Social Welfare
भारतातील अभिजात भाषा
भारताच्या भाषिक वारशाचे जतन
Posted On:
27 OCT 2025 10:02AM
मुख्य मुद्दे
* भारत सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना 03 ऑक्टोबर 2024 रोजी‘अभिजात भाषेचा’ (Classical Language) दर्जा प्रदान केला.
* ऑक्टोबर 2025 पर्यंत, एकूण 11 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
* यापूर्वी सहा भारतीय भाषांना — तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया — या भाषांना 2004 ते 2024 दरम्यान अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.
प्रस्तावना
भारतीय अभिजात भाषा

भारताला एक समृद्ध, वैविध्यपूर्ण भाषिक वारसा लाभला आहे. येथे देशभरात अनेक भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. भारत सरकार विविध धोरणे, कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे देशाच्या भाषिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्य करते. यातीलच एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, ज्या भाषांची मुळे प्राचीन आहेत आणि ज्यांचा हजारो वर्षांचा साहित्य, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा भारताची सांस्कृतिक ओळख घडवतो, अशा भाषांना "अभिजात भाषेचा" दर्जा देणे. भारत सरकार विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या भाषांना "अभिजात भाषेचा" दर्जा देते आणि या भाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी मदत करते. 03 ऑक्टोबर 2024 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांचा या श्रेणीत समावेश करण्यास मान्यता दिली. त्यामुळे देशातील अभिजात भाषांची एकूण संख्या 11 झाली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा का महत्त्वाचा?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देणे म्हणजे त्या भाषेचे ऐतिहासिक महत्त्व, तिची परंपरा आणि भारताच्या संस्कृती तसेच ज्ञानपरंपरेवर झालेला तिचा खोलवर प्रभाव याचा सन्मान करणे. या भाषांनी हजारो वर्षांपासून प्राचीन ज्ञान, तत्त्वज्ञान आणि मूल्यांचे जतन आणि प्रसार केला आहे, त्याला मान्यता देणे, संवर्धन करणे आहे. हा दर्जा मिळाल्याने केवळ भाषेचा मान वाढत नाही, तर या भाषांचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील अभ्यास करण्यासाठीच्या प्रयत्नांनाही बळ मिळते, ज्यामुळे त्या आजच्या जगातही प्रासंगिक राहतील.
कोणते घटक भाषेला "अभिजात" बनवतात?
भारत सरकारने, संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून आणि भाषिक तसेच इतिहास तज्ञांशी सल्लामसलत करून, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष निश्चित केले आहेत.
भाषेचे अभिजात भाषा म्हणून वर्गीकरण करण्यासाठी असलेले निकष खालीलप्रमाणे आहेत:
* त्या भाषेतील सुरुवातीच्या ग्रंथांची किंवा नोंदवलेल्या इतिहासाची अतिउच्च प्राचीनता, जी 1,500-2,000 वर्षांच्या कालावधीची असावी.
* प्राचीन साहित्यसंपदा किंवा ग्रंथभांडार, जो ती भाषा पिढ्यानपिढ्या बोलणाऱ्या लोकांसाठी वारसा मानला जातो.
* काव्य, शिलालेख आणि कोरीव पुरावे, या व्यतिरिक्त ज्ञान ग्रंथ, विशेषतः गद्य ग्रंथ उपलब्ध असणे.
* अभिजात भाषेचे आणि तिच्या साहित्याचे स्वरूप आजच्या भाषेपेक्षा वेगळे असू शकते. मूळ भाषेतून पुढे विकसित झालेल्या भाषेच्या नवीन स्वरूपांशी त्याचा तुटलेला संबंध - म्हणजेच सातत्याचा अभाव - दिसू शकतो.
भारताचा भाषिक वारसा विस्तारणे: 2024 मधील नवीन समावेश
तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, आणि ओडिया या सहा भाषांना 2004 ते 2014 दरम्यान अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली होती. 03 ऑक्टोबर 2024 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी, आणि बंगाली यांचा या श्रेणीत समावेश करण्यास मान्यता दिल्यामुळे मान्यताप्राप्त अभिजात भाषांची संख्या 11 झाली आहे.
