Farmer's Welfare
वर्ल्ड फूड इंडिया 2025
ज्या ठिकाणी स्वादाचा जागतिक धोरणात्मक भागीदारीशी होतो संगम
Posted On:
24 SEP 2025 1:14PM
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2025
महत्त्वाचे मुद्दे
- वर्ल्ड फूड इंडिया 2025 हा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेला, भारताला 'जागतिक अन्न केंद्र' म्हणून स्थापित करणारा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम 25-28 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीत आयोजित केला जाणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
- 90 हून अधिक देश आणि 2000 हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.
- या कार्यक्रमात न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया भागीदार देश म्हणून सहभागी होतील, तर जपान, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम आणि रशिया हे फोकस देश म्हणून सहभागी होतील.
- भारत दूध, कांदे आणि डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आहे. तर, तांदूळ, गहू, ऊस, चहा, फळे आणि भाज्या तसेच अंडी यांचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.
- गेल्या एका दशकात अन्न प्रक्रिया क्षेत्रात 7.33 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा थेट परदेशी गुंतवणूकीचा ओघ आला.
प्रस्तावना
भारताचा अन्नप्रक्रिया उद्योग एका परिवर्तन कार्यशक्तीच्या रूपात स्थापित होत आहे. या उद्योगाने देशाला जागतिक अन्न केंद्राच्या रूपात नावारूपाला आणले आहे. या विकासाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने शेतापासून जेवणाच्या ताटापर्यंतचा संपर्क मजबूत करण्यासाठी मूल्य संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी कोल्ड चेन संरचनेचा विस्तार करण्यासाठी तसेच स्टार्टप्स लॉजिस्टिक्स आणि किरकोळ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक धोरणात्मक उपक्रम सुरू केले आहेत. या प्रयत्नांनी एका मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाची पायाभरणी केली आहे.

याच दृष्टिकोनाला अनुसरून अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 2017 मध्ये भारताच्या समृद्ध अन्न संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आरेखित करण्यात आलेला आपला प्रमुख कार्यक्रम ‘वर्ल्ड फुड इंडिया’चा शुभारंभ केला. 2023 आणि 2024 मध्ये या कार्यक्रमाच्या आणखी दोन आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या आणि चौथी आवृत्ती 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठीचा प्रास्तविक कार्यक्रम (कर्टन रेझर) 23 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
स्थापनेपासून वर्ल्ड फुड इंडिया कार्यक्रम, जागतिक भागधारकांसाठी भारताच्या गतिशील अन्न प्रक्रिया क्षेत्रासोबत जोडले जाण्यासाठी, सहयोग आणि संधी शोधण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ बनले आहे. वर्ल्ड फुड इंडिया 2025 मध्ये अग्रगण्य अन्नप्रक्रिया कंपन्या, नवोन्मेषक, पुरवठा साखळीतील घटक आणि उपकरण उत्पादक सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांदरम्यान भागीदारी निर्माण करण्यासाठी, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि नवीन व्यवसाय संधी उघडण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ म्हणून काम करेल.
भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी उपक्रम
गेल्या 11 वर्षांत भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योगाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. यामागे शक्तिशाली कृषी आधार, वाढती मागणी आणि समर्थक सरकारी धोरणे आहेत. भारत आता या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे आणि पुढेही तो स्थिर विकास साधत आहे. भारताचा मजबूत कृषी आधार, विशेषतः फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणून असलेला आपला दर्जा, अन्न प्रक्रिया क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन घडवून आणत आहे. हे क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे बनले आहे. राष्ट्रीय स्थूल उत्पादन, रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढ यामध्ये याचा मोठा वाटा आहे. 2024-25 मध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात 49.4 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली, ज्यामध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाटा 20.4% होता, जो 2014-15 मध्ये केवळ 13.7% इतका होता. अधिकृत सर्वेक्षणांनुसार, नोंदणीकृत उद्योगांमध्ये सुमारे 22.3 लाख कामगार तर नोंदणीकृत नसलेल्या क्षेत्रात 46.8 लाख कामगार कार्यरत आहेत.

भारत सरकार अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक दर्जाचे मूल्यवर्धित कृषी केंद्र बनवण्याच्या उद्देशाने विविध योजनांद्वारे आणि सुधारणा करून सक्रिय प्रोत्साहन देत आहे. देशातील नोंदणीकृत अन्न व्यवसाय संचालकांची संख्या 25 लाखांवरून 64 लाखांपर्यंत वाढली आहे, जे हे क्षेत्र औपचारिक अर्थव्यवस्थेकडे झपाट्याने वाटचाल करत असल्याचे दर्शक आहे. 24 मेगा फूड पार्क, 22 कृषी-प्रक्रिया क्लस्टर आणि 289 शीतसाखळी प्रकल्प तसेच 305 प्रक्रिया आणि संवर्धन युनिट्स पूर्ण करून या क्षेत्रासाठीच्या भौतिक पायाभूत सुविधा देखील मजबूत झाल्या आहेत. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे. याशिवाय, ऑपरेशन ग्रीन्स अंतर्गत 10 प्रकल्पांनी मूल्यवर्धन साधले गेले आहे, तर 225 संशोधन आणि विकास प्रकल्पांनी 20 पेटंट आणि 52 व्यावसायिक तंत्रज्ञान मिळवले आहेत.
जागतिक विजेते तयार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय ब्रँडना प्रोत्साहन देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (2021-22 ते 2026-27) 10,900 कोटी रुपये खर्चासह अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLISFPI) राबवत आहे. याशिवाय, रेडी-टू-ईट (RTE) आणि रेडी-टू-कूक (RTC) भरड धान्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भरड धान्याचा वापर वाढविण्यासाठी भरड धान्य-आधारित उत्पादनांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLISMBP) सुरू करण्यात आली आहे.
अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, सरकारने ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देणे, फूड पार्कमध्ये परवडणाऱ्या व्याजदरात कर्जासाठी 20000 कोटी रुपयांचा नाबार्ड निधी स्थापन करणे आणि ऑनलाइन योजना व्यवस्थापनाद्वारे व्यवसाय सुलभता वाढवणे यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY) सारख्या प्रमुख योजना आधुनिक पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम पुरवठा साखळी निर्माण करत आहेत, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे औपचारिकीकरण योजना (PMFME) सूक्ष्म-युनिट्सना तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करत आहे. एकत्रितपणे, या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट अपव्यय कमी करणे, प्रक्रिया क्षमता वाढवणे, रोजगार निर्माण करणे आणि भारताला जागतिक अन्न प्रक्रिया केंद्र म्हणून स्थान मिळवून देणे, हेच आहे.
वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2025
WFI 2025 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. मागील आवृत्त्यांनी मिळवलेल्या यशाच्या आधारावर ही आवृत्ती आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती ठरणार आहे. या आवृत्तीत 90 हून अधिक देश, 2000 हून अधिक प्रदर्शक आणि शेतीपासून ते जेवणाच्या ताटापर्यंत, संपूर्ण अन्न मूल्य साखळीशी संबंधित हजारो भागधारक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
WFI 2025 चे उद्दिष्ट
वर्ल्ड फूड इंडिया 2025 चे उद्दिष्ट अन्न प्रक्रिया तसेच अन्न पुरवठ्यासाठी भारताला 'जागतिक अन्न केंद्र' म्हणून प्रदर्शित करणे आहे. वरिष्ठ सरकारी मान्यवर, गुंतवणूकदार, प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत अन्न कंपन्यांचे व्यावसायिक नेते आणि सर्व संबंधित भागधारकांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संमेलनांपैकी एक असलेल्या या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. जगभरातील सर्व संबंधित घटक — जसे की, उत्पादक, अन्न प्रक्रिया करणारे, उपकरण उत्पादक, लॉजिस्टिक्स कंपन्या, कोल्ड चेन कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार, स्टार्ट-अप आणि नवोन्मेषक, किरकोळ अन्न विक्रेते इत्यादी सर्व संबंधित भागधारकांना एकाच व्यासपीठावर आपली ताकद प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
- जागतिक विचारवंत, धोरणकर्ते आणि उद्योग तज्ञांबरोबर उच्च-स्तरीय ज्ञान सत्रे आणि पॅनेल चर्चा.
- अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, यंत्रसामग्री, कोल्ड चेन आणि संबंधित उद्योगांमधील नवोन्मेषावर प्रकाश टाकणारी क्षेत्रीय प्रदर्शने.
- धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्य निर्माण करण्याच्या उद्देशाने B2B आणि B2G नेटवर्किंगची संधी.
- निरोगी, शाश्वत आणि भविष्यकालीन अन्नातील जागतिक ट्रेंडच्या सोबतीला भारताच्या विविध अन्न वारशाचे प्रदर्शन करणाऱ्या पाककृतींचा अनुभव आणि शेफ स्पर्धा.

याव्यतिरिक्त, वर्ल्ड फुड इंडिया 2025 सोबत दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातील:
- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे (FSSAI) तिसऱ्या जागतिक अन्न नियामक शिखर परिषदेचे आयोजन- ही परिषद जागतिक नियामकांना अन्न सुरक्षा मानकांबाबत सुसंवाद साधण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय नियामक सहकार्य मजबूत करण्यासाठी एकत्र आणणारे अद्वितीय व्यासपीठ प्रदान आहे.
- भारतीय समुद्री खाद्य निर्यात संघाद्वारे (SEAI) आयोजित 24 वे भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्रीखाद्य प्रदर्शन (IISS) - भारताच्या वाढत्या समुद्री खाद्य निर्यात क्षमतेवर आणि जागतिक बाजारपेठेतील संबंधांवर लक्ष केंद्रित करत आहे.
विकसित भारत 2047, भारताला एक विकसित, समावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राष्ट्र म्हणून कल्पित करते आणि वर्ल्ड फुड इंडिया 2025 अन्न प्रक्रिया क्षेत्राला प्रगतीपथावर नेऊन या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा कार्यक्रम ग्रामीण समृद्धी वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोपक्रम एकत्र आणतो. शाश्वतता, पायाभूत सुविधा, उद्योजकता, जागतिक नेतृत्व आणि नवोन्मेष या पाच धोरणात्मक स्तंभांवर आधारित वर्ल्ड फुड इंडिया 2025 कार्यक्रम हवामान - स्मार्ट तंत्रज्ञान, पोषण-केंद्रित उत्पादने, प्रगत अन्न-तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठ एकत्रीकरणावर भर देतो, यासोबतच सूक्ष्म-उद्योगांना, क्षमता विकासाला आणि मेक इन इंडियाला अभियानाला पाठबळ देतो, जो दृष्टिकोन 2047 च्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भागीदार आणि केंद्रित देश
वर्ल्ड फुड इंडियाच्या या वर्षीच्या आवृत्तीत न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया हे भागीदार देश म्हणून सहभागी होतील, तर जपान, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम आणि रशिया हे केंद्रित देश म्हणून सहभागी होतील. यातून अन्न क्षेत्रात भारताचे वाढते आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रतिबिंबित होते. या देशांची उपस्थिती द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यास, ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्यास तसेच व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण करण्यास हातभार लावेल.

वर्ल्ड फुड इंडिया 2025 चे मुख्य केंद्रबिंदू

वर्ल्ड फुड इंडिया 2025 चे प्रमुख कार्यक्रम
|
कार्यक्रम घटक
|
मुख्य ठळक मुद्दे
|
|
स्टार्टअप ग्रँड चॅलेंज
|
नवोन्मेष प्रदर्शन
मार्गदर्शन संधी
निधी संपर्क
|
|
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उच्च-स्तरीय गोलमेज बैठक
|
उद्योग आणि धोरणकर्ते यांच्यातील संवाद
शासकीय धोरण चौकट
कर आकारणी आणि व्यापार गतिशीलता
नियामक आव्हानांवरील चर्चा
|
|
B2B/B2G/G2G बैठका
|
थेट व्यवसाय संबंध
सरकारी भागीदारी
आंतरराष्ट्रीय सहकार्य
धोरणात्मक संलग्नता
|
|
प्रदर्शने: संधींचे प्रदर्शन
|
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, देश, मंत्रालय-निहाय मंडप
उत्पादन- आधारित विभाग
पाळीव प्राण्यांच्या अन्नासाठी विशेष क्षेत्र
HoReCa (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे/केटरिंग), मादक पेय आणि कापणीनंतरची यंत्रसामग्री
|
|
परिषद आणि ज्ञान सत्रे
|
उद्योगाशी संबंधित अंतर्दृष्टी
ज्ञानविनीमय सत्रे
नवीनतम ट्रेंड आणि नवोन्मेष
तांत्रिक कार्यशाळा
|
|
डिजिटल प्रदर्शन
|
डिजिटल उत्पादन प्रदर्शन
परस्परसंवादी सादरीकरणे
इमर्सिव्ह टेक झोन
स्मार्ट पुरवठा साखळी
|
|
ग्रेट इंडियन फूड स्ट्रीट
|
भारतीय स्वाद
प्रादेशिक पाककला प्रदर्शन
स्वयंपाकाचा प्रत्यक्ष अनुभव
फ्यूजन फूड इनोव्हेशन
|
वर्ल्ड फूड इंडिया 2024
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडियाची तिसरी आवृत्ती 19 ते 22 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली होती. वर्ल्ड फूड इंडिया 2024 ला 9 मंत्रालये, 8 संस्था आणि 26 राज्यांनी पाठिंबा दिला होता. यात 1,557 प्रदर्शक, 20 देशांचे मंडप, 108 राष्ट्रांचे 809 खरेदीदार आणि 2,390 परदेशी प्रतिनिधी सहभागी झाले होते. 70,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या या प्रदर्शनातील 9 विभागात 100 हून अधिक ODOP उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती. या आवृत्तीत जपान भागीदार देश तर इराण आणि व्हिएतनाम फोकस देश म्हणून सहभागी झाले होते.

या कार्यक्रमादरम्यान, खालील टप्पे साध्य करण्यात आले:
- अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLISFPI) आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत 5,135 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह 67 अन्न प्रक्रिया युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले.
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे औपचारिकीकरण (PMFME) योजनेअंतर्गत 25,000 लाभार्थ्यांना 2,351 कोटी रुपयांच्या सूक्ष्म प्रकल्पांसाठी क्रेडिट-लिंक्ड सहाय्य मिळाले.
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे औपचारिकीकरण (PMFME) योजनेअंतर्गत 70,000 बचत गट सदस्यांना 245 कोटी रुपयांचे बिज भांडवल मंजूर करण्यात आले.
निष्कर्ष
वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2025 हे केवळ भारताच्या अन्न क्षेत्राचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ नाही तर भारतासोबतीने अन्न क्षेत्राचे भविष्य निर्माण करण्यासाठी जगाला एक खुले आमंत्रण आहे. हा कार्यक्रम भारताला केवळ बाजारपेठ म्हणून नव्हे तर प्रमाण, नवोन्मेष, परवडणारी क्षमता आणि शाश्वतता एकत्रित करणारा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मिळवून देतो. भरड धान्यासारख्या परंपरागत धान्यांपासून ते वनस्पती-आधारित प्रथिनांसारख्या उदयोन्मुख श्रेणींपर्यंत, भारत सामग्री, ग्राहक वर्ग आणि मूल्य साखळीमध्ये अतुलनीय विविधता प्रदान करतो.
जगातील सर्वात मोठा दुध उत्पादक, फळे आणि भाज्यांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीसाठी वेगाने वाढणारे केंद्र म्हणून भारताने स्वतःला जागतिक अन्न प्रक्रिया महाशक्ती म्हणून स्थापित केले आहे. व्यवसायाला मदत करणारी धोरणे, सक्षम पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेसाठी सुधारणा यातून या परिसंस्थेला आणखी बळकटी मिळत आहे.
अशावेळी जेव्हा जग अन्न सुरक्षा, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांशी झुंजत असताना, भारत स्थिरता, विश्वास आणि सहकार्य प्रदान करणारा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उभा आहे. वर्ल्ड फुड इंडिया 2025 ची संकल्पना केवळ गुंतवणूक वाढवण्यासाठीच नाही तर पोषण, शाश्वतता आणि समावेशक वाढीतील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी भागीदारी निर्माण करण्यासाठी देखील एक व्यासपीठ म्हणून केली आहे. जागतिक नेते आणि भागधारकांसह, भारत जगासाठी एक सशक्त, नवोन्मेषी आणि शाश्वत अन्न भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे.
संदर्भ
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156031)
आगंतुक पटल : 121
Provide suggestions / comments