Social Welfare
                            
                            
                                राष्ट्रीय एकता दिवस: राष्ट्रीय एकात्मतेचा आधारस्तंभ
                        
                            
                                
                        
                        
                            Posted On:
                            30 OCT 2025 11:48AM
                        
                        नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
 
	
		
			| महत्त्वपूर्ण बाबी  | 
		
			| 
				राष्ट्रीय एकता दिवस, दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय आव्हानांचा बीमोड करत विविधतेत एकतेचा पुरस्कार करत एकसंध भारत घडवण्याच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान हा दिवस करतो.सरदार पटेल यांची 150 वी जयंती सन 2025 मध्ये आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडिया येथील एकता नगर येथे राष्ट्रीय एकता दिवसाच्या समारंभात सहभागी होणार आहेत.रन फॉर युनिटी आणि युनिटी मार्च सारखे वार्षिक कार्यक्रम नागरिकांना, विशेषतः तरुणांना देशभक्ती आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्यास प्रोत्साहित करतात. | 
	
 
प्रास्ताविक
राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. भारताची राष्ट्रीय आणि राजकीय अखंडता व एकता राखण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्राचे सार्वभौमत्व, शांतता आणि अखंडता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि नागरिकांना विविधतेत एकतेसाठी वचनबद्ध राहण्यास प्रोत्साहित करतो.

सरदार पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी भारत सरकारने 2014 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्याची घोषणा केल्यानंतर, 31ऑक्टोबर 2015 रोजी झालेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध प्रदेशातील लोकांमध्ये निरंतर आणि रचनात्मक संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील आपसातली सामंजस्य आणि भावबंध दृढ होण्यासाठी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाची घोषणा केली. तेव्हापासून दहाहून अधिक केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, शाळा, महाविद्यालये आणि युवा संघटना देशाच्या विविध भागातील लोकांमध्ये अशा प्रकारचे बंध वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे हा दिवस साजरा करत आहेत.
सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यावर्षीचा राष्ट्रीय एकता दिन विशेषतः खास आहे.
 
मूलभूत वारसा 
भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय एकीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा सुमारे 40% भूभाग आणि लोकसंख्येचा समावेश असलेल्या 560 हून अधिक संस्थानांना भारत संघराज्यात जोडण्याचे कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत, संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे की नाही हे ठरवण्याचा पर्याय देण्यात आला होता. सरदार पटेल यांनी विखंडन रोखण्यासाठी मुत्सद्देगिरी, अनुनय-विनय आणि आवश्यकतेनुसार, कठोर प्रशासकीय उपाययोजनांचा वापर केला. सरदार पटेल यांनी 15 ऑगस्ट 1947 पर्यंत किंवा त्यानंतर लगेचच या संस्थानांचे यशस्वीरित्या एकत्रीकरण साधले, आधुनिक भारताची क्षेत्रीय अखंडता सुनिश्चित केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे संभाव्य विखंडन टाळता आले आणि एकात्मिक लोकशाही प्रजासत्ताकाचा पाया रचला गेला. या लोहपुरुषाच्या निर्णायक नेतृत्वानेच देशाच्या फाळणीच्या अशांत काळात अंतर्गत स्थैर्य सुनिश्चित केले. त्यांनी "पोलादी चौकट" म्हणून अखिल भारतीय सेवांची स्थापना केली, जी देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करत राहील.


 
एक भारत श्रेष्ठ भारत: सरदार पटेल यांचा वारसा पुढे नेणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2015 रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त जाहीर केलेला 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रम, सरदार पटेल यांच्या एकसंध भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. हा उपक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान आणि परस्पर सामंजस्याला प्रोत्साहन देतो, तसेच परस्पर संवाद आणि आदानप्रदान यांद्वारे भारताची विविधता साजरी करतो.
या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे :
	- नागरिकांमध्ये भावनिक बंध दृढ करणे,
- संरचित आंतरराज्य सहभागाद्वारे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे,
- भारताच्या विविध संस्कृतींचे प्रदर्शन आणि सन्मान करणे,
- चिरस्थायी भागीदारी निर्माण करणे, आणि
- प्रदेशांमध्ये परस्पर अध्ययन आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्यास प्रोत्साहन देणे.
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम, भाषिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदानप्रदानाद्वारे भावनिक बंध दृढ करण्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडून "विविधतेत एकता" या कल्पनेला प्रोत्साहन देतो. या गतिविधींमुळे राष्ट्रीय एकता दिवसाचा संदेश एका दिवसापुरता मर्यादित न राहता, त्याचे राष्ट्रीय एकात्मतेसाठी निरंतर सुरू राहणाऱ्या चळवळीत रूपांतर होते.
एकता दिवसावरुन प्रेरित एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम आणि उपक्रम:
	- भाषा संगम 'ॲप'– 22 अधिकृत भारतीय भाषांमधील दैनंदिन वापराची 100 हून अधिक वाक्ये शिकण्यासाठी
- सांस्कृतिक प्रदर्शने आणि खाद्य महोत्सव
- विद्यार्थी विनिमय कार्यक्रम – “युवा संगम” आणि शाळा तसेच विद्यापीठांमधील ईबीएसबी क्लब्स जोडलेल्या राज्यांदरम्यान तरुणांचे संवाद घडणे सुलभ करतात आणि त्यायोगे परस्पर सामंजस्यात वाढ करतात.
- काशी तमिळ संगमम – कला, भाषा आणि परंपरांच्या आदानप्रदानातून ऐक्याला चालना देत, काशी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक नात्याचा उत्सव साजरा करते.
- डिजिटल आणि प्रसारविषयक मोहिमा – माय भारत डिजिटल पोर्टल आणि ईबीएसबी प्रश्नमंजुषा स्पर्धांसारखे उपक्रम नागरिकांना ऐक्य, देशभक्ती तसेच भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे ज्ञान वाढवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी करुन घेतात.
- राष्ट्रीय एकात्मतेला मजबूत करणाऱ्या उपक्रमांचे दस्तावेजीकरण करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे व्यासपीठ देऊ करत ईबीएसबी पोर्टल राष्ट्रीय एकता दिवसाच्या संकल्पनेमागील विचाराचा डिजिटल विस्तार म्हणून काम करते. एकता दिवसाच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अंतर्गत विविध मंत्रालयांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आंतर-राज्यीय सांस्कृतिक आदानप्रदान, तरुणांचे कार्यक्रम तसेच मोहिमा यांचे अहवाल या पोर्टलवर नोंदवलेले आहेत. लाखो सहभागी आणि अभ्यागतांसह हे पोर्टल त्यातील डिजिटल माहितीकोषाच्या माध्यमातून देखो अपना देश (पर्यटन), स्वदेशी क्रीडा वैशिष्ट्ये (क्रीडा) यांसारखे कार्यक्रम सादर करून तसेच भारताची विविधता आणि सामुहिक ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या मासिक उपक्रमांना अधोरेखित करणाऱ्या ईबीएसबी वॉलच्या माध्यमातून वर्षभर ऐक्याची भावना जिवंत ठेवते.
2025 मधील महत्त्व: सरदार पटेल यांची 150 वी जयंती
वर्षभर चालणाऱ्या देशव्यापी स्मरणोत्सवाच्या रुपात या प्रसंगाची कल्पना मांडण्यात आली आहे. हा टप्पा समकालीन भारतात, विशेषतः ऐक्य आणि सामाजिक एकसंधतेसमोर उभ्या असलेल्या जागतिक आव्हानांच्या काळात सरदार पटेल यांची चिरस्थायी समर्पकता अधोरेखित करतो. राष्ट्रीय एकता दिवसाची भावना एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) च्या तत्वांशी देखील खोलवर जुळलेली आहे. ही भावना जोडलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान, भाषिक रसग्रहण आणि परस्पर सामंजस्याच्या माध्यमातून भावनिक बंध आणखी दृढ करते. एकत्रितपणे, हे सर्व उपक्रम, विविधतेतील एकतेच्या संकल्पनेला नवे बळ देतात आणि राष्ट्रीय एकात्मतेला केवळ उत्सव साजरा करण्याकडून सध्याच्या लोक चळवळीत परिवर्तीत करतात.
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण करतील आणि त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीचे राष्ट्रीय एकता दिवस सोहोळे सुरु होतील. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले उपक्रम आणि कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:
 
	
		
			| विभाग | तपशील | 
		
			| मुख्य कार्यक्रमाची तारीख | 
				31 ऑक्टोबर (दर वर्षी) — राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो | 
		
			| मुख्य संचलनाचे सोहोळ्याचे स्थान (यावर्षी) | 
				गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर (पूर्वीचे युनिटी टाऊन)भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण पथकातर्फे हवाई कसरती | 
		
			| संचलन – सहभागी पथके | 
				9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलातील 16 पायदळ पथकेकेंद्रीय सशस्त्र दलाची (सीएपीएफएस) 4 पथकेराष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र विशेष विभाग: उदा. सीमा सुरक्षा दलाचे श्वान पथक, आसाम पोलीस दलाचे मोटरसायकलसह सादरीकरण, सीमा सुरक्षा दलाचे उंटांचे पथक. | 
		
			| महिला अधिकाऱ्यांची भूमिका / विशेष उल्लेखनीय सहभाग | 
				पंतप्रधानांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचे नेतृत्व महिला अधिकारी करेल. | 
		
			| सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथ | 
				विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे “विविधतेतील एकता” या संकल्पनेवर आधारित चित्ररथकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित भारतीय शास्त्रीय आणि लोककला सादर करणाऱ्या सुमारे 900 कलाकारांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम | 
		
			| विस्तारित सोहोळा / “भारत पर्व” | 
				दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत एकता नगर येथे भारत पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विविध राज्यांतर्फे सांस्कृतिक सादरीकरणे आणि खाद्य महोत्सव यांचा समावेश असेल. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी, 15 नोव्हेंबर रोजी आपल्या आदिवासी समुदायांची वैभवशाली संस्कृती आणि दृढनिश्चयी भावना अधोरेखित करणाऱ्या विशेष कार्यक्रमांच्या सादरीकरणासह हा महोत्सव संपन्न होईल. | 
		
			| इतर लॉजिस्टिक्स वैशिष्ट्ये | 
				दिल्लीत राजघाट ते लाल किल्ला या टप्प्यात “रन फॉर युनिटी” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिव्यांगजन, विद्यार्थी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान इत्यादींचा सहभाग असेल.महोत्सवाच्या सप्ताहात एकता नगर येथे 280 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करण्यात येईल | 
	
 
	
		
			| भारतीय जातीच्या श्वानांचे अनोखे संचलन पथक  
 
				2025 मधील राष्ट्रीय एकता दिवसाच्या संचलनात सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) भारतीय जातीच्या श्वानांची, विशेषतः रामपूर हाऊंड्स आणि मुधोळ हाऊंड्सचे एक पथक असेल, जे कारवायांमध्ये बल गुणक म्हणून त्यांची भूमिका दर्शवतात. अखिल भारतीय पोलिस श्वान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर मुधोळ हाऊंड 'रिया' संघाचे नेतृत्व करत, आत्मनिर्भर भारताच्या भावनेला मूर्त रूप देणाऱ्या या स्थानिक जाती त्यांच्या अपवादात्मक कौशल्यांचे प्रदर्शन करतील, गुजरातमधील एकता नगर येथील परेडमध्ये त्यांचा सहभाग राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांचे योगदान अधोरेखित करतो आणि भारताच्या मूळ श्वानांच्या वारशाचा उत्सव साजरा करून विविधतेत एकता या थीमवर प्रकाश टाकतो. गुजरातमधील एकता नगर येथील परेडमध्ये त्यांचा सहभाग राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांचे योगदान अधोरेखित करतो आणि भारताच्या मूळ कुत्र्यांच्या वारशाचे उत्सव साजरा करून विविधतेत एकता या संकल्पनेवर प्रकाश टाकतो. | 
	
सरदार @150 एकता मार्च
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, माय भारत व्यासपीठाच्या माध्यमातून तरुणांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारी वाढवण्यासाठी देशव्यापी एकता मार्च (यात्रा) आयोजित केली आहे, जी 'एक भारत, आत्मनिर्भर भारत' या तत्त्वांशी सुसंगत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 6 ऑक्टोबर 2025 रोजी माय भारत पोर्टलवर सुरू केलेल्या या उपक्रमात सोशल मीडिया रील्स स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि सरदार @150 यंग लीडर्स प्रोग्राम यासारख्या स्पर्धांचा समावेश आहे, ज्यात 150 विजेते राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होतील.


एकता मार्च दोन टप्प्यात निघेल. 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संसदीय मतदारसंघातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय पदयात्रा होतील. या पदयात्रांच्या आधी निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर आणि योगदानावर चर्चासत्रे आणि शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पथनाट्ये यासह जागरूकता उपक्रमांची मालिका आयोजित केली जाईल. पदयात्रेसह, स्वच्छता मोहिमेसारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक विकास उपक्रम हाती घेतले जातील. पदयात्रेसोबतच, जिल्ह्यांमध्ये विविध विकासात्मक उपक्रम हाती घेतले जातील - जसे की जलकुंभांमध्ये स्वच्छता मोहीम, "सरदार उपवन" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम, महिला कल्याण शिबिरे, योग आणि आरोग्य शिबिरे आणि "व्होकल फॉर लोकल" प्रचार मोहीम. २६ नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय मार्चमध्ये करमसद (गुजरातमधील सरदार पटेल यांचे जन्मस्थान) ते केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत 152 किलोमीटरचा प्रवास केला जाईल, ज्यामध्ये या मार्गावरील गावांमध्ये सामुदायिक विकास उपक्रमांचा समावेश असेल, ज्यामध्ये एनएसएस विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, माय भारत स्वयंसेवक आणि तरुण नेते सहभागी होतील. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि सरदार पटेल यांचे जीवन दर्शविणारे प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल.
 
रन फॉर युनिटी
राष्ट्रीय एकता दिवसासाठी सरकार-निर्देशित मोहिमांमध्ये "रन फॉर युनिटी" हा प्रमुख कार्यक्रम आहे, जो राष्ट्रीय एकतेकडे सामूहिक वाटचालीचे प्रतीक आहे. 2025 मध्ये, रन फॉर युनिटी, 31 ऑक्टोबर रोजी मुख्य समारंभाच्या आधी आयोजित केली आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमांसह प्रमुख शहरांमध्ये हजारो लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
निष्कर्ष
राष्ट्रीय एकता दिवस हा विविध संस्थानांमधून एकसंध भारत घडवण्यात सरदार पटेल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची एक चिरंतन आठवण म्हणून उभा आहे, जो देशाच्या प्रगतीचा पाया आहे. शपथा, मोर्चे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ऐतिहासिक श्रद्धा आणि समकालीन सहभाग यांचे मिश्रण करून - हा उत्सव केवळ भूतकाळातील विजयांचे स्मरण करत नाही, तर आधुनिक विभाजनकारी शक्तींना सक्रियपणे विरोध करतो, "एक भारत, श्रेष्ठ भारत" या नीतिमत्तेला बळकटी देतो. राष्ट्रीय एकता दिवस हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीकात्मक दिवस आहे, तर एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय भाषा समारोह, सांस्कृतिक प्रदर्शने आणि युवा परिवर्तन कार्यक्रम यासारख्या संरचित उपक्रमांद्वारे वर्षभर त्या ध्येयाचा विस्तार करतो. हे सातत्यपूर्ण उपक्रम विविधतेतील एकतेची भावना वार्षिक उत्सवाच्या पलीकडेही प्रतिध्वनीत राहते याची खात्री करण्यास मदत करतात.
संदर्भ
पत्रसूचना कार्यालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारत सरकार
 
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
 
* * *
नेहा कुलकर्णी/ सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai@gmail.com
pibmumbai@gmail.com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                        (Backgrounder ID: 155828)
                        Visitor Counter : 7
                        
                        Provide suggestions / comments