Technology
राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे प्रशासकीय व्यवस्थेचे सशक्तीकरण
Posted On:
24 OCT 2025 10:38AM
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2025
महत्त्वाचे मुद्दे
- राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा सप्टेंबर 2024 मध्ये 64.76 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू करण्यात आला.
- राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखड्याच्या मुख्य घटकांमध्ये विश्वस्य ब्लॉकचेन स्टॅक, एनबीएफ-लाईट, प्रामाणिक आणि राष्ट्रीय ब्लॉकचेन पोर्टल यांचा समावेश आहे.
- भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबाद येथील एनआयसी डेटा सेंटरमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान स्टॅक तैनात करण्यात आला आहे.
- 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत ब्लॉकचेन व्यासपीठावर 34 कोटींहून अधिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
परिचय
क्रिप्टोकरन्सीशी सुरुवातीला जोडल्या गेलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने आता 21 व्या शतकातील सर्वाधिक परिवर्तनकारी डिजिटल नवोन्मेषापैकी एक म्हणून स्थान मिळवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाची ताकद संगणकीय शक्तीत असते, त्याविरुद्ध ब्लॉकचेनची ताकद मध्यस्थांशिवाय पडताळणीयोग्य विश्वास स्थापित करण्याच्या क्षमतेमध्ये आहे.
भारताच्या सध्याच्या प्रशासन प्रणाली बहुदा केंद्रीकृत डेटाबेसवर अवलंबून असतात, ज्यामध्ये चुका, फसवणूक आणि पारदर्शकतेचा अभाव असू शकतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आपल्या छेडछाड न करता येणाऱ्या, वितरित लेखाजोख्याच्या प्रणालीद्वारे या आव्हानांचा मुकाबला करते, जिथे माहिती अनेक नोड्समध्ये सुरक्षितरित्या राखली जाते. या रचनेमुळे अनधिकृत बदल करणे जवळजवळ अशक्य होते तसेच माहितीची अखंडता आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणावर वाढते.

या तंत्रज्ञानाच्या प्रचंड क्षमतेची दखल घेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा (NBF) विकसित केला आहे. विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेन आधारित उपाययोजना लागू करण्यासाठी एक एकीकृत संरचना उपलब्ध करून देणे, हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखड्यात सार्वजनिक सेवा वितरणात ब्लॉकचेन तंत्रज्ञान एकत्रीकरणासाठी मार्गदर्शन करणे हे ध्येय असून त्यामुळे अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची खात्री होईल.
ब्लॉकचेन म्हणजे काय?
ब्लॉकचेन ही एक वितरित, पारदर्शक, सुरक्षित आणि अपरिवर्तनीय डेटाबेस प्रणाली आहे जी रेकॉर्ड किंवा व्यवहारांच्या वही खात्यासारखे कार्य करते. ही प्रणाली छेडछाड न करता येण्याजोगी असून संगणकाच्या नेटवर्कवर सर्वांसाठी उपलब्ध असते.
ब्लॉकचेन चे प्रकार समजून घेऊया
- सार्वजनिक ब्लॉकचेन: या नेटवर्कमध्ये, सर्व नोड्स नोंदी पाहू शकतात, व्यवहारांची पडताळणी करू शकतात, कामाचे प्रमाणीकरण करू शकतात तसेच नवीन ब्लॉक जोडू शकतात.
- खाजगी ब्लॉकचेन: ही एक परवानगी आधारित ब्लॉकचेन प्रणाली आहे, जी संस्थेतील केवळ निवडक सहभागींसाठी मर्यादित आहे. नियंत्रण करणारी संस्था सुरक्षा, अधिकृतता आणि प्रवेशाचे स्तर निश्चित करते, ज्यामुळे ते शासकीय वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या रचनेमुळे सहभागी संस्थांमधील विश्वास वाढतो तसेच डेटा गोपनीयता आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते.
- कन्सोर्टियम ब्लॉकचेन: ही प्रणाली अर्ध-विकेंद्रित आहे, आणि अनेक संस्थांकडून संयुक्तपणे चालवलेली असते. यामध्ये सामायिक डेटा व्यवस्थापन आणि पडताळणी केली जाते.
- हायब्रिड ब्लॉकचेन: ही सार्वजनिक आणि खाजगी ब्लॉकचेनची मिश्रित रचना आहे ज्यात निवडक डेटा प्रवेश दिला जातो.

ब्लॉकचेनची मूलभूत ताकद - पारदर्शकता, अपरिवर्तनीयता, विकेंद्रीकरण आणि विश्वास - ही राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखड्याची प्रमुख बलस्थाने आहेत. ही वैशिष्ट्यांमुळे सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल प्रणाली निर्माण करता येते, ज्याद्वारे प्रशासनात परिवर्तन, नागरिक सेवांचे उन्नतीकरण आणि प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता या बाबी साध्य करता येतात.

राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा: सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणावर लागू करता येण्याजोग्या डिजिटल प्रशासकीय व्यवस्थेसाठी भारताचे स्वदेशी व्यासपीठ
राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा (NBF) मार्च 2021 मध्ये 64.76 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह आरंभ करण्यात आला आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अधिकृत उद्घाटनाबरोबर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखड्याचा उद्देश परवानगी आधारित ब्लॉकचेन उपयोगाच्या विकास आणि अंमलबजावणीला गती देणे हा आहे. यामुळे भारतासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि विस्तारक्षम डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल टाकले गेले आहे.
तंत्रज्ञान स्टॅक - विश्वस्य ब्लॉकचेन स्टॅक
राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखड्याच्या केंद्रस्थानी आहे - विश्वस्य ब्लॉकचेन स्टॅक .
हे एक स्वदेशी आणि मॉड्यूलर व्यासपीठ आहे जे प्रशासनासाठी ब्लॉकचेन-आधारित अनुप्रयोग तयार करण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. विश्वस्य ब्लॉकचेन स्टॅकची वैशिष्ट्ये अशी आहेत:
- ब्लॉकचेन-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS): विश्वस्य ब्लॉकचेन पायाभूत सुविधांना एक सामायिक सेवा म्हणून प्रदान करते. त्यामुळे सरकारी संस्थांना त्यांच्या स्वतःच्या पायाभूत सुविधा तयार करण्याची किंवा व्यवस्थापित करण्याची आवश्यकता राहत नाही आणि त्यांना ब्लॉकचेन-आधारित अनुप्रयोग विकसित आणि तैनात करता येतात.
- वितरित पायाभूत सुविधा: ही प्रणाली भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबाद येथे असलेल्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रातील डेटा सेंटरमध्ये तैनात करण्यात आली आहे. या वितरित नेटवर्क रचनेमुळे ब्लॉकचेन-आधारित अनुप्रयोगांसाठी दोष सहिष्णुता, मापनीयता आणि बळकटी प्राप्त होते.
- परवानगी आधारित ब्लॉकचेन स्तर: हे व्यासपीठ एका परवानगी आधारित ब्लॉकचेनवर तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे केवळ पडताळलेले आणि अधिकृत सहभागीच व्यवहारांमध्ये सामील होऊ शकतात किंवा प्रमाणित करू शकतात याची खात्री होते.
- ओपन एपीआय आणि एकत्रीकरण सेवा: विश्वस्य ओपन एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) प्रमाणीकरण आणि डेटा देवाणघेवाण करण्यासाठी एकत्रीकरण मॉड्यूल प्रदान करते. ही वैशिष्ट्ये ई-गव्हर्नन्स व्यासपीठाची अखंडपणे जोडणी करण्यास सक्षम करतात.
एनबीएफ-लाईट (NBFLite) - स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी ब्लॉकचेन सँडबॉक्स
एनबीएफ-लाईट ही ब्लॉकचेन तंत्रज्ञान स्टॅकची सँडबॉक्स आवृत्ती आहे, जी नवोन्मेष, प्रयोग आणि क्षमता विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहे. याद्वारे स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि विद्यार्थ्यांना नियंत्रित वातावरणात ब्लॉकचेन-आधारित अनुप्रयोगांचे प्रोटोटाइप तयार करण्याची परवानगी देते, तेही मोठ्या प्रमाणात लागू करण्याची आवश्यकता न ठेवता. या व्यासपीठासोबत स्मार्ट कॉन्टॅक्ट टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत, जसे की पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि डिजिटल प्रमाणपत्र – ज्याद्वारे वापरकर्ते जलद गतीने अनुप्रयोग विकसित करू शकतात आणि पडताळू शकतात.
प्रामाणिक - ॲप पडताळणीसाठी अभिनव ब्लॉकचेन उपाय
आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल जगात, दुष्ट हेतूने प्रेरित ॲप्स आणि फसव्या ग्राहक सहाय्यापासून मोबाइल उपकरणाचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण हे धोके वैयक्तिक डेटाची चोरी करु शकतात आणि आर्थिक नुकसानीचे कारण बनू शकतात. प्रामाणिक हा एक अभिनव उपाय आहे जो मोबाइल ॲपची प्रामाणिकता आणि उगम पडताळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करतो. वापरकर्ते जेव्हा एखादे ॲप स्कॅन करतात किंवा तपासतात, तेव्हा प्रामाणिक त्या ॲपची माहिती ब्लॉकचेनवरील नोंदींशी जुळवून पाहते, यातून त्याची वैधता निश्चित होते. परिणामी मोबाइल इकोसिस्टम मध्ये विश्वास आणि पारदर्शकता वाढीस लागते.

राष्ट्रीय ब्लॉकचेन पोर्टल
राष्ट्रीय ब्लॉकचेन पोर्टल प्रशासन आणि उद्योगात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची रूपरेषा देते. हे व्यासपीठ नवोन्मेष, मानकीकरण आणि अनुप्रयोगांसाठी ब्लॉकचेनचा क्रॉस-सेक्टर अवलंब यांना चालना देते. ज्यामुळे ब्लॉकचेन अनुप्रयोग मध्ये विश्वास, नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये भारताचे जागतिक नेतृत्व दृढ होते. भारताचा राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा हा जगातील काही शासकीय-नेतृत्वाखालील उपक्रमांपैकी एक आहे जो अनेक उद्योगांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरायला पाठिंबा देते.

ब्लॉकचेन-सक्षम साखळ्या - प्रशासन, पुरवठा साखळी आणि न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडवत आहेत
विश्वसनीय डिजिटल अर्थव्यवस्थेकडे भारताचा प्रवास प्रमुख नियामक आणि तंत्रज्ञान सक्षमकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे चालवला जात आहे. प्रशासन, पुरवठा साखळी आणि उपक्रमांमध्ये ब्लॉकचेन स्वीकारण्यासाठी राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा मुख्य पायाभूत सुविधा प्रदान करते.
प्रमाणपत्र आणि दस्तऐवज साखळी
सध्या प्रमाणपत्रे जारी करणे आणि त्यांचा वापर करणे या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर आणि सेवा वितरणात होणारा विलंब यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. या आव्हानांवर मात करण्यासाठी, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) अशा नोंदींची सुरक्षित साठवण आणि पुनर्प्राप्ती साठी 'प्रमाणपत्र साखळी' तयार करण्याच्या उद्देशाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
या प्रमाणपत्र साखळीचा एक वापर म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक प्रमाणपत्रांची नोंद ब्लॉकचेन वर ठेवणे.

त्याचप्रमाणे, प्रमाणपत्र साखळी हे एक एकमेव असे व्यासपीठ आहे जे शासकीय प्राधिकरणे आणि दस्तऐवज वापरणाऱ्या संस्थांना प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे साठवण्यासाठी तसेच ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी एक मानक प्रक्रिया उपलब्ध करून देते. या साखळीत द्वारे जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म आणि मृत्यू दाखले इत्यादी विविध शासकीय कागदपत्रे सुरक्षित रित्या साठवली जातात. 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत, भारतातील ब्लॉकचेन-आधारित व्यासपीठाद्वारे 34 कोटींहून अधिक कागदपत्रांची सुरक्षितपणे पडताळणी करण्यात आली आहे, त्यापैकी 48,000 हून अधिक कागदपत्रे दस्तऐवज साखळीशी संबंधित आहेत.
लॉजिस्टिक्स साखळी
लॉजिस्टिक्स साखळी अनेक भागधारकांमध्ये वस्तू किंवा संसाधनांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी एक सुरक्षित आणि पारदर्शक व्यासपीठ प्रदान करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून, पुरवठा साखळीतील सर्व व्यवहार छेडछाड न करता येणाऱ्या नोंदवहीत नोंदवले जातात, ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर ट्रेसेबिलिटी आणि जबाबदारी सुनिश्चित होते. लॉजिस्टिक्स साखळीच्या वापराच्या प्रकरणांपैकी एक म्हणजे कर्नाटकातील औषधांसाठी ऑनलाइन पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणाली (औषध).
औषध प्रणाली ब्लॉकचेनशी एकात्मिक बनवण्यात आली आहे, ज्या द्वारे औषध निर्मिती केंद्रापासून ते रुग्णालयापर्यंतच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली जाते. त्यात गुणवत्ता तपासणी देखील समाविष्ट आहे. रुग्ण औषध सेवन करण्यापूर्वी औषध उत्पादकाचे तपशील, कालबाह्यता तपशील आणि गुणवत्ता तपासू शकतात. ही प्रणाली व्यवहारांमध्ये ट्रेसेबिलिटी (ट्रॅक आणि ट्रेस) प्रदान करते ज्यामुळे बनावट औषधे बाजारात प्रवेश करण्याची शक्यता कमी होते, अचूकता वाढते आणि पारदर्शकता येते.
न्यायव्यवस्था साखळी
न्यायव्यवस्था साखळी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा आणि कागदपत्रांचे सुरक्षित, अपरिवर्तनीय आणि वेळेवर स्टँप केलेला रेकॉर्ड प्रदान करून न्यायव्यवस्थेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विश्वास वाढवते. ब्लॉकचेनच्या माध्यमातून नोटीस, समन्स आणि जामीन आदेशांचे इलेक्ट्रॉनिक वितरण सुलभ झाले आहे, ज्यामुळे विलंब कमी होतो आणि हाताने करायच्या कामावरील अवलंबित्व कमी होते. 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत ब्लॉकचेन व्यासपीठावर एकूण 665 न्यायव्यवस्था कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
आंतर परिचालित गुन्हे न्याय व्यवस्था (ICJS)
न्यायव्यवस्था साखळीवर आधारित, आंतर परिचारित गुन्हे न्याय व्यवस्था (ICJS) संपूर्ण गुन्हे न्याय परिसंस्थेला एकत्रित करते. याद्वारे केस रेकॉर्ड, पुरावे आणि न्यायालयीन कागदपत्रांसाठी एक एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होते. 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत, ब्लॉकचेन व्यासपीठावर 39,000 हून अधिक आंतर परिचालित गुन्हे न्याय व्यवस्था (ICJS) कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
मालमत्ता साखळी
ब्लॉकचेन-आधारित मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली हे सुनिश्चित करते की प्रत्येक मालमत्ता व्यवहाराची ब्लॉकचेनवर सुरक्षितपणे नोंद केली जाईल. जमिनीच्या नोंदींमध्ये कोणत्याही सुधारणा, बदल किंवा हस्तांतरण करतानाही, सर्व संबंधित पक्षांना निर्णय घेण्यापूर्वी व्यवहाराचा संपूर्ण इतिहास पाहता येतो. या पारदर्शकतेमुळे संभाव्य खरेदीदारांना मालकी हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची पडताळणी करणे सोपे होते. परिणामी, खटल्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते आणि वादाचे निराकरण जलद होते. 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत, ब्लॉकचेन व्यासपीठाद्वारे 34 कोटींहून अधिक मालमत्ता कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
भारतात ब्लॉकचेन स्वीकारण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शक आराखडा आणि नियामक उपक्रम
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे विकसित केलेले राष्ट्रीय ब्लॉकचेन धोरण भारतातील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक मार्गदर्शक आराखडा म्हणून काम करते. या धोरणात ब्लॉकचेनच्या अंमलबजावणीतील आव्हाने तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित केली गेली आहेत. ज्यायोगे विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉगचे एकत्रीकरण साध्य करता येईल.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील उत्कृष्टता केंद्र (CoE) (BCT)
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) ने एक ब्लॉकचेन उत्कृष्टता केंद्र (CoE) स्थापन केले आहे. हे केंद्र शासकीय विभागांना सल्लामसलत, प्रशिक्षण आणि सहाय्य उपलब्ध करून देणारे व्यासपीठ म्हणून काम करते. याद्वारे विभागांना प्रायोगिक प्रकल्प विकसित करून पूर्ण प्रमाणावर अंमलबजावणी पूर्वी त्याची चाचणी घेता येते.
हे उत्कृष्टता केंद्र ब्लॉकचेनशी संबंधित सेवा आणि आयसीटी (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान) पायाभूत सुविधा प्रदान करते जे विभागांना आपल्या व्यवस्थेला जोडण्यासाठी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान (BCT) प्रभावीपणे वापरण्यासाठी मदत करते. त्याने हायपरलेजर सॉटूथ, हायपरलेजर फॅब्रिक आणि इथरियम सारख्या लोकप्रिय ब्लॉकचेन व्यासपीठाबरोबर काम केले आहे - जे सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल नेटवर्क तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओपन-सोर्स सिस्टम आहेत.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील (BCT) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची (TRAI) भूमिका
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ब्लॉकचेन-आधारित वितरित लेखाजोखा तंत्रज्ञान (DLT) दूरसंचार प्रणालीत समाविष्ट केले आहे. या अंतर्गत सर्व प्रमुख संस्था (PEs) आणि टेलिमार्केटर्स (TMs) यांना त्यांच्या संदेश प्रसारण साखळ्यांची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. यामुळे एसएमएस चा उगम ते वितरणापर्यंतचा संपूर्ण प्रवासाचे एंड-टू-एंड ट्रॅकिंग शक्य झाले आहे. नियामक आणि सेवा प्रदात्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्राहक संरक्षण मजबूत झाले आहे, स्पॅम मध्ये घट झाली आहे तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियमांचे पालन आणि डिजिटल विश्वास अधिक बळकट झाला आहे. 1.13 लाखांहून अधिक संस्थांना व्यापणारा हा मोठ्या प्रमाणावरील उपक्रम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (SEBI), राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) आणि सी-डॅक यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबवण्यात आला आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन भारताच्या वित्तीय प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. या अंतर्गत डिजिटल रुपया (e₹) सारख्या प्रायोगिक प्रकल्पाची सुरुवात डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आली. हा रिटेल प्रायोगिक प्रकल्प ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या नियंत्रित गटात सुरू करण्यात आला असून याद्वारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान त्वरित पारदर्शक आणि ट्रेसिबल व्यवहार कसे सक्षम करते हे दाखवले आहे. यामुळे वित्तीय समावेशन आणि पेमेंट प्रणालीतील नवोन्मेष यांना चालना मिळाली आहे.
डिबेंचर करार देखरेखीसाठी एनएसडीएल कडून ब्लॉकचेनचा अवलंब
भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने डिबेंचर करार देखरेखीसाठी वितरित लेखाजोखा तंत्रज्ञान (डीएलटी) आधारित ब्लॉकचेन व्यासपीठ सुरू केले आहे. जे भारताच्या भांडवली बाजाराच्या आधुनिकीकरणात एक मोठे पाऊल आहे. हे व्यासपीठ जारीकर्त्यांना आणि डिबेंचर विश्वस्तांना मालमत्तेवरील हक्काची नोंद, मालमत्ता गुणोत्तरांचे निरीक्षण आणि कराराचे ट्रेकिंग करण्यासाठी सक्षम बनवते. हा लेखाजोखा छेडछाड करता येणार नाही असा, क्रिप्टोग्राफिकली स्वाक्षरी आणि टाईम स्टॅम्प याद्वारे सुरक्षित केलेला आहे. यामुळे पडताळणीयोग्य ऑडिट ट्रेल तयार करते आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवते.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील क्षमता निर्माण उपक्रम
ब्लॉकचेनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ब्लॉकचेनवर लक्ष केंद्रित करून अनेक क्षमता विकास कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांचे उद्दिष्ट भविष्यासाठी तयार असलेले तंत्रज्ञान निपुण कार्यबल तयार करणे हे आहे.
कौशल्य विकास कार्यक्रम
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (MeitY) च्या क्षमता विकास विभागाने विविध विभागांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढवच्या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतले आहेत. आजपर्यंत 214 हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रमातून ब्लॉकचेन सारख्या उदयोन्मुख क्षेत्रात 21,000 हून जास्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. राज्य ई-मिशन टीम्स (SeMTs) च्या साह्याने, हा उपक्रम भविष्यासाठी तंत्रज्ञान आधारित प्रशासन चालविण्याकरिता सज्ज असलेले प्रशासकीय कार्य बल निर्माण करत आहे.
फिनटेक आणि ब्लॉकचेन डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका (PG-DFBD)
क्रिप्टोकरन्सी, एनएफटी (नॉन-फंजिबल टोकन्स) आणि इतर ब्लॉकचेन अनुप्रयोगांच्या वाढीमुळे जलद, स्वस्त आणि अधिक सुरक्षित व्यासपीठाची गरज निर्माण झाली आहे, ज्यामुळे फिनटेक परिसंस्था वेगाने विकसित होत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, फिनटेक आणि ब्लॉकचेन डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका (PG-DFBD) सारखे कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग, सायबरसुरक्षा, प्रोग्रामिंग आणि नियामक आराखडा यासारख्या विषयांचा 900 तासांचा व्यापक अभ्यासक्रम प्रदान केला जातो, जो व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवण्यासाठी मदत करतो.
ब्लेंड (BLEND): सी-डॅक (C-DAC) ऑनलाइन अभ्यासक्रम
प्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC) द्वारे राबविला जाणारा ब्लेंड (BLEND) हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील व्यावसायिकांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि त्याच्या व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये प्रवीण्य मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ब्लॉकचेन संकल्पना, रचना, घटक आणि कार्यप्रणाली यांचे सखोल ज्ञान प्रदान करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सहभागींना विविध क्षेत्रांमध्ये वास्तविक-जगात ब्लॉकचेन अनुप्रयोग विकसित करण्यासाठी सक्षम बनवतो.
फ्यूचर स्किल्स प्राइम
फ्यूचरस्किल्स प्राइम (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळाचा पुन:कौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीसाठी उद्योगाभिमुख कार्यक्रम) हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे प्रायोजित एक उद्योग-केंद्रित उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील मनुष्यबळाला ब्लॉकचेनसह दहा उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये डिजिटल कौशल्य देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवणे आणि देशाच्या तंत्रज्ञान प्रतिभेला बळकटी देणे हा आहे.
पुढील दिशा : भविष्यातील ब्लॉकचेन वापर प्रकरणे

सार्वजनिक सेवांमध्ये कार्यक्षमता आणि विश्वास वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेन-आधारित वापर प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे. ब्लॉकचेन प्रशासनात नवोन्मेष कशाप्रकारे घडवून आणू शकते, कशाप्रकारे जबाबदारी सुनिश्चित करू शकते आणि कशाप्रकारे प्रणालीगत अकार्यक्षमता कमी करू शकते, हे या उपक्रमातून दिसून येते. संकल्पनांच्या प्रमुख पुराव्यांमध्ये (POCs) सुरक्षित मालकी नोंदीसाठी जमिनीचे अभिलेख, पारदर्शक रक्तदान ट्रॅकिंगसाठी रक्तपेढी, रिअल-टाइम कर देखरेखीसाठी वस्तू आणि सेवा कर साखळी तसेच सुरक्षित पुरवठा साखळीसाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) यांचा समावेश आहे.
निष्कर्ष
डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनानुसार, ब्लॉकचेन तंत्रज्ञान डिजिटल प्रशासनात विश्वास आणि पारदर्शकतेचा पाया मजबूत करत आहे. राष्ट्रीय ब्लॉकचेन आराखडा उपक्रमाद्वारे, भारत एक एकात्मिक आणि अंतर संचालनीय ब्लॉकचेन परिसंस्था निर्माण करत आहे जी सरकार-ते-नागरिक (G2C) आणि सरकार-ते-व्यवसाय (G2B) सेवांना सक्षम बनवते. यासोबतच, तंत्रज्ञानात नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेला चालना दिली जात आहे. क्षमता निर्माण आणि स्वदेशी ब्लॉकचेन उपायांच्या विकासावर सतत लक्ष केंद्रित करून, भारत समावेशक वाढीसाठी ब्लॉकचेनचा वापर करण्यात जागतिक नेता म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे.
संदर्भ
Ministry of Electronics and IT
Rajya Sabha
Ministry of Communications
Ministry of Finance
Digital India Corporation
National Informatics Centre
National Institute of Electronics & Information Technology
Centre of Excellence in Blockchain Technology
Download in PDF
* * *
अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Backgrounder ID: 156418)
आगंतुक पटल : 3
Provide suggestions / comments