Social Welfare

भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवण्यात इफ्फीचे योगदान

Posted On: 19 NOV 2026 3:24PM

नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2026

गोव्यातील 57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)

स्रोत: माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपटसृष्टीमध्ये लोकांना एकत्र आणण्याची एक अनोखी मोहिनी आहे. एखाद्या दुर्गम गावातील कथा हजारो मैल दूर असलेल्या प्रेक्षकांना भावूक करू शकते. एखाद्या अनोळखी भाषेतील चित्रपटही प्रत्येकाला समजतील अशा भावना व्यक्त करु शकतो. भौगोलिक सीमा आणि सांस्कृतिक भेदाच्या पलीकडे जाऊन कथा माणसांना एकमेकांशी जोडण्याचे मार्ग शोधतात. विविध आवाज, नवीन दृष्टिकोन आणि नव्या प्रतिभेला एका मंचावर आणत चित्रपट महोत्सव हे नातेसंबंध आणखीन दृढ करतात. 

कथाकथनाची हीच भावना 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. हा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' (सीमाविरहित कथा) ही महोत्सवाची यावर्षीची संकल्पना संस्कृती आणि देशांच्या सीमा ओलांडून लोकांना जोडण्याच्या चित्रपटाच्या सामर्थ्याचा गौरव करणारी आहे. नऊ दिवसांच्या या महोत्सवात जगभरातील चित्रपट निर्माते, उदयोन्मुख कलाकार आणि चित्रपटप्रेमी सहभागी होणार आहेत.

अर्थात, इफ्फी म्हणजे केवळ प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ नाही. एखाद्या तरुण चित्रपट निर्मात्यासाठी जागतिक चित्रपटसृष्टीशी होणारा त्याचा पहिला परिचय असू शकतो. एखाद्या प्रादेशिक कथाकारासाठी आपल्याला अवगत असलेली भाषा आणि सांस्कृती यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा अवसर असू शकतो. एखाद्या स्वतंत्र चित्रपट निर्मात्यासाठी, हे व्यासपीठ नवीन सहयोग आणि संधींची कवाडे खुली करणारी असू शकते. इफ्फी (IFFI) आपल्या विविध उपक्रमांद्वारे, प्रतिभेला प्रोत्साहन देत आहे, भारताच्या चित्रपटविषयक विविधतेचा उत्सव साजरा करत आहे आणि सोबतच जागतिक स्तरावरील संबंध अधिक दृढ करत आहेत. 

कथाकारांच्या पुढील पिढीचे संगोपन

प्रत्येक चित्रपट निर्मात्याच्या प्रवासाची सुरुवात एका कल्पनेने आणि ती प्रत्यक्षात आणण्याच्या जिद्दीने होते. मात्र, त्या कल्पनेला चित्रपटात रूपांतरित करण्यासाठी केवळ सर्जनशीलता पुरेशी नसते. त्यासाठी तांत्रिक कौशल्ये, सहयोग, चित्रपट उद्योगातील अनुभव आणि आपली क्षमता सिद्ध करण्याच्या संधींची गरज असते. इफ्फी हे अशाच महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वाची पावले उचलण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे. 

या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी 2021 मध्ये सुरू करण्यात आलेला 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' (सीएमओटी) हा उपक्रम आहे. इफ्फी (IFFI) 2026 मध्ये सादर होणाऱ्या या उपक्रमाच्या सहाव्या आवृत्तीत चित्रपट निर्मितीच्या 13 विविध क्षेत्रातील 100 तरुण प्रतिभावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये दिग्दर्शन, छायाचित्रण आणि पटकथा लेखनापासून ते ध्वनीमुद्रण, वेशभूषा आणि व्हिज्युअल इफेक्ट्स अशा विविध कलांचा समावेश आहे. चित्रपट निर्मिती ही अनेक सर्जनशील शाखांमधील व्यक्तींच्या एकत्रित योगदानावर अवलंबून असते हे या उपक्रमातून अधोरेखित होते.

या उपक्रमातील सहभागी प्रसिद्ध चित्रपट व्यावसायिकांच्या सोबतीने मार्गदर्शनपर सत्रे, कार्यशाळा आणि संवादांमध्ये सहभागी होतील. 48 तासांत चित्रपट निर्मिती करण्याच्या आव्हानाद्वारे या तरुणांच्या कल्पनांना पूर्ण चित्रपटांमध्ये रूपांतरित करण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल. या कार्यक्रमात 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ टॅलेंट कॅम्पचाही समावेश आहे. यामध्ये सहभागी होणारे तरुण आपल्या सर्जनशील संकल्पना सादर करतील, सोबतच माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील संधीचा शोध घेतील. एकत्रितपणे, हे उपक्रम पारंपरिक वर्गशिक्षणापलीकडील जाऊन प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावसायिक क्षेत्राची ओळख होण्याची संधी प्रदान करतील.

स्रोत: माहिती आणि प्रसारण मंत्रालय

या उपक्रमातून घडलेल्या तरुण चित्रपट निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली आहे. 2022 मधील 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो'मध्ये सहभागी चिदानंद एस. नाईक हे याचे उल्लेखनीय उदाहरण आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) विद्यार्थी असताना बनवलेल्या त्यांच्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या लघुपटाने 2024 मध्ये कान्स येथे ‘ला सिनेफ’ पुरस्कार पटकावला आहे. भारतीय लोककथा आणि परंपरांपासून प्रेरित असलेल्या या कन्नड भाषेतील चित्रपटाने, स्थानिक कथांमध्ये आंतरराष्ट्रीय आकर्षण बनण्याची क्षमता असल्याचे दर्शवले आहे. त्यांचा हा प्रवास उदयोन्मुख भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचे उदाहरण आहे.

2026 च्या महोत्सवात चित्रपट निवडीमध्येही नव्या प्रतिभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महोत्सवात भारत आणि इतर देशातील 52 महिला चित्रपट निर्मात्या तसेच 62 नवोदित चित्रपट दिग्दर्शक यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी 10 महिला चित्रपट निर्मात्या आणि 12 नवोदित चित्रपट दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा स्पर्धात्मक विभागात समावेश आहे. विविध देशांतील सात चित्रपट, ज्यात भारताच्या 'द स्लेज' आणि 'बर्ड्स ऑन आइस' यांचा समावेश असून ते 'सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट' स्पर्धेतही भाग घेणार आहेत. अशा व्यासपीठामुळे नवोदित दिग्दर्शकांना प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांसोबत आपले काम सादर करण्याची संधी मिळते.

'इफ्फी' प्रतिभावंतांमधील प्रतिभेच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर व्यासपीठ उपलब्ध करून देते. काही सहभागी चित्रपट निर्मितीची कला शिकत असतात, तर काही जण त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी ओळख मिळवू पाहत असतात. हा महोत्सव या सर्वांना एकत्र आणतो तसेच नवीन कल्पना आणि उदयोन्मुख प्रतिभेला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवून देतो.

भारतीय पॅनोरमा: विविध भारतीय भाषांमधील चित्रपट

भारताचे चित्रपटविश्व हे त्याला आकार देणाऱ्या समुदाय आणि संस्कृतींइतकेच वैविध्यपूर्ण आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या पलीकडे, देशाच्या प्रादेशिक भाषा आणि चित्रपट निर्मितीच्या परंपरांमधून असंख्य कथा उदयास येतात. काही कथा परिचित मानवी अनुभवांचे अन्वेषण करतात, तर काही पडद्यावर क्वचितच दिसणारे जीवन उलगडतात. हे विविध दृष्टिकोन एकत्र आणणे, हे इफ्फीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

1978 मध्ये सुरू झालेला 'इंडियन पॅनोरमा' हा विभाग या प्रयत्नात मध्यवर्ती भूमिका बजावतो. इफ्फीचा हा प्रमुख विभाग उत्कृष्ट समकालीन भारतीय कथा आधारित चित्रपट आणि कथाबाह्य चित्रपट प्रदर्शित करतो.

स्रोत: माहिती आणि प्रसारण मंत्रालय

गेल्या काही वर्षांत, इंडियन पॅनोरमाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक कथांना प्रकाशात आणले आहे. इफ्फी 2023 मध्ये, 'अँड्रो ड्रीम्स' या मणिपुरी माहितीपटाने कथाबाह्य विभागाची सुरुवात केली. मीना लोंगजाम दिग्दर्शित या माहितीपटात ग्रामीण मणिपूरमधील मुलींच्या फुटबॉल क्लबची कथा दाखवण्यात आली होती. आर्थिक अडचणी आणि खोलवर रुजलेल्या सामाजिक अडथळ्यांमध्ये महिलांचा दृढनिश्चय या चित्रपटाने उलगडला होता. 2024 मध्ये, 'घर जैसा कुछ' या लडाखी लघुपटाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. इंडियन पॅनोरमाच्या कथाबाह्य विभागाचे उद्घाटन करणारा हा पहिला लडाखी चित्रपट ठरला. दिग्दर्शक हर्ष संगानी यांच्या या चित्रपटाने विस्थापन, आपलेपणाची भावना आणि घराची ओढ या भावनांचा वेध घेतला.

2025 मध्ये प्रस्थापित तसेच कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या चित्रपट परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांमुळे ही विविधता कायम राहिली. कथा आधारित चित्रपट विभागाच्या उद्घाटनासाठी तमिळ चित्रपट 'अमरन'ची, तर कथाबाह्य चित्रपट विभागासाठी हिंदी चित्रपट 'काकोरी'ची निवड करण्यात आली. निवडलेल्या चित्रपटांमध्ये ब्रज भाषेतील 'विमुक्त', तुलू भाषेतील 'इम्बू' आणि मणिपुरी भाषेतील 'ओइथारेई' यांचाही समावेश होता. 'इंडियन पॅनोरमा'च्या माध्यमातून सादर होणाऱ्या कथांची वाढती भाषिक विविधता या चित्रपटांमधून दिसून आली.

57 वा 'इफ्फी' 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपटांसह ही परंपरा पुढे नेत आहे. यांची निवड अनुक्रमे 404 फीचर प्रवेशिका आणि 358 नॉन-फीचर प्रवेशिकांमधून करण्यात आली आहे. एकूणच, 'इंडियन सिनेमा' विभागामध्ये 18 भाषांतील 76 चित्रपट दाखवले जातील. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या सुरुवातीच्या कथापटासोबतच लीना यादव दिग्दर्शित 'बिकमिंग' या लडाखी चित्रपटाने कथाबाह्य विभागाची सुरुवात होईल. इतर निवडक चित्रपटांमध्ये न्यिशी भाषेतील 'उरूम', तुळू भाषेतील 'पिली चन्ने' आणि लडाखी भाषेतील 'बर्ड्स ऑन आइस' यांचा समावेश आहे. या महोत्सवात मराठी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीवरही विशेष भर दिला जाणार असून, त्यांचा वारसा आणि समकालीन संदेशांचा गौरव केला जाईल.

पिली चन्ने

बर्ड्स ऑन आइस

अशा प्रकारच्या निवडींवरून भारतीय चित्रपटसृष्टीत विविध आवाजांना स्थान देण्याचे महत्त्व दिसून येते. एखादा प्रादेशिक चित्रपट प्रेक्षकांची अनोळखी भूप्रदेश, परंपरा आणि अनुभवांशी ओळख करून देऊ शकतो. तरीही, त्यातील मूळ आशय मनाला खोलवर भिडणारा आणि आपलासा वाटणारा असू शकतो. या कथा एकत्र आणून, 'इंडियन पॅनोरमा' भारताच्या चित्रपटविषयक ओळखीची समज अधिक व्यापक करतो. तसेच, चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशापलीकडील प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी एक व्यासपीठही उपलब्ध करून देतो.

वेव्हज फिल्म बझार' आणि ब्रिक्स विशेष सादरीकरण

शेवटचे दृश्य चित्रित झाल्यानंतर चित्रपटाचा प्रवास संपत नाही. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा आर्थिक पाठबळ, चित्रपटसृष्टीतील संपर्क आणि परिचित बाजारपेठांपलीकडील संधींची आवश्यकता असते. स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी या संधी शोधणे विशेषत्वाने कठीण असू शकते. गेल्या काही वर्षांत, असे संपर्क करून देऊ शकतील असे एक व्यासपीठ म्हणून 'इफ्फी' विकसित झाले आहे.