मराठी
मराठी ही प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलली जाणारी इंडो-आर्यन (भारतीय आर्य) भाषा आहे. तिला एक हजार वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध साहित्य इतिहास लाभला आहे. अंदाजे 110 दशलक्ष मूळ भाषिक असलेल्या मराठीचा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख 15 भाषांमध्ये समावेश आहे.
मराठीची मुळे 2500 वर्षांहून अधिक जुनी असून, ती प्राचीन महरठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश मराठी यांसारख्या भाषांपासून विकसित झाली आहे. या भाषेमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले असले तरी, तिने विविध ऐतिहासिक टप्प्यांमध्ये तिचे सातत्य टिकवून ठेवले आहे.
● आधुनिक मराठी भाषेचा विकास, या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांमधून झाला, ज्याची सुरुवात सातवाहन युगात (2 रे शतक ई.स.पू. ते 2 रे शतक ई.स.) बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्री प्राकृत, या प्राकृत भाषेच्या बोलीतून झाली.
मराठी साहित्याचे योगदान
* गाथासप्तशती, ही सर्वात जुनी ज्ञात मराठी साहित्यकृती सुमारे 2000 वर्षांपूर्वीची आहे आणि ती प्रारंभिक मराठी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
* हे काव्यसंकलन सातवाहन राजा हाला यांनी संकलित केले असल्याचे मानले जाते आणि ते पहिल्या शतकात इ.स. मध्ये तयार झाले असावे. यानंतर, सुमारे आठ शतकांपूर्वी मराठी भाषेला एक परिपक्व भाषिक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उदयास आले.
* अनेक शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते आणि जुने धार्मिक ग्रंथ (पोथ्या) मराठीची समृद्ध ऐतिहासिक मुळे सुंदरपणे दर्शवतात.
* नाणेघाट शिलालेख हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शिल्प आहे. हा शिलालेख 2500 वर्षांपूर्वी होत असलेला मराठीचा वापर दर्शवतो.
* याव्यतिरिक्त, विनयपिटक, दीपवंस आणि महावंस यांसारख्या प्राचीन भारतीय लेखनांमध्ये, तसेच कालिदास आणि वररुची यांसारख्या प्रसिद्ध लेखकांच्या कामांमध्ये मराठीचा उल्लेख आढळतो.
* मराठीच्या साहित्यिक वारशामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांसारख्या संतांचे योगदान आदर्श आहे.
पाली
प्राचीन भारताच्या इतिहासाची पुनर्चना करण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण तिच्या साहित्यात भूतकाळावर प्रकाश टाकणारी मौल्यवान सामग्री आहे. अनेक पाली ग्रंथ आजही दुर्मीळ हस्तलिखितांमध्ये दडलेले आहेत, जे सहजप्राप्त नाहीत. श्रीलंका, म्यानमार, थायलंड हे देश आणि चटगाव (चित्तगांव) सारख्या प्रदेशांसह जपान, कोरिया, तिबेट, चीन आणि मंगोलिया यांसारख्या बौद्ध देशांमध्ये पालीचा अभ्यास आजही सुरू आहे.
पालीचे सर्वात जुने संदर्भ बौद्ध विद्वान बुद्धघोसांच्या भाष्यग्रंथांमध्ये (commentaries) आढळतात.
पाली भाषेचे साहित्यिक योगदान
पाली ही विविध बोलीभाषांनी विणलेली एक समृद्ध कलाकुसर आहे. प्राचीन भारतात बौद्ध आणि जैन पंथांनी त्यांची पवित्र भाषा म्हणून ती स्वीकारली होती.
सुमारे 500 इ.स.पू. मध्ये होऊन गेलेले भगवान बुद्ध यांनी आपले उपदेश देण्यासाठी पाली भाषेचा वापर केला, त्यामुळे त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्याचे ते एक महत्त्वाचे माध्यम बनले. संपूर्ण बौद्ध प्रमाणित साहित्य (canonical literature) पालीमध्ये लिहिले गेले आहे, ज्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्रिपिटक (Tipitaka -तीन टोपली) आहे.
* पहिली टोपली, विनय पिटक, बौद्ध भिक्खूंसाठी मठवासीय नियमांची रूपरेषा दर्शवते, नैतिक आचरण आणि सामुदायिक जीवनासाठी एक चौकट प्रदान करते.
* दुसरी टोपली, सुत्त पिटक, बुद्धांचे ज्ञान आणि तात्विक अंतर्दृष्टी समाविष्ट असलेली भाषणे आणि संवादांचा खजिना आहे.
* शेवटी, अभिधम्म पिटक नैतिकता, मानसशास्त्र आणि ज्ञान सिद्धांताशी संबंधित विविध विषयांचा सखोल अभ्यास करते, मन आणि वास्तविकतेचे गहन विश्लेषण सादर करते.
पाली साहित्यात जातक कथा येतात. या कथा म्हणजे बुद्धांच्या मागील जन्मांबद्दलच्या, बोधिसत्त्व म्हणून - म्हणजे भावी बुद्ध म्हणून-सांगितल्या जाणाऱ्या, पण ऐतिहासिकरीत्या प्रमाणित नसलेल्या गोष्टी. या कथा भारताच्या सर्व भागांना एकत्र जोडणाऱ्या, सर्वांनी सामायिक केलेल्या सांस्कृतिक परंपरांचा भाग आहेत. त्यात समान नैतिक मूल्ये आणि परंपरा दिसतात. एकत्रितपणे पाहता, या कथांमुळे भारतीय विचारसरणी आणि अध्यात्म जपण्यात पाली भाषेने निभावलेली महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते.
प्राकृत
मध्यम इंडो-आर्यन भाषांच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारी प्राकृत भाषा, भारताचा समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही प्राचीन भाषा (प्राकृत) अनेक आधुनिक भारतीय भाषांची पायाभूत भाषा आहे. याशिवाय, तिने भारतीय उपखंडाच्या इतिहासाला आकार देणाऱ्या विविध परंपरा आणि तत्त्वज्ञानांनाही अभिव्यक्त केले आहे. आदि शंकराचार्य म्हणतातः 'वाचः प्राकृत संस्कृतौ श्रुतिगिरो' - म्हणजे प्राकृत आणि संस्कृत या दोन्ही भाषा भारतीय ज्ञानपरंपरेच्या आणि विद्वत्तेच्या खऱ्या वाहक आहेत.
प्राकृत भाषेचे योगदान
प्राकृत भाषेला भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वानांमध्ये मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. पाणिनी, चंद, वररुची आणि सामंतभद्राचार्य यांसारख्या आचार्यांनी तिच्या व्याकरणाला आकार दिला. महात्मा बुद्ध आणि महावीर यांनी उपदेश देण्यासाठी प्राकृतचा वापर केला, त्यामुळे तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकला. तिचा प्रभाव प्रादेशिक साहित्यातही दिसतो. या भाषेतील नाट्य, काव्य आणि तत्त्वज्ञानावर आधारित साहित्यकृतींनी ज्योतिष, गणित, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र अशा अनेक क्षेत्रांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. प्राकृत भारतीय भाषाशास्त्र आणि बोलीभाषांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि तिला एक समृद्ध वारसा आहे. राष्ट्रभाषा (राष्ट्रीय भाषा) हिंदीची परंपरा प्राकृत-अपभ्रंशमधून विकसित झाली आहे. वैदिक भाषेतसुद्धा प्राकृत भाषेतील अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. त्यामुळे भारतातील भाषांची कशी प्रगती आणि त्यांत कसे बदल झाले - म्हणजेच भाषिक उत्क्रांती - हे समजून घेण्यासाठी प्राकृत भाषेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक ठरते. प्राकृत भाषेतील शिलालेख महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी मानले जातात. ते भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देतात. मौर्यपूर्व काळातील शिलालेख तसेच सम्राट अशोक आणि राजा खारवेल यांचे बहुतेक शिलालेख प्रामुख्याने प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत.
