• Sitemap
  • Advance Search
Social Welfare

शहरी केंद्रांपासून ग्रामीण अंतर्भागांपर्यंत

केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती देत आहेत शैक्षणिक समानतेला चालना

Posted On: 10 NOV 2025 2:03PM

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2025

 

मुख्य मुद्दे

ऑक्टोबर 2025 पर्यंत, देशभरात 1,290 केंद्रीय विद्यालये (KVS) कार्यरत आहेत.

भारत सरकारने पुढील 9 वर्षांत 57 नवीन केंद्रीय विद्यालये (KVS) उघडण्यास मान्यता दिली आहे, ज्यासाठी सुमारे 5862.55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2025 पर्यंत देशभरात 662 नवोदय विद्यालये कार्यरत आहेत.

2024-25 या वर्षासाठी, नवोदय विद्यालय समिती (NVS) शाळांना अनुदान म्हणून 5370.79 कोटी रुपये वाटप करण्यात आले.

पीएम श्री योजनेअंतर्गत, 913 केंद्रीय विद्यालय आणि 620 नवोदय विद्यालय समिती शाळांना आदर्श संस्था म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आले आहे.

प्रस्तावना

भारतीय शिक्षण व्यवस्था देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ती लाखो विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये रुजवते, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाचा आधारस्तंभ म्हणून कार्य करते. या व्यवस्थेत, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (MoE) अखत्यारीतील केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि जवाहर नवोदय विद्यालय (NVS) या स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही संस्था देशभरात उच्च-गुणवत्तेचे, समान शिक्षण देण्यासाठी समर्पित आहेत.

केंद्रीय विद्यालय संघटन प्रामुख्याने बदली होणारे केंद्र सरकारचे कर्मचारी, ज्यात संरक्षण आणि निमलष्करी दलातील कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, तसेच एकुलती एक मुलगी यांचा प्राधान्यक्रमाने समावेश असून त्यांच्या मुलांना एकसमान, दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते[1], त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 नुसार राष्ट्रीय एकात्मता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देते.

दुसरीकडे, जवाहर नवोदय विद्यालय (NVS) ही संस्था गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेद्वारे ग्रामीण भागातील प्रतिभावान मुलांना मोफत निवासी शिक्षण प्रदान करते, ज्याचा उद्देश शहरी-ग्रामीण शैक्षणिक दरी कमी करणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे. ही संस्था देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 नुसार राष्ट्रीय एकात्मता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देते.

एकत्रितपणे, या संस्थांद्वारे देशाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. ज्यामुळे भारतातील शालेय शिक्षण प्रणालीमध्ये सर्वसमावेशक विकास आणि शैक्षणिक समानतेला चालना देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ऐतिहासिक आढावा

केंद्रीय विद्यालय संघटनच्या शाळा, ज्यांना सामान्यतः केंद्रीय विद्यालय म्हणून ओळखले जाते, त्यांनी स्थापनेपासूनच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, नवोदय विद्यालय समितीच्या शाळा, ज्या नवोदय विद्यालय म्हणून ओळखल्या जातात, त्या मोफत निवासी शिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करतात. दोन्ही संस्थांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जातो, ज्यामुळे सर्वांगीण शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन मिळते.

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS)

केंद्रीय विद्यालय संघटनची स्थापना नोव्हेंबर 1963 मध्ये झाली. (2025 मध्ये 62 वे वर्ष साजरे करत आहे), याची सुरुवात 1962 मध्ये सेंट्रल स्कूल्स ऑर्गनायझेशन (CSO) पासून झाली. वारंवार बदली होणाऱ्या तसेच बदली न होणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना एक समान शिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे हे केंद्रीय विद्यालयांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अलीकडच्या काही वर्षांत, विविध मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून येणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे, विशेषतः वंचित आणि कमी प्रमाणात सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये केंद्रीय विद्यालय यांचे जाळे देशभर विस्तारले आहे.

सर्व केंद्रीय विद्यालये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न आहेत आणि बालवाटिका I, II आणि III तसेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) 2023 आणि नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे. हा अभ्यासक्रम सर्वांगीण विकासावर भर देतो, ज्यात शैक्षणिक अभ्यास, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि कौशल्य-आधारित शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.

नवोदय विद्यालय समिती (NVS)

राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 अंतर्गत 1986 मध्ये सुरू झालेली नवोदय विद्यालय समितीची सुरुवात सीबीएसईशी संलग्न असलेल्या 2 प्रायोगिक शाळांसह झाली. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीची पर्वा न करता निवासी, सह-शिक्षण पद्धतीने, मोफत आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा या विद्यालयांचा मुख्य उद्देश आहे.

ऑक्टोबर 2025 पर्यंत, देशभरात 662 नवोदय विद्यालये कार्यरत आहेत.

सर्व नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जातो. या शाळांमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार बहुभाषिकता आणि सांस्कृतिक एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्रि-भाषा सूत्र (प्रादेशिक भाषा, हिंदी/इंग्रजी आणि विद्यार्थ्यांच्या स्थलांतराशी संबंधित तिसरी आधुनिक भारतीय भाषा) अमलात आणले जाते.

शहरी लाभ विरुद्ध ग्रामीण सशक्तिकरण: केव्हीएस आणि एनव्हीएसच्या पायाभूत सुविधांची वास्तविकता

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती या दोन्ही संस्था सीबीएसई’च्या मानकांनुसार विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि क्रीडांगणे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्राधान्यानुसार पायाभूत रचना वेगळी दिसून येऊ शकते. म्हणजेच, केव्हीएस - शहरी सुलभतेचा फायदा घेत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, तर, एनव्हीएस - आत्मनिर्भरतेसाठी ग्रामीण व्यवस्थांना बळकट करत आहे.

पैलू

 

केव्ही (केंद्रीय विद्यालय)

 

एनव्ही (नवोदय विद्यालय)

 

शाळांची संख्या

 

1,290 [2]

 

689 मंजूर (प्रत्येक जिल्ह्यात एक, पूर्णपणे निवासी)

 

विद्यार्थी क्षमता

 

13,71,306 [3]

 

3,10,517 (दि. 30.09.2025 पर्यंत)

 

सुविधांवर भर

 

डिजिटल भाषा प्रयोगशाळा, ई-वर्गखोल्या[4]

 

डिजिटल दरी भरून काढण्यासाठी स्मार्ट वर्गखोल्या; डिजिटल भाषा प्रयोगशाळा

 

भौगोलिक विस्तार

 

शहरी/निमशहरी भाग [5]

 

ग्रामीण भागातील दुर्गम जिल्हे (दुर्गम जिल्ह्यांचा समावेश) [6]

 

 

निधीची पायाभरणी: धोरणात्मक वाटपाद्वारे शाश्वत वाढ

केंद्रीय विद्यालय संघटनेच्या शाळांच्या कार्यात सातत्य राखण्यासाठी आणि विस्तारासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा अर्थसंकल्पीय सहाय्य दिले जाते.

 

नवोदय विद्यालयांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये निवासी संचालन आणि ग्रामीण बांधकामाला प्राधान्य दिले जाते, ज्यात 2024-25 साठी अनुदान म्हणून 5370.79 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, 1 एप्रिल 2024 रोजीचा सुरुवातीचा शिल्लक असलेला 585.34 कोटी रुपयांचा निधी देखील 2024-25 या वर्षात वापरण्याची परवानगी देण्यात आली होती, तसेच या वर्षात 44.70 कोटी रुपयांची अंतर्गत प्राप्ती देखील झाली. अशा प्रकारे, 2024-25 या वर्षात नवोदय विद्यालयांकडे एकूण 6000.83 कोटी रुपये उपलब्ध होते.

2025 मधील टप्पे: विस्ताराला गती आणि डिजिटल प्रगतीला चालना

2025 मध्ये, केव्हीएस आणि एनव्हीएस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पायावर आधारित, आपल्या धोरणात्मक वाढीची आणि तंत्रज्ञानाच्या समावेशाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. हे बदल केवळ भौतिक क्षमताच वाढवत नाहीत, तर विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या हेतूने नवीन अध्यापन पद्धती देखील रुजवल्या जात आहेत.

1 ऑक्टोबर 2025 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात 57 नवीन नागरी क्षेत्रातील केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली. यासाठी 2026-27 पासून पुढील नऊ वर्षांच्या कालावधीत सुमारे 5,862.55 कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे. एकूण निधीपैकी भांडवली खर्चासाठी (जमीन, इमारती, उपकरणे) 2,585.52 कोटी रुपये आणि परिचालन खर्चासाठी 3,277.03 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत[7]. या उपक्रमाद्वारे वंचित जिल्ह्यांना लक्ष्य केले जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता वाढेल तसेच बहुभाषिकता आणि कौशल्य समावेशन यांसारख्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) उद्दिष्टांना बळकटी मिळेल. याला पूरक म्हणून, 'पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया' (PM SHRI) योजनेअंतर्गत 913 केंद्रीय विद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे[8][9]. या शाळांना आदर्श संस्थांमध्ये रूपांतरित करण्यात आले. या संस्थांमध्ये कृती-आधारित शिक्षण केंद्रे, डिजिटल संसाधन केंद्रे आणि नेतृत्व विकास कार्यक्रम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाची अंमलबजावणी होईल.

नवोदय विद्यालयांसाठी, 6 डिसेंबर 2024 रोजी, सरकारने 2024-2025 ते 2018 2019 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 2,359.82 कोटी रुपयांच्या खर्चातून 28 नवीन नवोदय विद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली. यामध्ये 1,944.19 कोटी रुपये भांडवली खर्च तर 415.63 कोटी रुपयांचा परिचालन खर्च समाविष्ट आहे.[10] [11].

डिजिटल पहाट: तंत्रज्ञानाद्वारे वर्गांना सक्षम करणे

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती या दोन्ही संस्थांच्या शाळांनी 2025 मध्ये अत्याधुनिक डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत, तसेच शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यासाठी पीएम श्री योजनेच्या समन्वयाचा लाभ घेतला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये अद्ययावत करण्यात आलेली केव्हीएसच्या सर्वसमावेशक माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (ICT) आराखड्या अंतर्गत 90% शाळांना स्मार्ट क्लासरूम, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित अनुकूल शिक्षण साधने आणि व्हर्च्युअल लॅब उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे दीक्षा (DIKKSHA) प्लॅटफॉर्मद्वारे एनईपी-अनुरूप वैयक्तिकृत सामग्रीसह संमिश्र पद्धतीने सत्रे घेणे शक्य झाले आहे. [12].

नवोदय विद्यालय स्मार्ट क्लासरूमद्वारे या वचनबद्धतेला बळकटी देत आहे. सध्या, नवोदय विद्यालयांमध्ये प्रयोगशाळांसह एकूण 9,417 स्मार्ट क्लासरूमची स्थापना करण्यात आली आहे. 311 नवोदय विद्यालयांमध्ये समर्पित लीज्ड लाइन इंटरनेट कनेक्शन आहे आणि उर्वरित नवोदय विद्यालयांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे. याव्यतिरिक्त, कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये असलेल्या सर्व नवोदय विद्यालयांमध्ये एक समर्पित संगणक प्रयोगशाळा आहे. माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, एनव्हीएस प्रत्येक नवोदय विद्यालयाच्या गरजेनुसार डेस्कटॉप/लॅपटॉप प्रदान करण्याचे काम करत आहे. सध्या, प्रत्येक नवोदय विद्यालयात सरासरी 40 डेस्कटॉप असून सर्व नवोदय विद्यालयांमध्ये मिळून सुमारे 26,118 डेस्कटॉप उपलब्ध आहेत. पीएम श्री प्रकल्पांतर्गत 312 डिजिटल भाषा प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच सीबीएसई सीएसआर प्रकल्पांतर्गत 100 इंग्रजी आणि 100 हिंदी भाषा प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे.

पीएम श्री योजना: केव्हीएस आणि एनव्हीएसला एनईपी उत्कृष्टतेकडे घेऊन जाणारी योजना

2025 च्या विस्ताराच्या आणि डिजिटल एकात्मतेच्या गतीवर आधारित, 'प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री) योजना एक परिवर्तनकारी आधारस्तंभ म्हणून उभी आहे. ही योजना निवडक केव्हीएस आणि एनव्हीएस संस्थांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 चे आदर्श नमुने म्हणून उन्नत करत आहे. 2022 मध्ये 27,360 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह [13] [14] सुरू झालेल्या या योजनेत 2022-27 या पाच वर्षांत 2027 पर्यंत 14,500 हून अधिक शाळांना सर्वांगीण शिक्षण केंद्रांमध्ये रूपांतरित करणे आहे. या शाळा जवळपासच्या संस्थांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP) समानता, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देतील. बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, अनुभवाधारित शिक्षण आणि शाश्वत पद्धतींचा समावेश करून, पीएम श्री योजना पायाभूत सुविधांमधील आणि अध्यापनशास्त्रीय त्रुटी दूर करते, परिणामी केंद्रीय विद्यालय संघटनेची (KVS) शहरी-केंद्रित स्थिरता आणि नवोदय विद्यालयांचे (NVS) ग्रामीण सक्षमीकरण सर्वसमावेशक शिक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत बनते.

सामर्थ्याचा समन्वय: केव्हीएस आणि एनव्हीएसवर पीएम श्री योजनेचा सकारात्मक प्रभाव

केव्हीएसमध्ये, पीएम श्री योजनेत केलेल्या सुधारणांमुळे 913 शाळांमध्ये [15] प्रगत अध्यापन पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे बदली होणाऱ्या आणि बदली न होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सेवा देण्यामध्ये के व्ही एस संस्थेची भूमिका अधिक बळकट झाली आहे. यामुळे, कृती-आधारित शिक्षण, डिजिटल संसाधने आणि नेतृत्व विकास संधींनी समृद्ध असे गतिमान शिक्षण वातावरण तयार होते. इको-क्लब आणि व्यावसायिक प्रयोगशाळा यासारख्या सुविधांमुळे मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरतेवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेला भर प्रत्यक्षात अमलात येतो. आता बहुतेक पीएम श्री केव्ही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि वैयक्तिकृत शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने उपलब्ध असून शहरी केंद्रांमधील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे [16].

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, जवळपास सर्वच नवोदय विद्यालयांना पीएम श्री शाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे, सध्या शाळांची संख्या 620 [17] असून, त्या आदर्श संस्था म्हणून काम करत आहेत आणि इतर शाळांसाठी एक आदर्श निर्माण करत आहेत [18]. ही योजना ग्रामीण गुणवंत विद्यार्थ्यांच्या संवर्धनाला नव्या शैक्षणिक धोरणाच्या समतेच्या दृष्टिकोनाशी जोडत आहे. नवोदय विद्यालये आता डिजिटल कौशल्य केंद्रे, नवोन्मेष केंद्र आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांनी सुसज्ज होत आहेत. हे सहकार्य शैक्षणिक परिणाम सुधारते आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देते. परिणामी, केव्हीएस आणि एनव्हीएस कुशल, एकसंध भारताच्या निर्मितीमध्ये अग्रणी ठरत आहेत.

पायाभूत शिक्षण सर्वप्रथम: केव्हीएस, एनव्हीएस आणि बालवाटिका आराखड्यात प्रारंभिक शिक्षणाचे एकत्रीकरण

जसे डिजिटल आणि पायाभूत सुविधांमधील प्रगती उच्च-स्तरीय शिक्षणाला बळकटी देत आहे, त्याचप्रमाणे प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षण (ECCE) हा शिक्षणाचा मजबूत पाया ठरतो आहे. हे KVS ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या 3-8 वर्षे वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाशी जोडते, ज्यामुळे संज्ञानात्मक, सामाजिक-भावनिक आणि शारीरिक वाढ साधली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत, प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र आराखड्याद्वारे (NCPFECCE) खेळ-आधारित, बहुभाषिक ECCE अभ्यासक्रम राबवणे अनिवार्य आहे. यात तिसऱ्या इयत्तेपर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्यावर भर दिला जातो, तसेच 2030 पर्यंत सर्वांसाठी सार्वत्रिक प्रवेशाचे लक्ष्य ठेवले आहे. हा पायाभूत टप्पा केंद्रीय शाळांच्या परिसंस्थेमध्ये सहजपणे समाकलित होत असून तो छोट्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करतो आणि वंचित भागातील समतेच्या प्रश्नाला उत्तर देतो.

बाल मनांचे संगोपन: केव्हीएस मधील बालवाटिकेची भूमिका आणि एनव्हीएस सोबत व्यापक ईसीसीई समन्वय

केव्हीएस आपल्या बालवाटिका कार्यक्रमाद्वारे प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी ठरली आहे. सध्या 505 केंद्रीय विद्यालय मध्ये बाल वाटिका कार्यरत असून येथे कृती आधारित मॉड्यूल्सद्वारे (खेळ, कला आणि मूलभूत साक्षरतेचे मिश्रण) विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारी कौशल्यांवर भर दिला जातो. औपचारिक शालेय शिक्षणापूर्वीचा हा तणावमुक्त प्रारंभिक टप्पा हजारो मुलांना लाभ देत आहे. [19] [20]. अलीकडील विस्तारांमध्ये, 2025 मध्ये मंजूर झालेल्या 57 नवीन केंद्रीय विद्यालयांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासूनच बालवाटिका समाविष्ट करण्यात येत असून प्रति शाळा 240 विद्यार्थी (बालवाटिका I, II आणि III) या निकषानुसार 13,680 विद्यार्थ्यांची अतिरिक्त क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील 5+3+3+4 संरचनेला अधिक बळकटी मिळत असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण देत सर्वसमावेशकतेला चालना देते [21] [22].

एनव्हीएस प्रामुख्याने इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असली तरी, ते प्रवेश-स्तरीय अभ्यासक्रमांमध्ये मूलभूत कौशल्य पूर्तता समाविष्ट करून ते ईसीसीईला पूरक ठरते. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची दरी भरून काढण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून व्यावसायिक आणि डिजिटल परिचयाद्वारे प्रारंभिक कौशल्यांवर आधारित आहे. परिणामी, बाल वाटिकेतून तयार झालेले विद्यार्थी गुणवत्ताधारित पद्धतीने नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतात, यामुळे दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकास साधला जातो. हा एकात्मिक दृष्टिकोन समान पायाभूत शिक्षणाची खात्री देतो, ज्यामुळे दोन्ही प्रणालींमधील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञान-आधारित भविष्यासाठी सक्षम केले जाते.

निष्कर्ष: भारताच्या उज्वल भविष्यासाठी एकसंध शैक्षणिक वारसा घडवणे

एकूणात, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती या संस्था समान, परिवर्तनकारी शिक्षणाप्रती भारत सरकारची दृढ बांधिलकी स्पष्टपणे दर्शवतात. शहरी सुलभता आणि ग्रामीण सक्षमीकरण यांचा समन्वय साधून 2025 मध्ये 16.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देणारी ही यंत्रणा उभी आहे. 1963 मध्ये स्थापन झालेल्या केव्हीएस ने अखंड शैक्षणिक सातत्य सुनिश्चित केले तर 1986 मध्ये सुरू झालेल्या एनव्हीएस ने ग्रामीण भारतातील गुणवत्ताधारित संधींना चालना दिली. मजबूत पायाभूत सुविधा, धोरणात्मक निधी तसेच 2025 मधील नियोजित दिसतात – 57 नवीन केंद्रीय विद्यालये आणि 28 नवोदय विद्यालये - त्यांच्या माध्यमातून दोन्ही संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांगीण, कौशल्य आधारित शिक्षण दृष्टीला प्रत्यक्षात आणत आहे. पीएम श्री अंतर्गत 1,213 शाळांमध्ये केलेल्या सुधारणा आणि बालवाटिकांच्या माध्यमातून ईसीसीई (ECCE) च्या एकात्मिकरणाच्या बळावर या संस्था डिजिटल दरी कमी करत आहेत, राष्ट्रीय एकात्मता वाढवत आहेत आणि भविष्यातील नेत्यांना घडवत आहेत. यामुळे प्रत्येक मूल एका चैतन्यमयी, सर्वसमावेशक भारताच्या उभारणीत योगदान देईल याची खात्री होते.

संदर्भ:

पत्र सूचना कार्यालय:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2173548

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2081688

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2091737

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1857410

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2173548#:~:text=State/UTs/Ministries/Departments,13.62%20lakh%20(approx.)

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2081688#:~:text=As%20on%20date%2C%20there%20are,education%20is%20accessible%20to%20all

https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1857409

केंद्रीय विद्यालय संघटन:

https://www.facebook.com/KVSHQ/

https://kvsangathan.nic.in/%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%b5%e0%a4%82-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d/

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s32d2ca7eedf739ef4c3800713ec482e1a/uploads/2024/02/2024021425.pdf

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s32d2ca7eedf739ef4c3800713ec482e1a/uploads/2023/11/2023112463.pdf

https://kvsangathan.nic.in/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2/

https://kvsangathan.nic.in/en/bal-vatika/

https://kvsangathan.nic.in/en/admission-guidelines/

https://kvsangathan.nic.in/en/ict-infrastructure/

https://kvsangathan.nic.in/en/pm-shri-schools/

https://kvsangathan.nic.in/

https://kvsangathan.nic.in/en/kvs-vision-and-mission/

https://kvsangathan.nic.in/en/syllabus/?_archive=1

https://balvatika.kvs.gov.in/participated-kendriya-vidyalaya

https://bsfbagafa.kvs.ac.in/en/bal-vatika/#:~:text=Balvatika%20in%20Kendriya%20Vidyalayas%20(KVs,foundational%20base%20for%20lifelong%20learning

https://balvatika.kvs.gov.in/participated-kendriya-vidyalaya

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3kv059b7bb73d948b38d0ac3e1f8f5515/uploads/2024/07/2024070674.pdf

नवोदय विद्यालय समिति:

https://navodaya.gov.in/nvs/nvs-school/GODDA/en/academics/Computer-education-ICT/

https://navodaya.gov.in/nvs/en/About-Us/Establishment-of-JNVs/

https://navodaya.gov.in/nvs/en/Academic/Student-Profile/

https://navodaya.gov.in/nvs/nvs-school/DHANBAD/en/academics/Computer-education-ICT/

https://navodaya.gov.in/nvs/en/Academic/Academic-Excellance/

https://navodaya.gov.in/nvs/en/About-Us/Vision-Mission/#:~:text=Navodaya%20Vidyalaya%20Scheme,the%20best%20of%20rural%20talent

पीएम श्री:

https://pmshrischools.education.gov.in/

शिक्षण मंत्रालय:

https://dsel.education.gov.in/en/pm-shri-schools

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ:

https://cbseacademic.nic.in/web_material/Curriculum16/SrSecondary/Initial%20pages.pdf

इतर:

https://news.samsung.com/in/samsung-smart-school-to-take-digital-education-to-less-privileged-students-in-remotest-parts-of-india-with-smart-classes-at-80-more-navodaya-schools#:~:text=JNV%20schools%20are%20run%20by,digital%20literacy%20to%20rural%20India.%E2%80%9D

शहरी केंद्रांपासून ग्रामीण क्षेत्रांपर्यंत

(रिलीज आयडी : 10874) 

हर्षल आकुदे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

(Explainer ID: 156551) आगंतुक पटल : 41
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Kannada
National Portal Of India
STQC Certificate