Social Welfare
जनजाती आदिवासी गौरव दिवस
भारतातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान
Posted On:
14 NOV 2025 12:01PM
महत्वाचे मुद्दे –
-
आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस (आदिवासी गौरव दिवस) म्हणून साजरा केला जातो.
-
स्वातंत्र्य मिळवण्यााठी आदिवासी समाजानेही ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केले, अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये भाग घेतला. आदिवासींच्या या भरीव कार्याचे स्मरण करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा प्रचार करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने 11 संग्रहालयांची स्थापन केली जात आहे.
-
आदिवासी व्यवहार मंत्रालय आदि संस्कृती आणि आदि वाणी यांसारख्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे आदिवासी कला, भाषा आणि परंपरांना प्रोत्साहन देत आहे.
प्रस्तावना
आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि वसाहतवादविरोधी बिरसा मुंडा यांचा जन्म 1874 मध्ये झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये दरवर्षी 15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस (आदिवासी गौरव दिवस) साजरा करतो. 2024-25 हे वर्ष त्यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या देशव्यापी उत्सवांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, भारताच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात बिरसा मुंडा आणि इतर भारतीय आदिवासी नेत्यांच्या बलिदानाचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी आणि देशातील आदिवासी संस्कृती आणि वारशाची समृद्ध विविधता साजरी करण्यासाठी 1-15 नोव्हेंबर या पंधरवड्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आदिवासी इतिहास आणि संस्कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. सध्या सुरू असलेल्या जनजाती गौरव वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून देशभरात अनेक कार्यशाळा, कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.शासनाच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक म्हणजे आपल्या ऐतिहासिक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी 11 आदिवासी संग्रहालयांची उभारणी करत आहे.
आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उपक्रम -
जुलमी ब्रिटीश शासन आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध करण्यामध्ये भारतातील आदिवासी नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी केलेले अनेक उठाव, विद्रोह आणि चळवळी आजच्या भारताला आकार देण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. मात्र भारतीय इतिहासात त्यांची मुख्य प्रवाहात फारशी नोंद झालेली नाही. त्यामुळे आता हे कार्य सरकारकडून केले जात आहे. आदिवासी नेत्यांची माहिती जतन करणे, त्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रसारित करण्यासाठी आणि या चळवळींबद्दल लोकांचे प्रबोधन करण्यासाठी सरकारने संग्रहालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने या योजने अंतर्गत आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य देत आहे. तसेच आदिवासी संग्रहालयांच्या स्थापनेसाठी राज्य सरकारांना निधी उपलब्ध करून देते.
संग्रहालयांचे तपशील खाली देण्यात आहेत:
|
राज्ये
|
स्थान
|
प्रकल्पाचा खर्च
(कोटी रूपये)
|
आदिवासी व्यवहार मंत्रालयाने मंजूर केलेला निधी
(कोटी रूपये)
|
|
झारखंड
|
रांची
|
34.22
|
25.00
|
|
गुजरात
|
राजपिपला
|
257.94
|
50.00
|
|
आंध्र प्रदेश
|
लंबासिंगी
|
45.00
|
25.00
|
|
छत्तीसगड
|
रायपूर
|
53.13
|
42.47
|
|
केरळ
|
वायनाड
|
16.66
|
15.00
|
|
मध्य प्रदेश
|
छिंदवाडा
|
40.69
|
25.69
|
|
जबलपूर
|
14.39
|
14.39
|
|
तेलंगणा
|
हैदराबाद
|
34.00
|
25.00
|
|
मणिपूर
|
तामेंगलाँग
|
51.38
|
15.00
|
|
मिझोरम
|
केलसिह
|
25.59
|
22.59
|
|
गोवा
|
पोंडा
|
27.55
|
15.00
|
छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यातील संग्रहालयांचे उद्घाटन याआधीच करण्यात आले आहे.
शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय
छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच 1 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या संग्रहालयामध्ये छत्तीसगडमधील आदिवासी समुदायांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध केलेल्या संघर्षांचा माहिती संग्रहीत करण्यात आली आहे.
या संग्रहालयाच्या उभारणीसाठी 53.13 कोटी रूपये खर्च आला आहे. त्यापैकी 42.47 कोटी रूपये आदिवासी व्यवहार मंत्रालयाने खर्च केले 10.66 कोटी रूपये राज्याने खर्च केले आहेत. यामध्ये अनेक डिजिटल यंत्रणेसह 16 गॅलरीमध्ये 650 शिल्पे आहेत, ज्यात डिजिटल स्क्रीन आणि ‘डिस्प्ले’, टोपोग्राफिक प्रोजेक्शन नकाशे, दृक-श्राव्य ‘डिस्प्ले’, एक कृत्रिम प्रज्ञाधारित गाळा तयार करण्यात आला आहे. तसेच वक्राकृती पडदा आणि आरएफआयडी डिजिटल पडदा यांचा समावेश आहे.
या संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर नारायण सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण केले, आदि शौर्य नावाच्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि शहीदांच्या वंशजांशी संवाद साधला.

छायाचित्रातील माहिती-
छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह स्मारक-सह-आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच 1 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.
प्रस्तूत संग्रहालय भारताच्या आदिवासी वारशाच्या अनाम वीरांचा सन्मान करते आणि :
-
वीर नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश जुलमाविरूध्द केलेले कार्याचा आणि त्यांच्या हौतात्म्याच्या चळवळीचा इतिहास दर्शवते.
-
हलबा क्रांती, सरगुजा क्रांती, भोपाळपट्टणम क्रांती, परळकोट क्रांती, तारापूर क्रांती, मेरी क्रांती, कोई क्रांती, लिंगगिरी क्रांती, मुरिया यांसारख्या प्रमुख आदिवासी उठावांचा समावेश असून क्रांती, आणि गुंडाधुर आणि लाल कालिंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील खूप गाजलेली भूमकाल क्रांती, यांची माहिती देते;
-
आदिवासी गावाची रचना, त्यांची श्रद्धास्थाने आणि संस्कृती यांचे दर्शन घडवते.
-
राणी चो-रिस क्रांती (1878) ची ठळक वैशिष्ट्ये दिलेली असल्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची माहिती मिळते.
-
महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीत आदिवासी समुदायांनी कसा सहभाग घेतला हे दाखवण्यात आले असून, त्यामधून ‘झंडा सत्याग्रह आणि जंगल सत्याग्रह’ यांची माहिती मिळते.

बिंझवार जमातीतील नारायण सिंह हे छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील सोनाखन येथील जमीनदार होते. 1856 मध्ये, ज्यावेळी ब्रिटिशांनी अन्नधान्याचा साठा करून ठेवला, त्यावेळी ओडिशावर दुष्काळाचे संकट आले होते. अशा आपत्तीच्या काळामध्ये नारायण सिंह यांनी लोकांना उपासमारीच्या संकटातून वाचवले. लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी ब्रिटिशांच्या ताब्यातील धान्य दुकानांची कुलूपे त्यांनी तोडली. या कृत्याबद्दल इंग्रजांनी त्यांना अटक करून रायपूर येथे तुरुंगात डांबले. वीर नारायण सिंह यांनी तेथून निसटून स्वतःचे सैन्य तयार केले.
29 नोव्हेंबर 1856 रोजी ब्रिटीश सैन्याचा पराभव नारायण सिंहांच्या सैन्याने केला. तथापि, नंतर इंग्रजांनी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने सैन्यासह हल्ला केला आणि नारायण सिंह यांना ब्रिटिशांनी पकडले. 10 डिसेंबर 1857 रोजी या शूरवीराला एका चौकामध्ये क्रूरतेने मारण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय

भगवान बिरसा मुंडा आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे झारखंडमधील रांची येथे दि. 15 नोव्हेंबर 2021, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.
झारखंडच्या उलिहातू गावात जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी ‘उलगुलान’ किंवा “ग्रेट ट्यमल्ट” (1899-1900) या आंदोलनाचे नेतृत्व केले. आदिवासी स्वराज्य आणि ‘खुंटकट्टी’ म्हणजेच सामुदायिक जमिनीचे हक्क पुन्हा मिळावेत यासाठी एक मोठे आणि तीव्र आंदोलनाचे नेतृत्व केले. एक आध्यात्मिक सुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या भागातील सर्व जमातींना ब्रिटिशांचे भूमीविषयक कायदे आणि सरंजामशाही शोषणाविरुद्ध एकत्र केले. धरती आबा ("पृथ्वीचा पिता") या संबोधनाने ओळखले जाणारे, बिरसा मुंडा यांनी वसाहतवादी प्रभावापासून मुक्त नैतिक, स्वशासित समाजाची कल्पना केली. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांना रांची तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. बिरसा मुंडा यांनी अशा चळवळी करून वीरमरण पत्करले.
बादल भोई राज्य आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय
बादल भोई राज्य आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन 15 नोव्हेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे करण्यात आले.
बादल भोई यांचा जन्म 1845 मध्ये छिंदवाडा जिल्ह्यात झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली, 1923 मध्ये हजारो आदिवासींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला आणि भोई यांना अटक करण्यात आली. काही वर्षांनंतर, ऑगस्ट 1930 मध्ये, त्यांना पुन्हा एकदा रामकोना येथे वन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अटक केली. बादल भोई यांनी आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे तुरुंगात घालवली आणि 1940 मध्ये ब्रिटिशांकडून त्यांच्यावर विषप्रयोग केल्याची नोंद आढळते.
राजा शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय
राजा शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन 15 नोव्हेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे करण्यात आले.
गोंड साम्राज्याचे राजे निजाम शाह यांचे वंशज राजे शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह यांनी 1857 च्या घटनांदरम्यान ब्रिटीश राजवटीला सक्रिय विरोध केला. अहिंसा पालनासाठी वचनबद्ध असल्यामुळे, अतिशय उत्तम प्रतीचे कवी असलेल्या या दोघा स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीश राजवटीचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडील काव्यप्रतिभेचा एक शक्तिशाली माध्यम म्हणून वापर केला. जुलमी राजवटीच्या विरोधात रचलेले श्लोक, कवने ते म्हणत होते. 18 सप्टेंबर 1858 रोजी राजे शाह यांना त्याचा मुलगा कुंवर रघुनाथ शाह यांच्यासह ब्रिटिशांनी पकडले आणि त्यांना मृत्युदंड दिला.
जनजाती गौरव वर्ष सोहळा
आदिवासींविषयी ओळख आणि माहिती देणे , स्वदेशी ज्ञान प्रणाली प्रदर्शित करण्यासाठी आणि आदिवासी सक्षमीकरणासाठी सरकारी उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात जनजाती गौरव वर्षाचा हा विशेष पंधरवडा साजरा केला जात आहे.
या पंधरवड्यात देशभरामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे :
|
राज्य/ केंद्रशासित प्रदेश
|
आयोजक विभाग/संस्था
|
प्रमुख कार्यक्रम
|
|
जम्मू आणि काश्मीर
|
-
|
पंतप्रधान जनमन, धरती आबा उपक्रम, कायदेशीर सशक्तीकरण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण अध्यापनशास्त्र या विषयावर क्षमता-निर्माण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि डिजिटल साक्षरता सत्रही घेण्यात आले.
