57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

विस्थापन, ओळख आणि आपलेपणाचा शोध - ‘पॅरिस पॅरिस’ चित्रपटातून घरापासून दूर नवे घर उभारण्याचा प्रवास


स्थलांतर आणि आपले म्हणता येईल अशा घराच्या शोधाचा सार्वत्रिक अनुभव मांडणाऱ्या ‘पॅरिस पॅरिस’ चित्रपटाविषयी बेल्जियन चित्रपट दिग्दर्शिका इसाबेल टोलनेरे यांनी इफ्फी 2026 मध्ये व्यक्त केले विचार

Posted On: 27 NOV 2026 1:47PMby PIB MumbaiRelease ID: 2342525Views: 5

गोवा, 27 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरू असलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, बेल्जियन चित्रपट दिग्दर्शिका इसाबेल टोलनेरे यांनी आपल्या ‘पॅरिस पॅरिस’ या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया तसेच स्थलांतर, विस्थापन आणि आपलेपणा या विषयांवर विचार मांडले. आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात समाविष्ट असलेला हा चित्रपट फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे राहणाऱ्या तीन पुरुषांच्या जीवनातून ‘घर’ या संकल्पनेचा अर्थ उलगडतो.

पॅरिसमधील एका इमारतीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘पॅरिस पॅरिस’ हा चित्रपट वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या तीन पुरुषांची कथा मांडतो. अनधिकृतपणे ताब्यात घेतलेल्या एका सदनिकेत स्वतःसाठी हक्काचे घर उभारण्याचा त्यांचा प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मर्यादित साधनसामग्रीचा एकत्रित वापर करताना आणि आपल्या भूतकाळातील आठवणी तसेच भविष्याविषयीच्या अपेक्षांवर संवाद साधताना हे तिघेही ओळख, विस्थापन आणि आपलेपणाशी संबंधित प्रश्नांना सामोरे जातात. विविध संस्कृतींमधील लोकांना एकमेकांशी जोडणारे मानवी अनुभव या चित्रपटातून प्रभावीपणे गुंफण्यात आले आहेत.

पहिल्यांदाच भारतात आल्याबद्दल आनंद व्यक्त करताना टोलेनेरे म्हणाल्या की, इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट सादर करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान आहे. आदल्या दिवशी झालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सभागृह पूर्णपणे भरले होते, असे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या रंजक प्रश्नोत्तरांच्या सत्रामुळे भारतीय प्रेक्षकांशी संवाद साधता आला आणि चित्रपटाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याची संधी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. 

आपल्या सर्जनशील दृष्टिकोनाविषयी बोलताना टोलेनेरे यांनी सांगितले की, माहितीपट निर्मितीच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव कलाकारांची निवड करताना बराच कामी आला. ज्या कलाकारांचे वैयक्तिक अनुभव आणि जीवनप्रवास चित्रपटातील त्यांनी साकारायच्या व्यक्तिरेखांशी मिळतेजुळते होते, अशा कलाकारांची त्यांनी निवड केली.

चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आलेल्या आव्हानांविषयीही या चित्रपट निर्मात्या बोलल्या. कमी आर्थिक तरतुदीमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि चित्रीकरणासाठी योग्य ठिकाणे शोधताना आलेल्या अनुभवांचा त्यांनी उल्लेख केला. चित्रपटामागील वैयक्तिक प्रेरणेविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, त्यांचे आजी-आजोबा स्थलांतरित होते. त्यांच्या या अनुभवामुळे स्थलांतर, विस्थापन आणि आपलेपणाची भावना या विषयांमध्ये आपल्याला रुची निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.

चित्रपटाविषयीच्या अपेक्षा व्यक्त करताना टोलेनेरे म्हणाल्या की, हा चित्रपट विविध देशांतील आणि संस्कृतींतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची इच्छा आहे. चित्रपटातील वैश्विक विषय आणि सामायिक मानवी अनुभव यांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांशी त्याला जोडता यावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन अँड्र्यू लालछंदामा यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद पहा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/आशुतोष सावे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342525
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026