Technology
22 भाषा, डिजिटल स्वरूपात पुनर्कल्पित
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या भाषिक भविष्याची उघडणार दारे
Posted On:
25 OCT 2025 2:54PM
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2025
“भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती संस्कृतीचा आत्मा आहे, ती संस्कृती आहे, तिचा वारसा आहे.”
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्य मुद्दे
- भाषिणी आणि भारतजेन सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठाद्वारे सर्व 22 अनुसूचित भाषांना डिजिटल पाठबळ.
- लुप्तप्राय भाषांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना (SPPEL) आणि संचिका यातील डिजिटाइज्ड भाषिक माहितीमुळे बहुभाषिक उपायांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल प्रशिक्षणाला समृद्धता प्राप्त होते.
- तंत्रज्ञान आधारित उपक्रमांमुळे बहुभाषिक डिजिटल परिवर्तनात भारताला जागतिक नेतृत्वस्थान मिळत आहे.
प्रस्तावना

भारताचे भाषिक वैविध्य हे जगातील सर्वात समृद्ध संस्कृती पैकी एक आहे. या विशाल देशाच्या विविध भागात 22 अनुसूचित भाषा तसेच शेकडो आदिवासी आणि प्रादेशिक बोली बोलल्या जातात. डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढत असताना, ही भाषिक विविधता डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अंतर्भूत करणे आवश्यक बनले आहे. तंत्रज्ञान आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही; ते समावेशनाचा कणा बनले आहे.
भारत सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP), मशीन लर्निंग आणि स्पीच रेकग्निशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुद्धिमान आणि विस्तारक्षम भाषिक उपाय विकसित करत आहे. या उपक्रमांचे उद्दिष्ट – डिजिटल सेवांमध्ये सर्वांसाठी प्रवेश अखंड संवाद, रिअल-टाइम भाषांतर, व्हॉइस एनेबल इंटरफेस आणि स्थानिक भाषांमधील आशय वितरण यांच्यामार्फत डिजिटल सेवांचा सर्वांसाठी प्रसार करणे, हे आहे. भाषिक विविधतेचा आदर करणारी एक मजबूत तांत्रिक परिसंस्था तयार करून, भारत एका समावेशक डिजिटल भविष्याचा पाया रचत आहे जिथे प्रत्येक नागरिक, त्यांची मातृभाषा कोणतीही असो, डिजिटल अर्थव्यवस्था आणि प्रशासनात पूर्णपणे सहभागी होऊ शकेल.
भाषिक समावेशनाला प्रोत्साहन देणारी प्रमुख व्यासपीठे
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषिक व्यासपीठ आणि विशाल डिजिटल संग्रह भारतातील भाषा कशा जतन केल्या जातात, वापरल्या जातात आणि विकसित केल्या जातात हे नव्याने परिभाषित करत आहे. भाषिणी आणि भारतजेन सारखी व्यासपीठे प्रशासन, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात बहुभाषिक सहाय्य पुरवत आहेत. आदि-वाणी सारखे उपक्रम आदिवासी भाषांना डिजिटल क्षेत्रात स्थान देत आहेत. या एकत्रीकरणामुळे भारताचा भाषिक वारसा केवळ जतन होत नाही तर डिजिटल युगात कार्यक्षम आणि गतिशील ही बनतो.
गेल्या दशकात, कृत्रिम बुद्धिमत्ता, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगतीमुळे भारताच्या भाषिक विविधतेचे दस्तऐवजीकरण, डिजिटलायझेशन आणि पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. या तंत्रज्ञानामुळे शेकडो भाषा आणि बोलींमध्ये मोठ्या प्रमाणात भाषा डेटा संकलन, स्वयंचलित भाषांतर आणि उच्चार ओळखणे शक्य झाले आहे – ज्यापैकी अनेक भाषांचा डिजिटल प्रतिनिधित्वात अभाव होता. या तांत्रिक गतीने संवादातील अडथळे दूर केले, समावेशक प्रशासनाला प्रोत्साहन दिले आणि समुदायांना त्यांच्या मूळ भाषांमध्ये डिजिटल सामग्री उपलब्ध करून देऊन सक्षम करण्यास मदत केली आहे.
आदि-वाणी: आदिवासी भाषांच्या समावेशासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

आदि-वाणी हे 2024 मध्ये स्थापित झालेले भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ आहे जे आदिवासी भाषांचे रिअल-टाइम भाषांतर आणि जतन करण्यासाठी समर्पित आहे. अत्याधुनिक भाषा तंत्रज्ञानाद्वारे संवादात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या व्यासपीठावर कृत्रिम बुद्धिमत्तेची अचूकता आणि मानवी भाषिक कौशल्य यांचा समन्वय साधला आहे, जेणेकरून अखंड बहुभाषिक अनुभव मिळतील.
या व्यासपीठाच्या केंद्रस्थानी अत्याधुनिक स्पीच रिकग्निशन आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) तंत्रज्ञान आहे जे आदि-वाणी संथाली, भिली, मुंडारी आणि गोंडी सारख्या भाषांना समर्थन देते - ज्यापैकी अनेक भाषा पारंपारिकपणे मौखिक प्रसारणावर अवलंबून आहेत आणि त्यांना पुरेसे डिजिटल प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आदिवासी भाषा आणि प्रमुख भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम भाषांतर सक्षम करून, हे व्यासपीठ केवळ या समृद्ध भाषिक परंपरांचे जतन करत नाही तर त्यांना शिक्षण, प्रशासन आणि सांस्कृतिक दस्तऐवजीकरणासाठी देखील सुलभ बनवते.
लुप्तप्राय भाषांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना (SPPEL)
लुप्तप्राय भाषांच्या संरक्षण आणि संवर्धनाची योजना (SPPEL) शिक्षण मंत्रालयाने 2013 मध्ये सुरू केली असून म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) द्वारे ती राबवली जाते. ही योजना, विशेषतः ज्या भाषा 10,000 पेक्षा कमी लोक बोलतात अशा धोक्यात असलेल्या भारतीय भाषांचे दस्तऐवजीकरण आणि डिजिटल संग्रहण करण्यावर लक्ष केंद्रित करते.
या योजनेद्वारे तयार केले जाणारे समृद्ध पाठ्य, ध्वनी आणि व्हिडिओ डेटासेट हे जतन करण्यासोबतच नवोन्मेषासाठी देखील उपयुक्त ठरतात, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) प्रणालींसाठी महत्त्वपूर्ण संसाधने प्रदान करतात. संचिका (Sanchika) सारखे केंद्रीय भारतीय भाषा संस्थेचे (CIIL) चे डिजिटल संग्रहासारखे व्यासपीठ, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल प्रशिक्षण, मशीन भाषांतर आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत भाषिक तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करतात.
संचिका (Sanchika): भारतीय भाषांचा डिजिटल संग्रह
केंद्रीय भारतीय भाषा संस्थेद्वारे (CIIL) प्रबंधित, संचिका, ही एक डिजिटल संग्रह प्रणाली आहे जी अनुसूचित आणि आदिवासी भाषांसाठी शब्दकोश, प्राइमर्स, गोष्टींची पुस्तके आणि मल्टीमीडिया संसाधने एकत्रित करते. हे केंद्रीकृत डिजिटल संग्रह भाषा मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी, भाषांतर प्रणाली विकसित करण्यासाठी आणि सांस्कृतिक कथांचे जतन करण्यासाठी एक महत्त्वाचा डेटा स्रोत ठरते.
हे व्यासपीठ भाषिक दृष्ट्या वर्गीकृत डिजिटल संसाधने प्रदान करते ज्यात पाठ्य, ध्वनी आणि दृश्य साहित्य समाविष्ट आहे - जे शैक्षणिक संशोधन, भाषा शिक्षण आणि सांस्कृतिक दस्तऐवजीकरणासाठी मदत करते. या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संग्रहामुळे उदयोन्मुख कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया अनुप्रयोगांसाठी पायाभूत डेटा प्रदान करतात, त्यामुळे अल्प संसाधन असलेल्या आदिवासी आणि प्रादेशिक भाषांसाठी अधिक समावेशक आणि प्रभावी डिजिटल साधने विकसित होतात.
भारतजेन: भारतीय भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल
भारतजेन सर्व 22 अनुसूचित भाषांसाठी प्रगत टेक्स्ट-टू-टेक्स्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच भाषांतर मॉडेल विकसित करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ आहे. ते बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली तयार करण्यासाठी एसपीपीईएल आणि सांचिका येथील डेटाचा वापर प्रशासन, शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रात केला जातो - ज्यामुळे प्रमुख भारतीय भाषेत डिजिटल सर्वांसाठी उपलब्ध आहे याची खात्री होते.
भारतजेनच्या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली प्रशासन, शिक्षण आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल प्रवेशयोग्यता आणि समावेशकता वाढविण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. या प्रणाली भारताच्या विविधतेने समृद्ध अशा वातावरणात अखंड संवाद आणि आशय वितरण सक्षम करतात.
GeM आणि GeMAI: सरकारी ई-मार्केटप्लेससाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहुभाषिक सहाय्यक
सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) हे सार्वजनिक खरेदीसाठी भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे 9 ऑगस्ट 2016 रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केले. GeM हे सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसाठी खरेदी प्रक्रिया सुलभ करते तसेच पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते.
वापरकर्त्यांची सुलभता आणि समावेशकता वाढविण्यासाठी, GeM ने GeMAI, एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहुभाषिक सहाय्यक समाविष्ट करण्यात आला आहे. GeMAI अनेक भारतीय भाषांमध्ये आवाज आणि लिखित मजकूर आधारित सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रगत नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे वापरकर्ते व्यासपीठावर अधिक सहजपणे शोध घेण्यास, नेव्हिगेट करण्यास आणि व्यवहार पूर्ण करण्यास सक्षम बनतात, परिणामी, सरकारी खरेदीतील भाषेतील अडथळे दूर होण्यास मदत होते.
भाषिणी: समावेशक भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहुभाषिक भाषांतर व्यासपीठ
भाषिणी, हे राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियान (NLTM) अंतर्गत एक अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठ आहे जे 22 अनुसूचित भाषा आणि आदिवासी भाषांसाठी रिअल-टाइम भाषांतर सक्षम करते. हे व्यासपीठ सरकारी सेवांमध्ये प्रवेश सुलभ करते, डिजिटल सामग्रीपर्यंत पोहोच वाढवते तसेच मशीन भाषांतर, स्पीच रिकग्निशन आणि नैसर्गिक भाषा समजण्याद्वारे डिजिटल समावेशाला प्रोत्साहन देते.
प्रमुख कामगिरी:

संसद भाषिणी - कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संसदीय चर्चांचे रिअल टाईम भाषांतर आणि नागरिक सहभागासाठी उपयुक्त व्यासपीठ.
आदिवासी संशोधन, माहिती, शिक्षण, संवाद आणि कार्यक्रम (TRI-ECE) योजना
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाणारी आदिवासी संशोधन, माहिती, शिक्षण, संवाद आणि कार्यक्रम (TRI-ECE) योजना, ही आदिवासी भाषा आणि संस्कृतींचे जतन करण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पांना पाठबळ देते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषांतर साधनांच्या विकासाला पाठिंबा दिला आहे ज्याद्वारे इंग्रजी आणि हिंदी मजकूर आणि ध्वनी आदिवासी भाषांमध्ये आणि उलट भाषांतरित करता येते.
ही साधने मशीन लर्निंग स्पीच रिकग्निशन आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया यांचा वापर करून लुप्तप्राय आदिवासी भाषांचे रिअल-टाइम भाषांतर आणि डिजिटल संरक्षणास समर्थन देतात. हा प्रकल्प आदिवासी संशोधन संस्था आणि भाषा तज्ञांच्या सहकार्याने समुदायाच्या सहभागावर भर देतो, ज्यामुळे भाषिक अचूकता आणि सांस्कृतिक संवेदनशीलता सुनिश्चित होते.
डिजिटल अभिलेखागार आणि शैक्षणिक उपक्रम
केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA) यासारख्या संस्थांनी भाषिणी सोबत सहकार्य करून प्राचीन हस्तलिखिते, लोकसाहित्य आणि मौखिक परंपरांचे डिजिटायझेशन सुरू केले आहे. हे डिजिटल अभिलेखागार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) प्रणालींना समृद्ध करतात, ज्यामुळे भाषांचे जतन आणि अत्याधुनिक भाषांतर उपाय दोन्ही शक्य होतात. या प्रयत्नांमुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा दुवा अधिक मजबूत झाला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहुभाषिक व्यासपीठाद्वारे शिक्षणाचे सक्षमीकरण
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने भारतातील शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, सुलभ आणि भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण बनत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषा तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या उद्दिष्टांना चालना मिळत आहे. या धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या भाषेत, मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत - किमान इयत्ता 5 वी पर्यंत आणि शक्य असल्यास इयत्ता 8 वी आणि त्यापुढे शिक्षण देण्यावर भर दिला आहे.
ई-कुंभ पोर्टल म्हणजे काय?
ई-कुंभ पोर्टल हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (AICTE) व्यासपीठ आहे जे अनेक भारतीय भाषांमधील तांत्रिक पुस्तके आणि अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध करून देते.हे व्यासपीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मातृभाषेत शिक्षणाच्या दृष्टिकोनाला समर्थन देते.
संस्थात्मक पातळीवर, एआयसीटीईचे अनुवादिनी ॲप, एक स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहुभाषिक भाषांतर साधन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि कौशल्य विकास पुस्तकांचे भारतीय भाषांमध्ये जलद भाषांतर करण्यास सक्षम करते. अनुवादित सामग्री ई-कुंभ पोर्टलवर प्रकाशित केली जाते, ज्यामुळे मातृभाषांमध्ये तांत्रिक ज्ञानाची उपलब्धता वाढते.

या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपक्रमांना पूरक म्हणून, ज्ञानवर्धक ग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यास मदत करणारे - राष्ट्रीय भाषांतर अभियान (NTM) आणि भारताच्या प्राचीन विद्वत्तापूर्ण कार्यांचे जतन आणि डिजिटलीकरण करणारे - राष्ट्रीय हस्तलिखित अभियान (NMM) यासारखे यासारखे दीर्घकालीन राष्ट्रीय प्रयत्न सुरू आहेत. हे उपक्रम एकत्रितरित्या भारताच्या भाषिक वारसा आणि त्याच्या भविष्यासाठी सज्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता - सक्षम शिक्षण परिसंस्थेमध्ये एक सातत्य निर्माण करतात.
दरम्यान, स्वयम सारखे व्यासपीठ बहुभाषिक सामग्री वितरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा प्रदान करतात. 2025 च्या मध्यापर्यंत, 5 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयं’वर नोंदणी केली आहे. सरकारने निर्देश दिले आहेत की पुढील तीन वर्षांत सर्व शालेय आणि उच्च-शिक्षण पाठ्यपुस्तके आणि अभ्यास साहित्य भारतीय भाषांमध्ये डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून द्यावे.
भाषिनी सारख्या भाषा आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठासह हे उपक्रम शाळा, शिक्षण-तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च-शिक्षण संस्थांना स्थानिक भाषांमध्ये स्थानिक शिक्षण साहित्य, परस्परसंवादी साधने आणि शिक्षक-सहाय्य सामग्री तयार आणि वितरित करण्यास सक्षम करतात - भाषिक दरी कमी करतात. यामुळे भाषिक अंतर कमी होते आकलन सुधारते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेत डिजिटल शिक्षण असा लाभ घेण्याची संधी मिळते.
ही उदयोन्मुख बहुभाषिक डिजिटल शिक्षण प्रणाली केवळ शैक्षणिक समावेशनाला बळकटी देत नाही तर भारताच्या भाषिक विविधतेलाही बळकटी देते - आणि सोबतच, हे सुनिश्चित करते की देशातील अनेक भाषा केवळ सांस्कृतिक वर्षाचा भाग न राहता शिक्षण, ज्ञान आणि नवोन्मेषाचे सशक्त माध्यम म्हणून जिवंत राहतील.
परिवर्तनामागील तंत्रज्ञान
भारताची बहुभाषिक डिजिटल परिसंस्था ही देशाच्या भाषिक विविधतेला लक्षात घेऊन तयार केलेल्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय भाषाशास्त्र तंत्रज्ञानावर आधारित आहे. अत्याधुनिक नवोन्मेषाचा वापर करून, ही तंत्रज्ञान प्रणाली केवळ भाषिक वारसा जतन करत नाहीत तर विविध भाषांमध्ये अखंड, रिअल-टाइम संवाद सुलभ करून मोठ्या प्रमाणात डिजिटल समावेशनाला चालना देते.
या परिसंस्थेच्या प्रमुख घटकांमध्ये हे समाविष्ट आहेत :
- ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन (ASR): विविध भारतीय भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या शब्दांना अचूक मजकुरात रूपांतरित करते, यामुळे ध्वनी आधारित ॲप, कमांड इंटरफेस आणि रिअल-टाइम ट्रान्सक्रिप्शन सेवा शक्य होतात.
- टेक्स्ट-टू-स्पीच (TTS): मूळ भाषांमध्ये नैसर्गिक आणि समजण्यास सुलभ आवाजात भाषण तयार करते, ज्याचा उपयोग डिजिटल सहाय्यक, शैक्षणिक साधने आणि सरकारी सेवांमध्ये केला जातो.
- न्यूरल मशीन ट्रान्सलेशन (NMT): वाक्यरचना आणि अर्थविषयक गुंतागुंत दूर करून, अनेक भारतीय भाषांमध्ये संदर्भ-जागरूक, रिअल-टाइम भाषांतर प्रदान करण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर करते.
- नैसर्गिक भाषा समज (NLU): मूळ भाषांमधील वापरकर्त्याचा हेतू, भावना आणि संदर्भाचा अर्थ लावण्यासाठी, संभाषणात्मक एजंट आणि वापरकर्त्याच्या परस्पर संवादात सुधारणा करण्यासाठी एआय सिस्टम्सना सुलभ करते.
- ट्रान्सफॉर्मर-आधारित आर्किटेक्चर्स (IndicBERT, mBART): हे अत्याधुनिक मॉडेल्स मोठ्या बहुभाषिक भारतीय भाषा कॉर्पोरावर पूर्व-प्रशिक्षित आहेत, ज्यामुळे भाषा मॉडेलिंग, भाषांतर आणि समजून घेण्याच्या कार्यांमध्ये उच्च अचूकता प्राप्त होते.
- कॉर्पस विकास आणि डेटा संकलन: डिजिटायझ्ड हस्तलिखिते, लोककथा, मौखिक परंपरा, सरकारी नोंदी आणि शैक्षणिक साहित्यामधून विस्तृत डेटासेट संकलित केले जातात. हे समृद्ध आणि प्रातिनिधिक डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीचे प्रशिक्षण आणि सुधारणा करण्यासाठी वापरले जातात जे भारताच्या विविध भाषिक परिदृश्यासाठी आवश्यक आहेत.
या तांत्रिक पायाभूत सुविधांवर आधारित भाषिणी, भारतजेन आणि आदि-वाणी सारखी व्यासपीठे भारताच्या अद्वितीय बहुभाषिक संदर्भासाठी अचूक, विस्तारक्षम आणि समावेशक भाषिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
निष्कर्ष
भारताच्या भाषा संरक्षणाच्या भविष्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवीन दिशा दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल संग्रह यांच्या एकत्रीकरणामुळे देशाचा समृद्ध भाषिक वारसा अधिक सजीव, सुलभ आणि सर्वसमावेशक होत आहे. भाषिणी, भारतजेन आणि आदि-वाणी यासारखी व्यासपीठे, लुप्तप्राय भाषांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना (एसपीपीईएल) आणि आदिवासी संशोधन, माहिती, शिक्षण, संवाद आणि कार्यक्रम (TRI-ECE) योजना सारख्या लक्ष्यित उपक्रमांमुळे देशभरातील नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा आणि डिजिटल साधनाशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. हा व्यापक दृष्टिकोन केवळ भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे रक्षण करत नाही तर समावेशक डिजिटल प्रगतीला चालना देतो, ज्यामुळे भारत बहुभाषिक नवोन्मेषाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व स्थान मिळवत आहे.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय
Digital.gov
गृहमंत्रालय
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालय
शिक्षण मंत्रालय
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156449)
आगंतुक पटल : 41
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_Ddn
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
Odia