Social Welfare
हेल्मेट: एक जीवरक्षक कवच
स्मार्ट व्हा. दुचाकी प्रवास सुरक्षित करा. बी आय एस प्रमाणित हेल्मेट वापरा
Posted On:
12 JUL 2025 9:13AM
नवी दिल्ली, 12 जुलै 2025
ठळक मुद्दे
- भारतात एकूण अपघाती मृत्यूंमध्ये 44.5% मृत्यू दुचाकी अपघातामुळे होतात, जीव वाचवण्यासाठी हेल्मेट खूप महत्वाचे ठरते.
- जागतिक आरोग्य संघटना ( WHO) : योग्य हेल्मेटमुळे मृत्यूचा धोका 6 पट कमी होतो, तर मेंदूच्या जखमांची शक्यता 74% नी कमी होते.
- BIS प्रमाणित हेल्मेट (IS 4151:2015) चा वापर 2021 सालापासून कायद्याने बंधनकारक आहे.
- BIS ने 2024-25 मध्ये 3000 हून अधिक बनावट हेल्मेट्स जप्त केली असून अशा बेकायदेशीर हेल्मेट विक्रीच्या विरोधात कारवाई सुरू आहे.
प्राचीन काळापासून उन्हापासून संरक्षण होण्यासाठी डोक्याला कपडा बांधण्याची पद्धत होती, तशा फेटे- पगड्यांपासून ते अगदी लढाईत सैनिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या शिरस्त्राणांपर्यंत, डोक्याचे संरक्षण खूप महत्त्वाचे होते.
हेल्मेट या शब्दाचा उगम मध्ययुगीन हेल्म या शब्दात असून डोक्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मध्ययुगीन शिरस्त्राणांसाठी हा शब्द वापरला गेला होता. आता या शब्दाचा उपयोग प्रवास, क्रीडा अथवा धोकादायक कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शिरस्त्राणांसाठी केला जातो. विसाव्या शतकापासून हेल्मेटचा आधुनिक अवतार वापरात आला असला तरी त्याचे उद्दिष्ट पूर्वीचेच आहे- डोक्याचे संरक्षण आणि मृत्यूपासून बचाव.
भारतात दरवर्षी रस्ते अपघातात अनेक लोकांचा जीव जातो. यात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचा समावेश असतो. दुचाकी हा लाखो लोकांसाठी दररोजच्या वाहतुकीचा मुख्य पर्याय आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते, 2022 मध्ये, भारतातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 44.5% मृत्यू दुचाकीस्वारांचे होते.
भारतात हेल्मेटचा वापर बहुतेकदा सुरक्षेच्या चिंतेपेक्षा दंडाच्या भीतीने जास्त केला जातो. चालक अनेकदा पोलिस चौक्या दिसत असतानाच हेल्मेट घालतात आणि नंतर ते लगेच काढून टाकतात. हे खरे तर निष्काळजीपणाचे लक्षण आहे. 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असलेल्या आपल्या देशात, अतिशय विस्कळीत वाहतुकीत आणि अनेकदा प्रतिकूल हवामानात प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यास त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे छोटेसे हेल्मेट मोठे काम करते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, योग्य हेल्मेट वापरामुळे अपघातात मृत्यूचा धोका 6 पटीने कमी होऊ शकतो आणि मेंदूला दुखापत होण्याचा धोका 74% पर्यंत कमी होऊ शकतो.
मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत हेल्मेट कायदेशीररित्या अनिवार्य असले तरी, सर्वच हेल्मेट्स खरे संरक्षण देत नाहीत. ट्रॅफिक जंक्शन किंवा रस्त्याच्या कडेला विक्रीस असलेली हेल्मेट बहुतेकदा स्वस्त किमतीत आणि आकर्षक दिसणारी असतात, परंतु त्यांना अगदी प्राथमिक सुरक्षा प्रमाणपत्रे देखील नसतात. ही निकृष्ट उत्पादने हेल्मेटसारखी दिसतात, परंतु ती जीवनरक्षक उपकरणे म्हणून काम करत नाहीत. त्यांची चाचणी केल्यास, अपघातामुळे डोक्याला बसणारा आघात शोषून घेण्यात, डोक्यावर टिकून राहण्यात किंवा कवटीचे संरक्षण करण्यात ती अयशस्वी ठरतात. थोडक्यात, ते दुचकीस्वारांना सुरक्षिततेची खोटी भावना देतात - आणि हा भ्रम घातक ठरू शकतो. ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) ने ग्राहकांना या धोक्याची माहिती देऊन फक्त BIS-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करणारी राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. 2021 पासून लागू असलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार, प्रत्येक दुचाकी चालकाला कायद्यानुसार IS4151:2015 - BIS द्वारे प्रमाणित “संरक्षणात्मक हेल्मेटसाठी भारताच्या मानकां”चे पालन करणारे हेल्मेट घालणे आवश्यक आहे. भारतभरात जून 2025 पर्यंत, 17६ उत्पादकांकडे अशा हेल्मेट्सचे उत्पादन करण्यासाठी वैध BIS परवाने देण्यात आले आहेत. परंतु वाढती जागरूकता व कायद्याने मनाई असूनही, असुरक्षित, अप्रमाणित हेल्मेट्सची समांतर बाजारपेठ अजूनही वाढत आहे.

प्रमाणित हेल्मेट कोणत्या बाबतीत वेगळे असते हे आता आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्या मुळाशी निव्वळ विज्ञान आहे.
एक चांगले हेल्मेट एकाच गोष्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन केलेले असते - ती म्हणजे “आघात”. अपघातादरम्यान, दुचाकीस्वाराची “गतिज ऊर्जा” (एखादी वस्तू गतिमान असल्याने तिच्यात तयार होणारी ऊर्जा) अचानक थांबते. असे अचानक थांबल्याने डोक्यातील कवटीवर प्रचंड दाब निर्माण होतो, ज्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत होते. तो दाब शोषून घेत त्याला हेल्मेटच्या पृष्ठभागावर पसरवून त्याची विनाशक ताकद कमी करणे हेच हेल्मेटचे काम आहे, यामुळे डोक्याला बसणाऱ्या धक्क्याची तीव्रता कमी होते.
BIS-प्रमाणित हेल्मेट त्रि -स्तरीय डिझाइनद्वारे काम करतात: आघाताचा प्रतिकार करण्यासाठी एक कठीण प्लास्टिक बाह्य कवच, आघाताची ऊर्जा शोषण्यासाठी आत फोमचा संरक्षक थर आणि डोक्याला नीट बसून घर्षण कमी करण्यासाठी आरामदायी पॅडिंग.
हेल्मेटने केवळ आघातापासून सुरक्षा देणे महत्वाचे नाही तर आघातानंतर दुचाकीस्वार खाली पडतो किंवा गडगडत दूर जातो त्यावेळी हेल्मेट डोक्यावर टिकून राहणे आवश्यक असते. या बाबीकडे बरेचदा दुर्लक्ष होते. त्यासाठी BIS कोणत्याही हेल्मेटला प्रमाणित करण्याआधी त्याच्या काटेकोर चाचण्या घेते.
या चाचण्यांमध्ये खालील बाबी समाविष्ट असतात:
- जड वजने भरलेल्या हेल्मेट्स ना लोखंडी ऐरणीवर आपटून त्या आघाताचे परिणाम तपासणे,
- हेल्मेटमधून बाहेरचे दृश्य नीट पाहता येते की नाही हे तपासणे.
- हेल्मेट डोक्याला बांधण्यासाठी असलेले पट्टे आघातादरम्यान टिकून राहतात की नाही हे तपासणे आणि
- सभोवतालच्या वाहनांचे आवाज हेल्मेटच्या आत स्वाराला ऐकू येतात की नाही हे तपासणे.
हेल्मेटसाठी वापरलेल्या साहित्यावर विषम तापमान, आर्द्रता आणि रोजच्या वापरामुळे होणारी झीज, गंज ओरखडे याचा कमीत कमी परिणाम होणे आवश्यक असते.
बनावट आणि अप्रमाणित हेल्मेट्स वर अनेकदा खोटे आयएसआय शिक्के असतात आणि त्यांच्या वरीलप्रमाणे कडक तपासण्या केल्या जात नाहीत. अशी हेल्मेट्स आघातात तुटून जातात किंवा स्वाराच्या डोक्यावरून दूर फेकली जातात. नुकतेच 2024-25 सालात BIS ने 30 छापे टाकून 500 हून जास्त हेल्मेट्स च्या तपासण्या केल्या होत्या. परवाने रद्द केलेले किंवा बाद झालेले असूनही हेल्मेटचे उत्पादन करणाऱ्या 9 कंपन्यांची 2,500 हून अधिक अप्रमाणित हेल्मेट्स दिल्ली मध्ये टाकलेल्या एका छाप्यात जप्त करण्यात आली होती. निरनिराळ्या 17 ठिकाणी रस्त्याच्या कडेला विकली जाणारी 500 निकृष्ट दर्जाची हेल्मेट्स जप्त करण्यात आली होती. त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हेल्मेट्स अधिकृत दर्जाची आहेत की नाहीत हे ग्राहकांना कळणे सोपे जावे व त्यानुसार त्यांनी दक्षता घ्यावी यासाठी BIS ने एक सोपी प्रणाली विकसित केली आहे. हेल्मेट उत्पादकाकडे परवाना आहे की नाही याची खात्री BIS पोर्टल व BIS केअर ऍप द्वारे ग्राहक करून घेऊ शकतात तसेच संशयित बनावट परवाने बाळगणाऱ्या उत्पादकांची तक्रार नोंदवू शकतात. BIS कार्यालये व स्थानिक पोलीसांच्या सहकार्याने बेकायदेशीर हेलमेट विक्रीच्या विरोधात जोरदार कारवाई मोहिमा चालवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चेन्नईसारख्या शहरांमध्ये वाहतूक विभागाच्या सहकार्याने जागोजागी पथनाट्ये सादर करून व प्रमाणित हेल्मेट्स चे मोफत वाटप करून जनजागृती करण्यात आली आहे.
केवळ कायद्याच्या अंमलबजावणी कडे लक्ष केंद्रित न करता BIS ने जनशिक्षणाकडेही लक्ष दिले आहे. क्वालिटी कनेक्ट या मोहिमेत मानक मित्र हे नाव घेऊन अनेक स्वयंसेवक शहरी व निमशहरी भागात ग्राहकांना भेटून बनावट हेल्मेटच्या धोक्यांबद्दल माहिती देत आहेत व प्रमाणित हेल्मेटमुळे जीव कसा वाचू शकतो याबद्दल जनजागृती करत आहेत.
BIS प्रमाणित हेल्मेट वापरा- दंड वाचवण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी.
यातून दिलेला संदेश जितका सोपा तितकाच महत्वाचा आहे- स्टाईल किंवा किमतीसाठी सुरक्षेशी तडजोड करणे चुकीचे आहे. हेल्मेट्स ही केवळ प्लास्टिकची टोपी नव्हे, तर जीवघेणे आघात शोषून घेणारे व वैज्ञानिक पद्धतीने आरेखन केलेले संरक्षक कवच आहे. हेल्मेट केवळ दंड वाचवण्यासाठी नव्हे तर वेदनादायक जखमांपासून बचावणारी ढाल आहे. कायद्याच्या बडग्यामुळे केवळ नियमपालन घडून येते पण सखोल माहिती घेतल्यास जीव वाचू शकतो. दंड किंवा चालान टाळण्यापेक्षा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे हे ध्यानात आल्यास दुचाकीस्वारांचा हेल्मेट प्रति दृष्टिकोन बदलू शकतो. प्रमाणित व अप्रमाणित हेल्मेट मध्ये केवळ एका स्टीकर चा फरक नसून तो जीवन आणि अपघाती मृत्यूतील फरक आहे.

फक्त हेल्मेट नव्हे, तर प्रमाणित हेल्मेट वापरा आणि सुरक्षित राहा.
संदर्भ
Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution
Ministry of Road Transport and Highways
Annual Report 2024-25: https://morth.nic.in/sites/default/files/Annual-Report-English-with-Cover.pdf (Page 82)
Bureau of Indian Standards
Helmet E-Book (March 2023): https://www.bis.gov.in/helmet-3/
World Health Organisation
Download in PDF (Helmet - More Than Just a Shell)
* * *
Jaydevi PS/Uma Raikar/Darshana Rane
(Backgrounder ID: 155618)
Visitor Counter : 11
Provide suggestions / comments