|
|
मेघालय
|
कला आणि संस्कृती विभाग आणि आदिवासी संशोधन संस्था
|
संस्थेने शिलाँग येथील राज्य मध्यवर्ती वाचनालयामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात आदिवासी प्रतिकांना पुष्पांजली आणि आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
|
|
राजस्थान
|
सर्व 31 एकलव्य आदर्श निवासी शाळा (इएमआरसी)
|
इएमआरसी शाळांनी आदिवासी गौरव वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंध आणि भाषण स्पर्धा, आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि सांस्कृतिक वारसा याविषयी कार्यक्रम करून सर्जनशीलतेचे प्रदर्शन केले
|
|
आंध्र प्रदेश
|
आंध्र प्रदेश आदिवासी संशोधन संस्था (एपी टीआरआय )
|
एपी टीआरआय’च्यावतीने बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. या कार्यक्रमात कला, नृत्य आणि राज्यभरातील आदिवासी समुदायांची एकतेचे दर्शन दिले.
|
|
सिक्किम
|
-
|
या उत्सवाचा प्रारंभ आदिवासी भाषा शिक्षकांसाठी प्रशिक्षण-सहकार्य शाळेने झाली. देशी भाषा जतन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. दुस-या दिवशी आदिवासी तरुणांनी बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल आणि धावणे यासारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
|
|
मणिपूर
|
जिल्हा प्रशासन, पोलीस, आणि तामेंगलाँग स्वायत्त जिल्हा परिषद
|
अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे राणी गायदिलायू आदिवासी बाजार आणि हैपौजाडोनांग उद्यान येथे माल्यार्पण केले आणि सामुदायिक स्वच्छता मोहीम राबवून आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.
|
|
ओडिशा
|
अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती विकास विभाग
|
विभागाच्यावतीने बिरसा मुंडा मंडप येथे त्यांचे जीवन आणि कार्यावर प्रदर्शन भरविले होते. तसेच ओडिशातील विविध आदिवासी परंपरा प्रदर्शनासाठी छायाचित्रांचे दालन तयार केले. आदिवासी कलेचे थेट प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या सहभागासह कार्यक्रम आणि आदिवासी वारशावरील प्रदर्शनांनी उत्सव साजरा केला. दुसऱ्या दिवशी, ओडिशा राज्य आदिवासी संग्रहालयात आकर्षक छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात ओडिशाच्या आदिवासी समुदायांचे जीवन, कला आणि संस्कृती दर्शविणारी 80 छायाचित्रांचा समावेश होता.
|
|
गुजरात
|
आदिवासी विकास आणि आदिवासी विभाग संशोधन संस्था, गुजरात
|
विभाग आणि संस्थेने संयुक्तपणे नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे बिरसा मुंडा यांचे जीवन, संघर्ष आणि योगदान यावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले. त्याचे उद्घाटन राज्यमंत्री पी.सी. बरंडा यांनी केले. या कार्यक्रमाला 600 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यामध्ये प्राध्यापक, शैक्षणिक आणि आदिवासी नेते यांचा समावेश होता. यामधून शैक्षणिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन झाले.
|
आदिवासी इतिहास आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे इतर उपक्रम
केंद्र सरकारकडून विविध योजना आणि उपक्रमांद्वारे अनुसूचित जमाती समुदायांच्या समृद्ध संस्कृती आणि वारशांना प्रोत्साहन देते, त्यांची वेगळी ओळख जपण्याचे आणि त्यांना भारतीय चेतना आणि इतिहासाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याच्या उद्देशाने कार्य केले जात आहे.
यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
|
उपक्रम किंवा प्रकल्प
|
तपशील
|
ठळक वैशिष्ट्ये
|
|
आदि संस्कृती प्रकल्प
|
आदिवासी कलाकृतींसाठी एक डिजिटल शिक्षण मंच.
|
विविध आदिवासी कलाप्रकारांवर सुमारे 100 समर्पित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक आदिवासी वारशावर सुधारित केलेल्या सुमारे 5,000 दस्तऐवजांचा समावेश आहे.
|
|
आदि वाणी
|
आदिवासी भाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधारित भाषांतर साधन.
|
हिंदी, इंग्रजी आणि आदिवासी भाषांमध्ये वास्तव वेळेत मजकूर आणि भाषांतर सुविधा — मुंडारी, भिली, गोंडी, संथाली, गारो आणि कुई; लोकसाहित्य, मौखिक परंपरा आणि सांस्कृतिक ज्ञानाचे डिजिटायझेशन आणि जतन करण्यात मदत होते.
|
|
आदिवासी डिजिटल दस्तऐवज भांडार
|
आदिवासी-संबंधित संशोधन आणि संसाधनांचे डिजिटल संग्रह.
|
https://repository.tribal.gov.in/ या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध; हे भारतातील आदिवासी समुदायांशी संबंधित कागदपत्रांचे शोधण्यायोग्य भांडार म्हणून काम करते.
|
|
वर्णमाला आणि मौखिक साहित्य जतन उपक्रम
|
आदिवासी भाषिक आणि मौखिक वारसा जतन करणे.
|
आदिवासी भाषेतील स्थानिक गीते आणि कथांचे प्रकाशन करणे. हा साहित्य ठेवा जतन करण्यासाठी मौखिक आदिवासी साहित्य, लोककथा आणि लोककथांचे संकलन आणि दस्तऐवजीकरण.
|
|
स्वदेशी ज्ञानाचे संशोधन आणि दस्तऐवजीकरण
|
प्रचार आणि आदिवासी ज्ञान प्रणालीचे संरक्षण आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती.
|
स्वदेशी उपचार पद्धती, औषधी वनस्पती, आदिवासी भाषा, शेती, नृत्य आणि चित्रे यावरील अभ्यासांचा समावेश आहे. साहित्य महोत्सव, अनुवाद कार्य आणि आदिवासी लेखकांच्या प्रकाशनांना देखील समर्थन देते.
|
|
आदि महोत्सव
|
भारत सरकारच्यावतीने आदिवासी संस्क़तीचा राष्ट्रीय उत्सव
|
आदिवासी हस्तकला, पाककृती, वाणिज्य, संस्कृती आणि कला साजरे करून संयोजित संस्कृती; आदिवासी प्रतिभा आणि उद्योजकता प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ प्रदान केले जाते.
|
|
आदिवासी हस्तकला मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
|
सरकर पुरस्कृत आदिवासी कलेला चालना देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
|
हस्तकला मेळावे, नृत्य महोत्सव, कला स्पर्धा आणि आदिवासी चित्रांवरील कार्यशाळा-सहकारी प्रदर्शनांचे आयोजन; देश आणि राज्यभरात आदिवासी मेळावे आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
|
समारोप -
जनजाती गौरव दिवस समाजातील मोठ्या प्रमाणावर उपेक्षित वर्गाच्या-अनुसूचित जमातीच्या योगदानावर, इतिहासावर, संस्कृतींवर आणि परंपरांवर प्रकाश टाकतो. या दिवसाद्वारे आणि आदिवासी गौरव वर्षाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण केले जाते. त्याचबरोबर इतर उपक्रमांसह अकरा आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालये स्थापन करून, केंद्र सरकारने आदिवासी समाजाने केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेले यश राष्ट्राच्या सामूहिक चेतनेमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करत आहे. एकत्रितपणे, हे प्रयत्न एक भारत, श्रेष्ठ भारत-एकसंध राष्ट्र या संकल्पनेचा पुरस्कार करीत आहे. समुदायांच्या सामर्थ्याचा आणि त्यांच्या अंतर्भूत गुणांचा आदर करणे, म्हणजे एक राष्ट्र म्हणून देशाला बळकटी दिली जात आहे.
संदर्भ
पत्रसूचना कार्यालय
इतर:
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
***
NehaKulkarni/SuvarnaBedekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 156560)
आगंतुक पटल : 34
Provide suggestions / comments