• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Technology

राष्ट्रीय अभियंता दिन 2025

भारताला प्रगतीपथावर नेणारे अभियांत्रिकी सामर्थ्य

Posted On: 14 SEP 2025 8:18PM

नवी दिल्‍ली, 14 सप्‍टेंबर 2025

 

"आपल्या राष्ट्राला प्रतिभावान अभियंत्यांचे अद्वितीय वरदान लाभले आहे, ते राष्ट्रनिर्माण कार्यात मोलाची भर घालत आहेत." -पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

महत्त्वाची निरीक्षणे

  • जगातील एकूण चिप डिझाइन अभियंत्यांपैकी जवळजवळ 20% अभियंते भारतात आहेत.
  • स्टॅनफर्ड एआय सूची 2024 नुसार, एआय कौशल्य विस्ताराच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
  • 2031 पर्यंत 1000 भौतिक क्युबिट्सपर्यंत (physical qubits) असलेले क्वांटम संगणक विकसित करणे हे भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन चे उद्दिष्ट आहे.

 

प्रस्‍तावना

राष्ट्रीय अभियंता दिन हा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या भारताच्या महान अभियंत्याच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. अभियांत्रिकीतील त्यांच्या अग्रणी योगदानामुळे त्यांची ख्याती आहे. त्यांनी केलेली अभिनव डिझाइन्स, दूरदृष्टीचे नियोजन आणि सामाजिक परिणाम साधणाऱ्या तांत्रिक उपायांमुळे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे परिवर्तन झाले. ते एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि लेखक असले तरी, त्यांचे अभियंता म्हणून असलेले विलक्षण यश पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहिले आहे. त्यांनी समस्या सोडवणे, नावीन्य आणि राष्ट्रनिर्माण यात एक आदर्श निर्माण केला.

आज भारत 'टेकएड' म्हणजेच तंत्रज्ञानाच्या जलद नवसंशोधन आणि परिवर्तनाच्या दशकात प्रवेश करताना अभियंत्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची बनली आहे. कुशल अभियांत्रिकी पदवीधरांची वाढती संख्या हे शिक्षण, संशोधन आणि नवनिर्माण यांना प्रोत्साहन देण्याच्या शासकीय प्रयत्नांचे यश आहे. या प्रयत्नांमुळेच विकसित भारत 2047 चे स्वप्न साकारायला मदत होत आहे. तेव्हा भारत एक विकसित, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनलेला असेल.

 

विश्वेश्वरय्यांचे जीवन आणि वारसा

साध्या परिस्थितीतून आलेल्या सर एम. विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूरचे दिवाण आणि ऑल-इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद भूषवले. 1955 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दूरदृष्टीच्या कल्पना आजही आर्थिक नियोजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे जीवन आजही प्रेरणास्रोत असून, भारतीय इतिहासातील एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या रूपात त्यांचे स्थान अढळ आहे.

त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान

  • पूर व्यवस्थापन प्रणाली : 1908 मध्ये मुसी नदीला आलेल्या प्रलंयकारी पुरानंतर त्यांनी उस्मान सागर आणि हिमायत सागर सारख्या जलाशयांची योजना आखली. विशाखापट्टणम बंदराला समुद्री धूप होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करून त्यांनी शहराची टिकून राहण्याची क्षमता वाढवली.
  • धरण आणि सिंचन : म्हैसूरचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी 1932 मध्ये कृष्ण राजा सागर (KRS) धरण बांधले, त्यामुळे आशियातील सर्वात मोठा जलाशय तयार झाला आणि मंड्या इथल्या शेतीत क्रांतिकारक बदल झाले. त्यांच्या स्वयंचलित स्लुईस गेट्सने अनेक धरणांच्या पाणी नियमनात सुधारणा केली.
  • साहित्यिक वारसा : सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या लेखनाचा भारताच्या विकासावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे. ‘प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया’ या पुस्तकाने औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले, ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’ ने शिक्षण आणि प्रशासनावर भर दिला, आणि ‘मेमॉअर्स ऑफ माय वर्किंग लाईफ’ मध्ये त्यांच्या अभियांत्रिकी यशांचा इतिहास आहे. ही पुस्तके आधुनिक आर्थिक आणि अभियांत्रिकी धोरणांना मार्गदर्शक ठरली आहेत.
 

 

राष्ट्रनिर्माण कार्यात अभियंत्यांची भूमिका

अभियंते हे भारताच्या परिवर्तनाचे मुख्य चालक आहेत. अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीपासून ते ज्ञान-आधारित नावीन्यपूर्णतेला पुढे नेण्यापर्यंत, ते एका आधुनिक राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पायाभूत सुविधांचा विकास

अभियंते, आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून, महामार्ग, द्रुतगती मार्ग, मेट्रो रेल्वे नेटवर्क, पूल, बंदरे आणि ऊर्जा निर्मिती प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची रचना आणि बांधकाम करत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नमूद केले आहे की, भारतमाला परियोजना, सागरमाला, पीएम गती शक्ती आणि स्मार्ट सिटी मिशन यांसारखे प्रकल्प संपर्क आणि पुरवठाप्रक्रियेमध्ये परिवर्तन घडवत आहेत. त्यामध्ये अभियंते त्यांच्या अंमलबजावणी आणि नवोन्मेषाला चालना देत आहेत. सर एम. विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या अग्रणी व्यक्तींनी प्रेरित होऊन, आजचे अभियंते प्रगतिशील राष्ट्र निर्मितीचा वारसा पुढे नेत आहेत.

सामरिक क्षेत्रे

संरक्षण उत्पादन, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनातील भारताची प्रगती अभियांत्रिकी उत्कृष्टतेमुळेच शक्य झाली आहे. अवकाश विभागातील अभियंते प्रक्षेपण वाहनांच्या आरोग्य निरीक्षणासाठी एआय आणि रोबोटिक्स, उपग्रह डेटा विश्लेषण आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी मूलभूत काम करत आहेत, तर अणुऊर्जा विभाग (DAE) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमधील अभियंते भारताच्या सामरिक क्षमता वाढवणारे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

डिजिटल परिवर्तन

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत अभियंत्यांनी आधार, यूपीआय आणि डिजिलॉकर यांसारख्या व्यासपीठांचा विकास केला आहे. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, सायबरसुरक्षा आणि डेटा विश्लेषणाचा लाभ घेत त्यांनी भारताला डिजिटल पायाभूत सुविधा आणि डीप-टेक नवोन्मेषात जागतिक स्तरावर अग्रणी बनवले आहे.

 

अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवोन्मेषाला चालना देणारे सरकारी उपक्रम

भारत सरकार अभियांत्रिकी उत्कृष्टता, संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यात एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ही परिसंस्था प्रतिभांचे पोषण करते आणि परिवर्तनात्मक विकासाला चालना देते.

स्किल इंडिया डिजिटल हब

विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करत असताना, स्किल इंडिया डिजिटल हब हा सरकारी उपक्रम अभियंत्यांना व्यावहारिक, उद्योगासाठी सज्ज कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. त्यातून ते तांत्रिक क्षेत्रातील जलद गतीने विकसित होणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज होत आहेत.

अटल इनोव्हेशन मिशन

अटल इनोव्हेशन मिशन (AIM) अटल इनक्यूबेशन केंद्रे (AICs) यांसारख्या उपक्रमांद्वारे भारतभर नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते. त्यामुळे विद्यार्थी आणि अभियंत्यांसाठी एक मजबूत स्टार्टअप परिसंस्था तयार होते. 18 डिसेंबर 2024 पर्यंत, 72 अटल इनक्यबेशन केंद्रांमध्ये 3,556 स्टार्टअप्सना सहाय्य केले गेले आहे. त्यातून 41,965 रोजगार निर्माण झाले आहेत.

इन्स्पायर (इनोव्हेशन इन सायन्स परस्युइट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च)

इन्स्पायर योजना तरुणांना अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनासाठी प्रेरणा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभियंत्यांसाठी ही योजना स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, अवकाश तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा नवोन्मेष यासारख्या क्षेत्रात प्रगत संशोधन आणि विकास या साठी मार्ग उपलब्ध करुन देते. त्यामुळे उद्याच्या अभियंत्यांची एक मजबूत फळी निर्माण होत आहे.

स्टार्टअप इंडिया

स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश देशभरात नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअप्सच्या वाढीला चालना देणे हा आहे. अभियंत्यांसाठी हा उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यासपीठ यासारख्या क्षेत्रांत तांत्रिक कल्पनांना भरीव उपक्रमांमध्ये रूपांतरित करण्याची संधी देतो. या उपक्रमाचा प्रभाव उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) मान्यता दिलेल्या स्टार्टअप्सच्या संख्येत झालेल्या वाढीतून दिसून येतो. ही वाढ 2016 मधल्या सुमारे 500 स्टार्टअप्स वरून 15 जानेवारी 2025 पर्यंत 1,59,157 एवढी झाली आहे.

मेरीट योजना (मल्टिडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन स्कीम)

2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणा अंतर्गत, सरकारने मेरीट योजनेसाठी 4,200 कोटी रुपयांचे (2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी) वाटप केले आहे, त्यामुळे तांत्रिक शिक्षणात परिवर्तन घडेल आणि ते धोरणाच्या कौशल्य विकास आणि नवोन्मेषाच्या दृष्टीशी सुसंगत असेल. ही योजना 275 तांत्रिक संस्थांमध्ये लागू केली जाईल, त्यात 175 अभियांत्रिकी महाविद्यालये आणि 100 पॉलिटेक्निक महाविद्यालयांचा समावेश आहे. अभियंत्यांसाठी मेरीट योजना आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत अभ्यासक्रम आणि बहुशाखीय शिक्षण प्रदान करते, आणि त्यांना स्वच्छ ऊर्जा, एआय आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रांत नवोन्मेषासाठी तयार करते, त्यामुळे भारताचे तांत्रिक नेतृत्व मजबूत होते.

उत्कृष्ट अभियंते निर्माण करणाऱ्या प्रमुख संस्था

भारत सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) यांसारख्या प्रमुख संस्थांद्वारे अभियांत्रिकी परिसंस्थेला बळकटी दिली आहे, या संस्था शिक्षण आणि संशोधनासाठी मजबूत पायाभरणीचे काम करतात. याला पूरक म्हणून, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या रिसर्च प्रमोशन स्कीम (RPS) यांसारख्या उपक्रमांद्वारे अभियंत्यांना आधुनिक साधनांनी सुसज्ज केले जाते आणि संशोधन-प्रेरित वातावरणाला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे स्थापित आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात नवोन्मेषाला चालना मिळते.

डीप-टेक नवोन्मेष

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे लागू केलेले राष्ट्रीय मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर-फिजिकल सिस्टम्स (NM-ICPS) हा कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), सायबरसुरक्षा आणि फिनटेक यासारख्या डीप तंत्रज्ञानात संशोधन, विकास आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारा एक प्रमुख सरकारी उपक्रम आहे. प्रमुख संस्थांमध्ये स्थापित 25 तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांच्या माध्यमातून हा उपक्रम अभियंत्यांना प्रगत कौशल्ये प्रदान करतो, उद्योजकतेला प्रोत्साहन देतो आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करतो. या उपक्रमाने 389 तंत्रज्ञान/उत्पादनांचे व्यावसायिकीकरण, 2,700 हून अधिक प्रकाशने आणि बौद्धिक संपदा उत्पादने यांसारखे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. त्यामुळे भारताची अत्याधुनिक, स्वदेशी डीप-टेक नवोन्मेषाची परिसंस्था बळकट झाली आहे.

हरित तंत्रज्ञान नवोन्मेष

भारत नवीकरणीय ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे, त्यामुळे अभियंत्यांना नवोन्मेषासाठी संधी मिळत आहे. पीएम सूर्य घर, पीएम-कुसुम, सोलर पार्क्स आणि राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन यांसारख्या उपक्रमांतर्गत, अभियंते सौर रूफटॉप सिस्टम, मोठ्या प्रमाणावरील सौर पार्क्स, बायोएनर्जी आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांचे डिझाइन आणि अंमलबजावणी करत आहेत. भारत आता सौर क्षमतेत जागतिक स्तरावर तिसऱ्या आणि पवन क्षमतेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये नवीकरणीय ऊर्जा एकूण स्थापित ऊर्जेच्या 50% आहे. अभियंते सौर पीव्ही सेल्सच्या देशांतर्गत उत्पादनात, ऊर्जा साठवणुकीचे उपाय आणि अॅग्रीव्होल्टायिक्स, फ्लोटिंग सोलर आणि हायड्रोजन हब्समधील पायलट प्रकल्पांमध्ये योगदान देत आहेत. यातून भारताची स्वच्छ ऊर्जा परिसंस्था मजबूत होत आहे.

अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन (ANRF)

2023 सालच्या ANRF कायद्या अंतर्गत स्थापित अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन (ANRF) नैसर्गिक विज्ञान (गणितीय विज्ञानांसह), अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, कृषी आणि मानवता व सामाजिक विज्ञानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी धोरणात्मक दिशादर्शन करते. त्याचे कार्यक्रम उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह उपक्रम-प्रेरित संशोधनाला प्रोत्साहन देतात. मिशन फॉर अॅडव्हान्समेंट इन हाय-इम्पॅक्ट एरियास (MAHA)-EV अंतर्गत, उद्योग/सार्वजनिक क्षेत्र/स्टार्टअपचा सहभाग 10% खर्च वाटपासह अनिवार्य आहे. संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना 1 लाख कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह, दीर्घकालीन कमी व्याजदराने वित्तपुरवठा प्रदान करते, तर अॅडव्हान्स्ड रिसर्च ग्रँट (ARG) कार्यक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात कृत्रीम बुद्धीमत्ता साधन विकासाला सहाय्य करतो.

 

भारताचे अभियांत्रिकी नेतृत्व आणि जागतिक प्रभाव

भारताच्या अभियांत्रिकी प्रगतीने कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर डिझाइन आणि क्वांटम संगणन यासारख्या क्षेत्रांत तांत्रिक नेतृत्वाला चालना देत, जागतिक मान्यता मिळवली आहे. जागतिक नवोन्मेष सूचीमध्ये भारताचे सातत्याने उंचावणारे स्थान त्याच्या गतिशील आणि प्रगतिशील अभियांत्रिकी परिसंस्थेचे द्योतक आहे.

 

निष्कर्ष

भारत 2025 मध्ये राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करत असताना, अभियंते केवळ राष्ट्राच्या तांत्रिक प्रगतीचे प्रवर्तक नसून त्याच्या भविष्याचे शिल्पकारही आहेत, हे स्पष्ट आहे. पायाभूत सुविधांच्या प्रगतीपासून डीप-टेकपर्यंत, त्यांचे योगदान भारताच्या तंत्रज्ञान-दशकाला आकार देत आहे. सातत्यपूर्ण सरकारी उपक्रम आणि संशोधन आणि नवोन्मेषाच्या चैतन्यपूर्ण परिसंस्थेचे पाठबळ लाभलेले भारताचे अभियंते विकसित भारत 2047 च्या दिशेने होत असलेल्या प्रगतीला हातभार लावत आहेत. ही प्रगची सर्वसमावेशक, शाश्वत आणि परिवर्तन घडवणारी आहे.

 

संदर्भ

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पत्र सूचना कार्यालय

भारतीय संस्कृती

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तांत्रिक वस्तुसंग्रहालय

एआयसीटीई (AICTE)

Click here to see pdf

 

* * *

नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Backgrounder ID: 155938) Visitor Counter : 3
Provide suggestions / comments
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate