गोवा, 27 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी (IFFI - International Film Festival of India) अंतर्गत आज पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने (PIB) आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय चित्रपटकर्मी आनंद एल. राय यांनी सहकारी परीक्षक सदस्यांसह उपस्थितांसोबत संवाद साधला. या सगळ्यांनी सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या 15 कथात्मक चित्रपटांच्या (फीचर) परीक्षण प्रक्रियेचे आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी परीक्षक सदस्यांनी या प्रक्रियेअंतर्गतचे सिनेमॅटिक अभिव्यक्तीतील विविधता, सांस्कृतिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण आणि सिनेमाच्या बदलत्या भाषेबद्दलचे आपले अनुभव उपस्थितांसोबत सामायिक केले. हा अनुभव म्हणजे शिकण्याची एक संधी असल्याची भावना चित्रपटकर्मी आनंद एल. राय यांनी व्यक्त केली. विविध देशांतील आणि संस्कृतींतील चित्रपट पाहणे आणि त्यानंतर परीक्षक सदस्यांमध्ये झालेल्या चर्चांमधून प्रत्येक कलाकृतीमागील सर्जनशील पसंती आणि सांस्कृतिक संदर्भांची दृढ जाणीव झाल्याचे ते म्हणाले. मी परीक्षक म्हणून आलो होतो, पण चित्रपट पाहताना मी सिनेमाचा विद्यार्थी झालो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

समीक्षकांचा दृष्टीकोन स्पष्ट करताना राय म्हणाले की निवड प्रक्रिया खुल्या व उत्स्फूर्त चर्चांद्वारे झाली. कोणताही पूर्वग्रह नव्हता किंवा चित्रपट कोणत्या देशातील आहे, याचा विचार केला गेला नाही. ही प्रक्रिया संपूर्णपणे स्वतंत्र होती; सदस्यांनी मुक्तपणे आपले मत व दृष्टीकोन सांगितला. "खरेतर माझ्यासाठी हे खूपच स्वाभाविक होते. हे कसे सांगावे मला कळत नाही, मात्र आम्ही आमच्या मनातले बोललो, इतकेच," असे ते म्हणाले. ही चर्चा निकोप व समृद्ध करणारी होती, चित्रपटातील एकाच प्रसंगाबाबतचा दृष्टीकोन वेगळा असूनही बरेच वेळा सदस्यांचे एकमत झाले, असेही त्यांनी सांगितले.
चित्रपट हा सातत्याने विकसित होणारा कला प्रकार आहे यावर भर देत राय म्हणाले की चित्रपटकर्त्यांनी आपण कोणत्या भाषेत काम करतो, याला महत्त्व न देता, चित्रपटांच्या परिभाषेत होणाऱ्या बदलांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. “चित्रपट हा एक अनुभव आहे, भावनेचा किंवा तिच्या अभिव्यक्तीचा अनुभव. प्रत्येक चित्रपटाने तुम्हाला काहीतरी दिले पाहिजे. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही पहिल्यासारखे न राहता तुमच्यात काहीतरी बदल घडला पाहिजे,” असे ते म्हणाले. चित्रपटांच्या परिभाषेला आकार देण्याचे काम अंतिमतः भाषेपेक्षा चित्रपटनिर्माते करतात, असेही ते म्हणाले.

आपला चित्रपट आधीच्या इफ्फीमध्ये समारोपाचा चित्रपट म्हणून प्रदर्शित केला गेल्यानंतर इफ्फीमध्ये परतलेले थाई चित्रपटनिर्माते रचापूम बूनबंचाचोक यांनी, परीक्षक मंडळातील सदस्यांची वेगवेगळी पार्श्वभूमी त्यांच्या चर्चा समृद्ध करणारी ठरली, असे अधोरेखित केले. ते म्हणाले की चित्रपटाचा भावनिक परिणाम त्याच्या केवळ तांत्रिक सर्वोत्कृष्टतेपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. “चित्रपट दिग्दर्शक तंत्रज्ञानाचा वापर प्रेक्षकांवर भावनिक परिणाम साधण्यासाठी कशाप्रकारे करतो याला महत्त्व आहे,” ते म्हणाले.
_20261127193224_00b9fa.jpeg)
कोलंबियाच्या संगीत रचनाकार मारिया अलेक्झांड्रा रोजस यांनी हा अनुभव चित्रपट निर्मितीनंतरच्या व्यावसायिक कामांच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरला असे सांगितले. त्या म्हणाल्या की ही चर्चा वैचारिकदृष्ट्या संपन्न करणारी होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरचे शांततेचे क्षणदेखील चर्चेच्या सखोलपणात भर टाकणारे होते.
अर्जेंटिनाच्या चित्रपट निर्मात्या आणि पटकथालेखिका सोल बेरुएझो पिचॉन-रिव्हिएरे यांनी महोत्सवातील चित्रपटांच्या निवडीत विविध विचारांना आणि मतांना स्थान दिल्याबद्दल कौतुक केले. प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कदाचित पुरेसे लक्ष न मिळालेल्या चित्रपटांसह, विविध देश, संस्कृती आणि निर्मिती स्तरांवरील चित्रपटांना इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.
_20261127193424_9d1523.jpeg)
रोमानियाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते बोगदान मुरेशानू यांनी यंदाच्या महोत्सवातील चित्रपटांची निवड अत्यंत दर्जेदार असल्याचे सांगितले. जगाच्या विविध भागांतून आलेल्या परीक्षकांच्या आवडीनिवडींमध्येही लक्षणीय साम्य आणि एकवाक्यता दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रपटांचे प्रदर्शन झाल्यानंतर परीक्षकांमध्ये होणाऱ्या चर्चांची आठवण सांगताना ते म्हणाले, “प्रत्येक चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही त्यातील काय आवडले आणि काय आवडले नाही, यावर लगेचच चर्चा करत असू. त्या चित्रपटांच्या कथांमध्ये आम्ही इतके गुंतून जात असू की, पुढच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्या अनुभवात आणखी काही काळ रमण्याचा आनंद आम्हाला मिळत असे.” इतर परीक्षकांचे विचार ऐकून घेणे आणि चित्रपटांकडे पाहण्याचे त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.
परीक्षकांच्या या अनुभवातून विविध देशांतील चित्रपट परंपरांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आणि त्यांच्यात संवाद घडवून आणण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट झाली. अशा महोत्सवांमुळे एकमेकांकडून शिकण्याची आणि चित्रपटांचा अधिक व्यापक दृष्टिकोनातून आस्वाद घेण्याची संधी मिळते, हेही अधोरेखित झाले.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन रजित चंद्रन यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/सुरेखा जोशी/आशुतोष सावे/दर्शना राणे