• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

ज्ञान भारतम मिशन

Posted On: 10 SEP 2025 5:27PM

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2025

 

ठळक मुद्दे

  • ज्ञान भारतम मिशन हा भारताच्या विशाल हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी एक राष्ट्रीय उपक्रम आहे, जो भविष्यातील पिढ्यांसाठी तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा मेळ घालतो. या मिशनसाठी 482.85 कोटी रुपयांची (2024-31) तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 44.07 लाखांहून अधिक हस्तलिखितांचे याआधीच कृती संपदा डिजिटल रिपॉझिटरीमध्ये दस्तावेजीकरण झाले आहे.
  • ज्ञान भारतम परिषद हे पहिले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, ज्याने देशभरातील भागधारकांना भारताच्या हस्तलिखित वारशाचे जतन आणि डिजिटायझेशन करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी तसेच पुढील मार्ग आखण्यासाठी आमंत्रित केले आहे.
  • ज्ञान भारतम परिषदेत 1,400 हून अधिक युवा सहभागी आणि 500 प्रतिनिधी सहभागी होत आहेत, जे भविष्यासाठी मजबूत संरक्षकत्व दर्शवते.
  • भारताच्या हस्तलिखित वारशाला जागतिक स्तरावर प्रवेशयोग्य बनवण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष याच्या केंद्रस्थानी आहेत.


प्रस्तावना

शतकानुशतके भारताच्या संस्कृतीच्या समृद्ध कल्पना आणि सर्जनशीलता नवनवीन रूपांमध्ये सातत्याने आकार घेत राहिल्या- आजच्या डिजिटल युगात त्या नवीन अभिव्यक्ती शोधत आहेत. विचारवंतांच्या पिढ्यांना घडवणाऱ्या गुरुकुलांपासून ते जगभरातील विद्वानांना आकर्षित करणाऱ्या नालंदा आणि तक्षशिला या महान विद्यापीठांपर्यंत, शिक्षण हा नेहमीच आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू राहिला आहे. ही विशाल परंपरा हस्तलिखिते, स्मारके आणि सांस्कृतिक पद्धतींमध्ये काळजीपूर्वक जतन केली गेली आहे जी एकत्रितपणे आपली ओळख दर्शविणारा पाया बनवतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डिजिटल इंडियाच्या परिवर्तनकारी मोहिमेने प्रशासन, संधी आणि संस्कृतीशी नागरिक कसे जोडले जातात, हे पुनर्परिभाषित केले आहे. भारतनेटद्वारे गावांना हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा दिली जाते, अधिकृत कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केली जातात, उमंग ॲपद्वारे नागरिक शेकडो सेवांचा लाभ घेतात, कुटुंबांना ई-हॉस्पिटलद्वारे अधिक सहजपणे आरोग्यसेवा मिळते आणि क्रांतिकारी यूपीआयद्वारे आर्थिक समावेशन अधिक सखोल झाले आहे. आता डिजिटल साधने आपल्या वारशाचे रक्षण करत आहेत - भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य खजिना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अभिलेखागार, संग्रहालये आणि भांडारांना समर्थन देत आहेत.

याच भावनेतून सांस्कृतिक मंत्रालयाने 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे "हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताचा ज्ञानाचा वारसा पुनर्प्राप्त करणे" या विषयावर पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत देश आणि परदेशातील विद्वान, तज्ञ, संस्था आणि सांस्कृतिक अभ्यासकांसह 1,100 हून अधिक सहभागी एकत्र येतील. हे भारताच्या हस्तलिखितांचे जतन, डिजिटायझेशन आणि सामायिकीकरण यावर चर्चा, विचारविनिमय आणि भविष्यातील मार्ग तयार करण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ तयार करेल.

ज्ञान भारतम मिशन ही भारताच्या विशाल हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी समर्पित अशी एक दूरदर्शी राष्ट्रीय चळवळ म्हणून सुरू केली जात आहे. ही मोहीम म्हणजे आपल्या संस्कृतीच्या मुळांना वाहिलेली आदरांजली आहे तसेच 2047 पर्यंत पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाकडे टाकलेले एक भविष्यकालीन पाऊल आहे, जिथे भारत खरा विश्वगुरू म्हणून उदयास येईल, जो त्याच्या भूतकाळातील ज्ञान आणि भविष्यातील नवोपक्रमांना एकत्र करेल.

 

ज्ञान भारतम परिषद

परिषदेचा आढावा

11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणारा तीन दिवसांचा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय मेळावा हे ज्ञान भारतम परिषद, ज्ञान भारतम मिशनच्या औपचारिक शुभारंभाचे प्रतीक आहे. त्याची वेळ अत्यंत प्रतीकात्मक आहे - असा एक क्षण ज्याने भारताच्या ज्ञान आणि अध्यात्माचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवला, त्या 1893 मधील शिकागो येथे स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाच्या वर्धापनदिनाशी ही वेळ जुळणारी आहे. त्याच भावनेने या परिषदेचे उद्दिष्ट ज्ञानाची संस्कृती म्हणून भारताची भूमिका पुन्हा एकदा सिद्ध करण्याची आहे, जी आता तंत्रज्ञानाने सशक्त आहे आणि जगासोबत आपला वारसा सामायिक करण्यास तयार आहे.

या परिषदेत प्रख्यात मान्यवर, जागतिक विद्वान आणि सांस्कृतिक संरक्षक एकत्र येत आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विरासत और विकास" या भावनेतून वारसा आणि नवोपक्रमाचे मिश्रण करण्याच्या दृष्टिकोनाला प्रतिबिंबित करतात. संकरित पद्धतीने आयोजित केलेल्या या परिषदेत उद्घाटन आणि समारोप सत्राशिवाय 4 पूर्ण सत्रे आणि 12 तांत्रिक सत्रे होणार आहेत, ज्यामध्ये सुमारे 500 प्रतिनिधी आणि 75 आमंत्रित तज्ञ सहभागी आहेत.

यात हस्तलिखितांचे संवर्धन आणि पुनर्संचयन करणे, सर्वेक्षण आणि दस्तावेजीकरण मानके, डिजिटायझेशन साधने आणि मंच, हस्तलिखित मजकूराची ओळख आणि लिपीचा उलगडा यासारख्या एआय-चालित नवकल्पना, भाषांतर आणि प्रकाशन चौकट, शिक्षण आणि संस्कृतीशी एकात्मता, हस्तलिखितशास्त्रातील क्षमता निर्माण तसेच कॉपीराइट आणि कायदेशीर समस्या - यासारख्या विस्तृत विषयांवर चर्चा केंद्रित आहेत.

 

सत्रे आणि सहभाग

शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमधील 1,100 हून अधिक सहभागी या तीन दिवसांच्या परिषदेत सहभागी होत आहेत, जे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत सामूहिक वचनबद्धता दर्शवतात. सहभागींमध्ये 95 हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील 22 प्रशासक, 179 व्यावसायिक, 112 संशोधन विद्वान, 230 विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील 400 हून अधिक प्रतिनिधींचा समावेश आहे. या परिषदेत 17 राष्ट्रीय वक्ते आणि 17 आंतरराष्ट्रीय वक्ते देखील सहभागी आहेत, जे भारत आणि परदेशातील विविध दृष्टिकोनांना एकत्र आणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे की राष्ट्राचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. डिजिटायझेशन, एआय टूल्स आणि आधुनिक मंचांमुळे प्राचीन ग्रंथांमध्ये प्रवेश आणि त्यांचा अर्थ लावण्याचे नवनवीन मार्ग उघडले जात आहेत, हे मिशन तरुणांना त्यांच्या स्वतःच्या प्रवासाचा एक भाग म्हणून वारसा पाहण्यास प्रेरित करत आहे - असे काहीतरी जे भविष्यात संरक्षण, अभ्यास आणि अभिमानाने घेऊन जाता येईल.

 

पूर्व-परिषद कार्यगट

ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तयारीसाठी आठ विशेष कार्यगटांची एक मालिका तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध विद्वान, संशोधक आणि सांस्कृतिक मान्यवरांना एकत्र आणले आहे. हे गट मिशनचा व्यापक दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात, तसेच हस्तलिखित जतन करण्याच्या तसेच ज्ञान एकात्मतेच्या प्रत्येक पैलूला संबोधित करतात.

एकत्रितपणे, हे कार्य गट पुरातत्व आणि संवर्धन विज्ञान, कायदा, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक राजनैतिक कूटनीति यासारख्या विविध कौशल्यांचा समावेश करतात. त्यांच्यातील विचारविनिमय मिशनच्या पथदर्थकाला आकार देत आहेत, ज्ञान भारतम परिषद केवळ वारशाचा उत्सवच नाही तर व्यावहारिक धोरणे आणि भविष्यासाठी सज्ज उपायांसाठीचे एक व्यासपीठ देखील आहे, याची खात्री करत आहेत.

 

ज्ञान-सेतू: राष्ट्रीय एआय नवोन्मेष आव्हान

हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताचा ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे” या आंतरराष्ट्रीय परिषदेचा भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाने ज्ञान भारतम मिशन अंतर्गत ज्ञान-सेतू हे एक राष्ट्रीय एआय नवोन्मेष आव्हान सुरू केले आहे. हा उपक्रम युवकांना आणि नवोन्मेषकांना वारशाचे रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो. तत्वज्ञान आणि औषधांपासून ते प्रशासन आणि कला या विषयांवर 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांसह हा वारसा जगासाठी अधिक सुलभ आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी एआयचा वापर करणे हा या आव्हानाचा उद्देश आहे.

विद्यार्थी, संशोधक, संस्था आणि स्टार्ट-अप्ससाठी खुल्या सहभागाची सुविधा उपलब्ध करून ज्ञान-सेतू वारसा जतनाला सामूहिक राष्ट्रीय प्रयत्न म्हणून स्थान देत आहे. ते हस्तलिखितांचे नाजूक कलाकृतींमधून शिक्षण आणि नवोन्मेषाच्या जिवंत स्रोतांमध्ये रूपांतर होईल, तसेच भारतीय ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांपर्यंत नवीन सामर्थ्याने पोहोचेल.

 

अपेक्षित परिणाम

या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे ज्ञान भारतम मिशन म्हणजे भारताच्या हस्तलिखित वारशाचे पुनर्प्राप्ती, जतन आणि जागतिकीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वळण ठरेल अशी कल्पना आहे. जागतिक स्तरावर बौद्धिक नेता बनण्याचा भारताचा दृष्टिकोन लक्षात घेऊन, ते विद्वत्तापूर्ण नवोन्मेषांना प्रेरणा देण्यास, संस्कृतीचा अभिमान बळकट करण्यास, तांत्रिक सक्षमीकरणाचा वापर करण्यास आणि सांस्कृतिक कूटनीतिचा विस्तार करण्यास उद्युक्त करते.

प्रमुख परिणाम:

ज्ञान भारतम मिशनचे दृष्टिकोन आणि उद्दिष्टे

भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा त्याच्या विशाल हस्तलिखित संपत्तीतून प्रतिबिंबित होतो, ज्यात सुमारे पाच दशलक्षाहून अधिक ग्रंथ आहेत. ज्ञानाची एक उल्लेखनीय श्रेणी असणाऱ्या या ग्रंथांनी तत्वज्ञान, विज्ञान, वैद्यक, गणित, खगोलशास्त्र, साहित्य, कला, वास्तुकला आणि अध्यात्म यासारखे विषय व्यापले आहेत. अनेक लिपी आणि भाषांमध्ये लिहिलेले हे ग्रंथ मंदिरे, मठ, जैन भंडारे, अभिलेखागार, ग्रंथालये आणि खाजगी संग्रहांमध्ये संरक्षित आहेत. एकत्रितपणे, ते भारतीय ज्ञान परंपरा (भारतीय ज्ञान प्रणाली) चा एक अतुलनीय अभिलेख तयार करतात आणि भारताच्या सभ्यतेच्या विचारसरणीचे सातत्य दर्शवितात.

चालू आर्थिक वर्षात (2025-26) मिशनसाठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, याला 2024-31 या कालावधीसाठी केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून मान्यता देण्यात आली आहे ज्याचा एकूण खर्च 482.85 कोटी रुपये आहे.

कालक्रमानुसार ठळक मुद्दे

ज्ञान भारतम अभियानाची उद्दिष्टे

ज्ञान भारतम अभियान हे संरक्षण, डिजिटायझेशन, शिष्यवृत्ती आणि जागतिक सुलभता या सर्वांचा समावेश करून भारताच्या हस्तलिखित वारशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक व्यापक चौकट म्हणून आरेखित केले आहे. त्याची उद्दिष्टे भौतिक संग्रहांचे संरक्षण करण्यापलीकडे जातात, तसेच शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक अभिमानासाठी एक जिवंत संसाधन म्हणून हस्तलिखिते पुन्हा स्थापित करण्याचे यांचे उद्दिष्ट आहे.

ओळख आणि दस्तावेजीकरण: संस्था आणि खाजगी संग्रहांमध्ये विखुरलेल्या प्राचीन हस्तलिखितांची पद्धतशीरपणे ओळख, दस्तावेजीकरण आणि सूचीकरण करण्यासाठी हस्तलिखित संसाधन केंद्रांचे (एम आर सी) एक देशव्यापी जाळे स्थापित केले जाईल, ज्यामुळे एक प्रामाणिक आणि विश्वासार्ह राष्ट्रीय नोंदणी तयार होईल.

संवर्धन आणि जीर्णोद्धार: बळकट हस्तलिखित संवर्धन केंद्रांद्वारे (एमसीसी) प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक संवर्धन पद्धतींचा वापर करून हस्तलिखितांचे संरक्षण केले जाईल, जेणेकरून नाजूक आणि धोक्यात असलेला मजकूर पारंपरिक पद्धतींचा आदर राखत वैज्ञानिक अचूकतेने जतन करता येईल.

डिजिटायझेशन आणि रिपॉझिटरी निर्मिती: मिशन एआय-सहाय्यित हस्तलिखित मजकूर ओळख (एचटीआर), मायक्रोफिल्मिंग आणि क्लाउड-आधारित मेटाडेटा प्रणाली वापरून हस्तलिखितांचे मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन करण्याची कल्पना राबवली जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर प्रवेशयोग्य होण्यासाठी आरेखित केलेली राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरी तयार करण्यास मदत होईल.

संशोधन, भाषांतर आणि प्रकाशन: दुर्मिळ आणि अप्रकाशित हस्तलिखितांचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक आवृत्त्या, प्रतिकृती आणि भाषांतरांद्वारे केले जाईल, त्यामुळे भारताचा बौद्धिक वारसा जागतिक शिष्यवृत्तीमध्ये एकत्रित करण्यासाठी त्यांना अनेक भाषांमध्ये प्रवेशयोग्य बनवले जाईल.

क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण: लिप्यंतरण, पुरालेखन, संवर्धन आणि हस्तलिखित अभ्यासांमध्ये संरचित प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील जेणेकरून तज्ञांची एक नवीन पिढी तयार होईल. यामुळे संस्थात्मक क्षमता बळकट होतील आणि या क्षेत्रासाठी समर्पित विद्वान, संरक्षक आणि लिप्यंतरकर्त्यांचे संगोपन होईल.

तंत्रज्ञान विकास: मिशन हस्तलिखितांसाठी डिजिटल साधने तयार करण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये मोबाइल अनुप्रयोग, सुरक्षित क्लाउड स्टोरेज सोल्यूशन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा इंटरऑपरेबिलिटी फ्रेमवर्कवर आधारित प्लॅटफॉर्म समाविष्ट असतील, ज्यामुळे कार्यक्षमरीत्या जतन आणि व्यापक पोहोच शक्य होईल.

सहभाग आणि प्रोत्साहन: सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी, हस्तलिखित संरक्षक आणि संग्राहकांना आपापले संग्रह सत्यता प्रमाणपत्र आणि महसूल वाटणीद्वारे सामायिक करण्यास प्रोत्साहित केले जाईल. हस्तलिखित संशोधन भागीदार कार्यक्रम प्रदर्शने, डिजिटल सामग्री, संग्रहालये आणि नवोन्मेष प्रयोगशाळांद्वारे तरुण विद्वानांना सहभागी करून घेता येईल.

जागतिक सहकार्य आणि शिक्षण: हस्तलिखित पुनर्प्राप्ती, डिजिटायझेशन आणि मानकीकरणासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवली जाईल, ज्यामुळे जागतिक ज्ञान देवाणघेवाणीत भारताचे नेतृत्व सुनिश्चित होईल. अभ्यासक्रम, उच्च शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये हस्तलिखित ज्ञान अंतर्भूत केले जाईल, जेणेकरून प्राचीन अंतर्दृष्टी आधुनिक शिक्षणाला प्रेरणा आणि माहिती देत राहतील.

एकत्रितपणे, ही उद्दिष्टे ज्ञान भारतम मिशनला केवळ जतन करण्याच्या प्रयत्नांपेक्षा जास्त स्थान देतात - डिजिटल युगात वारसा कसा वाढू शकतो याचा हा एक आराखडा आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाशी आणि "विरासत और विकास" - वारशात दृढपणे रुजलेली प्रगती - या राष्ट्रीय संकल्पाशी सुसंगत आहे जेणेकरून भारत 2047 मध्ये विकसित भारताकडे वाटचाल करत असताना, त्याचे सभ्यता ज्ञान जतन केले जाईल, साजरे केले जाईल आणि जगासोबत सामायिक केले जाईल.

 

मिशनची पायाभूत माहिती

हस्तलिखितांसाठी राष्ट्रीय मिशन

हस्तलिखित म्हणजे ताडपत्री, बर्च झाडाची साल, कापड, कागद किंवा अगदी धातूसारख्या साहित्यावर लिहिलेली हस्तलिखित रचना, जी किमान पंचाहत्तर वर्षे जुनी आहे आणि तिला महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, वैज्ञानिक किंवा सौंदर्यात्मक मूल्य आहे. छापील पुस्तके किंवा प्रशासकीय नोंदींपेक्षा, हस्तलिखितांमध्ये ज्ञानाचा समावेश असतो, ज्यामध्ये तत्वज्ञान, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, साहित्य आणि कला यासारख्या विविध विषयांचा समावेश असतो. ते शेकडो भाषांमध्ये आणि लिप्यांमध्ये आढळतात, कधीकधी एकाच भाषेचे प्रतिनिधित्व अनेक लिप्यांमध्ये केले जाते - उदाहरणार्थ, देवनागरी, उडिया आणि ग्रंथांमध्ये संस्कृत भाषा.

या अफाट संपत्तीचे जतन करण्यासाठी 2003 मध्ये राष्ट्रीय हस्तलिखित मिशनची (एन एम एम) स्थापना एक भांडार म्हणून करण्यात आली. आणि ते भारताच्या बौद्धिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्रस्थानी राहिले आहे. मिशनने:

आपल्या महत्त्वाकांक्षी डिजिटल भांडार, कृती संपदा द्वारे 44.07 लाखांहून अधिक हस्तलिखितांचे दस्तावेजीकरण केले आहे.

अचूक आणि एकसमान दस्तावेजीकरण सुनिश्चित करण्यासाठी जागतिक मेटाडेटा मानकांवर आधारित मानुस ग्रंथावली हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

सरस्वती महल ग्रंथालय (तंजावूर), रामपूर रझा ग्रंथालय (रामपूर) आणि खुदा बख्श ग्रंथालय (पटना) सारख्या प्रमुख संग्रहांसोबत भागीदारी केली आहे, तसेच देशभरातील हजारो अल्पज्ञात संग्रहांना प्रकाशात आणले आहे.

कॅट-कॅट (कॅटलॉगचा डेटाबेस) उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचे 2,500 हून अधिक छापील कॅटलॉग संकलित केले आहेत, जेणेकरून कॅटलॉग केलेले काम देखील राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये एकत्रित केले जाईल याची खात्री होईल.

हा वारसा आता एक मजबूत पाया प्रदान करतो ज्यावर ज्ञान भारतम मिशन भविष्यासाठी एक विस्तृत आणि तंत्रज्ञान-चालित चौकट तयार करत आहे.

 

एन ई पी 2020 अंतर्गत शिक्षण आणि भारतीय ज्ञान प्रणाली

ज्ञान भारतम मिशन ज्या पायावर उभे आहे तोच पाया राष्ट्रीय शिक्षण धोरण , २०२० मजबूत करते. किमान इयत्ता 5 वी पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून अध्ययनाला प्रोत्साहन देऊन नवीन धोरण हे सुनिश्चित करते की मुले भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेली राहून अधिक प्रभावीपणे शिकतील.

या धोरणात भारतीय भाषा, कला आणि वारसा यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे, जे हरवले आहे ते जतन करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांसाठी परंपरा पुनरुज्जीवित करण्याची गरज ओळखून. हे दृष्टिकोन भारताच्या सभ्यतेच्या ज्ञानाच्या जिवंत नोंदी म्हणून हस्तलिखितांचे संरक्षण करण्याच्या मिशनच्या कार्याशी थेट जुळणारे आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय शिक्षण धोरण अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) समाविष्ट करते, ज्यामुळे विज्ञान, तत्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि साहित्यातील प्राचीन योगदान आधुनिक शिक्षणाचा भाग बनते. तरुणांना नवोपक्रम स्वीकारताना वारशाचे संरक्षक बनण्यास सक्षम करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी हा प्रयत्न जुळतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि ज्ञान भारतम मिशन एकत्रितपणे भूतकाळातील ज्ञान भविष्याची ताकद बनेल याची खात्री करेल.

 

आजच्या संदर्भात प्रासंगिकता

ज्ञान भारतम मिशन हे दाखवते की भारत डिजिटल इंडियाच्या परिवर्तनकारी शक्तीचा वारशाच्या क्षेत्रात कसा विस्तार करत आहे. ज्याप्रमाणे‌ यूपीआयने पेमेंटमध्ये क्रांती घडवली आणि दीक्षाने शिक्षणाची पुनर्कल्पना केली, त्याचप्रमाणे जीबीएमने पाच दशलक्षाहून अधिक हस्तलिखिते जतन आणि सामायिक करण्यासाठी AI-चालित कॅटलॉगिंग, डिजिटल रिपॉझिटरीज, स्क्रिप्ट डिसिफरमेंट आणि बहुभाषिक प्लॅटफॉर्म वापरत आहे. हे केवळ संवर्धनाबद्दल नाही तर जगभरातील वर्गखोल्या, संशोधन केंद्रे आणि डिजिटल ग्रंथालयांमध्ये भारताचे कालातीत ज्ञान उपलब्ध करून देण्याबद्दल आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी 1,400 हून अधिक विद्यार्थी आणि विद्वानांनी नोंदणी केली आहे आणि ज्ञान-सेतू एआय नवोन्मेष आव्हान यासारख्या उपक्रमांद्वारे स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषकांना पुढील पिढीची साधने आरेखित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या प्रयत्नांमुळे तरुण भारतीयांना वारसा हा दूरच्या कलाकृती म्हणून नव्हे तर तंत्रज्ञानाद्वारे पुनर्कल्पित करण्यासाठी जिवंत ज्ञान म्हणून पाहण्यास प्रेरित केले जात आहे.

हे अभियान नागरी वारसा, डिजिटल सक्षमीकरण आणि युवा नवोन्मेष एकत्र आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक स्तरावर आदरणीय विकसित भारत घडवण्याचे मोठे ध्येय प्रतिबिंबित करते. ज्ञान भारतम अभियान हे सुनिश्चित करते की भारत विकासपथावर पुढे जात असताना त्याचा वारसा जपला जात आहे,‌ युवावर्गाला गुंतवून ठेवले जात आहे आणि त्याचे ज्ञान जगासोबत अभिमानाने सामायिक केले जात आहे.

 

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

(Explainer ID: 155918) आगंतुक पटल : 35
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate