Social Welfare
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि अपार (APAAR)
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2026 20:42 PM
नवी दिल्ली, 4 जुलै 2026
भारतातील आजीवन शिक्षण व्यवस्थेची उभारणी
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स: एक आढावा
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) हा शिक्षण मंत्रालयाचा एक महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी उपक्रम असून, त्याचे नियमन विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) करतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला अधिक लवचिक आणि सक्षम बनविण्यासाठी विकसित करण्यात आलेले हे एक सुरक्षित डिजिटल व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर मान्यताप्राप्त पदवी प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी संपादित केलेली शैक्षणिक श्रेयांके (अकॅडमिक क्रेडिट्स) सुरक्षितपणे साठवणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत हस्तांतरित करणे तसेच आवश्यकतेनुसार त्यांचा वापर (रिडीम) करणे शक्य होते.
अपार आयडी (APAAR ID - ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री) हा 12-अंकी एक विशेष विद्यार्थी ओळख क्रमांक आहे. तो एबीसी प्रणालीशी जोडलेला आहे. "एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र" या मोहिमेचा भाग म्हणून हा अपार आयडी सुरू करण्यात आला आहे. तो प्रत्येक विद्यार्थ्याची एकच शैक्षणिक ओळख तयार करतो. डिजिलॉकर आणि एबीसी मंचाच्या माध्यमातून हा आयडी वापरता येतो. यावर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण, कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक नोंदी एकाच ठिकाणी एकत्र आणल्या जातात. पुढे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी–अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एनएडी-एबीसी) अंतर्गत शालेय शिक्षणाच्या नोंदींचेही श्रेयांकन करून त्या अपार आयडीशी संलग्न करण्यात येणार आहेत. दुर्गम आणि वंचित भागांतील विद्यार्थ्यांसाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी ) या सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे देखील अपार आयडी तयार करता येऊ शकतात. 2 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण भारतात 26.35 कोटी पडताळणी झालेले अपार आयडी तयार करण्यात आले आहेत.
एबीसी आणि विद्यार्थ्याचा अपार आयडी यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कालांतराने अखंडपणे जोडला जातो.

एबीसीचे उद्देश
विद्यार्थीकेंद्रित, लवचिक आणि अनुकूल शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, हा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या शैक्षणिक श्रेयांकांची नोंद सुरक्षितपणे जतन केली जाते, त्यामुळे त्यांचा आवश्यकतेनुसार आयुष्यभर वापर करता येतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 आणि राष्ट्रीय श्रेयांकन आराखडा (एनसीआरएफ) यांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेला हे व्यासपीठ बळकटी देते. यामुळे विविध शैक्षणिक संस्था आणि अभ्यासशाखांदरम्यान शैक्षणिक श्रेयांकांचे हस्तांतरण, शिक्षणात अनेक वेळा प्रवेश आणि निर्गमनाचे पर्याय, तसेच विविध प्रकारच्या शिक्षणाला मान्यता देणे शक्य होते. याचा अर्थ असा की, एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण अर्धवट सोडले तरी त्याने अर्जित केलेली शैक्षणिक श्रेयांके (क्रेडिट्स) एबीसीच्या डेटा बँकेत सुरक्षित राहतात. त्यामुळे भविष्यात त्याने पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास, निर्धारित वैधता कालावधीत या श्रेयांकांचा उपयोग करून त्याला आपले शिक्षण पुढे सुरू ठेवता किंवा पूर्ण करता येते. या शैक्षणिक श्रेयांकांच्या (क्रेडिट्सच्या) हस्तांतरणासाठी आणि वापरासाठी (रिडीम करण्यासाठी) कमाल सात वर्षांची वैधता निश्चित करण्यात आली आहे.

एबीसी आणि अपार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या डिजिटल नोंदी ठेवण्यास मदत करतात. यामुळे विविध शैक्षणिक संस्थांदरम्यान शैक्षणिक श्रेयांकांच्या (क्रेडिट्सच्या) हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होते आणि शैक्षणिक नोंदींचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनते. हे व्यासपीठ शाळा, विद्यापीठे, कौशल्य विकास संस्था तसेच इतर शैक्षणिक भागधारकांना परस्परांशी जोडण्याचे काम करते. त्यामुळे परस्परांशी सुसंगत आणि एकात्मिक शिक्षण परिसंस्था निर्माण होण्यास मदत होते.
एबीसी कसे काम करते
-
विद्यार्थी एबीसी पोर्टलवर नोंदणी करतात आणि त्यांना एक विशेष एबीसी आयडी (ज्याचे नाव बदलून आता अपार आयडी केले आहे) मिळतो. हा आयडी त्यांच्या आधार आणि डिजिलॉकर खात्याशी जोडलेला असतो.
-
पात्र उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य प्रदान करणाऱ्या संस्थांचे विद्यार्थी या एबीसी सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
-
प्रमाणपत्रे, पदव्या आणि गुणपत्रिका प्रदान करण्यासाठी अधिकृत असलेल्या शैक्षणिक संस्था, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अपार आयडीशी संलग्न शैक्षणिक श्रेयांकांची माहिती थेट नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी-अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एनएडी-एबीसी) पोर्टलवर अपलोड करू शकतात.
-
विद्यार्थी आपले शैक्षणिक नुकसान होऊ न देता विविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये क्रेडिट्स गोळा, हस्तांतरित आणि वळवून (रिडीम) घेऊ शकतात.
-
हे क्रेडिट्स कमाल 7 वर्षे किंवा संबंधित शैक्षणिक शाखेने ठरवून दिलेल्या कालावधीसाठी वैध असतात. एकदा रिडीम केलेले क्रेडिट्स पुन्हा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा रिडीम करण्यासाठी वापरता येत नाहीत.
-
प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका देण्याचे काम शैक्षणिक संस्थांद्वारे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी) मंचाच्या माध्यमातून केले जाते.
-
एनएडी हा एबीसीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून काम करतो, जो सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि नोंदी सुरक्षितपणे साठवतो.
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स: प्रगती अहवाल
या उपक्रमाची अंमलबजावणी देशभरात मोठ्या प्रमाणावर झाली असून, त्याला लक्षणीय यश मिळाले आहे. 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांमधील शैक्षणिक श्रेयांकांची (क्रेडिट्सची) माहिती 30 जून 2026 पर्यंत एनएडी-एबीसी पोर्टलवर अपलोड करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी बंधनकारक केले होते. 2 जुलै 2026 पर्यंतची प्रगती पुढीलप्रमाणे आहे :
|
संस्थेचा स्वरूप
|
संस्थेचा प्रकार
|
एबीसी साठी नोंदणी केलेल्या संस्था (संख्या)
|
निर्माण केलेल्या आणि प्रदाता संस्थेकडे मॅप केलेल्या अपार आयडीज
|
अध्ययनकर्त्यांच्या अपार आयडीसोबत मॅप केलेल्या क्रेडिट्सच्या नोंदी (गुणपत्रिका)
|
|
स्वायत्त महाविद्यालय
|
स्वायत्त महाविद्यालय
|
1287
|
33,25,904
|
1,04,27,612
|
|
स्वतंत्र संस्था
|
स्वतंत्र संस्था
|
258
|
5,54,652
|
2,95,351
|
|
राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था (आयएनआय)
|
एम्स
|
10
|
8,697
|
-
|
|
आयआयआयटी
|
25
|
36,175
|
89,767
|
|
आयआयएम
|
21
|
30,971
|
98,216
|
|
आयआयएसईआर
|
7
|
13,493
|
46,161
|
|
आयआयटी
|
23
|
1,09,262
|
3,41,666
|
|
एनआयडी
|
5
|
1,922
|
3,690
|
|
एनआयएफटीईएम
|
1
|
1,188
|
5,270
|
|
एनआयपीईआर
|
6
|
2,240
|
6,334
|
|
एनआयटी
|
31
|
1,59,807
|
4,05,168
|
|
इतर आयएनआय
|
14
|
22,769
|
66,923
|
|
एसपीए
|
3
|
2,706
|
7,774
|
|
विद्यापीठ
|
केंद्रीय विद्यापीठ
|
57
|
49,09,200
|
57,73,788
|
|
अभिमत विद्यापीठ
|
141
|
15,45,183
|
42,03,142
|
|
खासगी विद्यापीठ
|
521
|
34,56,172
|
87,17,160
|
|
राज्य विद्यापीठ
|
489
|
3,37,32,125
|
6,73,09,371
|
|
(उच्च शिक्षण संस्थां)ची एकूण संख्या
|
2899
|
4,79,12,466
|
9,77,97,393
|
|
कौशल्य प्रदात्या संस्था
|
कौशल्य एबीज
|
98
|
36,98,558
|
3,37,838
|
|
शालेय शिक्षण
|
(शाळांमधील अपार आयडीज)
|
-
|
16.62 (कोटी)
|
-
|
|
मॅप न केलेल्या संस्था
|
(अपार आयडी)
|
-
|
3.39 (कोटी)
|
-
|
एबीसी तसेच अपार यांमधील माहिती सुरक्षेचे व्यवस्थापन
माहितीची गोपनीयता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी हे मंच मजबूत सुरक्षाविषयक नियमावली तसेच एन्क्रिप्शन मानकांचा स्वीकार करतात. सर्व एकात्मिक प्रणाली आणि संस्थात्मक चौकटींमध्ये सुरळीत उपलब्धता कायम राखत वापरकर्त्याची माहिती सुरक्षित ठेवून अपार आयडी तसेच आधार-संलग्न डिजीलॉकर प्रमाणपत्रे यांच्या माध्यमातून प्रवेश प्रमाणित केला जातो.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि परिणाम
- शैक्षणिक गतिमानता: विद्यार्थी बहुविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेऊ शकतात तसेच त्यांचे क्रेडिट्स सुरळीतपणे विविध अभ्यासक्रम आणि संस्थांमध्ये हस्तांतरित करू शकतात.
- एबीसी विद्यार्थ्यांना पडताळणी प्रक्रिया सुलभ करणाऱ्या आणि प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षणीयरित्या कमी करणारी एक अखंडित, संमती-आधारित दस्तावेज देवाणघेवाण प्रणाली उपलब्ध करून देते.
- बहु-प्रवेश आणि बहु-निर्गमन (एमईएमई): एबीसी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत एमईएमई आराखडा शक्य करून देते. यातून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तरतुदी करणे; दोन वर्षांनंतर पदविका; तीन किंवा चार वर्षांनंतर पदवी मिळणे शक्य करते. सुमारे 700 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि 6,600 पेक्षा जास्त महाविद्यालये बहु प्रवेश, निर्गमन पर्याय देऊ करत आहेत.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक नोंदी आणि डिजिटल प्रमाणपत्रे, कोणत्याही वेळी, कुठल्याही ठिकाणाहून मिळवता येतात.
- विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचा दर कमी झाला आणि सातत्याने शिक्षण घेण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली.
- एबीसी औपचारिक, अनौपचारिक आणि अनुभवात्मक शिक्षणातील दरी भरून काढत आहे.
- या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांशी संलग्न असलेले अनेक फायदे आहेत. अपार आयडी प्रमाणित करून, वय वर्ष 13 ते 30 या गटातील विद्यार्थी मुलभूत विमानप्रवासभाड्यावर 10%पर्यंत सवलत तसेच विमानप्रवासात अतिरिक्त 10 किलो सामान नेण्याची मुभा अशा सवलतींसह प्रवासाचे अनेक विशेष लाभ मिळवू शकतात.
- स्वयम मंचासोबत एकत्रीकरण: स्वयम या ऑनलाईन मंचाकडून विद्यार्थी 40%पर्यंत क्रेडिट्स मिळवू शकतात. सुमारे 450 विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता रुंदावत या नियमनाचा स्वीकार केला आहे.
- राष्ट्रीय क्रेडीट आराखडा (एनसीआरएफ): एनसीआरएफला राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 शी जुळवून घेण्यात आले आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक, व्यावसायिक आणि अनुभवात्मक शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. वर्ष 2026 पर्यंत देशभरातील 196 विद्यापीठांनी एनसीआरएफचा स्वीकार केला आहे.

एबीसीच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा
एबीसी हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत शिक्षणासाठी सुरु केलेल्या, भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेचा (डीपीआय) महत्त्वाचा घटक आहे.
- एनएडी-डिजीलॉकरसह एकत्रीकरण करण्यात आल्यामुळे, विद्यार्थ्यांना सुरक्षित पद्धतीने आणि कोणत्याही वेळी त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक नोंदींची पडताळणी उपलब्ध झाली आहे.
- डिजिटल भारत महामंडळ/एनईजीडी (केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान) ने नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांच्या डिजिटल भारत ‘आमच्या तज्ञांना विचारा’ मालिकेत एबीसी-एनएडी चा समावेश केला.