* आचार्य भरतमुनी यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथ 'नाट्यशास्त्र' मध्ये प्राकृत भाषेला बहुसंख्य भारतीयांची भाषा म्हणून मान्यता दिली आहे. ही भाषा कलात्मक अभिव्यक्तीने आणि सांस्कृतिक विविधतेने समृद्ध होती.
* ही मान्यता प्राकृत भाषेची सहजता आणि ती सामान्य लोकांमध्ये संवादाचे प्रमुख माध्यम होती हे स्पष्टपणे दाखवते.
हिंदी, बंगाली, मराठी यांसारख्या अनेक आधुनिक भाषांचे मूळ प्राकृत भाषेत आहे. त्यामुळे आधुनिक भारतीय भाषा कशा निर्माण झाल्या आणि कशा विकसित होत गेल्या - याची संपूर्ण सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी प्राकृत साहित्य समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
आसामी
आसामची अधिकृत भाषा (आसामी) ही मूळतः संस्कृतमधून विकसित झाली असून तिचा विकास ख्रिस्तपूर्व 7 व्या शतकापासून सुरू झाला. पण तिची (आसामीची) थेट पूर्वज भाषा, 'मागधी अपभ्रंश' ही होती. ही बोली प्राकृत भाषेशी खूप जवळची आणि तिच्यापासूनच विकसित झालेली होती. भाषाशास्त्रज्ञ जी.ए. ग्रिअरसन यांनी नमूद केले की, मागधी त्या प्रदेशाची प्रमुख बोली होती. मागधीसोबतच तिच्यासारखीच आणखी एक पूर्वेकडील बोली - प्राच्य अपभ्रंश - दक्षिण आणि आग्नेय दिशांना पसरली आणि पुढे ती भाषा विकसित होत जाऊन आजची बंगाली भाषा बनली. प्राच्य अपभ्रंश पूर्वेकडे विस्तारत असताना, ती गंगेच्या उत्तरेस ओलांडून आसामच्या खोऱ्यात पोहोचली आणि तिचे आसामीमध्ये रूपांतर झाले. आसामीचा सर्वात जुना नोंदवलेला उल्लेख कथा गुरुचरित मध्ये आढळतो. "ऑक्सोमिया" (Axomiya) या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल विविध अर्थ आहेत. काही विद्वान ते भौगोलिक वैशिष्ट्यांशी जोडतात, तर काही जण त्याला सहा शतके राज्य करणाऱ्या आहोम राजघराण्याशी जोडतात. महाभारतात ब्रह्मपुत्रा खोरे - ज्यात उत्तर बंगालचा भाग येतो - याला 'प्राग्ज्योतिषपूर' असे संबोधले आहे. तसेच चौथ्या शतकातील (ई.स.) समुद्रगुप्ताच्या स्तंभलेखात या प्रदेशाला 'कामरूप' असे म्हटले आहे. "आसाम" या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती "ऑक्सोम" (Axom) या, ब्रह्मपुत्रा खोरे दर्शवणाऱ्या शब्दापासून झाली आणि यातूनच त्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेला "आसामी" हे नाव मिळाले. आठव्या शतकाच्या इ.स. पर्यंत, आसामी भाषा आधीच विकसित झाली होती. आसामी, ओडिया आणि बंगाली या तिनही भाषांचा भाषिक वारसा समान आहे. त्या तिन्हींचे मूळ एकच, मागधी अपभ्रंश ही बोली आहे आणि त्या त्याच्यापासून विकसित झाल्या आहेत.
आसामी भाषेचे साहित्यिक योगदान
* पूर्व-आधुनिक आसामी लिपीचे सर्वात जुने नमुने‘चर्यापदे' या प्राचीन बौद्ध तांत्रिक ग्रंथांमध्ये दिसतात. हे ग्रंथ बौद्ध सिद्धाचार्यांनी इ.स. 8 वे ते 12 वे शतक या काळात रचले होते.
* चर्यापदे आसामी आणि इतर मागधी भाषांशी खूप जवळचे संबंध दर्शवतात. तसेच ती अनेक भारतीय भाषांच्या विकासाच्या टप्प्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात.
* चर्यापदांमधील शब्दसंग्रहात स्पष्टपणे आसामी शब्द समाविष्ट आहेत.
* याशिवाय, ध्वनीशास्त्र (phonetics) आणि आकारविज्ञान (morphology) या बाबतीत, चर्यापदांचा शब्दसंग्रह विशिष्ट आसामी शब्दांशी खूप जवळचा संबंध दर्शवतो, आणि त्यातील अनेक शब्द आजही आधुनिक आसामी आणि इतर भाषांमध्ये कायम आहेत.
बंगाली
बंगाली ही भारतातील अत्यंत महत्त्वाची भाषा असून, ती संपूर्ण भारतीय उपखंडाच्या संस्कृती आणि भाषेच्या इतिहासात मोठे स्थान राखून आहे. बंगाली भाषेत असे कवी, लेखक आणि विद्वान झाले आहेत, ज्यांनी केवळ बंगालची सांस्कृतिक ओळख घडवली नाही, तर भारतात राष्ट्रजागृती चेतवली. बंगाली भाषेतील सर्वात प्राचीन साहित्यकृतींचा उगम इ.स. 10 व्या ते 12 व्या शतकात आढळतो. संस्कृत महाकाव्यांच्या अगदी सुरुवातीच्या अनुवादांपासून ते 19 व्या आणि 20 व्या शतकातील क्रांतिकारी लेखनापर्यंत, बंगाली साहित्याने सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक चळवळींना संघटित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
● बंगाली, तसेच आसामी आणि ओडिया, त्याचप्रमाणे मागधी, मैथिली आणि भोजपुरी या भाषांचा एकत्रित समूह म्हणजे भारताच्या आग्नेय भागातील एक, भाषिक गट आहे. भाषेचा मुळ पाया मगध प्राकृतमध्ये आहे आणि तो भौगोलिकदृष्ट्या बिहार प्रदेशाशी संबंधित आहे.
● गौडा-बंगा (Gauda Banga) भाषा, इतर पूर्वेकडील भाषांसारखी, मागध अपभ्रंशातून विकसित झाली आहे.
● अनुवांशिकदृष्ट्या, बंगाली भाषा इंडो-आर्यन भाषांमधून उद्भवली आहे आणि ही इंडो-युरोपिय कुटुंबाच्या इंडो-इराणी शाखेच्या इंडिक उप-शाखेशी संबंधित आहे.
बंगाली भाषेचे साहित्यिक योगदान
प्राचीन बांगला भाषेचे सर्वात जुने विद्यमान साहित्यिक नमुने म्हणजे 47 अध्यात्मिक भजने. ही भजने चर्यापदे, म्हणून ओळखली जातात. ही चर्यापदे बौद्ध भिक्खूंनी रचली होती. चर्यापदांमध्ये केवळ धार्मिक / आध्यात्मिकच नाही तर भाषिक आणि साहित्यिक मुल्येही आहेत. या भजनांचे रचनाकार लुईपा, भुसुकुपा, कान्हपा आणि सवरपा हे होते.
सर्वात जुनी बंगाली साहित्य निर्मिती, 10व्या ते 12व्या शतकातील आहेत, आणि त्यांची सुरुवात मुख्यतः महान संस्कृत महाकाव्यांच्या अनुवादांपासून झाली. 16 वे शतक हे बंगाली समाज आणि साहित्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले, कारण या काळात चैतन्याने धार्मिक सुधारणा केल्या आणि रघुनाथ तसेच रघुनंदन यांनी पवित्र कायद्याचा प्रचार केला. पुढील शतकांमध्ये बंगाली साहित्याने मूळ रचनांचा उदय पाहिला. यामध्ये, अनेकदा 'बंगालचे चॉसर' गणले जाणारे मुकुंद राम, तसेच भारत चंद्र आणि राम प्रसाद यांसारखे साहित्यिक दिग्गज समाविष्ट आहेत.
* 19 वे शतक बंगाली साहित्यासाठी सुवर्णकाळ ठरले. यात राजा राम मोहन रॉय आणि ईश्वर चंद्र विद्यासागर यांसारख्या प्रभावी व्यक्तीमत्वांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
* संवाद कौमुदी, सोम प्रकाश आणि वंदे मातरम यांसारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे जनसमुदायाला संघटित करण्यात लेखणीची ताकद अधोरेखित झाली.
* बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगाली कथासाहित्याची (fiction) सुरुवात केली, तर रवींद्रनाथ टागोर, मायकल मधुसूदन दत्त, सुकांता भट्टाचार्य आणि काझी नजरुल इस्लाम यांसारख्या कवींनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या साहित्यिक क्रांतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
* नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 'जय हिंद' आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे 'वंदे मातरम' हे नारे देशभर घुमले आणि त्यांनी पिढ्यांना प्रेरणा दिली.
* आपले राष्ट्रगीत 'जन गण मन', रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे आणि आपले राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम', बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले आहे; ही दोन्ही गीते बंगाली कवींच्या सर्जनशीलतेतून जन्माला आली आहेत.
अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेली पाऊले
* अभिजात भाषांचा समावेश असलेल्या सर्व भारतीय भाषांचे संवर्धन केंद्रीय भारतीय भाषा संस्था, शिक्षण मंत्रालयाच्या भाषा विभागाद्वारे केले जाते. याव्यतिरिक्त, अभिजात भाषांच्या अभ्यास आणि संवर्धनासाठी, एकतर स्वतंत्रपणे किंवा केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत, विशेष केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
* 2020 मध्ये, संस्कृतच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी संसदेच्या कायद्याद्वारे तीन केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्यात आली. ती म्हणजे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली) आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती).
याव्यतिरिक्त, आदर्श संस्कृत महाविद्यालये आणि संशोधन संस्थांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
* सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT), या केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेची स्थापना, अभिजात तमिळ साहित्याचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी करण्यात आली आहे. ही संस्था प्राचीन तमिळ ग्रंथांचे भाषांतर सुलभ करते, संशोधनाला पाठबळ देते आणि विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्वानांसाठी अभिजात तमिळमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करुन देते.
* अभिजात भाषांच्या अभ्यास आणि जतनाला अधिक पाठबळ देण्यासाठी, कन्नड, तेलगू, मल्याळम, आणि ओडिया साठीच उत्कृष्टता केंद्रे (Centres for Excellence) देखील, कर्नाटकात म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहेत.
शास्त्रीय भाषा केंद्रांचे मुख्य उपक्रम आणि उद्दिष्टे
* भारताच्या अभिजात भाषा आणि साहित्याचे संवर्धन, प्रसार आणि जतन करणे.
* संशोधन आणि दस्तऐवजीकरण.
* राज्य संग्रहालये आणि अभिलेखागारांच्या (Archives) सहकार्याने हस्तलिखितांचे डिजिटलीकरण करणे.
* पुस्तके, संशोधन अहवाल आणि हस्तलिखित सूचिपत्र (कॅटलॉग) प्रकाशित करणे.
* अभिजात ग्रंथांचे भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर करणे.
* ध्वनीचित्र (ऑडिओ-व्हिज्युअल) दस्तऐवजीकरण: प्रख्यात विद्वान आणि अभिजात ग्रंथांवर माहितीपट तयार करणे.
* अभिजात भाषा, शिलालेख, पुरातत्व, मानववंशशास्त्र, नाणीशास्त्र आणि प्राचीन इतिहासाशी जोडणाऱ्या अभ्यासांना प्रोत्साहन देणे.
* आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिजात वारशाला पारंपरिक किंवा स्थानिक ज्ञानाशी जोडून, त्याचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास करणे किंवा त्या विषयावर विद्वानांसाठी अभ्यासक्रम तयार करणे.
चेन्नई येथील केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), तमिळ भाषेच्या अभिजात टप्याशी संबंधित विस्तृत संशोधन करत आहे. हा टप्पा प्रारंभिक कालावधीपासून 600 इ.स. पर्यंतचा आहे. यात तोलकाप्पियम - सर्वात प्राचीन अस्तित्वातील तमिळ व्याकरण ग्रंथ, नऱ्ऱिणै, पुऱनाऩूऱु, कार् नाऱ्पत्तु आणि इतर 41 प्राचीन तमिळ ग्रंथांचा समावेश आहे. हे केंद्र तमिळच्या प्राचीनतेचा अभ्यास करण्यासाठी अनेक शास्त्रांमध्ये पारंगत विद्वानांना सहभागी करुन घेत आहे. ते द्रविड तुलनात्मक व्याकरण आणि तमिळ बोलींचा अभ्यास यावर संशोधन करत आहे, जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये तमिळ अध्यासन स्थापन करत आहे, संस्था आणि संशोधकांना अल्प-मुदतीच्या संशोधन प्रकल्पांसाठी अनुदान (Grant-in-Aid) प्रदान करत आहे, आणि यासह अनेक उपक्रम राबवत आहे.
हे केंद्र प्राचीन तमिळ ग्रंथांचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत तिरुक्कुऱळ या ग्रंथाचे 28 भारतीय आणि 30 हून अधिक जागतिक भाषांमध्ये तसेच ब्रेल मध्ये अनुवाद करण्यात आला आहे. हे केंद्र अभिजात तमिळ ग्रंथांना ब्रेलमध्ये प्रकाशित करत आहे आणि एक अभिजात तमिळ शब्दकोश (thesaurus) संकलित करत आहे.
* सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल तेलगू (सीइएससीटी), या अभिजात तेलगू अभ्यास उत्कृष्टता केंद्राची ची स्थापना केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत झाली असून ते वेंकटचलम, एस.पी.एस.आर. नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथील परिसरा (कॅम्पस) मधून कार्य करते. सीइएससीटी ने अंदाजे 10,000 अभिजात महाकाव्यांची तपशीलवार माहिती असलेला माहितीसंग्रह (डेटाबेस) संकलित केला आहे. यात नाटके, आंध्र आणि तेलंगणातील मंदिरे, गाव नोंदी इत्यादींचा समावेश आहे. सर्व तेलगू शिलालेख संपादित करून "तेलगू शासनालू" नावाच्या पुस्तकात संकलित केले आहेत. पहिले तेलगू व्याकरण 'आंध्र शब्द चिंतामणी' आणि छंदशास्त्रावरील (prosody) अग्रगण्य ग्रंथ 'कविजनश्रमम' यांचे इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे.
* सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल कन्नड या अभिजात कन्नड अभ्यास उत्कृष्टता केंद्राची (सीइएससीके) ची स्थापना केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत झाली असून ते म्हैसूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये, म्हैसूर येथे कार्यरत आहे, आणि त्यासाठी स्वतंत्र ग्रंथालय, सांस्कृतिक प्रयोगशाळा तसेच नवीन परिषद (कॉन्फरन्स) सुविधा उपलब्ध आहेत.
सीइएससीके ने कृती आराखडा बैठका आणि आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे अभिजात कन्नडचा प्रसार करण्यासारखे विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. हे केंद्र- संशोधन, अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार- या चार मूलभूत क्षेत्रांमध्ये कार्य करते. या केंद्राने 7 पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि आणखी 22 पुस्तके प्रकाशनासाठी सज्ज आहेत. कवी-संत अन्नामाचार्य यांनी मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेले पहिले संगीत नोटेशन (लेखी चिन्ह लिपी) 'संकीर्तना लक्षणम' चे कन्नडमध्ये भाषांतर केले गेले आहे.
* सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल ओडिया या अभिजात ओडिया अभ्यास उत्कृष्टता केंद्राची (सीइएससीओ ) ची स्थापना केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत झाली असून ते भुवनेश्वर येथील ईस्टर्न रिजनल लँग्वेज सेंटर, या पूर्व प्रादेशिक भाषा केंद्रामध्ये स्थित आहे. हे केंद्र, अभिजात भाषा आणि साहित्याचा वारसा यांना प्रोत्साहन, त्यांचा प्रसार आणि जतन करण्यासाठी तसेच संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी कार्य करते. या केंद्राने ओडियासारख्या अभिजात भाषांच्या स्रोतांवर आधारित प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यात शिलालेखांचे विश्लेषण, भित्तिचित्रांचा भाषिक अभ्यास, पुरातत्व अवशेष, जुनी ताडपत्री हस्तलिखिते आणि विविध प्राचीन ग्रंथांमधून संदर्भ संकलित करणे यांचा समावेश आहे.
* सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल मल्याळम या अभिजात मल्याळम अभ्यास उत्कृष्टता केंद्राची (सीइएससीएम) स्थापना केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत झाली असून ते राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या थुंचथ एज्युथाचन मल्याळम युनिव्हर्सिटी, तिरूर, मलप्पुरम, केरळ येथे स्थापन करण्यात आले आहे.
निष्कर्ष
“विरासत भी, विकास भी' (वारसाही, विकासही) - पंतप्रधान मोदींचा हा प्रेरणादायक मंत्र भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान करताना आधुनिक, प्रगतीशील विकास साधण्याचा मूलभूत संदेश देतो. देशाच्या अभिजात भाषा - संस्कृत, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया - या दृष्टिकोनाची जिवंत प्रतीके म्हणून उभ्या आहेत. त्या आपल्या नागरी जीवनपद्धतीचा बौद्धिक आणि सांस्कृतिक खजिना प्रभावीपणे प्रकट करतात. याव्यतिरिक्त, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा सरकारचा निर्णय, भारताच्या बौद्धिक वारशाच्या निर्मितीत या भाषांनी बजावलेल्या अमूल्य आणि ऐतिहासिक भूमिकेची सखोल दखल घेतो. सरकारच्या प्रयत्नांमुळे संस्था, विद्वान आणि तरुण पिढीला आपल्या प्राचीन परंपरांशी अधिक घट्टपणे जोडले जाणे शक्य झाले आहे. या भाषांचे भावी पिढ्यांसाठी जतन करून, पंतप्रधान मोदी सांस्कृतिक स्वावलंबनाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ देत आहेत. हे 'आत्मनिर्भर भारत' आणि संस्कृतीशी निगडीत भारताच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे अनुरूप आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहील.
संदर्भ:
पंतप्रधान कार्यालय, भारत
https://www.pmindia.gov.in/en/news_updates/highlights-from-the-pms-address-on-the-79th-independence-day/
https://www.pmindia.gov.in/en/news_updates/cabinet-approves-conferring-status-of-classical-language-to-marathi-pali-prakrit-assamese-and-bengali-languages/
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार
https://www.indiaculture.gov.in/
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
https://ccrtindia.gov.in/resources/literary-arts/
https://www.slbsrsv.ac.in/faculties-and-departments/faculty-sahitya-and-sanskriti/department-prakrit
पत्र सूचना कार्यालय (पी आय बी):
https://www.pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=103014
https://www.pib.gov.in/FeaturesDeatils.aspx?NoteId=153317&ModuleId+=+2
https://www.pib.gov.in/FeaturesDeatils.aspx?NoteId=153318&ModuleId%20=%202
https://www.pib.gov.in/FeaturesDeatils.aspx?NoteId=153320&ModuleId=2
https://www.pib.gov.in/FeaturesDeatils.aspx?NoteId=153322&ModuleId%20=%202
https://www.pib.gov.in/FeaturesDeatils.aspx?NoteId=153315&ModuleId+=+2#_ftn1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2061660
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
नितीन फुल्लुके/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Backgrounder ID: 156471)
आगंतुक पटल : 13
Provide suggestions / comments