Energy & Environment
भारताचे ‘महत्त्वपूर्ण खनिज अभियान’: भविष्यासाठी खनिजे सुरक्षित करणे
Posted On:
06 SEP 2025 10:11AM
|
महत्त्वाचे मुद्दे
|
|
●राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियान (एनसीएमएम) हा 2025 मध्ये सुरू झालेला उपक्रम भारतातील आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेला आराखडा आहे.
●एनसीएमएम ने 2030 पर्यंत 1,000 पेटंट नोंदवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामध्ये शोध आणि उत्खननात प्रगती करण्यासाठी 7 उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली आहेत.
●एनसीएमएम अंतर्गत, महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापर क्षमतेत वाढ करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना मंजूर करण्यात आली आहे.
|
महत्त्वाची खनिजे: प्रगतीचे नवीन चलन व्यवस्था
जग स्वच्छ ऊर्जेकडे आणि प्रगत तंत्रज्ञानाकडे वळत असताना, महत्त्वपूर्ण खनिजांवरील नियंत्रण हे नव्या भू-राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे. भारताने जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिजे अभियान सुरू केले. हे अभियान 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणारा असून यासाठी 16,300 कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आणि इतर भागधारकांकडून 18,000 कोटी रुपयांची अपेक्षित गुंतवणूक अपेक्षित आहे. हा केवळ खनिज उत्खननाचा कार्यक्रम नाही तर ऊर्जा सुरक्षा, औद्योगिक वाढीला चालना आणि तांत्रिक स्वावलंबन यांना चालना देणारा आराखडा आहे. इलेक्ट्रिक वाहनांना ऊर्जा देणाऱ्या लिथियमपासून ते संरक्षण प्रणालींसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण दुर्मिळ घटकापर्यंत सर्वांचा राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानात समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वपूर्ण खनिजे म्हणजे काय
महत्त्वपूर्ण खनिज म्हणजे अशी खनिजे जी आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. ही खनिजे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, उच्च-तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स, वाहतूक, दूरसंचार आणि संरक्षण उद्योगासाठी अपरिहार्य आहेत. कमी कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेकडे जागतिक संक्रमणाला चालना देण्यासाठी ती महत्त्वाची आहेत. मात्र, या खनिजांची पुरवठा साखळी असुरक्षिततेने भरलेली असल्याने सरकारांना अशा खनिजांसाठी आपल्या पुरवठा साखळ्या सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे.
देश आपल्या राष्ट्रीय प्राधान्यांनुसार त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण खनिजे निश्चित करतात. 2023 मध्ये, खाण मंत्रालयाने भारतासाठी 30 महत्त्वाच्या खनिजांची यादी प्रसिद्ध केली. ही खनिजे म्हणजे – अँटिमनी, बेरिलियम, बिस्मथ, कोबाल्ट, तांबे, गॅलियम, जर्मेनियम, ग्रेफाइट, हाफनियम, इंडियम, लिथियम, मोलिब्डेनम, निओबियम, निकेल, पीजीई, फॉस्फरस, पोटॅश, आरईई, रेनियम, सिलिकॉन, स्ट्रॉन्टियम, टँटलम, टेल्युरियम, टिन, टायटॅनियम, टंगस्टन, व्हॅनेडियम, झिरकोनियम, सेलेनियम आणि कॅडमियम.
भारताच्या स्वच्छ ऊर्जा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण खनिजे का महत्त्वाची आहेत
महत्त्वपूर्ण खनिजे भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या केंद्रस्थानी आहेत, सौर पॅनेलपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत प्रत्येक तंत्रज्ञान या खनिजांवर अवलंबून आहे. त्यांची भूमिका प्रमुख क्षेत्रांमध्ये विस्तारलेली आहे, वाढती मागणी पाहता ही खनिजे एका मजबूत धोरणात्मक भविष्याचा पाया म्हणून उदयास येत आहेत.
सौर ऊर्जा
सौर पॅनेलचे हृदय असलेल्या फोटोव्होल्टेइक सेल्स, सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. या सेल्ससाठी सिलिकॉन, टेल्युरियम, इंडियम आणि गॅलियम ही खनिजे अत्यावश्यक आहेत. भारताची सौर ऊर्जा क्षमता, आता 64 GW आहे, या महत्त्वपूर्ण खनिजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ज्यामुळे देशाचे सौर स्वप्न पूर्ण होते.
पवन ऊर्जा
पवन टर्बाइनमध्ये निओडीमियम आणि डिस्प्रोसियम वापरले जाते. ही खनिजे उच्च-कार्यक्षमतेचे चुंबक तयार करतात जे कार्यक्षमतेने टर्बाइन फिरवतात. भारताने 2030 पर्यंत आपली पवन ऊर्जा क्षमता 42 GW वरून 140 GW पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, यामुळे या महत्त्वपूर्ण खनिजांची मागणी झपाट्याने वाढेल. ही खनिजे भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीतील अत्यावश्यक घटक बनत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने (EVs)
प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाच्या केंद्रस्थानी असते एक बॅटरी, जी लिथियम, निकेल आणि कोबाल्ट या खनिजांवर चालते. ही खनिजे स्वच्छ आणि शाश्वत गतिशीलता शक्य बनवतात, जे रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांना शक्ती देण्यासाठी ऊर्जा संग्रहित करतात. सरकारचे उद्दिष्ट 2030 पर्यंत 30% इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग साध्य करण्याचे आहे, यामुळे या खनिजांची मागणी अनेक पटीने वाढणार आहे.
ऊर्जा साठवण
नवीकरणीय ऊर्जेची साठवण आणि वापर यासाठी लिथियम-आयन प्रणाली महत्वाच्या आहेत. या प्रणाली देखील लिथियम, कोबाल्ट आणि निकेल या खनिजावर अवलंबून आहेत. ही खनिजे अतिरिक्त वीज साठवून ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळे ऊर्जेची मागणी वाढल्यावर बॅकअप पुरवठा करणे शक्य करतात.
भारताचा महत्वपूर्ण खनिजे मार्गदर्शक आराखडा
राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिजे अभियानाचा मुख्य उद्देश भारताला उदयोन्मुख हरित अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा जागतिक खेळाडू म्हणून स्थान मिळवून देणे हा आहे. या अभियानाचा कायदेशीर आणि धोरणात्मक पाया खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा (MMDR कायदा) मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीवर आधारित आहे. या दुरुस्ती अंतर्गत केंद्र सरकारला निश्चित करण्यात आलेल्या 30 पैक 24 महत्वपूर्ण खनिजांचा लिलाव करण्याचा विशेष अधिकार आहे.
या अभियानाची रचना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा स्रोत सुरक्षित करणे तसेच अन्वेषण, खाणकाम, प्रक्रिया, पुनर्वापर, संशोधन आणि विकास तसेच मानव संसाधन विकास यासारख्या खनिज मूल्य साखळ्यांना बळकट करणे या प्राथमिक उद्दिष्टांसह करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाचा एक भाग म्हणून, सरकारने पारंपरिक खाणींच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या प्रायोगिक प्रकल्पांसाठी 100 कोटी राखून ठेवले आहेत. याचा मुख्य उद्देश ओव्हरबर्डन, माइन टेलिंग्ज, फ्लाय ॲश आणि अगदी लाल माती यासारख्या अपारंपरिक स्रोतांचा वापर करून मौल्यवान खनिजे पुनर्प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जे अन्यथा वाया गेले असते. या प्रयत्नामुळे औद्योगिक उप-उत्पादनांचे धोरणात्मक मालमत्तेत रूपांतर होते. भारताचे खनिज भविष्य सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाच्या मोठ्या उद्दिष्टांशी जोडल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी पावलांपैकी हे एक आहे, ज्यामध्ये पेटंट, पुनर्वापर, संशोधन आणि जागतिक भागीदारी यांचा समावेश आहे.
|
केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाअंतर्गत 1,500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश ई-कचरा, लिथियम- आयन बॅटरी स्क्रॅप आणि जीवनचक्र संपलेल्या वाहनांचे भाग यासारख्या दुय्यम स्रोतांमधून महत्त्वपूर्ण खनिजांचा पुनर्वापर करण्याची देशाची क्षमता वाढवणे, हा आहे. या उपक्रमाद्वारे नवीन आणि विद्यमान पुनर्वापरकर्त्यांना प्रोत्साहन देऊन, वार्षिक 270 किलो टन पुनर्वापर क्षमता निर्माण करणे, 40 किलो टन महत्त्वपूर्ण खनिजे उत्पादन करणे, सुमारे 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे तसेच सुमारे 70,000 रोजगार निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. हे पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
|

भारताच्या खनिज क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या प्रवासासाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या उद्दिष्टांद्वारे, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियान आपली दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्याची योजना आखत आहे. भारताने स्वतःच्या सीमेत महत्त्वपूर्ण खनिजांचे नवीन साठे शोधण्यासाठी एक हजाराहून अधिक प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना परदेशात महत्त्वपूर्ण खनिज प्रकल्पांमध्ये भागीदारी मिळवून मालमत्ता मिळविण्यास प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे भारताचा जागतिक ठसा अधिक बळकट होईल. पेटंटचा विकास, खनिजांसाठी प्रक्रिया उद्याने, उत्कृष्टता केंद्रे, पुनर्वापरासाठी प्रोत्साहने, कामगारांचे कौशल्यवर्धन आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खनिज साठ्यांसारखे धोरणात्मक साठे राखणे, या सर्व उपाययोजनाद्वारे राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाचे ध्येय वास्तवात उतरवले जाणार आहे.
नवोन्मेषाच्या खाणी
राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिजे अभियानाचे (NCMM) एक केंद्रीय लक्ष्य म्हणजे आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत महत्त्वपूर्ण खनिजांच्या मूल्य साखळीतील 1,000 पेटंट दाखल करण्यास सहयोग देऊन आणि त्यांचे निरीक्षण करून नवोन्मेषाला उत्प्रेरित करणे, हे आहे. या उपक्रमागील हेतू स्पष्ट आहे : भारताच्या ऊर्जा संक्रमण आणि धोरणात्मक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या देशी तंत्रज्ञानाच्या विकास आणि व्यापारीकरणाला गती देणे. या दिशेने गती आधीच दिसून येत आहे. याचा अनुषंगाने, या अभियानांतर्गत समर्पित सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना 6 एप्रिल 2025 रोजी मंजूरी देण्यात आली, जे भारताच्या महत्त्वपूर्ण खनिज धोरणाला पुढे नेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
|
पेटंटचा वेग: भारतातील महत्त्वपूर्ण खनिजांच्या भविष्याला आकार देणारे राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियान
मे 2025 मध्ये, भारतात महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रांशी संबंधित 21 पेटंट दाखल करण्यात आले, त्यानंतर जूनमध्ये आणखी 41 पेटंट दाखल करण्यात आले. याशिवाय पेटंट मंजुरींचाही वेग वाढला आहे- मे महिन्यात दोन आणि जून महिन्यात आठ पेटंट मंजूर झाले, हे आकडे संशोधन आणि विकास क्षेत्रात विशेषतः खनिज शोध, उत्थनन, प्रकिया आणि प्रगत अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रयत्नांची वाढ दर्शवतात.
नव्याने मंजूर झालेले पेटंट चालू असलेल्या संशोधनाच्या विविधतेवर प्रकाश टाकतात. त्यात यिटरबियम-डोपेल मेटल ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स आणि निकेल व्हॅनडेट थिन फिल्मपासून ते टंगस्टन- पॉलिमर कंपोझिट मोल्ड्समधील नवोन्मेष, सोडियम-आयन बॅटरीसाठी टँटलम- डोपेड नासिकॉन सॉलिड- स्टेट इलेक्ट्रोलाइट्स आणि दुय्यम बॅटरीसाठी प्रगत एनोड मटेरियल यांचा समावेश आहे.
हे सर्व नवोन्मेष एकत्रितपणे लिथियम, निकेल, टायटॅनियम, टंगस्टन, व्हॅनेडियम, यिटरबियम आणि टँटलम सारख्या महत्त्वाच्या खनिजांशी संबंधित आहेत, ते स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.
|
|
खाणकामातील उत्कृष्टता केंद्र
खाण मंत्रालयाने राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिजे अभियान (NCMM) अंतर्गत उत्कृष्टता केंद्रे (CoEs) म्हणून 7 प्रमुख संस्था- 4 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि 3 संशोधन प्रयोगशाळा नियुक्त केल्या आहेत. ही उत्कृष्टता केंद्रे भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतांना बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देतील. या केंद्रांसाठीचा निधी सरकारी संशोधन आणि विकास योजनांद्वारे, औद्योगिक सहकार्याद्वारे आणि उद्यम भांडवल सहाय्याद्वारे प्रकल्प आधारित पद्धतीने उपलब्ध करून दिला जाईल. उत्कृष्टता केंद्र (CoE) म्हणून मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आय आय टी बॉम्बे, आय आय टी हैदराबाद, आय आय टी (ISM) धनबाद, आय आय टी रुरकी, सीएसआयआर- आयएमएमटी भुवनेश्वर, सीएसआयआर-एनएमएल जमशेदपूर आणि एनएफटीडीसी हैदराबाद यांचा समावेश आहे.
|
निष्कर्ष
महत्वाची खनिजे ही जलदगतीने 21 व्या शतकाचे इंधन बनत आहेत, जे दुर्मिळ, धोरणात्मक आणि तीव्र प्रतिस्पर्धी आहेत. ते आधुनिक अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक आहेत. भारताने हवामान बदलाशी लढण्यासाठी काही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. यात – 2005 च्या तुलनेत 2030 पर्यंत राष्ट्रीय स्थूल उत्पादनाच्या उत्सर्जन तीव्रतेत 45% कपात करणे, 2030 पर्यंत ऊर्जेच्या अर्ध्या क्षमतेचा पुरवठा जीवाश्म नसलेल्या इंधनांपासून मिळवणे आणि 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करणे, यांचा समावेश आहे. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियान (NCMM) केंद्रस्थानी आहे. हे अभियान लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि दुर्मिळ घटक यासारख्या खनिजांचा दीर्घकालीन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जा आणि विद्युत गतिशीलता सुनिश्चित करण्यापलीकडे जाऊन, हे अभियान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि उद्याच्या उद्योगांसाठी जागतिक पुरवठा साखळीच्या केंद्रस्थानी भारताला ठेवण्यासाठी आरेखित केलेले आहे.
संदर्भ
खाण मंत्रालय
https://mines.gov.in/webportal/newsdetail/shri--vl-kantha-rao-secretary-ministry-of-mines-inaugurated-the-centre-of-excellence-under-ncmm-at-iit-bombay-on-23rd-august-2025-in-the-presence-of-director-iit-bombay-prof-shireesh-kedare
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2151287
NCMM_1739251643.pdf
679a0e7c614611738149500.pdf
पावर पॉइंट सादरीकरण
News/Events
News/Events
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2114467
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2151287
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2122219#:~:text=CoEs%20will%20undertake%20innovative%20and,Shuhaib%20T
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2163454
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1942027)
पत्र सूचना कार्यालय
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154178&ModuleId=3
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
***
NehaKulkarni/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Backgrounder ID: 155838)
आगंतुक पटल : 29
Provide suggestions / comments