• Sitemap
  • Advance Search
Economy

स्वच्छता ही सेवा 2025 : स्वच्छ भारत अभियाला मिळाली उर्जा

Posted On: 25 SEP 2025 10:56AM

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2025

 

स्वच्छ भारत अभियान ही या शतकातील लोकांनी लोकांसाठी चालवली जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी लोकचळवळ आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ठळक मुद्दे

  • स्वच्छ भारत मिशन (SBM), या अभियानाअंतर्गत 12 कोटी शौचालये बांधली गेली आहेत, यामुळे उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण कमी झाले असून, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत मोठी प्रगती घडून आली आहे.
  • स्वच्छोत्सव या संकल्पनेवर आधारित स्वच्छता ही सेवा 2025, हे अभियान भारताला 2047 पर्यंत शाश्वत, सर्वसमावेशक आणि विकसित भारत बनवण्याच्या वाटचालीतील कारक घटक बनले आहे.
  • यापूर्वीपासून साचून राहिलेल्या 2,492 लाख टन इतक्या प्रचंड कचऱ्यापैकी 1,437 लाख टन (58%) कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, यामुळे गुणवत्ता घटलेल्या जमिनीचे पुनरुज्जीवन करण्यात मदत झाली आहे.
  • 2024 मध्ये 8 लाखांपेक्षा जास्त ठिकाणे स्वच्छता लक्षित केंद्रांत (Cleanliness Target Units) रूपांतरीत झाले. कचऱ्याचे ढिग आणि दुर्लक्षित जागांना स्वच्छ, वापरयोग्य ठिकाणांचे रुप मिळाले.

 

जेव्हा स्वच्छता बनली राष्ट्रीय प्रतिज्ञा

2 ऑक्टोबर 2014 च्या सकाळी, धूळीने माखलेल्या रस्त्यांवर झाडू फिरले, गटारांतून प्लास्टिकच्या बाटल्या बाहेर काढल्या गेल्या आणि शहरे तसेच गावांमध्ये दृढनिश्चयाचा आवाज दुमदुमला. हे केवळ एक स्वच्छता अभियान नव्हते, तर ती एका राष्ट्रीय जागृतीची सुरुवात होती. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनचा उद्देश केवळ रस्ते आणि गटारांची स्वच्छता करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सवयीत बदल घडवून आणणे, नवी मानसिकता घडवणे आणि दैनंदिन जीवनात स्वच्छतेला पुन्हा प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश होता. आता देश पुन्हा नव्या उत्साहाने सज्ज होत आहे, आणि अशावेळी स्वच्छता ही सेवा (SHS) 2025 अभियाची प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे. आता हे अभियान स्वच्छतेला नागरिकत्वाच्या सामुदायिक उत्सवाचे रुप देऊ लागले आहे.

 

स्वच्छता ही सेवा – स्वच्छोत्सवची भावना

2017 मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाचा प्रारंभ झाला. तेव्हापासूनच हे अभियान स्वच्छ भारत मिशनचा एक आधारस्तंभ ठरले आहे. दरवर्षी हे अभियान आयोजित केले जाते. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना एकत्र आणून, त्यांनी आपल्या आसपासच्या परिसराची जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांना प्रेरित केले जाते. स्वच्छोत्सव या संकल्पनेवर आधारित असलेल्या, स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानाच्या माध्यमातून उत्सवाच्या आनंदाला जबाबदारीच्या गांभीर्याशी जोडले गेले आहे. दरवर्षी 17 सप्टेंबरला या अभियानाची सुरुवात होते आणि 2 ऑक्टोबर रोजी समाप्ती होते. या 15 दिवसांच्या काळात या अभियानाच्या माध्यमातून, देशभरातील लाखो हात आणि संवेदनशील नागरिक सर्वोत्तम स्वच्छता मोहिमांच्या निमित्ताने एकत्र येतात. एका अर्थाने हे अभियान म्हणजे ‘अंत्योदय से सर्वोदय’ या तत्त्वाचेच मूर्त स्वरूप आहे. अर्थात सर्वाधिक वंचित लोकांना प्रतिष्ठा मिळवून देत आणि त्यांचा कल्याण साधत राष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात करणे. या अभियानाअंतर्गत अगदी अखेरच्या टोकावरील व्यक्तींच्या समावेशनावर भर दिला गेला आहे. यामुळेच भारतातील गावे आणि शहरे सन्मान, आरोग्य आणि शाश्वततेसह पुढे वाटचाल करू लागतील याची सुनिश्चिती झाली आहे.

श्रमदान : एक राष्ट्र, एक तास सेवा

स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानाचा एक भाग म्हणून, 25 सप्टेंबर 2025 रोजी, ‘एक दिन, एक घंटा, एक साथ,’ अर्थात एक दिवस, एक तास, एकत्रितरित्या ही भव्य राष्ट्रव्यापी ऐच्छिक श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत शहरे आणि गावांमधून लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी श्रमदान आणि प्लॉगिंग (धावत किंवा चालत कचरा गोळा करणे) अशा उपक्रमांमध्ये भाग घेतला. या उपक्रमांतून, आपापल्या परिसरांना स्वच्छता लक्ष्यित केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या वचनबद्धतेलाही अधिक बळकटी मिळाली. रहिवासी, राजकीय नेते, स्वच्छ भारत अभियानचे दूत, युवा गट, स्वयंसेवी संस्था, नागरी समाजिक संस्था, भागीदार संस्था आणि सामाजातील प्रभावशाली व्यक्तींनी, प्रत्यक्ष या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. या सोबतच या अभियानाचे अनामिक नायक असलेल्या स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा, विशेष शिबिरांमध्ये गौरवही करण्यात आला, आणि भारताला स्वच्छ ठेवण्यात त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाची गौरवपूर्ण दखल घेतली गेली.

 

स्वच्छोत्सवचे मुख्य आधारस्तंभ

स्वच्छोत्सवचे मुख्य आधारस्तंभच या उपक्रमाचा मुख्य गाभा आहेत. हे आधारस्तंभ म्हणजे याअंतर्गतचे लक्षित उपक्रम आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना, विविध ठिकाणांना आणि आपल्या हेतूंना एकत्र आणत, स्वच्छ आणि हरित भारताचा दृष्टीकोन प्रत्यक्ष जमिनीवरील कृतीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वच्छ क्रांती 2025 : कचऱ्याचे संधीमध्ये रूपांतर

प्रभावी कचरा व्यवस्थापन हा स्वच्छ भारत मिशनचा गाभा आहे. याअंतर्गत भारतातील कचरा संकलनाची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि त्यातून पुनरोत्पादन घेण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणले जात आहेत. परिणामी, स्वच्छ, आरोग्यदायी आणि शाश्वत समाजाचाही जडणघडण होत आहे.

 

शहरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गतचे कचरा व्यवस्थापन

जैव उपसणी आणि जैव तंत्रज्ञानाधारीत उपाययोजनांच्या (biomining and bioremediation) माध्यमातून कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्उपयोग आणि जुन्या कचराभूमींचे पुनरुज्जीवन बंधनकारक करणे, आणि याद्वारे शून्य कचरायुक्त जमिनी घडवण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हा भारताच्या घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 चा उद्देश आहे. याच दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, आता भारताच्या शहरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या 1,59,109.02 टन प्रति दिवस इतक्या घनकचऱ्यापैकी 1,29,206.87 टन प्रति दिवस इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याबाबतीत 2014 मध्ये केवळ 16% कचऱ्यावर प्रक्रिया होत होती, त्या तुलनेत, आज हे प्रमाण 81% पेक्षा जास्त आहे. एका अर्थाने ही एक उल्लेखनीय प्रगती आहे. कचऱ्यावरील प्रक्रिया करणाऱ्या सोयी सुविधांच्या जाळ्याचा विस्तार केल्यामुळेच हे शक्य झाले आहे. याअंतर्गत वस्तुमाल पुनर्प्राप्ती सुविधा, हस्तांतरण केंद्रे, खतनिर्मिती प्रकल्प, बांधकाम आणि तोडफोड तसेच कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारे प्रकल्प, कचऱ्यापासून मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईडचे विघटन करणारी जैव तंत्रज्ञानाधारीत प्रक्रिया प्रकल्प (Bio-Methanation) यांचा समावेश आहे. या सर्व प्रयत्नांमधून आता कचरा म्हणजे ओझे नाही तर भविष्यासाठीचे एक संसाधन मानले जाणाऱ्या, एका स्वच्छ, चक्रीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने निर्णायक बदल होत असल्याचे दिसून येते.

कचरा व्यवस्थापन हा स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रस्थानी असलेला पायाच आहे. याअंतर्गत केवळ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी, संसाधनांचा शाश्वत वापर करण्याच्या दिशेने एक वैचारिक बदल घडून आला आहे. शहरी - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, भारताने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आपली क्षमता विस्तारली आहे. त्याचबरोबर, कचराभूमींचे पुनरुज्जीवन करून, जुन्या कचराभूमींचे पर्यावरणपूरक आणि उत्पादक जागेत रूपांतर करून दाखवले आहे. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या कचऱ्याविरोधातला (legacy waste) भारताचा लढा, हळूहळू पण निश्चित गतीने त्या त्या ठिकाणांच्या स्वरुपात बदल घडवून आणत आहे. आजवर अशा साचून राहिलेल्या 2,492 लाख टन इतक्या प्रचंड प्रमाणातील कचऱ्यापैकी, 1,437 लाख टन (58%) इतक्या कचऱ्यावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे श्वास कोंडलेल्या जमिनींना नवसंजीवनीच मिळाली आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे केवळ कचऱ्याचीच सफाई झालेली नाही, तर 7,646 एकरपेक्षा जास्त जमीनही, पुन्हा वापरासाठी उपलब्ध झाली आहे. कधीकाळी कचऱ्याच्या डोंगराखाली झाकल्या गेलेल्या या जागांवर आता हरित आच्छादने, सार्वजनिक सुविधा आणि नवे शहरी जीवन नांदू लागेल हीच आशा आहे.

कचराभूमी मुक्त मोहीम : कचराभूमींचे उपजीविकेत रूपांतरण

स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमामुळे संपूर्ण भारतभरात, कचराभूमींच्या पुनरुज्जीवनाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे कचऱ्याच्या उंचच उंच ढिगाऱ्यांनी आच्छादलेल्या कचराभूमींच्या जागी स्वच्छ, हरित जागा निर्माण होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत, शहरी - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरातील, निश्चित केलेल्या 2,476 कचराभूमींपैकी 1,041 कचराभूमींचे पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित 1,020 ठिकाणी कामासाठी मंजुरी मिळाली आहे किंवा हे काम प्रगतीपथावर आहे.

  • कचऱ्याचा डोंगर उभ्या राहिलेल्या जागांना पुन्हा स्वच्छ जमिनींचे रुप मिळवून देण्याच्या मोहिमेला सरकारने आता अधिक गती दिली आहे. त्याअंतर्गत दिल्लीतील 70 एकरवर पसरलेली भलस्वा कचराभूमी, आता कचऱ्यापासून साधनसंपत्ती निर्माण करण्याच्या कल्पकनेअंतर्गतचा पथदर्शक प्रकल्प ठरू लागला आहे. स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत, या जागेला नवे स्वरुप मिळवून देत, त्याचे एका स्वच्छ, अधिक शाश्वत शहरी जागेत रूपांतरित केले जाणार आहे. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यापैकी 25 एकर जागेवरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापैकी 5 एकरावर बांबूची लागवड केली गेली आहे, तर 20 एकर जागा स्वच्छता विषयक सोयी सुविधा आणि कचरा प्रक्रिया केंद्रासाठी राखीव ठेवली गेली आहे.
  • राजकोटमध्येही 16 लाख टन इतक्या प्रमाणात साचून राहिलेल्या कचऱ्यात, स्वतःचे अस्तित्वच गमावलेल्या कचराभूमीला, आता एका 20 एकरच्या शहरी भागातील वनाच्या रुपात परावर्तीत केले गेले आहे. राजकोटमधले हे यश म्हणजे शहरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, कचऱ्याने व्यापलेल्या कचराभूमींचे शहरांतील हिरवाईने व्यापलेल्या जागेत कसे परावर्तीत केले जात आहेत याचेच ठळक उदाहरण ठरले आहे.

या सर्व महत्त्वाच्या यशदायी टप्प्यांमधून, देशभरातील कचराभूमींना स्वच्छ, वावरण्या - राहण्यायोग्य जागेत रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला स्वच्छ भारत मिशनने कशा प्रकारे गती दिली आहे हेच दिसून येते.

 

कामाच्या ठिकाणी स्वच्छता : मंत्रालयांनीही दिली साथ

संपूर्ण भारतभरात, विविध मंत्रालये आणि त्यांच्या अखत्यारितील संस्था स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत, स्वच्छताविषयक आखलेल्या धोरणांचे कृतीत रूपांतर करण्यासाठी, आपल्या बैठकांच्या खोल्यांमधून बाहेर पडून रस्त्यावर उतरले आहेत. याअंतर्गत केलेले महत्वाचे प्रयत्न खाली नमूद केले आहेत:

  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि त्यांच्या अखत्यारितील देशभरातील आस्थापनांनीही स्वच्छता ही सेवा 2025 मध्ये थेट सहभाग घेतला आहे. याअनुषंगाने दिल्लीतील वाणिज्य भवनापासून ते कोची, इंदूर आणि इतर ठिकाणच्या विशेष आर्थिक क्षेत्रांमधील कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवल्या गेल्या आणि यातून स्वच्छतेप्रती सामुदायिक कृतीचे दर्शन घडवले गेले. 
  • कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देखील कृषी भवन येथे स्वच्छता प्रतिज्ञा मोहीम घेतली आणि आपल्या अखत्यारितील देशव्यापी संस्थांमध्ये तपासणी आणि स्वच्छता मोहिम राबवून या अभियानाचा प्रारंभ केला. यासोबतच सफाई मित्रांसाठी विशेष उपक्रम राबवले. याअंतर्गत त्यांच्या पाल्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले गेले.
  • सहकार मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशनशी जोडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रमात सहभाग नोंदवला. तसेच लक्ष्यित स्वच्छता केंद्रांची साफसफाई, सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आणि पर्यावरणपूरक समारंभात सहभाग नोंदवला.
  • संसदीय कामकाज मंत्रालयाने स्वच्छ हवेसाठी हरित उपक्रम, कर्मचाऱ्यांसाठीचे उपक्रम, सामुदायिक श्रमदान आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. यातून त्यांनी स्वच्छता, कामगारांचा सन्मान आणि स्वच्छ भारताच्या संकल्पाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
  • बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने स्वच्छता प्रतिज्ञेसह, आपल्या अंतर्गतची बंदरे, गोदी आणि किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये स्वच्छता मोहिमांच्या माध्यमातून, स्वच्छोत्सवाची संकल्पना राबवली. यातून त्यांनी आपले कर्मचारी, विद्यार्थी, नागरी समाजिक समुहांना आणि स्थानिक समुदायांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले.

 

स्वच्छता ही सेवा 2024: प्रगतीला आयाम मिळवून देणारे यश

स्वच्छता ही सेवा 2024 मध्ये नागरिकांनी नोंदवलेल्या अभूतपूर्व सहभागामुळे या अभियानाने स्वतःची एक अमिट छाप सोडली आहे. 2024 मधील या अभियानाच्या यशातून, स्वच्छता ही सेवा म्हणजे केवळ एक स्वच्छता मोहीम नसून, नागरी सहभागाचे एक राष्ट्रव्यापी आवाहन बनल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले, असे नक्कीच म्हणता येईल. जर प्रत्येक व्यक्ती या अभियानात सहभागी झाली तरच एका स्वच्छ आणि आरोग्यदायी भारताचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, ही बाब या अभियानाने पुन्हा एकदा अधोरेखित केली.

याच यशाच्या पार्श्वभूमीवर, राबवलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ अंतर्गत लक्ष्यित स्वच्छता केंद्रांमधील अशा अस्वच्छ - कचऱ्याने व्यापलेल्या परिसरांवर भर दिला गेला, ज्यांवरून शहरांचे रंगरुप ठरत होते. एकट्या 2024 या वर्षातच 8 लाखांपेक्षा जास्त लक्ष्यित स्वच्छता  केंद्रांचे रूपांतर, वापर - वावरायोग्य सार्वजनिक जागांमध्ये करण्यात आले. एका अर्थाने ज्या जागांकडे आपण पाहूही शकत नव्हतो, त्या प्रफुल्लीत जागांमध्ये रुपांतीरीत करता येऊ शकते हीच बाब यातून सिद्ध झाली. आता यावर्षी, या अभियानाला अधिक गती दिली गेली आहे, आणि अशाच प्रकारच्या काना कोपऱ्यातील दुर्लक्षित जागा तसेच, कचराभूमी निश्चित करून, त्यांची साफसफाई आणि सुशोभिकरण करण्यावर भर दिला गेला आहे. अर्थात हे काम केवळ अभियानाच्या काळातच नाही, तर त्यानंतरही सुरू ठेवले जाणार आहे.

 

बदलाच्या यशोगाथा : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्यक्ष कार्यवाही

लोकचळवळीचे स्वरुप धारण केलेले स्वच्छ भारत मिशन, आता एक ऐतिहासिक अभियान बनले आहे. या अभियानामुळे स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतच्या भारताच्या संकल्पाला एक नवी दिशा मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशभरात घडून आलेल्या परिवर्तनकारी बदलांतून, या अभियानाची परिणामकारकता दिसून येते. सप्टेंबर 2025 पर्यंत, देशभरात 12 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधली गेली आहेत. यामुळे उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे, परिणामी महिलांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे, आणि त्यांचा सन्मानही राखला गेला आहे. जागतिक आरोग्य अहवालानुसार, या बदलांमुळे स्वच्छता विषयक चांगली परिस्थिती नसल्याने उद्भवणाऱ्या आजारांपासून, पाच वर्षांखालील सुमारे 3 लाख बालकांचा बचाव करण्यात मोठी मदत मिळाली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि जीवनमानाच्या गुणवत्तेतही मोठी सुधारणा घूडून आली आहे.

आता या अभियानामुळे संपूर्ण भारतभरातील विविध राज्ये, स्वतःच्या बदलांच्या यशोगाथा रचू लागली लागली आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गतच्या या अशा असंख्य यशोगाथांपेकी, अनेक यशोगाथा नवोन्मेष आणि सामुहिकतेच्या भावनेची प्रचिती देणाऱ्या आहेत.

जम्मू आणि काश्मीर : 2025 च्या अमरनाथ यात्रेत श्रद्धा आणि स्वच्छतेचा संगम

2025 ची अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एक आध्यात्मिक प्रवासाची यात्रा ठरली नाही, तर ती शाश्वततेच्या दिशेचे एक आदर्श उदाहरणही ठरली. हिमालयातील पवित्र गुहेच्या दिशेने चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पदयात्रा केली. इतक्या मोठ्या संख्यने यात्रेकरू आलेले असतानाही यात्रेअंतर्गत राबवलेल्या कचराशून्य भूमी आणि प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या माध्यमातून, या यात्रेत शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0 च्या उद्दिष्टपूर्तीचेही प्रतिध्वनी उमटले. या यात्रेच्या निमित्ताने एक सुनियोजित कचरा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणली गेली. त्याअंतर्गत दररोज सुमारे 11.67 मेट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली. 1,000 पेक्षा अधिक दुहेरी कचरापेट्या, 65 कचरा संकलन वाहने आणि 1,300 सफाई मित्रांनी यात्रेचा मार्ग स्वच्छ राहील यासाठी अविरतपणे काम केले. लंगरमध्ये एकदाच वापरल्यानंतर फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकचा वापरच टाळला गेला, अशा प्लास्टिकऐवजी कापड आणि तागाच्या पिशव्या वापरल्या गेल्या. भाविकांसाठी 1,600 मोबाईल अर्थात फिरती शौचालये, QR-आधारित अभिप्राय नोंदवण्याची सोय आणि 100% मैलावरील प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. यामुळे या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनाही स्वच्छताविषक सुधारित सुविधांचा अनुभव घेता आला. या यात्रेदरम्यान 70,000 पेक्षा जास्त यात्रेकरूंनी हरित प्रतिज्ञाही घेतली आणि वैयक्तिक पातळीवरील भक्तीला नागरी जबाबदारीमध्ये परावर्तीत केले. 2025 च्या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने श्रद्धेचा शाश्वततेशी अशा प्रकारचा संगम साधत केलेल्या उपाययोजनांमुळे, मोठ्या स्वरुपातील धार्मिक आयोजने पर्यावरणाप्रती सजग, कचराशून्य तीर्थ यात्रेचे आदर्श मापदंड प्रस्थापित करू शकतात ही गोष्ट ठळकपणे सिद्ध झाली. एका अर्थाने ही यात्रा स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची एक खरी योशोगाथाच आहे.

आसामने दिली हरित स्वच्छतेच्या मोहिमेला चालना

आसामच्या पूर प्रवण मोरीगाव या जिल्ह्यामधील, बोरछिला गावातील 60 महिलांनी मिळून तिथे मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या जलपर्णीच्या समस्येचे संधीत रूपांतर करून दाखवले आहे. या जलपर्णीच्या उपयोगाने त्यांनी पर्यावरणपूरक हस्तकलाकृती तयार केल्या आणि त्याद्वारे त्या दरमहा प्रत्येकी किमान 10,000 रुपये इतके उत्पन्नही मिळवू लागल्या आहेत. खरे तर तणांच्या प्रजातीतली ही जलपर्णी अधिक वेगाने वाढत असल्याने, त्यांच्या अच्छादनाखाली नद्यांचा श्वासच कोंडला जात होता, इतकेच नाही तर त्यामुळे मासेमारी, जल वाहतूक आणि जलाशयांमधील मनोरंजनपर क्रिया प्रक्रियांमध्येही अडथळा येत होता. जलपर्णीच्या या अशा वर्चस्वामुळेच इथल्या जलस्रोतांचा व्यवहार्य उपयोगच घटला होता. पण आता हीच जलपर्णी इथल्या महिलांच्या उपजीविकेचे आणि त्यांच्या प्रतिष्ठेचे साधन बनली आहे. तर दुसरीकडे गुवाहाटीमधील रूपंकर भट्टाचार्जी आणि अनिकेट धार या दोन तरुण नवोन्मेषकांनी, याच जलपर्णीचा वापर करून 100%  जैवविघटनीय, रसायनमुक्त कागदाचे उत्पादन घेण्याचा, कुंभी कागज नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यांच्या या स्टार्टअपमुळे आता तिथल्या जवळपास 40 महिलांना रोजगार मिळाला आहे, इतकेच नाही तर कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना Zero Waste Cities Challenge  हा सन्मानही प्राप्त झाला आहे. या उपक्रमांची एकंदरित परिणामकारता पाहिली तर, ईशान्येकडील राज्ये पर्यावरणासमोरील आव्हानांचे, शाश्वत उपजीविकेच्या संधीमध्ये रूपांतरण करून, स्वच्छता आणि चक्रीय अर्थव्यवस्थेची परिभाषा नव्याने रचत असल्याचे ठळकपणे दिसून येते. 

img   img

उत्तर प्रदेश: आग्राच्या विषाक्त कचराभूमीचे पर्यावरणीय केंद्रात रुपांतर

आग्रा शहराने तर तिथल्या विस्तीर्ण कुबेरपूर कचराभूमीचे रूपांतर आग्रामधील एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहरात करून दाखवले असून, त्यांनी परिवर्तनाचा दखलपात्र अध्याय रचला आहे. त्यांच्या या यशातून शहरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक राष्ट्रीय मापदंड स्थापित झाला आहे. कधीकाळी या कचराभूमीवर सुमारे 1.9 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला होता, एका अर्थाने ही भूमी कचऱ्याचे माहेरघर झाली होती. मात्र या कचराभूमीवर मोठ्या प्रमाणात कचऱ्यापासून मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईडचे विघटन करणारी जैव तंत्रज्ञानाधारीत प्रक्रिया (Bio-Methanation) राबवली गेली, आणि डिसेंबर 2024 पर्यंत या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपलेली 47 एकर इतकी जमीन मोकळी करून तिला वापर - वावरायोग्य बनवण्यात आले. यासाठी सुमारे 320 कोटी खर्च केला गेला आहे. पुनर्प्राप्ती केलेल्या जागेवर आता  मियावाकी वनीकरण तंत्राचा वापर करून इथल्या 10 एकर परिसराला हिरवळीची जागा, 5 एकर परिसरात आधुनिक स्वच्छताविषयक कचराभूमी आणि पर्यावरणपूरक क्षेत्राचे स्वरुप दिले गेले आहे. यासोबतच आणखी 10 एकर जागेवर शहरी वनीकरणाचे काम सुरू आहे. जानेवारी 2025 मध्ये, आग्र्यात 65 टन प्रतिदिन इतक्या क्षमतेची वस्तुमाल पुनर्प्राप्ती सुविधा आणि प्लास्टिक कचरा प्रक्रिया प्रकल्पही सुरु केला गेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत टाकाऊ प्लास्टिकपासून, पुनर्उत्पादन घेत  शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरामध्ये पाण्याच्या नलिका बनवल्या जात आहेत. अशा उपाययोजनांच्या माध्यमातून आग्रा शहराने कचरा व्यवस्थापनाला उपजीविकेशी संबंधित लाभांशी यशस्विरीत्या जोडून दाखवले आहे. इथल्या पायाभूत सुविधांच्या पलीकडे जात, आता हे केंद्र शैक्षणिक केंद्र म्हणूनही नावारुपाला आले आहे. आता इथे देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि नवोन्मेषी व्यक्ती शाश्वत कार्यपद्धती आणि उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी येऊ लागले आहेत. तंत्रज्ञान, शासन आणि नागरिकांमधील जागृतीचा मिलाफ साधला गेला, तर वाया गेलेल्या जमिनीलाही नवसंजीवनी दिली जाऊ शकते, प्रदूषणात घट साध्य केली जाऊ शकते आणि एका हरित, लवचिक शहरी भविष्याची जडणघडण केली जाऊ शकते, हीच बाब आग्रा शहराने मोठ्या धाडसाने राबवलेल्या या उपक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे.

   

अभियानापासून संस्कृतीपर्यंत

स्वच्छ भारत मिशनने आपल्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रतिकात्मकतेच्या पलीकडे जात,  खूप मोठा पल्ला गाठला आहे. खरे तर रस्त्यांची साफसफाई करण्याच्या आवाहनातून या अभियानाचा प्रारंभ झाला होता, मात्र आता हे अभियान सार्वजनिक आरोग्य, महिलांचा सन्मान आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी याबाबत आजच्या भारताच्या दृष्टीकोनाला आकार देऊ लागला आहे. कचराभूमी आणि गल्ल्यांपासून ते गर्दीमय रेल्वे स्थानके, नद्यांचे काठ आणि गुणवत्ता गमावलेल्या जमिनींपर्यंत, शहरी जीवनमानावर थेट परिणाम करणाऱ्या जागा.. अशा सगळ्यांचे मानचित्रण करून तिथल्या समस्यांवर या अभियानाअंतर्गत उपायोयोजना केल्या जात आहेत. खरे तर या अभियाने एक स्पष्ट संदेश दिला आहे, तो म्हणजे, स्वच्छता ही केवळ कचरा काढण्यापुरती नाही, तर आपल्या दैनंदिन वावराच्या परिसराला त्याचे सौंदर्य पुन्हा मिळून देणे म्हणजे स्वच्छता होय. आता स्वच्छता ही सेवा 2025, या अभियानाअंतर्गतच्या स्वच्छोत्सवच्या उपक्रमाने लाखो लोकांना एकत्र आणले आहे. स्वच्छता ही एका विशिष्ट हंगामातील कृती नसून, आता ती राष्ट्रीय संस्कृती बनू लागली असल्याचेच हा उपक्रम आपल्याला स्मरण करून देतो आहे. आणि जर का आपण स्वच्छता या संकल्पनेमागची ही भावना टिकवून ठेवली, तर तो स्वतंत्र भारतातील सर्वात दीर्घकाळ टिकणाऱ्या वारशापैकी एक ठरू शकेल आणि हाच वारसा विकसित भारत 2047 चा पाया रचणार आहे.

संदर्भ

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय

जलशक्ती मंत्रालय

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

सहकार मंत्रालय

संसदीय कामकाज मंत्रालय

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय

प्रधानमंत्री कार्यालय

पत्र सूचना कार्यालय

 

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

नितीन फुल्‍लुके/तुषार पवार/दर्शना राणे

(Explainer ID: 156387) आगंतुक पटल : 49
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi
National Portal Of India
STQC Certificate