• Sitemap
  • Advance Search
Technology

7 वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026

प्रविष्टि तिथि: 08 SEP 2026 18:06 PM

नवी दिल्ली,  8 सप्टेंबर 2026

प्रभाव पाडण्याची क्षमता

 

फिनटेक क्रांतीला चालना

भारत आपल्या व्याप्ती, नवोन्मेष आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) च्या माध्यमातून जागतिक फिनटेक क्षेत्राला नव्याने आकार देत आहे. आधारची सुरुवात, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) च्या विकासामुळे वित्तीय सेवांमध्ये मोठे परिवर्तन घडले. या नवोन्मेषामुळे मोठ्या लोकसंख्येसाठी डिजिटल ओळख, त्वरित पेमेंट आणि संमती-आधारित डेटा शेअरिंग शक्य झाले. तंत्रज्ञानाच्या वापरातून वित्तीय सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक कशा बनवल्या जाऊ शकतात, हे भारताच्या अनुभवातून सिध्द होते.

या परिवर्तनामुळे भारत फिनटेक नवोन्मेष आणि डिजिटल फायनान्ससाठी एक जागतिक केंद्र म्हणून स्थापित झाला आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2026 हे या क्षेत्रात भारताचा वाढता जागतिक प्रभाव अधोरेखित करते. जीएफएफ’ची 7 वी आवृत्ती 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान मुंबईत आयोजित केली जात आहे. वित्तीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक संवाद, सहयोग आणि नवोन्मेषासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

2020 मध्ये स्थापना झाल्यापासून, जीएफएफ जगातील अग्रगण्य फिनटेक संमेलनांपैकी एक बनले आहे. याची वाढ भारताच्या डिजिटल वित्तीय रचना आणि फिनटेक क्षमतांमध्ये वाढत्या जागतिक स्वारस्याचे द्योतक आहे. हा महोत्सव भारताचा अनुभव जगासमोर मांडण्यासाठी आणि जागतिक नवोन्मेषकांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच, तो विकसित अर्थव्यवस्था, उदयोन्मुख बाजारपेठा आणि ग्लोबल साउथ देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करतो.

जीएफएफ 2026 च्या यशास चालना देणाऱ्या संस्था

पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल (एफसीसी) हे जीएफएफ’चे प्रमुख आयोजक आहेत. याव्यतिरिक्त, जीएफएफ 2026 ला खालील संस्थांचे सहकार्य लाभले आहे:

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय

नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (नेस्ट) विभाग, परराष्ट्र मंत्रालय

नीति आयोग

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी)

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए)

निवृत्तीवेतन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)

जीएफएफ 2026 - वित्तीय नवोन्मेषाच्या पुढील पर्वाला चालना

ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 ही केवळ एक परिषद नाही. हा जगातील सर्वात मोठा फिनटेक महोत्सव आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भविष्याला आकार देण्यासाठी सर्वोत्तम प्रतिभांना एकत्र आणतो. जीएफएफ’च्या प्रवासातील प्रत्येक आवृत्ती नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकास तसेच समृद्धीच्या सामायिक दृष्टिकोनाने प्रेरित आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्ट - संकल्पना आणि कार्यसूची

जीएफएफ 2026 ची संकल्पना आहे “प्रभाव पाडण्याची क्षमता: एजेंटिक एआय | टोकनायझेशन | क्वांटम: सर्वसमावेशक वित्तासाठी विश्वसनीय, परस्पर जोडलेल्या, जागतिक प्रणाली.” जागतिक वित्त व्यवस्थेला स्वायत्त, प्रोग्राम करण्यायोग्य आणि सुरक्षित परिसंस्थांकडे नेणाऱ्या तीन मूलभूत तंत्रज्ञानावर ही संकल्पना आधारित आहे.

एजेंटिक एआय: हे आर्थिक प्रणालींना मजबूत प्रशासकीय चौकटीत राहून रिअल-टाइममध्ये परिस्थिती समजून घेण्यास, निर्णय घेण्यास आणि कृती करण्यास सक्षम करते. हे तंत्रज्ञान संपूर्ण कार्यप्रवाहांचे सुसूत्रिकरण करते, नियामक देखरेख मजबूत करते, फसवणूक प्रतिबंध वाढवते आणि मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने वैयक्तिक घरी अनुसार वित्तीय सेवा उपलब्ध करून देते. तसेच, समजण्यास सुलभाषा बुद्धिमान प्रणाली द्वारे मानवी निरीक्षमतेला सक्षम करते.

टोकनायझेशन: हे मालमत्तांना प्रोग्राम करण्यायोग्य डिजिटल युनिट्समध्ये रूपांतरित करते. यामुळे मालमत्तेची अंशात्मक मालकी, त्वरित व्यवहार निपटारा आणि परस्परशी संघक डिजिटल चलन शक्य होते. तरलता वाढवून आणि वित्तीय सेवन पर्यंतचा प्रवेश अधिक लोकशाहीवादी बनवून हे तंत्रज्ञान भांडवली बाजार, पेमेंट व्यवस्था आणि जागतिक वित्तीय प्रणालीतील सहभागाचे स्वरूप बदलत आहे.

क्वांटम: क्वांटम तंत्रज्ञान संगणकीय क्षमता आणि सुरक्षितेच्या क्षेत्रात एक मूलभूत बदल घडवून आणते. क्वांटम-सुरक्षित क्रिप्टोग्राफीपासून ते प्रगत जोखीम व्यवस्थापनापर्यंतच्या विविध उपायांमुळे वित्तीय पायाभूत सुविधांची प्रणालीगत सक्षमता मजबूत होते आणि भविष्यातील वित्तीय व्यवस्थेवरील दीर्घकालीन विश्वास निश्चित होतो.

जीएफएफ 2026 ची कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फिनटेक समजून घेऊया

फिनटेकचे वर्णन एक असा उद्योग म्हणून केले जाते, जो वित्तीय प्रणाली आणि वित्तीय सेवा वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. याचा अर्थ "तंत्रज्ञानाने सक्षम केलेला वित्तीय नवोन्मेष" असा होतो. यात नवीन व्यवसाय प्रारुपे, ॲप्लिकेशन्स, प्रक्रिया किंवा उत्पादने विकसित होऊ शकतात आणि त्यांचा आर्थिक बाजारपेठा, संस्था तसेच आर्थिक सेवांच्या वितरणावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.

फिनटेकद्वारे वापरले जाणारे प्रमुख सक्षम तंत्रज्ञान

एपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस): एपीआयमध्ये नियम आणि वैशिष्ट्यांचा एक संच असून त्याचा वापर सॉफ्टवेअर प्रोग्रामकडून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जातो. ते इतर ॲप्लिकेशन्सच्या आधारावर नवीन ॲप्लिकेशन्स तयार करण्यास परवानगी देतात.

क्लाउड कॉम्प्युटिंग: संगणकीय क्षमतेचा विस्तार आणि सक्षमता वाढवण्यासाठी होस्टिंग प्रोसेसरच्या ऑनलाइन नेटवर्कचा ('क्लाउड') वापर करण्याची पद्धत. या पद्धतीने खर्चात बचत होते.

बायोमेट्रिक्स: व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरता येणाऱ्या विशिष्ट आणि मोजता येण्याजोग्या मानवी शारीरिक किंवा जैविक वैशिष्ट्यांचा अभ्यास.

डीएलटी (डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी): मालमत्ता किंवा व्यवहारांची नोंद करण्यासाठीची एक डिजिटल प्रणाली, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी तपशील नोंदवले जातात.

बिग डेटा: प्रचंड प्रमाणात असलेला संरचित किंवा असंरचित डेटा, जो डिजिटल साधने आणि माहिती प्रणालींद्वारे तयार केला जाऊ शकतो, त्याचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि तो वापरला जाऊ शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एमएल (मशीन लर्निंग): मानवी क्षमतेची आवश्यकता असलेली कार्य पार पाडू शकणाऱ्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. मशीन लर्निगमध्ये संगणक मानवी हस्तक्षेपाशिवाय डेटामधून शिकतात.

 

फिनटेकचे महत्त्व आणि फायदे

फिनटेकमध्ये वित्तीय क्षेत्राचे मूलभूत स्वरुप बदलण्याची क्षमता आहे. यामुळे ग्राहकांना अधिक स्पर्धात्मक किमतींवर आर्थिक उत्पादनांचे व्यापक पर्याय उपलब्ध होतात. तसेच वित्तीय संस्थांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येते. फिनटेकमुळे अर्थव्यवस्थांमध्ये कार्यक्षमता, सर्वसमावेशकता आणि वित्तीय स्थिरतेमध्ये मोजता येण्याजोगे फायदे मिळत आहेत.

वित्तीय क्षेत्राला अधिक कार्यक्षम बनवण्यात फिनटेकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) द्वारे जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट प्रणाली म्हणून यूपीआय’ला मान्यता दिली आहे. यूपीआय’द्वारे केवळ जुलै 2026 मध्येच 29.88 लाख कोटी रुपयांचे 2,365.8 कोटी व्यवहार झाले. यूपीआय या व्यासपीठावर 741 बँका कार्यरत होत्या. आर्थिक वर्ष 2016-17 पासून व्यवहारांच्या संख्येत जवळपास 12,000 पटींनी वाढ झाली आहे.

माहितीतील असमतोल किंवा व्यवहारांचा जास्त खर्च यांसारख्या बाजारपेठेतील अडथळ्यांवर मात करून फिनटेक वित्तीय समावेशनाला चालना देण्यास मदत करते. भारताचा वित्तीय समावेश निर्देशांक मार्च 2017 मधील 43.4 वरून मार्च 2026 मध्ये 70.0 पर्यंत वाढला आहे.

फिनटेकच्या वाढीमुळे पारंपरिक बँकिंग प्रणालींच्या पलीकडे पतपुरवठ्याचे स्रोत वैविध्यपूर्ण होत आहेत. पतपुरवठ्यातील अधिक विविधतेमुळे मोजक्या बँकांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. यामुळे आर्थिक परिसंस्थेची सक्षमता, स्पर्धात्मकता आणि स्थिरता अधिक मजबूत होऊ शकते.

भारताच्या फिनटेक यशाचा भक्कम पाया

भारताचे फिनटेक क्षेत्रातील यश हे डिजिटल इंडिया आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) यामध्ये गेल्या दशकभरात करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर आधारित आहे. या पायाभूत व्यवस्थेमध्ये सार्वत्रिक उपलब्धता, डिजिटल ओळख, परस्पर-सुसंगत डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि खुल्या डिजिटल नेटवर्क्सचा समावेश आहे. या क्षमतांमुळे आर्थिक क्षेत्रातील नवोन्मेष वेगाने आणि सर्वसमावेशक पद्धतीने विस्तारू शकणारी परिसंस्था निर्माण झाली आहे.
[अधिक वाचण्यासाठी: भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा]

  • JAM त्रिसूत्री: जनधन–आधार–मोबाईल (JAM) त्रिसूत्री डिजिटल आर्थिक समावेशनाचा पाया आहे. जनधन खाती औपचारिक बँकिंग सेवांपर्यंत पोहोच उपलब्ध करून देतात, तर आधार सुरक्षित डिजिटल ओळख सक्षम करतो. इंटरनेटच्या वाढत्या उपलब्धतेमुळे नागरिकांना डिजिटल वित्तीय सेवांशी जोडणे शक्य झाले आहे. 26 ऑगस्ट 2026 पर्यंत 59.15 कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून, मार्च 2026 पर्यंत आधार नोंदणी 144 कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे देशभरात फिनटेक सेवांसाठी मोठा आणि सहज उपलब्ध पाया निर्माण झाला आहे.
  • युपीआय: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) भारतातील डिजिटल व्यवहारांना सक्षम करणारी परस्पर-सुसंगत डिजिटल पेमेंट पायाभूत व्यवस्था उपलब्ध करून देते. ऑगस्ट 2026 मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 24,509 दशलक्ष इतकी झाली. जागतिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणापैकी जवळपास 50% व्यवहार युपीआयच्या माध्यमातून होतात आणि ही प्रणाली 11 देशांमध्ये कार्यरत आहे. या खुल्या पायाभूत व्यवस्थेमुळे फिनटेक कंपन्यांना मोठ्या लोकसंख्येपर्यंत नाविन्यपूर्ण पेमेंट सेवा पोहोचवणे शक्य झाले आहे.
  • डिजिटल ओळख आणि कागदपत्रे: सुरक्षित आणि कार्यक्षम वित्तीय सेवांसाठी विश्वासार्ह डिजिटल ओळख अत्यावश्यक आहे. आधार ई-केव्हायसी डिजिटल ग्राहक पडताळणी सुलभ करते, तसेच कागदपत्रांची गरज आणि सेवा सुरू करण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. 29 जून 2026 पर्यंत आधार ई-केव्हायसीच्या माध्यमातून 2,458 कोटींपेक्षा अधिक व्यवहार प्रक्रिया करण्यात आले आहेत. डिजीलॉकरचे 73.53 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असून, त्यामध्ये 936.03 कोटी कागदपत्रे जारी करण्यात आली आहेत. या डिजिटल प्रणालींमुळे विश्वास अधिक मजबूत होण्यासोबतच वित्तीय सेवांमध्ये ग्राहकांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुलभ झाली आहे.
  • डिजिटल कल्याणकारी योजनांचे वितरण: थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेअंतर्गत डिजिटल वित्तीय पायाभूत सुविधांचा वापर करून लाभार्थ्यांना मिळणारे लाभ थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातात. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होते, पारदर्शकता वाढते आणि सरकारी लाभांचे जलद वितरण शक्य होते. सप्टेंबर 2026 पर्यंत एकूण थेट लाभ हस्तांतरण ₹53.26 लाख कोटींवर पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील डिजिटल हस्तांतरणामुळे भारताच्या वित्तीय पायाभूत व्यवस्थेची सेवा कार्यक्षमतेने पोहोचवण्याची क्षमता अधोरेखित होते.
  • खुल्या डिजिटल वाणिज्याची व्यवस्था: डिजिटल वाणिज्यासाठी खुल्या नेटवर्कने (ONDC) भारताची परस्पर-सुसंगत डिजिटल व्यवस्था पेमेंटच्या पलीकडे विस्तारली आहे. जून 2026 पर्यंत ONDCने 1,000 पेक्षा अधिक शहरांमधील 20 कोटींहून अधिक खरेदीदार आणि 5 लाख विक्रेत्यांपर्यंत पोहोच मिळवली होती. त्यातील वित्तीय सेवा श्रेणी डिजिटल वित्तीय उत्पादनांसाठी अतिरिक्त संधी निर्माण करत आहे. या खुल्या संरचनेमुळे फिनटेक कंपन्यांना नवीन वापरकर्ते आणि बाजारपेठांपर्यंत अधिक कार्यक्षमतेने पोहोचण्यास मदत होऊ शकते.

भक्कम आणि विश्वासार्ह नियामक परिसंस्था

भारताच्या फिनटेक क्षेत्राचा विस्तार होत असताना, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल वित्तीय व्यवस्थेवरील सार्वजनिक विश्वासाचा आधार असलेली नियामक आणि ग्राहक संरक्षणाची व्यवस्था सातत्याने अधिक मजबूत केली आहे.

  • स्वयं-नियमन आणि मानके: रिझर्व्ह बँकेच्या फिनटेक क्षेत्रातील स्वयं-नियामक संस्थांसाठीच्या चौकटीने (SRO-FT, मे 2024) उद्योगातील नैतिक आचरण, बाजारपेठेची अखंडता आणि तक्रार निवारणाला प्रोत्साहन दिले आहे.
  • पेमेंट सुरक्षा: रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल पेमेंट सुरक्षा नियंत्रणांसंदर्भातील (2021) मास्टर निर्देशांद्वारे इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगसह विविध पेमेंट माध्यमांसाठी किमान सुरक्षा मानके अनिवार्य करण्यात आली आहेत. यामुळे वेब आणि मोबाईल अॅपवरील धोक्यांचा सामना करण्यास मदत होते. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळ NPCIने युपीआय़ व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)/मशीन लर्निंग (ML) आधारित फसवणूक निरीक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे.
  • डेटा संरक्षण: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्यक्तींच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी Digital Personal Data Protection Act, 2023 आणि Digital Personal Data Protection Rules, 2025 अधिसूचित केले आहेत.
  • सुरक्षित नवोन्मेषाची चाचणी: भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2019 मध्ये नियामक चाचणी चौकट (Regulatory Sandbox framework) सुरू केले. यामुळे नाविन्यपूर्ण वित्तीय उत्पादने आणि सेवांची नियंत्रित नियामक वातावरणात चाचणी घेता येते, तसेच आवश्यकतेनुसार नियामक सवलतींसह किंवा त्याशिवाय त्यांचे परीक्षण करता येते.
  • डिजिटल कर्जवितरणातील ग्राहक संरक्षण: अधिक मजबूत नियामक चौकट, डिजिटल कर्जवितरण अॅप्स (DLA) निर्देशिका आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठीच्या यंत्रणांद्वारे नागरिकांना फसव्या कर्ज अॅप्सपासून संरक्षण दिले जात आहे. यामध्ये राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (cybercrime.gov.in) आणि 1930 हेल्पलाइन यांचा समावेश आहे. तसेच, नागरिकांसाठी उपलब्ध सचेत पोर्टल बेकायदेशीर ठेवी स्वीकारण्यासंदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते.

नियामक दृष्टिकोन केवळ बाजारपेठेत नवोन्मेष आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित नाही. जबाबदार नवोन्मेषाची चाचणी, मूल्यमापन आणि त्याला पाठबळ देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे, हा या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे.

पुढील वाटचाल

भारताची फिनटेक परिसंस्था व्यापकता, परस्पर-सुसंगतता, नवोन्मेष आणि संस्थात्मक विश्वास या चार आधारस्तंभांवर उभी आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सुलभ, परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांसाठी भक्कम पाया उपलब्ध करून देत आहेत. पुढील टप्प्यात डिजिटल सार्वभौमत्व, तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता आणि जबाबदार नवोन्मेष अधिक दृढ करण्यावर भर देणे आवश्यक आहे. खुली डिजिटल व्यासपीठे नागरिक, स्टार्ट-अप्स आणि व्यवसायांसाठी तंत्रज्ञान अधिक लोकाभिमुख आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यास मदत करू शकतात.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि कार्यक्षम वित्तीय सेवा उपलब्ध होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, टोकनायझेशन, ब्लॉकचेन आणि क्वांटम तंत्रज्ञान वित्तीय परिसंस्थेत नवीन संधी निर्माण करू शकतात. डिजिटल वित्तीय सेवांचा विस्तार होत असताना मजबूत सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण आणि ग्राहक संरक्षणाच्या उपाययोजना अत्यावश्यक राहतील. फिनटेकमधील नवोन्मेष लोककेंद्रित प्रशासन, समावेशन आणि सार्वजनिक हित यांना केंद्रस्थानी ठेवूनच पुढे जाणे आवश्यक आहे.

भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथ देशांसोबत भागीदारी करून आपले डिजिटल कौशल्य आणि अनुभव अधिक व्यापकपणे सामायिक करू शकतो. यामुळे सर्वसमावेशक डिजिटल वित्तीय प्रणाली उभारण्यात भारताची विश्वासार्ह भागीदार म्हणून भूमिका अधिक मजबूत होऊ शकते.

पुढील वाटचाल सार्वभौम, सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल वित्तीय परिसंस्था उभारण्याची आहे. हा दृष्टिकोन भारताला लोककेंद्रित डिजिटल वित्तीय व्यवस्थेच्या भविष्याला आकार देणारा जागतिक नेता म्हणून स्थान मिळवून देऊ शकतो.

Global FinTech Fest

PIB

Ministry of Finance

National Payments Corporation of India

Reserve Bank of India

Others

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नेहा कुलकर्णी/ श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर

(तथ्य सामग्री आईडी: 151002) आगंतुक पटल : 24


Provide suggestions / comments
इस विश्लेषक को इन भाषाओं में पढ़ें : English , Bengali , हिन्दी , Kannada , Urdu , Assamese