वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुक्त व्यापार करारांमुळे निर्माण होणाऱ्या संधींबाबत वाणिज्य मंत्रालयाकडून कार्यशाळांची मालिका आयोजित


भारतासाठी प्राधान्याच्या बाजारपेठांपर्यंत पोहोच 70 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत विस्तारली, ही बाजारपेठ 85 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा.

राजस्थानमधील रत्ने, दागिने, वस्त्रोद्योग आणि हस्तकला क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेत मोठ्या संधी असल्याचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन. 

2029 पर्यंत राजस्थानची निर्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट, 2025-26 मध्ये निर्यात 11.18 अब्ज अमेरिकी डॉलरवर.

उत्तराखंडमधील डेहराडून येथे मुक्त व्यापार करारांबाबत कार्यशाळा, राज्याची निर्यात 13 हजार 802 कोटी रुपयांवर

Posted On: 28 NOV 2026 9:25AM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने 27 नोव्हेंबर 2026 रोजी जयपूर आणि डेहराडून येथे विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. भारताने केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे निर्माण झालेल्या संधींची माहिती निर्यातदार, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना करून देणे, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या कार्यशाळांचा उद्देश होता.

अलीकडे भारताने केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठेच्या संधी विस्तारल्या आहेत. या करारांमुळे उपलब्ध झालेल्या संधींचा भारतीय उद्योगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी केले होते.

काही वर्षांपूर्वी जागतिक बाजारपेठेत भारताला प्राधान्याने व्यापाराची संधी असलेल्या बाजारपेठांची व्याप्ती सुमारे 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी होती. गेल्या साडेचार वर्षांत त्यात आणखी 60 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची भर पडली असून, ही व्याप्ती आता सुमारे 70 ट्रिलियन अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. आठ ते नऊ भौगोलिक क्षेत्रांशी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापारविषयक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे येत्या एक ते दीड वर्षात ही व्याप्ती सुमारे 85 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे प्रमाण जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 76 टक्के असेल, असे गोयल यांनी सांगितले होते.

भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने भारतीय निर्यात संघटनांचा महासंघ, विदेश व्यापार महासंचालनालय आणि राजस्थान सरकार यांच्या सहकार्याने जयपूर येथे निर्यातदारांसाठी विशेष चर्चासत्र आयोजित केले होते. भारताच्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घेऊन निर्यातीच्या संधी कशा वाढवता येतील, याबाबत या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

या चर्चासत्रात निर्यातदारांशी संवाद साधताना, केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारताच्या मुक्त व्यापार करारांमुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या मोठ्या संधींकडे लक्ष वेधले. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी या करारांमुळे प्राधान्याने उपलब्ध झालेल्या बाजारपेठांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुक्त व्यापार करारातील सहभागी देशांमध्ये आपल्या उत्पादनांसाठी असलेल्या निर्यातीच्या संधी शोधाव्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे, परदेशात पुरवठा साखळी विकसित करावी आणि सीमापार ई-कॉमर्ससारख्या नव्या क्षेत्रांतील संधींचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी निर्यातदारांना सुचवले.

रत्ने आणि दागिने, वस्त्रोद्योग, हस्तकला, फर्निचर आणि खनिजे या क्षेत्रांमध्ये राजस्थानचे मोठे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याच्या निर्यातीत वाढ करावी, असे आवाहन राजेश अग्रवाल यांनी उद्योग क्षेत्राला केले. भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामध्ये निर्यात कर्जासाठी आर्थिक सहाय्य, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागासाठी मदत, उत्पादनांची चाचणी आणि प्रमाणन, परदेशात गोदामांची सुविधा तसेच वाहतूक आणि रसद व्यवस्थापनासाठी सहाय्य यांचा समावेश आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांतर्गत संपूर्ण जिऱ्यावरील सीमाशुल्क 5 टक्क्यांवरून शून्य करण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थानमधील शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनांना यूएईच्या बाजारपेठेत आपला विस्तार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

