Social Welfare
दूरदर्शनची 66 वर्षे
सार्वजनिक सेवा आणि डिजिटल नवोन्मेषाचा वारसा
Posted On:
15 SEP 2025 9:36AM
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
ठळक मुद्दे
- सप्टेंबर 2025 पर्यंत, दूरदर्शनद्वारा 35 वाहिन्या चालवल्या जात आहेत, यात आंतरराष्ट्रीय प्रसारण सेवा पुरवणाऱ्या डीडी इंडिया या वाहिनीचाही समावेश आहे.
- दूरदर्शनची सेवा भारताच्या 90% हून अधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचलेली आहे. डीडी न्यूजद्वारा दररोज 17 पेक्षा जास्त तास इतक्या प्रमाणात थेट कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते, तर डीडी इंडिया प्रमुख इंग्रजी वृत्तवाहिन्यांसोबत दमदार स्पर्धा करत आपले अस्तित्व दर्शवत आहे.
- 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास (BIND) योजनेअंतर्गत (2021-26) दूरदर्शनच्या संपूर्ण विस्तारीत जाळ्याअंतर्गत तत्रज्ञान विषयक सुधारणा घडवून आणण्याचे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे.
- पीबी शब्द (PB SHABD) सध्या 15 भारतीय भाषांमध्ये कार्यरत असून, या सेवेअंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंत 1200 वार्ताहर काम करत आहेत.
प्रस्तावना

दूरदर्शन ही भारताची प्रमुख सार्वजनिक सेवा प्रसारक असून, 15 सप्टेंबर 2025 रोजी दूरदर्शनचा 66 वा स्थापना दिवस साजरा झाला. 1959 मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या अंतर्गत प्रायोगिक दूरचित्रवाणी सेवा म्हणून या वाहिनीची सुरुवात झाली होती. मागील दशकांमध्ये, माहितीचा प्रसार, सांस्कृतीचे जतन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक महत्त्वाचा मंच म्हणून दूरदर्शनने मोठी प्रगती साध्य केली आहे. सद्यस्थितीत उपग्रह आणि थेट घरापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या माध्यमातून, दूरदर्शनचे जाळे भारताच्या जवळपास 100% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेले आहे. प्रसार भारतीचा एक भाग असलेल्या दूरदर्शनने 1997 पासून शिक्षण, बातम्या आणि मनोरंजनावर भर देत, सार्वजनिक हिताच्या प्रसारणाला सातत्याने प्राधान्य दिले आहे.
नवी दिल्लीतील आकाशवाणी भवनातील रंग भवन इथे 15 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित शब्दांजली : DD@66 या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दूरदर्शनचा 66 वा स्थापना दिवस सह साजरा झाला.

इतिहास

दूरदर्शन ही भारताची प्रमुख सार्वजनिक सेवा प्रसारक असून, 15 सप्टेंबर 2025 रोजी दूरदर्शनचा 66 वा स्थापना दिवस साजरा झाला. 1959 मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या (हीच संस्था आता आकाशवाणी म्हणून ओळखली जाते) अंतर्गत प्रायोगिक दूरचित्रवाणी सेवा म्हणून या वाहिनीची सुरुवात झाली होती.
भारताचे प्रमुख सार्वजनिक सेवा प्रसारक असलेले दूरदर्शन 15 सप्टेंबर 2025 रोजी आपला 66 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 1959 मध्ये ऑल इंडिया रेडिओ (जे आता आकाशवाणी म्हणून ओळखले जाते) च्या अंतर्गत प्रायोगिक दूरचित्रवाणी सेवा म्हणून याची सुरुवात झाली. सद्यस्थितीत उपग्रह आणि थेट घरापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या माध्यमातून, दूरदर्शनचे जाळे भारताच्या जवळपास 100% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेले आहे. प्रसार भारतीचा एक भाग असलेल्या दूरदर्शनने 1997 पासून शिक्षण, बातम्या आणि मनोरंजनावर भर देत, सार्वजनिक हिताच्या प्रसारणाला सातत्याने प्राधान्य दिले आहे.

1 एप्रिल 1976 रोजी दूरदर्शनला ऑल इंडिया रेडिओ पासून स्वतंत्र ओळख मिळाली. दूरदर्शनच्या वाटचालीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. यामुळे दूरदर्शनला आपला विस्तार सर्वदूर पोहोचवण्यासाठी कार्यान्वयात्मक स्वायत्तता मिळाली. 15 ऑगस्ट 1982 रोजी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने रंगीत स्वरुपातील दूरचित्रवाणीला प्रारंभ झाला. या बदलाने दूरदर्शनच्या दृश्यात्मक आकर्षण आणि प्रेक्षकसंख्येत मोठा कायापालट घडून आला. प्रसार भारती कायदा, 1990 अंतर्गत 23 सप्टेंबर 1997 रोजी प्रसार भारतीची एक स्वायत्त महामंडळ म्हणून स्थापना झाली. त्यानंतर दूरदर्शनलाही अधिक व्यावसायिक स्वरूप आले, आणि ऑल इंडिया रेडिओसह, दूरदर्शनचा एका एकात्मक सार्वजनिक प्रसारण सेवेच्या चौकटीत अंतर्भाव केला गेला.
सद्यस्थिती
सद्यस्थितीत दूरदर्शन सेवेअंतर्गत 35 उपग्रह वाहिन्या आणि 66 स्टुडिओ केंद्रांच्या व्यापक जाळ्याच्या माध्यमातून, 24 पेक्षा जास्त भाषा आणि विविध बोलीभाषांमध्ये आशय सामग्रीचे प्रसारण केले जात असून, देशभरातील विविध भाषक आणि सांस्कृतिक समुदायांना सेवा पुरवली जात आहे. 2024 पर्यंत आकडेवारीनुसार दूरदर्श समुहाची DD Free Dish ही सुविधा, 49 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचली आहे. ही भारतातील थेट घरापर्यंत सेवा (DTH) देणारी सर्वात मोठी विनामूल्य - प्रसारण (Free-to-Air - FTA) सेवा आहे. यामुळे दूरदर्शनची सेवा दुर्गम भागातही पोहोचेल याची सुनिश्चिती झाली आहे. दरदर्शने आजवर आरोग्य विषयक मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांसारख्या सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कार्यक्रमांवर भर दिला असून, दूरदर्शनचा हा दृष्टीकोन राष्ट्रीय विकासाच्या उद्दिष्टांना अनुसरून आहे. हा दूरदर्शनच्या सार्वजनिक सेवेप्रती असलेल्या वचनबद्धतेचा सर्वात मोठा पुरावाच आहे.

आज दूरदर्शनच्या व्यापक समुहाअंतर्गत, 06 राष्ट्रीय वाहिन्या, 28 प्रादेशिक वाहिन्या आणि आंतरराष्ट्रीय अस्तित्व असलेल्या 01 वाहिनीसह एकूण 35 वाहिन्या आहेत.
डीडी न्यूज : सार्वजनिक प्रसारणाचा आधारस्तंभ

डीडी न्यूज, ही भारताची एकमेव भूक्षेत्र वजा उपग्रह वृत्तवाहिनी आहे. 3 नोव्हेंबर 2003 रोजी डीडी - मेट्रो या वाहिनीचे 24 तासांच्या वृत्तवाहिनीमध्ये रूपांतर करून या वाहनीअंतर्गतच्या सेवेचा प्रारंभ गेला गेला होता. तेव्हापासूनच या वाहिनीच्या माध्यमातून तटस्थ, निष्पक्ष आणि अचूक बातम्या पोहचवल्या जात आहे. डीडी न्यूजवरून दररोज 17 तासांपेक्षा जास्त थेट कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. याअंतर्गत 30 हून अधिक बातम्यांविषयक बुलेटिन सोबतच 26 भाषा / बोलीभाषांमधील 30 प्रादेशिक वृत्त विभागांनी तयार केलेल्या प्रादेशिक आशय सामग्रीचाही अंतर्भाव असतो. या वाहिनीवरून हिंदीसह संस्कृत आणि सांकेतिक भाषांमध्येही विविधांगी आशय सामग्रीची निर्मिती केली जाते. या वाहिनीवरून उद्योग व्यवसाय विषयक कार्यक्रम, चालू घडामोडींशी संबंधित कार्यक्रम, तसेच आरोग्य, युवा, सिनेमा, कला, संस्कृती, महत्त्वाकांक्षी सरकारी योजनांवरील विशेष कार्यक्रम आणि संस्कृतमधील मासिक वृत्तविषयक कार्यक्रमचा समावेश आहे. त्याचबरोबर ही वाहिनीच्या माध्यमातून डीडी नॅशल, डीडी इंडिया आणि डीडी उर्दू सांरख्या सहयोगी वाहिन्यांसाठीही आशय सामग्रीची निर्मिती करून ती पुरवली जाते.
ट्विटर (@DDNewsLive) आणि यूट्यूब (youtube.com/DDNewsOfficial) सारख्या समाज माध्यम व्यासपीठांच्या माध्यमातूनही ही वाहिनी सक्रियपणे प्रेक्षकांसोबत संवाद साधत आली आहे. याशिवाय डीडी न्यूज वरून सातत्याने ताज्या घडामोडींविषयक बातम्यांचे प्रसारण केले जाते, तसेच सार्वजनिक जागृतीसाठी वाहिनीवर स्क्रोल पट्टी तसेच चलपट्टी अर्थात Ticker Band च्या माध्यमातूनही, प्रचार प्रसार विषयक माहिती प्रदर्शित केली जाते. दूरदर्शनच्या अशा स्वरुपातील बहुआयामी अस्तित्वामुळे सार्वजनिक जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मकतेत वृद्धी घडवून आणणारा एक विश्वसार्ह आणि सर्वसमावेशक माहितीचा स्रोत म्हणून, दूरदर्शनची भूमिका अधिक बळकट झाली आहे.

डीडी इंडिया : आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना सेवा पुरवणारी वाहिनी
या वाहिनीचा 1995 मध्ये डीडी इंटरनॅशनल या नावाने प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर वाहिनीचे नाव बदलून डीडी इंडिया असे केले गेले. ही वाहिनी देखील प्रसार भारतीची विनामूल्य प्रसारण सेवेअंतर्गतची उपग्रह इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. या वाहिनीच्या माध्यमातून प्रामुख्याने जगभरात वसलेल्या भारतीय वंशाच्या समुदायाला आणि जागतिक प्रेक्षकांना प्रसारण सेवा पुरवली जाते. या वाहिनीच्या सेवेअंतर्गत बातम्या, चालू घडामोडी, परराष्ट्र व्यवहार, अर्थव्यवस्था, क्रीडा आणि मनोरंजनावर भर दिला जातो. भारताचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणे हा या वाहिनीचा उद्देश आहे. ऑक्टोबर 2020 पासून या वाहिनीच्या प्रसारण सेवेची गुणवत्ता सुधारून हाय डेफिनीशन (HD) केली गेली. या सुधारणेसह आता वाहिनीने आघाडीच्या खासगी इंग्रजी वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा करत आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले असून, बार्कची (BARC) मान्यताही प्राप्त केली आहे. परदेशात भारतीय आशय सामग्रीची असलेली वाढती मागणी पूर्ण करण्याकरता केबल आणि उपग्रह आधारीत व्यासपीठांचा उपयोग करून घेतला जातो. त्यादृष्टीनेच डीडी इंडिया वाहिनीवरून प्रामुख्याने थेट वार्तांकन आणि सखोल विश्लेषणात्मक कार्यक्रमांच्या प्रसारणावर सर्वाधिक भर दिला जातो.
दूरदर्शनवर पंतप्रधानांची मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी नभोवाणी आणि दूरचित्रवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी राष्ट्रीय प्रश्न, संस्कृती आणि विकासाशी संबंधित मुद्यांवर संवाद साधतात. या कार्यक्रमाचे प्रसारण डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज तसेच दूरदर्शनच्या इतर वाहिन्यांवरून केले जाते, आणि हा या वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे कार्यक्रम दूरदर्शनच्या व्यापक विस्तारीत जाळ्यावरून थेट प्रसारण केले जात असल्याने, आणि त्याला डीडी फ्री डिशची जोडही लाभली असल्याने तो मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचतो. यामुळे हा कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत पोहचेल याची सुनिश्चितीही शक्य झाली आहे. डीडी इंडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंतही हा कार्यक्रम पोहोचवला जातो. या कार्यक्रमामुळे सार्वजनिक सहभागात वृद्धी घडून येत आहे, तळागाळात राबवल्या जात असलेल्या उपक्रम लोकांपर्यंत ठळकपणे पोहचू लागले आहेत, त्यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्राधान्यक्रमाला अनुसरूनच शिक्षण, आरोग्य आणि शाश्वतता यांसारख्या विषयांवरही भर दिला जात आहे.
दूरदर्शनवरून प्रसारित अजरामर मालिका
दूरदर्शवरून रामायण, महाभारत, हम लोग, बुनियाद, चाणक्य, मालगुडी डेज, शक्तीमान, चित्रहार, फौजी, सर्कस आणि उडान यांसारख्या काही अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर मालिकांचे प्रसारण झाले आहे. या सर्व कार्यक्रमांनी सार्वजनिक जागरूकतेत वृद्धी घडवून आणण्याची जबाबदारी तर पार पाडलीच आहे, पण त्यासोबतच अद्वितीय कलाकृती आणि मनोरंजनाचे उच्च मापदंडही प्रस्थापित केले आहेत.


डीडी फ्री डिश : भारताची सर्वात मोठी विनामूल्य - प्रसारण सेवा

थेट घरापर्यंत सेवा पोहचवणारी डीडी फ्री डिश ही सेवा डिसेंबर 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही देशातली थेट घरापर्यंत सेवा पोहचवणारी एकमेव विनामूल्य प्रसारण सेवा आहे. यासाठी कोणतेही मासिक शुल्क आकारले जात नाही. आजमितीला भारतातील 49 दशलक्ष घरांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे. डीडी फ्री डिश या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना विस्तृत श्रेणीअंतर्गतच्या वाहिन्या उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सेवेअंतर्गत सद्यस्थितीत दूरदर्शन समुहाच्या हाय डेफिनिशन गुणवत्तेच्या 9 वाहिन्या, तसेच 35 स्टँडर्ड डेफिनिशन गुणवत्तेच्या वाहिन्या, आकाशवाणीच्या 48 नभोवाणी वाहिन्या, संसद टीव्हीच्या 2 हाय डेफिनिशन गुणवत्तेच्या वाहिन्या आणि 2 स्टँडर्ड डेफिनिशन गुणवत्तेच्या वाहिन्या, 92 खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि 266 सह - ब्रँडेड शैक्षणिक वाहिन्या उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
या सेवेच्या माध्यमातून मनोरंजन, बातम्या आणि प्रधानमंत्री ई-विद्या सांरख्या शैक्षणिक कार्यक्रमांसह विविध आशय सामग्रीचे प्रसारण केले जाते, महत्वाचे म्हणजे या सेवेसाठी इंटरनेट जोडणीची आवश्यकता भासत नाही.
डिजिटल युगाची पहाट
वेव्ह्ज (Waves) ओटीटी मंचाच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन
प्रसार भारतीच्या नेतृत्वाअंतर्गत, दूरदर्शनने नोव्हेंबर 2024 मध्ये वेव्ह्ज हा आपला ओटीटी मंच सुरू करत, एक अभूतपूर्व डिजिटल परिवर्तन घडवून आणले. या मंचाचा प्रारंभ म्हणजे पारंपारिक प्रसारणातून आधुनिक स्वरुपातील प्ररणाच्या दिशेने केलेल्या महत्त्वाच्या बदलाचे द्योतक आहे. हा ओटीटी मंच म्हणजे एक सर्वसमावेशक डिजिटल केंद्र असून, त्यावर 12 भाषांमधील आशय सामग्री उपलब्ध करून दिली आहे. यापुढेही यात सर्व प्रमुख भारतीय भाषांचा समावेश करण्याची योजना आहे. या मंचाच्या माध्यमातून विविधांगी प्रेक्षकांची आशय सामग्रीची गरज भागवली जाते. अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या या ओटीटी मंचाने महत्त्वाच्या जागतिक सहभागाचे लक्ष्यही साध्य केले आहे. यासोबतच डिजिटल व्यापाराच्या उद्देशाने वेव्ह्ज ओटीटी मंचाने खुल्या आणि मुक्त नेटवर्कसोबत (ONDC) भागीदारी देखील केली असून, या सेवेच्या अॅपमध्ये ई-कॉमर्सची जोडही दिली गेली आहे. हीच बाब या ओटीटी मंचाचे जगावेगळे वैशिष्ट्य ठरले असून, त्यामुळे आधुनिक डिजिटल क्षेत्रातील कलांचा अवलंब करतानाच मनोरंजन, शिक्षण आणि खरेदी या क्षेत्रांचेही एकात्मिकीकरण घडवून आणणाऱ्या या मंचामुळे अवघ्या जगाला भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडत आहे.

वेव्ह्जच्या या व्यापक यशातून दूरदर्शनची सार्वजनिक सेवेअंतर्गत नैतिकतेचे तत्व जपत, केबल / डीटीएचला बगल देणाऱ्या युगाशी जुळवून घेण्याची क्षमताही दिसून आली आहे. याच तत्वाला अनुसरून या मंचावरून स्वच्छ, सर्वसमावेशक आणि कुटुंबासोबत पाहता येणासारख्या आशय सामग्रीचे प्रसारण केले जात अहे. दूरदर्शनच्या स्वतःच्या तसेच बी4यू, एसएबी ग्रुप आणि 9एक्स मीडिया यां सारख्या खासगी समुहांच्या 70 पेक्षा जास्त थेट प्रासारित होणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्या आणि प्ले-टू-प्ले गेम्स तसेच विशेषतः युवा वर्षासाठी निर्मिती आशय सामग्री ही या मंचाची परस्पर संवादविषयक आशयसाग्रीच्या अनुषंगाने ठळक वैशिष्टे म्हणता येतील. यामुळेच वेव्ह्जला स्वतःच्या जागतिक सहभागाची व्याप्ती विस्तारण्यातही मोठे यश मिळाले आहे.
वेव्ह्जच्या प्रारंभाच्या माध्यमातून, दूरदर्शनने एक भविष्यवेधी प्रसारक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. सद्यस्थितीत दूरदर्शन आपल्या व्यापक आणि विशाल पायाभूत सुविधांचा योग्य उपयोग करून घेत हाय डिफिनिशन गुणवत्तेची आशय सामग्री प्रसारित करत आहे. यामुळे भारतासह आणि जगभरातील सांस्कृतिक तसेच शैक्षणिक आधारस्तंभ म्हणूनही दूरदर्शनची भूमिका अधिक बळकट झाली आहे.
पीबी शब्द – वृत्त प्रसारणाची नवी पद्धत

प्रसार भारतीच्या प्रसारण आणि वितरणासाठी सामायिक दृकश्राव्य (Prasar Bharati-Shared Audio-Visuals for Broadcast and Dissemination - PB-SHABD) अर्थात पीबी शब्द या सेवेचा 13 मार्च 2024 रोजी प्रारंभ केला गेला. वृत्त सामायिक करणारी सेवा म्हणूनच ही सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेच्या माध्यमातून माध्यम जगतातील संस्थांना चित्रफिती, ध्वनीफिती, मजकूर आणि छायाचित्र स्वरूपात दैनंदिन बातम्यांविषयीची आशय सामग्री पुरवली जाते. या सुविधेअंतर्गत चोवीस तास संपादन सेवा पुरवत असलेल्या 60 डेस्कच्या माध्यमातून, आणि 1200 हून अधिक वार्ताहर, प्रतिनिधी आणि स्ट्रिंगर्सच्या विस्तृत जाळ्याचा योग्य उपयोग करून घेतला जात आहे. एका वर्षभरात पीबी शब्दसोबत 2500 हून अधिक माध्यम जगताशी संबंधित ग्राहक जोडले गेले आहेत. अशा व्यापकतेमुळे ही सुविधेच्या माध्यमातून दररोज प्रादेशिक वृत्त विभागांद्वारे तसेच मुख्यालयातून प्रमुख भारतीय भाषांममधील कृषी, तंत्रज्ञान, परराष्ट्र व्यवहार आणि राजकीय घडामोडींसह 50 पेक्षा अधिक श्रेणींमदील, 1000 हून अधिक बातम्या प्रसारित केल्या जात असून, अशी सेवा देणारी ही आघाडीवर असलेली व्यवस्था ठरली आहे. पीबी शब्दवरील आशयसामग्री ही बोधचिन्ह मुक्त असून, तीच्या वापरासाठी कोणतेही श्रेयांकन देण्याची गरज नसते. याअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार समारंभ, निवडणूक रॅली, पत्रकार परिषद आणि राजकीय कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमांच्या विशेष कव्हरेजसाठी थेट फीड (Live Feed) उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या संग्रहातील दुर्मिळ अभिलेखागार अर्थात जतन केलेल्या फुटेजसाठी माध्यम संग्रह तयार करणे, तसेच ही सुविधा वापरणाऱ्या सदस्यांना मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यात मदत करण्याच्या उद्देशाने संबंधित विशेष पॅकेज (Curated Packages - संबंधित बातमीच्या विविध पैलुंचा अतर्भाव असणाऱ्या आशय सामाग्रीचे एकात्मिकरण) यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण सेवांचाही यात समावेश केलेला आहे. लोकांना जटिल समस्या सोप्या भाषेत समजून घेता याव्यात या उद्देशाने तज्ञांचे लेख असलेला एक संपादकीय विभागही याअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

डीडी स्पोर्ट्स

प्रसार भारती क्रीडा विभागाने गेल्या काही वर्षांत डीडी स्पोर्ट्स आणि वेव्ह्ज ओटीटी मंच या दोन्हींवर आशय सामग्री पुनरुज्जीवित करण्यासाठी असंख्य पाऊले उचलली आहेत. क्रीडा कायदा, 2008 अंतर्गत प्रसारित होणाऱ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित थेट कार्यक्रमांच्या (मुख्य कार्यक्रमाच्या प्रसारणापूर्वीचा कार्यक्रम, मुख्य कार्यक्रमा दरम्यानचा कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम संपल्यानंतरचा कार्यक्रम) निर्मितीची गुणवत्ता वाढवणे या उद्देशानेच अशी पावले उचलली जात आहेत. याद्वारे क्रीडा विषयक सर्वंकष आणि आशयघन आशय सामग्री उपलब्ध करून देत वाहिनीची प्रेक्षमकसंख्या वाढवणे हा उद्देश आहे. यासोबतच भारताला क्रीडा शक्ती बनवण्यात सार्वजनिक प्रसारक म्हणून सक्रिय भूमिका बजावता येणार असून, परिणामी देशातील सर्व क्रीडाप्रेमींसाठी क्रीडा क्षेत्रविषयक गुणवत्तापूर्ण आशय सामग्री उपलब्ध करून देता येणार आहे.
याअंतर्गत सर्वात प्रथम क्रीडा कायदा, 2008 अंतर्गत प्रसारित होणाऱ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पार्श्वभूमीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या (मुख्य कार्यक्रमाच्या प्रसारणापूर्वीचा कार्यक्रम, मुख्य कार्यक्रमा दरम्यानचा कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम संपल्यानंतरचा कार्यक्रम) कार्यक्रमांच्या निर्मितीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक पाऊले उचलली गेली आहेत. वास्तविक वेळेतील आकडेवारी, अत्याधुनिक ग्राफिक्स आणि जागतिक दर्जाच्या स्वरूपातील चित्रिकरणाचे नेपथ्य अर्थात सेट्समुळे ही गुणवत्ता सुधारणे शक्य झाले आहे.
दुसरे म्हणजे, केंद्र सरकारच्या नेतृत्वाखालील खेलो इंडिया या प्रमुख क्रीडाविषयक उपक्रमाशी संबंधित कार्यक्रमांच्या निर्मितीच्या गुणवत्तेतही सुधारणा घडवून आणली गेली आहे. गेल्या काही वर्षांत, डीडी स्पोर्ट्सने गुजरात, गोवा आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा, नवी दिल्लीत झालेली खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, दीवमध्ये पार पडलेली खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा, तसेच गुलमर्ग आणि लेहमध्ये पार पडलेली खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा यांसारख्या मोठ्या स्पर्धांच्या कार्यक्रमांची यशस्वीरित्या निर्मिती आणि प्रसारण केले आहे.
गेल्या वर्षी, या वाहिनीवरून हॉकी इंडिया लीग (पुरुष आणि महिला) तसेच हॉकी इंडियाच्या नेतृत्वाखालील इतर प्रमुख स्पर्धांची निर्मिती आणि प्रसारण करण्यासाठी हॉकी इंडियासोबत एक करारही केला गेला. त्याचप्रमाणे, प्रसार भारतीने भारतीय हँडबॉल महासंघासोबत त्यांच्या प्रमुख स्पर्धांच्या कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारणासाठी करार केला आहे. भारतीय तिरंदाजी संघटना, भारतीय बॅडमिंटन संघटना आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियासोबत देखील आगामी महिन्यांत असेच करार होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात, प्रसार भारतीने दिल्लीत होणार असलेल्या आगामी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 च्या कार्यक्रमाची निर्मिती आणि प्रसारणासाठी भारतीय पॅरालिम्पिक्स समितीसोबत करार केला आहे.
प्रसार भारतीच्या क्रीडा विभागाने वाहिनीची प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी अगदी नव्या स्वरुपातील आणि नवोन्मेषी आशय सामग्रीच्या निर्मितीसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थांशीही करार केले आहेत. याअंतर्गत द ग्रेट इंडियन क्रिकेट शो या कार्यक्रमाचे 104 भाग तयार करण्यासाठी एलिप्स क्रिकविझ प्रायव्हेट लिमिटेडसोबत दोन वर्षांचा करार केला गेला आहे. हा कार्यक्रम दूरदर्शन समुह, वेव्ह्ज (प्रसार भारतीचा ओटीटी मंच) आणि आकाशवाणीवरून प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेअंतर्गत प्रमुख माजी भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या विजय, पराभव आणि घटनांच्या आठवणींबद्दल स्वतः माहिती सामायिक करणार आहेत. त्याचप्रमाणे, प्रसार भारती ने ग्लोबल लीग ऑफ रेसलिंग या जागतिक दर्जाच्या क्रीडा विषयक अधिकारित सामग्रीची भारतीय आवृत्ती तयार करण्यासाठी आदी समुहासोबत करार केला आहे.
अखेरचे आणि महत्वाचे म्हणजे, प्रसार भारती ने डीएफबी पोकल - द जर्मन कप यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. कराराअंतर्गत डीएफबी पोकल आणि महिला बुंडेस्लिगामधील प्रमुख फुटबॉल सामने डीडी स्पोर्ट्स आणि वेव्ह्जवरून प्रसारित केले जात आहेत. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फुटबॉल मनोरंजन जास्तीत जास्त भारतीय घरांपर्यंत पोहोचवणे हा या करारामागचा उद्देश आहे.
कानपूर इथली भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भविष्यातील तंत्रज्ञानासोबतची भागीदारी
प्रसार भारतीने भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कानपूर इथल्या शाखेसोबतही सामंजस्य करार केला असून, या करारातून तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेषाप्रती दूरदर्शनची असलेली वचनबद्धताच अधोरेखित होते. भू क्षेत्रीय प्रसारण आणि थेट मोबाईलवरील प्रसारणासारख्या (D2M) उपाययोजनांच्या माध्यमातून भविष्यातील प्रसारणाचा मार्गदर्शक आराखडा तयार करणे हा या कराराचा उद्देश आहे.दूरदर्शनच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, थेट मोबालईवर प्रसारीत करण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या D2M प्रसारणासारख्या अत्याधुनिक मानकांचे एकात्मिकीकरण घडवून आणणे हे या या सहकार्यपूर्ण भागिदारीचे उद्दिष्ट आहे. यामुळे दूरदर्शनची सेवा दुर्गम आणि शहरी दोन्ही भागांपर्यंत अगदीर सर्वदूर पोहचू शकणार आहे.
प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास योजने (BIND Scheme) (2021–26) अंतर्गत, 24x7 सुरु असणाऱ्या प्रादेशिक वाहिन्यांच्या तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची योजना सरकारने आखली आहे. यामुळे हाय डेफिनिशन गुणवत्तेच्या स्वरुपात निर्मिती आणि प्रसारण शक्य होणार आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कानपूर इथल्या शाखेसोबत केलेल्या सहकार्यपूर्ण भागिदारीमुळे दूरदर्शनला प्रसारण नवोन्मेषात आघाडीचे स्थान मिळणार आहेत. यासोबतच ही भागिदारी 28 प्रादेशिक वाहिन्यांकरता हाय डेफिनिशन गुणवत्तेच्या स्वरुपातील निर्मितीसाठी तसेच ऑल इंडिया रेडिओच्या एफएम वाहिन्यांची व्याप्ती भारताच्या 80% हून अधिक लोकसंख्येपर्यंत विस्तारण्याच्या उद्देशाने 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास योजनेला अनुसरून असणार आहे. संवर्धित वास्तवता (Augmented Reality), आभासी वास्तवता (Virtual Reality) आणि फाइल आधारित कार्यप्रवाह (File-based Workflows) यांसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून, दूरदर्शनवरील कार्यक्रमांची गुणवत्ता तसेच विशेषतः शैक्षणिक आणि सांस्कृतिक आशय सामग्रीच्या बाबतीतील प्रेक्षकांच्या अनुभवातही सुधारणा घडून येत आहे. या प्रगतीमुळे दूरदर्शनची कार्यान्वयनात्मक कार्यक्षमता सुधारण्यासोबतच, दूरदर्शनच्या जागतिक स्पर्धात्मकतेलाही बळकटी मिळाली आहे. यामुळे सातत्याने वाढत्या डिजिटल माध्यम क्षेत्रात सार्वजनिक सेवेअंतर्गतचे नैतिकतेचे तत्व जपत, विविधांगी प्रेक्षकांना उच्च गुणवत्तेची आशय सामग्री उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
Yupp TV सोबतची भागीदारी आणि डीडी किसान वाहिनीचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञआनासोबत एकात्मिकरण

मार्च 2022 मध्ये, प्रसार भारती ने Yupp TV या आघाडीच्या ओटीटी मंचासोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे डीडी इंडियाला अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. जगभरातील दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांसाठीचे एक प्रवेशद्वारासारखे Yupp TV या ओटीटी मंचावरून डीडी इंडियावरील आशय सामग्रीसह इतर स्वरुपातील भारतीय आशय सामग्रीचे प्रसारण केले जाते. जगभरात वसलेल्या भारतीय वंशाच्या समुदायांची तसेच जागतिक प्रेक्षकांची भारत - केंद्रि कार्यक्रमांची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे.

दूरदर्शन किसान या कृषी वाहिनीने देखील आता एआय क्रिश (AI Krish) आणि एआय भूमी (AI Bhoomi) या दोन दोन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने निर्मित निवेदकांचा अंतर्भाव करून, तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेषाची कास धरली आहे. यामुळे बातम्यांचे 24/7 प्रसारण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी ही भारतातील पहिली सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे. या वाहिनीवरील हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने निर्मित निवेदक, 50 भाषांमध्ये सादरीकरण करू शकतात. यासबोतच ते शेतकरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी कृषी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या विषयांवर निरंतरपणे, बहुभाषिक आशय सामग्री सादर करतात. यामुळे या वाहिनीची प्रेक्षकसंख्या सर्वदूर विस्तारत असून, परस्पर सहभाग वाढण्यालाही चालना मिळू लागली आहे. अलिकडच्या काळात सुरू झालेली हे एकात्मिकीरणाची प्रक्रिया वेव्ह्ज ओटीटी मंचासह दूरदर्शनच्या व्यापक डिजिटल धोरणाला पूरक ठरली आहे. यातून विविधांगी समुदायांना सेवा पुरवण्यासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा (Next-Generation Technologies) अवलंब करण्याची दूरदर्शनची वचनबद्धताही दिसून येते, आणि त्याचवेळी सार्वजनिक सेवेचा उद्देशही जपला जातो.
सारांश
1959 मधील आपल्या प्रारंभापासून ते परंपरा आणि नवोन्मेषाचा संगम साधणाऱ्या बहुआयामी विस्तृत जाळ्यापर्यंतच्या प्रगतीचा टप्पा गाठलेले दूरदर्शन, 2025 या वर्षात आपला 66 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, भारताच्या सार्वजनिक प्रसारणाचा आधारस्तंभ म्हणून आजही ठामपणे उभे आहे. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत आणि मालगुडी डेज यांसारख्या अजरामर कार्यक्रमांनी देशाच्या सांस्कृतिक स्मृतींना आयाम मिळवून दिला आहे, तर 1984 मध्ये भारताच्या पहिल्या अंतराळवीराच्या अंतराळ प्रवासाचे प्रसारण करण्यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाने देशाची एकत्र मोट बांधली आहे. सद्यस्थितीत 35 उपग्रह वाहिन्या, 66 डिजिटायझ्ड केंद्रे आणि 45 दशलक्ष पेक्षा जास्त घरांपर्यंत सेवा देत असलेल्या व्यापक डीडी फ्री डिश सारख्या सुविधेमुळे, दूरदर्शन सर्वसमावेशक, बहुभाषिक आशय सामग्रीचे प्रसारण करणारी एक महत्त्वाची शक्ती म्हणून आपले स्थान कायम टिकवून आहे. वेव्ह्ज ओटीटी मंचाच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन, डीडी किसानमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण, Yupp TV आणि कानपूरमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत धोरणात्मक भागीदारी तसेच पीबी शब्द सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, दूरदर्शन भविष्यातील तंत्रज्ञान आणि जागतिक बाह्य संपर्कच्या व्यापकतेचा अवलंब करू लागले आहे. या सगळ्याच्या माध्यमातून दूरदर्शन देशाच्या भावी पिढ्यांसाठी शिक्षण, सांस्कृतीचे जतन संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा आपला वारसा कायम टिकवून ठेवत आले आहे.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय (PIB) :
माहिती आणि प्रसारण मंत्रालय :
दूरदर्शन :
इतर :
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
(Backgrounder ID: 155939)
Visitor Counter : 4
Provide suggestions / comments