• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

स्किलिंग फॉर एआय रेडीनेस (SOAR) उपक्रम देत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन

Posted On: 22 OCT 2025 10:07AM

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2025

 

महत्त्वाचे मुद्दे

  • स्किलिंग फॉर एआय रेडीनेस (SOAR) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तयारीसाठी कौशल्य प्रशिक्षण, हा उपक्रम इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लक्ष्य करतो, जेणेकरून या वाढत्या डिजिटल जगात भारत भविष्यासाठी सक्षम होईल.
  • एसओएआर उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी 15-तासांच्या 3 विशेष मॉड्यूलचा समावेश आहे, तसेच शिक्षकांसाठी एक स्वतंत्र 45-तासांचे मॉड्यूल समाविष्ट आहे, यात नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.
  • केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण आणि नवोन्मेष वाढवणे आहे.
  • जून 2025 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 ते 2025-26 दरम्यान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना-2 (NAPS-2) अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा इंजिनिअर आणि मशीन लर्निंग इंजिनिअर यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता-संबंधित भूमिकांमध्ये 1,480 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

प्रस्तावना

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि ऑटोमेशनमधील प्रगतीमुळे जागतिक कामगारवर्गात अमुलाग्र परिवर्तन होत आहे. आरोग्यसेवा, वित्त, शिक्षण, उत्पादन आणि सार्वजनिक सेवा यासारख्या उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्भूत होत असताना, व्यापक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरतेची आणि विशेष कौशल्यांची आवश्यकता तातडीने जाणवत आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) सुरू केलेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तयारीसाठी कौशल्य प्रशिक्षण (SOAR) उपक्रम हा भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य समाविष्ट करण्याचा एक धोरणात्मक उपक्रम आहे. हा उपक्रम भारताला जागतिक तंत्रज्ञानातील आघाडीवर नेण्याच्या सरकारच्या उद्दिष्ट अशी सुसंगत आहे. जुलै 2025 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम स्किल इंडिया अभियानाच्या 10 वर्षांच्या टप्प्याशी जुळुन येतो. 2015 पासून या अभियानाने विविध कौशल्य विकास योजनांद्वारे लोकांना सक्षम केले आहे. यात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) 4.0 अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तयारीसाठी कौशल्य प्रशिक्षण (SOAR) उपक्रमाचे ध्येय: भविष्याचे सक्षमीकरण

  • कृत्रिम बुद्धिमत्ता जागरूकता वाढवणे: या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता जोपासण्यास प्राधान्य देणे हा आहे. मशीन लर्निंगच्या (एमएल) मूलभूत गोष्टी आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता वापर यासारख्या मूलभूत संकल्पना शिकवून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि नवोन्मेषाची भावना विकसित करणे, त्यांना तंत्रज्ञान आधारित भविष्यासाठी तयार करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमात शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाची तरतूद आहे ज्याद्वारे ते विद्यमान अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता मॉड्यूल्स समाविष्ट करू शकतील, परिणामी शिक्षण प्रभावी होईल आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत होईल.
  • आर्थिक आत्मनिर्भरतेला समर्थन: हा उपक्रम भारताच्या आर्थिक स्वावलंबनाच्या (आत्मनिर्भर भारत) दृष्टिकोनाचे धोरणात्मक समर्थन करतो. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उद्योगांसारख्या उच्च-मागणी क्षेत्रांसाठी युवकांना कौशल्यांनी सुसज्ज करून हा उपक्रम रोजगारयोग्यता आणि उद्योजकता वाढवतो. हा उपक्रम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) 4.0 सारख्या प्रमुख योजनांअंतर्गत राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे, जो उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करतो.
  • तंत्रज्ञान आधारित भारताची निर्मिती: या उपक्रमाचा दीर्घकालीन दृष्टीकोन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर पोहचवणे. यासाठी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित करिअर आणि उद्योजकतेसाठी तयार केले जाते.शाळा आणि महाविद्यालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मजबूत परिसंस्थेला चालना देऊन, हा उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञान नवोन्मेष क्षेत्रासाठी कुशल व्यावसायिकांची एक नवी पिढी घडविण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

   

 

कृत्रिम बुद्धिमत्ता: भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन

कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत आहे. ती नवोन्मेषाला चालना देते, डिजिटल साक्षरता वाढवते आणि तंत्रज्ञान आधारित भविष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींनुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश आता अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास आराखड्यामध्ये सुसंगतरित्या केला जात आहे. या परिवर्तनाला चालना देणाऱ्या काही प्रमुख घडामोडींमध्ये हे समाविष्ट आहे:

शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश:

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 मध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी योग्य स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक विषयांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आधीच आपल्या संलग्न शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश केला आहे. 2019-20 शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववीमध्ये सुरू करण्यात आला, तर 2020-21 शैक्षणिक सत्रापासून इयत्ता अकरावीपर्यंत तो शिकवला जात आहे, यात कौशल्य विकास आणि वैयक्तिकृत शिक्षण साधनांसारख्या व्यावहारिक अनुप्रयोगांवर भर दिला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राची स्थापना:

भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे, वर्गात चिंतनशील शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि पारंपारिक शिक्षण पद्धतींपासून "फळ्यापासून चिपसेटपर्यंत" या तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोनांकडे संक्रमण करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.

हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधन विकासासाठी व्यापक राष्ट्रीय प्रयत्नांना बळकटी देईल. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त संस्थांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा ऐच्छिक अभ्यासक्रम म्हणून देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (IITs) या प्रयत्नांना पूरक म्हणून डीप लर्निंग, मशीन लर्निंग आणि प्रेडिक्टिव्ह डेटा ॲनालिटिक्स यासारखे प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता-संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.

स्किल इंडिया अभियानात (SIM) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल लर्निंगचे एकत्रीकरण:

भारत सरकारने स्किल इंडिया अभियानांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल लर्निंग कार्यक्रमांचा समावेश करून भविष्यसज्ज कार्यबल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात पुढील उपक्रमांचा समावेश आहे: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) 4.0, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना (NAPS), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTIs) आणि स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH)

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) 4.0: ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली असून अल्पकालीन प्रशिक्षण, कौशल्य वाढवणे आणि पूर्वीच्या कौशल्यांची मान्यता यावर ती लक्ष केंद्रित करते.तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या भविष्योन्मुख कौशल्यांना प्राधान्य देते.

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना (NAPS): ऑगस्ट 2016 पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सध्याच्या दुसऱ्या टप्प्यात ती विविध क्षेत्रात शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणाला प्रोत्साहन देत आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तयारीसाठी कौशल्य प्रशिक्षण (SOAR) उपक्रम: महत्त्व आणि अपेक्षित परिणाम

कौशल्य भारत अभियानाशी धोरणात्मक संलग्नता: हा उपक्रम कौशल्य भारत अभियानाला बळकटी देतो. विद्यार्थ्यांसाठी लक्ष्यित मॉड्यूल प्रदान करून तो तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्षेत्रांमध्ये रोजगारक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज बनवतो.

विकसित भारत दृष्टिकोनात योगदान: हा कार्यक्रम 2047 पर्यंत विकसित राष्ट्राच्या भारताच्या दृष्टिकोनाला पाठबळ देतो. सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI for All) या उपक्रमांतर्गत तो तंत्रज्ञान जाणकार कार्यबल वाढवतो जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग नवोन्मेष आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी करु शकतो. ही संकल्पना राष्ट्रीय कौशल्य विकास धोरणांमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.

डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन: SOAR हा उपक्रम शहर आणि ग्रामीण भाग यातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी स्किल इंडिया डिजिटल हब सारख्या सुलभ व्यासपीठावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण उपलब्ध करून देतो. यामुळे सरकारी आणि खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना समान संधीने डिजिटल कौशल्य शिक्षण उपलब्ध होते आणि वंचित समुदायांना सक्षम बनवले जाते.

कृत्रिम बुद्धिमत्ता-जाणकार विद्यार्थी आणि प्रशिक्षित शिक्षक: SOAR या उपक्रमाचे उद्दिष्ट नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता अनुप्रयोगासाठी सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता-जाणकार विद्यार्थी तयार करणे तसेच सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन पद्धतींचा प्रभावी अवलंब सुनिश्चित करणे हे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरबद्दल उत्सुकता वाढवणे आणि कौशल्यांमधील तफावत कमी करणे: SOAR कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरबद्दल उत्सुकता वाढवणे अपेक्षित आहे. प्रायोगिक प्रशिक्षणाद्वारे आणि सर्वसमावेशक अभ्यासक्रमाद्वारे हा कार्यक्रम शहरी आणि ग्रामीण डिजिटल कौशल्यांमधील तफावत कमी करतो, तसेच उच्च मागणी असलेल्या तांत्रिक कौशल्यांमध्ये प्रवेश सुलभ करतो.

 

निष्कर्ष

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तयारीसाठी कौशल्य प्रशिक्षण (SOAR) हा कार्यक्रम भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण आणि कार्यबल विकासाच्या क्षेत्रात जागतिक नेता म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. शालेय अभ्यासक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अंतर्भूत करून, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अत्याधुनिक तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज करतो. तसेच नवोन्मेष आणि नैतिक तंत्रज्ञानाच्या वापराची संस्कृती विकसित करतो. स्किल इंडिया डिजिटल हब सारख्या धोरणात्मक भागीदारी आणि व्यासपीठांद्वारे, हा कार्यक्रम विविध सामाजिक-आर्थिक गटांपर्यंत पोहोचतो. त्यातून भारतातील तरुणांना तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीचे चालक बनण्यास सक्षम केले जाते. विकसित भारत @2047 दृष्टिकोनाचा आधारस्तंभ म्हणून, SOAR हा उपक्रम डिजिटलदृष्ट्या समावेशक, स्पर्धात्मक आणि स्वावलंबी भारताचा पाया रचतो, जो जागतिक नवोन्मेषाच्या भविष्यात सक्रिय योगदान देईल.

 

संदर्भ

केंद्रीय अर्थसंकल्प:

पत्र सूचना कार्यालय :

शिक्षण मंत्रालय :

कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालय:

इतर:

 

पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Explainer ID: 156417) आगंतुक पटल : 46
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Gujarati , Manipuri , Bengali , Assamese , Urdu , Nepali , हिन्दी , Hindi_Ddn , Punjabi , Odia , Telugu , Kannada
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate