Goa, 28 November 2026
गोव्यामध्ये आयोजित 57 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, जर्मन चित्रपट निर्माते वोल्कर श्लॉन्डॉर्फ यांना ‘व्हिजिटेशन’ (Visitation) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या ‘रौप्य मयूर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. समारोप समारंभात श्लॉन्डॉर्फ यांच्या वतीने चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक ॲक्सेल श्नेप्पट आणि छायाचित्रण टीममधील कॉनराड वाल्डमन यांनी रौप्य मयूर' (Silver Peacock) पुरस्कार स्वीकारला.
_20261128215057_b18724.jpeg)
चित्रपट प्रेमींच्या अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या कथा पडद्यावर साकारताना, श्लोंडॉर्फ यांनी चित्रपट माध्यमावरचे आपले विलक्षण प्रभुत्व सिद्ध केले आहे. चित्रपट निर्मितीमधील कलात्मक आणि तांत्रिक घटकांना एकत्र गुंफून अचूकता आणि संयमाने एकसंध चित्र अनुभूती देण्याच्या दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा परीक्षकांनी गौरव केला.
"या चित्रपटात, प्रत्येक तपशील अचूक मांडला आहे, मग ती कलाकारांची एकत्रित कामगिरी असो, निर्दोष संपादन असो किंवा प्रभावी तरीही संयमित संगीत रचना असो," परीक्षकांनी नमूद केले.
जर्मन सिनेजगतातील दिग्गज, वोल्कर श्लॉन्डॉर्फ यांनी ‘व्हिजिटेशन’ (Visitation) या चित्रपटात अनेक दशकांचा आपला चित्रपट निर्मितीचा अनुभव सिद्ध केला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी पॅरिसमध्ये लुई माल, ज्यां-पिएर मेलव्हिल आणि अलेन रेने यांसारख्या ख्यातनाम चित्रपट निर्मात्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यातील कलेला आकार दिला. त्यांनी 1973 मध्ये 'बायोस्कोप' (Bioskop) नावाच्या निर्मिती संस्थेची सह-स्थापना केली, आणि फ्रँकफर्ट, बर्लिन आणि पॅरिसमध्ये ऑपेरांचे दिग्दर्शनही केले.
मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराद्वारे दिग्दर्शकाची असामान्य सर्जनशील दृष्टी आणि चित्रपटाची कलाकृती साकारण्यात त्यांनी दिलेले योगदान यांचा गौरव केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप, रौप्य मयूर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 20 लाख रुपयांचा रोख पुरस्कार असे आहे.
व्हिजिटेशन चित्रपटाविषयी..

बर्लिनजवळील तलावाच्या काठावर असलेल्या एका घराच्या पार्श्वभूमीवर व्हिजिटेशन हा चित्रपट वेगवेगळ्या काळात या घरात राहिलेल्या लोकांच्या जीवनातून जर्मनीच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचा वेध घेतो. नाझीवादाचा उदय, दुसऱ्या महायुद्धाचा विध्वंस, सोव्हिएत राजवट आणि जर्मनीचा पुनर्विलय अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घडामोडींचे हे घर मूक साक्षीदार राहते.
वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये एका ज्यू कुटुंबाने, एका वास्तुविशारदाने आणि त्याच्या पत्नीने, एका लेखिकेने तसेच तिच्या नातीने या घरात वास्तव्य केले आहे. प्रत्येकाला आपापल्या काळातील अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. जेनी एर्पेनबेक यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बदलत्या जर्मनीच्या पार्श्वभूमीवर घर, आपलेपणा, विस्थापन आणि स्मृती अशा विषयांचा वेध घेतो.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
***
राधिका अघोर//परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com