Posted On:
29 NOV 2026 1:21PM by PIB Mumbai
पुण्यातील प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेने (DIAT - Defence Institute of Advanced Technology) अत्याधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि राष्ट्रीय सुरक्षेसमोरील महत्त्वाच्या आव्हानांवर उपाययोजनांच्या माध्यमातून संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे उत्कृष्टता केंद्र आणि आधुनिक काळातली तक्षशिला म्हणून आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी देश विदेशातले प्रतिभावान संशोधक आणि शास्त्रज्ञांनाही संस्थेने आकर्षित करावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात पुणे इथे संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या (DDR&D - Department of Defence Research & Development) अखत्यारीतील प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्था या आघाडी संस्थेचा 15 वा दीक्षांत समारंभ 29 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाला. या समारंभाला राजनाथ सिंह यांनी संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्वायत्त प्रणाली, प्रगत साधन सामग्री, सायबर सुरक्षा, अंतराळ क्षेत्रावर आधारित क्षमता आणि निर्देशित ऊर्जा तंत्रज्ञान (directed-energy technologies) या क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत आहे. यामुळे युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. आणि या सगळ्यातून नवीन शक्यतांसोबतच नवी आव्हानेही उभी राहिली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. केवळ नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हेच आव्हान राहिलेले नाही, तर त्यासोबतच राष्ट्रीय हिताला अनुसरून असे तंत्रज्ञान वेगाने समजून घेणे, ते आत्मसात करणे आणि त्याचा प्रभावी वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे आव्हान बनले आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेने तंत्रज्ञानातील या बदलांच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासोबतच, भविष्यातील युद्धभूमीच्या स्वरुपाला अनुसरून असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रक्रियेतही आघाडी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लष्करी सामर्थ्य तसेच वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानविषयक क्षमता हे घटक राष्ट्रीय शक्तीचे दोन महत्त्वाचे आणि परस्परांवर अवलंबून असलेले आधारस्तंभ आहेत असे ते म्हणाले. संरक्षण दले देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करतात, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आर्थिक विकास, औद्योगिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेला चालना देतात, आणि या माध्यमातून अंतर्गत पातळीवर देशाला बळकटी देतात असे त्यांनी सांगितले. जे देश तंत्रज्ञानात आघाडी घेतात, ते सुरक्षेच्या बाबतीतही आघाडीवर राहतात, आणि जे देश सुरक्षेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करतात, ते देश आपले स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि विकासाला अधिक भक्कमतेने सुरक्षित ठेवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संरक्षण संशोधनाचे व्यापक महत्त्व अधोरेखित करता संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, लष्करासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग अनेकदा आरोग्यसेवा, कृषी, दळणवळण आणि वाहतूक यांसारख्या नागरी क्षेत्रांमध्येही होतो. ते पुढे म्हणाले की, आज प्रयोगशाळेत सुरू केलेला एखादा छोटासा संशोधन उपक्रमही भविष्यात शेतकऱ्याला एक नवीन साधन, डॉक्टरांना एक नाविन्यपूर्ण उपाय किंवा सैनिकाला जीव वाचवणारे तंत्रज्ञान देऊ शकतो. आपल्या संशोधकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे कार्य देशाची संरक्षण क्षमता आणि तांत्रिक सामर्थ्य या दोन्ही गोष्टी बळकट करेल.
'विकसित भारत@2047' या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना देशाची संरक्षण तंत्रज्ञान व्यवस्था बळकट करण्यात आणि वैज्ञानिक क्षमता पुढे नेण्यात डीआयएटीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. डीआयएटीमधील महिलांच्या लक्षणीय सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि प्रगत विज्ञान, अभियांत्रिकी व संरक्षण तंत्रज्ञानातील त्यांची वाढती उपस्थिती भारताच्या संरक्षण संशोधन व्यवस्थेला अधिक बळकटी देईल, असे सांगितले.

या समारंभात एकूण 518 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ही डीआयएटीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक पदवी प्रदान संख्या आहे. यामध्ये 27 पीएच.डी. संशोधक, एक एमएस (संशोधनाद्वारे) संशोधक, 401 एम.टेक. पदवीधर आणि 89 एम.एस्सी. पदवीधरांचा समावेश होता. एम.एस्सी. पदवीधरांपैकी 30 जणांनी टँक तंत्रज्ञान, तीन जणांनी अन्न तंत्रज्ञान, आठ जणांनी माहिती तंत्रज्ञान आणि उर्वरित 48 जणांनी इतर एम.एस्सी. अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

***
राधिका अघोर/तुषार पवार/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai