Social Welfare
प्रधानमंत्री आवास योजना - शहरी 2.0
अंगीकार 2025 मोहिमेसह शहरी गृहनिर्माणातील विषमता दूर करण्याचा संकल्प
Posted On:
17 SEP 2025 11:52AM
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
मुख्य मुद्दे
- 17 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण देशभर प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आवास दिवस साजरा केला जाणार आहे.
- अंगीकार 2025 ही दोन महिन्यांची राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेअंतर्गत अर्जांची जलद पडताळणी आणि घरांचे बांधकाम पूर्ण करण्यास गती दिली जाणार आहे.
- या मोहिमेअंतर्गत 5,000+ शहरी स्थानिक संस्थांशी संपर्क केला जाणार असून, घरपोच जनजागृती मोहिमा, गृहनिर्माण शिबिरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत योजना पोहोचवली जाणार आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 अंतर्गत1.47 लाख अतिरिक्त पक्की घरे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे मंजूर घरांची एकूण संख्या 8.56 लाखांवर पोहोचली आहे.
- वंचित आणि मागासवर्गीय समाजासाठी मोठ्या प्रमाणावर घरे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जातींच्या समुदायासाठी 32,551, अनुसूचित जमाती समुदायासाठी 5,025, आणि इतर मागासवर्गीय कुटुंबांसाठी 58,375 घरांचा समावेश आहे.
अंगीकार 2025 योजना आली आहे : शहरी गृहनिर्माणाच्या शेवटच्या टप्प्याला वेग देणारी मोहीम

कल्पना करा, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित, कायमस्वरूपी घर बांधण्याची संधी मिळाली आहे, आणि तीही शासनाच्या योजनेतून. तुम्ही ती संधी घ्याल का?
सध्या देशभरातली हजारो कुटुंबे हीच संधी वास्तवात उतरवत आहेत.
4 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सरकारने ‘अंगीकार 2025’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. सर्वांसाठी घर हे आश्वासन थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणारे एक निर्णायक पाऊल. प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 च्या पाठबळावर सुरू झालेली ही केवळ एक धोरणात्मक मोहीम नाही; ती आता जनआंदोलनाचे रूप घेत आहे. त्यात जागरूकता, जबाबदारी आणि कृती यांचा ताळमेळ साधला आहे.
कुटुंबांना त्यांच्या अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन करणे असो, वर्षानुवर्षे वाट पाहत असलेल्या घरांच्या बांधकामाला गती देणे असो, किंवा सौरऊर्जेचा वापर व कर्जसहाय्याशी त्यांना जोडणे असो —ज्यांना आतापर्यंत या संधीपासून वंचित राहावे लागले, अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अंगीकार ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
कारण कोट्यवधी शहरी गरीबांसाठी “आतापर्यंत किती घरे बांधली गेली आहेत?” हा खरा प्रश्न नाही,
तर “माझं घर केव्हा तयार होणार?” हा खरा प्रश्न आहे.

अंगीकार 2025 हे या प्रश्नाला दिलेले भारताचे आजवरचे सर्वात थेट आणि ठोस उत्तर आहे.
2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) सुरू झाली, तेव्हा तिच्यासोबत एक ठाम वचन देण्यात आले होते - “सर्वांसाठी घर”. या योजनेने गेल्या काही वर्षांत लाखो अल्प उत्पन्न गटातील शहरी कुटुंबांचे जीवन बदलून टाकले आहे. हजारो कुटुंबांना असुरक्षित झोपड्यांमधून बाहेर काढून सुरक्षित, कायमस्वरूपी आणि परवडणाऱ्या घरात स्थायिक होण्याची संधी मिळाली आहे. या भक्कम पायावर उभे राहून, प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 सप्टेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आली. या आवृत्तीचे ध्येय स्पष्ट आणि प्रभावी आहे — “कोणतंही कुटुंब मागे राहू नये.” प्रत्येक शहरी कुटुंबाला — त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता — केवळ छतच नव्हे, तर मूलभूत सुविधांसह सुरक्षित घर मिळालेच पाहिजे.
17 सप्टेंबर 225 रोजी, पीएमएवाय-शहरी 2.0 (PMAY-Urban 2.0) च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हे आणि शहरी स्थानिक संस्था (ULBs) यांच्यामार्फत पीएमएवाय-यू आवास दिवस म्हणून साजरा केला जाईल.

शहरी गृहप्रकल्पांमध्ये सर्वसमावेशकता, गती आणि संपूर्ण कव्हरेज साध्य करणे
भारतातील प्रत्येक शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (प्रधानमंत्री आवास योजना-यू) 2.0 चा संपूर्ण लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आखलेली अंगीकार 2025 ही एक ध्येयकेंद्री मोहीम आहे. या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
- प्रधानमंत्री आवास योजना-यू अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या 20 लाख घरांच्या पूर्णतेस गती देणे.
- विशेष लक्ष केंद्रित गटांतील (Special Focus Groups) संभाव्य लाभार्थ्यांचा समावेश करणे — उदा. सफाई कर्मचारी, रस्त्यावरील विक्रेते (पीएम स्वनिधी अंतर्गत), कारागीर (पीएम विश्वकर्मा अंतर्गत), अंगणवाडी सेविका, बांधकाम कामगार, तसेच झोपडपट्टी आणि चाळीत राहणारे नागरिक.
- आधीच बांधून तयार झालेल्या घरांना पीएम सूर्य घर : मुफ्त बिजली योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणे.
- नव्याने पूर्ण झालेल्या घरांच्या गृहप्रवेश समारंभांचे आयोजन करून सन्मानपूर्वक हस्तांतरण सुनिश्चित करणे.
- योजनेच्या सर्व घटकांबाबत माहितीचा प्रसार करणे आणि लाभार्थ्यांना अर्ज तसेच प्रगती ट्रॅकिंगसाठी प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 च्या एकात्मिक वेब पोर्टलवर मार्गदर्शन करणे.
- अर्जदार पात्रतेची पडताळणी — क्षेत्रीय जनसंपर्क, कागदपत्र तपासणी, जिओ-टॅगिंग आणि घरपोच संवादाद्वारे करणे.
- या योजनेअंतर्गत आधीच मंजूर झालेल्या 8.5 लाख घरांसाठी गृहकर्ज सुलभता उपलब्ध करून देणे.
- सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 हे महिने ‘गृहनिर्माण महिने’ म्हणून साजरे करून, देशभरात गृहनिर्माणातील दृश्यमानता, वितरण आणि सामुदायिक सहभागाला नव्या उंचीवर नेणे.
|
पीएम आवास मेला – शहरी : प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 च्या वर्षपूर्तीच्या यशाचा उत्सव
अंगीकार 2025 मोहिमेअंतर्गत समाजातील सहभाग वाढवण्यासाठी आणि योजनेची उद्दिष्टे वास्तवात आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागरूकता, अंमलबजावणी आणि समावेशासाठी प्रेरक शक्ती ठरेल. या उपक्रमाद्वारे शासन संस्था, आर्थिक संस्था आणि स्थानिक समुदाय असे सर्व स्तरांवरील घटक एकत्र येऊन गृहनिर्माण वितरणाला वेग देणार आहेत तसेच लाभार्थ्यांना संपूर्ण सहाय्य आणि माहिती पुरवणार आहेत.
अंगीकार 2025 चा हा प्रमुख उपक्रम म्हणजे “पीएम आवास मेला – शहरी”. हा मेला 17 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-यू आणि प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 च्या फायद्यांवर प्रकाश टाकत, स्थानिक पातळीवर एकात्मता, जनसहभाग आणि संवादाला चालना दिली जाणार आहे.या मेळ्याचे आयोजन दोन टप्प्यांत होईल. पहिला टप्पा: 17 ते 27 सप्टेंबर 2025 आणि दुसरा टप्पा: 15 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कोणत्याही दिवशी आयोजित केला जाईल.

|
पीएम आवास मेला – शहरी : लाभार्थ्यांसाठी संधी, माहिती आणि सक्षमीकरणाचे व्यासपीठ
पीएम आवास मेला – शहरी हा प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 च्या संभाव्य लाभार्थ्यांवर केंद्रित एक व्यापक उपक्रम आहे, ज्यामध्ये विविध सेवा आणि कार्यक्रमांचा समावेश असेल :
- हेल्प डेस्क आणि माहिती केंद्रे — पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि योजनेचे लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी.
- तात्काळ पडताळणी आणि नोंदणीची सुविधा.
- पीएम सूर्य घर : मुफ्त बिजली योजना शिबिरे — सध्याच्या प्रधानमंत्री आवास योजना-यू लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी.
- कर्ज मेळावे— प्रधानमंत्री आवास योजना-यू, प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 आणि सौरऊर्जा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गृहकर्ज मिळवण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी.
- आरोग्य शिबिरे, तसेच पीएम उज्ज्वला, पीएम स्वनिधी आणि आयुष्मान भारत यांसारख्या इतर कल्याणकारी योजनांची माहिती देणारी आणि योजना एकत्रीकरण वाढवणारी शिबिरे.
- प्रधानमंत्री आवास योजना-यू 2.0 अंतर्गत विशेष लक्ष केंद्रित गटांसाठी स्वतंत्र शिबिरे.
- शिबिरांतील संवादांवर आधारित नवीन संभाव्य लाभार्थ्यांच्या नोंदणी मोहिमा.
- नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी क्विझ स्पर्धा, सेल्फी बूथ्स, आणि स्थानिक कलाकार आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन.
- लाभार्थ्यांच्या यशोगाथा सामायिक करून इतरांना प्रेरित करण्याचा उपक्रम.
- उत्कृष्ट लाभार्थी, महिला यशस्विनी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार.
- शहरी स्थानिक संस्थांच्या कामगिरीचा गौरव करणारे सन्मान समारंभ.
- या उपक्रमाची माहिती देशभरात पोहोचण्यासाठी कार्यक्रमातील विविध उपक्रमांवर व्यापक माध्यम कव्हरेज.
|
गृहनिर्माणाच्या प्रसाराचा विस्तार

प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यापासून 1.2 कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी जवळजवळ 94 लाख घरे लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. पीएमवाय शहरी 2.0 अंतर्गत सरकारने आणखी 1 कोटी शहरी कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अत्यंत कमी उत्पन्न गट, कमी उत्पन्न गट, आणि मध्यम उत्पन्न गट यातील पात्र कुटुंबांना ₹2.5 लाखपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते, त्याचा वापर घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी करता येईल. यासाठी अर्ज pmay-urban.gov.in वर ऑनलाइन करता येतात किंवा शहरी स्थानिक संस्थे मार्फतही सादर करता येतात.
ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या 4थ्या केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या (CSMC) बैठकीत 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणखी 1.47 लाख पक्की घरे मंजूर केली गेली, ज्यामुळे PMएवाय-U 2.0 अंतर्गत एकूण मंजुर घरांची संख्या 8.56 लाख झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 कशी कार्य करते
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 चार प्रमुख मार्गांद्वारे राबवली जाते – लाभार्थी-नेतृत्व असलेले बांधकाम, भागीदारीतील परवडणारे घर, परवडणारे भाड्याचे घर, आणि व्याज सवलत योजना. अलीकडे मंजूर झालेली बहुतेक घरे लाभार्थी बांधणी आणि भागीदारीतील परवडणारे घर या प्रकारांत येतात. या सतत चालणाऱ्या उपक्रमाद्वारे सरकार सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देते, आणि प्रत्येक कुटुंबाला फक्त घर नाही, तर सुरक्षित आणि सन्मानास्पद घर मिळावे, याकडे लक्ष देत आहे.

कोण पात्र आहे?
- ज्यांचे भारतात कुठेही पक्के घर नाही अशी कुटुंबे (पती-पत्नी, अविवाहित मुले/मुली).
- अत्यंत कमी उत्पन्न गट (₹3 लाखापर्यंत), कमी उत्पन्न गट (₹3–6 लाख), मध्यम उत्पन्न गट (₹6–9 लाख) यामध्ये येणारी कुटुंबे.
- यांना प्राथमिकता दिली जाते: विधवा, एकटी महिला, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, एससी/एसटी/ओबीसी कुटुंब, अल्पसंख्यांक, स्वच्छता कामगार, रस्त्यावरील विक्रेते, शिल्पकार, अंगणवाडी आणि बांधकाम कामगार, आणि झोपडपट्टीतले रहिवासी.
- सर्व अर्जदारांसाठी आधार/व्हर्च्युअल ओळखपत्र अनिवार्य.
- प्रधानमंत्री आवास योजना - जी (ग्रामीण समकक्ष) शी जोडून पुनरावृत्ती टाळली जाते.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार दाखवतो की प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना- 2.0 अंतर्गत किती पक्की घरे पूर्ण झाली आहेत हे खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल, ज्यातून पात्रतेला वास्तवात रूपांतरित करून शहरी भारतात प्रत्यक्ष वितरण कसे होत आहे, हे स्पष्ट होते.

समानता घरापासून सुरू होते
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMएवाय-U) 2.0 च्या अंमलबजावणीतील एक मुख्य लक्ष समावेशकता वाढवणे आणि समाजाच्या संवेदनशील घटकांचे सबलीकरण करणे हे आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत:
- महिलांच्या नावावर विशेषतः मंजूर झालेली घरे 75,417, ज्यात एकटी महिला आणि विधवांचा समावेश आहे, हे महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानास्पद जीवन सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे उदाहरण आहे.
- उत्तर प्रदेश मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मंजूर घरे 1,166, त्यातून वृद्धांची घराची गरज लक्षात घेण्यात आलेली दिसते.
सर्वसमावेशक धोरणाअंतर्गत, विविध वंचित समुदायांसाठी मंजूर घरांची संख्या:
- अनुसूचित जाती (SC): 32,551
- अनुसूचित जमाती (ST): 5,025
- इतर मागास वर्ग (OBC): 58,375
या उपक्रमांमुळे ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या समुदायांपर्यंत मदत पोहचत आहे.
निष्कर्ष: सर्वांसाठी वेळेवर आणि लक्ष्यित घरनिर्माण
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 आणि अंगिकार मोहीम भारत सरकारच्या समावेशक विकास या प्रबळ वचनाचे प्रतीक आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 सन्मानास्पद घरांची पायाभूत रचना प्रदान करते, तर अंगिकार मोहीम लाभार्थ्यांना स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण आणि आर्थिक समावेश यांसारख्या आवश्यक सेवांशी जोडते.
एकत्रितपणे या सगळ्या योजना प्रत्येक घर स्थिरता, संधी आणि सन्मानाचा स्रोत ठरेल हे सुनिश्चित करतात. वेळेवर अंमलबजावणी, केंद्रस्थानी असलेले समावेशी धोरण आणि संमिलित दृष्टिकोन यामुळे भारत सर्वांसाठी घर या ध्येयाकडे स्थिरपणे वाटचाल करत आहे.
बांधलेले प्रत्येक घर जीवनाचे सबलीकरण करते, आणि प्रत्येक समाविष्ट कुटुंब राष्ट्राला समानता, न्याय आणि शाश्वत विकासाच्या भविष्याजवळ नेते.
संदर्भ
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
(Explainer ID: 155957)
आगंतुक पटल : 94
Provide suggestions / comments