Social Welfare
यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती (नमस्ते)
सुरक्षा आणि सन्मानासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण
Posted On:
10 SEP 2025 2:22PM
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025
महत्वाचे मुद्दे
- 20 सप्टेंबर 2025 पर्यंत, 'नमस्ते' योजनेअंतर्गत देशभरात 88,448 गटार आणि सेप्टिक टँक कामगारांची (SSWs) नोंदणी प्रमाणित करण्यात आली आहे.
- राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वच्छता कामगारांना 83,901 वैयक्तिक संरक्षक उपकरण (PPE) किट आणि आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्सना 555 सुरक्षा उपकरण किट वितरित करण्यात आले आहेत.
- 65,805 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत - PMJAY आणि राज्याच्या आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
- जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ यांनी मिळून कचरा वेचक गणना ॲप सुरू केले. याचा उद्देश 2.5 लाख कचरा वेचणाऱ्यांची माहिती गोळा करणे हा आहे.
- 20 सप्टेंबर 2025 पर्यंत, देशभरात 42,127 कचरा वेचणाऱ्यांची eKYC द्वारे नोंदणी प्रमाणित करण्यात आली आहे आणि या प्रमाणित कचरा वेचकांसाठी 3000 हून अधिक PPE किट पाठवण्यात आले आहेत.
प्रस्तावना

यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती (NAMASTE) योजना जुलै 2023 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (MoSJE) आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) यांनी सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश हाताने केली जाणारी धोकादायक साफसफाई थांबवून, प्रशिक्षित आणि प्रमाणित कामगारांमार्फत सुरक्षित व यांत्रिकीकृत पद्धतींना प्रोत्साहन देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करणे हा आहे. या योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये पु़ढीलप्रमाणे आहेत: स्वच्छतेच्या कामात शून्य मृत्यूदर गाठणे, मानवी विष्ठेशी थेट संपर्क पूर्णपणे टाळणे, सर्व स्वच्छता कामे कुशल कामगारांकडून सुरक्षा उपकरणांसह केली जातील याची खातरजमा करणे, आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्सचे (ERSUs) सबलीकरण, बचत गटांच्या माध्यमातून तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन कामगारांना सक्षम करणे.
|
ही योजना देशातील 4800 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2025-26 पर्यंतच्या तीन वर्षांच्या कालावधीत राबवली जाणार असून, यासाठी 349.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
|
'नमस्ते' (NAMASTE) योजनेचे प्रमुख घटक

- गटार/सेप्टिक टँक कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करणे: 'नमस्ते' योजनेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गटार/सेप्टिक टँक कर्मचाऱ्यांचा तपशील गोळा करून त्यांचा सर्वसमावेशक माहितीसंच तयार केला जातो. एस.एस.डब्ल्यू. बद्दल आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी समर्पित 'माहिती संकलन शिबिरांद्वारे' सविस्तर माहिती जमा केली जाते.
- व्यावसायिक सुरक्षा प्रशिक्षण आणि पीपीई किटचे वितरण: गटार/सेप्टिक टँक कर्मचाऱ्यांच्या (SSWs) कामाच्या सुरक्षिततेसाठी त्यांना व्यावसायिक सुरक्षा प्रशिक्षण दिले जाते आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणांचे (PPE) किट पुरवले जातात.
- आणीबाणी प्रतिसाद स्वच्छता युनिट्सना (ERSUs) सुरक्षा साधनांसाठी मदत: धोकादायक साफसफाईच्या कामात गुंतलेल्या आणीबाणी प्रतिसाद स्वच्छता युनिट्सना (ERSUs) त्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने पुरवली जात आहेत.
- आयुष्मान भारत-पीएमजेएवाय (AB-PMJAY) अंतर्गत आरोग्य विमा कवच: लक्षित गटार/सेप्टिक टँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य सुरक्षा कवच देण्यासाठी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी केली जात आहे. हाताने मैला साफ करणाऱ्या आणि नव्याने लक्षित उर्वरित एस.एस.डब्ल्यू.ना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून 'नमस्ते' योजनेअंतर्गत अर्थसहाय्य घेऊन आयुष्मान भारत-पीएमजेएवाय अंतर्गत आरोग्य विमा दिला जाईल.
- उपजीविका समर्थन आणि उद्योजकता विकास: या कृती आराखड्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळामार्फत निधी आणि भांडवली अनुदान पुरवून यांत्रिकीकरण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये स्वच्छता उद्यमी योजनेअंतर्गत एस.एस.डब्ल्यू., हाताने मैला साफ करणारे आणि त्यांच्या अवलंबितांना स्वच्छता-संबंधित उपकरणे आणि वाहने घेण्यासाठी मदत केली जाते, ज्यामुळे त्यांचे 'स्वच्छता उद्योजकां'मध्ये रूपांतरण होण्यास प्रोत्साहन मिळते. याव्यतिरिक्त, लक्षित हाताने मैला साफ करणाऱ्यांना आणि त्यांच्या अवलंबितांना स्वयंरोजगार प्रकल्पांसाठी भांडवली अनुदान आणि कौशल्य विकास प्रशिक्षण (दरमहा 3000 रुपयांच्या विद्यावेतनासह दोन वर्षांपर्यंत) दिले जाईल.
- सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या कार्यक्रमांचे अभिसरण: 'नमस्ते' योजनेचा उद्देश एस.एस.डब्ल्यू.च्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्यात समन्वय वाढवणे आहे. या कृती आराखड्यामध्ये हाताने मैला साफ करणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना सर्वसमावेशक व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक आधार मिळण्यासाठी स्वयंरोजगार योजना (SRMS), स्वच्छ भारत अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांसारख्या विद्यमान कार्यक्रमांमधील आर्थिक साधनसंपत्ती एकत्र केली जाते.
- माहिती, शिक्षण आणि संवाद मोहीम: शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळाकडून इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमे, महत्त्वाच्या ठिकाणी फलक आणि सोशल मीडियाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जागरूकता मोहिम राबवली जात आहे. या मोहिमा स्थानिक भाषा, इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहेत, त्यामुळे 'नमस्ते' योजनेच्या तपशिलांबद्दल एस.एस.डब्ल्यू.ना जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल.
- व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि समर्पित संकेतस्थळ: कार्यक्रमांच्या उपक्रमांचे प्रभावीपणे निरीक्षण आणि डेटा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी एक मजबूत व्यवस्थापन माहिती प्रणाली प्रयुक्त केली जात आहे, त्या प्रणालीशी 'नमस्ते'चे समर्पित संकेतस्थळ जोडलेले असेल.
'नमस्ते' योजनेची प्रासंगिकता
'नमस्ते' योजना हा भारतातील गटार आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. नियोजित हस्तक्षेपांद्वारे त्यांच्या व्यावसायिक सुरक्षितता, आरोग्य आणि प्रतिष्ठेमध्ये बदल घडवून आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 'नमस्ते' योजनेची गरज आणि परिवर्तनकारी परिणाम खालील गोष्टींद्वारे अधिक स्पष्ट होतात:

- जीवघेण्या व्यावसायिक धोक्यांचे निराकरण: गटार आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचारी गटारे आणि सेप्टिक टँकची हाताने साफसफाई करताना विषारी वायू आणि शारीरिक धोक्यांसह धोकादायक कचरा आणि अत्यंत व्यावसायिक धोक्यांना सामोरे जातात, त्यामुळे अनेकदा गंभीर आरोग्याच्या समस्या किंवा जीवितहानी होते. 'नमस्ते' योजना यांत्रिकीकरणाच्या आधारे या हे धोके टाळते, त्यामुळे विष्ठेशी थेट संपर्क टाळला जातो आणि आजारी पडण्याचे प्रमाण आणि मृत्युदर लक्षणीयरीत्या कमी होतो. वैयक्तिक संरक्षक उपकरणे (PPE) आणि आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्स मार्फत सुरक्षा साधने पुरवून, ही योजना कामाच्या सुरक्षिततेची हमी देते आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे त्यांच्या व्यवसायाच्या अंतर्निहित धोक्यांपासून संरक्षण करते.
- प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षेला प्रोत्साहन: गटार आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचारी बहुतेकदा अनौपचारिक आणि अनियमित परिस्थितीत काम करतात, त्यांना सामाजिक कलंकाचा सामना करावा लागतो आणि आरोग्य विमा किंवा आर्थिक स्थैर्य यांसारख्या मूलभूत संरक्षणाची कमतरता असते. 'नमस्ते' योजनेत माहिती गोळा करून, आयुष्मान भारत-पीएमजेएवाय अंतर्गत आरोग्य विमा प्रदान करून आणि स्वच्छता उद्यमी योजनेसारख्या (SUY) उपक्रमांद्वारे कौशल्य विकास व उपजीविकेसाठी पाठबळ देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांना औपचारिक प्रणालींमध्ये समाविष्ट करून परिवर्तनकारी बदल घडवले जातात. ही पावले स्वच्छता कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक मान्यता आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देतात, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढते आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते.
- यांत्रिकीकरण आणि अभिसरणाद्वारे प्रणालीगत बदल घडवणे: गटारे आणि सेप्टिक टँकची हाताने साफसफाई करण्यावर अवलंबून असणे आणि असुरक्षित पद्धती वापरल्या जाणे, हे स्वच्छता कामांमध्ये प्रणालीगत सुधारणा करण्याची तातडीची गरज दर्शवते. 'नमस्ते' योजना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देऊन, आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्सना आधुनिक स्वच्छता उपकरणांनी सुसज्ज करून आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्यात अभिसरण वाढवून परिवर्तनकारी बदल घडवते. हा सहयोगी दृष्टिकोन स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांसारख्या कार्यक्रमांमधील साधनसामग्रीचा वापर करतो, त्यामुळे कामगारांचे संरक्षण करणाऱ्या आणि देशभरात कचरा व्यवस्थापन प्रणालीची कार्यक्षमता वाढवणाऱ्या शाश्वत, तंत्रज्ञान-आधारित स्वच्छता पद्धतींचा वापर सुनिश्चित होतो.

साध्य केलेले महत्त्वाचे टप्पे
'नमस्ते' योजना गटार आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक धोक्यांवर आणि सामाजिक-आर्थिक समस्यांवर लक्ष्यित हस्तक्षेपांद्वारे उपाय करून त्यांच्या सुरक्षिततेत आणि उपजीविकेमध्ये क्रांती घडवून आणत आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत 88,448 कर्मचाऱ्यांची नोंदणी वैध झाली असून, या योजनेने त्यांची भूमिका औपचारिक करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.

प्रमुख यश
- सुधारित सुरक्षा उपाय: सफाई कामगारांचे जीवघेणे धोके कमी करण्यासाठी, 83,901 वैयक्तिक संरक्षक उपकरण (PPE) किट्स आणि 555 सुरक्षा उपकरण किट्स राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्सना वितरित करण्यात आले आहेत. यामुळे सुरक्षित कामाची परिस्थिती निर्माण झाली असून धोकादायक कचऱ्याशी थेट संपर्क कमी झाला आहे.
- आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा: या योजनेअंतर्गत 65,805 सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य आरोग्य योजनांतर्गत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे त्यांना आरोग्य सुविधा मिळण्याची खात्री झाली असून त्यांचे जीवनमान सुधारले आहे.
- उपजीविकेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण: 769 सफाई कामगार आणि त्यांच्या अवलंबितांना स्वच्छतेसंबंधित प्रकल्पांसाठी 23.06 कोटी रुपयांचे भांडवली अनुदान देण्यात आले आहे, यामुळे उद्योजकता आणि आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळाली आहे. याशिवाय, यांत्रिकीकरण आणि सुरक्षित पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी धोकादायक साफसफाईच्या प्रतिबंधावर 1,112 कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

अलीकडील घडामोडी
'नमस्ते' योजनेत कचरा वेचकांचा समावेश
कचरा वेचक भारताच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते पुनर्वापरात मोठे योगदान देतात आणि कचराभूमीवरील भार कमी करतात. मात्र, त्यांना औपचारिक ओळख नसणे, कामाची वाईट परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते.
भारताच्या घनकचरा व्यवस्थापन (SWM) परिसंस्थेसाठी कचरा वेचक हे महत्त्वाचे आहेत, जे पुनर्वापराच्या द्वितीय कामगार आयोग आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 सारख्या नियमांमध्ये मान्यता असूनही, शहरी स्थानिक संस्था (ULBs) यांनी कचरा वेचकांना कचरा संकलन, पृथक्करण आणि मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज (MRFs) द्वारे पुनर्वापराच्या क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे समाविष्ट केलेले नाही. नमस्ते योजनेचा कचरा वेचकांना औपचारिकपणे घनकचरा मूल्य साखळीत एकत्रित करून, कचरा व्यवस्थापन कार्यक्षमता वाढवून, पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देऊन आणि त्यांचे जीवनमान सुधारून या अंतरांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. या उपक्रमाचे उद्दिष्ट औपचारिक मान्यता, वित्तपुरवठा, योग्य तंत्रज्ञान आणि सुरक्षित, शाश्वत कामाचे वातावरण प्रदान करणे आहे, तसेच कचरा वेचकांना त्यांचे एकूण कल्याण वाढविण्यासाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांशी जोडणे आहे.
नमस्ते योजनेतील कचरा वेचक घटक हा घनकचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे आणि व्यवस्थापन करण्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या आव्हानांना आणि गरजांना तोंड देण्यासाठी तयार केला आहे. हे कचरा वेचक, गोळा करणारे आणि वर्गीकरण करणारे यांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करते, जे घनकचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी महत्त्वाचे आहेत परंतु वारंवार अनौपचारिक आणि अनिश्चित परिस्थितीत काम करतात.
जून 2024 मध्ये कचरा वेचकांना या योजनेअंतर्गत लक्ष्य गट म्हणून जोडण्यात आले आहे. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत, देशभरातील विविध शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 42,127 कचरा वेचकांचे eKYC प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
कचरा वेचक गणना ॲपचे अनावरण

जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांनी नवी दिल्लीत कचरा वेचक गणना ॲपचे अनावरण केले. या उपक्रमाद्वारे 'नमस्ते' योजनेचा विस्तार करून गटार आणि सेप्टिक टँक कामगारांसोबत आता कचरा वेचकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश 2.5 लाख कचरा वेचकांची नोंदणी करणे आणि त्यांना पुढील सुविधा पुरवणे हा आहे: व्यावसायिक फोटो ओळखपत्र, आयुष्मान भारत (PM-JAY) अंतर्गत आरोग्य विमा, वैयक्तिक संरक्षक उपकरण किट्स, व्यावसायिक सुरक्षा आणि कौशल्य सुधारणा प्रशिक्षण, कचरा संकलन वाहने खरेदी करण्यासाठी भांडवली अनुदान, 750 सुका कचरा संकलन केंद्रे व्यवस्थापित करण्यासाठी कचरा वेचक गटांना पाठबळ देणे हे आहे.
निष्कर्ष
जुलै 2023 मध्ये सुरू झालेली 'नमस्ते' योजना, भारतातील स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचकांची सुरक्षा, सन्मान आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
'नमस्ते' योजनेअंतर्गत झालेली प्रगती: 88,448 स्वच्छता कर्मचारी आणि 42,127 कचरा वेचकांचे प्रमाणीकरण झाले आहे. आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्ससाठी 83,901 पीपीई किट्स आणि 555 सुरक्षा उपकरण किट्स जारी करण्यात आले आहेत. 65,805 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत-PMJAY आणि राज्य आरोग्य योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळाले आहे. 769 स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंबंधित प्रकल्पांसाठी 23.06 कोटी रुपयांचे भांडवली अनुदान देण्यात आले आहे. धोकादायक साफसफाईच्या प्रतिबंधावर 1,112 कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. देशभरात 568 जबाबदार स्वच्छता प्राधिकरण आणि 642 आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्स स्थापन करण्यात आली आहेत. नमस्ते योजनेच्या कचरा वेचक घटकांतर्गत विविध स्थानिक संस्थांना मदत करण्यासाठी 77 रिसोर्स ऑर्गनायझेशनची यादी तयार करण्यात आली आहे.
कचरा वेचकांचा समावेश आणि कचरा वेचक गणना ॲपचे अनावरण हे पर्यावरण न्याय आणि एका सुदृढ स्वच्छता प्रणालीसाठी कटिबद्धता दर्शवते. यांत्रिकीकरण, आंतर-मंत्रालयीन समन्वय आणि जनजागृती मोहिमांद्वारे 'नमस्ते' योजना केवळ मृत्युदर कमी करून कामाची परिस्थिती सुधारत नाही, तर शाश्वत उपजीविकेलाही प्रोत्साहन देत आहे.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय:
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
(Backgrounder ID: 155888)
Visitor Counter : 4
Provide suggestions / comments