Social Welfare
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान
निरोगी भारतासाठी महिला आणि कुटुंबांचे सक्षमीकरण
Posted On:
16 SEP 2025 4:21PM
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
ठळक मुद्दे
- स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील.
- रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी सर्वसमावेशक तपासणी सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
- माता आणि बाल मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण प्रयत्नांना आणि लसीकरणाच्या प्रयत्नांना आणि पोषण विषयक लाभांना पाठबळ देणे, हे या अभियानाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.
- पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी सक्षम (SASHAKT) पोर्टलद्वारे रिअल-टाइम (तात्काळ) देखरेख ठेवून काम करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
- सामुदायिक आधार प्रणाली, हा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा महत्वाचा घटक असून, देशभरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निक्षय मित्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
परिचय
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान' (एसएनएसपीए) हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि महिला व बाल विकास मंत्रालय (एमओडब्ल्यूसीडी) यांचा ऐतिहासिक उपक्रम असून, आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारणे, दर्जेदार आरोग्य सेवा देणे आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून देशभरातील महिला आणि मुलांसाठीच्या आरोग्य सेवा मजबूत करणे हे याचे उद्दिष्ट आहे. जन भागिदारी अभियान म्हणून ओळखले जाणारे हे अभियान समावेशक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी खासगी रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देते.
17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त या मोहिमेचे उद्घाटन होणार असून, ते पंतप्रधानांच्या ‘सक्षम समुदाय’ या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.
या अभियानाअंतर्गत एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून, महिला आणि मुलांसाठीचे हे देशातील सर्वात मोठे अभियान ठरले आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे [1] आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. या ठिकाणी पोषण, आरोग्याबाबत जागरूकता आणि कुटुंबाच्या सर्वसमावेशक कल्याणाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले जाईल.

हे अभियान निरोगी कुटुंब निर्माण करण्याच्या सरकारच्या व्यापक उद्दिष्टाला समर्थन देते आणि समावेशक विकासासाठी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहे. माता आणि बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांची पोहोच आणि शाश्वतता वाढवण्यासाठी अंगणवाड्यांसारख्या मंचाचा वापर करते.
पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले सर्वसमावेशक ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (एसएनएसपीए)’, ही एक महत्वाची आरोग्य मोहीम असून, ती 2 ऑक्टोबर 2025 रोजी गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे.
स्वच्छ भारत अभियानासारख्या परिवर्तनशील सरकारी कार्यक्रमांना मिळालेल्या यशाच्या आधारावर हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यापूर्वीच्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणांमध्ये ओळखल्या गेलेल्या माता आणि बाल आरोग्याशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी देशव्यापी आरोग्य आणि स्वच्छता मोहिमेला गती देत आहे.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, हे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणारे मिशन शक्ती आणि महिला आणि मुलांमधील कुपोषणाचा सामना करण्याच्या उद्देशाने असलेल्या पोषण 2.0 यासारख्या सध्याच्या सरकारी योजनांशी धोरणात्मकदृष्ट्या सुसंगत आहे.
उद्दिष्ट
सर्वसमावेशक तपासणी आणि सेवांद्वारे महिलांचे आरोग्य सुधारणे

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (एसएनएसपीए) महिलांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी आणि सेवा प्रदान करून त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देते. आरोग्य शिबिरे आणि इतर संबंधित उपक्रमांद्वारे, ही मोहीम आदिवासी भागात विशेष समुपदेशनासह त्वचारोगविषयक समस्या, उच्च रक्तदाब, रक्तक्षय, पुनरुत्पानाशी निगडीत आरोग्य समस्या, स्तन आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग, मधुमेह, क्षयरोग आणि सिकलसेल आजार (एससीडी) यासारख्या आजारांसाठी तपासणी सुविधा देते.
राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करणे, शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी लवकर निदान आणि उपचार सुनिश्चित करणे, हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहाय्य असलेल्या या सेवांचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्य चिकित्सक आणि दंतवैद्य यासारख्या तज्ञांचा समावेश असून, त्यांना राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या आरोग्य विषयक त्रुटी दूर करण्यासाठी अचूक निदान आणि पाठपुरावा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा रुग्णालयांचे सहाय्य मिळते.
माता आणि बाल संगोपनाद्वारे कौटुंबिक कल्याणाला प्रोत्साहन

एसएनएसपीए अभियान कुटुंब कल्याणाला बळकटी देण्यासाठी पोषण 2.0 सारख्या उपक्रमांशी मेळ साधून माता आणि बाल संगोपनावर लक्ष केंद्रित करते. हे अभियान प्रसूतीपूर्व काळजी (एएनसी) तपासणी, समुपदेशन आणि आरोग्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी माता आणि बाल संरक्षण (एमसीपी) कार्डांचे वितरण करून माता आणि बालकांचे आरोग्य सुरक्षित करते.
पोषण 2.0 ला अनुसरून अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांद्वारे गर्भवती महिला आणि बालकांच्या लसीकरण सेवेकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
प्रतिबंधात्मक काळजी आणि पोषण जागरूकता यावर लक्ष केंद्रित करून, माता आणि बाल मृत्यू दर कमी करणे हे एसएनएसपीएचे उद्दीष्ट आहे. अशा प्रकारे हे अभियान पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेला अनुसरून लवचिक कुटुंबांची उभारणी करण्याच्या व्यापक उद्दिष्टाला पाठबळ देते.
शिक्षणाद्वारे वर्तनातील बदलांना प्रोत्साहन
हे अभियान मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, संतुलित पोषण आणि सर्वांगीण निरोगीपणा यासारख्या अत्यावश्यक आरोग्य विषयक समस्यांवर समुदायांना शिक्षित करून वर्तणुकीत बदल घडवून आणते. ‘पोषण मास’ दरम्यान अंगणवाड्यांमध्ये कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (एसएनएसपीए) महिलांना माहितीपश्चात आरोग्य सेवेची निवड करण्याबाबतचे ज्ञान देऊन सक्षम बनवते.
आरोग्य सेवा कर्मचारी आणि वस्ती पातळीवरील नेतृत्वाच्या सहाय्याने दिल्या जाणाऱ्या या शिक्षणाचे उद्दिष्ट, निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांना वाचा फोडणे, स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि महिला आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये शाश्वत आरोग्यासाठीच्या वर्तनाला प्रोत्साहन देणे हे आहे. याव्यतिरिक्त, ही मोहीम मिशनच्या एकूण उद्दिष्टांना पाठबळ देण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य विषयक उद्दिष्टांमध्ये समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी आणि शाश्वत आरोग्य पद्धती सुनिश्चित करण्यासाठी निक्षय मित्र नोंदणीला प्रोत्साहन देते.
लोक सहभाग आणि जनजागृतीला प्रोत्साहन
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (एसएनएसपीए) जन भागिदारी अभियानाला चालना देऊन, खासगी रुग्णालये, स्थानिक नेते आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन लोक सहभागाला प्रोत्साहन देते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमा, लक्ष्यित माध्यम पोहोच आणि समुदाय-स्तरीय सहभागाद्वारे महिलांच्या आरोग्याचे आणि कुटुंब कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करतात. समुदायांना सहभागी करून, एक निरोगी, अधिक सशक्त समाज निर्माण करण्यासाठी एसएनएसपीए शाश्वत प्रभाव सुनिश्चित करते.
अंमलबजावणी धोरण
रिअल-टाइम (तात्काळ) देखरेखीसह देशव्यापी आरोग्य शिबिरांचे आयोजन
- एसएनएसपीए आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करेल, प्रगती आणि संसाधन वाटपाबाबत ताज्या माहितीसाठी सशक्त (SASHAKT) पोर्टलशी समन्वय साधेल आणि देखरेख ठेवेल.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या व्यवस्थापना अंतर्गत, हा डिजिटल प्लॅटफॉर्म पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची खात्री देतो, शिबिरातील उपक्रम, उपस्थिती आणि परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी भागधारकांना सक्षम बनवतो, यामुळे राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेली महिलांचे आरोग्य आणि पोषण यातील तफावत दूर करता येते.

पीएम-जेएवाय , आयुष्मान वय वंदना आणि आभा (ABHA) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल. कार्ड पडताळणी आणि तक्रार निवारणासाठी आरोग्य शिबिरांमध्ये हेल्पडेस्क उभारले जातील.
स्वयं-पडताळणीच्या माध्यमातून आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी
- जबाबदारी आणि प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करण्यासाठी स्वयं-पडताळणी प्रणाली प्रणालीमध्ये वैद्यकीय अधिकारी, वस्ती पातळीवरील आरोग्य अधिकारी (सीएचओ), बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू) आणि मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा) यांच्यासह आरोग्य सेवा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- सशक्त (SASHAKT) पोर्टलशी जोडलेली ही प्रणाली कामगारांना त्यांच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तसेच तपासणी, लसीकरण आणि समुपदेशन यासारख्या सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची खात्री करण्यासाठी उपयोगी ठरते.
जनजागृतीसाठी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून व्यापक पोहोच
- जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी (एआयआर) आणि सोशल मीडिया मोहिमांचा लाभ घेणे हे एसएनएसपीएचे उद्दिष्ट आहे. अंगणवाड्यांमधील पोषण मास उपक्रमांशी सुसंगत असलेले हे व्यासपीठ महिलांचे आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यावरील महत्त्वाचे संदेश प्रसारित करते.
- राष्ट्रीय माध्यम नेटवर्कचा वापर करून, ही मोहीम आपली उद्दिष्टे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकसंख्येपर्यंत पोहोचतील याची खात्री करते, त्यामुळे व्यापक लोकसहभाग मिळतो.
स्वयंसेवक आणि निक्षय मित्रांचा सहभाग
- क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना आणि समुदाय पातळीवर आरोग्य उपक्रमांना पाठिंबा देणारे निक्षय मित्र आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून या मोहिमेत सहभाग वाढवण्यात आला आहे.
- स्वयंसेवी संस्था आणि भारतीय रेडक्रॉस सोसायटी यांच्यातील सहयोग, विशेषत: रक्तदान शिबिरांमध्ये, समुदायाचा सहभाग वाढवतो. जन भागिदारी अभियान मॉडेलमध्ये रुजलेला हा दृष्टिकोन स्थानिक पाठिंबा आणि संसाधने यांना एकत्र आणून शाश्वत परिणाम साधतो.

प्रभाव आणि अपेक्षित परिणाम
आरोग्य निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा

- स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानामुळे (एसएनएसपीए), विशेषत: प्रसूतीपूर्व काळजी, तपासणी आणि आरोग्य शिबिरांमध्ये केलेल्या लसीकरणाद्वारे माता मृत्यू दर कमी झाल्यामुळे प्रमुख आरोग्य निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अधोरेखित केल्याप्रमाणे, रक्तक्षय, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्यावर या मोहिमेचा भर असून, राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणांमध्ये ओळखल्या गेलेल्या त्रुटी दूर करणे आणि संपूर्ण भारतातील महिला आणि मुलांच्या आरोग्यात चांगली सुधारणा सुनिश्चित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
स्वच्छता आणि कल्याणाबाबतच्या जागरुकतेमध्ये वाढ
- पोषण मास दरम्यान अंगणवाड्यांमध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक सत्रांद्वारे महिला आणि कुटुंबांमध्ये मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, पोषण आणि एकूणच निरामय आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
- दूरदर्शन आणि आकाशवाणी सारख्या मंचाचा लाभ घेऊन, एसएनएसपीए आरोग्यदायी जीवनशैली जोपासण्यासाठी शाश्वत वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देते. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या पाठिंब्याने सुरू असलेले हे प्रयत्न, दीर्घकालीन कल्याणासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाने जनसमुदायाला सक्षम बनवतात.
वंचित भागात आरोग्य सेवेची व्यापक पोहोच
- इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने तज्ज्ञ वैद्यकीय सेवा (उदा. स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक) तैनात करून आणि रक्तदान मोहिमेचे आयोजन करून ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे (एसएनएसपीए) उद्दीष्ट आहे.
- आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या पाठबळावर चालणाऱ्या या मोहिमेचे उद्दिष्ट, विशेषतः आदिवासी समुदायांना सिकलसेल आजार (एससीडी) आणि क्षयरोगावरील लक्ष्यित समुपदेशनाद्वारे, समन्यायी आरोग्यसेवा प्रदान करणे, हे आहे. मिशन शक्ती सारख्या योजनांअंतर्गत समावेशक आरोग्य सेवांची पोहोच वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला हे अनुसरून आहे.
इतर संबंधित योजना
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (जीएसके)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 मध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) चा विस्तार करण्यात आला. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात गुंतागुंतीसाठी सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली.
- या कार्यक्रमाद्वारे माता आणि नवजात बालकांना, विशेषतः प्रसूतीनंतर पहिल्या 48 तासांत, महत्वाच्या आरोग्य सेवा मिळतील याची खात्री केली जाते, जेणेकरून माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारते.
- 2014-15 मध्ये जेएसएसकेचा विस्तार झाल्यापासून, जेएसएसके 16.60 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे [2] आणि मोफत आरोग्य सेवा देत आहे. त्यामुळे कुटुंबांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आर्थिक अडथळे दूर करून, या उपक्रमाने संपूर्ण भारतात दर्जेदार माता आणि बाल आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे.
जननी सुरक्षा योजना (जेएसवाय)
- जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) च्या अनुषंगाने, जननी सुरक्षा योजनेने (जेएसवाय) मार्च 2025 पर्यंत 11.07 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आधार दिला आहे[3]. या उपक्रमाने दर्जेदार प्रसूती सेवा सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून माता आणि बाल आरोग्य सेवेमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.
- जेएसवाय, ही सशर्त रोख हस्तांतरण योजना, ग्रामीण आणि वंचित भागांवर लक्ष केंद्रित करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरोदर महिलांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन देते. आर्थिक अडचणी दूर करून, हा कार्यक्रम सुरक्षित प्रसुतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देतो, त्यामुळे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते.
सुरक्षित मातृत्व आश्वासन (एसयुएमएएन)
- सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) उपक्रम गर्भवती महिला, आजारी नवजात बालके आणि प्रसूतीनंतर सहा महिन्यांपर्यंत मातांना शून्य-खर्च, उच्च-दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करतो.
- हा उपक्रम प्रमाणित सुविधांमध्ये प्रशिक्षित व्यावसायिकांद्वारे सन्माननीय आणि आदरयुक्त आरोग्य सेवेची हमी देतो, आणि माता आणि नवजात अर्भकांच्या आरोग्याला बळकटी देतो.

मिशन इंद्रधनुष
- 25 डिसेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेला मिशन इंद्रधनुष हा एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य उपक्रम असून, बालके आणि गर्भवती महिलांच्या लसीकरण व्याप्ती वाढवून, जीवघेण्या आजारांपासून त्यांचे संरक्षण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत, हे अभियान असुरक्षित लोकसंख्येला टाळता येण्याजोग्या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी कव्हरेजमधील अंतर दूर करून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला (यूआयपी) बळकटी देते.
- डिसेंबर 2024 पर्यंत, 5.46 कोटींहून अधिक बालके आणि 1.32 कोटी गर्भवती महिलांचे [4] लसीकरण झाले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए)
- प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत चार व्यापक प्रसूतीपूर्व तपासण्या करून मातेच्या आरोग्याचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावते. यामुळे उच्च-जोखमीच्या गर्भधारणेचे वेळेवर निदान करता येते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हीवाय)
- 2017 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हीवाय) वंचित गटातील गर्भवती आणि स्तनदा मातांना आधार देण्यासाठी पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपयांचा मातृत्व लाभ (तसेच जननी सुरक्षा योजना प्रोत्साहन, सरासरी 6,000 रुपये) देते.
- दुसरे अपत्य जर मुलगी असेल, तर मुलीच्या कल्याणासाठी, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित महिलांमध्ये माता आरोग्य सुधारण्यासाठी पीएमएमव्हीवाय 6,000 रुपयांचे अर्थसहाय्य देते.
सुपोषित ग्रामपंचायत अभियान
- पोषण आणि आरोग्यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी तळागाळातील जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी या मोहिमेद्वारे अव्वल 1,000 ग्रामपंचायतींचा गौरव केला जातो आणि त्यांना पुरस्कृत केले जाते.
- या सुपोषित ग्रामपंचायती माता आणि बालकांच्या पोषणामध्ये समुदायाच्या नेतृत्वाखालील प्रगतीचे अनुकरणीय मॉडेल म्हणून काम करतात.
निष्कर्ष
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान (एसएनएसपीए) भारताच्या विकसित भारत 2047 च्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल असून, ते महिलांचे आरोग्य आणि कुटुंबांच्या सक्षमीकरणाला राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवते. सर्वसमावेशक तपासणी, माता आणि बालसंगोपन सेवा, वर्तणुकीशी संबंधित शिक्षण आणि समुदाय-चालित उपक्रमांचे एकत्रीकरण करून, एसएनएसपीए केवळ आरोग्यसेवेची उपलब्धता आणि जागरूकतेमधील गंभीर त्रुटी दूर करत नाही, तर स्वच्छ भारत अभियान, मिशन शक्ती आणि पोषण 2.0 यासारख्या प्रमुख कार्यक्रमांच्या यशावर देखील भर देते. सरकारी मंत्रालये, खासगी लाभधारक आणि तळागाळातील स्वयंसेवक यांच्या सहकार्याने केलेल्या एकत्रित प्रयत्नांद्वारे, ही मोहीम शाश्वत वर्तनात्मक बदलांना चालना देते, माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करते आणि शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात न्याय्य आरोग्य सेवेला प्रोत्साहन देते. स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियान गांधी जयंतीच्या दिवशी संपत आहे. गांधी जयंतीच्या समारोप होत असलेले स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, समावेशक विकास प्रगती, बदलाला गती देणाऱ्या म्हणून महिलांना सक्षम बनवण्याच्या आणि भारताच्या परिवर्तनकारी विकासाला चालना देणाऱ्या निरोगी, मजबूत कुटुंबांचा पाया रचण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय:
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय:
महिला आणि बालविकास मंत्रालय:
इतर:
Click here to see pdf
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
(Backgrounder ID: 155941)
आगंतुक पटल : 21
Provide suggestions / comments