वस्त्रोद्योग, हस्तकला, दागिने आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच कारागिरांना या करारांमधील आयातशुल्क सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनांची किंमत अधिक स्पर्धात्मक होण्यास मदत होईल. यूएई आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या करारांनुसार दागिन्यांवरील 5 टक्के आयातशुल्कही रद्द करण्यात आले आहे. तर, ब्रिटनसोबतच्या करारांतर्गत दागिन्यांवरील 2 ते 4 टक्के आयातशुल्क रद्द करण्यात आले आहे. या करारामुळे कपड्यांवरील 12 टक्क्यांपर्यंत आणि गालिच्यांवरील 8 टक्के आयातशुल्कही रद्द होणार आहे. युरोपीय महासंघासोबतच्या कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सुती कपडे आणि बेडशीटवरील 12 टक्के, तर गालिच्यांवरील 8 टक्के आयातशुल्क रद्द होणार आहे.

भारताची वस्तू आणि सेवा क्षेत्रातील निर्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत 16 पूर्णांक 66 शतांश टक्क्यांनी वाढून 568 पूर्णांक 84 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात रत्ने आणि दागिने यांच्या निर्यातीत 40 पूर्णांक 06 शतांश टक्के, हस्तकला वस्तूंच्या निर्यातीत 55 पूर्णांक 22 शतांश टक्के, गालिच्यांच्या निर्यातीत 20 पूर्णांक 64 शतांश टक्के, तर तयार कपड्यांच्या निर्यातीत 20 पूर्णांक 33 शतांश टक्के वाढ झाली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताने 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. राजस्थानमधून 2025-26 या आर्थिक वर्षात 11 पूर्णांक 18 अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात झाली. यात अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, तसेच वस्त्रोद्योग आणि हस्तकला क्षेत्राचा मोठा वाटा आहे. 2029 पर्यंत 1 लाख 50 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट राजस्थानने ठेवले आहे.

न्यूझीलंडसोबत झालेल्या करारामुळे भारतीय वस्तूंना 100 टक्के शुल्कमुक्त बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कारागीर, शेतकरी आणि महिला उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या कराराअंतर्गत भारतीय तरुण आणि व्यावसायिकांना दरवर्षी 5 हजार तात्पुरते रोजगार प्रवेश व्हिसा आणि 1 हजार वर्किंग हॉलिडे व्हिसा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुक्त व्यापार करारांमुळे वस्त्रोद्योग, तयार कपडे आणि चामड्याच्या वस्तू यांसारख्या अधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांतील उत्पादनांना प्राधान्याने बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे या क्षेत्रांच्या विकासाला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. ब्रिटनसोबतच्या करारामुळे अधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन अर्थात ईएफटीएच्या सदस्य देशांनी पुढील 15 वर्षांत भारतातील गुंतवणुकीत 100 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, याच कालावधीत 10 लाख रोजगार निर्माण करण्यास मदत करण्याचेही या देशांचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव मोहित यादव यांनी भारताच्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घेण्यामध्ये राजस्थानची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. निर्यातक्षम विविध क्षेत्रांमधील राजस्थानची नैसर्गिक क्षमता लक्षात घेता, या करारांचा लाभ घेण्यासाठी राज्याला विशेष संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मुक्त व्यापार करार केवळ प्राधान्याच्या आधारावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित नसून, त्यातून तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त उपक्रम आणि गुंतवणुकीतील भागीदारीच्या संधीही उपलब्ध होतात, असे यादव यांनी सांगितले. भारत-युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन अर्थात ईएफटीए यांच्यातील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारांतर्गत पुढील 15 वर्षांत 100 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीच्या बांधिलकीच्या पार्श्वभूमीवर या संधी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

जयपूरचे परकीय व्यापार महासंचालनालयाचे संयुक्त महासंचालक मोईन अफाक यांनी व्यापार करारांचा लाभ कसा घेता येईल, तसेच निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत उपलब्ध असलेल्या सहाय्याची माहिती दिली. 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी या अभियानाकरिता 25 हजार 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परतावा मिळण्यास पात्र असलेल्या प्रमाणपत्रांची संख्या वाढवून 600 करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी 308 जिल्ह्यांतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातदारांना निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत वाहतूक खर्चाचा परतावा मिळण्यास पात्र ठरवण्यात आले आहे.

सत्रानंतर, राजेश अग्रवाल यांनी एका खुल्या चर्चेदरम्यान निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच निर्यातीच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्धतेशी संबंधित त्यांच्या समस्यांवर आणि प्रश्नावर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी 'ट्रेड कनेक्ट' पोर्टलचा अधिक वापर करण्याचे, विदेश व्यापार महासंचालनालयच्या (डीजीएफटी) कार्यालये आणि परदेशातील भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याचे, तसेच निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत (ईपीएम) उपलब्ध असलेल्या विविध सहाय्य यंत्रणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आणखी एका संपर्क उपक्रमांतर्गत, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, अतिरिक्त महासंचालक विदेशी व्यापार (प्रादेशिक प्राधिकरण,दिल्ली) यांच्या कार्यालयाने, उत्तराखंड सरकारच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने डेहराडून येथे “मुक्त व्यापार करारांचा लाभ घेणे” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले. भारताच्या मुक्त व्यापार करारांअंतर्गत असलेल्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करून राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, उद्योजक आणि निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेशी जोडणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

या कार्यक्रमाला उत्तराखंड सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री भरत सिंह चौधरी, भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव अमित वर्मा; भारत सरकारचे विदेशी व्यापार विभागाचे अतिरिक्त महासंचालक निखिल वर्मा; उत्तराखंड सरकारचे उद्योग महासंचालक आणि आयुक्त सौरभ गहरवार उपस्थित होते. या कार्यशाळेत पीएचडीसीसीआय, सीआयआय, ईईपीसी, ईपीसीएच, अपेडा आणि एसईपीसी यांसारख्या प्रमुख व्यापार आणि निर्यात प्रोत्साहन संस्थांचे प्रतिनिधी, तसेच राज्यभरातील उद्योजक आणि निर्यातदार सहभागी झाले होते.

उत्तराखंडचे उद्योजक, निर्यातदार, विशेषतः सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीत समाविष्ट करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना भरत सिंह चौधरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत, त्यांनी नमूद केले की ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांसोबतचे आधुनिक मुक्त व्यापार करार भारतीय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शून्य-शुल्क किंवा प्राधान्यपूर्ण कमी-शुल्कात प्रवेश मिळवून देत आहेत.

राज्याच्या औद्योगिक प्रगतीबद्दल बोलताना चौधरी यांनी सांगितले की, उत्तराखंडची निर्यात 2017-18 मधील 10,836 कोटी रुपयांवरून 2025-26 मध्ये 13,802 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. यामध्ये औषधनिर्माण, अभियांत्रिकी वस्तू, अन्न प्रक्रिया, सेंद्रिय आणि हर्बल उत्पादने आणि हस्तकला यांचा प्रमुख वाटा आहे. ‘इन्व्हेस्ट उत्तराखंड’ या एक-खिडकी पोर्टलद्वारे, गेल्या तीन वर्षांत 70,397 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या 6,932 प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे, त्यांनी अशीही माहिती दिली. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2024 आणि गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 मध्ये उत्तराखंडने आपल्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

डोंगराळ जिल्ह्यांमध्ये औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी पौडी, चमोली आणि अल्मोरा येथे समर्पित औद्योगिक पार्क उभारले जात असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. हरिद्वारमध्ये 194 कोटी रुपयांच्या फ्लॅटेड फॅक्टरीच्या स्थापनेनंतर, सेलाकी आणि पंतनगर येथेही अशाच प्रकारच्या प्लग-अँड-प्ले सुविधा सुरू प्रस्ताव आहे. तसेच, किच्छा येथील खुरपिया येथे 1,100 कोटी रुपये खर्चून 1,002 एकरवर पसरलेला एक एकात्मिक उत्पादन समूह (IMC) देखील विकसित केला जात आहे. याव्यतिरिक्त, लॉजिस्टिक्स आणि व्यापार पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हरिद्वारमध्ये एक मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि बनबसा येथे एक भू-सीमाशुल्क केंद्र विकसित केले जात आहे. ‘हाऊस ऑफ हिमालया’ आणि ‘हिमाद्री’ यांसारखे उपक्रम पारंपरिक हस्तकला, ऐपन कला, भरडधान्ये आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यास मदत करत आहेत.

सौरभ गहरवार यांनी उत्तराखंडची औद्योगिक परिसंस्था आणि निर्यात प्रोत्साहनासाठीचा आराखडा (रोडमॅप) मांडला. अमित वर्मा आणि निखिल वर्मा यांनी भारताचे मुक्त व्यापार करार (एफटीए), शुल्क सवलती, 'रूल्स ऑफ ओरिजिन' (आरओओ), 'एक्सपोर्ट प्रमोशन मिशन' (ईपीएम) आणि निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला 'जिल्हे ही निर्यात केंद्र' (Districts as Export Hubs - DEH) उपक्रम, याबाबत सविस्तर माहिती दिली.

तांत्रिक सत्रांमध्ये अपेडा (एपीईडीए), एसईपीसी, ईपीसीएच, ईईपीसी, सीआयआय आणि पीएचडीसीसीआय मधील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. त्यांनी उत्तराखंडसाठी कृषी, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला, सेवा आणि अभियांत्रिकी वस्तू यांसारख्या क्षेत्रांमधील निर्यातीच्या संधींवर चर्चा केली. राज्य उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थितांना 'उत्तराखंड निर्यात धोरणांतर्गत उपलब्ध असलेल्या आर्थिक प्रोत्साहन योजना, गुणवत्ता प्रमाणन मिळवण्यासाठीचे सहाय्य आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली.

कार्यशाळेचा समारोप संवादात्मक प्रश्नोत्तराच्या सत्राने झाला, यामध्ये निर्यातदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट आपले प्रश्न आणि अभिप्राय मांडले. या चर्चेमुळे संबंधित घटकांना भारताच्या मुक्त व्यापार करारांचे (एफटीए) फायदे समजून घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उत्तराखंडची उपस्थिती वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

15 जुलै 2026 रोजी अमलात आलेला युनायटेड किंगडमबरोबरच मुक्त व्यापार करार, भारताच्या सुमारे 99 टक्के निर्यातीसाठी शुल्कमुक्त प्रवेश प्रदान करतो. 1 जून 2026 पासून लागू झालेला ओमानबरोबरच करार, भारताच्या एकूण निर्यातीपैकी 99.38 टक्के निर्यातीसाठी (मूल्यानुसार) शुल्कमुक्त प्रवेश देतो. याव्यतिरिक्त, भारताने 2022 पासून संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही मुक्त व्यापार करार केले आहेत.

भारत-युरोपियन युनियन (ईयु) करार अमलात आल्यानंतर, ईयु च्या 70.4 टक्के टॅरिफ लाईन्सवर (शुल्क श्रेणी) शुल्क रद्द केले जाईल, यामध्ये भारताच्या एकूण निर्यात मूल्यापैकी 90.7 टक्के हिस्सा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित 20.3 टक्के टॅरिफ लाईन्सवरील शुल्क टप्प्याटप्प्याने काढून टाकले जाईल. हा करार 2027 च्या सुरुवातीला लागू होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेबरोबरच्या अंतरिम कराराची रूपरेषा 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाली असून, त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. कॅनडाबरोबरच्या वाटाघाटींची सहावी फेरी 11 ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पार पडली. शेतकरी, उद्योग, व्यावसायिक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रत्यक्ष लाभ देणारा करार साध्य करणे, हे या या वाटाघाटींचे उद्दिष्ट होते. याव्यतिरिक्त, चिली, पेरू, इस्रायल आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन तसेच मेक्सिको आणि इतर भागीदारांबरोबरही वाटाघाटी सुरू आहेत.

हे संपर्क उपक्रम, भारताच्या व्यापार करारांचे लाभ विविध राज्यांमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महिला आणि तरुण उद्योजक, यासह इतर निर्यातदारांपर्यंत पोहोचवण्याच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत.

***

नितीन फुल्लुके / राज दळेकर / श्रद्धा मुखेडकर / राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2343012) अभ्यागत कक्ष : 5