गोवा, 28 नोव्हेंबर 2026
जीवनातील सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या सभोवतालच्या सर्वात साध्या गोष्टींमध्ये दडलेली असतील तर? नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक प्रवासाच्या माध्यमातून या विचाराचा वेध घेणारा ‘हनुमान अंश’ हा चित्रपट, 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 2026 च्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना क्षणभर थांबून, चिंतन करून आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन करतो. डॉ. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित हा चित्रपट, सध्याच्या उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात जन्मलेल्या लक्ष्मीनारायण यांच्या जीवनाचा मागोवा घेतो. जीवन, मृत्यू आणि मानवी दुःख समजून घेण्याच्या लक्ष्मीनारायण यांच्या ध्यासानतून ते हळूहळू एका आध्यात्मिक मार्गाकडे वळले आणि त्यांचा हा प्रवास असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारा ठरला.

पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी यांनी चित्रपटामागील प्रेरणा आणि त्याच्या निर्मितीला आकार देणाऱ्या सर्जनशील तत्त्वज्ञानाबद्दल सांगितले. आपण चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक गोष्टींचा शोध घेतला आणि जे काही शिकलो त्याचे श्रेय आपल्या आईला असल्याचे ते म्हणाले. हा चित्रपट आत्मचिंतन करण्याचे आवाहन करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. चतुर्वेदी यांनी चित्रपटाचे कथानक आणि जमिनीवरील वास्तव यांमधील दरी कमी करण्याच्या गरजेवरही भर दिला. प्रेक्षकांशी सहज आणि आकर्षक पद्धतीने जोडले जाण्यासाठी ही कथा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांशी निगडित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले की, हा चित्रपट एका सामान्य मध्यम-बजेट हिंदी चित्रपटाच्या बजेटच्या जवळपास एक-दशांश इतक्या कमी खर्चात बनवण्यात आला आहे. साधेपणा आणि कमीत कमी साधनांचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यातून चित्रपटात चित्रित केलेल्या अध्यात्मिक प्रवासाचे मूळ सार प्रतिबिंबित होते, असे त्यांनी सांगितले. जीवन अधिक साधे करण्याची आणि अनावश्यक गुंतागुंत टाळण्याची गरज अधोरेखित करताना डॉ. विशाल म्हणाले की, अनेकदा साध्यासोप्या उपाययोजना आपल्या अगदी जवळच असतात मात्र आधुनिक जीवनातील गुंतागुंतीमुळे त्यांच्याकडे आपले लक्ष जात नाही.
दिग्दर्शकांनी संगीत आणि सादरीकरणाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाबद्दलही विचार मांडले, आणि त्यांनी सर्जनशील प्रतिभेला बहरण्याची संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या चित्रपटातील संगीताशी असलेल्या आपल्या वैयक्तिक संबंधांचा संदर्भ देत डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले की, गायकांची निवड खूप आधीच करण्यात आली होती, त्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देणे आणि चित्रपटाच्या सर्जनशील प्रवासात अर्थपूर्ण योगदान द्यायला सक्षम करणे, हे यामागचे उद्दिष्ट होते असे ते म्हणाले. कलाकारांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी विस्तृत सर्जनशील मोकळीक देण्याचाही आपला प्रयत्न होता असे ते म्हणाले. कलाकारांच्या प्रतिभेला दिशा दाखवण्याऐवजी नव्या दिशेला वळवणे, ही दिग्दर्शकाची भूमिका असावी, यावर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

संगीत रचनेबद्दल अधिक माहिती देताना चतुर्वेदी यांनी सांगितले की, 'पार्वती' गाण्याचे संगीत बऱ्याच अंशी त्याच्या मूळ स्वरूपातच ठेवण्यात आले. त्यामध्ये अगदी किरकोळ बदल करण्यात आले, यामुळे गायकाचा आवाज आणि भाव नैसर्गिकरीत्या उमटले. त्यांनी सांगितले की, चित्रपटातील एक गाणे 11 व्या शतकातील नाथ योगी गोरखनाथ यांच्या दोह्यांपासून प्रेरित आहे, याद्वारे चित्रपटातील आध्यात्मिक संकल्पना आणि भारतीय तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपरा, याचा मेळ साधला. आपल्या स्वतःच्या जीवनाला दिशा देणाऱ्या शिकवणींवर भाष्य करताना, चतुर्वेदी यांनी भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या संदेशाचा उल्लेख केला आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कृतीचे महत्व सांगितले.
चित्रीकरणामागचा एक रंजक प्रसंग सांगताना दिग्दर्शक म्हणाले की, चित्रकूटमधील ज्या खोलीत नीम करोली बाबा अन्नाचे वाटप करताना दिसतात, त्या खोलीत महाराज स्वतः राहत होते, त्यामुळे हे चित्रीकरण खास आणि अत्यंत व्यक्तिगत बनले.
'हनुमान अंश', हा चित्रपट त्रयीचा पहिला भाग आहे, उत्तर भारतातील लक्ष्मीनायरायणच्या प्रवासाचा मागोवा घेतो, या प्रवासात साधू-संत आणि सामान्य लोकांशी होणाऱ्या भेटीगाठींतून त्याचे जीवन आणि अध्यात्माबद्दलचे आकलन घडत जाते. नीम करोली गावाजवळील एका रहस्यमय घटनेमुळे 'नीम करोली बाबा' असे त्यांचे नाव पडले. हा चित्रपट अशा एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होण्याच्या प्रवासाचा मागोवा घेतो, ज्याच्या शिकवणींनी स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांच्यासह जगभरातील अनेक लोकांना प्रेरित केले. कथाकथन आणि आत्मपरीक्षणावर भर देऊन, 'हनुमान अंश' प्रेक्षकांना ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो की, जगाला समजून घेण्याचा प्रवास अनेकदा स्वतःला समजून घेण्यापासूनच सुरू होतो.
पत्रकार परिषदेचे संचालन कुलदीप मीणा यांनी केले.
पूर्ण पत्रकार परिषद येथे पाहता येईल:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे