Social Welfare
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन 2025
सुरक्षित, अंमलीपदार्थ मुक्त भविष्याकडे वाटचाल
Posted On:
29 JUN 2025 8:20PM
नवी दिल्ली, 25 जून 2025
प्रमुख घटना
- 7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने (यूएनजीए) 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व तस्करी विरोधी दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.
- 2024 मध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांनी मिळून सुमारे 25,330 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.
- 2014 मध्ये केंद्रिय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील यंत्रणांनी 1,17,284 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले.
- 2024 मध्ये सागरी क्षेत्रातूनही एकंदर 4,134 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
|
एनसीबीकडून ड्रग्ज जप्ती आणि अटक (2004–2024)
|
|
वर्गीकरणे
|
2004–2014
|
2014-2024
|
|
प्रकरणे नोंदवली
|
1,250
|
4,150
|
|
अटक
|
1,360
|
6,300
|
|
ड्रग्ज जप्त (किलो)
|
1.52 लाख किलो
|
5.43 लाख किलो
|
|
जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत
|
₹5,900 कोटी
|
₹22,000 कोटी
|
परिचय
अंमली पदार्थ हे एक जागतिक आव्हान आहे. अंमली पदार्थांमुळे संबंधित व्यक्तीचे नुकसान तर होतेच शिवाय, कुटुंबांचेही नुकसान होते व समाज पोखरला जातो. याचे परिणाम फक्त व्यसनापुरते मर्यादित राहात नाहीत, ते शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसानही करतात. अंमली पदार्थांचा हा वाढता धोका लक्षात घेऊन 7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व तस्करी विरोधी दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.

तेव्हापासून 26 जून हा दिवस जनजागृती वाढविणे, प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन आणि अंमली पदार्थ व तस्करी विरोधात सर्व देशांचे परस्पर सहकार्य मजबूत करणे यांना पुन्हा उजाळा देण्याचे दिवस म्हणून पाळला जातो. संघटित गुन्हेगारी व अंमली पदार्थ तस्करीची साखळी तोडणे यावर यावर्षी भर दिला जाणार आहे.
अंमली पदार्थांबाबत शून्य सहिष्णुता धोरण
अंमली पदार्थांबाबत सरकारने शून्य सहिष्णुता धोरण व संघटित प्रयत्नांचा दृष्टीकोन स्वीकारला आहे. अंमली पदार्थमुक्त भारत घडविण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हा लढा लोक चळवळ बनविण्यावर भर देत भारत सरकारने युवा पिढीमधे तसेच समाजात जनजागृती करण्याचे प्रयत्न वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टीकोनामुळे, केवळ एका वर्षातच अंमली पदार्थ जप्ती, अटक व अंमली पदार्थ विक्री साखळी तोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.
2024 मध्ये एनसीबीसह देशभरातील पोलिस यंत्रणांनी सुमारे 25,330 कोटी रुपये किमतीचे म्हणजेच आधीच्या वर्षापेक्षा 55 टक्के जास्त अंमली पदार्थ जप्त केले, 2023 मध्ये 16,100 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 2024 मध्ये अधिक हानीकारक आणि व्यसन वाढविणारे कृत्रिम अंमली पदार्थ, कोकेन व मनोविकारावरील औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
एटीएस अर्थात ऍम्फेटेमाईनसारखे उत्तेजक या कृत्रिम अंमली पदार्थामुळे मेंदू, ह्रदय व चेतासंस्थेचे नुकसान होते.
मेथाम्फेटेमाईन (मेथ): या स्फटिकासारख्या अंमली पदार्थामुळे मेंदू व ह्रदयावर घातक परिणाम होतात
कोकेन: या पांढऱ्या रंगाच्या पुडीमुळे ह्रदयविकार होऊ शकतो व व्यसनाधीनता बळावते.
मेफेड्रेन: पार्टीमध्ये घेतल्या जाणाऱ्या या अंमली पदार्थामुळे चिंता, गोंधळलेली स्थिती व ह्रदयाच्या समस्यांमध्ये वाढ होते.
हशीश: गांजापासून बनविलेल्या या पदार्थामुळे स्मृती व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

एनसीबीचा दशकातील कृती

गेली काही वर्षे अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी तोडण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) सुनियोजित राष्ट्रीय धोरणानुसार अथक प्रयत्न करत आहे. गेल्या दहा वर्षांत अंमली पदार्थ तस्करीच्या नोंद झालेल्या घटना, आरोपींना अटक करणे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण व किंमत यामध्ये मोठी वाढ झाली.
अंमली पदार्थांचा वापर व तस्करी रोखण्यासाठीच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांना बळ देण्यासाठी भारत सरकारने 17 मार्च 1986 या दिवशी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारी ही एनसीबी संस्था विविध यंत्रणांच्या माध्यमातून एनडीपीएस कायदा व संबंधित कायद्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या राज्यांमधल्या कारवाईच्या घटनांमध्ये समन्वय राखण्याचे काम करते. आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत समन्वय साधून अंमली पदार्थ विरोधी जागतिक प्रयत्नांना सहाय्य करण्याचे कामदेखील ही संस्था करते तसेच विविध मंत्रालयांसोबत अंमली पदार्थांशी संबंधित इतर समस्या सोडविण्यासाठीही काम करते.

अंमली पदार्थ विरोधाच्या देशव्यापी मोहीमेला गती देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागात प्रमुख रचनात्मक बदल करण्यात आले.
एनसीबीचा विस्तार
- क्षेत्रिय कार्यालये: यांची संख्या 3 वरुन 7 केली ( उदा. अमृतसर, गुवाहाटी, चेन्नई, अहमदाबाद)
- विभागीय कार्यालये: यांची संख्या 13 वरुन 30 केली. यामध्ये गोरखपूर, सिलिगुडी, आगरतळा, इटानगर व रायपूर येथील नवीन कार्यालयांचाही समावेश आहे.
- कर्मचारी संख्या: 536 पदे वाढवून कर्मचाऱ्यांची अधिकृत संख्या 1,496 करण्यात आली.
- नार्को-केनिन पूल: शोध मोहीमेच्या बळकटीकरणासाठी 10 विभागीय कार्यालयांमधे नार-के9 पथके तैनात करण्यात आली.
अंमली पदार्थ – दहशतवाद दुष्टचक्र संपविणे
अंमली पदार्थांची समस्या मुळातून नष्ट करण्याच्या प्रयत्नांमधील एक प्रमुख टप्पा म्हणजे 2024 मध्ये देशाच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली अंमली पदार्थ जप्तीची कारवाई. केंद्रिय गृह मंत्रालयाच्या नेतृत्वात अंमली पदार्थांची साखळी तोडून दोषींना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा दृष्टीकोन अमलात आणला जात आहे.
एनसीबी, नौदल व गुजरात पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 3132 किलो अंमली पदार्थाचा प्रचंड मोठा साठा ताब्यात घेतला गेला.
अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय व्यापार उघडकीस आणत गुजरातमध्ये सुरक्षा यंत्रणांनी आणि 700 किलोपेक्षा जास्त अवैध मेथॅम्फेटामाइन जप्त केले.
एनसीबीने नवी दिल्लीत 82.53 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले.
दिल्लीतील एका माल वाहतूक केंद्रात चालवल्या जाणाऱ्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी, तळापासून उच्चपदापर्यंत कारवाई करीत, सुमारे 900 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मोठी साठा जप्त करण्यात आला.
सुरक्षा यंत्रणांनी सागरी हद्दीत 2024 मध्ये एकंदर 4,134 किलो अंमली पदार्थ जप्त केले.
2024 मध्ये गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील सुरक्षा यंत्रणांनी 1,17,284 किलो अंमली पदार्थ नष्ट केले.
अंमली पदार्थ तस्करी रोखण्याचे उपाय
समग्र सरकारी दृष्टीकोनातून केंद्र सरकार गेली 5 वर्षे रचनात्मक, संस्थात्मक व माहितीसंबंधी सुधारणांच्या भक्कम पायावर अंमली पदार्थ विरोधी लढा लढत आहे.
- 4 स्तरीय एनकॉर्ड (नार्को – समन्वय केंद्र) यंत्रणा: एकात्मिक पोर्टलद्वारे सर्वोच्च स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व संबंधितांशी समन्वय
- अंमली पदार्थ विरोधी कृती दल (एएनटीएफ): एनकॉर्डच्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील समर्पित पथके
- संयुक्त समन्वय समिती (जेसीसी): एनसीबी महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या अंमली पदार्थ जप्ती व तपासावर देखरेख
- सीमा सुरक्षा व रेल्वे पोलिस: बीएसएफ (सीमा सुरक्षा दल), आसाम रायफल्स, एसएसबी (सशस्त्र सीमा बल), भारतीय तटरक्षक दल आणि आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) यांना एनटीपीएस कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी शोध, जप्ती व अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
एनडीपीएस कायदा (1985) हा अंमली पदार्थ प्रतिबंध व नियंत्रण आणि अवैध तस्करी रोखण्यासाठीचा भारतातील मुख्य कायदा आहे. या कायद्यान्वये अंमली पदार्थ व मनोविकारावरील औषधांचे वैद्यकीय अथवा शास्त्रीय कारणाशिवाय उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद यामध्ये असून व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी मदत करण्याचीही तरतूद आहे.
- आंतर यंत्रणा संयुक्त कारवाई: देशव्यापी कारवाईसाठी एनसीबी नौदल, तटरक्षक दल, बीएसएफ, राज्यांचे अंमली पदार्थ विरोधी विभाग आणि इतरांसोबत समन्वयाने काम करते.
- क्षमता बांधणी व प्रशिक्षण: सर्व अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांमध्ये सातत्याने व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
- डार्कनेट व क्रिप्टो कृती दल: सायबर विश्वातील अंमली पदार्थ तस्करी कल, देखरेख व कायद्यातील अद्ययावत सुधारणा यावर भर देणारे एमएसी स्तरीय युनिट
एमएसी म्हणजे अनेक यंत्रणांचा समावेश असलेले केंद्र. एमएसी स्तरावर भारतातील विविध गुप्तहेर व पोलिस यंत्रणा एकत्र येऊन माहितीचे आदानप्रदान करतात, कारवायांमध्ये समन्वय राखतात आणि अंमली पदार्थ तस्करी, दहशतवाद व संघटीत गुन्हेगारीशी संबंधित धमक्यांवर लक्ष ठेवतात.
- राष्ट्रीय मदत क्रमांक (मानस 1933): अंमली पदार्थांशी संबंधित शंका व माहितीसाठी 24 तास कार्यरत मोफत दूरध्वनी क्रमांक
- न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा मदत: राज्यांच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुधारणांसाठी केंद्राची मदत
- सागरी सुरक्षा समूह – एनएससीएस (राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय): नोव्हेंबर 2022 मध्ये स्थापन झालेली ही संस्था समुद्री मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे काम करते
- आंतरराष्ट्रीय सहकार्य: शेजारी देशांसोबत (म्यानमार, इराण, बांग्लादेश इ.) समुद्रातील व जमिनीवरील अंमली पदार्थ वाहतुकीच्या मार्गांबाबत महासंचालक स्तरावरील द्विपक्षीय चर्चा
अंमली पदार्थविरोधी लढा
अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने प्रतिबंध, उपचार व पुनर्वसनावर आधारित उपक्रम विकसित करुन देशभरात त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नशा मुक्त भारत अभियान (एनएमबीए)
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2020 रोजी नशा मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन या माध्यमातून ही अंमली पदार्थ विरोधी देशव्यापी मोहीम राबविली जाते.
एनएमबीए संकेतस्थळ: सर्वसमावेशक स्रोत, अद्ययावत आकडेवारी, इ प्रतिज्ञा पर्याय आणि तज्ज्ञांच्या नेतृत्वातील विचारमंच या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
एनएमबीए मोबाइल ॲप: स्वयंसेवकांच्या सहभागातून स्थानिक स्तरावर माहिती गोळा करणे व नियंत्रण

राष्ट्रीय विनाशुल्क मदत क्रमांक (14446): प्राथमिक समुपदेशन व तत्काळ संदर्भ सेवा पुरविली जाते.
अंमली पदार्थ मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा (एनएपीडीडीआर)
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने अंमलबजावणी सुरू केलेला अंमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीचा राष्ट्रीय कृती आराखडा ही केंद्र पुरस्कृत योजना खालील केंद्रांना आर्थिक मदत देते.
342 सर्वसमावेशक पुनर्वसन केंद्रे (आयआरसीए) – या केंद्रांमध्ये अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर निवासी उपचार केले जातात. तसेच समुपदेशन, व्यसनमुक्ती, उपचारानंतरची काळजी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामावण्यासाठीचे प्रयत्न केले जातात.
47 समाजाभिमुख समवयस्क हस्तक्षेप (सीपीएलआय) – याअंतर्गत 18 वर्षांखालील मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे व त्यांना जीवन कौशल्ये शिकविण्याचे उपक्रम राबविले जातात.
74 अंमली पदार्थबाधित व्यक्तींचा शोध व दाखल केंद्रे (ओडीआयसी) – या केंद्रांमध्ये व्यक्तीला सुरक्षित जागेत तपासणी, मूल्यांकन व समुपदेशन सेवा दिली जाते. त्यानंतरच्या काळासाठी संदर्भ पुरविले जातात तसेच उपचार व पुनर्वसन केंद्रांची माहिती दिली जाते.
83 व्यसनमुक्ती उपचार सुविधा केंद्रे (एटीएफ) – सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
53 जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र (डीडीएसी) – या केंद्रांमध्ये एकाच छताखाली आयआरसीए, ओडीआयसी व सीपीएलआय या तिनही केंद्रांमधील सुविधा उपलब्ध आहेत.
यशाच्या कहाण्या
काळजी, उपचार व मदत याद्वारे अंमली पदार्थ व्यसनमुक्तीच्या रमेशसारख्या (नाव बदलले आहे) असंख्य कहाण्या आहेत. आपल्या कुटुंबियांसोबत आनंदात राहणाऱ्या रमेशला एका अपघातामुळे आपली नोकरी गमवावी लागली. त्यामुळे त्याचे अवघे जगच बदलून गेले, तो भावनिकदृष्ट्या खचून गेला. आपल्या मानसिक स्थितीवर मात करण्याच्या प्रयत्नांत तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला. त्याच्याकडील सगळे पैसे संपले आणि तो व्यसनाच्या विळख्यात अडकला. अशावेळी रमेशची पत्नी आणि मुलगी त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्यांच्या मदतीने त्याने एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले. पुन्हा व्यसनाकडे वळल्यानंतरही व्यसनमुक्तीच्या प्रत्येक प्रयत्नात त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली. तीन वेळा उपचार घेतल्यानंतर रमेश पुन्हा उभा राहिला आणि आता तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असून साधे, समाधानी आयुष्य जगत आहे.
मध्य मुंबईत राहणारा सूरज (नाव बदलले आहे) महाविद्यालयात असताना अंमली पदार्थांचे सेवन करू लागला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या कुटुंबियांनी त्याला कृपा फाउंडेशन सर्वसमावेशक पुनर्वसन केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविले. निरंतर मानसोपचारांच्या मदतीने सूरज संयमी व आरोग्यपूर्ण जीवन जगू लागला. आज त्याच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे. वेळेत मिळालेली मदत व व्यसनमुक्तीची इच्छा एखाद्याचे भविष्य बदलू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
निष्कर्ष
समन्वित कृती, जागरुकता आणि पुनर्वसन याद्वारे अंमली पदार्थाच्या संकटावर मात करण्याची नितांत गरज आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व तस्करी विरोधी दिनानिमित्त जागतिक पातळीवर ही गरज पुनःपुन्हा व्यक्त केली जाते. शून्य सहिष्णुता धोरण, अंमलबजावणीतील गतीमानता आणि नशा मुक्ती भारत अभियानासारख्या लोकाभिमुख उपक्रमाद्वारे, सुरक्षित, आरोग्यपूर्ण व अंमलीपदार्थ मुक्त देशासाठी भारतात सातत्याने परिणामकारक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
संदर्भ
PIB Backgrounders:
United Nations Office on Drugs and Crime:
Ministry of Home Affairs
Ministry of Social Justice and Empowerment
Social Media Links:
International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking 2025
* * *
S.Tupe/S.Joshi/D.Rane
(Explainer ID: 154825)
आगंतुक पटल : 274
Provide suggestions / comments