Rural Prosperity
राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम
सर्वसमावेशक मदतीतून भारताच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण
Posted On:
07 NOV 2025 3:21PM
नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर 2025
महत्वाच्या बाबी
- राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत देशभरात 3.09 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना, पाच उपयोजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.
- 2024–25 या वर्षात, IGNOAPS (इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना) अंतर्गत 6,843.92 कोटी रुपये, IGNWPS(इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना) अंतर्गत 2,150.03 कोटी रुपये, IGNDPS(इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना) अंतर्गत 243.74 कोटी रुपये, आणि NFBS (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना) अंतर्गत 394.19 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
- NSAP अंतर्गत 2.5 कोटी लाभार्थ्यांना आधारशी जोडण्यात आले असून, त्यामुळे पारदर्शकता राखत थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुनिश्चित झाले आहे.
प्रस्तावना
15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) ही पूर्णपणे केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळणारी केंद्रपुरस्कृत योजना आहे. दारिद्र्यरेषेखाली (BPL) जीवन जगणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागात अंमलात आणली जाते. भारतीय संविधानात नमूद केलेल्या राज्य धोरणांच्या निर्देशक तत्त्वांची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. NSAP अंतर्गत, वृद्धापकाळातील निवृत्तीवेतन, विधवा निवृत्तीवेतन, दिव्यांग निवृत्तीवेतन,कुटुंब सहाय्य, तसेच वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेस पात्र असूनही लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी अन्नपूर्णा योजनेद्वारे अन्नसुरक्षा, अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत देशभरात 3.09 कोटी लाभार्थ्यांना मदत दिली जाते. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी लाभार्थ्यांच्या संख्येवर योजनानिहाय मर्यादा (सीलिंग/कॅप) निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये—इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS) अंतर्गत 2.21 कोटी ज्येष्ठ नागरिक, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS) अंतर्गत 67 लाख लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS) अंतर्गत 8.33 लाखांहून अधिक लाभार्थी, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS) अंतर्गत 3.5 लाख लाभार्थी, तसेच अन्नपूर्णा योजना अंतर्गत 8.31 लाख लाभार्थी, यांचा समावेश असून, ही मदत संपूर्ण देशभर दिली जाते.

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) निवृत्तीवेतनधारक / लाभार्थी
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS): 2,21,30,687
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS): 67,83,469
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS): 8,33, 751
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS): 3,58,840
अन्नपूर्णा योजना: 8,31,722
एकूण लाभार्थी: 3.09 कोटी
स्रोत: ग्राम विकास मंत्रालय
ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग अशा अत्यंत असुरक्षित श्रेणीतील नागरिकांना मुलभूत स्तरावरील सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
निवड प्रक्रिया: विविध NSAP योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ग्रामपंचायती आणि नगरपालिका सक्रिय भूमिका बजावतात.
लाभ वितरणः लाभार्थ्यांना 94 % लाभ, थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जातात, म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात किंवा टपाल कार्यालयाच्या बचत खात्यात रक्कम, थेट जमा केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोस्टल मनी ऑर्डरद्वारेही लाभ दिला जातो. तसेच, ज्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत लाभार्थी निवृत्तीवेतन घेण्यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयामध्ये जाऊ शकत नाहीत, अशा वेळी घरपोच रोख रक्कम (Cash at Doorstep) देण्यासही योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी आहे.
नियंत्रण आणि देखरेख: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजना कोणत्याही राज्य सरकारी विभागामार्फत राबवण्याची मुभा आहे. मात्र, अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी राज्य पातळीवर एक प्रमुख सचिव नेमणे बंधनकारक आहे. प्रत्येक तिमाहीचा प्रगती अहवाल ठरावीक नमुन्यात, संबंधित तिमाहीनंतरच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. जर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने ठरलेल्या वेळेत प्रगती अहवाल सादर केला नाही, तर असे समजले जाईल की योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही किंवा प्रगती झालेली नाही. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारा अतिरिक्त निधी/सहाय्य रोखले जाऊ शकते किंवा दिले जाणार नाही.
सध्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत खालील पाच उपयोजना (घटक) समाविष्ट आहेत—
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS)
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS)
- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS)
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS)
- अन्नपूर्णा योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS)
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची योजना असून, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत—60 ते 79 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा 200 रुपये, 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लाभार्थ्यांना दरमहा 500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते.

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारच्या वाट्याइतकी किंवा त्याहून अधिक अतिरिक्त रक्कम (टॉप-अप) देण्यास प्रोत्साहन दिले जाते (राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःच्या निधीतून तितकीच किंवा त्याहून जास्त रक्कम जोडावी अशी अपेक्षा असते). या अतिरिक्त सहाय्यामुळे लाभार्थ्यांना योग्य आणि सन्मानपूर्वक उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्न मिळण्यास मदत होते.सध्या, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन उपयोजनां अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून दिले जाणारे टॉप-अप दरमहा 50 रुपयांपासून 5,700 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरासरी निवृत्तीवेतन सुमारे 1,100 रुपये प्रतिमहिना इतके होते.
2024-25 या आर्थिक वर्षासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS) अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6,843.92 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी 2023-24 या वर्षात वितरित करण्यात आलेल्या 6,778.48 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS)
या योजनेअंतर्गत, भारत सरकारने ओळख पटवलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील 40 ते 79 वर्षे वयोगटातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या वयोगटातील प्रत्येक पात्र लाभार्थीला केंद्र सरकारकडून दरमहा 300 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच, 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या विधवा महिलांना दरमहा 500 रुपये केंद्र सहाय्य दिले जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS)
2024–25 या आर्थिक वर्षासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS) अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 243.74 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. ही योजना 18 ते 79 वर्षे वयोगटातील, गंभीर किंवा एकापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सहाय्य देते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा 300 रुपये मदत दिली जाते. तसेच, 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लाभार्थ्यांना दरमहा 500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS)
या योजनेअंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा (वय 18 ते 59 वर्षे) दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबाला एकरकमी आर्थिक मदत देण्यात येते. या परिस्थितीत कुटुंबाला 20,000 रुपये इतकी रक्कम सहाय्य म्हणून दिली जाते, जेणेकरून कमावत्या व्यक्तीच्या निधनामुळे उद्भवणाऱ्या तातडीच्या आर्थिक अडचणींना तोंड देणे शक्य होईल.
अन्नपूर्णा योजना
या योजनेअंतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने (IGNOAPS) साठी पात्र असूनही ज्यांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत दिले जाते.
2025-26 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा (NSAP) करता 9,652 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
2025-26 या आर्थिक वर्षासाठी NSAP अंतर्गत घटकनिहाय अर्थसंकल्पीय तरतूद:
|
अनुक्रमांक
|
उपयोजना
|
आर्थिक तरतूद 2025-26 (कोटी रुपयां मध्ये)
|
|
1
|
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS)
|
6645.90
|
|
2
|
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS)
|
2026.99
|
|
3
|
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS)
|
659.00
|
|
4
|
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (IGNDPS)
|
290.00
|
|
5
|
अन्नपूर्णा योजना
|
10.00
|
|
6
|
व्यवस्थापन कक्ष
|
20.11
|
|
|
एकूण
|
9652.00 कोटी रुपये
|
सर्व संभाव्य लाभार्थ्यांची माहिती आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, पत्ता, निवृत्तीवेतन वितरणाचे माध्यम, बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक आणि उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे.
आतापर्यंत NSAP अंतर्गत 2.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या खात्यांशी जोडले असून, त्यामुळे सुरक्षित आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुनिश्चित झाले आहे. ही सर्व माहिती NSAP च्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
www.nsap.nic.in
या डिजिटल उपक्रमामुळे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निवृत्तीवेतन थेट जमा केले जात आहे. यामध्ये आधार प्रमाणीकरण आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) यांचे एकत्रीकरण करण्यात आल्याने बनावट नोंदी दूर करण्यास मदत झाली असून, पारदर्शकता वाढली आहे.
NSAP अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांना डिजिटल हयातीचा दाखला (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-DLC) देण्यासाठी, आधार-आधारित मोबाईल अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) ग्राम विकास मंत्र्यांनी 15 जुलै 2025 रोजी सुरू केले आहे. या DLC अॅप्लिकेशनमुळे लाभार्थ्यांच्या वार्षिक जीवन प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ होणार असून, यापूर्वी ही प्रक्रिया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून हाताने-प्रत्यक्ष (मॅन्युअली) करण्यात येत होती.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) हा भारताच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असून, गरजू नागरिकांना आवश्यक सहाय्य पुरवतो. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, अन्नपूर्णा योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या विविध घटकांद्वारे, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना नियमित आर्थिक मदत आणि अन्नसुरक्षा मिळावी याची खातरजमा केली जाते. आधार-आधारित प्रमाणीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे NSAP मध्ये पारदर्शकता वाढली, फसवणूक कमी झाली आणि कोट्यवधी लाभार्थ्यांपर्यंत कल्याणकारक योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचू लागला. एकत्रितपणे, या सर्व उपाययोजनांमुळे महत्त्वाचा आर्थिक आधार मिळतो आणि देशभरात अधिक समावेशक आणि समताधिष्ठित सामाजिक सुरक्षा जाळे मजबूत होते.
संदर्भ
ग्रामविकास मंत्रालय
https://www.dord.gov.in/static/uploads/2024/02/43f6d3ecbd0cf21b1a0c23d80d270e0c.pdf
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम
https://nsap.nic.in/
https://nsap.nic.in/circular.do?method=faq#collapse3
https://nsap.nic.in/circular.do?method=faq#collapse12
मणिपूर राज्य राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र
https://manipur.nic.in/news/manipur-awarded-for-100-dbt-for-nsap-by-ministry-of-rural-development/
माय स्कीम पोर्टल
https://www.myscheme.gov.in/schemes/nsap-ignoaps
राज्य सभा
https://sansad.in/getFile/annex/268/AU2384_qLzV6d.pdf?source=pqars
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/185/AU3825_81y9WL.pdf?source=pqals
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/185/AU3882_9TjvAE.pdf?source=pqals
https://sansad.in/getFile/annex/268/AU2384_qLzV6d.pdf?source=pqars
भारताचा अर्थसंकल्प
https://www.indiabudget.gov.in/doc/eb/sbe87.pdf
पत्रसूचना कार्यालय (पीआयबी) प्रसिद्धीपत्रक
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2152593
https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2088996&utm_source
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(Backgrounder ID: 155928)
आशिष सांगळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
(Explainer ID: 156559)
आगंतुक पटल : 78
Provide suggestions / comments