• Sitemap
  • Advance Search
Social Welfare

पोषण माह

पोषणाच्या माध्यमातून आरोग्यदायी आणि सुदृढ राष्ट्राची उभारणी

Posted On: 18 SEP 2025 5:54PM

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2025

 

ठळक मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी 8 व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा तसेच आरोग्यदायी महिला, सशक्त कुटुंब (SNSPA - Swasth Nari Sashakt Parivar Abhiyan) या अभियानाचा प्रारंभ केला. या अभियानाची आखणी ही पंतप्रधानांनी मांडलेल्या सशक्त नारी आणि सुपोषित भारत या त्यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून केली गेली आहे.
  • 17 सप्टेंबर 2025 पर्यंत, पोषण ट्रॅकर ॲपवर 14,02,248 अंगणवाडी केंद्रे आणि 9,14,75,640 पात्र लाभार्थ्यांची नोंदणी झाली.
  • प्रधानमंत्री पोषण योजनेकरता 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 1,30,794.90 कोटी रुपये खर्चाची वित्तीय तरतूद केली गेली आहे.
  • राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-5, 2019-21), पाच वर्षांखालील मुलांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण 38.4% वरून 35.5% पर्यंत कमी झाले आहे.
  • पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) अहवालानुसार, मुलांमध्ये वजन कमी असण्याचे प्रमाण 35.8% वरून 32.1% पर्यंत खाली आले आहे.

 

प्रस्तावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2018 रोजी राजस्थानमधील झुंझुनू इथून पोषण अभियानाला सुरूवात केली होती. हे एक महत्त्वाकांक्षी बहु मंत्रालयीन एकात्मिकरणाच्या स्वरुपातील अभियान आहे. या अभियानाअंतर्गत, पोषणाला भारताच्या राष्ट्रीय विकास कार्यक्रमंध्ये, आघाडीच्या प्राधान्यक्रमाचे स्थान दिले गेले आहे. या योजनेला समग्र पोषणासाठीची पंतप्रधानांची व्यापक योजना (POSHAN) असे म्हटले आहे. या योजनेच्या नावातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोषणाला समग्र विकासाशी जोडण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. यासोबतच अधिक आरोग्यदायी आणि अधिक सुदृढ राष्ट्राच्या उभारणीत, पोषणाच्या भूमिकेला त्यांनी दिलेले महत्वही यातून अधोरेखित होते. या योजनेअंतर्गत अंतर्भूत केलेल्या लक्ष्यित घटकांमध्ये, 6 वर्षांखालील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची तंत्रज्ञानाधारित, समुदाय केंद्रित दृष्टिकोनातून अंमलबजावणी केली जाणार असून, त्याद्वारे कुपोषणावर मात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यादृष्टीनेच व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण माह साजरा केला जातो. याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसही असतो. यातून राष्ट्रीय प्रगतीचा आधारस्तंभ असलेल्या पोषणा सारख्या मुद्याप्रति पंतप्रधानांची वैयक्तिक वचनबद्धताही दिसून येते. या पोषण महिन्या दरम्यान, स्वतः पंतप्रधान सक्रियपणे, मायजीओव्ही या मंचावरून तसेच #Local4Poshan यांसारखे हॅशटॅग वापरून नागरिकांना स्थानिक पौष्टिक पाककृती सामायिक करण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे सामुदायिक सहभाग वाढावा, तसेच आहारातील विविधता वाढवी यादृष्टीने पारंपारिक, पोषण समृद्ध आहारालाही प्रोत्साहन मिळू लागले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ‘सशक्त नारी आणि सुपोषित भारत’ या त्यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असे 8वे राष्ट्रीय पोषण माह आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (SNSPA) सुरू करण्यात आले आहे.

 

उद्दिष्ट्ये

पोषण अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये खाली नमूद केली आहेत:

  • 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांमधील वाढ खुंटणे, कुपोषण आणि जन्माच्या वेळी वजन कमी असण्याच्या समस्यांचे प्रमाण कमी करणे.
  • बालके (6–59 महिने), किशोरवयीन मुली आणि महिला (15–49 वर्षे) यांच्यातील रक्तक्षयाचे (ॲनिमिया) प्रमाण कमी करणे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-5, 2019-21), पाच वर्षांखालील मुलांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण 38.4% वरून 35.5% पर्यंत कमी झाले आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) अहवालानुसार, मुलांमध्ये वजन कमी असण्याचे प्रमाण 35.8% वरून 32.1% पर्यंत खाली आले आहे, यासोबतच उंचीनुसार वजन कमी असण्याचे प्रमाण 21.0% वरून 19.3% पर्यंत कमी झाले आहे.

2024-25 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 15.4 कोटी बालके / किशोरवयीन मुलांना लोह आणि फॉलिक ॲसिड पूरक पोषण आहार मिळाला आहे.

पोषण अभियानाअंतर्गत गर्भधारणेपासून ते वयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या पहिल्या 1,000 दिवसांना प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून दारिद्र्य, बालविवाह आणि लिंगभेदासारख्या घटकांमुळे, पिढ्या पिढ्यांममधील सातत्याने वाढत्या कुपोषणाचे चक्र थांबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, पोषण अभियानाअंतर्गत आहारातील विविधता, पूरक आहार आणि स्तनपानाला प्राधान्य देण्याला, प्रोत्साहन दिले जात आहे. याला समांतरपणेच लोक चळवळीचे धोरण अवलंबत सामुदायिक सहभागात वाढ घडवून आणली जात आहे. सर्वांसाठी समग्र पोषणाची संधी असेल, याची सुनिश्चितता करण्याच्या उद्देशाने, या उपक्रमाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांचे एकात्मिकरण केले गेले आहे. याला जोडूनच मार्च 2021 मध्ये पोषण ट्रॅकर ॲपही सुरु केले गेले. एका अर्थाने या अभियानाअंतर्गत आता तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावू लागले आहे. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीचा आलेख आणि सेवांच्या प्रत्यक्ष पुरवठ्याच्या बाबतीत प्रत्यक्ष त्या त्या वेळीच देखरेख ठेवणे शक्य झाले आहे.

पोषण माह आणि मार्च / एप्रिलमध्ये आयोजित झालेल्या पोषण पंधरवडा यांसारख्या सामाजिक सहभागावर आधारित कार्यक्रमांअंतर्गत, पोषण कार्यशाळा, रॅली आणि पोषण वाटिका यांसारखे उपक्रम आयोजित केले गेले. या माध्यमातून लाखो लोकांशी जोडून घेणेही शक्य झाले. परिणामी स्थानिक पातळीवर पिकवलेल्या, पोषण समृद्ध खाद्यान्नालाही प्रोत्साहन मिळाले.

 

प्रमुख संकल्पना आणि निर्धारीत लक्ष्य

8 व्या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या माध्यमातून पोषण विषयक साक्षरता आणि आरोग्यदायी पद्धतींना प्रोत्साहन देण्याची लोकचळवळ पुढे सुरु ठेवली जात आहे. या उपक्रमाच्या या वर्षाच्या आवृत्तीचे आयोजन लक्षात घेतले, तर त्यातून कुपोषणावर मात करण्यासाठी आणि शाश्वत आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी, बाळगलेला नवोन्मेषी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ठळकपणे अधोरेखित होतो. त्यादृष्टीनेच सरकारने काही प्रमुख संकल्पनाही राबवल्या, त्या खाली नमूद केल्या आहेत :

लठ्ठपणाच्या समस्येवर उपाययोजना – साखर आणि तेलाचा वापर कमी करणे : लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि अधिक आरोग्यदायी भारताची जडणघडण करण्यासाठी तेल आणि साखरेचा वापर कमी करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

"लठ्ठपणा ही आपल्या देशासाठी एक मोठी समस्या बनत चालली आहे. येत्या काही वर्षांत प्रत्येक तिसरा व्यक्ती या समस्येचा बळी ठरण्याची शक्यता आहे. आपण स्वतःला लठ्ठपणापासून वाचवले पाहिजे. म्हणून, मी तुम्हाला एक छोटी सूचना करू इच्छितो, स्वयंपाकात तेलाचा वापर 10% ने कमी करा."

- पंतप्रधान नरेंद्र मोदी, 15 ऑगस्ट 2025

बाल्यावस्थेतील आरोग्यविषयक निगा आणि शिक्षण (ECCE) / पोषण भी पढाई भी (PBPB) : हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्देशांना अनुसरून आखला गेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण बाल विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अंगणवाडी केंद्रांवर, पोषण आणि बाल्यावस्थेतील शिक्षणाचे एकात्मिकीकरण करून, जगातील सर्वात मोठे, उच्च गुणवत्तेचे शाळापूर्व व्यवस्थेचे जाळे विकसित केले जाणार आहे.

 

एक पेड माँ के नाम : या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वततेला, पोषण विषयक जागरूकतेसोबत जोडले गेले आहे. याअंतर्गत दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याणासाठी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे.

 

शिशू आणि लहान बालकांसाठीच्या स्तनपान (IYCF) पद्धती : या उपक्रमाअंतर्गत शिशू आणि लहान बालकांच्या पोषणाच्या बाबतीत, अपेक्षित परिणाम साधता यावा ल यादृष्टीने सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. याच उद्देशाने, दोन वर्षांखालील बालकांकरता स्तनपानाच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्टही सरकारने समोर ठेवले आहे. याअनुषंगाने या उपक्रमात पुरेशा प्रमाणात स्तनपान आणि पूरक आहारावर भर दिला गेला आहे.

"मुलांचे पोषण हे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या पोषणावर वर्षभर लक्ष दिले जाते, परंतु एक महिना असा आहे, जेव्हा संपूर्ण देश या गोष्टीवर विशेष भर देत असतो."

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पोषण आणि आरोग्यविषयक सेवा सुश्रृषेत पुरुषांचा सहभाग: कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्याच्या बाबतीतल परस्पर सामायिक जबाबदारीचे भान वाढवण्यासाठी, पोषण आणि आरोग्यविषयक सेवा सुश्रृषेत पुरुषांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे.

 

पोषण ट्रॅकर ॲप: पोषणाचे डिजिटायझेशन

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 1 मार्च 2021 रोजी पोषण ट्रॅकर ॲपचा प्रारंभ केला. पोषण अभियानांतर्गत पोषण विषयक सेवांच्या वितरणाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने हे ॲप डिझाइन केले गेले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुलांमधील वाढ खुंटण्याची समस्या, उंचीच्या तुलनेत वजन कमी असण्याची समस्यांचे प्रत्यक्ष त्या त्या वेळचे प्रमाण काढणे आणि त्याचे देखरेख - निरीक्षण करणे शक्य झाले आहे. यासोबतच या ॲपमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही कार्यक्षम सेवा वितरणाची साधने आणि आपापल्या कामगिरीचा मागोवा घेण्याण्याकरता पाठबळ मिळाले आहे. या ॲपच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा, लाभार्थी-केंद्रित सेवांचा पुरवठा करण्याची सोय उपलब्ध झाली आहे, आणि त्यासोबतच अधिक चांगल्या परिणामकारतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्रत्यक्ष त्या त्या वेळच्या माहितीसाठ्याचे विश्लेषण करणेही शक्य झाले आहे.

सध्या, या ॲप्लिकेशनवर 14,02,248 अंगणवाडी केंद्रे आणि 9,14,75,640 पात्र लाभार्थी नोंदणी झाली असून, ही संख्या दररोज वाढते आहे.

प्रधानमंत्री पोषण : पोषण अभियानांतर्गतची एक प्रमुख योजना

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) योजना, म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत महत्वाचा उपक्रम आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (NFSA) अंतर्गत नमूद, प्रमुख हक्कांवर आधारलेली आहे. पोषणाशी संबंधित उपाययोजनांची परिणामकारता सुधारावी आणि विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढावे या अनुषंगानेचे या योजनेची आखणी केली गेली आहे.

पीएम पोषण (PM POSHAN) चे काही प्रमुख पैलू खाली नमूद केले आहेत:

  • आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी प्रधानमंत्री पोषण (POshan SHAkti Nirman) योजना सुरू ठेवायला मान्यता दिली आहे.
  • पूर्वी या योजना शाले माध्यान्ह भोजन योजना राष्ट्रीय कार्यक्रम या नावाने ओळखली जात होते. प्रामुख्याने ती माध्यान्ह भोजन योजना म्हणून लोकप्रिय झाली होती.
  • या योजनेअंतर्गत सरकारी आणि शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीI पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा अंतर्भाव केलेला आहे.
  • देशभरातील 11.20 लाख शाळांमध्ये शिकत असलेल्या सुमारे 11.80 कोटी मुलांना या योजनेचा लाभ होतो.

प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत, साहित्यासाठीचा खर्च म्हणून वितरीत केलेला निधी, भोजन तयार करण्यासाठी आवश्यक घटकांच्या खरेदीसाठी वापरला जातो.[12]

प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या खाद्यान्न संचाचा महागाईचा दर काढण्यासाठी, कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील कामगार ब्युरो हे आस्थापन, 20 राज्यांमधील 600 गावांमधून, दरांविषयीचा मासिक माहितीसाठा संकलित करते. यासाठी ग्रामीण भागातील मजुरांकरता ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-RL) पद्धतीचा वापर केला जातो. या महागाई निर्देशांकानुसारच, शिक्षण मंत्रालयाने, 1 मे 2025 पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या साहित्य खर्चात 9.5% ची वाढही केली आहे. अशा प्रकारची उपाययोजना केल्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला अंदाजे 954 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येणार आहे.[13]

पीएम पोषण योजनेची आणखी इतर वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहेत:[14]

  • अन्नधान्य : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमात (NFSA) नमूद असलेल्या दरांनुसार (भरड धान्यासाठी 1 रुपये/किलो, गव्हासाठी 2 रुपये/किलो, तांदळासाठी 3 रुपये/किलो) या दराने, प्राथमिक शाळेतील वर्गासाठी 100 ग्रॅम/मूल/प्रतिदिन आणि उच्च प्राथमिक शाळेतील वर्गासाठी 150 ग्रॅम/मूल/प्रतिदिन इतका पुरवठा केला जातो.
  • स्वयंपाक खर्च : याअंतर्गत प्राथमिक शाळांसाठी 4.97 रुपये/मूल/प्रतिदिन आणि उच्च प्राथमिक शाळांसाठी 7.45 रुपये/मूल/प्रतिदिन दराने (1 एप्रिल 2020 पासून लागू) पा पोषक घटकांचा (डाळी, भाज्या, तेल, मसाले, इंधन) अंतर्भाव केला आहे.
  • उन्हाळी सुट्ट्यांदरम्यानची भोजन व्यवस्था : पोषणाच्या पुरवठ्यात सातत्य राखता यावे यासाठी दुष्काळ/आपत्कालीन घटनांनी प्रभावित क्षेत्रांमध्ये भोजनाचा पुरवठा सुनिश्चित केला जातो.
  • शाळापूर्व वर्गांमधील भोजन व्यवस्था : राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गतच्या समग्र शिक्षण उपक्रमाच्या उद्दिष्टांना अनुसरून, प्राथमिक शाळांमधील बालवाटिका (इयत्ता पहिली आधीचे वर्ग) वर्गांपर्यंत भोजन पुरवठा सुविधेचा विस्तार केला गेला आहे.

 

बाल पोषण उद्यान : खाद्यान्न आणि आनंदाचा मिलाफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या दृष्टीकोनापासून प्रेरणा घेत, गुजरातच्या एकता नगर मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ एक अनोखे बाल पोषण उद्यान उभारले गेले आहे. सहि पोषण देश रोशन या संकल्पनेवर हे उद्यान उभारलेले आहे. मुलांना आरोग्यदायी खाण्याच्या सवयींबद्दल शिकता येईल अशा रितीने या उद्यानाची रचना करण्यात आली आहे.

या उद्यानात 600 मीटर लांबीची न्यूट्री ट्रेन राइड अर्थात पोषण रेल्वे फेरीची सुविधा उभारलेली आहे. या फेरीच्या मार्गावर फलशाका गृहम् हे स्थानक असून, ते एक संवादात्मक केंद्रच आहे. या स्थानकात किसन कुमार हा शुभंकर मुलांना फळे आणि भाज्यांबद्दल शिकवतो. पयो नगरी या स्थानकावर जनार्दन हा शुभंकर गायीला खाऊ घाला या आणि अशा खेळांच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थांच्या महत्त्वाबद्दल सांगतो. अन्नपूर्णा, या स्थानकावर डिजिटल गेम्सच्या माध्यामातून घरात बनवलेल्या जेवणाचे महत्व अधोरेखित केले जाते. पोषण पुरम् या स्थानकावर शेंगदाण्यासारखा सुका मेवा, बियाणे आणि जल आर्द्रताधारीत खाद्यांनांविषयी सांगितले जाते, आणि स्वस्थ भारतम्, या स्थानकावरील उपक्रमांतून योगाभ्यास आणि शारिरीक खेळांच्या माध्यमातून शारीरिक हालचालींच्या महत्वाविषयी शिक्षित केले जाते.

या उद्यानातले आणखी एक आकर्षण म्हणजे मिरर मेझ (आरसा चक्रव्यूह) ही सुविधा. इथे 5D चित्रपट, भारतीय थाळी, जंगल या संकल्पनेवरील इमारतीत लपलेल्या पोषक घटकांचा शोध, झॉर्ब बॉल आणि सायकल आधारीत खेळांचे केंद्र अशा अनेक मनोरंजनपर सुविधा आहेत. इथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, आणि दिव्यांग मुलांसाठी वावर सुलभतेचा उत्तम मिलाफ साधलेला आहे. यासोबतच आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणारे न्यूट्री कॅफे यांसारख्या सुविधा देखील आहे. एका अर्थाने हे उद्यानाच्या माध्यमातून समग्र पोषणाच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी मनोरंजन आणि शिक्षणाचा उत्तम मिलाफ साधला गेला आहे.

 

पोषण पंधरवडा (POSHAN PAKHWADA): पोषण, आरोग्य आणि आरोग्यविषयक स्वच्छतेला चालना

महिला आणि बाल विकास मंत्रालयच्या वतीने मिशन पोषण 2.0 अंतर्गत 8 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा 2025 साजरा केला गेला. पोषण विषयक जागरूकता वाढवणे, आरोग्याविषयक परिणामकारकतेत सुधारणा घडवून आणणे आणि समाजाचे सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या उपक्रमाच्या 7 व्या आवृत्तीअंतर्गत, बालकांच्या आयुष्यातील पहिल्या 1,000 दिवसांवर भर दिला गेला होता. म्हणजे गर्भधारणेपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीवर भर दिला गेला होता. या माध्यमातून, बालकांचे आयुष्यभराचे आरोग्य, शारिरीक मानसिक वाढ तसेच प्रौढत्वातील उत्पकता आणि जास्तीच्या उत्पनाचा पाया रचला जाईल या उद्देशाने, या हजार दिवसांच्या कालावधीत पोषणाची भूमिका किती महत्वाची असते हे अधोरेखित केले गेले. त्या सोबतच या उपक्रमामुळे पोषण विषयक उद्दिष्टपुर्तींच्या दृष्टीने सामाजिक सहभाग आणि सामाजिक सक्षमीकरणालाही बळकटी मिळाली.[15]

या उपक्रमाअंतर्गत या वर्षी राबवलेल्या संकल्पनेत खाली नमूद मुद्यांवर भर दिला गेला :

  • मातेच्या पोषणाबद्दल कुटुंबांना शिक्षित करणे.
  • प्रभावी स्तनपान पद्धती.
  • बालकांमधील वाढ खुंटणे आणि ॲनिमिया या समस्यांचा सामना करण्याच्यादृष्टीने संतुलित आहाराचे महत्त्व.

याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवरील उपाययोजना चालना देण्यावरही भर दिला गेला होता. विशेषत: आदिवासी भागांमध्ये आरोग्य विषयक परिणामकारकतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थानिक आहार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याअनुषंगानेच अशा भागांमध्ये स्थानिक पारंपारिक, पोषण समृद्ध अन्न घटकांचा अधिक वापर करण्याला प्रोत्साहन दिले गेले.

 

पोषण माह या उपक्रमात कसे सहभागी व्हावे

पोषण माह म्हणजे, पोषण आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा एक देशव्यापी उपक्रम आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण हा उपक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. उत्तम आरोग्यदायी भारताच्या जडणघडणीसाठी तुम्हीही या सहभागी होऊ शकता, आणि योगदान देऊ शकता. त्यासाठीचे काही अर्थपूर्ण मार्ग खाली नमूद केली आहे. :

समाजाला शिक्षित करणे

समतोल आहार, स्तनपान आणि कुपोषणावर मात करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आपाल्या आसपासच्या परिसरांमध्ये, शाळांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जागरूकता मोहिमांचे आयोजन करू शकता. तिथे आयोजित अशा मोहिमांमध्ये सहभाग होऊ शकता. सामुदायिक सहभागाला चालना देत, पोषण माह उपक्रम यशस्वी करण्यासाठीचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.

उदाहरण म्हणून पाहायचे झाले, तर पोषण माह 2024 मध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांना न्यूट्री-बास्केट्सचे (पोषक अन्न घटकांचा पेटारा ) वितरीत केला गेला. याअनुषंगाने बालकांसाठीचे अन्नप्राशन तसेच, धान्यदीक्षा समारंभ आयोजित केले गेले होते.[16]

पोषण वाटिकांची निर्मिती आणि परसबागेतील शेतीला प्रोत्साहन

सार्वजनिक वापराच्या जागा, शाळा किंवा परसबागेत फळझाडे, भाज्या किंवा औषधी वनस्पती लावाव्यात, अशा प्रकारच्या वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी नोंदवावा. या पोषण वाटिकांमुळे ताजी, पौष्टिक खाद्यान्न उत्पादने सहजतेने उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करता येते. याच अनुषंगाने, पोषण माह 2022 दरम्यान देखील, परसबागेतील कुक्कुटपालन / मत्स्यपालनाच्या सुविधांनी सज्ज न्यूट्री-गार्डन्सची (पोषक उद्याने) निर्मिती करण्यासाठी देशभरात 1.5 लाखांपेक्षा जास्त कार्यक्रम राबवले गेले होते.[17]

अंगणवाडी केंद्रे आणि आशा कार्यकर्त्यांना पाठबळ पुरवणे.

आपण स्थानिक अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वयंसेवक म्हणून योगदान देऊ शकता. याअंतर्गत आपण पौषक भोजनाच्या वितरणात मदत, आरोग्य तपासणी विषयक उपक्रमांना पाठबळ, अथवा मुले आणि मातांसाठी पोषण विषयक उपक्रमांचे आयोजन करून पोषण माहमध्ये सक्रिय योगदान देऊ शकता.

या उदाहरण मांडायचे झाले तर, 2024 मध्ये रांची इथे 7 व्या राष्ट्रीय पोषण माह उपक्रमाचा समारोप समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभा दरम्यान 20 राज्यांमध्ये 11,000 पेक्षा जास्त सक्षम अंगणवाडी केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले होते[18]. याव्यतिरिक्त, पोषण अभियानाच्या माध्यमातून सुपोषित भारताच्या दिशेनेही प्रगतीमय वाटचाल झाली. देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 781 जिल्ह्यांमध्ये 13,99,484 इतकी अंगणवाडी केंद्र प्रत्यक्ष कार्यरत आहेत. या केंद्रांमधील 13,33,561 अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पोषण माह उपक्रमासाठी केलेल्या प्रयत्नांंनीही या उपक्रमाला मोठी बळकटी दिली आहे.[19]

 

सारांश

पोषण माह हा उपक्रम पोषण अभियानाचा आधारस्तंभ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आहारातील वैविध्य, सामुदायिक सहभाग आणि तंत्रज्ञानाधारित उपाय योजनांना चालना दिली जात आहे. परिणामी कुपोषणाविरोधातील भारताच्या लढ्याने लक्षणीय प्रगती साध्य केली आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये साजऱ्या होणाऱ्या पोषण माह अंतर्गत, #Local4Poshan सारखी प्रभावी मोहिमही चालवली जाते. या मोहिमेच्या माध्यमातून विशेषतः बालकांच्या जन्मापासूनच्या पहिल्या 1,000 दिवसांमध्ये वाढ खुंटणे, कुपोषण, ॲनिमिया आणि जन्मच्या वेळी वजन कमी असण्याच्या समस्यांच्या सोडवणूकीवर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमाला प्रधानमंत्री पोषण योजनेसाठी केलेल्या 1,30,794.90 कोटी रुपये (2021-26) इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे आणि पोषण ट्रॅकर ॲप तसेच बाल पोषण उद्यानासारख्या नवोन्मेषी व्यासपीठांचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळेच पोषण माह हा उपक्रम एका उत्तम आरोग्यदायी अधिक सुदृढ देशाच्या निर्मितीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी, शाश्वत पोषण पद्धतींना चालना देण्याकरता, समाज आणि शाळांचे सक्षमीकरण करणारा उपक्रम ठरला आहे.

 

संदर्भ

पत्र सूचना कार्यालय :

महिला आणि बाल विकास मंत्रालय :

शिक्षण मंत्रालय :

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय :

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय :

इतर

 

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

(Explainer ID: 156416) आगंतुक पटल : 97
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi
National Portal Of India
STQC Certificate