Social Welfare
पवित्र रंगभूमी : भारतातील पारंपरिक विधीवत कला सादरीकरण
Posted On:
29 SEP 2025 1:34PM
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025

प्रस्तावना
पवित्र विधी आणि नाट्यमय अभिव्यक्ती यांचा संगम करणारा अभिनय प्रकार म्हणजे विधीवत कला सादरीकरण (रिचुअल थिएटर). ही कला प्रामुख्याने मंदिरांमध्ये किंवा सामूदायिक ठिकाणी सादर केली जाते आणि धार्मिक सणांशी, उत्सवांशी तसेच सामूहिक स्मृतींशी खोलवर जोडलेली असते.
पारंपरिक नाट्यप्रयोगांमध्ये सहसा अभिनय, गायन, नृत्य, संगीत, संवाद, निवेदन आणि पठण यांचा सुरेख संगम असतो. काही वेळा त्यात बाहुल्यांचा खेळ किंवा मूकाभिनय यांसारख्या घटकांचाही समावेश केला जातो. मात्र, ही कला म्हणजे केवळ प्रेक्षकांसाठी केलेले सादरीकरण नसून तिची समाज आणि संस्कृतीमध्येही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे.[1]
धार्मिक सण आणि सामूहिक स्मृतींच्या माध्यमातून समाज जीवनात खोलवर रुजलेली ही समृद्ध परंपरागत कला हे केवळ सादरीकरण नसून, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची चालतीबोलती अभिव्यक्ती आहे. समाज आणि संस्कृतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. या परंपरेचे स्वरूप लक्षात घेता, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी या कलांना ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता दिली आहे. ही मान्यता देणे म्हणजे या कलेतील मानवी मूल्याची दखल घेणे आहे. हा वारसा मिळाल्यामुळे भविष्यात या कलेच्या संवर्धन आणि जतनाला प्रोत्साहन मिळणार आहे.

अमूर्त सांस्कृतिक वारसा
हा वारसा पारंपरिक आणि समकालीन अशा दोन्ही स्वरूपांचा आहे. त्यात पूर्वजांकडून मिळालेल्या परंपरा आहेतच शिवाय आजच्या ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीतील प्रथांचाही समावेश आहे. ही कला सर्वसमावेशक असून भिन्न समाज, जाती, धर्म, किंवा प्रांतातील लोक ती सादर करतात, अनुभवतात किंवा जपतात. ती कोणत्याही एका गटापुरती मर्यादित नसते. एखादी कला, परंपरा किंवा सांस्कृतिक गोष्ट अनेक पिढ्यांमधून पुढे चालत येते आणि प्रत्येक पिढी त्यात काहीतरी नवीन भर घालते. त्यामुळे ती कला जिवंत राहते, बदलत राहते आणि अधिक समृद्ध होत जाते. ही गोष्ट लोकांना त्यांची ओळख आणि परंपरा जपण्यास मदत करते. त्यामुळे समाजात एकत्रितपणा निर्माण होतो. ती गोष्ट खास किंवा उच्चभ्रू म्हणून महत्त्वाची नसते, तर ती समाजात उपयोगी पडते म्हणून तिचे मूल्य मानले जाते. हा वारसा समाजातील विशिष्ट लोकांसाठी राखून ठेवलेला नसतो, तर तो सर्व समुदायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे महत्त्व त्याच्या उपयोगात आहे, खासपणात नाही. हा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्ञान आणि कौशल्यांमुळे टिकून राहतो आणि जिवंत राहतो. सध्या युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीत अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या (आयसीएच) 15 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता आणि जागतिक व्यासपीठ मिळाले आहे.

युनेस्कोच्या आयसीएच संरक्षण परिषदेने ठरवलेली पाच प्रमुख क्षेत्रे:
- मौखिक परंपरा आणि अभिव्यक्ती - यात भाषेचा समावेश वारशाचा वाहक म्हणून केला आहे.
- सादरीकरण कला
- सामाजिक प्रथा, विधी आणि उत्सव
- निसर्ग आणि विश्वाशी संबंधित ज्ञान व प्रथा
- पारंपरिक हस्तकला
भारतीय धार्मिक नाट्यप्रकारांचा आयसीएच यादीत समावेश
या जिवंत परंपरांच्या सांस्कृतिक मूल्याची दखल घेत युनेस्कोने कुटियाट्टम, मुडियेट्टू, राममान आणि रामलीला या धार्मिक नाट्यप्रकारांचा समावेश आपल्या प्रतिनिधी यादीत केला आहे.
या नाट्यप्रकारांमध्ये काही समान वैशिष्ट्ये आढळतात: दैवी कथा सांगण्याची परंपरा, पवित्र स्थळांचे महत्त्व, समुदायाचा सक्रिय सहभाग, ज्ञान आणि मूल्यांचे हस्तांतरण आणि कला प्रकारांचा संगम. ही सादरीकरणाची परंपरा केवळ सांस्कृतिक वारसा नसून, सामाजिक अस्मितेचा आणि ऐक्याचा अविभाज्य भाग आहेत.
कुटियाट्टम

कुटियाट्टम ही केरळमध्ये प्रचलित असलेली भारतातील सर्वात प्राचीन आणि आजही जिवंत असलेली नाट्यपरंपरा आहे. या कलेला सुमारे 2,000 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आहे. संस्कृत नाट्यशैली आणि केरळच्या स्थानिक परंपरांचा संगम असलेल्या या नाट्यप्रकारात नेत्राभिनय (डोळ्यांच्या हालचाली) आणि हस्ताभिनय (हातांचे इशारे) यांची विशिष्ट सांकेतिक भाषा वापरून पात्रांच्या भावना आणि विचार सादर केले जातात.
कुटियाट्टमचे कलाकार श्वास नियंत्रण, स्नायूंच्या सूक्ष्म हालचाली आणि अभिनयाच्या बारकाव्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी 10–15 वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतात. एका कथानकाच्या एका प्रसंगावर अनेक दिवस अभिनयाचा बारकाईने सराव केला जातो आणि संपूर्ण प्रयोग 40 दिवसांपर्यंत चालू शकतो.
कुटियाट्टम ही नाट्यकला पारंपरिकरीत्या मंदिरांतील रंगमंचांवर (कुट्टंपालम) सादर केली जाते. या सादरीकरणात धार्मिक विधी आणि रंगमंचावर ठेवलेल्या दिव्याच्या प्रतीकात्मक वापरामुळे पवित्र स्वरूप टिकून राहते. ही परंपरा केवळ कलात्मकतेचा अनुभव देत नाही तर ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभूतीही देते.[2]
आज विविध सांस्कृतिक संस्थांकडून या अद्वितीय संस्कृत सादरीकरणाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून ही परंपरा पुढील पिढ्यांसाठीही जिवंत राहील.
दैवी कथाकथन: शास्त्रीय असूनही कुटियाट्टममध्ये संस्कृत नाटकांमधून घेतलेल्या पौराणिक कथा आणि भक्तिपूर्ण कथानकांचा समावेश केला जातो. या नाट्यप्रकारात पुराणातील दैवी पात्रे, धार्मिक प्रसंग आणि भक्तिभाव यांचा सुरेख संगम दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन अधिक समृद्ध, व्यापक होतो.[3]
पवित्र स्थळ: कुटियाट्टमचे सादरीकरण पारंपरिकरीत्या कुट्टंपालमवर — म्हणजेच मंदिरातील रंगमंचावर केले जाते. त्यामुळे ही कला पवित्र वास्तुकलेशी आणि धार्मिक विधींशी निगडित राहते. रंगमंचावर दिवा ठेवण्याची परंपरा, धार्मिक वातावरण आणि मंदिर परिसरातील सादरीकरण यामुळे या कलाप्रकाराला एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गाभा प्राप्त होतो.[4]
समुदाय सहभाग: कुटियाट्टम ही अत्यंत विशिष्ट आणि कौशल्यपूर्ण कला असली तरी, मंदिर परिसरातील स्थानिक समुदाय तिच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.[5]
कुटियाट्टममध्ये समुदायाचा सहभाग हा केवळ प्रेक्षक म्हणून मर्यादित नसतो. या नाट्यपरंपरेच्या गाभ्यात स्थानिक मालकी हक्क, सामूहिक श्रम, आणि सामाजिक ऐक्य यांचा ठाम आधार असतो. कुटियाट्टम ही केवळ रंगमंचावर सादर होणारी कला नाही, तर ती संपूर्ण समुदायाची एक सामूहिक परंपरा आहे. या नाट्यकलेत लोकांचा सहभाग फक्त प्रेक्षक म्हणून नसतो — ते कलाकार, सहाय्यक, संगीतकार, नेपथ्यकार, आणि व्यवस्थापक म्हणूनही सहभागी असतात. त्या समुदायाची स्वतःची ओळख आणि हक्क असतो, अनेक लोक मिळून मेहनत घेतात आणि कला लोकांना एकत्र आणते, त्यांच्यात एकजूट निर्माण करते.
ज्ञान व मूल्यांचे हस्तांतरण: कुटियाट्टमसारख्या धार्मिक नाट्यप्रकारांमध्ये कलाकारांना दीर्घकालीन आणि कठोर प्रशिक्षण द्यावे लागते. यात अभिव्यक्ती, हस्तचालन, आवाजातील लय-ताल, आणि धार्मिक शिस्त यांचा समावेश असतो. हे शिक्षण केवळ तांत्रिक नसून, शारीरिक अनुभवातून आणि गुरू-शिष्य परंपरेतून मिळते. या नाट्यप्रकारांमधून नैतिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक मूल्ये पिढ्यानपिढ्या जतन केली जातात. ही कला शिक्षणप्रक्रिया आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून पुढे नेली जाते. त्यामुळे ती केवळ परंपरा न राहता समाजाच्या मूल्यसंस्थेचा भाग बनते.
कला प्रकारांचा संगम: कुटियाट्टम ही एक समन्वित शास्त्रीय नाट्यशैली आहे. संस्कृत नाटक, अभिनयशास्त्रातील ‘अभिनय’ तंत्र, पठण, संगीत आणि शैलीबद्ध अभिनय यांचा सुरेख संगम सादरीकरणात असतो. या विविध घटकांच्या एकत्रित सादरीकरणामुळे कुटियाट्टम एक अद्वितीय आणि समृद्ध नाट्यअनुभव निर्माण करते.
मुडियेट्टू

मुडियेट्टू ही केरळमधील एक धार्मिक नृत्य-नाट्यकला आहे. यात देवी काली आणि राक्षस दारिक यांच्यातील पौराणिक युद्धाचे सादरीकरण केले जाते. दरवर्षी सुगीच्या हंगामानंतर भगवती कावू मंदिरांमध्ये हे नाट्यप्रयोग सादर केले जातात. याची सुरुवात शुद्धीकरणाच्या विधींनी आणि देवी कालीचे पवित्र कलाम रेखाटण्याने होते. या सादरीकरणात संपूर्ण गाव सहभागी होतो. प्रत्येक जातीचे लोक आपापल्या भूमिकांद्वारे योगदान देतात. त्यामुळे सामूहिक ओळख आणि सहकार्य बळकट होते. ज्येष्ठ लोक तरुण शिष्यांना प्रशिक्षण देऊन ही परंपरा पुढे नेतात आणि त्यामुळे सांस्कृतिक मूल्ये, नैतिकता आणि सौंदर्यबोध यांचे सातत्य राखले जाते.[6]
मुडियेट्टूचे सांस्कृतिक घटक
दैवी कथाकथन: ही परंपरा देवी काली आणि राक्षस दारिक यांच्यातील युद्धाभोवती फिरते, ज्यातून दैवी संघर्ष आणि विजयाचे प्रतीक साकारले जाते.
पवित्र स्थळ: मुडियेट्टूचे सादरीकरण भगवती कावू (मंदिर परिसर) मध्ये होते. यापूर्वी कलमेझुत्तू (देवीचे पवित्र चित्र रेखाटणे) आणि आवाहन होतात.
समुदाय सहभाग: सर्व जातींचा सहभाग असतो — मुखवटे तयार करणारे, पोशाख पुरवणारे, कलाकार आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होणारे लोक एकत्र येतात.
ज्ञान व मूल्यांचे हस्तांतरण: ज्येष्ठ व्यक्ती तरुण शिष्यांना विधींचा कालक्रम, मंत्रोच्चार, क्रमवारी आणि कलमेझुत्तूच्या रचना शिकवतात. त्यामुळे परंपरेचे सातत्य राखले जाते.
कला प्रकारांचा संगम: नृत्य, संगीत, दृश्यकला (पवित्र चित्रे), मुखवटे, पोशाख आणि नाट्य यांचे एकत्रित पवित्र सादरीकरण म्हणून मुडियेट्टू समोर येतो.
राममान
राममान हा उत्तराखंडमधील सालूर-डुंगरा या जुळ्या गावांमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी साजरा केला जाणारा धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव भूमियाल या स्थानिक देवतेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
या उत्सवात जटिल धार्मिक विधी, रामायणाचे पठण केले जाते. भक्तिपर गाणी म्हटली जातात. मुखवटे घालून सादर केलेले नृत्यनाट्य यांचा समावेश असतो. प्रत्येक जात आणि सामाजिक गट विशिष्ट भूमिका बजावतो. त्यामुळे सामाजिक समरसता वाढते आणि एकात्मता बळकट होते.
या सादरीकरणात वापरले जाणारी काही वाद्ये:

मोठा ढोल
डमाऊ (लहान तालवाद्य)
मंजीरा (हातातील छोट्या झांजा)
झांझर (मोठ्या झांजा)
भंकोरा
ही वाद्ये मंत्रोच्चार, नृत्य आणि कथाकथनाच्या सादरीकरणात साथ देतात.

नाटक, संगीत, मौखिक परंपरा आणि ऐतिहासिक पुनर्रचना यांचा संगम असलेला राममान उत्सव समाजाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. या परंपरेचे सातत्य राखण्यासाठी पिढ्यानपिढ्या ज्ञान हस्तांतरित केले जाते आणि या परंपरेला स्थानिक पातळीपलीकडेही मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात.
दैवी कथाकथन: राममान सादरीकरणात रामकथेचे (रामायणातील प्रसंग) पठण केले जाते, ज्यात मुखवटे घालून देवतांचे आणि स्थानिक दंतकथांचे नृत्य सादर होते. यामुळे पौराणिक आणि स्थानिक कथांचे स्तर एकत्रितपणे साकारले जातात.[7]
पवित्र स्थळ: हे सादरीकरण सालूर-डुंगरा गावातील भूमियाल देवतेच्या मंदिराच्या प्रांगणात होते. हा परिसर पवित्र असून गावाच्या देवतेशी रंगमंच घट्टपणे जोडलेला आहे.[8]
समुदाय सहभाग: संपूर्ण गावातील विविध घराण्यांचा सहभाग असतो. जातीवर आधारित भूमिका असतात — पुजारी, मुखवटे तयार करणारे, ढोल वाजवणारे इत्यादी. निधी गावातूनच उभारला जातो आणि सहभागात वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांचा समावेश असतो.[9] [10]
ज्ञान व मूल्यांचे हस्तांतरण: महाकाव्यात्मक गाणी, नृत्यशैली आणि धार्मिक परंपरा मौखिक परंपरेद्वारे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केली जातात. तरुण गावकरी शिष्यत्व आणि समुदाय निरीक्षणाद्वारे ही कला शिकतात.[11]
कला प्रकारांचा संगम: राममान उत्सवात कथाकथन, मुखवटे नृत्य, धार्मिक नाट्य, संगीत आणि मुखवट्यांची निर्मिती यांचा एकत्रित समावेश असतो.
रामलीला

रामलीला ही रामायण महाकाव्याची नाट्यरूप पुनर्रचना आहे, जी गाणे, निवेदन, पठण आणि संवाद यांच्या अनुक्रमित दृश्यांद्वारे सादर केली जाते. पारंपरिकरीत्या उत्तर भारतात दसऱ्याच्या सणाच्या काळात रामलीला सादर केली जाते. ती धार्मिक दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते आणि तिचे प्रमाण व कालावधी ठिकाणानुसार बदलतो.
भारतातील काही प्रसिद्ध रामलीला सादरीकरण स्थळे: अयोध्या (भगवान रामाचे जन्मस्थान), रामनगर, वाराणसी, वृंदावन, अल्मोरा, सतना, मधुबनी
रामलीलेचे सादरीकरण प्रामुख्याने रामचरितमानस या सोळाव्या शतकातील भक्ति ग्रंथावर आधारित असते. संस्कृतमधील रामायण सामान्य जनतेला समजायला सोपे जावे म्हणून कवी-संत तुलसीदासांनी हा ग्रंथ हिंदीत रचला.
बहुतेक रामलीला सादरीकरणे 10 -12 दिवसांपर्यंत चालतात, मात्र काही, जसे की रामनगरमधील प्रसिद्ध रामलीला, तब्बल एक महिना चालते. ही उत्सवमालिका भारतातील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये साजरी केली जाते. भगवान रामाचे वनवासातून परत येणे आणि त्याचे रावणाशी झालेले युद्ध हे त्यातील प्रमुख प्रसंग.
दैवी कथाकथन: रामलीला ही नाट्यपरंपरा थेट रामायण सादर करते. भगवान रामाचे जीवन आणि पराक्रम नाट्यरूपात सादर करून भक्तिपूर्ण कथाकथन या परंपरेच्या केंद्रस्थानी असते.[12]
पवित्र स्थळ: रामलीलेचे सादरीकरण बहुधा मंदिर परिसर, सार्वजनिक चौक किंवा मोकळ्या अंगणांमध्ये केले जाते. त्यामुळे सादरीकरणाची जागा पवित्रतेशी आणि सार्वजनिक जीवनाशी जोडली जाते.[13]
ज्ञान व मूल्यांचे हस्तांतरण: रामलीलेच्या वार्षिक पठण आणि सादरीकरणाच्या माध्यमातून धर्म, भक्ती, निष्ठा आणि सांस्कृतिक स्मृती यांसारख्या मूल्यांचे पिढ्यानपिढ्या हस्तांतरण होते. ही परंपरा समाजाच्या नैतिक शिक्षणाचा एक सजीव स्रोत आहे.[14]

कला प्रकारांचा संगम: रामलीला ही एक समन्वित नाट्यशैली आहे, ज्यात कथानाट्य, संगीत, नृत्यरचना, रंगमंचीय तंत्र, संवाद आणि पोशाख यांचा संगम होतो. या विविध घटकांच्या एकत्रित सादरीकरणातून रामायणाचे नाट्यरूप प्रभावीपणे साकारले जाते.
संगीत नाटक अकादमीची भूमिका

संगीत नाटक अकादमी ही भारतातील सादरीकरण कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. तिची स्थापना 1953मध्ये भारताच्या विविधतेने नटलेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संवर्धन आणि प्रचारासाठी करण्यात आली. ही संस्था भारताच्या जिवंत परंपरांची संरक्षक म्हणून कार्य करते. परंपरा आणि आधुनिक संरक्षण तंत्र यांचा संगम साधून धार्मिक नाट्यप्रकार जसे की रामलीला, राममान, कुटियाट्टम आणि मुडियेट्टू यांना सजीव ठेवण्यासाठी ही संस्था पुढील प्रकारे योगदान देते:
- दस्तऐवजीकरण आणि संग्रहण: संगीत नाटक अकादमी ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंग, हस्तलिखिते आणि प्रकाशनांच्या माध्यमातून आयसीएचचे बारकाईने दस्तऐवजीकरण करते. ही कृती म्हणजे राष्ट्रीय संग्रह जपण्याच्या त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. हा संग्रह त्यांच्या संकेतस्थळ आणि अहवालांद्वारे सर्वांकरिता उपलब्ध आहे. (e.g., https://sangeetnatak.gov.in/public/uploads/reports/16409317172892.pdf).
- प्रशिक्षण आणि क्षमता विकास: गुरू-शिष्य परंपरेच्या उपक्रमांद्वारे, संगीत नाटक अकादमी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांना पाठिंबा देते. ती संस्था कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करते. कार्यशाळेत ज्येष्ठ कलाकार युवा शिष्यांकडे कौशल्ये हस्तांतरित करतात.
- पुरस्कार आणि सन्मान: संगीत नाटक अकादमी ही संस्था ज्या कलाकारांनी त्यांच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे अशा "जिवंत दंतकथा" ला सन्मानित करते. हे सन्मान विविध पुरस्कारांद्वारे दिले जातात - जसे की, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, फेलोशिप, आणि उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार.[15]
- संशोधन आणि प्रकाशन: अकादमी संशोधन करते आणि अमूर्त सांस्कृतिक वारशावर पुस्तके, जर्नल्स आणि मोनोग्राफ्स प्रकाशित करते. हे स्रोत तिच्या ग्रंथालयात आणि ऑनलाइन पोर्टल्सवर उपलब्ध आहेत.
- उत्सव आणि सादरीकरणे: ती राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील उत्सवांचे आयोजन करते - राष्ट्रीय नाट्य महोत्सव आणि नृत्य महोत्सव. यात आयसीएच प्रकारांचे सादरीकरण होते. हे कार्यक्रम संगीत नाटक अकादमीच्या अधिकृत वेबसाइटवर (https://sangeetnatak.gov.in/) सूचीबद्ध आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांना अधिक प्रसिद्धी मिळते, अधिक प्रेक्षक आकर्षित होतात आणि कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळते.
- युनेस्को आणि राज्य संस्थांशी सहकार्य: भारत सरकारच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा (आयसीएच – इन्टॅन्जिबल कल्चरल हेरिटेज) यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत संगीत नाटक अकादमी सक्रिय भूमिका बजावते. ती युनेस्कोसोबत सहकार्य करून कुटियाट्टमसारख्या पारंपरिक कलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देते आणि त्यांचे संरक्षण करते (कुटियाट्टम 2008 मध्ये युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले). याशिवाय, ही संस्था उत्तराखंडसारख्या राज्य सरकारांबरोबरही काम करते - जसे की, राममान या परंपरेसाठी - स्थानिक स्तरावर पाठिंबा आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी.
- कलाकारांसाठी पाठिंबा आणि आश्रय: संगीत नाटक अकादमी कलाकारांना आर्थिक आणि भौतिक मदत पुरवते. त्यामध्ये त्यांना मानधन, अनुदान आणि आवश्यक सुविधा दिल्या जातात - जसं की, पोशाख, प्रशिक्षणासाठी लागणारा खर्च, इत्यादी. या मदतीमुळे कलाकारांना त्यांच्या कलेचा सराव आणि सादरीकरण अधिक सहजपणे करता येतो.

निष्कर्ष
भारताच्या विविध भागांतील पारंपरिक विधीवत सादरीकरण प्रकार - जसे की कुटियाट्टम आणि राममान - या केवळ कला नसून, त्या दैवी (आध्यात्मिक) आणि दैनंदिन जीवन यांच्यातील एक कायमस्वरूपी, शाश्वत दुवा आहेत. हे कलाप्रकार केवळ मनोरंजनासाठी नसून, ते मिथककथा, संगीत आणि शरीराच्या हालचालींच्या माध्यमातून संपूर्ण समुदायाच्या आत्म्याशी जोडलेले असतात. उदाहरणार्थ, केरळमधील मंदिरांमध्ये सादर होणाऱ्या कुटियाट्टममध्ये अत्यंत सूक्ष्म हावभावांचा वापर होतो, तर गढवाल हिमालयातील राममानमध्ये संपूर्ण समुदाय सामील होतो आणि उत्साहाने नृत्य करतो. संस्कृती ही स्थिर नसते याची जाणीव या सगळ्या गोष्टी आपल्याला करून देतात. संस्कृती सतत बदलणारी, जिवंत आणि स्पंदनशील असते. ती टिकून राहते कारण ती सामूहिक सहभागातून, पवित्र जागांमधून आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शिक्षणातून पुढे नेली जाते.
संदर्भ
Ministry of Culture
Press Information Bureau:
Government of Kerala:
UNESCO
Sacred Stages
* * *
नितीन फुल्लुके/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156445)
आगंतुक पटल : 54
Provide suggestions / comments