असेच एक व्यासपीठ म्हणजे 'वेव्हज फिल्म बझार', जे 2026 मध्ये आपले 20 वे वर्ष साजरे करत आहे. 2007 मध्ये स्थापन झालेली ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी चित्रपट बाजारपेठ असून, गोव्यात 'इफ्फी'सोबत तिचे आयोजन केले जाते. पारंपरिक चित्रपट महोत्सवापेक्षा वेगळे म्हणून, 'फिल्म बझार' चित्रपटसृष्टीचा व्यवसाय आणि विकासावर लक्ष केंद्रित करते. हे जगभरातील चित्रपट निर्माते, निर्माते, वित्तपुरवठादार, वितरक आणि चित्रपट क्षेत्रातील इतर व्यावसायिकांना एकत्र आणते. चित्रपटांच्या आश्वासक प्रकल्पांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवून देणे हा याचा उद्देश आहे.

एखाद्या चित्रपटाच्या आश्वासक संहितेला  निर्मात्याची गरज असू शकते, तर एखाद्या अपूर्ण चित्रपटाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असू शकते. दुसरा एखादा चित्रपट वितरणासाठी तयार असू शकतो, पण त्याला आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नसते. 'फिल्म बझार' विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून या विविध गरजा पूर्ण करते. तिथले 'को-प्रॉडक्शन मार्केट' प्रकल्पांना संभाव्य सहयोगी आणि वित्तपुरवठादारांशी जोडते. 'स्क्रीनरायटर्स लॅब'  लेखकांना सहाय्य करते, तर 'वर्क-इन-प्रोग्रेस लॅब'  चित्रपट निर्मात्यांना आपले चित्रपट अधिक सुबक आणि परिपूर्ण करण्यास मदत करते. 'व्ह्यूइंग रूम', मार्केट स्क्रीनिंग्ज आणि 'प्रोड्यूसर्स लॅब'  चित्रपट निर्मात्यांना संभाव्य खरेदीदार आणि वितरकांशी जोडण्यास मदत करतात.

या प्रयत्नांचा प्रभाव या व्यासपीठाशी जोडल्या गेलेल्या चित्रपटांमधून दिसून येतो. 'द लंचबॉक्स', 'कोर्ट', 'न्यूटन' आणि 'गर्ल्स विल बी गर्ल्स' हे अशा काही प्रशंसनीय चित्रपटांपैकी आहेत, ज्यांच्या प्रवासात या व्यासपीठाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. 'फिल्म बझार' आपली 2 दशके पूर्ण करत असताना, त्याचे महत्त्व केवळ वैयक्तिक चित्रपटांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रेक्षकांच्या शोधात असलेल्या भारतीय कथाकारांसाठी संधींचे एक वाढते जाळे म्हणून ते ओळखले जाते.

फिल्म बझार' चित्रपटांना नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास मदत करत असतानाच, चित्रपट सामायिक अनुभवांच्या माध्यमातून राष्ट्रांना जोडण्याचे कामही करतो. या सांस्कृतिक पैलूचे दर्शन 'इफ्फी'च्या ब्रिक्स  चित्रपट विशेष सादरीकरणातून घडते, ज्यामध्ये 2026 मध्ये 21 चित्रपटांचा समावेश आहे. ब्रिक्स देशांतील कथा एकत्र आणून, हा कार्यक्रम विविध इतिहास, समाज आणि समकालीन वास्तवांचा शोध घेतो. हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवांपलीकडील घटनांमधून आकाराला आलेल्या दृष्टिकोनांचा परिचय करून घेण्याची संधी देतो.

ही निवड या समाजांची विविधता आणि त्यांना जोडणारे समान प्रश्न या दोन्हींचे प्रतिबिंब दाखवते. ब्राझीलचा 'अमादेओ अँड द हायपोथेटिकल न्यू वर्ल्ड' गुलामगिरीविरुद्धच्या संघर्षाचा पुन्हा मागोवा घेतो. इंडोनेशियाचा 'द सी स्पीक्स हिज नेम' देशातील 1998 च्या जनआंदोलनादरम्यान बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थी कार्यकर्त्याचा शोध घेतो. दक्षिण आफ्रिकेचा 'द ट्रेक' वसाहतवादी सीमेवरील अन्यायाचे परीक्षण करतो. जरी हे चित्रपट वेगवेगळ्या इतिहासांत रुजलेले असले, तरी ते स्वातंत्र्य, ओळख आणि आपलेपणाच्या प्रश्नांचा शोध घेतात.

ड्रीमिंग ऑफ सेरेनाडा

एम्बर्स

इतर चित्रपट दैनंदिन जीवनाशी अधिक जवळीक साधणाऱ्या अनुभवांकडे वळतात. युगांडा-यूकेचा 'ड्रीमिंग ऑफ सेरेनाडा' हा माहितीपट वडील आणि मुलीच्या नात्याच्या माध्यमातून हवामान बदलाचा वेध घेतो. चीनचा 'एम्बर्स' हा चित्रपट दुःख, हानी आणि नश्वरतेवर चिंतन करतो. अशा कथा वैयक्तिक अनुभव मोठ्या सामाजिक समस्यांवर कसा प्रकाश टाकू शकतात हे दर्शवतात. तसेच, वेगवेगळ्या समाजांतील कथांमध्ये समान भावनिक धागा कसा सापडू शकतो हे देखील यातून दिसून येते.

ब्रिक्स (BRICS) विशेष सादरीकरण राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक समज आणि संवाद वाढवण्यात चित्रपटांची असलेली भूमिका अधोरेखित करते. ज्या कथा कदाचित आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी अपरिचित राहिल्या असत्या, अशा कथांसाठी हे व्यासपीठ स्थान निर्माण करते. 'फिल्म बझार'सोबतच, हे सादरीकरण 'इफ्फी'च्या वाढत्या जागतिक सहभागाला एक नवा आयाम देते. एक व्यासपीठ व्यावसायिक संबंध प्रस्थापित करते, तर दुसरे चित्रपट आणि कथाकथनाच्या माध्यमातून संवादाला प्रोत्साहन देते.

ही दोन्ही व्यासपीठे मिळून महोत्सवाच्या 9 दिवसांच्या पलीकडे जाऊन 'इफ्फी'चा प्रभाव कसा विस्तारतो, हे दाखवून देतात. ते चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन शक्यता आणि प्रेक्षकांसाठी ताजे दृष्टिकोन घेऊन येतात. अधिक महत्त्वाचे म्हणजे, सहकार्य आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट लोकांना कसे जोडू शकतात, हे यातून दिसून येते.

एक असा महोत्सव जिथे कथांचा नवीन प्रवास सुरू होतो

चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपटांचे प्रदर्शन, पुरस्कार आणि सोहळ्यांपेक्षा खूप काही अधिक असतो. तो महोत्सवाच्या पलीकडेही टिकून राहणाऱ्या संधी आणि संबंध निर्माण करतो. उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी या भेटीगाठी नवीन शक्यतांची दारे उघडू शकतात. प्रादेशिक आणि स्वतंत्र चित्रपटसृष्टीसाठी त्या अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात. या सर्व संधी मिळून अधिक विविधतापूर्ण आणि जागतिक स्तरावर जोडल्या गेलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत योगदान देतात.

'सीमाविरहित कथा' ही संकल्पना प्रेक्षकांनी अनुभवलेल्या कथांमध्ये आणि त्या घडवणाऱ्यांच्या कामामध्ये प्रतिबिंबित होते. 57 वा 'इफ्फी' प्रतिभा, सर्जनशीलता आणि संस्कृतींना एकत्र आणत असताना, लोकांना जोडण्याच्या चित्रपटाच्या सामर्थ्याला अधिक बळकटी देतो. कोणत्याही महोत्सवाचे चिरस्थायी योगदान हे त्याने सादर केलेल्या चित्रपटांमध्ये आणि ते चित्रपट व त्यांचे निर्माते पुढे जाऊन काय कामगिरी करतात, यामध्ये दडलेले असते.

संदर्भ

Ministry of Information and Broadcasting

 

Click here to see pdf

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/गोपाळ चिप्‍पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/शैलेश पाटील/दर्शना राणे

(Features ID: 160876) आगंतुक पटल : 9
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam