Farmer's Welfare
भविष्याची बिजे : स्वच्छ रोपे कार्यक्रमाला मिळत आहे गती
रोगमुक्त रोपांद्वारे भारतीय बागायती क्षेत्रात परिवर्तन
Posted On:
21 SEP 2025 9:46AM
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2025
| मुख्य मुद्दे |
- स्वच्छ रोपे कार्यक्रमांतर्गत देशभरात 9 स्वच्छ रोपे केंद्र बनवण्यात येतील जेणेकरून रोगमुक्त आणि उत्पादक रोपे उपलब्ध होतील.
- महाराष्ट्रात 300 कोटी रुपये गुंतवणुकीतून 3 केंद्र स्थापित केले जातील.
- बागायती क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी माहिती, संसाधने आणि अद्यतनांचा केंद्रबिंदू म्हणून CPP वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
- आधुनिक रोपवाटिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी आठ कोटी रोगमुक्त रूपे उपलब्ध करून दिली जातील.
- धोका विश्लेषण रोपवाटिका तपासणी आणि प्रयोगशाळेत सुधारणा यासारख्या प्रत्यक्ष कृती सुरू आहेत, याशिवाय प्रमाणन, प्रशिक्षण आणि पीक प्रोटोकॉलचा विस्तार करण्याची योजना आहे.
|
परिचय
हवामान बदल तसेच वनस्पतींच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे जैविक आणि अजैविक घटक हे वाढते आव्हान बनले आहेत. या आव्हानांचा थेट परिणाम संपूर्ण कृषी उत्पादकतेवर होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि एकूण उत्पादकता कमी होते. भारताने शेती उत्पादकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असली तरीही प्रणालीगत (सिस्टेमिक) रोगजनक (प्रामुख्याने विषाणू) एक मोठा धोका निर्माण करत आहेत, ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे रोगजनक पिकांचे प्रमाण, गुणवत्ता आणि टिकाऊपणा कमी करतात. बहुतेक वेळा रोगाची लक्षणे दिसेपर्यंत, शेतकऱ्यांना शेतात रोगांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. म्हणूनच रोगमुक्त रोपे आणि लागवड साहित्यापासून शेतीची सुरुवात करणे ही या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वात प्रभावी रणनीती मानली गेली आहे.
यावर उपाय म्हणून, बियाण्यांची उच्च गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि स्वच्छ रोपे कार्यक्रम राबविणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व व्यापकपणे ओळखले गेले आहे. अशा उपाययोजना केवळ वनस्पतींच्या आरोग्याचे रक्षण करत नाहीत तर शेतीला प्रतिकूल दुष्परिणामांपासून मुक्त ठेवण्याचा अतिरिक्त फायदा देखील मिळवून देतात. याच पार्श्वभूमीवर, 9 ऑगस्ट 2024 रोजी, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या स्वच्छ रोपे कार्यक्रमाला (CPP) मंजुरी दिली.
आढावा: रोगमुक्त रोपे आणि लागवड साहित्याची अत्यावश्यकता
शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे, विषाणूमुक्त लागवड साहित्य उपलब्धत करून देण्यासाठी ‘स्वच्छ रोपे कार्यक्रम’ (CPP) एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाद्वारे (NHB) केली जात आहे. तर, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) तांत्रिक प्रगतीचे निरीक्षण आणि क्षमता वाढ याची जबाबदारी स्वीकारून सहकार्य करत आहे. या उपक्रमात 1,765.67 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक समाविष्ट आहे, ज्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये आशियाई विकास बँकेने मंजूर केलेले 98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाचाही समावेश आहे.
|
स्वच्छ रोपे कार्यक्रम (सीपीपी) म्हणजे काय?
आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने संकल्पित केलेला भारताचा स्वच्छ रोपे कार्यक्रम (CPP) हा एक अभिनव उपक्रम आहे ज्याचा उद्देश महत्त्वाच्या फळ पिकांसाठी निरोगी, रोगमुक्त रोपांची आणि लागवड साहित्याची खात्री करणे आहे. त्यायोगे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि नफा वाढवणे तसेच भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
|
या उपक्रम पुढील नियोजित विकास कामांद्वारे आकार घेऊ लागला आहे :
रोगमुक्त, उत्पादक लागवड साहित्य सुनिश्चित करण्यासाठी देशभरात 9 स्वच्छ रोपे केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यापैकी 3 महाराष्ट्रात असून त्यांच्या स्थापनेसाठी सुमारे 300 कोटी खर्च येणार आहे - पुणे (द्राक्षे), नागपूर (संत्री) आणि सोलापूर (डाळिंब).
आधुनिक रोपवाटिका विकसित केल्या जाणार असून मोठ्या रोपवाटिकांसाठी 3 कोटी रुपये तर मध्यम रोपवाटिकांसाठी 1.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या रोपवाटिका दरवर्षी शेतकऱ्यांना 8 कोटी रोगमुक्त रोपे पुरवतील.
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इस्रायल आणि नेदरलँड्ससारख्या देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य केले जाणार आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत मूळ वनस्पती प्रजातींवर संशोधन करण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे.

मैदानी स्तरावरील कृती आणि प्रगती
स्वच्छ रोपे कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरात हाती घेतलेल्या महत्त्वाच्या मैदानी उपक्रमांचे तपशील पुढील प्रमाणे आहेत :
सीपीपी संकेतस्थळाची सुरुवात : भारतातील बागायतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी संसाधने, अद्यतने आणि अंतर्दृष्टी यांचे केंद्रकृत व्यासपीठ म्हणून हे अधिकृत सीपीपी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. संकेतस्थळाची लिंक: https://cpp-beta.nhb.gov.in/
धोक्यांचे विश्लेषण (HA): हे एक महत्त्वाचे पाऊल असून विषाणू आणि विषाणू सदृश्य घटकांची ओळख आणि प्रोफाइलिंग करण्यासाठी आवश्यक आहे. याच आधारावर प्रमाणन आणि स्वच्छ रोपे केंद्रांची रचना केली जाते.
- द्राक्षवेल: आयसीएआर - द्राक्षांकरिता आयएआरअय (नवी दिल्ली) आणि आयसीएआर - एनआरसी (पुणे) यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मिझोरम या राज्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. एकूण 578 नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली असून द्राक्ष पिकांसाठी धोका विश्लेषण पूर्ण झाले आहे.
- सफरचंद: जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधून 535 नमुने गोळा करण्यात आले असून त्यांची चाचणी सुरू आहे आणि धोका विश्लेषण प्रगतीपथावर आहे.
- लिंबूवर्गीय फळे: आरोग्यदायी, विषाणूमुक्त लिंबूवर्गीय (संत्री, मोसंबी) फळांच्या लागवडीसाठी मार्ग मोकळा करून देण्याची तयारी म्हणून धोका विश्लेषणाची तयारी सुरू झाली आहे.
स्वच्छ रोपे केंद्र: भारतातील पहिले स्वच्छ रोपे केंद्र उभारणीचे काम प्रगतीपथावर असून त्याच्या डिझाइनसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे.
रोपवाटिका भेटी:
- 23-24 ऑक्टोबर 2024: राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (एनएचबी) आणि आशियाई विकास बँक (एडीबी) च्या अधिकाऱ्यांनी नाशिक आणि अहमदनगर (महाराष्ट्र) येथील द्राक्ष, डाळिंब आणि पेरू रोपवाटिकांना भेट देऊन रोपवाटिका परिसंस्था, रचना, कार्यपद्धती आणि खर्च संरचनांचा अभ्यास केला.
- 18-22 नोव्हेंबर 2024: याच पथकाने जम्मू आणि काश्मीरमधील रोपवाटिकांना भेट दिली. जिथे त्यांनी शित हवामानात सफरचंद आणि समशीतोष्ण हवामानात येणाऱ्या इतर पीकांच्या लागवडच्या पद्धतींचे मूल्यांकन केले.
प्रयोगशाळेचे मूल्यांकन: निदान आणि संगणकीय क्षमतांचा विकास साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल
16-20 जानेवारी 2025 दरम्यान, आयसीएआर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि आशियाई विकास बँकेच्या शास्त्रज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी भारतातील सार्वजनिक आणि खाजगी प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या भेटींचा उद्देश होता – बायोइन्फॉरमॅटिक्स पाइपलाइन विकसित करण्यासाठी प्रयोगशाळेच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे, त्यायोगे सीपीपी अंतर्गत एचटीएस डेटा विश्लेषण सुलभ होईल. यामुळे शास्त्रज्ञांना अनेक प्रकारच्या पिकांमध्ये विषाणूची जलद आणि अचूक तपासणी करण्यास, रोपवाटिका रोपांना सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांची चांगली मदत होईल.
स्रोतापासून मातीपर्यंत: स्वच्छ लागवड साहित्याचे उत्पादन
सीपीपी अंतर्गत स्वच्छ लागवड साहित्य मिळवणे, तपासणी करणे आणि प्रसार करणे या प्रक्रियेचे टप्पे खालील प्रमाणे आहेत – :

जर मिळालेल्या रोप साहित्याची चाचणी रोगजनकांसाठी नकारात्मक (निगेटिव्ह) आली तर त्याची पुन्हा तपासणी केली जाते आणि नंतर रोगमुक्त मातृ वनस्पतींचे उत्पादन आणि देखभाल करण्यासाठी वापरली जाते.
या मातृ वनस्पती पासून तयार झालेल्या रोगमुक्त रोपांचे विचरण प्रमाणित रूपवाटिकांमार्फत शेतकऱ्यांना केले जाते.
जर मिळालेल्या रोप साहित्याची चाचणी रोगजनकांसाठी सकारात्मक आली तर, टिश्यू कल्चर, उष्णता उपचार किंवा क्रायो-थेरपी सारख्या पद्धतींचा वापर करून विषाणू निर्मूलन केले जाते आणि त्यानंतर रोगमुक्त रोपांची वाढ केली जाते.
प्रमुख फायदे
सीपीपीचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:

शेतकऱ्यांसाठी: पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी विषाणूमुक्त, उच्च-गुणवत्तेचे लागवड साहित्य उपलब्ध होईल.
रोपवाटिकांसाठी : सुव्यवस्थित प्रमाणन प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाईल आणि पायाभूत सुविधांना पाठबळ मिळेल, ज्यामुळे रोपवाटिका रोगमुक्त रूपांचे संवर्धन प्रभावीपणे करू शकतील आणि शाश्वत वाढीस हातभार लावतील.
ग्राहकांसाठी : ग्राहकांना विषाणू मुक्त उच्च दर्जाची फळे उपलब्ध होतील यामुळे फळांची चव, स्वरूप आणि पौष्टिक मूल्य अधिक चांगले होईल.
निर्यातीसाठी : उच्च दर्जाच्या, रोगमुक्त फळांवर लक्ष केंद्रित करून जागतिक निर्यातदार म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल.
समानता आणि समावेशकता: जमीनीचे क्षेत्रफळ किंवा सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता सर्व शेतकऱ्यांना कीफायतशीर दरात रोगमुक्त रोपे उपलब्ध करून दिली जातील; संसाधने, प्रशिक्षण आणि निर्णय घेण्याच्या संधी प्रदान करून महिला शेतकऱ्यांना नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतले जाईल; आणि भारताच्या विविध कृषी-हवामान आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रदेशनिहाय स्वच्छ रोपांच्या जाती आणि तंत्रज्ञान विकसित केले जाईल.
इतर उपक्रमांशी संलग्नता
सीपीपी भारताच्या बागायती क्षेत्राला नवी गती देणारा आहे तसेच त्याचबरोबर मिशन लाइफ आणि वन हेल्थ या उपक्रमांशी संलग्न राहून शाश्वत तसेच पर्यावरण पूरक शेती पद्धतीचा प्रसार करणार आहे. वनस्पती आरोग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी मदत करतो – कारण वाढत्या तापमानामुळे केवळ प्रतिकूल हवामान येत नाही तर कीड आणि रोगांचे स्वरूप आणि प्रसारही बदलतो.
मिशन लाइफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) (LiFE)
मिशन लाईफ हे भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जनआंदोलन आहे ज्याचा उद्देश व्यक्ती आणि समाज या दोघांच्या कृतींना पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करणे आणि दिशादर्शन करणे हा आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे झालेल्या COP26 परिषदेत सादर केला होता. हा कार्यक्रम भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेतो, – जो नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्यास प्रोत्साहन देतो. आणि ज्याचा उद्देश, व्यक्ती आणि समुदायांच्या प्रयत्नांना एकत्र करून जागतिक पातळीवरील सकारात्मक वर्तन परिवर्तनाचे व्यापक जनआंदोलन निर्माण करणे हा आहे.

राष्ट्रीय एक आरोग्य अभियान
एक आरोग्य हा एक बहुआयामी दृष्टिकोन आहे जो मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य क्षेत्रांना एकत्र आणून आरोग्य, उत्पादकता आणि संवर्धनाशी संबंधित आव्हानांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. भारतासारख्या देशात जिथे — मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे, विविध वन्यजीव आणि वनस्पती आणि घनदाट मानवी लोकसंख्या असल्याने सहजीवनाच्या संधींबरोबर आणि रोग पसरण्याचे धोकेही मोठ्या प्रमाणात आहेत. कोविड-19 साथीचा रोग, गुरांमध्ये लम्पी त्वचारोग आणि एव्हीयन इन्फ्लूएंझा सारख्या घटना मानवी आरोग्याच्या पलीकडे पाहण्याची तसेच पशुधन, वन्यजीव आणि पर्यावरण यांचा समावेश करण्याची गरज अधोरेखित करतात. प्रत्येक क्षेत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करून, वन हेल्थ उपक्रम 'सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण' हे ध्येय साध्य करण्यासाठी एकात्मिक आणि मजबूत प्रतिसाद व्यवस्था निर्माण करते. पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेच्या (PM-STIAC) 21 व्या बैठकीत राष्ट्रीय एक आरोग्य अभियान स्थापन करण्यास मान्यता दिली.

धोरणात्मक संलग्नता : सीपीपी आणि एमआयडीएच
स्वच्छ रोपे कार्यक्रम हा एकात्मिक बागायती विकास अभियान (MIDH) या केंद्र प्रायोजित योजनेला पूरक ठरतो. एमआयडीएच ची सुरुवात 2014-15 मध्ये करण्यात आली होती याचा उद्देश बागायती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधने हा आहे.
एम आय डी एच अंतर्गत गुणवत्ता पूर्ण रूप साहित्य आणि सूक्ष्म सिंचन व्यवस्था हे दोन प्रमुख घटक आहेत ज्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन वाढले आहे – 2019-20 मध्ये 12.10 मेट्रिक टन प्रति हेक्टर वरून 2024-25 मध्ये 12.56 मेट्रिक टन प्रति हेक्टर इतकी वाढ झाली आहे.(दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार).

निष्कर्ष
स्वच्छ रोपे कार्यक्रम प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत अनेक उपक्रम प्रत्यक्षात सुरू झाले आहेत आणि नियोजित विकास कामे या कार्यक्रमाचा विस्तार आणि परिणामकारकता आणखीन वाढवतील. पुढे पाहता, सीपीपी अंतर्गत ठोस कृती पावले उचलली जाणार आहेत, ज्यात–- रोपवाटिकांसोबत व्यापक सल्लामसलत करून प्रमाणात प्रक्रिया विकसित करणे, प्रशासन आणि तांत्रिक संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, लिंबूवर्गीय फळांसाठी धोका विश्लेषण प्रोटोकॉल तसेच आंबा, पेरू, लिची, एवोकॅडो आणि ड्रॅगन फ्रुट यासारख्या फळांसाठी निदान प्रोटोकॉल विकसित करणे. आणि रोपवाटिकांसाठी जुळणारे-अनुदान आणि खर्च-नियम मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे, यांचा समावेश आहे. रोपवाटिकांसाठी सीपीपी आता एक व्हिजन राहिलेले नाही - ते भारताच्या बागायतीला बळकटी देण्यासाठी, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि क्षेत्राला खऱ्या अर्थाने बहरण्यास मदत करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून उदयास येत आहे.
संदर्भ
भारत सरकार
Office of the Principal Scientific Advisor to the Government of India
Ministry of Environment, Forest and Climate Change
नीति आयोग
National Horticulture Board
Indian Council of Medical Health Research
पत्र सूचना कार्यालय प्रसिद्धी पत्रके
PIB Backgrounder
Seeds of the Future: Clean Plant Programme Gaining Momentum
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Backgrounder ID: 155965)
आगंतुक पटल : 12
Provide suggestions / comments