- एबीसी एकत्रीकरणासाठी समर्थ ईआरपी (प्रमुख, क्लाऊड आधारित ई-प्रशासन मंच)चा वापर केल्यामुळे, विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनासाठी प्रमाणित आणि एकीकृत प्रवेशद्वार उपलब्ध होते.
- विद्यार्थ्यांचे अपार आयडी पडताळण्यासाठी आणि एनएडी-एबीसीवरील नोंदी जारी करण्यासाठी संस्थात्मक मंचाशी एकत्रीकरणासाठी एबीसी एपीआयज पुरवते.
- विद्यार्थ्यांच्या प्रमाणीकरणासाठी संस्था आणि त्यांचे शैक्षणिक मंच एकल-साईन-ऑनचा वापर करून अपार आयडी मॉड्यूलसह लॉगिनचा देखील वापर करू शकतात.
- दुर्गम गावांमधील कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) आता एबीसी आणि अपार नोंदणीसाठी प्रत्यक्ष सेवा केंद्रे म्हणून कार्य करत डिजिटल दरी कमी करण्यास मदत करत आहेत.
विश्वसनीय डिजिटल शिक्षण परिसंस्थेच्या दिशेने वाटचाल
एकत्रितपणे, एबीसी आणि अपार आता शिक्षणाला अधिक लवचिक, पारदर्शक आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुलभतेने उपलब्ध असे स्वरूप देत शैक्षणिक नोंदींसाठी विश्वसनीय डिजिटल परिसंस्था उभारत आहेत. अखंडित क्रेडीट गतिमानता, सुरक्षित नोंदी व्यवस्थापन आणि आजीवन शिक्षण शक्य करून हे उपक्रम भविष्यासाठी सज्ज शिक्षण प्रणालीसाठीचा पाया घालत आहे.
हे मंच सातत्याने विकसित होत असून त्यांची व्याप्ती वाढत असताना, नव्याने उदयाला येत असलेली तंत्रज्ञाने, डिजिटल शैक्षणिक प्रमाणपत्रांची सुरक्षितता आणि खरेपणा आणखी बळकट करण्यासाठी नव्या संधी देऊ करत आहेत. या संदर्भात डिजिटल प्रमाणपत्रांसाठीची ब्लॉकचेन हे पुढचं पाऊल ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्पोरेशन (डीआयसी) तर्फे विकसित करण्यात आलेला भारताचा हा सार्वभौम ब्लॉकचेन मंच मोठ्या प्रमाणात सुरक्षित, पडताळणी करण्यायोग्य आणि फेरफार करणे अशक्य असेल अशा डिजिटल प्रमाणपत्रांसाठी विकसित करण्यात आला आहे. डिजिटल प्रमाणपत्रांसाठी ब्लॉकचेन दोन मार्गांनी स्वीकारता येतील: तात्काळ वापरासाठी डीआयसीतर्फे व्यवस्थापित ब्लॉकचेन पायाभूत सुविधांच्या माध्यमातून किंवा अधिक स्वयंचलन आणि लवचिकता मिळवण्यासाठी समर्पित ब्लॉकचेन नोड्स परिचालित करून. संपूर्ण शैक्षणिक माहिती भारताच्या सार्वभौम डिजिटल पायाभूत सुविधांच्या कक्षेत राहते आणि हा मंच डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याचे संपूर्णपणे अनुपालन करतो.
पीडीएफ येथे पाहता येईल
Ministry of Education
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/NEP_Final_English_0.pdf
https://www.abc.gov.in/about-us
https://www.abc.gov.in
https://www.abc.gov.in/faq
https://apaar.education.gov.in/
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2003802&lang=2®=48&utm
https://www.facebook.com/photo/?fbid=1452271933596230&set=a.358256662997768
Ministry of Electronics and IT
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2072877®=48&lang=2
Ministry of Finance
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2219936®=3&lang=1
University Grants Commission
https://www.ugc.gov.in/pdfnews/5572622_Academic-Bank-of-Credits-Regulation.pdf
https://www.ugc.gov.in/pdfnews/9363820_Academic-Bank-of-Credits-(ABC).pdf
https://www.ugc.gov.in/pdfnews/9028476_Report-of-National-Credit-Framework.pdf
PIB Backgrounder
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/jul/doc2025729593701.pdf
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154950&ModuleId=3®=3&lang=1
नितीन फुल्लुके /आशिष सांगळे/आशुतोष सावे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
(तथ्य सामग्री आईडी: 150756)
आगंतुक पटल : 43
Provide suggestions / comments