Social Welfare
सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या दिशेने
आयुष्मान भारत प्रधानमंत्री-जन आरोग्य योजना
Posted On:
01 NOV 2025 11:27AM
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2025
ठळक मुद्दे:
- आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेवाय) ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य सेवा योजना आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- एबी-पीएमजेवाय, सात वर्षांपूर्वी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती.
- एबी-पीएमजेएवाय, 12 कोटींहून अधिक असुरक्षित कुटुंबांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा परवडण्याजोगी बनवते.
- 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत, एबी-पीएमजेएवाय लाभार्थ्यांसाठी 42 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आली.
- या योजनेत 86 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे.
- हा आयुष्मान भारत योजनेचा एक भाग असून त्याचे अनेक घटक आहेत. सार्वत्रिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे सर्व घटक एकत्रितपणे परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देतात.
परिचय
आरोग्य सेवेमधील गुंतवणूक जनसमुदायांना अधिक लवचिक, सक्षम आणि उत्पादक बनवते. सार्वत्रिक आरोग्य सेवा सर्वात असुरक्षित कुटुंबांसह, सर्वांना परवडणारी, दर्जेदार आरोग्य सेवेच्या उपलब्धतेची खात्री देते आणि त्यांना निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवते.
भारताच्या आर्थिक विकासाचा आलेख उंचावत असताना, केंद्र सरकार "सबका साथ, सबका विकास" ला अनुसरून, परवडणारी सार्वत्रिक आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जेणेकरून नागरिकांना चांगले आरोग्य आणि कल्याणचा लाभ होऊ शकेल आणि ते विकसित भारत @2047 निर्माण करू शकतील.
सार्वत्रिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सरकारने 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) सुरू केली. ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य सेवा असून, यामध्ये असुरक्षित गटातील कोट्यवधी भारतीय कुटुंबांनी नोंदणी केली आहे.
भारतात पारंपरिक संसर्गजन्य रोगांबरोबरच जीवनशैलीशी निगडीत असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 हे तंत्रज्ञानाची प्रगती, सामाजिक-आर्थिक परिस्थितीमधील सुधारणा आणि आजारांच्या पद्धतींमधील बदल, यासारख्या भारतातील आरोग्यसेवेपुढील बदलत्या आव्हानांवर उपाय सुचवते. या धोरणाच्या अनुषंगाने, एबी-पीएमजेएवाय हा 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोठ्या आयुष्मान भारत योजनेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समन्यायी आरोग्य कवच प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला हा एक आरोग्य विषयक उपक्रम आहे.
आयुष्मान भारत अंतर्गत इतर आधारस्तंभ:
एबी-पीएमजेएवाय हा 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोठ्या आयुष्मान भारत योजनेचा एक प्रमुख आधारस्तंभ असून, विशेषत: ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समन्यायी आरोग्य कवच प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला हा आरोग्य उपक्रम आहे.
आयुष्मान भारत अंतर्गत इतर आधारस्तंभांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
- आयुष्मान आरोग्य मंदिर नागरिकांना त्यांच्या घराजवळ अथवा फोन कॉलद्वारे प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची खात्री देते.
- आयुष्मान भारत डिजिटल मिशन ग्रामीण भागातील दवाखान्यांपासून ते मोठ्या रुग्णालयांपर्यंत सर्व आरोग्य सुविधा डिजिटली जोडते. देशातील एकात्मिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. ते आरोग्यसेवा परिसंस्थेच्या विविध भागधारकांना डिजिटल महामार्गांद्वारे जोडेल.
- पीएम-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान 2021 मध्ये सुरू करण्यात आले असून, ते ग्रामीण आरोग्य केंद्रांपासून, ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत मजबूत आरोग्य सेवा क्षमता निर्माण करते.
आयुष्मान भारत योजनेमुळे तिन्ही पातळ्यांवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होते- प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीतील.

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
एबी-पीएमजेएवाय नोंदणीकृत सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना द्वितीयक आणि तृतीयक देखभाल सेवा आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा संरक्षण प्रदान करते, यामुळे आवाक्याबाहेरील वैद्यकीय बिलांपासून त्यांचा बचाव होतो. ही योजना सरकारी अनुदानित आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळवून देते.

एबी-पीएमजेएवाय योजनेची प्रगती
भारतीय आर्थिक सर्वेक्षण (2024-25) अहवालानुसार, एबी-पीएमजेएवाय सुरू झाल्यापासून लाभार्थी कुटुंबांची आरोग्य सेवेवरील खर्चात 1.52 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे.
योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आयुष्मान कार्डनुसार 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत 42 कोटींहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. 70 वर्षांवरील 86.51 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना (व्हीव्हीएस) कार्ड देण्यात आली आहेत. देशभरातली 17,685 सार्वजनिक आणि 15,380 खासगी रुग्णालयांसाह, एकूण 33,000 हून अधिक रुग्णालये, एबी-पीएमजेएवाय अंतर्गत सूचीबद्ध करण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत (28 ऑक्टोबर 2025 पर्यंत) लाखो लोकांनी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
|
Speciality Name
|
Total Count
|
Total Amount in Rupees
|
|
General Medicine
|
21741389
|
183725535263
|
|
Ophthalmology
|
4499544
|
25218529234
|
|
Medical Oncology
|
4141188
|
45971190452
|
|
Obstetrics & Gynaecology
|
3564071
|
26921505469
|
|
General Surgery
|
3334123
|
51359883676
|
|
Orthopaedics
|
2445678
|
81185282099
|
|
Urology
|
1995470
|
36603974579
|
|
Emergency Room Packages (Care requiring less than 12 hrs stay)
|
1976059
|
3097080136
|
|
Cardiology
|
1282206
|
86730606349
|
|
Neo-natal Care
|
1104752
|
23200653194
|
एबी-पीएमजेएवाय- अर्थसंकल्पीय तरतूद
या योजनेला केंद्र सरकार आणि संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांकडून संपूर्ण अर्थसहाय्य दिले जात असून, अंमलबजावणीचा खर्च परस्परांमध्ये वाटून घेतला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अंदाजात वाढ झाली असून, 2025-26 साठी 9,406 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतुदीचा अंदाज आहे.
एबी-पीएमजेएवाय साठी गेल्या काही वर्षांमधील अर्थसंकल्पीय तरतूद:
|
Financial Year
|
Budget Estimate (in crore rupees)
|
|
2019-20
|
6,556
|
|
2020-21
|
6,429
|
|
2021-22
|
6,401
|
|
2022-23
|
7,857
|
|
2023-24
|
7,200
|
|
2024-25
|
7,500
|
|
2025-26
|
9,406
|
आयुष्मान आरोग्य मंदिरे
आयुष्मान आरोग्य मंदिरे (एएएम), हा आयुष्मान भारत योजनेचा दुसरा प्रमुख आधारस्तंभ असून, यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा सुलभ उपलब्ध झाली असून, नागरिकांच्या घराजवळ पोहोचली आहे. माता आणि बाल आरोग्य सेवांच्या पलीकडे, विस्तारित सेवा प्रदान करणे, हे याचे उद्दिष्ट असून, यात असंसर्गजन्य आजारांवर उपचार, पॅलिएटिव्ह केअर आणि पुनर्वसन सेवा, तोंड, डोळे आणि कान-नाक-घसा (ईएनटी) सेवा, मानसिक आरोग्य आणि आपत्कालीन आणि ट्रामा, यावरील प्राथमिक स्तरावरील काळजी, मोफत आवश्यक औषधे आणि निदान सेवा, याचा समावेश आहे.
प्राथमिक आणि उप-आरोग्य सेवा केंद्रांसह सर्व एएएम, पुढील आवश्यक संसाधनांनी सुसज्ज आहेत:
- अद्ययावत पायाभूत सुविधा
- अतिरिक्त मनुष्यबळ
- अत्यावश्यक औषधे आणि निदान
- आयटी प्रणाली, इ.
ग्रामीण भागांसह देशभरातील सर्व कार्यरत एएएम मध्ये टेलिकन्सल्टेशन सेवा देखील उपलब्ध आहेत. एएएममध्ये (सप्टेंबर 2025 पर्यंत) 39.61 कोटींहून अधिक टेलिकन्सल्टेशन करण्यात आली.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन
एबीएचए आरोग्य सेवा परिसंस्थेतील लोकांसाठी ‘विशिष्ट’ आरोग्य ओळख क्रमांक तयार करते. यामुळे आरोग्यसेवेच्या विविध स्तरांवर अखंड काळजी घेणे आणि दुर्गम आणि ग्रामीण भागांसह सर्वत्र सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे शक्य होते.
योजनेची प्रगती (5 ऑगस्ट 2025 पर्यंत):
- 79,91,18,072 आभा (एबीएचए) खाती तयार करण्यात आली
- एचएफआरवर 4,18,964 आरोग्य सुविधांची नोंदणी
- 6,79,692 आरोग्य सेवा व्यावसायिकांची एचपीआर वर नोंदणी
- 67,19,65,690 आरोग्य नोंदी आभा (एबीएचए) बरोबर जोडण्यात आल्या
पीएम-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान
कोविड-19 दरम्यान, भारत सरकारने ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा अवलंब करून त्वरित प्रतिसाद दिला. या साथरोगाने हे दाखवून दिले की, भारतातील आरोग्य व्यवस्थांना स्थानिक दवाखान्यांपासून ते मोठ्या रुग्णालयांपर्यंत सर्व स्तरांवर चांगल्या सुविधांची आवश्यकता आहे. ही तफावत दूर करण्यासाठी, 25 ऑक्टोबर 2021 रोजी 2021-22 च्या अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून पीएम-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन (पीएम-एबीएचआयएम) सुरू करण्यात आले. शहरे आणि खेड्यांमधील आरोग्याच्या पायाभूत सुविधा, रोग निरीक्षण आणि आरोग्य संशोधनातील गंभीर तफावत दूर करणे, हे पीएम-एबीएचआयएमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, जेणेकरून भारत भविष्यातील साथरोग स्वतंत्रपणे हाताळू शकेल. 2005 पासूनची ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा योजना असून, या अंतर्गत 2021-2026 या कालावधीसाठी 64,180 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आली आहे. या रक्कमेपैकी 54,205 कोटी रुपये राज्यस्तरीय कार्यक्रमांसाठी तर 9,340 कोटी रुपये केंद्रीय कार्यक्रमांसाठी देण्यात आले आहेत. भारतातील रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य संशोधन सुविधा अद्ययावत करण्यासाठी, भविष्यातील आरोग्य विषयक आणीबाणीसाठी देशाला अधिक चांगल्या प्रकारे सज्ज करण्यासाठी ही 5 वर्ष कालावधीची मोठी योजना राबवली जात आहे.
आयुष्मान भारत योजना: कामगिरीचा आढावा
2025 पर्यंत योजनेची प्रगती:
2022-23 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आयुष्मान आरोग्य मंदिरांचा विकास आणि परिचालनावर एकत्रितपणे 5,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

निष्कर्ष
एबी-पीएमजेएवाय, समाजातील असुरक्षित घटकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळण्याची खात्री देते आणि आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्यसेवा लोकांच्या घराजवळ आणतात. आभा (एबीएचए- आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) योजना प्रत्येक नागरिकाला सर्व सुविधांमध्ये त्याच्या आरोग्याच्या नोंदी अखंडपणे राखून ठेवण्यासाठी एक विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्र प्रदान करते. पीएम-एबीएचआयएम, गावापासून जिल्हा स्तरापर्यंत रुग्णालये, प्रयोगशाळा आणि आरोग्य केंद्रे, या पायाभूत सुविधांना बळकटी देते, जेणेकरून ही प्रणाली दर्जेदार आरोग्य सेवा देऊ शकेल आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देऊ शकेल. आयुष्मान भारत आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत या योजना एकत्रितपणे परवडणाऱ्या, चांगल्या दर्जाच्या आणि व्यापक आरोग्यसेवा प्रदान करतात, ज्यामुळे सर्वांसाठी सार्वत्रिक आरोग्य कवच सुनिश्चित होते.
संदर्भ
- रांची येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
- झारखंड: https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1547032
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथे आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (एबी-पीएमजे) शुभारंभ:
https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1546948#:~:text=Ayushman
%20Bharat%20%E2%80%93Pradhan%20Mantri%20Jan,to%20a%20new%20aspirational% 20level
पीडीएफ फाइलसाठी येथे क्लिक करा:
(रिलीज आयडी : 10867)
नितीन फुल्लुके / राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर
(Explainer ID: 156547)
आगंतुक पटल : 44
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Nepali
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada