• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Farmer's Welfare

प्रगतीचे नील तरंग

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या 5 वर्षांत विक्रमी उत्पादन, वाढत्या निर्याती आणि समावेशक, शाश्वत वाढीसह मच्छीमारांना सक्षम बनविले

Posted On: 09 SEP 2025 3:38PM

नवी दिल्‍ली, 9 सप्‍टेंबर 2025

 

पीएमएमएसवाय च्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही साजरे करतो :

  • 2024-25 मध्ये भारताने 195 लाख टनांचे विक्रमी मासे उत्पादन केले, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनला
  • फेब्रुवारी 2025 पर्यंत मत्स्य पालन उत्पादकतेत राष्ट्रीय सरासरी 3 ते 4.7 टन प्रती हेक्टर इतकी वाढ
  • डिसेंबर 2024 पर्यंत 58 लाख रोजगार संधी निर्माण झाल्या ज्या 55 लाखांच्या उद्दिष्ष्टापेक्षा जास्त होत्या
  • 2020-21 ते 2024-25 पर्यंत 4061.96 कोटी रुपये मंजुरीसह 99,018 महिलांचे सक्षमीकरण

 

परिचय : आव्हानांचे संधींमध्ये परिवर्तन

पीएमएमएसवाय 10 सप्टेंबर 2020 रोजी सुरू झाल्यापासून 10 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीत उत्पादन आणि उत्पादकता, गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर आणि काढणीनंतरच्या पायाभूत सुविधांमधील गंभीर तफावत दूर करून मत्स्यव्यवसाय क्षेत्राला पर्यावरणीयदृष्ट्या निरोगी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक बनविण्यासाठी काम होत आहे. या पाच वर्षांत, संपूर्ण भारतभर ते यशोगाथांना प्रेरणा देत राहिले आहे.

अशीच एक कहाणी उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथील कपिल तलवार यांची आहे, ज्यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे कारकिर्दीला बसलेल्या धक्क्याचे एका भरभराटीच्या यशात रूपांतरण केले. खतिमा ब्लॉकचे रहिवासी असलेल्या त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान पीएमएमएसवाय अंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठे बायोफ्लॉक मत्स्यपालन युनिट स्थापन केले. या योजनेतून 40% अनुदान आणि उत्तराखंडच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनासह, त्यांनी बासा आणि सिंघी माशांच्या मत्स्योत्पादनासाठी 50 टाक्या उभारल्या.

पीएमएमएसवाय योजने अंतर्गत उभारण्यात आलेले बायोफ्लॉक युनिट

त्यांची नर्सरी हॉस्पिटल टँकने परिपूर्ण असून यातून 50,000 बासा माशांचे उत्पादन झाले. त्यांनी उत्तर भारतात शोभेच्या जलसंस्कृतीचाही पाया रचला आहे. बायोफ्लॉक युनिट स्थापन केल्याने केवळ तलवार यांच्या उपजीविकेचे पुनरुज्जीवन करण्यात आले नाही तर या उपक्रमामुळे त्यांच्या विभागातील सात लोकांना (पाच पुरुष आणि दोन महिला) चांगले जीवनमान अनुभवता आले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या पाठिंब्याने, ते ग्रामीण महिलांना शाश्वत मत्स्यपालन पद्धतींमध्ये मार्गदर्शन देखील करतात. ही कथा तळागाळातील जीवनमान बदलण्याच्या पीएमएमएसवायच्या क्षमतेचे स्पष्ट दर्शन घडवते.

 

पार्श्वभूमी : मंजुरीपासून विस्तारापर्यंत

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रचंड वाढीच्या संधी आणि समर्पित लक्ष केंद्रित करण्याबाबत आवश्यकतेवर भर देत सरकारने 2019-20 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता, गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर, मच्छिमारीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन, मूल्य साखळी आधुनिकीकरण, मागोवाक्षमता आणि मच्छीमारांच्या कल्याणातील गंभीर तफावत दूर करण्यासाठी पीएमएमएसवायची घोषणा केली. भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात "नील क्रांती" आणण्यासाठी एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून 20 मे 2020 रोजी मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली.

पीएमएमएसवाय अंतर्गत ही योजना औपचारिकपणे 10 सप्टेंबर 2020 रोजी मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय मंत्रालय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने प्रशिक्षण, जागरूकता आणि क्षमता-निर्मिती कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (NFDB) या नोडल एजन्सीच्या अखत्यारीत सुरू केली. या योजनेला एकूण 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची मान्यता देण्यात आली. यामध्ये, 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र सरकारकडून 9,407 कोटी रुपये, राज्य सरकारांकडून 4,880 कोटी रुपये आणि लाभार्थ्यांकडून 5,763 कोटी रुपयांचे योगदान समाविष्ट होते.

