Others
आयएनएस विक्रांत : भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आणि नौदलाच्या क्षमतेतील एक महत्त्वाचा टप्पा
Posted On:
24 OCT 2025 7:06PM
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2025
|
महत्त्वाचे मुद्दे
- आयएनएस विक्रांत ही भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका 2 सप्टेंबर 2022 रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली
- या नौकेच्या निर्मितीत 76% स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, ज्यात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या 30,000 टन विशेष पोलादाचा समावेश आहे. या नौकाबांधणी प्रकल्पात 550 हून अधिक मुळ उपकरण निर्माते (ओईएम), 100 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सहभागी झाले, ज्यामुळे 2000 प्रत्यक्ष आणि 12,500 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले.
- अत्याधुनिक स्वयंचलन प्रणालीवर चालणारे आयएनएस विक्रांत 30 विमानांच्या ताफ्याने सुसज्ज आहे. या विमानांच्या ताफ्यात मिग-29के, कामोव-31, एमएच-60आर, मिग 29 केयूबी, चेतक आणि एएलएच यांचा समावेश आहे.
- मार्च 2025 मध्ये, गोव्याच्या पश्चिमेला 230 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या एमव्ही हेलन स्टार वरील जखमी कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून आयएनएस विक्रांतने बहुआयामी क्षमतेचे प्रदर्शन केले आहे.
- ही नौका 5,000 घरांसाठी पुरेल इतकी वीज निर्माण करू शकते.
|
प्रस्तावना

आयएनएस विक्रांत, भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका (IAC1), महत्त्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचे अभिमानास्पद प्रतिक आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने डिझाइन केलेली आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) द्वारे बांधलेली ही नौका देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलात या नौकेचे औपचारिक समावेशन केले, आयएनएस विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी संसाधने आणि स्वदेशी कौशल्यांचे जिवंत उदाहरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतवर 2025 ची दिवाळी साजरी केली, आणि भारतीय नौदल खलाशी आणि सशस्त्र दलातील जवानांच्या समर्पणाचा आणि धैर्याचा सन्मान केला. पंतप्रधानांची ही भेट, देशाच्या सीमेवर आणि धोरणात्मक क्षेत्रात तैनात असणाऱ्या सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या परंपरेचे प्रतिक आहे, ज्यातून देशाच्या सीमा आणि समुद्रिक क्षेत्राचे परीक्षण करणाऱ्या प्रत्येक रक्षकाप्रती एकजूटता आणि सन्मान प्रतीत होतो. पंतप्रधानांनी 19 आणि 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत या भेटीत रात्रकालीन समुद्री उड्डाणात भाग घेतला, यात खालील कार्यक्रमांचा समावेश होता :
- दिवसा आणि रात्री वायु शक्तीचे प्रात्यक्षिक
- पाणबुडीविरोधी रॉकेट प्रक्षेपण अभ्यास
- रात्रकालीन समुद्रावरील इंधन पुनर्भरण
- जवळच्या अंतरावर हवाई विरोधी गोळीबाराचे प्रात्यक्षिक
- स्टीम पास्ट आणि फ्लाय पास्ट प्रदर्शन
- सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बडाखाना (मेजवानी)
- पंतप्रधानांचे भाषण आणि कर्मचाऱ्यांशी संवाद
- समुद्रात योग सत्राचे आयोजन आणि विशेष दलांचे प्रात्यक्षिक अवलोकन
इतिहास आणि विकास
आयएनएस विक्रांत हे नाव भारताच्या पहिल्या विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत (आर11) वरून ठेवण्यात आले आहे, जी 1997 मध्ये सेवा मुक्त करण्यात आली होती. 1961 च्या गोवा मुक्ती संग्रामात आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात पूर्वीच्या आयएनएस विक्रांतने निर्णायक भूमिका बजावत भारताच्या नौदल इतिहासात अमिट ठसा उमटवत गौरवाचे स्थान मिळवले होते. सध्याची आयएनएस विक्रांत, भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका (IAC 1), या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेत आहे आणि देशाच्या नौदल आत्मनिर्भरता आणि जहाजबांधणी क्षमतेतील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवत आहे.
- नौका बांधणीचा प्रारंभ: या जहाज बांधणीची औपचारिक सुरुवात फेब्रुवारी 2009 रोजी कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे करण्यात झाली.
- जलावतरण आणि चाचण्या: आयएनएस विक्रांतचे ऑगस्ट 2013 मध्ये जलावतरण करण्यात आले आणि पहिली समुद्री चाचणी ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झाली.
- रचना (डिझाइन): या विमानवाहू नोकरीची संकल्पना आणि रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरो (WDB) ने स्वतः विकसित केली आहे.
- नौदलात समावेश: 2 सप्टेंबर 2022 रोजी कोची येथे जानवकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. या समावेशामुळे भारत त्या काही मोजक्या देशांपैकी एक बनला आहे जे स्वदेशी पातळीवर विमान वाहू नका डिझाईन आणि बांधणी करण्यास सक्षम आहेत.

- स्वदेशी सामग्री: जहाजाचा 76 टक्के भाग स्वदेशात निर्मित घटकांनी बनवलेला आहे, ज्यामध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) द्वारे पुरवलेले सुमारे 30,000 टन विशेष पोलाद समाविष्ट आहे.
- संरक्षण उद्योग सहभाग: या प्रकल्पात 100 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) सोबत 550 हून अधिक मूळ उपकरण उत्पादक (OEM) आणि उप-कंत्राटदारांचा समावेश होता.
- रोजगार निर्मिती: कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये सुमारे 2000 लोकांना थेट रोजगार मिळाला तसेच संबंधित उद्योग आणि पुरवठादारांमार्फत सुमारे 12,500 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला.
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबीतेचे प्रतीक असलेले आयएनएस विक्रांत हे केवळ एक युद्धनौका नाही - 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे.
क्षमता आणि वैशिष्ट्ये
आयएनएस विक्रांतची तांत्रिक आणि परिचालन क्षमता खालील वैशिष्ट्यांमध्ये दिसून येते:
- ही विमानवाहक नौका 265.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद आहे, ज्याचे विस्थापन (वजन) सुमारे 45,000 टन आहे.
- हे चार गॅस टर्बाइनद्वारे चालवले जे एकत्रितपणे सुमारे 88 मेगावॅट वीज निर्माण करतात.
- आयएनएस विक्रांत 28 नॉट्सचा जास्तीत जास्त वेग गाठू शकते.
- या जहाजात महिला अधिकारी आणि खलाशांसह सुमारे 1600 कर्मचारी सामावून घेतले जाऊ शकतात आणि त्यात सुमारे 2200 कंपार्टमेंट आहेत.
- ही नौका शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) प्रणालीवर चालते, ज्यामुळे विमानांना स्की-जंप वापरून उड्डाण करता येते आणि अरेस्टर वायरच्या मदतीने सुरक्षितरित्या उतरता येते.
- या विमानवाहू नौकेवर मिग 29के लढाऊ विमाने, मिग 29 केयूबी, चेतक, कामोव 31, एमएच 60आर हेलिकॉप्टर आणि ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) यासह 30 विमानांची क्षमता आहे.
- ही नौका जवळपास 5,000 घरांना पुरेल इतकी वीज निर्माण करते. नौकेतील अंतर्गत वायरिंग कोची ते काशी या दोन शहरातील अंतराइतकी लांब आहे.

आयएनएस विक्रांतची कामगिरी
भारतीय नौदलात सामील झाल्यापासून, आयएनएस विक्रांतने देशाच्या सागरी सामर्थ्याचा आधारस्तंभ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे केवळ या नौकेच्या प्रगत क्षमता प्रदर्शित होत नाहीत तर हिंद - प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या ‘सागर’ (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ) या दृष्टिकोनाबद्दल भारताची वचनबद्धता देखील बळकट होते.
- पहिली समुद्री चाचणी (4 ऑगस्ट 2021): आयएनएस विक्रांतने कोची येथून आपल्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली. ज्या प्रवासादरम्यान नौकेने प्रणोदन (propulsion), नेव्हिगेशन आणि शस्त्र प्रणालींचे प्रमाणीकरण केले आणि पूर्ण परिचालन तयारीचा पाया रचला.
- एलसीए (नेव्ही) आणि मिग-29के चे पहिले लँडिंग (फेब्रुवारी 2023): या नौकेने स्वदेशी एलसीए नेव्ही आणि मिग-29के जेट्सचे पहिले लँडिंग साध्य केले.
- रात्रीचे लँडिंग ऑपरेशन्स (मे 2023): आयएनएस विक्रांतने यशस्वी रात्रीचे लँडिंग केले, आव्हानात्मक परिस्थितीत जटिल मोहिमांसाठी तयारी दर्शविली.
