Posted On:
25 NOV 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
जल शक्ती मंत्रालयाचा पेय जल आणि स्वच्छता विभाग, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे प्रशिक्षण महासंचालनालय यांच्यात जल जीवन मिशन 2.0 (जेजेएम 2.0) अंतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेचे संचालन आणि देखभाल कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम –‘नल जल मित्र’साठी आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराला ग्रामीण भागातील पेय जल पायाभूत सुविधांची दीर्घकालीन शाश्वतता निश्चित करण्याच्या आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

हा सामंजस्य करार जल शक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील आणि राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथे जल शक्ती मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
व्याप्ती आणि आर्थिक तरतूद - या सामंजस्य करारांतर्गत जल जीवन मिशनच्या विस्तारित कालावधीत किमान 1,00,000 (एक लाख) उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी अंदाजे 111.93 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च पेय जल आणि स्वच्छता विभागाच्या विभागस्तरीय खर्चाच्या तरतुदीतून केला जाणार आहे.

लक्ष्यित गट आणि दुहेरी प्रमाणपत्र - आयटीआय आणि एनएसटीआय यांच्यातील कारागिर प्रशिक्षण योजना - सीटीएसच्या फिटर आणि प्लंबर व्यवसाय अभ्यासक्रमांचे विद्यमान प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी हा अभ्यासक्रम ऐच्छिक पूरक अभ्यासक्रम म्हणून उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्राबरोबर प्रशिक्षण महासंचालनालयाकडून राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा सुसंगत अल्पकालीन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिले जाईल.
अंमलबजावणी आणि प्रशासन - प्रशिक्षण महासंचालनालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय शिक्षणविषयक माध्यम संस्था (एनआयएमआय) ही प्रशिक्षण भागीदार म्हणून काम पाहील. निधीचे वितरण, प्रशिक्षणाचे समन्वयन, मूल्यांकन आणि प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या या संस्थेकडे असतील.
शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai