Technology
बीएसएनएल’च्या स्वदेशी 4जी तंत्रज्ञानातून स्वदेशी भावना प्रतीत
5जी विस्ताराला चालना, विकसित भारत 2047 साठी भारताचे 6जी दृष्टिकोन करणार साकार
Posted On:
28 SEP 2025 4:01PM
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2025

परिचय
भारताने आपले पहिले पूर्णपणे स्वदेशी 4जी (5जी- सज्ज) नेटवर्क लाँच करून आणि जवळपास 98,000 स्वदेशी 4जी टॉवर्स सुरू करत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हे संपूर्ण तंत्रज्ञान देशातच विकसित केलेल्या प्रणालींवर आधारित आहे. सी-डॉटने विकसित केलेले मुख्य नेटवर्क, तेजस नेटवर्क्सचा रेडिओ ॲक्सेस नेटवर्क (आरएएन) आणि टीसीएसने केलेले एकत्रीकरण, हे सर्व एकत्रितरीत्या भारताच्या तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत तसेच आत्मनिर्भर भारत या सरकारच्या वचन पद्धतीची ठोस अंमलबजावणी दर्शवतात.
पूर्वी 2जी, 3जी आणि 4जी सारख्या दूरसंचार तंत्रज्ञानासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून असलेल्या भारताने कोविड-19 महामारीच्या काळात शून्यातून स्वतःची पूर्णपणे स्वदेशी 4जी तंत्रज्ञान रचना विकसित केली. ही कामगिरी भारताच्या सक्षमतेचा, जलद नवोन्मेषाचा आणि पुरवठा साखळी स्वावलंबनाचा पुरावा आहे. या यशामुळे भारत अशा पाच देशांमध्ये समाविष्ट झाला आहे जे पूर्णपणे स्वदेशी 4जी सेवा सुरू करण्यास सक्षम आहेत. हे खऱ्या ‘स्वदेशी भावने’चे प्रतिबिंब आहे. बीएसएनएल चा क्लाउड-नेटिव्ह, 5जी-सज्ज 4जी स्टॅक तात्काळ संपर्क सुविधा प्रदान करण्यास सक्षम असून भविष्यात 5जी मध्ये सहज संक्रमणाची सुविधा देतो. यामुळे देशांतर्गत प्रतिभेला चालना, स्थानिक पुरवठा साखळीचे बळकटीकरण आणि तंत्रज्ञान स्वावलंबन यांना प्रोत्साहन मिळेल. भारत 6जी अलायन्स, 100 5जी/6जी लॅब आणि टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड यासारख्या पूरक सरकारी उपक्रमांद्वारे संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत आहेत, आणि त्यातून विकसित भारत 2047 तसेच डिजिटल तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहेत.
4G म्हणजे काय?
4जी हे चौथ्या पिढीच्या वायरलेसचे संक्षिप्त नाव आहे. हा ब्रॉडबँड मोबाइल कम्युनिकेशन्सचा टप्पा जो 3जी ची जागा घेतो आणि 5जी च्या पूर्ववर्ती आहे.
4जी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वायरलेस वापरकर्ते हाय-डेफिनिशन व्हिडिओ आणि ऑडिओ स्ट्रीम करू शकतात. 4जी वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देखील मिळते, ज्यासाठी वापरकर्त्यांना इंटरनेट सेवा प्रदात्याकडून केबल किंवा वायर द्वारे इंटरनेट कनेक्शन घेण्याची आवश्यकता नसते.
4जी मध्ये एलटीई, एमआयएमओ (मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट), आणि ओएफडीएम (ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बँडविड्थ, नेटवर्क कार्यक्षमता वाढवली जाते तसेच नेटवर्कवरील गर्दी कमी केली जाते.
4जी स्टॅकची वैशिष्ट्ये
- संपूर्णपणे स्वदेशी स्टॅक: रेडिओ ॲक्सेस नेटवर्क (तेजस), कोअर नेटवर्क (सी-डॉट) आणि स्थानिक एकत्रीकरण, यामुळे परदेशी विक्रेत्यांवरील अवलंबित्व कमी झाले आणि स्थानिक तंत्रज्ञान क्षमता निर्माण होते.
- सॉफ्टवेअर-आधारित / क्लाउड नेटिव्ह प्रणाली: जलद अपग्रेड, विस्तारक्षमता आणि भविष्यातील 5जी मध्ये संक्रमणाचा मार्ग सुलभ करते.
- भविष्याभिमुख रचना: "5जी सज्ज" म्हणून वर्णन केलेल्या साइट्स आणि संरचनांमुळे, विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल न करता पुढील पिढीच्या नेटवर्कमध्ये आद्यतनीकरण करणे सोपे होईल.
BSNL च्या स्वदेशी 4जी सेवा दर्जेदार डिजिटल सेवा उपलब्ध करून देऊन आदिवासी प्रदेश, दुर्गम गावे आणि डोंगराळ भागांना लाभदायक ठरतील अशी अपेक्षा आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात शिक्षण घेण्यासाठी उपस्थित राहता येईल, दूरच्या ठिकाणी शेतकरी पिकांच्या किंमती तपासू शकतील तसेच रुग्णांना टेलिमेडिसिनद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. याव्यतिरिक्त, ही योजना भारतीय सशस्त्र दलासाठी सुरक्षित आणि विश्वसनीय संवाद व्यवस्था मजबूत करण्यात मोठी मदत करेल.

स्वदेशी 4जी तंत्रज्ञान रचनेचे फायदे आणि परिणाम
- धोरणात्मक स्वायत्तता आणि डिजिटल सार्वभौमत्व: पूर्णपणे स्वदेशी 4जी तंत्रज्ञान रचना भारताला स्वतःच्या दूरसंचार पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते, परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करते आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते तसेच देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेला आणि डिजिटल सार्वभौमत्वाला नवीन उंची प्राप्त होते.
- रोजगार निर्मिती आणि पुरवठा-साखळी विकास: स्थानिक उत्पादन आणि तैनातीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होत आहेत, पुरवठादार परिसंस्था मजबूत होत आहेत आणि प्रगत दूरसंचार प्रणालींचे डिझाइन, चाचणी आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक असणारे सक्षम कुशल देशांतर्गत कार्यबल वाढवत आहेत. यामुळे भारताच्या दूरसंचार क्षेत्रात मानवी भांडवल आणि पुरवठा-साखळी स्वायत्तता दोन्हींची भर पडली आहे.
- जागतिक क्षमतेसह देशांतर्गत मागणी पूर्ण करणे: पूर्णपणे स्वदेशी 4जी तंत्रज्ञान रचना केवळ भारताच्या अंतर्गत गरजा पूर्ण करत नाही तर निर्यात क्षमतेसह डिझाइन केलेली आहे. काही देशांनी या तंत्रज्ञानाबद्दल आधीच रस दाखवला आहे यामुळे भारताला जागतिक पातळीवर नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
- स्वदेशी क्षमतेद्वारे जलद विकास: संपूर्ण 4जी संरचना केवळ 22 महिन्यांत देशातच विकसित करण्यात आली आहे - जे इतर अनेक देशांच्या तुलनेत अत्यंत जलद गतीचे यश मानले जाते.
- विस्तारित व्याप्ती आणि पोहोच: देशभरात 92,000 हून अधिक 4जी साइट्स सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे 2.2 कोटीहून अधिक नागरिक जोडले गेले आहेत. यापैकी सुमारे 20 लाख वापरकर्त्यांचे डिजिटल युगातील हे त्यांचे पहिलेच पाऊल आहे. दररोज या नेटवर्कद्वारे कार्यक्षमता आणि सुरक्षिततेसह सुमारे चार पेटाबाइट्स डेटा ट्रॅफिक व्यवस्थापित केले जाते.
- स्वदेशी तत्त्वाची अंमलबजावणी: स्वातंत्रज्ञानाची अंमलबजावणी ही स्वदेशी तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे -जी एका कल्पनेला स्थानिक उत्पादन, देशी कौशल्य जोपासना, सामुदायिक उद्योजकता आणि आर्थिक सन्मान यांचा जनक असलेल्या विकासाच्या इंजिनमध्ये रूपांतरित करते. .
- आर्थिक उलाढाल आणि नागरिकांचा विश्वास: स्वदेशी तंत्रज्ञानावरील वाढत्या विश्वासामुळे 17 वर्षांच्या आर्थिक ताणानंतर बीएसएनएलला सलग नफा मिळवता आला आहे. हे यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असणाऱ्या संस्थांवरील नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित करते.
4जी च्या पुढे जाऊन 5जी चा स्वीकार
स्वदेशी 4जी तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आणि 5जी च्या विस्तारामुळे भारताची डिजिटल संपर्कप्रणाली झपाट्याने वाढत आहे आणि देशाच्या दूरसंचार परिसंस्थेला बळकटी देत आहे.
- 1 ऑक्टोबर 2022 रोजी 5जी सेवा सुरू झाल्या.
- लाँच झाल्यापासून 8 महिन्यांच्या आत, 700 जिल्ह्यांमध्ये 2,00,000 साइट्स स्थापित करण्यात आल्या आहेत.
- सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5जी नेटवर्क सुरू झाले आहे.
- जगातील सर्वात जलद 5जी रोलआउट्सपैकी एक बनले आहे.
- सध्या, देशभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 5जी सेवा उपलब्ध आहे.
- 30 जून 2025 पर्यंत, देशभरातील दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे 4.86 लाख 5जी बेस ट्रान्सीव्हर स्टेशन स्थापित केले गेले आहेत.
5जी वापर क्षेत्रे
- शेती: 5जी तंत्रज्ञानामुळे प्रिसिजन फार्मिंग आणि स्मार्ट शेती शक्य होईल. आयओटी सेन्सर्स, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने मिळणाऱ्या रिअल-टाइम डेटावर आधारित शेती अधिक कार्यक्षम होईल ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल आणि संसाधनांचा योग्य व्यवस्थापन करता येईल.
- आरोग्यसेवा: 5जी च्या माध्यमातून टेलिमेडिसिन, रिमोट डायग्नोस्टिक्स आणि रिअल-टाइम आरोग्य देखरेख सुलभ होईल. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग खुला होईल.
- शिक्षण: वर्धित व्हर्च्युअल क्लासरूम आणि इमर्सिव्ह ऑगमेंटेड/व्हर्च्युअल रिअॅलिटी (एआर/व्हीआर) आधारित शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी होईल. यामुळे विद्यार्थ्यांना दुरस्त शिक्षणाच्या नवीन आणि आकर्षक संधी प्राप्त होतील.
- उत्पादन क्षेत्र आणि उद्योग 4.0: 5जी नेटवर्कमुळे ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि स्मार्ट कारखान्यांचे काम सुलभ होईल. अत्यंत विश्वासार्ह आणि कमी विलंब असलेल्या संप्रेषणामुळे उत्पादन कार्यक्षमता वाढेल, सुरक्षा सुधारेल आणि उद्योगांचे डिजिटलिकरण गती घेईल.
- स्मार्ट शहरे : 5जी तंत्रज्ञानामुळे ते कनेक्टेड उपकरणांद्वारे बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन, ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुरक्षा आणि पर्यावरणाशी संबंधित देखरेख सक्षम होईल.
- वाहन आणि परिवहन क्षेत्र : 5जी कनेक्टेड आणि स्वयंचलित वाहने शक्य होतील. रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स आणि सुरक्षित रस्ते वाहतूक प्रणाली आणि स्मार्ट परिवहन व्यवस्थापन यांना चालना मिळेल.
- मनोरंजन आणि माध्यम: 5जी मुळे वर्धित हाय-डेफिनिशन स्ट्रीमिंग, इमर्सिव्ह गेमिंग आणि परस्परसंवादी मीडिया अनुभव अधिक दर्जेदार आणि अखंड होतील.
6जीकडे जाणाऱ्या वाटेवर टाकलेले पाऊल
5जीच्या जलद विस्तारामुळे आणि देशांतर्गत स्विकृतीमुळे भारताच्या ‘भारत 6जी मोहिमे’चा मजबूत पाया रचला गेला आहे, ज्यामुळे देश भविष्यातील दूरसंचार नवोन्मेष जागतिक नेता म्हणून स्थान मिळवत आहे. सध्या, 6जी तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासाच्या टप्प्यात आहे आणि 2030 पर्यंत ते सर्वांना उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. 23 मार्च 2023 रोजी, भारताचा "भारत 6जी दृष्टिकोन" दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये 2030 पर्यंत 6जी तंत्रज्ञानाच्या डिझाइन, विकास आणि अंमलबजावणीमध्ये अग्रणी भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘भारत 6जी दृष्टिकोन’ परवडण्याजोगेपणा, शाश्वतता आणि सर्वव्यापीता (सार्वत्रिकता) या तत्त्वांवर आधारित आहे. दूरसंचार विभागाने 'भारत 6जी आघाडी' स्थापन करण्यास मदत केली आहे. ही आघाडी देशांतर्गत उद्योग शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि मानवीकरण संस्थांचा समूह आहे. भारताच्या 6जी दृष्टिकोनाशी सुसंगत ठोस कृती आराखडा तयार करणे हा याचा उद्देश आहे. कृती योजना विकसित करण्यासाठी देशांतर्गत उद्योग, शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि मानक संस्थांची एक युती आहे.
6जी रोल-आउटसाठी सरकारने हाती घेतलेले उपक्रम
- देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये क्षमता बांधणीसाठी 100 5जी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांमुळे क्षमता वर्धन तसेच 6जी-सज्ज शैक्षणिक आणि स्टार्ट-अप परिसंस्था निर्माण होत आहेत.
- 1 ऑक्टोबर 2022 रोजी टेलिकॉम क्षेत्रातील 6जी संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेषासाठी निधी देण्याच्या उद्देशाने टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड योजना सुरू केली. या माध्यमातून शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप्स, सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्याला चालना मिळाली आहे. 31 जुलै 2025 पर्यंत 275.88 कोटी रुपयांच्या 104 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
- सरकारने 6जी आघाडी स्थापन केली आहे, ज्यामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानकीकरण संस्था यांचा समावेश आहे. ही आघाडी भारत 6जी दृष्टिकोन साकारण्यासाठी कृती आराखडा तयार करत आहे. भारताने जागतिक 6जी आघाडी बरोबर समंजस्य करार करून आंतरराष्ट्रीय सहकार्यालाही प्रोत्साहन दिले आहे.
- एनएम-आयसीपीएस अंतर्गत, आयआयटी बंगळुरू येथे एक तंत्रज्ञान नवोन्मेष हब स्थापन करण्यात आले आहे. हे हब रिकॉन्फिगर करण्यायोग्य इंटेलिजेंट सरफेसेस आणि ओ-रॅन मॅसिव्ह सारख्या प्रगत संप्रेषण प्रणालींवर संशोधन करत आहे. यामुळे भविष्यातील 6जी नेटवर्क कव्हरेज, क्षमता आणि सेन्सिंग कार्यक्षमता सुधारेल.
जीएसएमए मोबाइल इंटरनेट संपर्क सुविधा निर्देशांक
स्टेट ऑफ मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी 2025 च्या अहवालानुसार (नेटवर्क कव्हरेज आणि पायाभूत सुविधा) नेटवर्क गुंतवणूकीचा बहुतांश भाग 5जीच्या विस्तारात गुंतवलेला आहे. सध्या जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येपर्यंत म्हणजे 54% (किंवा 4.4 अब्ज) 5जी पोहोचला आहे, ज्यापैकी 2024 मध्ये 70 कोटींहून अधिक अतिरिक्त लोकांपर्यंत 5जी पोहोचले आहेत. या वाढीपैकी निम्म्याहून अधिक वाढ भारतामुळे झाली असून भारताने 5जी लोकसंख्या कव्हरेजमध्ये 80% पेक्षा जास्त लोकसंख्या व्याप्ती साध्य केली आहे.
2024 मध्ये, देशातील मासिक 5जी ट्रॅफिक तीन पटीने वाढले आणि आता भारतातील एकूण मोबाईल ट्रॅफिकच्या 36% वर पोहोचली आहे, जे 2023 मध्ये ही आकडेवारी 15% होती.
जागतिक संदर्भ
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ च्या 2024 च्या आकडेवारीनुसार,
- अंदाजे 5.5 अब्ज लोक - किंवा जगाच्या लोकसंख्येच्या 68 टक्के - लोक इंटरनेट वापरत आहेत.
- 2019 मध्ये हे प्रमाण फक्त 53 टक्के होते, म्हणजेच त्या काळात 1.3 अब्ज लोकांनी या कालावधीत प्रथमच इंटरनेट वापरायला सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ 2024 च्या अहवालातील काही प्रमुख निष्कर्षांमध्ये हे समाविष्ट आहे:
- लिंग समानता सुधारत आहे: 2024 मध्ये, 70% पुरुष आणि 65% महिला इंटरनेट वापरत होत्या, दोघांमधील फरक 18.9 कोटी इतका राहिला आहे. परंतु आता तो अल्पविकसित देश वगळता इतरत्र हळूहळू कमी होत आहे.
- युवावर्ग अधिक जोडलेला: 15-24 वर्ष वयोगटातील 79% लोक ऑनलाइन आहेत, जे इतरांपेक्षा 13 टक्के जास्त आहेत. ही तफावत कमी होत आहे.
- परवडण्याचे आव्हान: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्थिर ब्रॉडबँड मिळवण्यासाठी महिन्याच्या उत्पन्नातील जवळपास एक तृतीयांश रक्कम खर्च करावी लागते.
- मोबाईल फोनचा व्यापक वापर: 10 वर्षांवरील प्रत्येक 5 पैकी 4 लोकांकडे फोन आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 95% तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 56% लोकांकडे मोबाईल आहे.
- 5जी विस्तारात असमतोल: जगभरातील 51% लोकसंख्या 5जी कव्हरेज मध्ये आली आहे. परंतु उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 84% तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 4% लोक कव्हरेज मध्ये आहेत.
- मोबाइल ब्रॉडबँड वाढत आहे: मोबाइल-सेल्युलर सेवा इतक्या लोकांजवळ पोहोचली आहे पण फिक्स्ड ब्रॉडबँड अद्यापही वैभवशाली सेवा मानली जाते.
- डेटा ट्राफिकमध्ये मोठी वाढ: उच्च उत्पन्न असलेल्या वापरकर्त्यांची सरासरी दरमहा 16.2 जीबी आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या (2 जीबी) पेक्षा आठ पट जास्त आहे.
निष्कर्ष
स्वदेशी 4जी तंत्रज्ञान रचनेची अंमलबजावणी भारतातील डिजिटल परिवर्तनातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे तंत्रज्ञान आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक विकास यांचा संगम साधला गेला आहे. या उपक्रमामुळे लाखो मोबाईल यूजर्स इंटरनेटशी जोडले गेले, नवीन रोजगार निर्मिती झाली आणि भारताने जागतिक दर्जाचे दूरसंचार उपाय स्वतः डिझाईन आणि अंमलबजावणी करण्याची क्षमता सिद्ध केली. भविष्याभिमुख, 5जी-सज्ज संरचना आणि निर्यात क्षमतेसह, हा उपक्रम जागतिक डिजिटल महासत्ता म्हणून भारताचे स्थान मजबूत करत आहे. या प्रगतीला पूरक म्हणून, 5जी विस्तारासाठी सुरू असलेले सरकारी उपक्रम, भारत 6जी आघाडी' आणि संबंधित कार्यक्रमांद्वारे 6जी तंत्रज्ञानाचा विकास याची खात्री करतो की, भारत पुढील पिढीच्या दूरसंचार नवोन्मेषांचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. हे सर्व प्रयत्न एकत्रितपणे भारताला ‘विकसित भारत 2047’ च्या दिशेने नेत आहेत , जिथे भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डिजिटल सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू ठरेल.
संदर्भ
ज्योतीरादित्य एम सिंदिया (X Handle)- https://x.com/JM_Scindia/status/1971847954827755710
पंतप्रधान कार्यालय:
दूरसंचार मंत्रालय :
टेक्नॉलॉजी डायजेस्ट, ट्राय
जीएसएमए (Global System for Mobile Communications Association):
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ:
टेक टार्गेट :
पीडीएफ फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156383)
आगंतुक पटल : 23
Provide suggestions / comments