• Sitemap
  • Advance Search
Energy & Environment

आकाशावर पुनरुज्जीवन

जागतिक ओझोन दिन: विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत

Posted On: 16 SEP 2025 3:01PM

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2025

 

ठळक मुद्दे

  • जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि 2025 ची संकल्पना "विज्ञानापासून जागतिक कृतीकडे" अशी आहे.
  • एचएफसी (हायड्रोफ्लुरोकार्बन) कमी करणे आणि शीतकरण कृती योजना यासह भारताचे सक्रिय उपाय ओझोन संरक्षणातील नेतृत्व दर्शवितात.
  • 2020 पासून थेट कार्बन डाय-ऑक्साइड (सीओटू) उत्सर्जन कमी करण्यात निव्वळ योगदान 42,62,100 मेट्रिक टन सीओटू समतुल्य प्रतिवर्ष आणि 2023 पासून 76,97,600 मेट्रिक टन सीओटू समतुल्य प्रतिवर्ष आहे.

 

प्रस्तावना

पृथ्वीवरील जीवनाचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो.

1987 च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे यश साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 मध्ये या दिवसाची सुरुवात केली. 1985 च्या व्हिएन्ना अधिवेशनानंतर हा करार झाला, जेव्हा शास्त्रज्ञांनी क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) नावाच्या रसायनांच्या धोक्यांबद्दल इशारा दिला होता. यामुळे वैज्ञानिक इशाऱ्यांचे जागतिक कृतीत रूपांतर झाले आणि आज ओझोन थर हळूहळू बरा व्हायला सुरुवात झाली आहे.

2025 च्या जागतिक ओझोन दिनाची संकल्पना "विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत" अशी आहे. ती ओझोनच्या ऱ्हासाच्या धोक्याबद्दल विज्ञानाने जगाला कसे सावध केले आणि राष्ट्रांमधील एकतेमुळे खरी प्रगती कशी झाली यावर प्रकाश टाकते.

प्रत्येक अंशाचा लहान भागदेखील महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक कृतीही महत्त्वाची ठरते. -अँटोनियो गुटेरेस, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की ओझोन थराचे उपचार हेच दर्शवितात की जेव्हा देश एकत्र काम करतात आणि विज्ञानाचे अनुसरण करतात तेव्हा ते खरी प्रगती साध्य करू शकतात. परंतु त्यांनी इशारा दिला की हवामान बदलाशी लढण्यासाठी आताही अशीच निकड आवश्यक आहे, कारण जग 1.5°C तापमानवाढीच्या मर्यादा ओलांडण्याच्या जवळ पोहोचले आहे. त्यांनी सरकारांना किगाली दुरुस्ती अंतर्गत हानिकारक शीतलक वायू कमी करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे शतकाच्या अखेरीस 0.5°C पर्यंत तापमानवाढ रोखता येईल.

 

किगाली सुधारणा

किगाली, रवांडा येथे 15 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांविषयक मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या 28 व्या बैठकीत

हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करण्यावर सर्व पक्षांचे‌ एकमत झाले.

व्हिएन्ना अधिवेशन (1985) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्यामध्ये देशांनी ओझोन थराचे ऱ्हास करणाऱ्या मानवी क्रियाकलापांपासून संरक्षण करण्यासाठी सहकार्य आणि माहिती सामायिक करण्यास सहमती दर्शविली आहे.

 

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल

1987 मध्ये स्वीकारलेला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांना, जसे की सीएफसी, हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराईड, एचसीएफसी आणि मिथाइल ब्रोमाइड हे टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी एक जागतिक करार केला आहे. सर्व देशांनी याला मान्यता दिली आहे आणि हा सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार मानला जातो, ज्यामुळे 2010 पर्यंत जागतिक स्तरावर ओझोन-कमी करणाऱ्या प्रमुख पदार्थांचे निर्मूलन होईल आणि ओझोन थर आणि हवामान प्रणाली या दोन्हीचे संरक्षण होईल.

 

जागतिक पर्यावरण सुविधा (जीईएफ) ची भूमिका

विकसनशील देशांना ओझोन कमी होणे, हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि आंतरराष्ट्रीय जलसमस्या यांना तोंड देता यावे, यासाठी जागतिक पर्यावरण सुविधा (जीईएफ) ची स्थापना करण्यात आली. ज्या देशांमध्ये संक्रमणशील अर्थव्यवस्था आहेत अशा देशांमध्ये ओझोन कमी करणारे पदार्थ टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याच्या प्रकल्पांना देखील ते सहाय्य करते, जे बहुपक्षीय निधी मदतीसाठी पात्र नाहीत. 1996 ते 2000 दरम्यान जीईएफने अझरबैजान, बेलारूस, बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, कझाकस्तान, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, रशिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तानसह 17 देशांना मदत करण्यासाठी 160 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. याव्यतिरिक्त, या देशांना एचसीएफसी आणि मिथाइल ब्रोमाइड टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यास मदत करण्यासाठी 60 दशलक्ष डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे.

 

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अंतर्गत भारताची प्रमुख कामगिरी

भारताने ओझोन कमी करणारे महत्त्वाचे पदार्थ वेळापत्रकापूर्वीच काढून टाकून, मजबूत धोरणे स्थापन करून तसेच जागतिक वाटाघाटींमध्ये नेतृत्वाची भूमिका घेऊन मॉन्ट्रियल प्रोटोकॉलप्रती दृढ वचनबद्धता दर्शविली आहे.

  • आरंभाची ओडीएस फेज-आउट: मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वेळापत्रकापूर्वी 2010 पर्यंत नियंत्रित वापरासह क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी), कार्बन टेट्राक्लोराईड (सीटीसी) आणि हॅलोन्स टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आले.
  • धोरण चौकट: 2000 मध्ये ओझोन कमी करणारे पदार्थ (ओडीएस) (नियमन आणि नियंत्रण) नियम लागू केले, 2003 पर्यंत नवीन उपकरणांमध्ये सीएफसी आणि हॅलोन्सवर बंदी घातली.
  • जागतिक नेतृत्व: 1989 पासून विकसनशील राष्ट्रांसाठी वकिली, 199 मध्ये तांत्रिक आणि आर्थिक मदतीसाठी बहुपक्षीय निधी (एम एल एफ) मिळवणे.
  • एचसीएफसी फेज-आउट: 2013 मध्ये हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन (HCFC) फ्रीज आणि 2015 मध्ये एचसीएफसी फेज-आउट व्यवस्थापन योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 10% कपात लक्ष्य पूर्ण करणे, 341.77ओझोन कमी करणारी क्षमता (ओडीपी) टन टप्प्याटप्प्याने कमी करणे.
  • आर एसी सर्व्हिसिंग: नॉन-ओडीएस तंत्रज्ञानाकडे वळण्यासाठी राष्ट्रीय सीएफसी उपभोग फेज-आउट योजनेअंतर्गत रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (आर ए सी) क्षेत्रातील 20,000 हून अधिक तंत्रज्ञांना प्रशिक्षित केले.

 

भारत - वेळापत्रकापूर्वी

भारताने 1 ऑगस्ट 2008 पासून मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वेळापत्रकाच्या 17 महिने आधी सीएफसीचे उत्पादन आणि वापर सक्रियपणे बंद केला, तसेच संक्रमण काळात दमा आणि सीओपीडी रुग्णांसाठी औषध-दर्जाच्या सीएफसीचा पुरवठा सुनिश्चित केला. 2010 पर्यंत भारताला एमडीआय तयार करण्यासाठी 343.6 मेट्रिक टन औषधी सीएफसीसाठी मान्यता देण्यात आली आणि 2011 पर्यंत कोणत्याही सीएफसीची विनंती करण्यात आली नाही कारण सीएफसी-मुक्त फॉर्म्युलेशन यशस्वीरित्या विकसित केले गेले आणि बाजारात आणले गेले. भारताची प्रगती ओळखून पक्षांच्या 19 व्या बैठकीत (2007) एचसीएफसीचे फेज-आउट 10 वर्षे पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. एचसीएफसी फेज-आउट व्यवस्थापन योजना (एचपीएमपी) उद्योग, संशोधन संस्था आणि इतर भागधारकांच्या निकट सहकार्याने तयार करण्यात आली, 2009 मध्ये वेगवान फेज-आउट वेळापत्रकाचे मार्गदर्शन करण्यासाठी पथदर्थक सुरू करण्यात आला.

 

ओझोन थर

ओझोन थर हा स्ट्रॅटोस्फियरचा एक भाग आहे, जो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15-50 किमी वर आढळतो, जिथे बहुतेक वातावरणीय ओझोन केंद्रित आहे. ओझोन हा तीन ऑक्सिजन अणूंनी बनलेला एक रेणू आहे आणि त्याच्या विशेष गुणधर्मामुळे ओझोन थर पृथ्वीच्या सौरपडद्याप्रमाणे कार्य करू शकतो. तो सूर्याच्या बहुतेक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांना, विशेषतः UV-B ला शोषून घेते, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, पिके, पदार्थ आणि सागरी जीवनाचे नुकसान होऊ शकते. ओझोन थराशिवाय, पृथ्वीवरील जीवन जसे विकसित झाले आहे तसे विकसित होऊ शकले नसते.

 

ओझोन कमी होण्याची कारणे

ओझोन कमी होणे हे प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी), हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराईड, मिथाइल क्लोरोफॉर्म आणि मिथाइल ब्रोमाइड सारख्या मानवनिर्मित रसायनांमुळे होते. हे पदार्थ खूप स्थिर असतात आणि पावसात विरघळत नाहीत, म्हणून ते स्ट्रॅटोस्फियरमध्ये पोहोचतात, जिथे तीव्र अतिनील किरणे त्यांना तोडतात आणि क्लोरीन किंवा ब्रोमिन सोडतात. एक क्लोरीन अणू 100,000 हून अधिक ओझोन रेणू नष्ट करू शकतो, ज्यामुळे ओझोन नैसर्गिकरित्या बदलण्यापेक्षा वेगाने कमी होतो. स्ट्रॅटोस्फियरमधील सुमारे 85% क्लोरीन या मानवनिर्मित रसायनांमधून येतो तर नैसर्गिक स्रोतांचा वाटा फक्त छोटासाच असतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून देखील एरोसोल बाहेर पडून ओझोनचे नुकसान वाढवू शकतो, जे सीएफसी मधील क्लोरीन बाहेर पडून ओझोन नष्ट करण्यात अधिक शक्तिशाली होतो.

 

ओझोन ऱ्हासाचे पर्यावरणीय परिणाम

ओझोन थर ऱ्हासामुळे हानिकारक अतिनील किरणोत्सर्ग तीव्र होतो, ज्यामुळे मानवी आरोग्य, शेती, परिसंस्था, प्राणी आणि पदार्थांवर पर्यावरणीय परिणामांचा एक मोठा प्रवाह सुरू होतो.

मानवी आरोग्याला धोके: ओझोन कमी झाल्यामुळे अतिनील किरणोत्सर्ग वाढतो, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग, सनबर्न, अकाली त्वचा वृद्धत्व, मोतीबिंदू, अंधत्व आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांचा धोका वाढतो. 1% ओझोन कमी झाल्यास हानिकारक अतिनील किरणोत्सर्ग सुमारे 2% ने वाढतो, ज्यामुळे दरवर्षी 20 लाख मोतीबिंदूचे नवीन रुग्ण निर्माण होण्याची शक्यता असते.

शेतीवरील परिणाम: अतिनील पातळीत वाढ झाल्याने तांदूळ, गहू, मका आणि सोयाबीन सारख्या पिकांचे नुकसान होते, पिकांची वाढ, प्रकाशसंश्लेषण आणि फुलणे कमी होते.1% अतिनील-बी वाढल्याने अन्न उत्पादन 1% ने कमी होऊ शकते, ज्यामुळे भारताच्या शेतीवर लक्षणीय परिणाम होतो.

सागरी जीवनाचे नुकसान: अतिनील वाढल्याने प्लँक्टनला धोका निर्माण होतो, जलचर अन्न साखळ्यांमध्ये व्यत्यय येतो. तरुण मासे, कोळंबी आणि खेकड्यांच्या अळ्यांना धोका निर्माण होतो, ज्यामुळे माशांचे उत्पादन आणि समुद्रातील जैवविविधता कमी होऊ शकते.

प्राण्यांचे आरोग्य: अतिनील किरणे अधिक प्रमाणात अंगावर पडली तर पाळीव आणि सागरी प्राण्यांमध्ये विशेषतः अंटार्क्टिक ओझोन छिद्राखाली, डोळे आणि त्वचेचे कर्करोग होऊ शकतात.

साहित्याचा ऱ्हास: अतिनील किरणोत्सर्गामुळे लाकूड, प्लास्टिक, रबर, कापड आणि बांधकाम साहित्याचे नुकसान होते, ज्यामुळे महागडे बदल किंवा संरक्षण उपाय करावे लागतात.

 

ओझोन कमी करणारे पदार्थ आणि त्यांचा उद्योगातील वापर

 

ओझोन कमी होण्याबाबत भारताचा पुढाकार

ओझोन थराच्या ऱ्हासाचा सामना करण्यासाठी भारताने सक्रिय उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यात शाश्वत शीतकरणावर लक्ष केंद्रित केले आहे, हानिकारक रेफ्रिजरंट्स टप्प्याटप्प्याने कमी केले आहेत, पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत आणि जनजागृती केली आहे.

भारत शीतकरण कृती योजना इंडिया कूलिंग अ‍ॅक्शन प्लॅन (ICAP): हा 2019 मध्ये सुरू करण्यात आला आणि जगातील पहिला शीतकरण कृती अ‍ॅक्शन प्लॅन आहे, जो 2037-38 पर्यंत कूलिंग डिमांडमध्ये 20-25%, उर्जेचा वापर 25-40% आणि रेफ्रिजरंट डिमांडमध्ये 25-30% कपात करण्याचे लक्ष्य ठेवतो. हे आर एस क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता आणि कमी जीडब्ल्यूपी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देते.

एचएफसी फेज-डाउन धोरण: 2023 मध्ये अंतिम रूप देण्यात आलेली भारताची एचएफसी फेज-डाउनची राष्ट्रीय रणनीती, किगाली सुधारणा उद्दिष्टांशी सुसंगत असा एचएफसी वापर आणि कमी जीडब्ल्यूपी पर्यायांवर आधारित क्षेत्रांना प्राधान्य देते.

थीमॅटिक वर्किंग ग्रुप्स: सहा गट स्पेस कूलिंग, कोल्ड चेन, आरएसी सर्व्हिसिंग, रेफ्रिजरंट डिमांड आणि आयसीएपी अंमलात आणण्यासाठी, कूलिंग कार्यक्षमता आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रित करतात.

जागरूकता प्रयत्न: ओझोन सेलच्या मोहिमा ओझोन कमी होणे आणि ओडीएस फेज-आउट बद्दल शिक्षित करण्यासाठी बहुभाषिक व्हिडिओ आणि सोशल मीडिया (यूट्यूब, फेसबुक, एक्स) वापरतात.

 

ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक कृती

घरी, शेतीमध्ये, तांत्रिक सेवांमध्ये आणि जागरूक ग्राहक आणि नागरिक म्हणून ओझोन-अनुकूल पद्धतींचा अवलंब करून व्यक्ती ओझोन थराचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

ओझोन-अनुकूल ग्राहक: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि एरोसोल सारखी "सीएफसी-मुक्त" किंवा "ओझोन-अनुकूल" उत्पादने खरेदी करा आणि विक्रेत्यांकडून पडताळणी करा.

ओझोन-अनुकूल घरमालक: जुन्या उपकरणांंची जबाबदारीने विल्हेवाट लावा, क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी)/हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन (एचसीएफसी) काढून टाकली जातील याची खात्री करा आणि हॅलोन अग्निशामक यंत्रांचा पुनर्वापर करा.

ओझोन-अनुकूल शेतकरी: मातीच्या धुरासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनासारख्या सुरक्षित पर्यायांकडे मिथाइल ब्रोमाइडऐवजी वळा.

ओझोन-अनुकूल तंत्रज्ञ: रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग युनिट्समधून रेफ्रिजरंट्स व्हेंटिलेशनशिवाय पुनर्प्राप्ती करा, गळती तपासा आणि पुनर्वापर कार्यक्रमांना प्रोत्साहन द्या.

ओझोन-अनुकूल नागरिक: ओझोन कमी होण्याचे परिणाम आणि राष्ट्रीय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल धोरणांबद्दल जाणून घ्या आणि तुमच्या राष्ट्रीय ओझोन युनिट (एनओयू) शी संवाद साधा.

 

निष्कर्ष

जागतिक ओझोन दिन आपल्याला आठवण करून देतो की जागतिक सहकार्य आणि विज्ञान-नेतृत्वाखालील कृती उल्लेखनीय परिणाम साध्य करू शकतात. ओझोन थराची पुनर्प्राप्ती दर्शवते की जेव्हा राष्ट्रे एकत्र येतात तेव्हा प्रगती शक्य आहे, जसे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने दाखवले आहे. भारताचे सक्रिय उपाय, लवकर टप्प्याटप्प्याने उपाययोजना आणि शाश्वत वचनबद्धता हे प्रतिबिंबित करतात की देश पर्यावरण संरक्षण आणि हवामान कृती या दोन्हीमध्ये कसे योगदान देऊ शकतात! हवामान बदलासारख्या नवीन आव्हानांना तोंड देत असताना प्रत्येक कृती महत्त्वाची आहे - ओझोनचा ऱ्हास करणारे तसेच हरितगृह वायू यांचा कमीतकमी वापर करून आपण आपल्या ग्रहाचे रक्षण करू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी, सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो.

 

संदर्भ

UNEP

United Nations

PIB

Ministry of Environment, Forest and Climate Change

 

Healing the Skies

 

* * *

नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

(Explainer ID: 155940) आगंतुक पटल : 97
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Bengali