- अंतिम कार्यकारी मंजुरी (जानेवारी-नोव्हेंबर 2024): आयएनएस विक्रांत ने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या दिवस-रात्र उड्डाणांसह 750 तासांहून अधिक उड्डाण संचलनाने नौकेच्या परिचालन तयारीला प्रमाणीत केले आहे.
- मिलन 24: आयएनएस विक्रांतने फेब्रुवारी 2024 मध्ये मिलान 24 मध्ये भाग घेतला, हा भारतीय नौदलाने आयोजित केलेला द्वैवार्षिक बहुपक्षीय नौदल सराव होता, ज्यामध्ये 36 हून अधिक जहाजे, दोन पाणबुड्या, 55 विमाने आणि सहा खंडांमधील 47 मीत्र देशांचे वरिष्ठ नेतृत्व सहभागी झाले होते. या कार्यक्रमाने हिंद महासागर प्रदेशात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून मुख्य दर्जा पुन्हा स्थापित केला तसेच भारतीय नौदलाच्या संरचनेला लढण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह, एकजूट आणि भविष्यासाठी तयार दल म्हणून बळकट केले.

- राष्ट्रपती भेट आणि कार्यप्रणाली प्रदर्शन (7 नोव्हेंबर 2024): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आय एन एस विक्रांत ला भेट देऊन विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग, क्षेपणास्त्र प्रात्यक्षिके आणि ताफ्याच्या हलचाली पाहिल्या, ज्यामुळे आयएनएस विक्रांतची सागरी शक्तीचे एक जबरदस्त प्रतीक म्हणून भूमिका अधोरेखित झाली.
- वरुण सराव 2025 : आयएनएस विक्रांतने मार्च 2025 मध्ये कॅरियर स्ट्राइक ग्रुप आणि फ्रेंच नौदलाच्या चार्ल्स डी गॉलसह एक्स- वरुण 25 या फ्रेंच नौदला सोबतच्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतला. यावेळी आयएन कॅरियर बॅटल ग्रुप आणि एफएफएन सीएसजी यांच्या सहभागाने प्रगत पाणबुडीविरोधी युद्ध आणि हवाई संरक्षण सराव घेण्यात आला.
- संचालनात्मक कामगिरी (मार्च 2025): अरबी समुद्रात तैनात असताना, आयएनएस विक्रांत’ने आयएनएस दीपकच्या सोबतीने ‘एमव्ही हेलान स्टार’ या पनामा-ध्वजधारी मालवाहू जहाजासंबंधित आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी त्वरित वळवण्यात आले. आयएनएस विक्रांतच्या सी किंग हेलिकॉप्टरने एक अत्यंत कठीण वैद्यकीय बचाओ मोहीम (MEDEVAC) यशस्वीरित्या पूर्ण केली. आणि, एमव्ही हेलान स्टारमधील तीन जखमी क्रू सदस्यांना गोव्यातील आयएनएस हंसा येथे सुरक्षित पोहोचवले.
- युद्ध क्षेत्रस्तरीय संचालनात्मक सज्जता सराव (TROPEX 2025): हिंद महासागर प्रदेशातील भारताच्या सर्वात मोठ्या द्वैवार्षिक सरावात आयएनएस विक्रांत’ने भाग घेतला, ज्यामध्ये 150 हून अधिक युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांनी सहभाग घेतला आणि या सरावात सागरी युद्धाच्या सर्व क्षेत्रांतील कौशल्यांची चाचणी घेण्यात आली.
- कोकण 2025 सराव: आयएनएस विक्रांत’ने युनायटेड किंगडमच्या रॉयल नेव्हीसोबत मुंबई किनाऱ्यावर द्विपक्षीय सराव आयोजित केला होता, ज्यामध्ये हवाई, पृष्ठभागीय आणि पाणबुडी विरोधी सैन्य संचलनाचा समावेश होता.
- ऑपरेशन सिंदूर: ऑपरेशन सिंदूर दरम्यान विक्रांत विमानवाहू नौका युद्ध गट भारतीय नौदलाच्या आक्रमक प्रतिबंधक भूमिकेच्या केंद्रस्थानी होता. उत्तर अरबी समुद्रात तैनात असलेल्या विक्रांत विमानवाहू नौका युद्ध गटाने विशिष्ट रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे पाकिस्तान नौदलाला बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले आणि त्यांना तातडीने युद्धबंदीची विनंती करण्यासही भाग पाडले.
- समुद्रात पंतप्रधानांनी व्यतीत केला एक दिवस (ऑक्टोबर 2025): 19 ते 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीनिमित्त या जहाजाने पंतप्रधानांना रात्रीच्या समुद्र सफरीसाठी आमंत्रित केले होते.
आयएनएस विक्रांत: मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षेत्रातील आधारस्तंभ (एचएडीआर)
आयएनएस विक्रांतने आपल्या धोरणात्मक लष्करी क्षमतेच्या पलीकडे, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) क्षेत्रात स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा आणि सक्षम संसाधन म्हणून सिद्ध केली आहे.
मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षेत्रातील (HADR) मोहिमांसाठी धोरणात्मक क्षमता

आयएनएस विक्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ते विविध मोहिमांसाठी एक बहुमुखी व्यासपीठ बनले आहे. त्याच्या डिझाइनमध्ये यंत्रसामग्री संचालन, जहाज संचालन आणि टिकून राहण्यासाठी उच्च दर्जाचे स्वचालन समाविष्ट आहे, जे आपत्कालीन तैनाती दरम्यान त्याची कार्यक्षमता वाढवते. विक्रांतच्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची बळकट वीज निर्मिती प्रणाली, जी 5,000 घरांसाठी पुरेल इतकी वीज निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे. या क्षमतेमुळे विक्रांतला दुर्गम किंवा आपत्तीग्रस्त भागात निरंतर सेवा बजावणे सुलभ होते. याव्यतिरिक्त, या विमानवाहू नौकेच्या प्रगत विमान वाहतूक सुविधांमुळे आपत्कालीन परिस्थितीत ती चलनशील कमांड सेंटर, रुग्णालय आणि पुरवठा केंद्र म्हणूनही काम करण्यास सक्षम होते.
भारताच्या प्रादेशिक रणनीतीशी संरेखन
मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षेत्रातील (HADR) अभियाना आयएनएस विक्रांतची भूमिका भारताच्या व्यापक सागरी धोरणाशी, विशेषतः 'SAGAR' (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ) उपक्रमाशी सुसंगत आहे. आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानवीय मदत आणि आपत्ती निवारण प्रदान करण्यात भारतीय नौदल नेहमीच अग्रभागी राहिले आहे. या कार्यामुळे हिंद महासागर क्षेत्रात 'मुख्य सुरक्षा भागीदार' आणि 'प्रथम प्रतिसादकर्ता' म्हणून भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.
बचाव कार्य

गोव्याच्या पश्चिमेला सुमारे 230 नॉटिकल मैल अंतरावर पनामा ध्वजधारी एमव्ही हेलन स्टारच्या आपत्कालीन आवाहनाला प्रतिसाद देत, आयएनएस विक्रांतच्या सी किंग हेलिकॉप्टरने तीन जखमी क्रू सदस्यांना वैद्यकीय मदतीसाठी आयएनएस हंसा येथे यशस्वीरित्या हलवले. या कामगिरीने राष्ट्रीय समुद्री सीमेच्या पलीकडे जाऊन मानवीय मदत आणि आपत्ती निवारणासाठी (एचएडीआर) भारतीय नौदलाच्या दृढ वचनबद्धतेचे उदाहरण दिले.
भारताच्या सागरी आत्मनिर्भरतेत एक मैलाचा दगड
भारतीय शिपयार्ड्सनी 2014 पासून आतापर्यंत नौदलाला 40 हून अधिक स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या दिल्या आहेत, ज्यामध्ये सरासरी दर 40 दिवसांनी एक नवीन प्लॅटफॉर्म समाविष्ट केला जात आहे. सागरी सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने क्षमता निर्माण करण्याच्या देशाच्या उत्साह आणि जोशाचे हे खरे उदाहरण आहे. आयएनएस विक्रांतचा विकास आणि तिचे कार्यान्वित होणे हे भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे.
स्वदेशी डिझाइन आणि बांधकाम
आयएनएस विक्रांतची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरो (डब्ल्यूडीबी) द्वारे करण्यात आली होती तर कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे तिची बांधणी करण्यात आली. हे भारताच्या स्वदेशी युद्धनौका रचना आणि निर्माण क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या युद्धनौकेत मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा वापर केलेला आहे. ही उपकरणे आणि यंत्रसामग्री तयार करण्यात देशातील प्रमुख औद्योगिक संघटनांनी योगदान दिले आहे – जसे की बीईएल, भेल, जीआरएसई, केल्ट्रॉन, किर्लोस्कर, लार्सन अँड टुब्रो, वॉर्टसिला इंडिया इत्यादी. याशिवाय 100 हून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची देखील यात भागीदारी आहे. आयएनएस विक्रांत साठी स्वदेशी युद्धनौका दर्जाच्या पोलादाचा विकास आणि उत्पादन नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) यांच्या यशस्वी भागीदारीद्वारे करण्यात आले. या सहयोगामुळे भारत युद्धनौका निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या ओलावाच्या उत्पादनात पूर्णपणे आत्मनिर्भर झाला आहे जे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
सागरी क्षमता वाढवणे
जून 2023 मध्ये, भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य यांच्यासह विविध जहाजे, पाणबुड्या आणि विमानांचा ताफा असलेल्या बहु-वाहक अभियान संचालित केले. या अभियानाने भारताच्या जबरदस्त सागरी क्षमतांचे प्रदर्शन केले, सागरी क्षेत्रात भारताची तांत्रिक कौशल्ये प्रदर्शित केली. हे केवळ भारतीय नौदलाच्या नेटवर्क सक्षम संचालनाची परिपक्वता दर्शवत नव्हते तर हिंद प्रशांत क्षेत्रात भारताच्या सामरिक उपस्थिती आणि समुद्री श्रेष्ठतेचे देखील प्रदर्शन होते.
धोरणात्मक खरेदी: राफेल-मरीन जेट्स
एप्रिल 2025 मध्ये, भारताने फ्रान्ससोबत 26 राफेल-मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला. या विमानांना विशेष रूपाने विमान वाहक नोकेवरून संचालित करण्यायोग्य बनवण्यात आले आहे. यामुळे भारताच्या नौदल वायूशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण वृद्धी होईल. या खरेदीमध्ये पायलट प्रशिक्षण, फ्लाइट सिम्युलेटर, अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि दीर्घकालीन देखभाल सहाय्यता समाविष्ट आहे. याशिवाय, भारतीय संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण देखील समाविष्ट आहे. राफेल-मरीन जेट्स आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन्ही विमानवाहू नौकांचे हवाई सामर्थ वाढवतील, ज्यामुळे भारतीय नौदलाची युद्ध तत्परता आणि संचालन क्षमता अभूतपूर्व रीत्या बळकट होईल.
स्वदेशी जहाजबांधणीसाठी वचनबद्धता
भारतीय नौदलाचे दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वप्न आणि पूर्व नौदल कमांडला बळकट करण्यासाठी विशाखापट्टणममध्ये आयएनएस विक्रांत तैनात करण्याची योजना यातून देशाची आत्मनिर्भरता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठीची अतुट वचनबद्धता अधोरेखित होते. डिसेंबर 2024 पर्यंत भारतात 133 हून अधिक जहाजे आणि पाणबुड्यांची बांधणी केली आहे तसेच नौदलात त्यांचा यशस्वी समावेश करण्यात आला आहे. यामुळे भारतीय नौदल भारतीय जहाजबांधणी क्षेत्राच्या वाढीला पाठिंबा देणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत, नौदलात समाविष्ट करण्याच्या नियोजित 64 युद्धनौकांपैकी 63 युद्धनौका भारतात बांधल्या जात आहेत. यामध्ये भव्य विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत तसेच अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात यांचाही समावेश आहे.
निष्कर्ष
आयएनएस विक्रांत हे भारताच्या सागरी पुनरुत्थानाचे एक चिरंतन प्रतीक आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही विमानवाहू नौका समुद्राच्या लाटांना छेद देत भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रभावी प्रदर्शन करते. भारतीय नौदलाची प्रादेशिक सुरक्षा भूमिका अधिक सक्षम बनवण्याबरोबरच विक्रांत भावी पिढ्यांना संपूर्ण संरक्षण स्वदेशीकरणासाठी प्रेरित करते. भारत हिंद-प्रशांत क्षेत्रात आपले अस्तित्व अधिक बळकट करत असताना, ही विमानवाहू नौका जगातील सर्वोच्च संरक्षण निर्यातदारांपैकी एक बनण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षेला देखील अधोरेखित करते. आयएनएस विक्रांतने देशात एक नवीन आत्मविश्वास जागवला आहे आणि इतर राष्ट्रांचा भारतावरही एक नवीन विश्वास निर्माण केला आहे.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156423)
आगंतुक पटल : 43
Provide suggestions / comments