्छता सुनिश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय शौचालय दिनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे, हे प्रयत्न केवळ सार्वजनिक आरोग्यच मजबूत करत नाहीत, तर शाश्वत विकास ध्येय 6 अंतर्गत जागतिक वचनबद्धतेशी सुसंगत आहेत, ज्यामुळे भारत सर्वांसाठी सुरक्षित स्वच्छतेच्या प्रगतीमध्ये एक अग्रणी देश म्हणून स्थापित होतो.

संदर्भ:

पेयजल आणि स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालय:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2089254

https://sbm.gov.in/sbmgdashboard/statesdashboard.aspx

https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/185/AU4632_lRzPYO.pdf?source=pqals

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय:

https://sbmurban.org/#

https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/185/AU4730_ge4vw3.pdf?source=pqals

https://swachhbharatmission.ddws.gov.in/sites/default/files/Technical-Notes/10Years_of_SBM_Brochure.pdf

https://sbmurban.org/storage/app/media/pdf/ODF_Plus_and_ODF_PlusPlus.pdf

स्वच्छ भारत अभियान:

https://swachhbharatmission.ddws.gov.in/

संयुक्त राष्ट्र संघ:

https://www.un.org/en/desa/ensure-safe-and-hygienic-sanitation-all-un-urges-marking-world-toilet-day#:~:text=Calendar-,Ensure%20safe%20and%20hygienic%20sanitation%20for%20all%2C%20UN%20urges%2C%20marking,in%20vulnerable%20situations%2C%20by%202030

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 156596) आगंतुक पटल : 27
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Assamese , Gujarati , Kannada
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate