Technology
भारताची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी झेप
2024-25 मध्ये उत्पादनात 11.3 लाख कोटी रुपयांची वाढ, एका दशकात सहा पटीने वाढ
Posted On:
11 OCT 2025 2:16PM
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
महत्त्वाचे मुद्दे
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 2014-15 मधील 1.9 लाख कोटी रुपयांवरुन तब्बल सहापट वाढून 2024 25 मध्ये 11.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
- मोबाइल फोन निर्यात 2014-15 मधील 1,500 कोटी रुपयांवरून 127 पटीने वाढून 2024-25 मध्ये 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.
- भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाने गेल्या 10 वर्षांत 25 लाख रोजगारांची निर्मिती केली.
प्रस्तावना
अर्थव्यवस्थेला शक्ती प्रदान करत तांत्रिक परिदृश्य नव्याने परिभाषित करत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र नवोन्मेष आणि विकासाचे इंजिन बनले आहे. जगभरात हे क्षेत्र दूरसंचार, स्वचालन आणि संपर्कप्रणालीमध्ये प्रगती करत असून समाजाचे राहणीमान, काम करण्याची आणि परस्परसंवाद साधण्याची पद्धत यांना आकार देत आहे.
भारत जलद गतीने एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून विकसित झाला आहे. भारताने गेल्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सुमारे सहापट वाढ नोंदवली आहे. गेल्या 10 वर्षांत या क्षेत्राने केवळ आपला औद्योगिक पाया मजबूत केला नाही तर 25 लाख नोकऱ्याही निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे रोजगार आणि आर्थिक वाढीचा प्रमुख चालक म्हणून या क्षेत्राची भूमिका अधोरेखित झाली आहे. महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रम आणि अनुकूल धोरण वातावरणामुळे स्थानिक उत्पादनात आणखी वाढ झाली आहे, निर्यातही वाढली आहे आणि लक्षणीय जागतिक गुंतवणूक आकर्षित झाली आहे.
2030-31 पर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्याची देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयासह, भारत जागतिक तंत्रज्ञान नेता म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे, जो जगासाठी नवनवीन शोध घेतो आणि देशात मोठ्या संधी निर्माण करतो.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यात स्थिती
‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत यासारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात वेगाने पुढे आला आहे. मजबूत धोरणात्मक प्रोत्साहन, तांत्रिक प्रगती आणि कुशल मनुष्यबळ यामुळे उत्पादन आणि निर्यात या दोन्हीत अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे.
महत्वपूर्ण कामगिरी:
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 2014-15 मध्ये 1.9 लाख कोटी रुपयांवर असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादन 2024-25 मध्ये सहा पट वाढून 11.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.
- याच कालावधीत निर्यात 38,000 कोटी रुपयांवरून आठ पटीने वाढून 3.27 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.
- गेल्या 10 वर्षांत, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राने 25 लाख रोजगार निर्माण केले [1]
- भारताने 2020-21 या आर्थिक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे.
- 2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी शीर्ष 5 निर्यात गंतव्यस्थाने म्हणजे अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, युनायटेड किंग्डम आणि इटली.

उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि व्यवसाय सुलभतेतील सुधारणा यासारख्या सहाय्यक उपायांमुळे उत्पादन आणि निर्यातीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील जलद वाढीमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, तर भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र प्रतिस्पर्धात्मकता वाढवत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करत जागतिक पुरवठा साखळींमध्ये खोलवर समाविष्ट झाले आहे.
मोबाईल उत्पादन आणि निर्यात
भारताची मोबाईल फोन क्रांती जीवन आणि उपजीविकेमध्ये बदल घडवून आणत आहे. 85 टक्क्यांहून अधिक भारतीय कुटुंबांकडे किमान एक स्मार्टफोन असल्याने, हे उपकरण आज बँकिंग, शिक्षण, मनोरंजन आणि सरकारी सेवांपर्यंत पोहोचण्याचे एक साधन म्हणून काम करत आहे. मोबाईल संपर्क प्रणाली, आर्थिक समावेशन आणि डिजिटल सक्षमीकरणाचा एक शक्तिशाली प्रेरक बनली आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वाधिक संपर्कात असलेल्या समाजांपैकी एक बनला आहे.

प्रमुख कामगिरी:
- मोबाईल फोन उत्पादन 2014-15 मधील 18,000 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 5.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, म्हणजेच सुमारे 28 पट वाढले आहे.
- भारत जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे.
- भारताचे मोबाईल उत्पादन उद्योग वेगाने वाढले आहे. भारतात 2014 मध्ये केवळ 2 उत्पादन युनिट होते जिथे आज भारतात 300 हून अधिक उत्पादन युनिट्स सुरू आहेत.
- दरवर्षी सुमारे 33 कोटी मोबाईल फोनचे उत्पादन केले जाते, ज्यापैकी जवळजवळ एक अब्ज मोबाईल फोन देशभरात सक्रिय वापरात आहेत.
- 2014-15 मध्ये 1,500 कोटी रुपयांवर असलेली निर्यात 127 पटीने वाढवून 2024-25 मध्ये 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
- 2024 मध्ये, भारतातून ॲपलची निर्यात विक्रमी 1,10,989 कोटी रुपयांवर (12.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स) पोहोचली, जी 42% वार्षिक वाढीसह 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.
- आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या पाच महिन्यांतच, स्मार्टफोन निर्यात 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा 55% नी वाढली आहे.
- भारताने मोबाईल उत्पादनात जवळजवळ स्वावलंबीत्व गाठले आहे - 2014-15 मध्ये आपल्या गरजेच्या 78% आयात करणारा भारत आज जवळजवळ सर्व उपकरणे देशातच तयार करण्यापर्यंत पोहोचला आहे.
- आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत, चीनला मागे टाकून भारत अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा अव्वल देश बनला आहे.
 |
इंडिया मोबाईल काँग्रेस 2025
इंडिया मोबाईल काँग्रेस ची 9वी आवृत्ती नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादन, निर्यात, आणि तंत्रज्ञान नवोन्मेषात भारताची वाढती ताकद अधोरेखित करणारा आहे.
या कार्यक्रमाला 150 देशातील सुमारे 1.5 लाखाहून अधिक अभ्यागत, सुमारे 7,000 जागतिक प्रतिनिधी आणि 400 हून अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या 100 सत्रांमध्ये सुमारे 800 तज्ञ मोबाईल उद्योग, 5जी, 6जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट मोबिलिटी, सायबर सुरक्षा, क्वांटम कम्प्युटिंग आणि हरित उद्योगाच्या सुमारे 1600 हून अधिक उपयोगांबाबत माहिती देतील.
या आयोजनात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल क्षेत्राला आकार देणाऱ्या उद्योगांना अधोरेखित करणाऱ्या सहा प्रमुख जागतिक शिखर संमेलनांचा समावेश आहे :
- आंतरराष्ट्रीय भारत 6जी परिसंवाद – 6जी संशोधनातील भारताच्या नेतृत्वाचे प्रदर्शन
- आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद – नेटवर्क आणि मोबाईल सेवांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता अनुप्रयोगांवर केंद्रित
- सायबर सुरक्षा शिखर परिषद – 1.2 अब्जांहून अधिक वापरकर्त्यांसाठी सुरक्षित दूरसंचारावर भर
- सॅटकॉम शिखर परिषद – उपग्रह-आधारित दूरसंचार पर्यायांचा शोध
- इंडिया मोबाईल काँग्रेस अस्पायर कार्यक्रम – स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूकदारांशी जोडणारा उपक्रम
- जागतिक स्टार्टअप विश्वचषक – भारतीय आवृत्ती – आंतरराष्ट्रीय वित्तपोषणाच्या संधी उपलब्ध करून देणारा मंच
इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल नवोन्मेषाचे जागतिक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट करते. तसेच, उत्पादन, निर्यात आणि नव्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या स्वीकाराला समर्थन देते.
|
आधुनिक उद्योगांचा कणा या रुपात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र [3]
इलेक्ट्रॉनिक्स आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. घरांपासून रुग्णालयांपर्यंत आणि कारखान्यांपासून वाहनांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात कार्यक्षमता, सोय आणि नवोन्मेष सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आवश्यक आहे. आज प्रत्येक प्रमुख क्षेत्र कामगिरी सुधारण्यासाठी, सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि चांगल्या सेवा देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सवर अवलंबून आहे. तंत्रज्ञान विकसित होत असताना, सर्व उद्योगांमध्ये प्रगती साधण्यात इलेक्ट्रॉनिक्सचे महत्त्व सतत वाढत आहे.
खाली काही प्रमुख क्षेत्र दिली आहेत जिथे इलेक्ट्रॉनिक्स ची भूमिका महत्त्वाची आहे:
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रत्येक घर आता टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीनसारख्या उपकरणांवर अवलंबून आहे. ही उत्पादने घरात सुविधा, मनोरंजन आणि कार्यक्षमता वाढवतात. किफायतशीर आणि ग्राहकोपयोगी उपकरणांची वाढती उपलब्धता यातून लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यात इलेक्ट्रॉनिक्सची वाढती भूमिका प्रतिबिंबित होते.
इलेक्ट्रॉनिक घटक
इलेक्ट्रॉनिक घटक हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीचा आधारस्तंभ आहेत. साध्या घरगुती उपकरणापासून जटिल औद्योगिक प्रणालींपर्यंत प्रत्येक उपकरणाला हे घटक उर्जा देतात. कोणताही उत्पादक या आवश्यक भागांशिवाय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण प्रणाली किंवा वैद्यकीय उपकरणे तयार करू शकत नाही. या उप-क्षेत्राची ताकद इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची एकूण स्पर्धात्मकता आणि स्थैर्य ठरवते.
ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स
आधुनिक वाहने कार्यक्षमता, सुरक्षितता आणि संपर्क प्रणाली यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्सवर अवलंबून आहेत. जग इलेक्ट्रिक आणि स्मार्ट मोबिलिटीकडे वळत असल्याने ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण आणि स्वच्छ वाहतुकीची वाढती गरज या बदलाला गती देत आहेत. सेन्सर्सपासून ते इन्फोटेनमेंट सिस्टमपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचे स्वरूप आणि वापरकर्त्यांशी परस्परसंवादाची पद्धत हे बदलत आहेत.
वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स
जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये वाढ आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या मागणीमुळे वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्सची बाजारपेठ वाढली आहे. ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर आणि डिजिटल मॉनिटर्स सारखी उपकरणे आता घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये सर्वत्र दिसत आहेत. वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवोन्मेषामुळे निदान, उपचार आणि रुग्णसेवा सुधारत आहेत. इलेक्ट्रॉनिक्समुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ, अचूक आणि बदलत्या जगाच्या गरजांना प्रतिसाद देणारी बनली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी प्रमुख सरकारी उपक्रम
भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग मजबूत धोरणात्मक आधार आणि लक्ष्यित सरकारी उपक्रमांच्या मदतीने झपाट्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन पर्यावरण तयार करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक मूल्य साखळीत भारताची भूमिका बळकट करताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे हे या कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे.
उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना[4]
1.97 लाख कोटी रुपये खर्चाची उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरसह 14 प्रमुख क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. ती कंपन्यांना उत्पादन वाढवण्यास, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास आणि निर्यात वाढवण्यास प्रोत्साहित करते.
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना
• ₹13107 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित
• ₹8.56 लाख कोटी रुपयांचे उत्पादन निर्माण
• ₹4.65 लाख कोटी रुपयांची निर्यात साध्य
• ₹1.35 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्मिती
*जून 2025 पर्यंतची माहिती
पूर्वी नमूद केल्याप्रमाणे, भारताने आर्थिक वर्ष 2020-21 पासून आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे. या थेट गुंतवणूकीपैकी जवळजवळ 70% रक्कम उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेतील लाभार्थ्यांकडून आली आहे.
इलेक्ट्रॉनिक घटक आणि सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना (एसपीईसीएस) [5]
एसपीईसीएस योजनेअंतर्गत प्रमुख इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठी भांडवली खर्चाच्या 25 टक्के आर्थिक प्रोत्साहनाची तरतूद आहे. यामुळे पुरवठा साखळीतील महत्वपूर्ण दुवे भरून काढण्यास मदत करते, स्थानिक उत्पादनाला चालना मिळते आणि असेंब्ली-आधारित उत्पादन पद्धतीतून उच्च-मूल्य घटक उत्पादनाकडे वाटचाल सुलभ करण्यास सहाय्य करते.
इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना (ईसीएमएस)[6]
1 मे 2025 रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 22,919 कोटी रुपये आर्थिक खर्चाच्या या योजनेला उद्योगांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून यासाठी एकूण 249 अर्ज प्राप्त झाले आहेत. 1,15,351 कोटी रुपयांची अपेक्षित गुंतवणूक बांधीलकी ही मूळ 59,350 कोटी रुपये उद्दिष्टापेक्षा जवळपास दुप्पट आहे.

पुढील सहा वर्षांत या योजनेतून 10,34,700 कोटी रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, जे सुरुवातीच्या 4,56,000 कोटी रुपये उद्दिष्टापेक्षा 2.2 पट आहे. या योजनेतून 1,42,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे, जे 91,600 च्या उद्दिष्टापेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहेत, तसेच यातून अनेक अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होतील. या योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची योजनेची क्षमता दिसून येते.
या योजनेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद जागतिक स्तरावर भारताची वाढती उंची तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात वाढता विश्वास दिर्शवतो. 1 मे 2025 पासून सुरू होणारी तीन महिन्यांची सुरुवातीची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली. 2030-31 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सच्या देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाकडे भारताच्या प्रवासाला ही योजना गती देईल, अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण (एनपीई) 2019
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे उद्दिष्ट भारताला इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि उत्पादनासाठी (ईएसडीएम) जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे, हे आहे. 2025 पर्यंत ईएसडीएममधून 400 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य आहे. हे धोरण नवोन्मेषाला प्रोत्साहन देते, डिझाइन आधारित उत्पादनाला प्रोत्साहन देते आणि दीर्घकालीन उद्योग वाढ सुनिश्चित करण्यासाठी संशोधन आणि विकासाला समर्थन देते.
निष्कर्ष
भारताचा इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादन क्षेत्रातील प्रवास देशाच्या महत्वाकांक्षा, नवोन्मेष आणि जागतिक स्पर्धा क्षमतेचा प्रत्यय देणारा आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय), इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना (ईसीएमएस) आणि इलेक्ट्रॉनिक घटक आणि सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना (एसपीईसीएस) यासारख्या योजनांमुळे देशांतर्गत उत्पादन वाढले आहे, पुरवठा साखळी मजबूत झाली आहे आणि निर्यात वाढीला चालना मिळाली आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण आणि मेक इन इंडिया अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांसह इतर उपाययोजनांमुळे रोजगार निर्माण झाला आहे. गुंतवणूक आकर्षित झाली आहे आणि भारताची तांत्रिक स्वावलंबन क्षमता आणखी दृढ झाली आहे. निरंतर नवोन्मेष आणि धोरणात्मक पाठबळ आणि मजबूत उत्पादन अधिष्ठानाच्या सहाय्याने भारत 2030-31 पर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सची देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी सज्ज आहे.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय बॅकग्राऊंडर्स
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय:
दूरसंचार मंत्रालय:
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय:
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय:
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156442)
आगंतुक पटल : 51
Provide suggestions / comments