ही योजना आता 2025-26 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्थ मंत्रालय, व्यय विभागाने विद्यमान योजनेच्या संरचना आणि निधी पद्धतीनुसार पीएमएमएसवायचा विस्तार आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत करण्यास सहमती दर्शविली आहे. 22 जुलै 2025 पर्यंत, मत्स्यव्यवसाय विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत रु 21,274.16 कोटी किमतीच्या मत्स्यव्यवसाय विकास प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या मंजुरी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि विविध अंमलबजावणी संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर आधारित आहेत. मंजूर रकमेपैकी, केंद्राचा वाटा रु 9,189.79 कोटी आहे. आतापर्यंत, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर संस्थांना रु 5,587.57 कोटी जारी करण्यात आले आहेत.

 

रचना आणि घटक

पीएमएमएसवाय ही एक छत्री योजना आहे ज्यामध्ये खालीलप्रमाणे दोन स्वतंत्र घटक आहेत:

(a) केंद्रीय क्षेत्र योजना (CS): केंद्र सरकारद्वारे संपूर्ण निधी वितरणाद्वारे अंमलात आणली जाते

(b) केंद्र पुरस्कृत योजना (CSS): केंद्र सरकारद्वारे अंशतः सहाय्य तर राज्यांद्वारे अंमलबजावणी केली जाते.

केंद्र पुरस्कृत योजना (CSS) घटक पुढील तीन व्यापक शीर्षकाखाली बिगर लाभार्थी-केंद्रित आणि लाभार्थी-केंद्रित उप-घटक/कार्यक्रमांमध्ये विभागला गेला आहे:

  • उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे
  • पायाभूत सुविधा आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन
  • मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन आणि नियामक चौकट

दृष्टिकोन : पर्यावरण दृष्ट्या निरोगी, आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिक दृष्ट्या समावेशक मत्स्य पालन क्षेत्र जे मत्स्य पालक आणि देशातील इतर भागधारक, देशाची अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुरक्षित ठेवतील

 

या योजनेची ध्येय आणि उद्दिष्टे अशी आहेत:

(a) शाश्वत, जबाबदार, समावेशक आणि न्याय्य पद्धतीने मत्स्यपालन क्षमतेचा वापर करणे

(b) जमीन आणि पाण्याचा विस्तार, तीव्रता, वैविध्यकरण आणि उत्पादक वापराद्वारे मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे

(c) मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण - मच्छिमारी नंतरचे व्यवस्थापन आणि गुणवत्ता सुधारणा

(d) मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि रोजगार निर्मिती

(e) कृषी एकूण मूल्य वर्धन आणि निर्यातीत योगदान वाढवणे

(f) मच्छीमार आणि मत्स्यपालकांसाठी सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा

(g) मजबूत मत्स्यपालन व्यवस्थापन आणि नियामक चौकट

फायदे थोडक्यात

A blue and white background with textAI-generated content may be incorrect.

टप्पे आणि कामगिरी

पीएमएमएसवाय ने भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले आहेत, ज्यामुळे वाढ, शाश्वतता आणि समावेशकता वाढली आहे.

  • भारताने 2024-25 मध्ये 195 लाख टन विक्रमी मत्स्य उत्पादन गाठले, जे 2019-20 मधील 141.64 लाख टनांपेक्षा खूपच जास्त आहे.
  • देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मासे उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे, ज्याचे जागतिक मत्स्य उत्पादनातील योगदान जवळपास 8% आहे.
  • मत्स्यव्यवसाय निर्यातीत जोरदार वाढ दिसून आली आहे, 2019-20 मध्ये 46,662.85 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 60,524.89 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, ज्यामुळे जागतिक समुद्रीखाद्य बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत झाले आहे.

या महत्वपूर्ण टप्प्यांव्यतिरिक्त, पीएमएमएसवाय ने त्याच्या मुख्य उद्दिष्टांच्या तुलनेत सुद्धा पुढीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे:

 

पीएमएमएसवाय अंतर्गत प्रमुख उपक्रम

लाभार्थी-केंद्रित उपक्रम आणि उद्योजक प्रारूपा अंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या 60% पर्यंत आर्थिक सहाय्य म्हणून (प्रति प्रकल्प ₹1.5 कोटी पर्यंत) प्रदान करून पीएमएमएसवाय मत्स्यपालनात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देते. 2020-21 ते 2024-25 पर्यंत 99,018 महिलांना समाविष्ट करणारे रु 4,061.96 कोटी किमतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राज्यांनी महिला लाभार्थ्यांना समर्पित आर्थिक सहाय्य देऊन व्यापक प्रशिक्षण, जागरूकता आणि क्षमता-निर्मिती उपक्रम हाती घेतले आहेत.

 

मत्स्यव्यवसायात महिलांचे सक्षमीकरण

तंत्रज्ञानाद्वारे हवामान लवचिकता निर्माण करणे

पीएमएमएसवाय अंतर्गत, मत्स्यव्यवसाय विभागाने 100 किनारी मच्छिमार गावांमध्ये (CRCFV) हवामान लवचिकता बळकट करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या चैतन्यशील बनवण्यासाठी निवडले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवून 52,058 जलाशययुक्त पिंजरे, 22,057 पुनर्परिसंचरण प्रणाली (RAS) आणि बायोफ्लॉक युनिट्स तसेच मासे सोडलेल्या जलवाहिन्या आणि 1,525 समुद्री जाळी उभारण्यात आली आहेत ज्यासाठी 3,040.87 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक करण्या आली आहे.

बायोफ्लॉक तंत्रज्ञान

बायोफ्लॉक तंत्रज्ञान ही एक शाश्वत मत्स्यपालन पद्धत आहे जी फायदेशीर सूक्ष्मजंतूंचा वापर करून पाण्यात पोषक तत्वांचा पुनर्वापर करते. हे सूक्ष्मजंतू बायोफ्लॉक नावाचे गठ्ठे तयार करतात, जे नैसर्गिक खाद्य म्हणून काम करतात आणि पाणी स्वच्छ करण्यास देखील मदत करतात. या पद्धतीला कमी किंवा कमी पाण्याची देवाणघेवाण आवश्यक आहे, ज्यामुळे ते कमीत कमी संसाधनांसह उच्च-घनतेच्या मत्स्यपालनासाठी आदर्श बनते. हे पर्यावरणपूरक असण्यासोबतच उत्पादकता वाढवते, ज्यामुळे मत्स्यपालन वर्तुळात त्याला "हरित सूप" किंवा "हेटरोट्रॉफिक तलाव" असे नाव मिळाले आहे.

सरकारी मदतीसाठी अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्यांना हे करणे आवश्यक आहे:

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

  • संवर्धन करायच्या माशांच्या प्रजाती
  • भांडवल आणि आवर्ती खर्च
  • किमान सात वर्षांसाठी जमिनीच्या मालकीचा किंवा नोंदणीकृत भाडेपट्ट्याचा पुरावा
  • रोजगार आणि उत्पादन फायदे
  • अंमलबजावणीसाठी कालमर्यादा

पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प अहवाल जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयात सादर करा.

या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे सरकारी मदत मिळू शकते:

  • तलावांसाठी:

एका व्यक्तीला 0.1 हेक्टरच्या 2 युनिट्सपर्यंत मदत मिळू शकते

गट किंवा सोसायटींना 0.1 हेक्टरच्या 2 युनिट्स म्हणून गट/सोसायटीच्या सदस्यांच्या संख्येने गुणाकार करून मदत मिळू शकते ज्याची कमाल मर्यादा प्रति गट 0.1 हेक्टरच्या 20 युनिट्स आहे.

  • टाक्यांसाठी:

एका व्यक्तीला एका मोठ्या, एका मध्यम किंवा एका लहान टाकी सेटअपसाठी मदत मिळू शकते

गट किंवा सोसायटींना 2 मोठ्या, 3 मध्यम किंवा 4 लहान टाकी सेटअपसाठी मदत मिळू शकते

शेतकरी उत्पादक संघटना (FFPOs) साठी, अंमलबजावणी तपशील आणि क्षेत्र मर्यादा संबंधित प्राधिकरणाद्वारे निश्चित केली जाते.

मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी, PMMSY ने व्यापक पायाभूत सुविधांना मंजुरी दिली आहे:

  • एकूण ₹3281.31 कोटी खर्च: 58 मासेमारी बंदरे आणि लँडिंग सेंटर
  • एकूण ₹1568.11 कोटी खर्च: 734 बर्फ संयंत्रे/कोल्ड स्टोरेज, 21 आधुनिक घाऊक मासे बाजार (3 स्मार्ट मार्केटसह), 192 मासे किरकोळ बाजार, 6,410 मासे किओस्क, 134 मूल्यवर्धित उपक्रम युनिट्स
  • 27,297 काढणीनंतरचे मासे वाहतूक युनिट्स आणि डिजिटल मासे व्यापारासाठी 5 ई-प्लॅटफॉर्म.

 

काढणीपश्चात विपणन परिसंस्था मजबूत करणे

याव्यतिरिक्त, मत्स्यशेतकऱ्यांच्या उत्पादक संघटना (FFPOs) म्हणून 2,195 मत्स्यपालन सहकारी संस्थांना रु 544.85 कोटींच्या प्रकल्प खर्चासह पाठिंबा देण्यात आला आहे, ज्यामुळे बाजारपेठेतील चांगले संबंध, सौदेबाजीची शक्ती आणि उच्च परतावा मिळवण्यासाठी शाश्वत मूल्य साखळी सक्षम होतात.

  • मत्स्यपालन मूल्य साखळीत लवचिकता आणि कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी, सरकारने 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना (PM-MKSSY) ला PMMSY ची केंद्रीय क्षेत्रीय उप-योजना म्हणून मान्यता दिली. ही योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2026-27 या चार वर्षांसाठी ₹6,000 कोटी गुंतवणुकीसह राबविली जात आहे.
  • पीएम -एमकेएसएसवाय मत्स्यपालन क्षेत्राचे औपचारिकीकरण, मत्स्यपालन विम्याचे प्रोत्साहन, मूल्य साखळी कार्यक्षमता सुधारणे आणि सुरक्षित मासे उत्पादनासाठी सुरक्षा आणि गुणवत्ता प्रणालींचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करते.
  • एप्रिल 2025 पर्यंत, योजनेच्या लवकर अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी योजनेअंतर्गत रु 11.84 कोटी आधीच मंजूर करण्यात आले आहेत.

 

पीएम -एमकेएसएसवाय : मूल्य साखळी आणि लवचिकता मजबूत करणे

एन एफ डी पी पोर्टलद्वारे डिजिटल परिवर्तन

पीएम -एमकेएसएसवाय चा एक भाग म्हणून, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) 11 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आला, जो योजनेचे फायदे मिळविण्यासाठी एकल-खिडकी प्रणाली प्रदान करतो.

या मंचाचे उद्दिष्ट सर्व भागधारकांसाठी कार्य-आधारित डिजिटल ओळख निर्माण करून मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्राला औपचारिक बनविण्याचे आहे. ते मच्छीमार, मत्स्यपालन शेतकरी, सहकारी संस्था, उपक्रम आणि इतर मूल्य साखळी घटकांचे एक केंद्रीकृत माहिती संकलन देखील तयार करत आहे.

एनएफडीपी लाभार्थ्यांना संस्थात्मक कर्ज, मत्स्यपालन विमा, मागोवा प्रणाली आणि कामगिरीशी संबंधित प्रोत्साहने मिळविण्यास मदत करते. ते मत्स्यपालन सहकारी संस्थांना बळकटी देण्यास आणि प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मितीच्या संधी प्रदान करण्यास देखील समर्थन देते. 8 सप्टेंबर 2025 पर्यंत, पोर्टलने 2.7 दशलक्ष नोंदणी ओलांडल्या आहेत.

 

निष्कर्ष

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या पाच वर्षांच्या काळात 195 लाख टन विक्रमी मत्स्य उत्पादन, 58 लाख उपजीविका निर्माण, 99,018 महिलांना सक्षमीकरण आणि हवामान-स्मार्ट, बाजारपेठेसाठी तयार मूल्य साखळी तयार करणे या उद्देशाने प्रभावी हेतू निर्माण केला आहे. या योजनेने जागतिक मत्स्यपालनात भारताची भूमिका मजबूत केली आहे, त्याचबरोबर या क्षेत्रात समावेशक वाढ, उपजीविकेच्या संधी आणि तांत्रिक परिवर्तन सुनिश्चित केले आहे. त्याच्या विक्रमी कामगिरी आणि भविष्यातील उपक्रमांसह, पीएमएमएसवाय "नील क्रांती" ला शाश्वत आणि लवचिक भविष्याकडे नेत आहे.

 

संदर्भ

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय

पीआयबी प्रेस रिलीज

PIB बॅक ग्राऊंडर

 

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे

(Backgrounder ID: 155886) आगंतुक पटल : 14
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Punjabi
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate