Technology
संचार साथी ॲप: नागरिकांसाठी दूरसंचार सक्षमीकरण आता अगदी सहज उपलब्ध
पारदर्शक आणि सुरक्षित मोबाईल सेवेत वृद्धी करण्यासाठी जानेवारी 2025 मध्ये प्रारंभ
Posted On:
02 DEC 2025 8:12PM
मुख्य ठळक वैशिष्ट्ये
* 17 जानेवारी 2025 रोजी सुरुवात झाल्यापासून, संचार साथी मोबाईल ॲपचे 1.4 कोटीं पेक्षा अधिक वेळा डाउनलोड्स झालेले आहेत.
* 42 लाख पेक्षा जास्त चोरी झालेली/हरवलेली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या ब्लाॅक करण्यात आली आहेत.
* 26 लाख हरवलेले/चोरी झालेले मोबाईल फोन शोधण्यात आले, त्यापैकी 7.23 लाख यशस्वीरित्या परत करण्यात आले आहेत.
* हे एक लोकशाही, पूर्णपणे ऐच्छिक, वापरकर्त्यावर आधारित आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारे ॲप आहे आणि ते केवळ वापरकर्त्याच्या संमतीनेच सक्रिय होते.
संचार साथी: भारतातील वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी वेळेवर दिलेला प्रतिसाद
एक अब्जाहून अधिक ग्राहक असल्यामुळे, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. मोबाईल फोन आता बँकिंग, मनोरंजन, ई-लर्निंग, आरोग्यसेवा आणि सरकारी सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार म्हणून काम करतात, त्यामुळे मोबाईलची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे.

वाढत्या सायबर धोक्यांमुळे मोबाईल वापरकर्त्यांचे संरक्षण करणे हा एक तातडीचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकानुसार (इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-CERT-In), सायबर गुन्ह्यांची संख्या 2023 मधील 15,92,917 वरून 2024 मध्ये 20,41,360 पर्यंत वाढली आहे. केवळ राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवलेल्या ‘डिजिटल अरेस्ट स्कॅम्स’ आणि संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या 2024 मध्ये एकूण 1,23,672 होती आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत अशा 17,718 प्रकरणांची नोंद झाली आहे.
या वाढत्या धोक्यांना प्रतिबंधात्मक प्रतिसाद म्हणून, दूरसंचार विभागाने 'संचार साथी' मोबाईल ॲप सादर केले. हे एक नागरिक-केंद्रित साधन असून ते थेट वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर भक्कम सुरक्षा वैशिष्ट्ये आणि फसवणूक लक्षात आणून देण्याची नोंदणी क्षमता घेऊन आले आहे. हे ॲप विद्यमान संचार साथी पोर्टलला पूरक ठरते, तसेच ओळख चोरी (आयडेन्टिटी थफ्ट), बनावट ग्राहक ओळख पडताळणी (नो युअर कस्टमर-KYC), उपकरण चोरी, बँकिंग फसवणूक आणि इतर सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोयीस्कर आणि बसल्या जागी मिळणारी (ऑन-द-गो) सुविधा प्रदान करते. या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी, दूरसंचार विभागाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार मोबाईल उत्पादकांना आणि आयातदारांना भारतातील वापरकर्त्यांसाठी, मोबाईल उपकरणावर संचार साथी ॲपची उपलब्धता आणि पोहोच सुलभ करणे अनिवार्य केले आहे.
नागरिक-प्रथम, गोपनीयता-सुरक्षित मंच
संचार साथी ॲप नागरिकांना प्रथम प्राधान्य देते आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करते. ते केवळ वापरकर्त्याच्या संमतीने कार्य करते आणि ॲप सक्रिय करणे तसेच वापर, यावर वापरकर्त्याला पूर्ण नियंत्रण देते.
* वापरकर्त्याने नोंदणी करण्याचा पर्याय निवडल्यानंतरच ते सक्रिय होते.
* वापरकर्ता ते कधीही सक्रिय, निष्क्रिय किंवा हटवू शकतो.
* गोपनीयतेशी तडजोड न करता भारताची सायबर सुरक्षा बळकट राखण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे.
संचार साथी: प्रभाव आणि मूर्त परिणाम
सुरुवात झाल्यापासून संचार साथीने स्पष्ट आणि सातत्यपूर्ण प्रभाव दाखवला आहे. या मंचाने वापरकर्त्यांची सुरक्षा मजबूत केली आहे आणि देशभरातील डिजिटल फसवणूक कमी केली आहे.
या मंचाची प्रमुख कामगिरी खालील प्रमाणे आहे:
* पोर्टलला (https://sancharsaathi.gov.in/) 21.5 कोटीं पेक्षा जास्त जणांनी भेट दिली.
* 1.4 कोटींपेक्षा जास्त जणांनी ॲप डाउनलोड केले आहे.
* 42 लाख पेक्षा जास्त चोरी झालेली/हरवलेली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या ‘ब्लॉक’ करण्यात आली.
* नागरिकांनी 'माझा नंबर नाही' म्हणून नोंद केल्यानंतर 1.43 कोटींहून जास्त मोबाईल जोडण्या खंडित करण्यात आल्या.
* 26 लाख हरवलेले किंवा चोरी झालेले फोन शोधले, त्यापैकी 7.23 लाख त्यांच्या मालकांना परत केले.
* नागरिकांच्या तक्रारींनंतर 40.96 लाख फसव्या जोडण्या हटवल्या.
* 6.2 लाख फसवणूकीशी संबंधित आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक (IMEI-International Mobile Equipment Identity) ब्लॉक केले.
* आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशकाने (फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर) 475 कोटी रुपयांचे नुकसान टाळले.
आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर-एफआरआय)
दूरसंचार विभागाने 'फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर' विकसित केला आहे. मोबाईल क्रमांकांचे वर्गीकरण, आर्थिक फसवणुकीच्या 'मध्यम', 'उच्च' किंवा 'अति उच्च' जोखिमांमध्ये करणारा, हा एक जोखीम-आधारित मापदंड आहे. बँका, बँकेतर वित्तीय संस्था (NBFCs) आणि यूपीआय सेवा प्रदात्यांना कोणते फोन नंबर फसवणुकीच्या उच्च जोखमीचे आहेत हे आधीच समजण्यास, एफआरआय मदत करतो. त्यामुळे त्या क्रमांकांवर लगेच कारवाई करता येते आणि ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणाच्या जास्तीत जास्त उपाययोजना करता येतात.

या उपक्रमामुळे, ठरवून केलेल्या कृतींच्या आधारे दूरसंचार क्षेत्रातील फसवणूक आणखी कमी झाली आहे आणि अनेक ठिकाणी त्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. 3 कोटीं पेक्षा जास्त फसवणूक करणाऱ्या मोबाईल जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत, 3.19 लाख उपकरणे रोखण्यात आली आहेत, 16.97 लाख व्हॉट्सॲप खाती निष्क्रिय करण्यात आली आहेत आणि 20,000 हून अधिक समूह पाठवणी संदेश (बल्क एसएमएस) पाठवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे दूरसंचार-संबंधित फसवणूक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि देशभरातील वापरकर्त्यांची सुरक्षा वाढली आहे.
संचार साथी अॅप, लोकांना वापरायला सोपी, साधने आणि तात्काळ मिळणाऱ्या सुरक्षा सुविधा देते. म्हणून भारतात वाढत चाललेले सायबर गुन्हे थांबवण्यासाठी हे अॅप योग्य आणि प्रभावी ठरते.
हे ॲप्लिकेशन हिंदी आणि इतर 21 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ते देशभरात सर्वसमावेशक आणि सुलभ ठरते. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या ॲपने, सुरुवातीपासून 1.4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे.

संचार साथीने देऊ केलेल्या नागरिक-केंद्रित सेवा
संचार साथी मोबाईल ॲप, पोर्टलवरील सर्व नागरिक-केंद्रित सेवा थेट वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर आणते. या सेवांमध्ये, सुरक्षा, पडताळणी आणि फसवणूकीची तक्रार नोंदणी या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

संचार साथीमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:
* चक्षु – कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे संशयास्पद फसवणूक करणाऱ्या संवादांची, विशेषतः केवायसी अपडेटिंग घोटाळ्यांची तक्रार वापरकर्त्यांना करता येते. हे सक्रिय नोंदणी साधन, दूरसंचार विभागाला बनावट केवायसी आणि ओळख चोरीच्या प्रकरणांवर तात्काळ लक्ष ठेवण्यास आणि कारवाई करण्यास मदत करते, तसेच नागरिकांना नको असलेल्या व्यावसायिक संवादांची (अनसाॅलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन-यूसीसी) तक्रार करण्यास प्रोत्साहन देते.
* IMEI (ट्रॅकिंग अँड ब्लॉकिंग) क्रमांकाद्वारे मोबाईलचा शोध घेणे आणि चोरी किंवा फसवणुकीशी संबंधित मोबाईलला नेटवर्क वापरता येऊ नये असे करणे.:- भारतातील कोठेही हरवलेले किंवा चोरी झालेले फोन, ट्रॅक आणि ब्लॉक करण्याची सुविधा यामुळे मिळते. पोलीस प्राधिकरणांना, चोरी झालेली किंवा हरवलेली उपकरणे शोधण्यात मदत करते, बनावट फोन, ब्लॅक मार्केटमध्ये येण्यापासून थांबवते आणि नकली उपकरणे तयार करण्याचे प्रयत्न रोखते.
* मोबाईल जोडण्यांच्या संख्येची पडताळणी – हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बनावट केवायसी तपशील वापरून तयार केलेली कोणतीही संशयास्पद जोडणी आढळल्यास, वापरकर्ते त्वरित त्यांची तक्रार करू शकतात आणि त्यांना प्रतिबंधित (ब्लॉक) करू शकतात.
* तुमच्या मोबाईल उपकरणाची सत्यता तपासणी:– खरेदी केलेले मोबाईल उपकरणे खरे आहे की नाही हे तपासण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करते.
* भारतीय क्रमांक असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची तक्रार – +91 (या भारत दर्शक कोडनंतर 10 अंक) ने सुरू होणाऱ्या नंबरवरून येणाऱ्या, म्हणजे देशांतर्गत काॅल भासवणाऱ्या, पण प्रत्यक्षात परदेशातून येणाऱ्या कॉल्सची तक्रार नागरिकांना करता येते. असे कॉल परदेशातील बेकायदेशीर दूरसंचार व्यवस्थेमधून येतात.
* तुमचा इंटरनेट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) जाणून घ्या – पिन कोड, पत्ता किंवा आयएसपी चे नाव टाकून वापरकर्त्यांना देशभरातील वायरलाइन इंटरनेट सेवा प्रदात्यांचे तपशील तपासण्याची सुविधा मिळते.
हा उपक्रम नागरिकांना त्यांची डिजिटल ओळख सुरक्षित राखण्यास आणि दूरसंचार फसवणुकीशी लढण्यास सक्षम करून दूरसंचार सुरक्षा मजबूत करतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्राय (TRAI) च्या 'दूरसंचार व्यावसायिक संवाद ग्राहक प्राधान्य नियमांची' (TCCCPR) अंमलबजावणी करण्यासही संचार साथी मदत करते, कारण ते वापरकर्त्यांना एका क्लिकवर स्पॅम आणि फसवणुकीचे कॉल आणि संदेशांची तक्रार करण्यास सक्षम करते.
सायबर गुन्हे म्हणजे गुन्हा करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी संगणक, संपर्क साधन किंवा संगणक नेटवर्कचा वापर केला जातो, असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य.
वापरकर्त्यांचे सशक्तीकरण
संचार साथी उपक्रम जन भागीदारी – म्हणजे शासनामध्ये लोकांचा सहभाग – याचे उदाहरण आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार साधनासामुग्रीचा गैरवापर रोखण्यात वापरकर्त्यांच्या तक्रारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दूरसंचार विभाग या तक्रारींवर त्वरित कारवाई करत राहतो आणि पोर्टलवर कामाची माहिती दाखवणारे डॅशबोर्ड लोकांना स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे सर्व काही पारदर्शक राहते.
गोपनीयता आणि सुरक्षा
या ॲपची रचना, वापरकर्त्याचा डेटा (माहिती) आणि गोपनीयतेचे संरक्षण करताना दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून केली आहे. हे ॲप, 'माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (आयटी अॅक्ट) चे पालन करते. हा कायदा, सायबर गुन्हे, ई-कॉमर्स, सुरक्षित माहिती प्रसारण (डेटा ट्रान्समिशन) आणि डेटा गोपनीयता नियंत्रित करणारा भारताचा प्राथमिक कायदा आहे. हा कायदा अनधिकृत घुसखोरी (हॅकिंग) आणि डेटा चोरी यांसारखे गुन्हे नेमके काय आहेत ते स्पष्ट करतो आणि अशा गुन्ह्यांसाठी कोणती शिक्षा द्यायची ते ठरवतो.

संचार साथी वापरकर्त्याच्या गोपनीयतेला प्राधान्य देते आणि सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली किमान वैयक्तिक माहितीच गोळा करते. हा प्लॅटफॉर्म व्यावसायिक विपणनासाठी 'प्रोफाईल्स' तयार करत नाही, तसेच तृतीय पक्षांसोबत वापरकर्त्याचा डेटा शेअर करत नाही. जेव्हा कायद्याने आवश्यक असते, तेव्हा डेटाची देवाणघेवाण, काटेकोरपणे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांपर्यंतच मर्यादित असते, ज्यामुळे डेटाची अनधिकृत उपलब्धता आणि गैरवापर यापासून संरक्षण सुनिश्चित होते.
हा प्लॅटफॉर्मवर त्याच्या गोपनीयता धोरणात, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 च्या तत्त्वांचे पालन करतो. या कायद्यात व्यक्तीच्या माहितीवर नियंत्रण, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर भर दिला आहे. संचार साथी फक्त कायदेशीर उद्दिष्टांसाठीच डेटा गोळा करतो, डेटा गोळा करण्याचे प्रमाण कमी ठेवतो आणि स्पष्ट सहमतीची प्रणाली लागू करतो.
निष्कर्ष
संचार साथी ॲप भारताच्या वाढत्या दूरसंचार परिसंस्थेला सुरक्षित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे. हरवलेली उपकरणे ब्लॉक करणे, फसवणुकीची तक्रार करणे, मोबाईल जोडणीची पडताळणी करणे आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे यासारख्या वेगवेगळ्या सेवा एका ठिकाणी उपलब्ध करुन देत, ते नागरिकांना त्यांची डिजिटल ओळख सहजतेने संरक्षित करण्यासाठी सक्षम करते. हे ॲप अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणे, सायबर कायद्यांचे पालन करणे आणि गोपनीयता राखण्यासाठी भक्कम सुरक्षा उपाय असणे या सर्व गुणांमुळे हा मंच सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह ठरतो. अॅपचा वापर वाढत असताना, संचार साथी फक्त टेलिकॉम फसवणूकच कमी करत नाही; तर ते लोकांचा डिजिटल विश्वास वाढवते आणि भारतातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि नागरिक केंद्रित भविष्य घडवते.
संदर्भ
संपर्क मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
नितीन फुल्लुके/आशुतोष सावे/परशुराम कोर
(Backgrounder ID: 156384)
आगंतुक पटल : 25
Provide suggestions / comments