• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

त्रिपुरा सुंदरी मंदिर : ईशान्य भारतातील आध्यात्मिक पर्यटनाची नवी पहाट

Posted On: 21 SEP 2025 1:11PM

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2025

 

"विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील ईशान्य भारत हा सर्वात वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. ईशान्य भारत म्हणजे पर्यटनासाठीचे एक परिपूर्ण पॅकेज आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी - उदयोन्मुख ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025,[1]

ठळक मुद्दे

  • त्रिपुरा सुंदरी मंदिर पुनर्विकास – या प्रकल्पाला 2020–21 मध्ये 34.43 कोटी रुपये खर्चासही मंजुरी दिली गेली होती. या प्रकल्पाअंतर्गत पवित्र शक्तीपीठ जतन संवर्धनासह सुविधा, संपर्क जोडणी व्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या गेल्या.
  • प्रशाद अर्थात तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक, वारसा संवर्धन मोहीमेच्या (PRASHAD - Pilgrimage Rejuvenation and Spiritual, Heritage Augmentation Drive) व्याप्तीचा विस्तार - या योजनेअंतर्गत 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 54 प्रकल्प हाती घेण्यात आले असून, प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांनी सुसज्ज केले आहे.
  • आस्था आणि विकास एकत्र – प्रशाद या मोहिमेच्या माध्यमातून वारशाचे संवर्धन आणि प्रगतीला परस्परांशी जोडले गेले असून, यातून पंतप्रधान मोदी यांच्या विकास भी, विरासत भी या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटले आहे. यामुळे ईशान्य भारत आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र बनू लागले आहे.

 

 

प्रस्तावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार पर्यटन म्हणजे वारसा आणि विकास यांच्यातील दुवा म्हणूनच संबोधले असून, भारताच्या प्रगतीच्या आपल्या दृष्टिकोनात आध्यात्मिक पर्यटनाला एक विशेष स्थान असल्याचा उल्लेखही त्यांनी अनेकदा केला आहे. तीर्थस्थळे ही केवळ आस्थेची केंद्रे नसून, संस्कृती आणि समुदायाची जिवंत प्रतीके आहेत. प्रशाद सारख्या उपक्रमांमुळे अनेक तीर्थस्थळांना नवसंजीवनी मिळाली आहे. सोयी सुविधांमधील सुधारण, संपर्क जोडणी व्यवस्थेचे बळकटीकरण आणि या पवित्र स्थळांच्या पावित्र्याची जपणूक, या माध्यमातून आध्यात्मिक यात्रा अधिक परिपूर्णतेचा अनुभव देणाऱ्या ठरतील यासाठी सरकार प्रयत्नशील राहिले आहे. त्याच वेळी याअंतर्गत स्थानिक समुदायांच्या आर्थिक विकासालाही प्रोत्साहन दिले गेले आहे. भक्ती आणि विकास यांचा संगम साधणारा हा दृष्टिकोनामुळे देशभरातील यात्रेकरूंच्या अनुभवाला नवीन आयाम लाभला आहे.

हाच दृष्टिकोन पुढे नेण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान 22 सप्टेंबर 2025 रोजी त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील[2] उदयपूर शहरात असलेल्या 51 पूजनीय शक्तीपीठांपैकी[3] एक असलेल्या पुनर्विकसित त्रिपुरा सुंदरी मंदिराची पूजा आणि दर्शन करून उद्घाटन करणार आहेत. त्रिपुराची राजधानी अगरतळा इथल्या एका टेकडीवर असलेले, हे मंदिर आपल्या प्राचीन पावित्र्यासाठी आणि अफाट सांस्कृतिक मूल्यासाठी ओळखले जाते. प्रशाद या योजनेअंतर्गत या मंदिराचे आधुनिक सुविधा आणि सुधारित पायाभूत सुविधांसह पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. हे उद्घाटन ईशान्य भारतातील राज्यांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग असणार आहे. यामुळे भारताच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या नकाशावर त्रिपुरा स्थान अधिक भक्कम होणार असून, वारशाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासातून परंपरांचे जतन करत, कशा प्रकारे प्रगतीला प्रेरणा दिली जाऊ शकते, याची प्रचितीही यामुळे येणार आहे.

 

त्रिपुरा सुंदरी मंदिर : राष्ट्रीय महत्त्वाचे शक्तीपीठ

त्रिपुरा सुंदरी मंदिर, हे माताबारी म्हणूनही ओळखले जाते. हे ईशान्य भारतातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आणि त्रिपुराच्या सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक वारशाचे चिरस्थायी प्रतीक आहे. महाराजा धन्यमाणिक्य यांनी इसवी सन 1501 मध्ये या मंदिराची स्थापना केली होती. भारतीय उपखंडातील 51 शक्तीपीठांमध्ये या मंदिराला अत्यंत प्रतिष्ठिचे मानले जाते. एका आख्यायिकेनुसार, भगवान शिवाच्या तांडव नृत्यादरम्यान देवी सतीचा उजवा पाय या ठिकाणी पडला होता, त्यामुळे या भूमीला दैवी पावित्र्य प्राप्त झाले होते.

स्रोत : अतुल्य भारत आणि त्रिपुरा पर्यटन

  

वास्तुकलेच्या दृष्टीने, या मंदिरातून साधेपणा आणि सौंदर्याची प्रचिती येते. मंदिराची चौकोनी रचना आणि उतरत्या स्वरुपाच्या छताची रचना ही बंगालच्या ग्रामीण भागांमधील झोपड्यांच्या छताच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. यातून स्थानिक सौंदर्यशास्त्र आध्यात्मिक प्रतिकात्मकतेचा अनोखा मिलाफ घडून आला आहे. या मंदिराचा पाया हिंदू परंपरेत स्थैर्य आणि सहनशीलतेचे एक शुभ प्रतीक मानल्या जाणाऱ्या कासवाच्या पाठीच्या कूबडासारखा आहे, यामुळे त्रिपुरा सुंदरी मंदिराचे कुर्म पीठ म्हणूनही पूजन केले जाते. मंदिरा लगतच्याच कल्याण सागर तलावामुळे या पवित्र बंधाला अधिक गहिरे रूप प्राप्त होते. याचे कारण असे की, भाविक कासवांना या स्थळाच्या पावित्र्याचे जिवंत प्रतीक मानतात, आणि त्यामुळेच ते या तलाव परिसरात कासवांचे जतन संवर्धनही करतात. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन मूर्ती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मुख्य देवता, देवी त्रिपुरा सुंदरी. ही मुर्ती, पाच फूट उंच आहे. या मुर्तीला अधिष्ठात्री माता म्हणून पूजले जाते, तर दुसरी मूर्ती लहान असून, ती छोटो - मा किंवा देवी चंडी म्हणून ओळखली जाते. ही लहान मूर्ती त्रिपुराच्या राजांसाठी विशेष महत्त्वाची होती. इथले राजे, शिकार मोहिमां आणि लढायांच्या वेळी आपल्या संरक्षणासाठी आणि नशिबासाठी दैवी ताबीज म्हणून ही मुर्ती सोबत घेऊन जात असत.

त्रिपुरा हे नाव या राज्याच्या अस्तित्वाशी अगदी घट्टपणे विणले गेले आहे, हे नाव देवी त्रिपुरा सुंदरी या नावावरूच पडले असल्याचे मानले जाते. एका अर्थाने हे मंदिर म्हणजे केवळ भक्तीचे स्थान नसून, ते इथल्या सांस्कृतीचा मुलाधार आहे.[4] या मंदिराचे व्यवस्थापन राज्याने नेमलेल्या समितीद्वारे केले जाते, तर माता त्रिपुरा सुंदरी मंदिर विश्वस्त संस्थेच्या दीर्घकालीन विकासाची जबाबदारी सांभाळत आहे.

समन्वयाचे प्रतीक म्हणून गौरवल्या गेलेल्या या मंदिराने शाक्त पंथ, वैष्णव पंथासह विविध समुदायांमध्ये एकता निर्माण केली. या मंदिरासाठी पार पाडल्या जाणाऱ्या विधी परंपरांमध्ये हिंदू, मुस्लिम आणि आदिवासी समुहासह सर्वजण सहभागी होतात. आपल्या आध्यात्मिक भूमिकेव्यतिरिक्त, हे मंदिर त्रिपुराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा आधारस्तंभ म्हणून कायम आहे, तसेच त्याच्या वास्तुकलात्मक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वासाठी राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.

 

प्रशाद (PRASHAD) योजना

दृष्टिकोन आणि उद्देश

पर्यटन मंत्रालयाने पर्यटक सुविधा, सुलभता, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सक्षमीकरणासाठी तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक, वारसा संवर्धन मोहीम (Pilgrimage Rejuvenation and Spiritual, Heritage Augmentation Drive - PRASHAD) सुरू केली आहे. स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देऊ शकेल अशा तऱ्हेच्या एकात्मिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाद्वारे तीर्थक्षेत्र/वारसा शहराच्या मूळ गाभ्याचे जतन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

उद्दिष्टे

या योजनेच्या माध्यमातून खाली नमूद विविध प्रकारच्या कामांना निधी दिला जातो[5]::

Rejuvenation and spiritual augmentation of important national global pilgrimage destinations. (3).png

अंमलबजावणीचा दृष्टिकोन

प्रशाद ही एक केंद्र सरकारची योजना असून, त्यासाठी केंद्र सरकारद्वारे अर्थसहाय्य पुरवले जाते. याअतंर्गत सांस्कृतिक महत्त्व, पर्यटकांची संख्या आणि विकास क्षमतेच्या आधारावर प्रकल्पांची निवड केली जाते. यामुळे सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होते. शाश्वतता आणि सामुदायिक लाभ सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक भागधारकांसोबतच्या सल्लामसलतीनंतर योजनांची आखणी केली जाते.

परिणामकारता आणि प्रभाव

या योजनेअंतर्गत वारसा संवर्धनाच्या कामाचा आधुनिक सुविधांसोबत मिलाफ साधला गेला आहे. यामाध्यमातून तीर्थस्थळांचे रूपांतर आस्था, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचे समग्र केंद्र म्हणून केले गेले आहे. या योजनेमुळे पर्यटनाशी जोडलेल्या उपजीविकांच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत. एका अर्थाने ही योजना विकसित भारत 2047 च्या ध्येय पूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली असून, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकास भी, विरासत भी या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटले आहे.

या प्रकल्पांची व्याप्ती मोठी असून, त्याअंतर्गत प्राचीन मंदिरे आणि सुफी दर्ग्यांपासून ते बौद्ध मठ आणि ऐतिहासिक शहरांपर्यंत अनेक तीर्थ आणि वारसा स्थळांचा समावेश आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे, त्याद्वारे समतोल प्रादेशिक विकासाची सुनिश्चिती होत असून, या योजनेच्या माध्यमातून जागतिक दर्जाची आध्यात्मिक पर्यटन केंद्रे तयार करण्याची सरकारची वचनबद्धताही दिसून येत आहे.[6]

त्रिपुरा सुंदरी मंदिरातील विशिष्ट उपाययोजना

त्रिपुरा सुंदरी मंदिराचा पुनर्विकास प्रकल्प केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेअंतर्गत सुरू आहे. 2020–21 मध्ये 34.43 कोटी रुपये खर्चासह या प्रकल्पाला मंजूरी दिली गेली होती.[7] पर्यटन मंत्रालयाद्वारे या प्रकल्पाचे व्यवस्थापन केले जात आहे. या प्रकल्पातून मंदिर आणि मदीर परिसराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केले जात असलेले व्यापक प्रयत्न दिसून येतात. यामुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि त्रिपुरातील आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून मंदिराच्या भूमिकेची व्याप्तीही वाढली आहे.

या पुनर्विकासाअंतर्गत मंदिर संरचनेचे जतन करण्यासोबतच, एकूणच कायापालट केला गेला आहे. मुख्य मंदिर परिसरात, नवीन सुविधांमध्ये खाद्य दालन, बहुउद्देशीय सभागृह, भोग आणि प्रसाद घर, पूजेसाठीच्या साहित्याची दुकाने, आधुनिक स्वच्छतागृहे आणि मंदिर रोषणाईचा समावेश आहे. यानिमित्ताने आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यात मलनिस्सारण आणि जल पुरवठा प्रणाली, एक भूगर्भातील पाण्याची टाकी), पर्जन्य जल मार्गिका (Storm Water Drains), भूदृश्यीकरण (Landscaping) आणि उभ्या स्वरुपातील वृक्षारोपण, संकेतफलक, सौर पीव्ही ऊर्जा व्यवस्था, एक बाह्य प्रवेशद्वार, विद्युत सेवेशी संबंधित कामे आणि स्वच्छतागृहे तसेच कपडे बदलण्याची खोली यांसारख्या सुधारित सार्वजनिक सुविधांचा समावेश आहे.

सप्टेंबर 2025 पर्यंत, या प्रकल्पाअंतर्गतचे सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे आणि हा प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 28.01 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 सप्टेंबर 2025 रोजी मंदिराचे औपचारिक उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. या मंदिर आणि मंदिर परिसराच्या व्यापक विकासाकामांतील एक महत्वाचे आकर्षण म्हणजे मंदिराच्या जवळच्या 51 शक्तीपीठ उद्यानाची निर्मिती. या उद्यानात सर्व 51 पवित्र स्थळांच्या प्रतिकृती असेल, त्यामुळे हे उद्यान भाविकांसह सांस्कृतिक पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र बनेल.

एकूणात या सुधारणांमुळे कित्येक शतके जुन्या असलेल्या या शक्तीपीठाला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक स्थळ म्हणून ओळख मिळेल. यामुळे त्रिपुराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण होऊन, देशभरातील तसेच शेजारील देशांतील भाविकांच्याही उपजीविकेला चालना मिळेल, पर्यटन विषयक पायाभूत सुविधा बळकट होऊन आणि इथे भेट देणाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांमध्येही सुधारणा घडून येत आहे.

   

 

त्रिपुरा आणि ईशान्य भारतावरील व्यापक प्रभाव

प्रशाद ही योजना ईशान्य भारताच्या आध्यात्मिक आणि आर्थिक क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेच्या माध्यमातून वारसा संवर्धनासह पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे एकात्मिकीकरण घडवून आणत, तीर्थस्थळांना पर्यटनाच्या नेतृत्वाखालील प्रगतीच्या इंजिनांमध्ये रूपांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. या प्रदेशाकडे लोकांचा ओढा वाढत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली आहे, गावांमध्ये होमस्टे वाढत आहेत, युवा पर्यटक मार्गदर्शकांसाठी रोजगाराच्या संधी वाढत आहेत. एकूणचं पर्यटन आणि पर्यटक वाहतुशी संबंधित परिसंस्था अधिक बळकट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अनेक मंचांवरून एक बाब ठळकपणे नमूद केली आहे, ती म्हणजे पर्यावरण पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि वारसा नूतनीकरणाची कामांचा संबंध केवळ आकडेवारीशी जोडलेला नाही, तर त्याचा थेट संबंध हा, नोकऱ्या, स्थानिक उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेतल्या रुपांतरणाशी आहे.

GrnP0yMWoAA55NM.jpg

ईशान्य भारतात प्रशाद या योजनेच्या वाटचालीचा प्रारंभ जवळपास एका दशकापूर्वी 2015-16 मध्ये आसाममधील प्रतिष्ठित कामाख्या मंदिराच्या सुधारणा कामापासून सुरू झाला होता. या कामामुळे या प्रदेशातील वारशाच्या नेतृत्वाखालील विकासाची दिशा निश्चित झाली होती. तेव्हापासूनच या प्रकल्पाचा सातत्याने मेघालय, मिझोरम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यांपर्यंत विस्तार झाला आहे. 2024-25 मध्ये मिझोराममधील वांगछिया इथेही या प्रकल्पाअंतर्गत नव्या कामाची सुरुवात झाली. त्यातून ही योजना कशा रितीने वाढते - विकसित होत आहे आणि, या योजनेअंतर्गत कशारितीने सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक महत्त्वाच्या नवीन स्थळांना समावून घेतले जात आहे ही बाब ठळकपणे दिसून येते.[8]

 क्र.

राज्य

प्रकल्पाचे नाव

मंजुरीचे वर्ष

1

आसाम

कामाख्या मंदिर आणि गुवाहाटीच्या आसपासच्या तीर्थस्थळाचा विकास

2015-16

2

नागालँड

नागालँडमध्ये तीर्थयात्रा पायाभूत सुविधांचा विकास

2018-19

3

मेघालय

मेघालयमध्ये तीर्थयात्रा सुविधांचा विकास

2020-21

4

अरुणाचल प्रदेश

परशुराम कुंड, लोहित जिल्हा यांचा विकास

2020-21

5

सिक्कीम

चार संरक्षक संतांच्या (Patron Saints) ठिकाणी, युक्सोम येथे तीर्थयात्रा सुविधांचा विकास

2020-21

6

त्रिपुरा

त्रिपुरा सुंदरी मंदिर, उदयपूर यांचा विकास

2020-21

7

मिझोराम

मिझोराम राज्यात तीर्थयात्रा आणि वारसा पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचा विकास

2022-23

8

नागालँड

झुनहेबोटो (Zunheboto) येथे तीर्थयात्रा पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास

2022-23

9

मिझोराम

चंफाई जिल्ह्यातील वांगछिया (Vangchhia) येथे प्रशाद योजनेअंतर्गत मूलभूत सुविधांचा विकास

2024-25 

 

सारांश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारत पर्यटनासाठीचे एक संपूर्ण पॅकेज असल्याचा, आणि E-A-S-T अर्थात Empower, Act, Strengthen, Transform हे तत्व या क्षेत्राच्या विकासाचे मार्गदर्शक तत्व असल्याचा उल्लेख वारंवार केला आहे. आधुनिक महामार्ग, रेल्वेचे सेवेचे जाळे, विमानतळ, जलमार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून हे परिवर्तन घडवून आणले जात आहे, आणि त्यामुळेच या भागाला भेट देणाऱ्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वासही निर्माण होऊ लागला आहे.[9]

त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या पुनर्विकासाचे काम देखील याच दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले प्रतिबिंबच आहे. कित्येक शतके जुने शक्तीपीठ असलेल्या या मंदिराच्या पावित्र्याचे संवर्धन करत, मंदिराचे आधुनिक सुविधांनी नूतनीकरण केले गेले आहे. यामुळे आता हे मंदिर केवळ एक आध्यात्मिक प्रतीक म्हणून नाही, तर स्थानिक समृद्धीचा स्रोत म्हणून उभे आहे. जर का आपण इथल्या वीस्तर्ण प्रदेशांचा विचार केला, तर वारशाच्या नेतृत्वाअंतर्गतचा विकास शाश्वत उपजीविका, भरभराट साधणारे उद्योग आणि परस्पर सामायिक अभिमानाची दृढ भावनेचा मार्ग कशा रितीने निर्माण केला जाऊ शकतो, हीच बाब या प्रकल्पांतून दिसून येते.

प्रशाद ही योजना देखील या दृष्टिकोनाला केंद्रस्थानी ठेऊनच आखली गेली आहे. केवळ मंदिरांच्या भौतिक सुधारणांपलीकडे जात, तीर्थयात्रा पर्यटनाची एक एकात्मिक परिसंस्था घडवणे हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रशाद योजनेच्या माध्यमातून सांस्कृतिक अनुभव समृद्ध करत असतानाच स्थानिक अर्थव्यवस्थांना बळकटी दिली जात असून, त्याद्वारे त्रिपुरा आणि संपूर्ण ईशान्य भारताला नवे महत्त्वही लाभू लागले आहे. यामुळेच तर इथली आस्थांशी संबंधित असलेली स्थळांचे भावी पिढ्यांसाठी सर्वधन केले जाईल, आणि विकासाचे इंजिन म्हणूनच त्यांच्याकडे नव्याने पाहिले जाईल.

त्रिपुरा सुंदरी मंदिर : ईशान्य भारतातील आध्यात्मिक पर्यटनाची नवी पहाट

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

(Backgrounder ID: 155968) Visitor Counter : 3
Provide suggestions / comments
Read this release in: हिन्दी , English
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate